Sunday, September 27, 2009

माझा 'श्वास' - ४

आधीच्या एका प्रकरणात म्हणल्याप्रमाणे पटकथेच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रीकरण स्थळे शोधणे. त्याप्रमाणे संदीप पुणे परीसरात आणि कोकणातही फिरत होताच. सुरूवात कुठे झाली ते वर आलंच आहे. आत्तापर्यंत त्याने बघितलेल्या जागा पटकथेला आकार देत होत्या. व्यक्तिमत्व देत होत्या. पटकथा अधिक जिवंत व्हावी यासाठी मदत करत होत्या.

आता या अनेक जागांच्यातून प्रत्यक्ष चित्रीकरणाची स्थळे नक्की करायची होती. त्यांचे तपशील जमवायचे होते. त्यांच्या कानाकोपर्‍यासकट. पटकथेचा पोत, व्यक्तिरेखांचं अस्सलपण दिसण्यात अधोरेखित करणार्‍या जागा आता नक्की करायच्या होत्या.

आतापर्यंत पटकथेतील किंवा दिग्दर्शकाच्या डोक्यात असलेली चित्रपटाची दृश्य संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रक्रिया आता सुरू होत होती. चित्रपटाची दृश्य संकल्पना म्हणजे संपूर्ण चित्रपट कसा दिसणार आहे, चित्राचे रंग, पोत, त्यातल्या रेषा कश्या कश्या असणार आहेत, त्यात कश्या कश्या तर्‍हेने काय स्वरूपाचे दृश्यबदल होणार आहेत याचा एक आराखडा. यातील बदल हा केवळ स्थळबदलापुरताच अपेक्षित नाही. सगळ्या दिसण्यातून येणारा, निर्माण होणारा अनुभव महत्वाचा आहे. त्यामुळे नदीचा तीर म्हणला की नदीच्या पाण्याचा रंग (सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी), नदीचं वळण, तीरावरची झाडी, त्यांची हिरवाई, गवताचे रंग, मातीचा किंवा वाळूचा पोत हे सगळं सगळं बारकाईने समजून घेऊन आपल्या आत उतरवावं लागतं. इथे visual designer चं काम सुरू होतं. दिग्दर्शकाच्या डोक्यात या सगळ्या गोष्टींचा उत्तम अंदाज होता. आणि याबाबतीतला उरला हातभार द्यायला छायालेखक संजय मेमाणे होता आणि मीही होतेच.

दिग्दर्शकाची पटकथेची, व्यक्तिरेखांची व दृश्याची हाताळणी हे सगळं समजावून घेतल्याशिवाय दिग्दर्शकाच्या कल्पनेतलं दृश्य आमच्या कल्पनेशी मेळ खाणार नव्हतं त्यामुळे कोकण फिरताना दिग्दर्शकीय संकल्पना आपल्या आत उतरवणे हे महत्वाचंच. अर्थात माझ्या सुदैवाने बरेच आधिपासुन मी हे करतच होते. दिग्दर्शकाला सगळाच धुंडाळत होते तेव्हा हाताला लागलेल्या बर्‍याच गोष्टींबरोबर हे सगळे होतेच.

पहिली लोकेशन बघण्याची ट्रिप कधी झाली ते मी आधी सांगितलंच आहे. नंतर मात्र आम्ही खरोखरच लोकेशन शोधण्यासाठी, अभ्यासासाठीच कोकणात, सिंधुदुर्गात फिरलो.

प्रत्येक जागेचे तपशील गोळा करण्याची पद्धत तशीच. जाउ त्या प्रत्येक ठिकाणी होकायंत्र ठेवून सगळ्या दिशा, सुर्यप्रकाशाच्या दिशा, झाडे, डोंगरकडे, समुद्राचा किनारा इत्यादी इत्यादी लिहून किंवा चित्र काढून ठेवायचं. फेब्रुवारी मार्चच्या सुमारास शूट होणार त्यामुळे त्यावेळेला तीच जागा कशी असेल याचा अंदाज घ्यायचा. अश्या सगळ्या अगदी मूलभूत गोष्टी करतच होतो पण त्याआधी मुळात कोकणातली दृश्ये म्हणजे फोनच्या दृश्यातले कटस आणि शेवट सोडला तर सगळा आठवणीतला मामला आहे. तेव्हा आजोबा आणि परश्याच्या भावविश्वाशी निगडीत सगळ्या जागा हव्यात. आणि दृश्य त्या त्या वेळेच्या मनस्थितीत परश्या किंवा आजोबांना जे आठवू शकेल त्याच्याशी संबंधित हवे. कथेला, कथेतल्या परिस्थितीला, अनुभवाला अधोरेखित करणारे हवे. हा सगळा तोल सांभाळत सगळा भाग अभ्यासायला लागलो. एका ६ वर्षाच्या मुलासाठी कोकणातल्या छोट्या गावातलं खाउन पिउन सुखी आयुष्य कसं कसं असेल, त्याच्या जगात कोण कोण आणि काय काय असेल ह्याचा अंदाज घेणं हेही सुरू केलं. ही प्रक्रीया दोन बाजूंनी होत होती. संदीपने परश्याबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल मोजके संदर्भ दिले होते. त्या संदर्भाशी मिळणार्‍या व्यक्तिरेखा दिसतायत का शोधणं आणि संदीपने दिलेल्या संदर्भातून ती व्यक्तिरेखा आपल्या डोक्यात उभी करत जाणं. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून होत्याही आणि नाहीही पण कोकणातली स्थळं(चित्रीकरणासाठीच!) शोधतानाच व्यक्तिरेखांचा अभ्यास चांगला होत होता.

