Sunday, September 28, 2008

प्रिय मित्रा!!

क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या 'प्रिय' या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही

या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे....

-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच

हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखवून जाण्यासाठी..

या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भितीही वाटली.

प्रिय मित्रा,
मला सांग रे
तात्कालिकची मर्यादा किती?
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?

सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!

-नी

Saturday, September 20, 2008

सूर्यास्त





गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.

Friday, September 19, 2008

ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी

"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

Search This Blog