Thursday, October 27, 2011

मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २

----------------------------------------
कशे आसंत सगळे? बरा मां?
पुढची पुरचुंडी सोडतंय त्याआधी
एक म्हणजे माका फ्रेंच, स्पॅनिश आणि बाकीचो भाषा येऊक नाय. स्पेलिंग आणि उच्चार यांचा मेळ जमतलाच असा काय नाय तर माफीच करून टाका. आणि दुसरं म्हणजे हयसरलो डिस्क्लेमर परत वाचा बघू. स्मित
वाचलात. समजला मां? आता येवा पुरचुंडी बघूक.
पुरचुंडीत पयलो रत्न आसां
द मिनिस्टर (L'exercice de l'etat) - पियेर शूलर या दिग्दर्शकाचा हा फ्रेंच चित्रपट. एका ट्रान्सपोर्ट मिनिस्टरच्या आयुष्यातील काही घडामोडींभोवती ही घटना घडते. एका प्रचंड मोठ्या अपघातापासून कथा सुरू होते. मंत्र्याचं अत्यंत तणावग्रस्त आणि धावपळीचं आयुष्य, हा मंत्री कुठल्याही 'टायटल्ड' घराण्यातला नसणं, त्याला जनतेची चाड असणं हे त्यातून उलगडत जातं. मंत्री आणि त्याचा ड्रायव्हर यांच्यातलं माणुसकीचं मैत्रीपूर्ण नातं आपल्याला दिसतं पण त्याचा पार टडोपा करत नाहीत. मग रेल्वेस्टेशन्सचे खाजगीकरण या मुद्द्यावरून राजकारणातले बेरिजवजाबाकीचे खेळ आपल्यापुढे यायला लागतात. शेवटी या मंत्र्याला दुसर्‍या खात्यावर टाकून खाजगीकरणाचे गाडे पुढे सरकते. राजकारणाचे खेळ, मैत्री या शब्दाचा पोकळपणा, 'टायटल' चा युरोपियन सोस, एकटेपणा अश्या सगळ्या गोष्टींना घेऊन सिनेमाची गाडी पुढे जाते. नुसत्या राजकारणाच्या कोरड्या खेळापेक्षा मानवी स्वभाव आणि नात्यांना स्पर्श करत कथा जाते त्यामुळे कंटाळा येत नाही.

हयसर आसंय एक बाभळी..
लास अ‍ॅकेशियास (Las acacias) - अर्जेंटिना आणि स्पेनची निर्मिती असलेला, पाब्लो जिऑर्जेयी (Pablo Giorgelli) या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट. भाषा इस्पॅनोल (स्पॅनिश). पेरूग्वे ते ब्युनॉस आयर्स या रस्त्यावर ही कथा घडते. वर्षोनवर्षे याच रस्त्यावरून ट्रक चालवणारा एक ट्रक ड्रायव्हर रुबेनच्या आयुष्यातल्या वेगळ्या दिवसाची ही गोष्ट. प्रवासाच्या सुरूवातीला जेसिंता त्याच्या ट्रकमधे ब्युनॉस आयर्सपर्यंत लिफ्ट मागते. जेसिंताबरोबर तिची आठ महिन्यांची मुलगीही आहे. संपूर्ण प्रवासभर ते फारसे बोलत नाहीत पण तरी संपूर्ण अनोळखीपणापासून मैत्रीपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो फार सुंदर. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांच्या आयुष्याबद्दल भोचकपणे प्रश्न विचारून फुकटचे तत्वज्ञानाचे डोस ते एकमेकांना पाजत नाहीत. एकमेकांच्या खाजगीपणाचा आदर ठेवून एकमेकांचे प्रवासाचे साथी होतात, एकमेकांना गरज पडल्यास मदत करतात. या सगळ्यात छोट्या मुलीचं तिथं असणं हा पण एक सुंदर कॅटॅलिस्ट. चित्रपटाचा दिग्दर्शक स्क्रिनिंगनंतर बोलताना म्हणाला की मी लिहिलेल्या पहिल्या स्क्रिप्टमधे मी खूप बडबड लिहिली होती पण दुसर्‍या तिसर्‍या ड्राफ्टला येताना ती बडबड इतकी अनावश्यक वाटायला लागली आणि संवाद अगदी कमीतकमी झाले. जे काय प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं ते नुसत्या सीन्समधूनच पोचवता येईल हे लक्षात आलं. एकूणात चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनाबद्दलचा हा डोस मला फार महत्वाचा वाटला. अभिनयाबद्दल रुबेन, जेसिंता आणि बेबी अनाही तिघांची दृष्ट काढायला हवी. चित्रपट बघायला हवा. उरलेला दिवस प्रसन्न होऊन जाईल.

इथे आहे लंकेतून आलेला भुरभुर पाऊस
ऑगस्ट ड्रिझल (Nikini Vassa) - मी बघितलेला पहिला श्रीलंकन चित्रपट. दिग्दर्शन अरूणा जयवर्दना या दिग्दर्शकाचे. संपूर्ण चित्रपटात मृत्यू प्रमुखस्थानी आहे. पण चित्रपट खूप जड इत्यादी नाही. सोमलता ही मृतदेहांना साफ करून, मेकप करून चांगले कपडे घालून पुरण्यासाठी तयार करण्याचे काम करत असते. वडिलांच्या नंतर हे काम तिच्याकडे आलेले आहे. तिने लग्न केलेले नाही या कारणास्तव गावात तिच्याबद्दल वाईट साईट चर्चा करणारे खूप आहेत. गावासाठी स्वतःच्या खर्चातून एक स्मशान बांधून द्यावे जेणेकरून आपल्याला थोडी तरी प्रतिष्ठा मिळेल गावात असा सोमलताचा विचार आहे. या कामादरम्यान सोमलताची भेट एका आर्किटेक्टशी होते. जो गावातलाच असूनही गावाच्या मानसिकतेपेक्षा वेगळा असतो. दोघांचं वेगळेपण त्यांना जवळ आणतं. पण स्मशान बांधणे आणि त्यातून सोमलताला मिळू शकणारी प्रतिष्ठा हे गावातल्या तिच्या प्रतिस्पर्ध्याला (मृतदेह साफ करण्याच्या धंद्यातला प्रतिस्पर्धी) पचणारं नसतं. त्याची ताकद आणि वजन गावात भरपूर आहे. त्यामुळे त्यावरून खूप मोठं राजकारण सुरू होतं. शेवटी सोमलताचा यात खून होतो. सिनेमा संपतो. श्रीलंकन गावातलं वातावरण आपल्यासाठी एकाचवेळी अनोळखी आणि ओळखीचं वाटतं. सोमलताची व्यक्तिरेखा करणार्‍या अभिनेत्रीचा चेहरा वेगळाच सुंदर आणि अभिनयक्षमता अफाट आहे. एकदा बघावा असा.

हयसर अमेरिकेतल्या त्रासलेल्या सुंदर्‍या आसत!
डॅम्झेल्स इन डिस्ट्रेस - शीर्षक वाचूनच बारीकसं फिदी टाइपचं हसू येतं. सगळा सिनेमा त्याच धर्तीवर आहे. गुडीगुडी हॉलिवूड स्टाइल मशी अमेरिकन कॉलेज ड्रामा प्रकारच्या फिल्म्सवर स्पूफ आहे(काय मराठी आहे वा वा!) . व्हिट स्टिलमन हा दिग्दर्शक. ज्यांना हॉटशॉटस, स्क्रीम असे स्पूफ सिनेमे आवडले असतील त्यांनी जरूर बघाच. जास्त काही सांगण्याची जरूरच नाही.स्मित

आणि या १७ पोटुश्या पोरी
१७ गर्ल्स (17 Filles) - २००८ मधे एका अमेरिकन हायस्कूलमधे घडलेल्या 'प्रेग्नंसी पॅक्ट' या घटनेवरून प्रेरणा घेऊन बनवलेला हा फ्रेंच चित्रपट. म्युरिएल आणि डेल्फिन कोलिन या बहिणींचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. यातल्या म्युरिएल कोलिनने किस्लॉव्हस्कीच्या 'थ्री कलर्स' आणि इतर अनेक फिल्म्ससाठी कॅमेरा डिपार्टमेंटमधे काम केले आहे. फ्रान्समधल्या समुद्रकिनार्‍याला लागून असलेल्या एका छोट्याश्या गावी ही कथा घडते. एका हायस्कूलमधल्या १६ वर्षाच्या काही मैत्रिणी एकत्र गरोदर रहायचं ठरवतात आणि एकत्र राहून मुलांना वाढवायचं ठरवतात त्याची ही गोष्ट. कॅमेरा वर्क अप्रतिम. फिल्म बाकी ठिकठाक असली तरी सगळ्या टिनेजर मुली आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेर्‍यासमोर आल्या आहेत हे बघता त्यांच्या अभिनयाला आणि दोन्ही दिग्दर्शक ताईंना टोप्या उडवून सलाम!!

आता उरलंसुरलं...
काही फिल्म्स बाकी आवडल्या नाहीत फारश्या पण त्यातली दिग्दर्शकीय प्रयोगशीलता आणि प्रामाणिकपणा फार महत्वाचा वाटला. यात एक इराणी फिल्म 'मोर्निंग' आणि रोमेनियन फिल्म 'बेस्ट इंटेशन्स' यांचा खास उल्लेख करायला हवा.

ही अजून एक पुरचुंडी पाह्यलेल्या आणि राह्यलेल्या पश्चात्तापाची..
पाह्यलेल्या पश्चात्तापाचो पतेरो
१ - सगळ्यात मोठा पश्चात्ताप 'मेलनकोलिया' - झेक रिपब्लिकची निर्मिती असलेला टिपिकल साय-फाय धर्तीचा हॉलिवूडी विंग्रजी चित्रपट. फिल्मच्या सुरूवातीची १० मिनिटे टायटल्स, काही अ‍ॅनिमेशन असा एक टॅब्लो आहे. तो अप्रतिम आहे पण त्यानंतर फिल्म बघायची काहीही गरज नाही. व्हिज्युअली उत्कृष्ट असली तरी कमालीची कंटाळवाणी आहे. आणि सगळ्याला 'काय उगाच?' हा प्रश्न आहेच. मेलनकोलिया नावाचा एक ग्रह पृथ्वीवर आदळून सगळं जग नष्ट करून टाकणार असतो त्यामुळे अतिप्रचंड श्रीमंत लोक वेड्यावेड्यासारखे विचित्र वागू लागतात त्याची गोष्ट आहे. या चित्रपटाचे आयएमडिबी रेटिंग बरेच आहे. त्यामुले २ तास रांगेत तंबू ठोकून हा चित्रपट बघितला आणि स्वतःचे डोके फोडून घ्यावेसे वाटले.
२ - ब्रेकफास्ट लंच डिनर - साउथ इस्ट एशियामधल्या तीन देशातील तीन दिग्दर्शक बायांनी केलेला हा चित्रपट. वेगवेगळ्या तीन जेवणाच्या तीन वेगळ्या गोष्टी. पण मूळ विषय प्रेम हा आहे. असे क्याटलॉगबुकात लिवलेले. कमालीची संथ हाताळणी. हॉटेलमधे १ मुलगी बसून बॉयफ्रेंडची वाट बघते. त्याला १५ मिनिटे उशीर होतो तर आपणही 'रियल टाइम' मधे १५ मिनिटे घालवतो असला खेळ. आणि त्याने काही होत नाही, कथा पुढे सरकत नाही. प्रेम कंटाळवाणे असते यापलिकडे काही अनुभव मिळत नाही.. दुसरी कथेचा कंटाळा इतका कंटाळवाणा झाला की कंटाळून आम्ही बाहेर पडलो.
३ - अरेंज्ड हॅपिनेस - काश्मिरमधल्या एका अ‍ॅरेंज मॅरेज कम प्रेमाची ही कथा आहे असं सिनॉप्सिस सांगतो. क्याटलॉगबुकात वाचून सिनेमा बघावासा वाटतो. वैधानिक इशारा की हा चित्रपट फिक्शन फिचर नसून माहितीपट आहे. एक स्वीडनची मुलगी, साउथमधल्या एका काश्मिर एम्पोरियममधे गालिचे बिलिचे विकणार्‍या एका तरूणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्या काश्मिरमधल्या घरी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गेली. बहिणीचे लग्न अ‍ॅरेंज्ड मॅरेज होते. तिथे गेल्यावर गोरी मेमचे आणि त्या तरूणाचे अफेअर अजूनतरी जाहिर केलेले नाही. ही पार्श्वभूमी. या गोर्‍या स्विडीश मुलीने लग्नाच्या सगळ्या विधींचे केलेले चित्रण ही आख्खी फिल्म. महान कंटाळा
४ - लव्ह यू टिल डेथ - एल वाय टि डी - रफिल एलियास या अ‍ॅडफिल्ममेकरने ही हिंदी फिल्म केलीये. सिनेमा चालू व्हायच्या आधी स्वतःच्याच चित्रपटाबद्दल नको इतके ग्रेट बोलून घेतले या सगळ्या टिमने. आणि चित्रपट रद्दी, सी ग्रेड, चीप, सॉफ्ट पोर्नो स्वरूपाची...

बघायचे राहून गेलेले बरेच पश्चात्ताप आहेत. कॅटलॉग वाचत गेले तर जेवढे बघितलेत त्याच्या दुप्पट राह्यलेले पश्चात्ताप होतील. पण हे काही अगदीच महत्वाचे...
१. पिना - पिना बॉश या नृत्यकर्मीवर असलेली ही डॉक्यु. डॉक्यु थ्रीडी आहे. आणि ज्यांना बघायला मिळाली ते बहुतेक सगळेच स्तुती करताना थकत नाहीयेत. माझं नशिब कधी उघडेल कुणास ठाऊक..
२. फाउस्ट - गोथ च्या फाउस्ट या ट्रॅजेडीचे अ‍ॅडप्टेशन. महोत्सवात डोक्याचे सॅच्युरेशन झाल्यावर शेवटी बघायला मिळाली. जड आहे आणि बरंच रक्त, आतडी असलं काय काय आहे. माझी कपॅसिटी संपली होती त्यामुळे १० मिनिटात उठून आले. फिल्म इंटरेस्टिंग असणार होती.

