Monday, March 8, 2010

परत ब्लॉगिंगबद्दलच..


मराठी मंडळी नावाचा एक उपक्रम चालू झालाय. छान आहे. लगोलग सदस्यत्व घेतलंय. बाजूला लोगो पण टाकलाय. पण अजून सगळं प्रकरण समजायला वेळ लागणार बहुतेक. माझ्या ब्लॉगवर लिहिल्यावर तिथे माझं नवीन लिखाण दिसू लागेल की तिथे जाऊन वेगळं लिहावं लागेल हे नीटसं कळलेलं नाहीये. अश्या ठिकाणी माझं अ-तांत्रिक असणं जाणवतं.
सध्या मुंबईच्या बाहेर आणि तेही नेट अ‍ॅक्सेस नसेल अश्या ठिकाणी फिरणे खूप चालू आहे कामानिमित्ताने. सावंतवाडीमधे नेट कॅफे आहे पण तिथे त्यांच्या वेळेत पोचणे शक्य नसते. यामुळे ६-७ दिवसांनीच एकदम मेलबॉक्स उघडला जातो. तसा पर्वा उघडला. मेल्स चा पाउस होता. आपण काही इतक्या लोकप्रिय नाही हे माहीत असल्यामुळे मी हरभर्‍याचं झाड गाठलं नाही. अर्ध्याहून अधिक फॉरवर्डस, विविध साइटसवर येण्यासाठी कुणी कुणी पाठवलेली आर्जवी निमंत्रणं, ऑफर्स, नियमितपणे येणारी न्यूजलेटर्स इत्यादी कचराच जास्त होता. पण त्याबरोबरच एक मोठ्ठा गठ्ठा ब्लॉग संदर्भातल्या मेल्सचा होता. माझ्या ब्लॉगसंदर्भातल्या नाही. इतरांनी त्यांचं ब्लॉगवरचं किंवा इतर संकेतस्थळांवरचं लिखाण/ फोटो जोडून, चिकटवून पाठवलेल्या मेल्स खूप होत्या. आणि त्या लिस्टमधून काढून टाकण्याची विनंती करणारे अनेक रिप्लाय ऑल्स. ही विनंती रिप्लाय ऑलमधे करू नका सांगणारे अजून रिप्लाय ऑल्स. या सगळ्या अंदाधुंदीत मूळ लिखाण पाठवणारा गप्प होता. पण त्याने पुढचं लिखाण/ फोटो परत पाठवलं होतं वेगळ्या मेलमधे.  आता तुमचा ब्लॉग आहे ना? तिथे लिहिलंत की नवीन लिखाण असेतो ते ब्लॉगविश्व, मराठी मंडळी, ब्लॉगअड्डा अश्या अनेक ठिकाणी दिसतं ना? मग परत हे असं मेलमधून का पाठवायचं? चार मित्रमैत्रिणींना पाठवलं तर एकवेळ ठिके पण असं सगळ्या ओळखीच्या अनोळखीच्या लोकांना कशाला? सगळ्यांचं सगळं सगळ्यांनी वाचायचं ठरलं तर माणसाने आपापलं काम कधी करायचं? आणि आपला ब्लॉग कधी लिहायचा? फॉरवर्डस, ऑफर्स, लिंक्डइन - फेसबुक- ट्विटरच्या आर्जवी विनंत्या असा कचरा जो जमा होत असतो त्यातच या मेल्स जातात जर तुम्हाला मी ओळखत नसेन तर. आणि एवढ्या कचर्‍यातून एखादी महत्वाची मेल जेव्हा सुटते तेव्हा जाम घोळ होतो. असो तर ही कळकळीची विनंती की मेलमधून नवीन पोस्ट चिकटवून, लिंकून कशीही पाठवू नये. तुम्ही माझे जवळचे मित्र/मैत्रिण नसाल तर ते न उघडता डिलिट केलं जाईल.
मधे एका सामाजिक संस्था म्हणवून घेणार्‍या संकेतस्थळाने इ-मासिक सुरू केले. त्यात त्यांना माझे काही लिखाण घ्यायचे होते. आमचं सामाजिक काम पहा आणि तुमचं काही लिखाण आमच्याकडे समाविष्ट करायची परवानगी द्या अशी त्यांची मेल आली. संस्थेच्या संकेतस्थळावरून मला तरी त्यांच्या सामाजिक कामाचा नक्की फोकस काय आहे याचा बोध झाला नाही. आणि ते करत असलेल्या कुठल्या कामाशी माझं लिखाण संबंधित आहे हे ही कळलं नाही. तसेच काही लिखाण समाविष्ट करायची परवानगी हे ही कळले नाही. ते तसे मी कळवले. ठराविक चार लेख अजिबात घेऊ नयेत. इतर लिखाणापैकी नक्की कुठले ते शीर्षक आणि लिंकसकट कळवावे म्हणजे मी त्या त्या प्रमाणे विचार करू शकेन असे उत्तर मी पाठवले. यावर बरेच दिवस काहीच उत्तर नाही आले म्हणून मी परत विचारणा केली असता अपमानास्पद उत्तरे या सामाजिक संस्थेच्या सचिव आणि कोशाध्यक्ष यांच्याकडून मिळाली. संस्थेच्या अध्यक्षांना फोन केला असता त्यांनी अर्थातच सहकार्‍यांची पाठराखण केली. तुमच्या ब्लॉगवर आमची संस्था चालत नाही असेही ऐकवले. आणि एक दिवसात मी माझ्या सहकार्‍यांशी बोलून तुम्हाला कळवतो असेही सांगितले. तो एक दिवस कधीच पूर्ण झाला नाही. त्या माणसाचा फोनही आला नाही. ते अर्थातच अपेक्षित होते. सामाजिक संस्था म्हणून रजिस्ट्रेशन करून त्यात अध्यक्ष, सचिव आणि इतर पदे निर्माण करून आपापसात ती वाटून घेऊन मोठा देखावा उभा करणे हे फारसे काही अवघड नाही. त्यामुळे अश्या पदांची लेबले चिकटवलेल्या लोकांकडे परीपक्वतेचा अभाव असण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. सामाजिक संस्था असं लेबल दिल्यावर आपण फार महान कार्य करत असल्याचा साक्षात्कार पहिल्याच दिवशी त्यांना होत असावा. त्यामुळे इतक्या महान असण्याच्या जाणिवेपोटी हे असं इतरांना कस्पटासमान लेखणं होत असावं.
असो..
सगळा पत्रव्यवहार, संस्थेचे नाव, इतर पदाधिकार्‍यांची नावे, त्यांची मुक्ताफळे हे सगळंच इथे जाहीर करणं माझ्यासाठी सोपं होतं, आहे. पण त्यात मला रस नाही. आपल्या ब्लॉगवरचं लिखाण कोण कशासाठी, कुठल्या पडद्याआड, काय अ‍ॅप्रोचने मागतंय याबाबत थोडं जागरूक रहावं ब्लॉगर्सनी एवढंच सांगण्याचा यामधे हेतू आहे. कुणी सांगावं तुम्ही भविष्यातले खरोखरीचे महान साहित्यिक होऊ घातलेले असाल आणि मग एकदा नावारूपाला आल्यावर चित्रकाराने सुरूवातीच्या काळात ओढलेल्या रेघोट्याही महत्वाच्या ठरतात तसं तुमचं आत्ताचं लिखाण महत्वाचं ठरेल. तेव्हा नाही त्या लोकांनी त्यावर आपला हक्क दाखवू नये यासाठीतरी  जागरूक रहा.
बाकी ब्लॉगच्या प्रतिक्रियांना उत्तरांबद्दल... तिथेच उत्तरे देण्याची सवय लावते आहे.
पण आता हळूहळू जाळ्यावरचे तास कमी कमी होत जाणार माझे त्यामुळे उत्तरे देणंही कमी होणार.
आणि लिखाण तर पारच थांबणार. तेव्हा यंज्जॉय्य!!!
-नी