परश्याच्या घरात आधुनिक वस्तुंची समृद्धी आणि चकचकाट नसणार होता पण अठरा विश्वे दारीद्र्यही नसणार होतं. अचानक चार माणसं आली तर आमटीभाताला घर महाग असणार नव्हतं. उन्हातून ताबडत आलेल्या अनोळखी पाहुण्याला पटकन झाडावरून उतरवून गार शहाळं देण्याची वृत्ती आणि सुबत्ता दोन्हीही परश्याच्या घरात असणार होती. अनोळखी पाहुण्याला आपलसं करेल असं प्रसन्न अंगण आणि उघडं दार असणार होतं. आणि अश्या घरात रहाणारे लोक हे परश्या, आजोबा, परश्याचे आईवडील असणार होते.

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळच्या आधी काही किलोमीटर ओरोस म्हणून एक गाव लागतं तिथे राजधानी नावाचं हॉटेल आहे. राजधानीचे आनंद डिचोलकर हे संपुर्ण सिंधुदुर्ग फिरलेले आहेत. निवतीचा किल्ला, भोगव्याचा समुद्रकिनारा या काही गोष्टी त्यांच्याच पोतडीतून आम्हाला कळलेल्या.

सकाळी ८ पर्यंत ओरोसचं राजधानी सोडायचं आणि कुडाळ, मालवण व वेंगुर्ले या पट्ट्यातला एकेक भाग बघत बघत जायचा आणि रात्री ९ - १० पर्यंत कधीतरी परत यायचं असा या ट्रिप्सचा दिनक्रम असायचा. आधीच्या पाटीपासून पुढच्या पाटीपर्यंतचे किलोमीटर, कुठला फाटा कुठून कुठे किती अंतरावर आहे इत्यादी सगळं लिहून ठेवत परश्याचं घर शोधत जायचं. परश्याचं शेत, परश्या मुंबईहून परत येईल तो नदीकाठ सगळं सगळं शोधत फिरायचं. आपल्या संकल्पनेच्या जवळचं काही दिसलं की गाडीतून उतरायचं आणि कुण्या अनोळख्याच्या अंगणात जाऊन त्यांच्याच घराची पहाणी करायची. कुणी विचारलं तर सगळा पाढा वाचायचा.... का, कशासाठी इत्यादी इत्यादी. मग कुणी अगत्याने गुळपाणी देत नाहीतर कंटाळल्या चेहर्‍याने माना डोलावूनच हो नाही म्हणत. एखाद्याचं घर लांबून छान वाटे पण अंगणात गेल्यावर संदीपचा चेहरा नकार देताना दिसे. असं करत करत सगळा परीसर पिंजून काढत होतो.

असं करता करता सिंधुदुर्गातला एकेक खजिना समोर येत होता. कोकण समजत होतं. तिथला माणूस, त्याच्या जिव्हाळ्याच्या जागा त्याही समजत होत्या.

फिरता फिरता एक दिवस गाडीने पाट(हे गावाचे नाव आहे!) सोडले आणि थोड्यावेळाने परुळ्यामधे प्रवेश केला. आज पाट परुळे हाच पट्टा होता. उजव्या बाजुला डोंगर असल्याने तिकडे काही घरं सापडणार नव्हतीच. डाव्या बाजुला दरी होती त्यामुळे इथे काय असणार अश्या विचारात होतो तेवढ्यात डावीकडे रस्त्यापासुन थोडं खोल काहीतरी सुंदर दिसलं. खरंच दिसलं की भास म्हणून ड्रायव्हर ला गाडी मागे घ्यायला सांगितली आणि गाडी थांबवून पाह्यलं. एक हसरं अंगण, कौलारू घर आणि पांढरा चाफा आमच्याकडे बघून खुदखुदत होता.

हेच ते घर आणि चाफा. पण ही फ्रेम चित्रपटातली आहे. त्यामुळे आस्पेक्ट रेश्यो सिनेमास्कोप आहे. १:२.३५ असा.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

केवढी मेहनत घ्यावी लागते , घेतली जाते याची आम्हाला काहीच कल्पना नसते. परिपुर्णतेचा ध्यास घेतल्याशिवाय अजरामर कलाकृती होणे कठीण.

चित्रपट पहातांना परश्याच्या वेदना ह्या पहाणाऱ्यांच्यापण झाल्यामुळे हे सारे तितकेसे जाणवले गेले नव्हते.

आता ही सारी पाश्वभुमी जाणुन घेतल्यानंतर अधिक प्रगल्भेने चित्रपटाचा रसस्वाद घ्यायला मिळेल.

परत एकदा "श्वास " पहायला हवा

New Template is beautiful

HAREKRISHNAJI said...

आज परत एकदा "श्वास’ पाहिला.

शरिरात एखादा अवयव नसल्याने काय होते ते आम्हाला चांगले ठावुक आहे.
या सारख्या वेदना आम्ही देखिल अवलंबल्या आहेत

घरात आम्हा सर्व भावंडांची Splenectomy शाळॆत असतांना झाली आहे. लाखात एखाद्यालाच असणारा त्रास. सर्व जण दोनचार वेळा मरणाच्या दाऱाला भोज्या करुन आलेले आहोत.

हे सारे परत श्वास बघतांना आठवले.

Search This Blog