अशी आमची जत्रा संपन्न झाली. दर्शन तर घडले. देव पावण्याची वाट बघूच आता.
(समाप्त)

- नीरजा पटवर्धन

Saturday, October 22, 2011

मला बी जत्रंला येऊ द्या की! - २

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १ 
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
 ---------------------------------------------
तर मंडळी या बसा घटकाभर! बघा आमच्या शिदोरीच्या गठुळ्यात काय काय जमलंय ते.
पण गठुळं खोलायच्या आधीच एक 'वैधानिक इशारा' आणि 'आमचे हात वर' (डिस्क्लेमर)
जगभरातले चित्रपट हे वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले, वेगवेगळ्या मानसिकतेबद्दल सांगणारे असतात. आपल्या अतिप्रचंड भयंकर महान आणि पुरातन संस्कृतीमधे बसणारे असतीलच असं नाही (म्हणजे काय कुणास ठाऊक). आपल्यापेक्षा वेगळं म्हणजे मानसिक आजारी नव्हे हे शिकण्यासाठी या शिदोरीचा वापर केल्यास आनंद होईल. न केल्यास केवळ तुमचाच तोटा. आवडलेले चित्रपट आवडल्याबद्दल आणि नावडलेले नावडल्याबद्दल कुठल्याही कोर्टात आम्ही उभे तर रहाणारच नाही पण त्या अनुषंगाने तुमची महान संस्कृती, आमची आजारी मानसिकता अश्या सगळ्या चर्चेला आत्तापासूनच उत्तमरित्या फाट्यावर मारण्यात आलेलं आहे.
तर असो!!
गठुळं खोलेंगे.... गठुळं खोल!!
गठुळ्यात बटवे, पुरचुंड्या, पुड्या. हा बटवा सगळ्यात रत्नजडीत. आधी बघू त्यात काय आहे..
ये देखो... ये तो 'मामि' मधली बेस्ट फिल्म छे!
'माय लिटल प्रिन्सेस' - सतत गायबच असलेली हॅना परत येते आणि अचानक फोटोग्राफर बनते. आपल्या १० वर्षाच्या मुलीला व्हियोलेताला आपल्या फोटोग्राफीसाठी मॉडेल बनवते. पापभीरू, साध्या असलेल्या पणजीकडे राहणार्‍या व्हियोलेताला आपल्या आईचं रंगीबेरंगी जग, त्यातली मजा, आपण आईसाठी महत्वाच्या आहोत हे वाटणं हे सगळं खेचून घेतं. एरॉटिक आर्टच्या जगात या फोटोंमुळे हॅनाचं नाव होतं. व्हियोलेता पण सुरूवातीला सगळा ड्रेसिंग अप, ग्लॅमर आणि स्टारडम एंजॉय करत असते. दोघींच्यातलं आई-मुलगी + फोटोग्राफर-मॉडेल हे नातं इव्हॉल्व्ह होत असतं. पण हळूहळो व्हियोलेताला हे सगळं नको व्हायला लागतं. अशातच हॅनाला चाइल्ड अ‍ॅब्युज बद्दल दोषी धरलं जातं इत्यादी. हॅना चुकतेय हे आपल्याला कळत असलं तरी ते हॅनाला समजतच नसतं. ती केवळ कलेच्या पॅशनपायी सगळं करत असते. मुलीवर तिचं प्रेम नाही आणि मुलीला छळायचं हा तिचा हेतू नक्की नसतो पण घसरण कधी सुरू झाली हे तिला कळलेलं नसतं. आपल्याला हॅनाचा राग येतो पण कीव पण येत रहाते अश्या विचित्र तणावांच्यातून हा चित्रपट जातो. एक क्षणभरही आपल्याला पडद्यापासून नजर, कान, मेंदू हलवू न देणारा असा अप्रतिम फ्रेंच चित्रपट. दिग्दर्शिका आहे इव्हा आयनेस्को. इव्हाने ११ वर्षाच्या वयात रोमन पोलान्स्कीच्या 'द टेनन्ट' मधून बाल-अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. दिग्दर्शक म्हणून ही तिची पहिली फिचर फिल्म. पण चित्रपटावरची दिग्दर्शक म्हणून पकड आणि सफाई बघून ही पहिली फिल्म आहे असं अजिबातच वाटत नाही.
व्हियोलेता झालेल्या छोट्या अभिनेत्रीने जे काही केलेय ते थक्क करणारे आहे. ते तिच्याकडून करून घेणे हे दिग्दर्शिकेने कसे जमवले असेल याची मला प्रचंड उत्सुकता आहे. या छोट्या अभिनेत्रीला बरेच पुरस्कार मिळाले आहेत या रोलसाठी. 'मामि' मधे सुद्धा.
याच चित्रपटाच्या स्क्रिनिंगमधे २-३ वेळेला प्रोजेक्शनिस्टने प्रचंड माती खाल्ली. पुढचं रीळच जोडलं नाही (प्लॅटरवर असून हे कसं काय जमवलं हे मला माहित नाही पण पडदा पांढरा स्वच्छ दिसू लागला काही काळ. नुसताच प्रोजेक्टरचा आवाज.. ), एकदा खाली डोकं वर पाय रीळ जोडलं होतं असं काय काय आणि हे सगळं असूनही एकालाही निघून जावेसे वाटले नाही इतकं या चित्रपटाने सगळ्यांना पकडून ठेवलं होतं.
हा पुढचा घास 'हजारो विदूषकांचा'!
अ थाउजंड फूल्स ( मिल क्रेटिनोज) - १५ वेगवेगळ्या कथांना एकत्र घेऊन बांधलेला हा स्पेनमधला स्पॅनिश गुच्छ. सगळ्या कथांना विनोदाचा डूब दिलेली असली तरी त्यांचा गाभा धो धो हसवणार्‍या विनोदाचा नाही. विनोदाचा वापर करून दु:ख, वेदना, म्हातारपण, मृत्यू, प्रेम या गोष्टींवर चुरचुरीत भाष्य आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेकदा येतो तो माणसाचा माणूस म्हणूनच करू शकेल असा मूर्खपणा.
पंधरा कथांमधल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणजे जणू काही मनोरंजन करायला ठेवलेले विदूषक (फूल्स) म्हणून तेच चित्रपटाचं नाव. स्पॅनिश दिग्दर्शक व्हेन्चुरा पोन्स याने अतिशय ब्रिलियंटली केलेली हि फिल्म. नक्की बघावी अशी.
या पुढे आता. इथे अजून विचित्र काहीतरी दिसतंय..
मायकेल - कान, मॉस्को, टॉरान्टो अश्या महत्वाच्या फेस्टिव्हल्समधून यावर्षी नावाजला गेलेला हा मार्कस श्लाइन्झर या दिग्दर्शकाचा ऑस्ट्रियन चित्रपट. मायकेल नावाचा एक दिसायला साधासरळ, चार लोकांसारखं घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर एवढंच आयुष्य असलेला, एकटा रहाणारा, थोडासा बावळटच वाटावा असा पिडोफाइल. एरवी त्याच्याकडे बघून त्याच्या या बाजूची कुणाला शंकाही येणार नाही. त्याने व्होल्फगांग नावाच्या एका १० वर्षाच्या मुलाला आपल्या घाणेरड्या शौकासाठी आपल्या घराच्या बेसमेंटमधे कोंडून ठेवलेय. या मुलाचा बाहेरच्या जगाशी संपर्क येऊ देत नाही. त्याला खाऊ, खेळणी तिथेच आणून देतो. दिवसभर मायकेल ऑफिसला असेल, अचानक बाहेरगावी गेला असेल तर अन्नाचा साठा बेसमेंटमधे करून ठेवलेला आहे. याच मुलाच्याबरोबर मायकेल ख्रिसमस पण साजरा करतो. घरी ट्री आणून इत्यादी. तेवढ्यापुरता त्याला वरती घरात येऊ देतो. पण बाकी बेसमेंटमधेच. बेसमेंटचं दार बाहेरून कुलूपबंद त्यामुळे घरी कोणी आलं तरी कोणाला सुतराम कल्पना येणार नाही की इथे कोणी आहे. मुलगा त्याच्या पातळीवर प्रोटेस्ट करतोच पण आईवडिलांनी शिस्त लावायला तुला माझ्याकडे पाठवलाय त्यामुळे मी म्हणेन ते तुला ऐकलं पाहिजे ही थाप त्या मुलाला असहाय्य करते. पुढे काय होते? त्याची सुटका होते का? मायकेलला शिक्षा मिळते का हे मी इथे सांगत नाही. दिग्दर्शकीय हाताळणी तशी प्लेन सिंपल नॅरेटिव्हची आहे. अधूनमधून बारीकश्या विनोदांचा वापरही आहे. आपण त्यावर हसतो आणि दुसर्‍याच क्षणाला कशावर हसलो आपण असं होतं. या सरळसोट नॅरेटिव्हमुळेच हा चित्रपट जास्त अंगावर येतो.
आता हे रत्नं बघा.
इव्हन द रेन - इश्यार बोलेन (Iciar Bollain) या दिग्दर्शिकेचा स्पेन-फ्रान्स-मेक्सिको अश्या तिन्ही देशांची एकत्रित निर्मिती असलेला स्पॅनिश भाषेतील हा चित्रपट. चित्रपटात चित्रपट अशी रचना तुम्हाला पूर्णवेळ खेचून धरते. कोलंबसाने अमेरिका शोधून पादाक्रांत केली या ऐतिहासिक कथेला धरून कोलंबसाचे जुलमीपण आणि स्थानिक लोकांची वाताहात यासंदर्भात चित्रपट करण्यासाठी सबॅस्टियन हा दिग्दर्शक, निर्माता कोस्टा आणि इतर क्रू बरोबर बोलिव्हिया मधे येतो. बोलिव्हियाच लोकेशन म्हणून निवडण्याचं कारण केवळ 'स्वस्त पडेल' हेच असतं. बोलिव्हियामधे २००० साली पाण्यावरून जो उठाव झाला त्याची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. कोलंबसाने सोनं मिळवण्यासाठी स्थानिक माणसे, स्थानिक निसर्ग यांच्यावर जुलमी सत्ता प्रस्थापित करणे आणि अमेरिकन/ युरोपियन कंपन्यांनी स्थानिकांच्या हक्काच्या पाण्यापासून त्यांना वंचित करणे अश्या दोन गोष्टी समांतरपणे घडताना आपल्याला दिसतात. ज्यातली एक ५०० वर्षांपूर्वी घडून गेलेली आहे आणि चित्रिकरणाच्या निमित्ताने आपल्याला दिसतेय तर एक आपल्यासमोर खरोखर घडत रहाते. म्हणलं तर भडक आणि म्हणलं तर तश्या नाजूक अश्या विषयावर अश्या प्रकारे इतक्या सुंदररित्या फिल्म करणं आणि कुठेही प्रचारकी कंटाळवाणी न होऊ देता आपला मुद्दा प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे महाकठीण आव्हान या दिग्दर्शिकेने लीलया पेललेले आहे. मी अजून ४-५ वेळा तरी ही फिल्म बघायच्या विचारात आहे. तुम्ही पण बघा.
आता हा तुटका आरसा घ्या. हा कधी खोटं बोलत नाही.
मिरर नेव्हर लाइज - कमला अंडिनी या इंडोनेशियन दिग्दर्शिकेची हि पहिली फिचर फिल्म. आजवर मी तरी एकही इंडोनेशियन चित्रपट पाह्यलेला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. इंडोनेशियन बेटांच्या समूहातल्या एका छोट्या बेटावर समुद्राला लागून तरंगणार्‍या घरांच्या वस्तीत राहणार्‍या पाकिस या १२ वर्षाच्या मुलीची ही कथा. ही सगळी वस्ती मासेमारी करणारे किंवा समुद्रातून विविध वस्तू आणून विकणार्‍यांची वस्ती आहे. पाकिसचे वडील मासेमारी करायला गेलेले असताना दुर्घटनेत गेलेत पण पाकीसचा विश्वास आहे ते हरवलेत. पाकिसच्या आईलाही खरी गोष्ट माहितीये पण ती पाकिसच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीये. त्यामुळेच ती बाजो जमातीच्या प्रथेप्रमाणे चेहर्‍यावर सफेद रंगाचा लेप लावून आहे. पाकिसकडे तिच्या वडिलांनी दिलेला एक आरसा आहे ज्यावर मंत्र टाकला असता ते असतील तर तिला दिसतील असा तिचा (तिच्या जमातीचा) विश्वास आहे. पाकिस आणि तिचा बेस्ट फ्रेंड लुमो यांचं शाळा, समुद्रात भटकणे, आईला मदत करणे, आईची बोलणी खाणे असं आयुष्य चालू असतंच दरम्यान जाकार्ताहून एक डॉल्फिन्सचा अभ्यास करणारा तुडो त्यांच्या घरात भाड्याने रहायला येतो. मग तुडो आणि मुलांची मैत्री, पाकिसला तुडोवर वाटणारा अधिकार, तुडो आणि पाकिसच्या आईमधे उमलू पहाणारे नाते यातून प्रवास करत शेवटी लुमोच्या वडिलांचा समुद्रात अपघाती मृत्यू, त्याचदरम्यान पाकिसच्या वडिलांच्या बोटीचे मिळालेले तुकडे आणि पाकिसला वडिलांचा मृत्यू मान्य करायला लागणं या ठिकाणी हा चित्रपट संपतो. अतिशय सुंदर असं निसर्गाचं दर्शन, वेगळ्याच प्रकारच्या जमातीच्या आयुष्याचं चित्रण ज्यात कुठेही माहिती सांगण्याचा सूर नाही, या दोन्ही पार्श्वभूमीवरची साधेपणाने सांगितलेली एक सुंदर गोष्ट अश्यामुळे हा चित्रपट आरश्यावर पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबासारखा चकचकत रहातो आणि आवडतो.
आता हे चित्र मिश्र संस्कृतींमधलं
लकी - हा पंजाबी चित्रपट नाही. झुलू, इंग्लिश आणि हिंदी अश्या तिन्ही भाषेत असलेला हा दक्षिण आफ्रिकेतला चित्रपट आहे. याचा दिग्दर्शक अवि लुथरा हा भारतीय वंशाचा ब्रिटीश माणूस आहे.
जगात एकटा उरलेला १० वर्षाचा झुलू मुलगा लकी आणि अल्बम्समधल्या फोटोंसकट एकटी उरलेली एक भारतीय आजीबाई पद्मा यांच्यातल्या शब्दांच्या पलिकडल्या नात्याची ही कहाणी. शब्दांच्या पलिकडले नाते अशासाठी की लकीला झुलू भाषेशिवाय दुसरी भाषा येत नाही आणि पद्माआजींना झुलू येत नाही. लकीने शाळेत गेलं पाहिजे अशी त्याच्या आईची शेवटची इच्छा आहे. लकीचा मामा एकदम ऐय्याश आणि बेकार माणूस आहे. लकीला शाळेत जायचंय. 'काळा' म्हणून लकीला कशालाही हात लावू न देणारी पद्माआजी त्याने शाळेत जावं यासाठी आपले आयुष्यभर जमवलेले दागदागिने विकून पैसा उभा करण्यापर्यंत पोचते हा प्रवास बघण्यासारखा आहे. या प्रवासात आपण जास्त गुंतून रहातो ते लकी आणि पद्मा साकार करणार्‍यांच्या अभिनयामुळे. पद्माची व्यक्तिरेखा करणार्‍या बी. जयश्री या कन्नड नाट्यकर्मी आणि आता राज्यसभा सदस्यही आहेत. त्यांची ३-४ नाटके मी पुण्यात काही महोत्सवांच्यात पाह्यली होती. आणि भाषा कुठेही समजत नसूनही मी भारले गेले होते. तेव्हापासून त्यांची मी पंखी आहे. त्यांना या चित्रपटात पडद्यावर बघणं हा एक अप्रतिम अनुभव होता.
आता ही रत्नजडीत बटव्यातली शेवटची वस्तू
टॉमबॉय - फ्रेंच सिनेमा. सेलिन सायमा ही स्त्री दिग्दर्शिका. १० वर्षाची एक मुलगी हा कथेचा केंद्रबिंदू. अतिशय सरळपणाने कथा जाते. १० वर्षाच्या लॉरे या मुलीला आपण मुलगी आहोत हे आवडत नसतं तिला मुलगाच व्हायचं असतं. सगळं कुटुंब नवीन घरात रहायला जातं आणि नवीन ठिकाणी मित्रमैत्रिणी जोडले जाताना लॉरे स्वतःची ओळख मिकेल नावाचा मुलगा अशी करून देते. बारीक केस, मुलांसारखे कपडे आणि अजून आकारात न आलेलं शरीर यामुळे ती थाप पचते. मग थाप टिकवायला आपल्या बालबुद्धीने लॉरे काय काय करते आणि अखेरीस खरं उघडकीला आल्यावर काय होतं अशी सगळी ही फिल्म. कुठेही गिमिकल हाताळणी न करता सहजपणे सांगितलेलं नॅरेटिव्ह आणि कुणावरच, कशावरच दोषारोपण न करता पुढे नेलेली कथा यामुळे ही फिल्म अक्षरशः अडोरेबल बनते. इतका अवघड विषय इतक्या सहजपणे आणि संवेदनशीलपणे हाताळल्यामुळे आपल्या मनात घर करून रहातो.
असा हा रत्नजडीत बटवा. कंटाळा आला नसेल तर गाठोड्यातल्या बाकी पुड्या-पुरचुंड्या पुढच्या भागात सोडूया. नाहीतर इथेच थांबूया. काय म्हणता?
क्रमशः लिहू की समाप्त?