7 comments:

सुसाट said...

नीधप आपला फॉंट म्हणजे लिपी लय लहान आहे. तेव्हा वाचण्याअस क्लेष होतो.

नीरजा पटवर्धन said...

badal kele aahet

मीनल said...

अगदी समर्पक बोललात.. मीही मूळ ईमेल पाठवणार्‍याला ’वगळा’ म्हणून रिप्लाय केला.(टू ऑल केले नाही) स्पॅम म्हणून मार्क करणे हा एकच पर्याय असेल का?

Anand Ghare said...

'स्पॅम' असे मार्क करण्यापेक्षा वेगळा उपाय मलाही दिसला नाही. 'मला वगळा' असे तरी कुणाकुणाला कळवणार? असे कळवणा-यांच्याच मला जास्त मेल आल्या.

Anonymous said...

kharach khup upyogi mahiti dilis. (ag tu g mhatal tar chalel as gruhit dharalay. Aawadal nasel tar saang(a).)
blog warchya lekhan chaouryacha wishay maratho boggers chya melawyat charchela aalach hota. he aani ase anubhav saglyani ekhadhya common blogwar share karnyachi garaj aahe.
Abhari aahe.

नीरजा पटवर्धन said...

Sonal,
common blog cha mudda agadich patala ani aavadala.

सौरभ said...

कड्डक

Search This Blog