Thursday, June 3, 2010

कविता होताना!

"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं.
मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे?
खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं...
मग मैत्रिणीने कोडंच घातलं...
"परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी....
कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?"
असं आहे होय.. अतीव कंटाळलेल्या घामट आणि सरभरीत अवस्थेत फेबुवर माझा संचार चालू होता. अचानक काहीतरी चुकीच्या टिचक्या पडल्या बहुतेक आणि सगळं काही एकाखाली एक दिसायला लागलं. जामच वैतागले. मी एकटीच का वैतागायचं पण लोकांनाही पकवू असं म्हणून जे झालं ते स्टेटसमधे टाकलं ते असं
"अचानक इथे हे असे काय झाले
रेखीले पान माझे विखरून गेले.....
माझा फेबु डिस्प्ले गंडलाय अचानक...."
लोकांना वाटणार मी कविता पाडतेय. लोक वाचणार आणि शेवटची ओळ वाचून त्यांचा पचका होणार. फालतू जोक म्हणून लोक चरफडणार इत्यादी इत्यादी वाटून मला जामच मजा आली. कसलं काय.. कोणी ढुंकून सुद्धा पाह्यलं नाही माझ्या स्टेटसाकडे. माझ्या विनोदाची फुलं अशी पार चुरगळली गेली... (इथे कमालीचे नाटकी हुंदके!)
पण तसं नव्हतं. मैत्रिणीला तरी वाटलं होतं मला कविता होतेय म्हणून. म्हणून तर हे फर्मान.
मला तर काडीचं काही सुचत नव्हतं. पण बेटी सांगायची ते आठवलं.
"शब्दखेळ करत रहा. त्यातूनच येईल एखादी भली कविता."
म्हणलं चला खेळून बघू शब्दखेळ. लगे हाथो मैत्रिणीच्या फर्मानाला मान पण दिल्यासारखं होईल.. स्मित
गप्पा पाऊस आणि ढगाच्याच चालू होत्या. केला शब्दखेळ...
"कसला ढग न कसलं काय...
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय! "
मैत्रिण हसली आणि बहुतेक मला मनातल्या मनात कोपरापासून हात जोडून गप्प बसली.
इथे माझ्या डोक्याला किल्ली बसली होती ना पण. शब्दखेळ पुढे सुरू केला.
जळमट धूळ जिकडे तिकडे
पसार्‍यात कायच सापडत नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
काम पडलीत, धामं अडलीत
लक्ष मुळी लागतच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
भूक नाही, झोपही नाही
कंटाळ्याने पसरले पाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं
शून्याचा पाढा घोकत जाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
कोपरा न कोपरा लख्ख केला
डोक्यामध्धे कायच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
असं काहीतरी निघालं डोक्यातून बाहेर. भली अशी नाही पण कविता तर झाली. बांध तर फुटला. तुम्हीही पकलात. सध्या मला इतकंच पुरे आहे.. स्मित
कधीतरी बरं लिहिण्याचं पण मनावर घेईन म्हणते... स्मित
-नी

Search This Blog