- नीरजा पटवर्धन

Friday, October 21, 2011

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३
 -------------------------------------------------------------------------
दरवर्षी काहीनाकाही कारणाने राहून जात होतं ते अखेर यावर्षी घडलं. यावर्षीच्या उत्सवाला हजेरी लागलीच.
७ - ८ दिवस नुसती धुमशान.
सकाळी उठून धडाधडा आवरून सिनेमॅक्स, वर्सोवा (तेच ते इन्फिनिटी मॉलमधलं!) गाठायचं. थेट्राबाहेर लायनी लावायच्या. जागा पकडायच्या. सिनेमा बघायचा. संपला की एक्झिटच्या दारातून पळत पळत ४० पायर्‍या उतरायच्या दुसर्‍या बाजूचा जिना गाठायचा परत सिक्युरिटीसाठी पर्स उचकायला द्यायची आणि ते झालं की पळतपळत दुसरीकडच्या ४० पायर्‍या परत चढायच्या. परत थेट्राबाहेर रांगेत. रांग लावायची म्हणून जेवण स्किप करायचं. किंवा रांगेत ४-५ जणांनी मांडा ठोकून बसायचं आणि तिथेच जेवायचं, घुसायला लागले लोक तर आरडाओरडा करायचा, कसतरी मरतमरत आत घुसायचं आणि परत तेच... रात्री थकल्या डोळ्यांनी घरी. अधल्यामधल्या वेळात उद्याच्या फिल्म्स कोणत्या, कुठल्या बघायच्या याचा कॅटलॉगमधून अभ्यास करायचा. कॅटलॉगमधे पुरेशी माहिती नसेल तर रात्री गुगलायचं. 'उद्या सकाळी अमुक वाजता स्क्रीन अमुकच्या लायनीत भेट' असले समस...
मज्जा न काय एकुणात!
१३-२० ऑक्टोबर २०११ या काळात घडलेल्या 'मामि' चित्रपट महोत्सवाची ही गोष्ट. दिवसाला प्रत्येक माणूस ५ चित्रपट बघू शकतो. माझी रोजच तेवढी क्षमता नव्हती. किंवा कधी चित्रपट सुरू झाल्यावर १० मिनिटात बकवास म्हणून बाहेर यायचो आम्ही मग पुढच्या चित्रपटासाठी रांग असायचीच त्यामुळे रांगेत तंबू. असे करून एकुणात २५ तरी सिनेमे बघितले गेले.
यावर्षीचं 'मामि' चं चित्रपटांचं कलेक्शन मस्त होतं यात वाद नाही. साधारण ७-८ स्पर्धात्मक आणि अ-स्पर्धात्मक विभाग ज्यामधे कान महोत्सवात नावाजले गेलेले चित्रपट, फ्रेंच सिनेमा, गाजलेले भारतीय चित्रपट यांपासून मुंबई या विषयावर नवख्या/ विद्यार्थी फिल्ममेकर्सनी केलेल्या शॉर्ट फिल्म्स असे सगळे रंग होते. या विविधरंगी गुच्छाबद्दल फेस्टिव्हल प्रॉग्रॅमिंग टीम आणि सिलेक्शन टीमचे विशेष अभिनंदन आणि आभार.
यावर्षी पहिल्यांदाच सिनेमॅक्समधे हा महोत्सव होत होता. सिनेमॅक्स, वर्सोवा हे मुख्य ठाणे तर सिनेमॅक्स, वडाळा आणि मेट्रो ही अजून दोन ठाणी या महोत्सवाची केंद्रे होती. सिनेमॅक्सच्या स्टाफला वेड्याविद्र्या चित्रपटांसाठी ३-३ ४-४ तास रांगा लावून बसलेल्या वेड्यावाकड्या जनतेला सांभाळताना आणि शिस्त राखताना घाम फुटला असणार. पण त्यांच्याशिवाय हे सगळं सुरळीत होऊ शकलं नसतं.
मात्र सिनेमॅक्सच्या प्रोजेक्शनिस्टससाठी आणि प्रोजेक्शनिस्टसबरोबर कोऑर्डिनेट करणार्‍या 'मामि' च्या लोकांसाठी चित्रपट महोत्सवात कसे काम करावे याचे मोठ्ठे वर्कशॉप कुणीतरी तज्ञ लोकांनी घेण्याची प्रचंड जरूर आहे. आलेल्या फिल्म्सची रिळे बरोबर न जोडणे किंवा अजिबातच न जोडणे किंवा खाली डोके वर पाय अशी जोडणे, सबटायटल्सशिवायच स्क्रिनिंग चालू करणे, आस्पेक्ट रेश्यो पार गंडलेला त्यामुळे सबटायटल्स दिसतील किंवा माणसांची डोकी तरी असले प्रकार, गोंधळ झाला काही तर थेट्रातले लोक आरडाओरड करत नाहीत तोवर दुर्लक्ष करणे, गोंधळ निस्तरून मधली ५-१० मिनिटे गायबच करून डायरेक्ट पुढचाच भाग सुरू करणे असले अक्षम्य अपराध प्रत्येकी रोज ४ वेळातरी हे लोक करत होते.
प्रत्येक चित्रपट बघत असताना सुरक्षेला धोका उत्पन्न होईल असं काहीतरी प्रत्येकाकडे निर्माण होतं असा सिक्युरिटीवाल्यांचा समज असावा कारण ४० पायर्‍या उतरणे आणि परत ४० पायर्‍या चढणे या परिक्रमेमधे दर वेळेला सगळी पर्स पूर्ण उचकून पाचकून बघितली जात होती. जाम जाम वैताग. अर्थात ते लोक त्यांची ड्यूटी करत होते त्यामुळे त्यांना दोष काय देणार पण निर्णय घेणार्‍यापुढे माझे कोपरापासून हात जोडलेले
तरीही बघायला मिळालेल्या सिनेमांची शिदोरी इतकी महत्वाची की त्यांचं पारडं जडच...
त्यांच्याबद्दल पुढच्या भागात...
(क्रमशः)
- नीरजा पटवर्धन

Monday, October 17, 2011

सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं

पुस्तकाचे नाव - सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं
मूळ लेखन - सी. एस. लक्ष्मी
अनुवाद - उर्मिला भिर्डीकर, उज्ज्वला मेहेंदळे
संपादन - अंजली मुळे
प्रकाशक - स्पॅरो SPARROW
प्रथम आवृत्ती - ऒगस्ट २०००
--------------
मुखपृष्ठावर इंटरेस्टिंग चित्र, स्पॅरोचा संदर्भ आणि पुस्तकाचं नाव यांच्यामुळे हे पुस्तक फारसा विचार न करता विकत घेतले. पुस्तकाचं नाव फारच गोंधळात पाडणारं आहे. दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची मनोगतं याचा अर्थ मला जो समजला त्याच्या तर मी मोहातच पडले होते. दृश्य कथा म्हणजे एखादा पूर्ण किंवा छोट्या लांबीचा चित्रपट मग तो माहितीपट असेल अथवा फिक्शन. स्पॅरोतर्फे अशी एखादी फिल्ममेकिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असावी आणि त्या कार्यशाळेत सहभागी असलेल्यांनी आपापल्या ज्या फिल्म्स बनवल्या त्या संदर्भातल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक असावं असा माझा समज झाला.
हा समज अर्थातच चुकीचा होता हे पुस्तक वाचायला घेतल्यावर हळूहळू लक्षात यायला लागलं. दृश्य कथा कार्यशाळा हा स्पॅरोचा एक महत्वाचा उपक्रम आहे. स्त्री-कलाकाराला कलेच्या जगात काम करताना कलाकाराचं स्त्रीपण खूप महत्वाची भूमिका बजावत असतं. या स्त्री कलाकारांकडून त्यांची अभिव्यक्ती, त्यासाठी त्यांनी शोधलेला/ मिळवलेला अवकाश, त्यांचे अनुभव याची ओळख या कार्यशाळेतून करून दिली जाते. या स्त्री कलाकारांना कार्यशाळेत बोलावून त्यांची मुलाखत घेतली जातेच. त्याचबरोबर कलाकाराच्या घरी, कामाच्या ठिकाणीही स्पॅरो सदस्य भेट देतात आणि कलाकाराचं स्त्री म्हणून जगणं, काम करणं समजून घेतात. हे सगळं ध्वनिचित्रमुद्रित केलं जातं. आणि मग त्यातून हे असं पुस्तक निर्माण होतं. साधारण १९९६-१९९७ दरम्यान घडलेल्या या कार्यशाळांमधे विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि संशोधक सहभागी होते. या पुस्तकामधे एकुणात सहा कलाकार स्त्रियांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा आहे. मुलाखती आणि कलाकारांशी त्यांच्या त्यांच्या अवकाशात भेट, त्यांना बोलतं करणं हे वेगवेगळ्या व्यक्तींनी केलं आहे. आणि त्याचे या पुस्तकामधे शब्दांकन सी. एस लक्ष्मी यांनी केले आहे.
पहिल्या आहेत जुन्या जमान्यातील चित्रपटांतील नटी व निर्माती प्रमिला उर्फ एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम. यांची मुलाखत स्वत: सी एस लक्ष्मी यांनीच घेतलेली आहे. १९९७ साली ८१ वर्षांचे वय असताना प्रमिला यांनी या कार्यशाळेसाठी मुलाखत दिलेली आहे. १९३५ ते १९६१ अशी अभिनयाची कारकीर्द आणि १९४२ ते १९६० अशी निर्माती म्हणून कारकीर्द असा प्रमिला यांचा आलेख आहे. इतक्या जुन्या काळात चित्रपट निर्माती स्त्री हे माझ्यासाठी फारच कुतूहलाचे होते. परंतू पाण्यात पडल्यावर पोहणे पेक्षा 'मी बिचारी बाई कशी पोहणार तरले कशीबशी' असाच अप्रोच जास्त जाणवला. संपूर्ण मुलाखतीचा सूर ’गाऊ तयांची आरती’ टाइप आहे. त्यातून प्रमिला यांच्या आयुष्याचा घटना-घटना-घटना असा आलेख मिळतो पण स्त्री म्हणून चित्रपटसृष्टीशी त्यांचे नाते, मर्यादा, अनुभव याबद्दल फार थोडे मिळते. आणि हा आलेख बघता प्रमिला यांचं कर्तुत्व, धडाडी यामधे बरंच काही ऐकण्यासारखं, शिकण्यासारखं असणार जे मुलाखतकाराला पकडता आले नाहीये हे सतत वाटत रहाते.
दुसर्‍या स्त्री कलाकार एक पारंपारीक व व्यक्तिचित्र शिल्पकार आहेत. त्यांचं नाव कनका मूर्ती. यांची मुलाखत लेखिका शशी देशपांडे यांनी घेतलीये. १९४२ साली म्हैसूरजवळच्या एका छोट्या गावात, अत्यंत पारंपारीक व कर्मठ वातावरणात जन्म घेतलेल्या कनका यांना आईने वडलांच्या मिनतवार्‍या करून पदवीपर्यंत शिकवणे आणि नंतर कनकांनी पारंपारिक शिल्पकलेच्या क्षेत्रातच काम करण्याचे ठरवणे यापासून ते त्यात त्यांनी यशस्वी होणे इथपर्यंत हा सगळा प्रवास अतिशयच प्रेरणादायी आणि अभ्यासण्यासारखा. विश्वकर्मा समाजातल्या स्त्रीने प्रख्यात शिल्पकार बनणे यासारखी सर्वच बाबतीत विरोधाभासाने पुरेपूर भरलेली घटना सत्यात उतरताना कनका यांना बरीच मानहानी, अविश्वास, कमीपणा सहन करावा लागला असणारच पण त्याबद्दल त्यांच्या पूर्ण मुलाखतीत कुठेही कडवटपणाचा अंश जाणवत नाही. त्या आपल्या कलेविषयी बोलताना कुठेच मी मी प्रकार नसतो. त्या पूर्णपणे कला आणि कलाकृती घडत जातानाची प्रक्रिया याबद्दल बोलतात. ही मुलाखत मला फारच आवडली.
तिसर्‍या स्त्री कलाकार आहेत नृत्यांगना दमयंती जोशी. ही मुलाखत नीला भागवत यांनी घेतलेली आहे. अतिशय गरिबीत मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. ही सगळी घटना प्रचंड रोचक आहे. ती मुळातून वाचायला हवी. दमयंती जोशींबद्दल लिहिताना मादाम मेनका यांच्या मादाम मेनका बनण्याच्या प्रवासाबद्दल पण या मुलाखतीत आले आहे. तेही तितकेच वाचनीय आहे. आणि हे सगळे १९३०च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनकाबाईंनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंतीबाईंनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान प्रचंड महत्वाचे आहेच. २० पानी मुलाखतीमधे हा सगळा आलेख थोडा कोंबल्यासारखा वाटतो. तसेच बरेच संदर्भ सतत मागे पुढे मागे पुढे होत रहातात त्यामुळे गोंधळ उडू शकतो पण त्याला पर्याय नाही. नृत्याबद्दल आस्था असणार्‍यांसाठी दमयंतींचा प्रवास समजून घेणे हे फार महत्वाचे ठरावे.
चौथ्या स्त्री कलाकार आहेत आपल्या सगळ्यांनाच माहित असलेल्या सुषमा देशपांडे. बारामतीमधे गेलेलं बालपण, मग पुण्यात कॉलेज, नाटक, पत्रकारितेचं शिक्षण आणि पत्रकारिता करताना स्वत:चा म्हणून गवसलेला नाट्यपत्रकारितेचा रस्ता (व्हय मी सावित्रीबाई, तिच्या आईची गोष्ट हे प्रयोग) हे सगळं फार छान मांडलेलं आहे. ’व्हय मी सावित्रीबाई’ या प्रयोगाची संपूर्ण संहिताही यामुलाखतीसोबत आहे.
पाचव्या स्त्री कलाकार आहेत नाटक जगणार्‍या समकालीन नाट्यकर्मी माया. यांची मुलाखत/ माहिती जे काय म्हणाल ते प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात एका मोनोलॉगसदृश चिंतनात आहे. आजूबाजूची स्पेस, वस्तू चाचपडत, शोधत, नव्याने शोधून काढत या मोनोलॉगचा प्रवास सुरू होतो तो शेक्सपिअर, कथकलीची तत्वे, मॉडर्न स्कूलमधलं शिक्षण, विविध प्रयोग, शरीर नटाचं साधन, श्वासावरची पकड अश्या अनेक स्टेशनातून जातो. नाटक डसतं म्हणजे कसं नक्की ते समजून घ्यायला हे नक्कीच वाचलं पाहिजे. भारतीय समकालीन नाट्यविचार समजून घेण्यासाठीही या मोनोलॉगचा प्रचंड उपयोग आहे आणि आमच्यासारख्या चिरकुट नाटकवाल्यांसाठी बरीच मोठी प्रेरणा.
सहाव्या स्त्री कलाकार आहेत चित्रकार समाजातील नसूनही म्हैसूर शैलीतली चित्रकारी आपला व्यवसाय म्हणून निवडलेल्या नीला. परंपरेनुसार ही कला स्त्रियांसाठी नसते. चित्रकार समाजातसुद्धा घरातल्या मुली-सुनांना ही कला शिकवली जात नाही किंबहुना त्यांच्यापासून ती गुप्तच राखली जाते(हे भारतातल्या बहुसंख्य हस्तकलांच्या बाबतीत बघायला मिळते). अश्या वातावरणात या शैलीला व्यवसाय म्हणून निवडण्याची इच्छा, हिंमत आणि चिकाटी दाखवणार्‍या नीला यांच्याबद्दलची माहिती या लेखात आहे पण माफक प्रमाणात. या माहितीबरोबरच ’अकाली गेलेली नणंदच पोटी जन्माला आली’ यासारख्या बिनमहत्वाच्या गोष्टी पण आहेत. परंतू भारतातील पारंपरिक चित्रशैली, रंग बनवण्याच्या पद्धती, या चित्रशैलींमधला विचार, वापरल्या जाणार्‍या वस्तूंबद्दल टिप्पण्या, म्हैसूर चित्रशैलीचे तपशील अश्या विविध गोष्टींसंबंधी असलेल्या संदर्भचौकटी कलाअभ्यासकांसाठी उपयोगी ठराव्यात.
स्पॅरोच्या पुढच्या उद्दिष्टांबद्दल सुतोवाच करून हे पुस्तक संपतं. कलाकार स्त्री म्हणून या सगळ्यांना जे अनुभव आलेत त्यातून मी काही गोष्टी शिकतेच पण मुलाखत, मुलाखतीचे शब्दांकन यासंदर्भातही काही करावे ते/ करू नये ते (dos & don'ts) मी शिकते.
- नीरजा पटवर्धन

Wednesday, September 21, 2011

मंदिर!!

पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.
रोज रात्री नकाशा समोर ठेवायचा. एक दिशा, एक रस्ता पकडायचा आणि त्या भागातली सगळी बारीक सारीक गावं, सगळ्या वाड्यावस्त्यांसकट दुसर्‍या दिवशी फिरायची, बघायची, फोटु मारायचे. असं करता करता एक दिवशी संध्याकाळच्या सुमारास नानेली गावात पोचलो. हि वाडी, ती वाडी असं करत करत एका ठिकाणी एक गंजकी पाटी पाह्यली गणपतिमंदिराची. पाटी बाण दाखवत होती त्या दिशेला एक पायवाटेसारखी वाट. निघालो. बरीच वळणं घेत शेवटी येऊन पोचलो ते एका अप्रतिम शांत, सुंदर अश्या जुन्या मंदीरापाशी
देवाकडे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूने मंदिराकडे वाट येते. तिथून येऊन देवळाला सामोरे गेलो. हे असे



देऊळ नक्कीच बरंच जुनं होतं. सुंदर तर होतंच. देवळात कोणी चिटपाखरूही नाही. गाभार्‍यात एक छोटासा बल्ब लटकत होता. लोड शेडींगची वेळ संपली होती त्यामुळे तो उजळून निघाला.अंधार पडायला लागला होता. हे देऊळ पाह्यला परत यायचं असं ठरवून आम्ही निघालो.
दुसर्‍या दिवशी सकाळचेच आलो देवळात. आत्ताही देवळात कोणीही नव्हतं.
हा देवळाचा मंडप.


हा त्याचा डावा खण


हा उजवा खण


एकेक खांब जांभ्याच्या सुबक गोल चिर्‍याचा. आत्ता उखडलेली दिसत असली तरी शेणाने सारवली जात असलेली जमीन. उजव्या खणाच्या पलिकडे चिर्‍यांनी बांधून काढलेली छोटीशी विहीर.
एका बाजूने या देवळाचा पूर्ण फोटो काढायला पॅनोरमा प्रकरण वापरावे लागले.


देवळाचे सगळ्या बाजूंनी निरीक्षण करत, फोटो काढत फिरता फिरता काही गावकरी मंडळी देवळात येऊन गेली. गुरवाने येऊन पूजा केली बाप्पाची. सुंदर काळ्या कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती. देवळाच्या बांधकामातला साधेपणा मूर्तीत अजिब्बात नव्हता. दोन वेगळ्या काळात किंवा वेगळ्या शैलीत केले गेले असण्याची शक्यता नक्कीच वाटत होती. देवाच्या डोक्यातच प्रकाश पडावा अशी इच्छा असल्यासारखा बल्ब बरोबर देवाच्या डोक्याशी टांगत होता त्यामुळे आमच्या फोटुमधे जरा जास्तच उजेड पडला. :) 


देऊळ कधीचं, किती वर्षं जुनं असं एकदोघांना विचारलं तर त्यांनी केवळ स्मितहास्यानेच उत्तर दिलं. गुरवनानांना विचारलं तर 'जुना आसां.' असं उत्तर मिळालं. मग दोन बाइकवीर आले. गावातलेच असावेत असं वाटत होतं. थाटमाटावरून गावच्या राजकारणात प्रवेश करत होत्साते वाटत होते. त्यांना देऊळ किती जुनं असं विचारलं असतं तर नक्की 'पांडवकालीन' असं उत्तर मिळालं असतं.
त्यांना आम्ही काही विचारायला गेलो नाही तरी तेच आले आम्हाला विचारायला.
'काल संध्याकाळी पण गाडी पाह्यली. काय विशेष? कुठून आलात? मुंबईला कुठे असता? काय करता?'
शूटींगच्या तयारीसाठी आलोय कळल्यावर प्रश्नांचा टोन बदलला. संशय कमी झाला.
'हे जुनं झालंय देऊळ. पार मोडायला आलंय. आता जीर्णोद्धार समिती झालीये स्थापन. लवकरच जीर्णोद्धार होणार देवळाचा! मग तेव्हा शूटींग घ्या तुम्ही. एकदम सुंदर असेल देऊळ.'
असा मोलाचा सल्ला देऊन ते बाइकवीर निघून गेले.
जीर्णोद्धार हा शब्द ऐकून जरा काळजाचा ठोका चुकल्यासारखंच झालं. चिर्‍याचे खांब दिसेनासे होऊन सिमेंटचे खांब येणार. त्याला ठराविक निळे, पिस्ता, गुलाबी, पिवळे ऑइलपेंट फासले जाणार. शेणाच्या जमिनीऐवजी घसरवणार्‍या चकचकीत फरश्या येणार. सिमेंटची स्लॅब येणार. देऊळ वाटावं म्हणून त्याला उगाच बिर्ला टाइपच्या महिरपी येणार आणि कोकणातल्या मंदीर वास्तुकलेचा अजून एक नमुना धारातीर्थी पडणार.
त्यात समितीतल्या कोणीतरी पैसे खाल्ले तर हे सगळंच काम तकलादू होणार आणि २-४ वर्षातच देवळाला पूर्ण अवकळा येणार. वाईट वाटलं खूप.
परत ३-४ महिन्यांनी कामासाठी त्या भागात जाणं झालं तेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला नसल्याचं कळलं आणि आम्ही थोडं हुश्श केलं. देवळाकडे चक्कर मारली. आज देवळातली वर्दळ वाढलेली होती. पताका होत्या देवळात लावलेल्या.


गावकर्‍यांशी थोडी प्रश्नोत्तरे झाली. 'मायनिंगवाले नाही. शूटींगवाले आसंत' कळल्यावर लोकांना हुश्श झालं. जीर्णोद्धाराचा विषय निघाला. देवळाच्या सद्य वास्तूकलेचे सौंदर्य आम्ही नावाजत होतो. हे सौंदर्य असंच जपून जीर्णोद्धार केला जाऊ शकतो. असे आर्किटेक्ट लोक आहेत असं काय काय आम्ही आपल्या परीने सांगितलं. हसर्‍या आणि कीवयुक्त चेहर्‍यांनी त्यांनी ते ऐकून घेतलं. याहून आम्ही काय करणार होतो कुणास ठाऊक.
पर्वाच मैत्रिणीचा झारापहून फोन आला. नानेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होतोय लवकरच. येत्या महिन्याभरात आलात तर बघायला मिळेल पूर्वीचं मंदीर. मग नाही. अशी बातमी तिने दिली. नाणेली गावाशी माझा तसा काहीच संबंध नसतानाही किंचित अस्वस्थ व्हायला झालंच.
जीर्णोद्धार आणि सौंदर्यदृष्टी यांचा एकमेकांशी संबंध का नसतो? चकचकीत ऑइलपेंटस, गुळगुळीत टाइल्स जमिनीला याच गोष्टीत सौंदर्य भरून राह्यलंय हे कुठे शिकवलं जातं? जुन्या प्रकारचं बांधकाम, जुन्या प्रकारचं अमुक तमुक हे काळाबरोबर लयाला जाणार हे मान्यच पण म्हणून कोणी ताजमहाल नव्याने बांधत नाही ना सिमेंट, ऑइलपेंट, टाइल्स लावून जीर्णोद्धाराच्या नावाखाली की कोणी रेम्ब्राँच्या पेंटींगवर परत नवीन पद्धतीने रंग मारत नाही लेटेस्ट स्टाइल म्हणून. आपली देवळं ही जरी जगातली आश्चर्यं किंवा मास्टरपीसेस नसली तरी त्या त्या वास्तूकलेचा नमुना आहेतच ना. त्या सगळ्या खुणा पारच पुसल्या जाऊन हे असं का आणि कसं होतं?
नानेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा होणार आहे याबद्दल मला अजूनतरी कल्पना नाही. तोपर्यंत 'सुखद धक्काच द्या हो बाप्पा!' अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे नाही का? :) 
- नीरजा पटवर्धन

Sunday, July 24, 2011

For here or to go?







बरेच दिवसांपासून वाचेन म्हणत होते ते शेवटी काल संपवलं वाचून.

इथे लिहितेय म्हणजे पुस्तक खूप महत्वाचं वाटतंय मला असं काही नाही. रादर अजिबातच नाही वाटत म्हणून हा प्रपंच.  तुम्ही स्वतः किंवा जवळपासचं कोणी अमेरिकेत असेल, कधीतरी अमेरिकेत राहून आला असेल तर हे पुस्तक तुमचा इंटरेस्ट टिकवून ठेवेल अन्यथा शक्यता कमी.

लेखिकेने केलेल्या मेहनतीचे कौतुक. ३०-४० वर्षांच्याही बरंच आधी अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांच्या अजिबात माहित नसलेल्या कहाण्या आणि त्यांची पाय रोवायची धडपड याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती माहिती खरंच इंटरेस्टिंग आहे. इथे माझ्यादृष्टीने या पुस्तकाचे प्लस पॉइंटस संपले.

पुस्तकात अमेरिकेबद्दल वाईट लिहिले हो म्हणून ज्यांच्याबद्दल रडले गेलेय त्या रमेश मंत्री, सुभाष भेण्डे आणि बाळ सामंत यांचंही काही वाचलं नाही. रमेश मंत्री आणि सुभाष भेण्डे दोघांची अमेरिकेबद्दलची जी पुस्तकं होती त्याची मुखपृष्ठ आवाज-जत्रा टाइपची चावट असल्याचं आठवतंय (हा समजुतीचा घोटाळा असू शकतो) त्यावरून त्या पुस्तकांना हात लावायची गरज वाटली नाही. अमेरिकेतील सर्वांनी ह्या लेखकांना सिरीयसली घेऊन फार दु:ख करून घेतले हे लेखिकेचे म्हणणे थोडे जास्त बढाचढाकेच वाटते.

एकुणात रिपिटेशन प्रचंड आहे. काही अंशी भारतात राह्यलेल्यांना धडा शिकवायला अधोरेखित केलेले मुद्दे असल्यासारखे वाटले.

३०-४० वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या पिढीच्या धाडसाबद्दल जे लिहिलेय त्याचे कौतुक आहे निश्चित पण ज्यांच्यात धाडस होते ते अमेरिकेत गेले आणि ज्यांच्यात धाडस नव्हतं ते भारतात राहून नुसतेच टोमणे मारत राह्यले अश्या प्रकारचे ठोकताळे पटले नाहीत. त्या बाबतीत हे पुस्तक प्रचंड एकांगी होते.

काही मुद्दे तर अगदी डोक्यात जाणारे. देशात आल्यावर हक्काने उकडीचे मोदक खायला आत्याकडे जायचं असेल तर आत्याने मुलीसाठी स्थळ बघ म्हणलेलं का खटकावं बुवा? किंवा तिने विकतचे मोदक वाढले तर आत्यापण आता थकलीये आणि काळ बदललाय याची जाणीव न होता हृदय का भळभळावं?
एकुणातच भारतात महिन्याभराच्या सुट्टीसाठी आल्यावर झालेल्या बदलांनी केलेले अपेक्षाभंग फारसे पचनी न पडलेले सगळ्या अनुभवांच्यात लक्षात येतं. पण भारतातल्या आपल्या घरांमधे बदल होणारच यातली अपरिहार्यता का कळत नाही? किंवा का समजून घेता आली नाही? ते बदल म्हणजे जखम असल्यासारखं उराशी का बाळगलं गेलं हा प्रश्न सतत पडत होता. भारतात आल्यावर सतत प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत आमच्याकडे असं नाहीये असं म्हणण्याबद्दल 'आपल्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून खरी परिस्थिती लपवली' हे जरा जास्तच उगाच सारवासारव केल्यासारखं होतं. नाहीच पटलं. इथल्यांच्या प्रत्येक कुजक्या शेर्‍याटोमण्यांनी घायाळ होणार्‍यांना आपल्याकडून असे शेरेटोमणे जात नाहीयेत ना याचं भान का उरलं नाही म्हणे?

मात्र यासंदर्भात अमान मोमीनांचा पुस्तकात आलेला दृष्टीकोन एकदम रिफ्रेशिंग आणि जास्त प्रॅक्टिकल वाटला मलातरी.

शेवटाला येताना इकडचे-तिकडचे हा वाद संपवायच्या गोष्टी करत करत लेखिका परत इकडचे-तिकडचेची पाचर मारूनच ठेवते.

एकुणात ठराविक अजेंड्यासाठी 'लिहून घेतलंय' की काय पुस्तक अशी शंका आल्याशिवाय रहात नाही.

ज्यांनी वाचले नसेल त्यांनी नाही वाचले तरी आयुष्यात काही बिघडणार नाही. अर्थात भेळेचा कागदही वाचून काढण्याइतके वाचन अंगी मुरले असेल तर घ्या बापडे...

- नी

Thursday, July 21, 2011

संस्कार १ - येतोच... आलोच...

अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.
आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते. नाही वाजली. भारतीय प्रमाण वेळेनुसार अजून अर्धा तास शिल्लक होताच म्हणा. पण एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे? असा विचार करत मी चुळबुळत खुर्चीवर बसून होते.
खूप वाजून गेले आणि बेल वाजलीच नाही. भुकेने आणि वाट बघण्याने डोकं तडकलंच होतं. पोटातल्या कावळ्यांना न्याय द्यायचं ठरवलं शेवटी. त्या आणि बाकी कामांना लागले. हे असं सलग आठवडाभर चाललं. आता माझा संताप आणि वैताग उतू जाऊन जाऊन संपायला आला होता. फोनवर फोन करणे, संताप व्यक्त करणे याचाही कंटाळा आला होता. पण अडला हरी.... करणार काय.
असेच सीन्स आयुष्यात वारंवार घडत होते. घडतायत. बेल वाजवणारा माणूस वेगळा एवढाच काय तो फरक.
गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी. केलीच तर त्या लोकांची एवढी वाट नाही बघणार. मी त्यांची वाट बघावी हे भाग्य ज्यांच्या नशिबी ते म्हणजे विविध फिटिंग्ज करणारे लोक. केबल, गॅस, फोन इत्यादी. दर वेळेला मी घर बदलल्यावर या लोकांच्या नशिबात मी त्यांची वाट बघणं असतं. फोनवर अमुक दिवशी येतो, अर्ध्या तासात येतोच असं सांगून हे कधीच येत नाहीत. आपल्याला कुठलीतरी सर्व्हिस हवीये आणि ती जोडून देऊन हे आपल्यावर डोंगराएवढे उपकार करणारेत हे त्यांचं ठरलेलं असतं. सर्व्हिस चार्ज आणि बक्षिस असं दोन्ही आपल्याकडून उपटूनही उपकारच असतात ते. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे आपलं जिवितकार्यच आहे असं हे लोक समजतात. आपल्याला बाकीची कामे, पोटापाण्याचे व्यवसाय काहीही असत नाहीत (तरीही आपण सर्व्हिस जोडून घेणार असतो आणि बिलंही भरणार असतो ते राहूद्या).

आठवडाभर तंगवल्यावर यांची हृदये द्रवतात. मग अचानक एक दिवस आपलं घर तिटपावडरविरहित असताना, आपण बाहेर निघालो असताना हे उगवतात. ते आल्या वेळेला काम करून घेतलं नाही तर आपलाच गुन्हा असतो. मग आपली अतिप्रचंड महत्वाची मिटींग का असेना. या लोकांच्यापुढे ते झ्याडम्याडच ना हे त्यांचं पक्कं ठरलेलं असतं.
तर असं सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात. कधी चुकून फोन करून वेळच्या वेळेला एखादा माणूस आलाच तर धक्का बसेल मला.
आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच पण कधी कधी समोरच्याची गरज असूनही समोरचा असंच वागतो ते मात्र मला आश्चर्याचं वाटतं. नवर्‍याला दहादा फोन करून असिस्ट करायला येऊ पाहणारे स्ट्रग्लर्स, मला असिस्ट करायला इच्छुक असलेले माझेच काही विद्यार्थी, मला या क्षेत्रात काही करायचंय तर मदत कराल का अश्या आर्जवासकट फोन करणारे ओळखीपाळखीचे लोक हे पण जेव्हा भेटायची वेळ ठरवून त्या वेळेला गायब असतात, येत नाहीये/ उशीरा येतोय असं काही कळवण्याची जरूरही समजत नाहीत तेव्हा अश्यांना कोणी का काम द्यावे हा विचार अर्थातच केला जातोच. त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच.
दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही?
हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?
-------------------------
संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून.


- नी

Friday, May 20, 2011

एकदा दुपारी!

"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं.

इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता.

"अति झालंय हं तुझं आता!"
"बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो? तेच बरं. तिथेच जा तू."
"शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर!"
असे आणि या अर्थाचे संवाद अधून मधून आईबाबांच्याकडून येत होते. छोटुकल्याला काय करावं सुचत नव्हतं. आईच्या हाताला धरून चालत जाणं एवढंच तो करत होता. मधेच दादाकडे नजर टाकत होता. छोटुकल्याचा दादा मात्र कळवळून रडत ओरडत होता.

'सगळे नियम गेले खड्ड्यात, इतका कळवळतोय तो 'शू लागली' म्हणून. मुलगाच आहे. लहानही आहे. जाउदेत त्याला त्या बाजूच्या कचरापेटीच्या इथे.' असं भोचकपणे सांगायची जाम इच्छा झाली होती मला.
तेवढ्यात गल्ली वळली आणि मी वळताना मला त्या आईचा चेहराही दिसला. असेल माझ्याच आसपासच्या वयाची. जे काय चाललंय त्याची प्रचंड शरम, दु:ख, राग सगळंच होतं तिच्या चेहर्‍यावर. बाबाच्या चेहर्‍यावर पण वेगळं काही नव्हतंच.

मग लक्षात आलं मुलाला चुकीच्या वेळेला, चुकीच्या ठिकाणी 'शू लागली' यासंदर्भाने हे सगळं घडत नव्हतंच. जे काय होतं ते बरंच काही आत खोलवर होतं. मुलाला कदाचित खरंच शू लागलेलीही नव्हती. काहीतरी झालं होतं आणि 'शू होतीये' असं रडून ओरडून मुलगा आपला संताप, हतबल होणं सगळंच व्यक्त करत होता. बोर्डींगचा धाक, थोडंफार दुर्लक्ष अशी कुठलीतरी हत्यारं वापरून आईबाबाही तेच सगळं व्यक्त करत होते. कुठेतरी कुणीतरी चुकलं होतं नक्कीच. आईबापांना दोष द्यावा असं वाटलं नाही कारण मुलगा आठनऊ वर्षाचाच जरी होता तरी आईबापही आईबाप म्हणून आठनऊ वर्षाचेच होते. आणि नक्कीच मुलाचा छळ करण्याइतके निर्दय वाटत नव्हते. मुलगा रस्त्यात लाज काढतोय या रागापेक्षा आपण कमी पडतोय याची शरम त्यांच्या चेहर्‍यावर सहज दिसत होती.

पुढे मी रिक्शा पकडली आणि जिथे पोचायचं होतं तिकडे निघाले. पुढे काय झालं माहित नाही. मी मदत काही केली नाही/ करू शकले नाही. मदत काय करणार होते म्हणा. त्यांच्या कुटुंबात जो काय प्रश्न असेल तो मी तिथे मधे पडून सोडवू शकणार नाहीये हे मला पक्कं उमजलं होतं. आणि बाहेरच्या माणसाने असे नाक खुपसून त्यांना अजून लाजिरवाणं वाटायला लावणं हे काही माणुसकीला धरून वाटत नव्हतं.

मी जरी तिथे काहीच केलं नाही तरी गेला आठवडाभर या एका प्रसंगाला धरून कहाण्याच्या कहाण्या माझ्या मेंदूने विणल्या. अजूनही तो प्रसंग डोक्यातून जात नाही. फुगा घ्यायला नाही म्हणाल्यावर रस्ताभर जोरात भोकाड पसरून आईबाबांना कानकोंडं केल्याच्या आपल्या सगळ्यांच्याच आठवणी असतीलच. त्याने आपल्या आयुष्यावर परिणाम नाही झाला काही. तशीच ही घटना ठरो अशी आशा करणंच उरतं आपल्याकडे.
पण तरी ही गल्ली चांगलीच लक्षात राहील माझ्या आणि हे कुटुंबही.

- नी

Wednesday, April 13, 2011

सेमो म्हणे!

चित्रकारांसंदर्भात चित्रपट बघायला मिळत होते. चित्रकाराचं नाव होतं जाँ मिशेल बास्किया. नाव ऐकून वेगळ्याच अपेक्षा होत्या आणि समोर वेगळंच काही आलं. बर्‍यापैकी कानाखाली वाजवणारं आणि तरीही खिळवून ठेवणारं. समोर उलगडला ब्रूकलिनमधला, ग्राफिटीमधून पुढे आलेला, संपूर्ण विस्कटलेला आणि मजेशीर ब्लॅक चित्रकार. चित्रं आणि लिहिलेली चित्रं बनवण्याचं व्यसन असलेला.
Untitled_acrylic_and_mixed_media_on_canvas_by_--Jean-Michel_Basquiat--,_1984.jpg
चित्र १ - अनटायटल्ड (स्कल) १९८४
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक आणि मिश्र माध्यम.
==Licensing== '''Fair use rationale:''' # This is a historically significant work that could not be conveyed in words. # Inclusion is for information, education and analysis onl

बास्कियाने १९८४ साली कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक आणि मिश्र माध्यमात रंगवलेलं हे चित्र. बास्कियाने या चित्राला काही नाव दिलेलं नाही. त्याने त्याच्या बर्‍याच चित्रांना नावं दिलेली नाहीत. संदर्भासाठी संग्राहकांनी वा अभ्यासकांनी 'स्कल' (कवटी) असं या चित्राला नंतर दिलेलं नाव.
हो, हे पेंटिंगच आहे. ही एक कलाकृतीच आहे. ही कलाकृती आहे, म्हणजे चांगली अथवा वाईट आहे, असं म्हणता येणार नाही. पण ही कलाकृती आहे नक्की. कलाकृतीमध्ये सर्वसाधारणतः दिसणारं ठरावीक प्रकारचं सौंदर्य यात कदाचित दिसणार नाही. पण तरी ही कलाकृती आहे.

Untitled--Halo---1982.jpg
चित्र २ - अनटायटल्ड (हेलो), १९८२
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

हे बघा. रेघोट्यांसारख्या विचित्र रेषा, मध्येच अक्षरं, हुबेहूब नसलेलं सगळं काही, सवयीची नसलेली भडक रंगसंगती, रंगांची अर्थहीन वाटणारी सरमिसळ, असं बरंच काही बघितलंत? हे पण पेंटिंगच आहे. ही पण कलाकृतीच आहे.
पण मग ह्याला 'कला' म्हणायचं तर मग 'कला' म्हणजे काय? असा प्रश्न निश्चितच उमटला असेल तुमच्या मनात. मग काय करणार कलेची व्याख्या? कशी करणार? डोळ्यांना सुखावते ती कला, आनंद निर्माण करते ती कला, अनुभव देते ती कला, समजते किंवा कळते ती कला, प्रामाणिक व्यक्त होणं म्हणजे कला, भावनेला आव्हान देते ती कला, विचार पोचवते ती कला, अस्वस्थ करते ती कला. असे अनेक आडाखे किंवा अपेक्षांची यादी करता येईल. हे आडाखे एकेकटे किंवा एकत्र मिळून ठरावीक कलाकृतींच्या बाबत योग्यही असतील. पण तरी हे सगळे आडाखे मिळूनही कलेचा पूर्ण आवाका लक्षात येणार नाहीच. व्याख्या अपूर्णच राहील.

कारण ही आडाख्यांची, अपेक्षांची यादी कलानिर्मितीच्या प्रवासाबरोबर वाढत जाणार. काही आडाखे कदाचित कालबाह्य होऊन यादीतून गळून जाणार. म्हणजे कलेच्या मर्यादा आणि कक्षा बदलत्या असणार. या प्रत्येक आडाख्याला धरून कला या संकल्पनेबाबत ठाम मते निर्माण होऊन बाजूने वा विरूद्ध वाद होणार. एकेका उदाहरणासकट एकेक नवीन आडाख्याची या यादीत वा व्याख्येत भर पडत जाणार. या सगळ्या चलनवलनामुळे कला ही संकल्पना समृद्ध होत राहणार.  अशा प्रकारच्या संकल्पनांना 'स्वभावतः वादग्रस्त संकल्पना' (एसेन्शियली कॉन्टेस्टेड कॉन्सेप्ट्‌स्‌) असं म्हटलं जातं. ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ वॉल्टर ब्रायस गॅलि यांनी १९५६ साली हा सिद्धांत मांडला. यामध्ये साहित्य, संगीत, दृश्य कला, नाटक, नृत्य अशा अनेकांचा समावेश होतो.
तस्मात, वरची चित्रे तुम्हांला अनुभव देत असतील किंवा खिळवून ठेवत असतील किंवा गेलाबाजार त्रास तरी देत असतील, तर त्यांना कलाकृती म्हणायला हरकत नाही.

या कलाकृतींनी मला पहिल्या भेटीतच खिळवून ठेवलं. या चित्रांमध्ये गुळगुळीत गोड प्रतिमा नव्हत्या, सुखावणारे रंग नव्हते, सुंदर किंवा भीतीदायक पण अद्भुत असे स्त्रीपुरूष नव्हते, गोयाच्या[४] चित्रांसारखं थरकाप उडवणारं क्रौर्य नव्हतं, माणसासारखा हुबेहूब माणूस आणि कुत्र्यासारखा तंतोतंत कुत्रा नव्हताच. पण असं काहीतरी जबरदस्त होतं की, हे सगळं नसताना त्या चित्रांकडे परत परत बघावसं वाटत होतं. अस्वस्थ केलं त्या चित्रांनी, भोवंडायलाही झालं कधीकधी, पण त्यापेक्षाही जास्त मौज आली. एखाद्या गोष्टीवर खवचट हसताना येते ना तशी मौज, आपला विस्कटलेला गाभा पूर्ण नागडा करून चार मित्रांनी एकमेकांवर खिदळावे तशी नागडी नशेदार मौज. त्याच्या चित्रांतल्या व्यक्त होण्यातल्या खरेपणाने, नागडेपणाने मला तरी झपाटलं. मग जिथे जसा जमेल तसा बास्किया शोधत राह्यले.

कोण होता बास्किया? अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी अंमली पदार्थांमुळे कारभार आटोपलेला, पण आधीच्या आठ-नऊ वर्षांत न्यूयॉर्क आणि युरोपच्या कलाजगतात प्रचंड गाजलेला असा एक गमतीशीर माणूस. उणीपुरी दहा वर्षांची कारकीर्द असलेलं 'तेजस्वी मूल', रस्त्यावर राहून मिळेल त्या वस्तूंनी मिळेल त्या पृष्ठभागावर चित्र काढणार्‍यापासून भरपूर पैसा आल्यावर $१०००चा अर्मानीचा सूट घालून पेंटिंग करणारा आणि पेंटिंगचे फटकारे सूटवर तसेच घेऊन सोहो[१] ते मॅडिसन अ‍ॅव्हेन्यू किंवा युरोपातल्याही बड्याबड्या पार्ट्यांमध्ये वावरणारा एक चित्रकार, की अजून काही?

हेशियन वडील आणि पोर्टोरिकन आईच्या पोटी एका मध्यमवर्गीय घरात २२ डिसेंबर १९६० साली जन्मलेला जाँ मिशेल चित्रकार बनण्याचं नशीब घेऊन आला होता. लहान असताना तो भरपूर चित्रं काढत असे. त्याच्या आईचीही इच्छा होती मुलाने चित्रकार बनावं. ती त्याला मॉडर्न आर्ट म्यूझियम आणि न्यूयॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्यूझियम ऑफ आर्टमध्ये चित्रं दाखवायला नेत असे. जाँ मिशेल आठ वर्षांचा असताना त्याला रस्त्यावर एका गाडीने धडक दिली. त्या अपघातात त्याचा हात मोडला, प्लीहा काढून टाकावी लागली. या दरम्यान तो हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेत असताना त्याच्या आईने त्याला 'ग्रेज अनॅटमी' हे पुस्तक वाचायला आणून दिलं. चित्रं आणि चित्रकार यांच्यात रस असलेल्या त्याच्या आईला हे पक्कं माहीत होतं की, मिकलांजेलो आणि जगातल्या प्रत्येक महान चित्रकाराने शरीरशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. या पुस्तकातल्या चित्रांचा जाँ मिशेलवर परिणाम झालेला दिसतो. अपघातातून बरा व्हायला मदत झालीच पण त्याची स्वतःची अशी चित्रशैली निर्माण व्हायला या चित्रांचा उपयोग झाला. प्रसिद्ध चित्रकार होण्याच्या इच्छेनेही इथेच कुठेतरी जन्म घेतला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर वडिलांच्या घरी रहाताना त्याची कुचंबणा होऊ लागली. मग सगळा राग, वैताग तो चित्रांतून बाहेर काढू लागला. प्रसिद्ध होण्याची प्रचंड इच्छा, चित्रं काढण्याचं व्यसन आणि साहसाचं आकर्षण या सगळ्यांच्या परिणामातून अंमली पदार्थांची नशा करू लागला.

 १९७७च्या आसपास जाँ मिशेल आणि अल दियाझ असे दोघं मिळून न्यूयॉर्कच्या सोहोमधल्या इमारतींवर ग्राफिटी काढू लागले. 'सेमो' (सेम ओल्ड शिट) या नावाची, खोटे तत्त्वज्ञान, खोटा धर्म विकून आपली उपजीविका करणारी व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केली. सेमोच्या वाक्यांनी सोहोमधल्या भिंती भरून जाऊ लागल्या. कॅपिटलमध्ये एस - ए - एम - ओ लिहून त्यापुढे किंचित खाली कॉपीराइट चिन्ह असल्यासारखा गोलात 'सी' अशी या सेमोची सही किंवा टॅग होता. हा असा - SAMO© .
'सेमो इज अ‍ॅन एन्ड टु माइण्डवॉश रिलिजन, नोव्हेअर पॉलिटिक्स अ‍ॅण्ड बोगस फिलॉसॉफी' (डोकं धुवून टाकणारा धर्म, कुठेही थारा नसलेलं राजकारण आणि खोटं तत्त्वज्ञान यांचा सेमो हा शेवट आहे), 'सेमो सेव्हज इडियटस्' (सेमो मूर्खांना वाचवतो), 'प्लश सेफ ही थिंक' (गुबगुबीत, आलिशान जे, ते सुरक्षित असं तो म्हणतो) अशी काही त्याची वाक्यं होती. हे एक उदाहरण.
imgC1.jpg
चित्र ३ - ग्राफिटी
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

याबद्दल त्याला विचारलं असता 'दांभिकपणाची टर उडवणे' हा हेतू असल्याचं बास्किया स्पष्ट करी. त्याच्या चित्रांच्या विषयांबद्दल विचारलं असता 'रॉयल्टी (राजेमहाराजे), हिरोइझम (शौर्य) आणि स्ट्रीट्स् (रस्त्यावरचं जग) असं तो सांगे. हा सेमोचा प्रकल्प काही दिवस चालला. 'सेमो इज डेड' (सेमो मेला आहे), असं सोहोमधल्या भिंतींवर जाहीर करून हा प्रोजेक्ट संपला.
visual_samo.jpg
चित्र ४ - ग्राफिटी
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

या सेमो प्रकाराने सबवे ट्रेन्स आणि इतर भूमिगत जगात बास्कियाला प्रसिद्धी मिळाली. दरम्यान १९७८च्या सुमारास त्याने शाळा सोडली, घर सोडलं आणि तो मित्रांबरोबर राहू लागला. उपजीविकेसाठी तो टीशर्ट रंगवून विकणं, हाताने बनवलेली पोस्टकार्ड्‌स्‌ विकणं असे उद्योग करत असे. सोहोमधल्या एका उपहारगृहात त्यानं प्रत्यक्ष अ‍ॅण्डी वॉरहॉलला[२] असं पोस्टकार्ड $१ ला विकलं होतं.

१९८०मध्ये पहिल्यांदा जाँ मिशेल बास्कियाची चित्रं 'टाइम्स स्क्वेअर शो' या प्रदर्शनात घेतली गेली. त्याच्याबरोबर अनेक महत्त्वाच्या चित्रकारांची चित्रं या ठिकाणी होती. जाँ मिशेल हा या सगळ्यांमध्ये वयाने लहान होता. यानंतर १९८१ मध्ये रने रिकार्द या कवी आणि कलासमीक्षकाने जाँ मिशेल बास्कियावर 'रेडियंट चाइल्ड' या शीर्षकाचा लेख लिहिला. या लेखाने जाँ मिशेल बास्कियाला 'ग्राफिटी आर्टिस्ट' आणि 'ग्राफिक आर्टिस्ट' या शिक्क्यांपलीकडे जाऊन 'फाइन आर्टिस्ट' अशी मान्यता मिळाली. न्यूयॉर्कनंतर मग युरोपमधल्या काही गॅलर्‍यांमध्येही त्याची चित्रे दाखवली गेली. कलासंग्राहक आणि दलाल, विक्रेते अशा सगळ्यांनीच त्याची शैली नावाजली.

भावनांचा तीव्र, धसमुसळा आविष्कार आणि माध्यमांची रासवट, रांगडी हाताळणी यांमुळे त्याच्या शैलीला निओ-एक्स्प्रेशनिस्ट शैलीचे प्रतिनिधित्व करणारी चित्रकला म्हटले गेले. चित्रातली मांडणी, रंग आणि उस्फूर्तता व कौशल्य यांच्यात साधलेला समतोल यासाठी कलासमीक्षक त्याला नावाजू लागले. मानवी आकृत्या त्याच्या सर्व चित्रांच्या केंद्रबिंदू असत. मानवी आकृत्या, शब्द, काट मारलेले शब्द, विविध चिन्हं आणि वेगवेगळ्या रंगांनी झाकलेले पार्श्वभूमीतील निरनिराळे भाग हे त्याच्या बर्‍याचशा चित्रांमध्ये बघायला मिळतात.
Italian.jpg
चित्र ५ - इन इटालियन १९८३
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक, ऑइलस्टिक आणि मार्कर.
द स्टेफनी अ‍ॅण्ड पीटर ब्रांट फाउंडेशन, ग्रीनविच, कनेटिकट

बास्कियाने वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, शब्द, रंग आणि प्रतिमा कोलाजमध्ये आणल्यासारख्या एकत्र आणल्या. या दृश्य कोलाजबरोबर खरोखरीचं कोलाजही त्याच्या चित्रांमध्ये बघायला मिळतं. सुरूवातीच्या काळातल्या काही चित्रांमध्ये त्याने कागदाचे कपटे चित्राच्या पृष्ठभागावर चिकटवून वेगळा पोत निर्माण केल्याचं दिसून येतं. १९८४-८५ दरम्यान केलेल्या काही चित्रांमध्ये स्वतःच्याच रेखाटनांना आणि त्यांच्या रंगीत फोटोकॉप्यांना एकत्र चिकटवून चित्रनिर्मिती केल्याचं दिसतं. संपूर्ण कॅनव्हासवर आधीच्या चित्रांच्या रंगीत फोटोकॉप्या लावून त्यावर मग मुखवट्यासारखी दिसणारी गायी आणि उंदरांची डोकी रंगवून काही चित्रे त्याने केली होती. या कोलाजिंगमध्ये अजून सुबकता आणण्यासाठी बास्कियाने सिल्कस्क्रीनिंग (स्क्रीनपेंटींग) तंत्राचा वापरही केलेला दिसतो. त्याने सिल्कस्क्रीन केलेल्या प्रतिमा कॅनव्हासवर डकवण्यासाठी वापरल्या.
माध्यमांचे वेगवेगळे प्रयोग करताना त्याने एकाच कॅनव्हासवर दोन प्रकारचे रंग तर वापरलेच पण त्या त्या प्रकारच्या रंगांच्या तंत्रांमध्येही प्रयोग केलेले दिसून येतात. 'नोटरी' या चित्रात त्याने कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंग अशाप्रकारे वापरले आहेत की जेणेकरून रंगांचे ओघळ स्पष्टपणे दिसतील. ऑइल पेन्टस्टिक नावाचं एक प्रकरणही त्याने कॅनव्हासवर आणि इतर चित्रांवर लिहिण्यासाठी वापरलं. तैलरंगांनी भरलेला एक मोठा खडू असं काहीसं या वस्तूचं स्वरूप होतं.
notary.jpg
चित्र ६ - नोटरी, १९८३.
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक, ऑइल पेन्टस्टिक व पेपर कोलाज. शॉर (Schorr) कुटुंबियांचा संग्रह. सध्या प्रिन्सटन युनिव्हर्सिटी आर्ट म्यूझियममध्ये.

सुरूवातीच्या काळात सोहोमधल्या इमारतींच्या भिंतींपासून कशावरही रंगवल्यामुळे कुठलाही पृष्ठभाग चित्र काढण्यासाठी तो वापरू शकत असे. दुसर्‍यांच्या चित्रांच्या मागे, दारांवर, शेल्फवर, मैत्रिणीच्या ड्रेसवर अशा अनेक ठिकाणी त्याने चित्रं काढून बघितलेली आहेत.
त्याच्या ग्राफिटीच्या दिवसांतल्या आणि नंतरही काही चित्रांमध्ये दिसणार्‍या सेमो या सहीबरोबरच एक चिन्ह त्याच्या चित्रांमध्ये सतत दिसतं, ते म्हणजे मुकुटाचं. हे चिन्ह त्याच्या नंतरच्या चित्रांमध्येही सतत दिसतं. शूर आणि महान अशा व्यक्तींसाठी हे चिन्ह तो राजचिन्ह या अर्थी वापरतो. बास्कियाला त्याच्या चित्रांतल्या विषयांबद्दल विचारले असता तो 'रॉयल्टी (राजेमहाराजे), हिरोइझम (शौर्य) आणि स्ट्रीट्स (रस्त्यावरचं जग) हे माझे महत्त्वाचे विषय आहेत, असं तो सांगे. त्यामुळे हे मुकुटाचं चिन्ह वारंवार येणं साहजिकच वाटतं.
JMB_panelofexperts.jpg
चित्र ७ - पॅनेल ऑफ एक्स्पर्ट्स
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

बास्कियाच्या चित्रांमध्ये सगळीकडे अक्षरं, शब्द दिसतात हे आपण बघितलंच. ग्राफिटीपासून सुरुवात झालेली असल्याने चित्रात शब्द असणं हे साहजिकच आहे, असंही म्हणता येईल. पण चित्रात शब्द असण्याचं तेवढंच कारण पुरेसं वाटत नाही. बास्कियाने आपल्या ग्राफिटीला कधी पेंटिंग मानलं नाही, पण त्याच्या चित्रांतून येणारे शब्द हे शब्दांपेक्षा कुंचल्याचे फटकारे असल्यासारखे वापरल्याचं त्याने नेहमीच सांगितलं. बास्कियाच्या चित्रांमध्ये अनेकदा त्याने शब्द लिहून त्यावर काट मारलेली असे. त्यासंदर्भात 'तुम्ही जे जास्त करून वाचावं/ बघावं असं मला वाटतं, त्यावर मी काट मारतो; जेणेकरून विद्रूप केल्यामुळे तुमचं लक्ष तिकडे अधिक जाईल', असा बास्कियाचा विचार असे. बास्कियाच्या पोर्टोरिकन पार्श्वभूमीमुळे त्याच्या चित्रांमध्ये स्पॅनिश भाषेतले शब्दही बरेच असत. त्याच्या चित्रातले वा ग्राफिटीमधले शब्द वाचताच येणार नाहीत इतपत विचित्र कधी नसत. नेहमीपेक्षा लक्ष वेधून घेतील असे, पण तरीही साधेपणाने लिहिलेले असे ते शब्द असत. उदाहरणार्थ, ग्राफिटीमध्ये लिहिताना कॅपिटल 'ई' या अक्षराची उभी रेघच तो देत नसे. त्याच्या ग्राफिटीतल्या शब्दांना, सेमोच्या वचनांना आणि नंतर चित्रांत वापरलेल्या शब्दांनाही काही जणांनी 'व्हिज्युअल पोएट्री' (दृश्य काव्य) असं संबोधलं होतं.

त्याच्या चित्रांमध्ये मानवी आकृत्या अतिशय महत्त्वाच्या असत, हे आपण बघितलं. प्रत्येक वेळेला अखंड संपूर्ण मानवाकृती असेलच असं मात्र नाही. कधी एखादाच अवयव तर कधी सुटे सुटे काही अवयवही त्याच्या चित्रांमध्ये येत असत. डोकं आणि कवटीचं चित्र आपल्याला बर्‍याच ठिकाणी दिसतं. पूर्ण मानवाकृती वा सुटे अवयव असले तरी ते हुबेहूब खर्‍यासारखे कधीच नसत. बाह्य आवरण काढून टाकून मानवाचा, डोक्याचा, पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न कायम असे. त्वचेच्या आवरणाखालच्या नसा, स्नायू आणि आतला सांगाडा उघडा करून दाखवलेला असे. आतलं आणि बाहेरचं एकाच वेळी दाखवणारी क्ष-किरण दृष्टी असल्यासारखं असं काहीतरी चित्रात दिसे. लहानपणी वाचून काढलेल्या 'ग्रेज अनॅटमी' या पुस्तकातल्या आकृत्यांचा प्रभाव या ठिकाणी सहज दिसतो. जेवढं वरवर दिसतंय त्याच्यापेक्षा इथे बरंच काही दडलेलं आहे असा काहीसा भाव या प्रकारच्या चित्रात असावा, अशी शक्यता वाटते. स्वतः बास्किया हा वरवर शांत दिसला तरी भावनिक पातळीवर सतत असंतोष, वैताग, विचार, प्रश्न, असुरक्षितता इत्यादी नेहमी खदखदत असत. त्याचंच हे प्रतिबिंब असणं सहज शक्य आहे (चित्र ८).
1395_jean_michel_basquiat_warri.jpg
चित्र ८ - वॉरियर, १९८१ न्यू यॉर्क, यू एस ए
source: Magazine www.egodesign.ca

बास्कियाला जॅझ आणि हिप-हॉप संगीत आवडत असे. या संगीतातली तालबद्धता आपल्याला बास्कियाच्या चित्रांमध्येही दिसते. एखादी गोष्ट परत येणे, वेगवेगळ्या रेषांनी एकमेकांना छेदणे, रंग, आकृत्या, शब्द या सगळ्यांतून चित्राला एक गतिवानता आलेली दिसते (चित्र ९).
1387_jean_michel_basquiat_antho.jpg
चित्र ९ - अ‍ॅन्थनी क्लार्क, १९८५ न्यू यॉर्क, यू एस ए
source: Magazine www.egodesign.ca

या प्रकारच्या संगीताची आवड ही बास्कियाच्या ब्लॅक असण्याशी अर्थातच जोडता येते. बास्किया हा हेशियन आणि पोर्टोरिकन आईवडिलांच्या पोटी जन्मलेला आफ्रिकन अमेरिकन माणूस होता. ब्लॅक माणूस चित्रांत आणणे, तो त्याच्या चित्रांचा नायक असणे हे बास्कियाच्या बर्‍याचशा चित्रांमध्ये दिसून येतं. स्वत:च्या ब्लॅक असण्याबद्दलची जाणीव त्याच्या चित्रांतून, तो वापरत असलेल्या चिन्हांतून स्पष्ट दिसून येते. कधी माहितीवजा पातळीवर, कधी असंतोष म्हणून, कधी वर्णभेदावर तिखट प्रतिक्रिया म्हणून तर कधी औपरोधिक पातळीवर. आफ्रिकन संस्कृतीचं जन्मस्थान प्राचीन इजिप्त मानलं जातं. बास्कियाचं एक महत्त्वाचं चित्र आहे ज्याचं नाव आहे 'द नाइल'. हे चित्र इजिप्तमधील नाइल नदीशी संबंधित आहे. प्राचीन इजिप्शियन चित्रांतील काही चिन्हे (डोळा व लाटा) आणि चित्रलिपीमधील (हिरोग्लिफ) खुणा 'द नाइल'बरोबरच इतर अनेक चित्रांतही दिसून येतात (चित्र १०).
JMB_TheNile83.jpg
चित्र १० - द नाइल १९८३
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक आणि ऑइलस्टिक. लाकडी सपोर्ट्‌स्‌वर चढवलेले.
एनरिको नवारा (Enrico Navarra) संग्रहातून

ब्लॅक असण्याच्या जाणिवेबरोबरच कुणाही माणसाच्या शहरी वास्तवातल्या अनेक गोष्टी मुद्दे बनून त्याच्या चित्रांत आलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, डांबर, तेल, जुने पत्रे, सोनं या सगळ्याला धरून येणार्‍या समस्या. याचबरोबर आर्थिक विषमतेबद्दलही बास्किया त्याच्या चित्रांतून भाष्य करतो. सामाजिक न्याय, वंशभेद, चंगळवाद, शोषण हे विषय त्याच्या चित्रांमध्ये पुनःपुन्हा येतात. यावर भाष्य करण्यासाठी टोकाच्या विरूद्ध गोष्टी तो एकाच चित्रात दाखवतो. उदाहरणार्थ, अतिगरिबी आणि अतिश्रीमंती. यासंदर्भातलं हे 'पर कॅपिटा' या शीर्षकाचं चित्र (चित्र ११).
JMB_percapita.jpg
चित्र ११ - पर कॅपिटा
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

या जाणिवेपोटी किंवा अजून कशामुळे असेल, असं म्हणतात की बास्किया काही बाबतींत खूप उदार होता. त्याने सुरूवातीच्या काळात हाती करून विकलेली पोस्टकार्ड्स, सोहो इमारतींची पॅनेल्स किंवा सेमोच्या वचनांची ग्राफिटो असलेली कुठलीही वस्तू या सगळ्याला बास्कियाचं नाव झाल्यावर मोठा भाव आला होता. अनेक लोक आर्ट डीलरकडे ह्या वस्तू घेऊन पोचत. ग्राफिटी आणि तत्सम वस्तू असल्याने खरोखर की बनावट हे ठरवणे त्यांना अवघड जाई. खात्री करण्यासाठी बास्कियाला विचारले असता तो शहानिशाही न करता वस्तू बनावट नाही, अशी ग्वाही देई. आपल्या नावावर आपल्या रस्त्यावरच्या मित्रानेही थोडे पैसे कमावले तर बिघडलं कुठे, असा त्याचा दृष्टिकोन असे.

बास्कियाच्या चित्रांमध्ये विविध प्रकारच्या कलाजाणिवांचा मेळ दिसतो. त्या एकत्र आलेल्या दिसतात. पण हा मेळ काही एका सामाजिक, राजकीय दृष्टिकोनाला धरून येतो. ह्यामुळे काही कलासमीक्षकांनी बास्कियाला निओ-पोस्ट-मॉडर्निस्ट असंही म्हटलं आहे. अशा प्रकारच्या जाणिवांनी झपाटून जाऊन बास्किया चित्रनिर्मिती करत होता. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्याची चित्रं दाखवली जात होती. त्याच्या काही चित्रांनी कलाबाजारातल्या आर्थिक उलाढालींचा उच्चांक गाठला होता. नाव, स्टेटस यांबरोबरच केवळ तीनचार वर्षांत अन्नान्नदशेपासून पैशात लोळण्यापर्यंत त्याची आर्थिक स्थितीही बदलली.

या दरम्यान १९८२मध्ये बास्किया आणि अ‍ॅण्डी वॉरहॉल आर्ट कोलॅबोरेटर्स म्हणून एकत्र आले. चारच वर्षांपूर्वी सोहोमधल्या एका उपहारगृहात अ‍ॅण्डी वॉरहॉलला गाठून बास्कियाने आपण बनवलेली पोस्टकार्ड्स प्रत्येकी $१ला विकली होती. प्रत्यक्ष अ‍ॅण्डी वॉरहॉलने आपली पोस्टकार्ड्स घेतली यामुळे वाटलेल्या धन्यतेबरोबर रस्त्यावर रहाणार्‍या जाँ मिशेलला त्या विक्रीतून पोट भरण्यासाठी थोडेफार पैसे मिळाले असावेत. आता परिस्थिती वेगळी होती. अ‍ॅण्डी वॉरहॉल पॉप आर्टचा[३] बादशहा होता. जाँ मिशेल बास्कियाला त्याच्या कलेबद्दल, प्रसिद्धीबद्दल प्रचंड औत्सुक्य होतेच, पण आता तो स्वतःही थोडक्या कालावधीत जगभर गाजलेला चित्रकार असल्याने अ‍ॅण्डीलाही त्याच्याबद्दल कौतुक, उत्सुकता होती. गाढ मैत्री आणि कलेतली पार्टनरशिप या दोन्ही पातळ्यांवर हे नातं वाढलं. दोघांनी एकत्र मिळून बरेच मोठे मोठे कॅनव्हास केले. दोन प्रतिभावान व्यक्तींमधला चित्रसंवाद म्हणता येईल असं त्या कॅनव्हासेसचं रूप होतं. दोघांच्या आपापल्या शैली एकमेकांना पूरक म्हणून आलेल्या या चित्रांमध्ये बघायला मिळतील. ही पार्टनरशिप १९८७पर्यंत म्हणजे अ‍ॅण्डी वॉरहॉलच्या मृत्यूपर्यंत टिकली.

जाँ मिशेलच्या इथपर्यंतच्या सगळ्या प्रवासात अंमली पदार्थांची साथ फारशी सुटली नव्हती. उलट ती सवय वाढतच गेली होती. अ‍ॅण्डीच्या सांगण्यावरून त्याने ही सवय सोडण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण ते सगळे प्रयत्न अल्पजिवी ठरले होते. अ‍ॅण्डी वॉरहॉलच्या मृत्यूनंतर जाँ मिशेल बास्किया कमालीचा एकटा पडला. अंमली पदार्थांचा वापर वाढत गेला. १९८८मध्ये स्वतःच्या मृत्यूशी सामना झाल्याचं चित्र त्यानं रंगवलं होतं. या चित्राचं नाव होतं 'रायडिंग विथ डेथ' (मृत्यूबरोबर सवारी!). http://4.bp.blogspot.com/_7UHICy8Etfo/S-BvBtlTS5I/AAAAAAAAJ0Q/B-c_hWIp1B... या ठिकाणी हे चित्र बघायला मिळेल. आयुष्यात त्याने केलेलं हे शेवटचं चित्र. यानंतर थोड्याच दिवसांत अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. 'डाय यंग अ‍ॅण्ड लीव्ह अ ब्युटिफुल कॉर्प्स बिहाइंड!', (तरूणपणी मरून सुंदर प्रेत मागे सोडा!) हे ब्रीदवाक्य असल्यासारखा तो जगला.

गेली दोन वर्षं शोधायचा प्रयत्न करत राहिल्यानंतर हाताशी आलेला हा थोडासा जाँ मिशेल बास्किया. भारतात तशा अपरिचित असलेल्या एका मनस्वी कलाकाराची आणि त्याच्या कलेमधल्या योगदानाची ही धावती ओळख आहे. हा लेख म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्याची भलावण नव्हे. हा लेख म्हणजे ह्या प्रकारची कलाच श्रेष्ठ, असं काही पटवण्याचा अट्टहासही नव्हे. बास्कियाचा कलाप्रवास, त्याची चित्रं, यांची ओळख करून घेतल्यावर कलेसंबंधीच्या आपल्या जाणिवा थोड्यातरी किलकिल्या झाल्या, बास्कियाच्या कालखंडाबद्दल, त्या अनुषंगाने असलेल्या वेगवेगळ्या कलाप्रवाहांबद्दल कोर्‍या आणि मोकळ्या मनाने समजून घ्यावं, असं वाचकांपैकी एकाला जरी वाटलं, तरी बरीच मोठी मजल मारल्यासारखं आहे.
---------------------------------------------------------------------------
तळटिपा -
[१] सोहो - साउथ ऑफ ह्यूस्टन(स्ट्रीट) ही शब्दाची फोड. १९व्या शतकाच्या मध्यात हा भाग औद्योगिक भाग म्हणून उदयास आला. अनेक प्रकारची वर्कशॉप्स इथे होती. नंतर दिवसा कामकरी लोकांची वर्दळ तर रात्री या कामकरी लोकांना रिझवणारे सर्व प्रकारचे वैध-अवैध धंदे इथे चालू झाले. २०व्या शतकाच्या मध्यात इथले उद्योग कमी झाले आणि रिकाम्या झालेल्या या गाळे प्रकारच्या स्वस्त जागा अनेक दृश्य कलेच्या कलाकारांनी आपले स्टुडिओ आणि घर एकत्र थाटण्यासाठी निवडल्या. १९६८च्या दरम्यान 'आर्टिस्ट इन रेसिडन्स' या शीर्षकाखाली त्यांनी शासनाकडून मान्यता आणि सवलतीही मिळवल्या. यामुळे या भागाचं रूप पालटलं.
[२] अ‍ॅण्डी वॉरहॉल (१९२८-१९८७) - अमेरिकन चित्रकार, ग्राफिक आर्टिस्ट, फिल्ममेकर इत्यादी. पॉप आर्ट या दृश्यकलाप्रवाहातील एक महत्त्वाचे नाव.
[३] पॉप आर्ट - १९५०च्या दशकात आधी ब्रिटन आणि मग अमेरिकेत हा दृश्यकलाप्रवाह सुरू झाला. पारंपरिक चित्रनिर्मितीला या प्रवाहाने छेद दिला. मोठ्या प्रमाणात एकगठ्ठा उत्पादित होणार्‍या वापराच्या वस्तूंशी संबंध असलेल्या प्रतिमांचा वापर दृश्य कलेत केला गेला. या प्रतिमा त्यांच्याशी संलग्न असलेल्या वस्तूंपासून, संदर्भांपासून बाजूला काढून एकेकटी प्रतिमा किंवा अशा अनेक प्रतिमा एकत्रित घेऊन, आपलं म्हणणं मांडण्यासाठी एका चित्रात आणल्या गेल्या.
[४] गोया - गोया हा स्पॅनिश, रोमँटिक शैलीतील चित्रकार होता. - http://en.wikipedia.org/wiki/Francisco_Goya
गोयावर केलेल्या चित्रपटाविषयी इथे बघा - http://www.imdb.com/title/tt0455957
------------------------------------------------------------------------------------
संदर्भसूची -
१. Basquiat - 1996 biopic/drama film, directed by Julian Schnabel
२. ARTFORUM Magazine :: Volume XX No. 4, December 1981. p.35-43
The Radiant Child by Rene Ricard
३. Basquiat Obitury: Jean Basquiat, 27, An Artist of Words And Angular Images
by CONSTANCE L. HAYS
४. http://www.smartwentcrazy.com/basquiat/index.html
५. Basquiat: A Quick Killing in Art by Pheobe Hoban
६. http://www.brooklynmuseum.org/exhibitions/basquiat/street-to-studio/engl...
७. Jean-Michel Basquiat - SAMO the shooting star
http://www.egodesign.ca/en/article.php?article_id=92&page=1
८. http://en.wikipedia.org/wiki/Jean-Michel_Basquiat
९. http://www.gagosian.com/artists/jean-michel-basquiat/?gclid=CLTOs4K7s6QC...
- नीरजा पटवर्धन 

हा लेख मायबोली डॉट कॉम च्या २०१० दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

Thursday, January 27, 2011

धोबी घाट

आवडला. फ्रेश वाटला. खोटा नाहीये. अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे. सुदैवाने आमिरची लुडबुड दिग्दर्शनात नाहीये हे कळतं आणि ते बरं वाटतं.
कंटाळा बिलकुल येत नाही.
पण It did not touch my heart!
>>>नक्षीच्या प्रेमात, ट्रीट्मेंटच्या प्रेमात अडकल्या सारखा टेंटेटीव्ह होतो.<<<
हे एका मित्राने मायबोलीवर लिहिलंय त्याला अगदी अगदी. खूप सारे जागतिक सिनेमाच्यांतले क्लीशे वापरल्याचं जाणवलं. पण किरण रावची पहिली फिल्म आहे आणि त्यामुळे हे साहजिकच. पेंटरच्या मागे बेगम अख्तर यांची ठुमरी हा ठार क्लीशे असला तरी मला आवडला. स्मित

आमिर मिसफिट एकदम. त्याची देहबोली पेंटरची नाहीच वाटत. पेंटींगची सुरूवात तो पिवळ्या, लाल रंगातून करतो, त्याच्या टेक्निकमधे/ हात चालवण्यात तो अक्षरशः कॅनव्हासवर तुटून पडताना दाखवलाय, त्याच्या स्ट्रोक्समधे प्रचंड अनरेस्ट आणि रॉ इमोशन दिसते. पण बाकीच्या वेळेला तो फारच ढोबळ आणि डेड परफॉर्म करतो. तो टिपिकल बॉलिवूड काढू नाहीये शकलेला स्वतःतून. आणि एक अगदी बारीक गोष्ट पण मला खूपच खटकली ती म्हणजे पेंटींग पूर्ण होतं तेव्हा कॅनव्हासवर आपल्याला यास्मिनचा चेहरा दिसतो. too much realistic आणि त्या चेहर्‍याच्या लाइन्सची शैली ग्राफिक डिझायनर्स सारखी जास्त वाटते. त्या चेहर्‍याची स्टाइल (स्केचिंगची स्टाइल) ही बाकी पेंटींगशी किंवा त्याच्या तोवर दाखवलेल्या स्टाइलशी मेळच खात नाही.
पण आमिरचा अभिनय बाजूला ठेवला तर स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शन पातळीवर त्याचं कॅरेक्टर स्केच कुठेही लूज एन्डस नसलेलं वाटलं. का कुणास ठाउक पण बास्किया चित्रपटातील स्क्रीनप्ले व दृश्य हाताळणीचा प्रभाव आमिरच्या, विशेषत: त्याच्या चित्रकला जगताच्या अनुषंगाने येणार्‍या सीन्समधे खूपच ठळकपणे जाणवला.

यास्मिनचा प्रेझेंस मस्तच आहे. पण ती जेव्हा दिसत नाही आणि बोलते ते आणि दिसते तेव्हा बोलते ते यात सेन्सिटीव्हिटी, व्यक्तिरेखा या पातळीवर खूप म्हणजे खूपच फरक जाणवतो. दोन वेगळ्या व्यक्तिरेखा असाव्यात इतपत. पण ही अ‍ॅक्टर फारच मस्त आहे. काय चेहरा आहे तिचा मस्त.

शायचं कॅरेक्टर आणि देहबोली कुठेही खटकत नाही. मस्त केलंय तिनं. पण शर्मिला म्हणाली तसंच तिचं फोटोग्राफर असणं हे मुंबई दाखवण्यासाठीचं डिव्हाइस खूप क्लीशे आहे. बाकी दोघांकडे एकच धोबी कपडे धुवत असणं हा थोडा जास्त घडवलेला योगायोग वाटला.

आता मला फारच आवडलेला म्हणजे प्रतिक... मी ठार झालेली आहे. स्मित
शर्मिलाने वरती मेन्शन केलेले १-२ क्षण सोडता खटकलेली एकच गोष्ट म्हणजे त्या कॅरेक्टरचं जिगलो असणं. फिल्मला त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याने काही भरही पडत नाहीये आणि मुन्नाचा वावर, देहबोली यामधे जिगलो असण्याने आलेलं एक निर्ढावलेपण किंवा तत्सम काही दिसतही नाहीये.
प्रतिक टू मच आवडेश...:)

सिनेमॅटोग्राफी सुरेख.
पण मुंबईचं कॅरेक्टर खूप नेहमीसारखं पाउस, समुद्र, गणपती विसर्जन, गर्दीच्या गल्ल्या, लोकल ट्रेन, भाई एवढंच का हा प्रश्न नक्की पडला. यास्मिनच्या नजरेतून ते बघतोय तिला हेच पटकन दिसणारे इत्यादी मुद्दे मान्य केले तरी हा दिग्दर्शनातला रॉनेस असं म्हणावसं वाटतं.
पण पावसामधे मुन्नाच्या घरात पाणी गळणं, वरती त्याने प्लास्टीक घालणं हे खूप खरं आणि प्रामाणिक होऊन जातं त्यामुळे तो रॉनेस माफ बाईंना. स्मित
>>>मुंबई टिपायला कॅरेक्टरचं फोटोग्राफर असणं हेही आता खूप क्लिशे झालय आणि मधे मधे दाखवलेल्या फोटोस्लाईड्सही एरवी फोटोएक्स्झिबिशन्समधून वगैरे अनेकांनी अनेकदा टिपलेल्या त्यामुळे क्लिशे वाटणार्‍याच होत्या पण हिंदी सिनेमाच्या पडद्यावर बहुधा पहिल्यांदाच आल्या त्यामुळे हेही ठिक आहे(डबेवाले वगैरे). <<<
याबद्दल शर्मिलाला अनुमोदन.

पण नक्की नक्की पहावा असा चित्रपट. २ लोकांबद्दल माझ्या अपेक्षा वाढल्यात मात्र. किरण राव आणि प्रतिक.

- नी

Saturday, January 8, 2011

लफ्फा

laffa_0.jpg


हे चित्र तयार करण्याचं मूळ कारण माझ्याकडे संदर्भ-बँक तयार करणं हे आहे. मला कल्पना आहे की डिजिटल पेंटींग म्हणून ह्या चित्राला काही महत्व नाही.
फोटोशॉपमधे आयबॉलच्या पेन टॅब्लेटच्या ( http://iball.co.in/Product.aspx?c=16 ) सहाय्याने हे चित्र तयार केलेय.
लफ्फ्याच्या फुलामधली एक पाकळी आधी पेनने फोटोशॉपमधे काढली. मग ती ३ वेळा रोटेट करून एक चार पाकळ्यांचे फुल बनवले आणि मग तेच फुल रोटेट आर्बिटरी (०.०५ - ०.१ या दरम्यान) क्लॉकवाइज आणि अँटीक्लॉकवाइज दोन्ही करून सगळी फुलं तयार केली. ती योग्य पद्धतीने अ‍ॅरेंज करून पहिले त्याची माळ बनवली.
एवढी सिमिट्री मिळाल्यावर मग नवीन लेयर मधे मोती फ्रीहँड काढले. शेड बिड दिली. तीच गोष्ट प्रत्येक फुलाला असलेल्या ३ मण्यांच्या लटकनची. मधल्या फुलावर लाल माणिक रंगवले.
टेक्स्ट टूलमधून श्री लिपीच्या सहाय्याने लप्फा हे शीर्षक दीले.
नवीन लेयर वर पेन माउसने माझी सही ठोकली.
फ्लॅटन इमेज करून लेयर्स दाबले.
-नीरजा पटवर्धन

Search This Blog