Wednesday, July 18, 2018

पाऊस, मी आणि ....!

तर यंदा मी ही पावसावर लिहिलंय. आजच्या लोकमतच्या मंथनमधे ते थोडे काटछाट करून छापूनही आलेय. त्याच ललिताचे अनकट व्हर्जन इथे देते आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
कॅलेण्डरमध्ये पावसाचा महिना लागला आणि तुझी वाट बघणे सुरू झाले.
'बदललंय हं चित्र आजूबाजूचं!, थोडा झगझगीतपणा कमी झालाय!, एक ग्रे वॉश चढायला लागलाय सगळ्यावर!' तुझ्या येण्याची वर्दी येऊन पोचली.
दरवर्षीप्रमाणे आम्ही तुझ्या स्वागताला लागलो. शब्दांची भरपूर तयारी केली. तू आल्यावर चिंब व्हायचंय, मेघ दाटलेले असणार आहेत, नवचैतन्य येणार आहे, धरती हिरवा शालू नेसणारे, मातीचा धुंद वास आम्हाला आर्त करणार आहे. अशी सगळी बेगमी करून झाली.
पडायला लागशील तेव्हा पहिल्या पावसात खुश झालेली माणसे, हिरवे भिजलेले डोंगर, वाहते पाणी, खिडकीच्या गजातून दिसणारा ओला रस्ता, ओले झाड, दिव्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या पावसाच्या रेषा, अति पडलास की सगळं ग्रे आणि एकमेकात मिसळल्यासारखं दिसणारं असं शहरातलं काहीतरी, कमी पडलास तर जमिनीच्या भेगा, असे सगळे फोटो आम्ही आखून ठेवले.
पावसाळी भटकंतीसाठी कसे कसे आणि कुठे कुठे जाल किंवा कसे कसे कुठे कुठे भिजून आलो याबद्दलचे लिखाण कढईत टाकले. मासिके, पाक्षिके, दैनिके, ब्लॉग्ज आणि फेसबुक सगळीकडे लवकरच वाचायला मिळेल हे बघितले. त्याबरोबरच कांदा भजी व इतर पावसाळी हादडणे कार्यक्रमासाठी सुयोग्य पाककृती वगैरेही तयार ठेवल्या.
आणि तू आलास.
आलास तो असा की सगळ्यांची दाणादाण उडवलीस. रोजचे जगणे मुश्कील करून ठेवलेस. कपडे वाळत नाहीत. रिक्षात, ट्रेनमधे पाऊस सर्व बाजूंनी आत येतोय. कामाला पोचायला उशीर, घरी यायला उशीर, कुठे कोरड्या अंगाने पोचायची शक्यताच नाही. सक्तीची घरकैद. स्कूटर स्किड झाली, रेनकोटला गळ्याशी भेग पडलीये त्यातून पाणी आता झिरपतंय. भिंतींना ओल आहे. पावसाळी भटकंतीला जाणे हा जिवाशी खेळच झालाय. कुठे कुठे पूर आलाय. अनेकांचं जगणं त्यात वाहून गेलंय.
एका बाजूला हे तर दुसरीकडे शोष पडलाय. तुझी वाट पाहताना माणसांची आयुष्ये काळवंडून गेलीयेत. तुझी नक्षत्रं कोरडी चाललीयेत.
असा कसा तू? नको तिथे चवताळलायस आणि नको तिथे पाठ फिरवलीयेस. आमची हतबलता झाकायला आम्ही स्पिरीट हा शब्द पांघरून घेतोय. तो ही आता तोकडा पडायला लागलाय. का करतोस असं? हे असंच करणारेस का यावर्षी सगळावेळ? ज्याच्या हिरोसारख्या एंट्रीसाठी एवढी तयारी केली तो तू असा व्हिलनसारखा का वागतोयस? सिनेमातल्या व्हिलनच्या नावाने बोटं मोडतात लोक. तेच होतंय आता. तुझ्या नावाने उपहासाच्या फोडण्या पडायला लागल्या आहेत.
आणि तू सोशल मीडियावरच्या लिखाणखोर दुनियेसारखा उगाच हळवा झालायस. तुझ्या या वागण्यावरही रम्य प्रतिक्रिया, लाईक्स आणि प्रेम देणं बंधनकारक झालंय. नाहीतर हल्ली तुलाही न्यूनगंड येतो आणि मग तुझा मूड जातो. आणि मग असा विचित्र वागतोस.
तुझा मूड गेलेला नाही आवडत मला. तुझ्याबरोबर खूप जुनी मैत्री आहे. तुझी गरज आहेच जगाला, मला. तुझ्या गोष्टी आठवणं, चघळत बसणं आवडतं मला. तुला माहिती नसलेली एक गोष्ट सांगते. बघ तुलाही छान वाटेल.
‘किंचितशी खिन्न छटा चेहऱ्यावर वागवत ती उभी. अचानक तिच्या गालावर एक थेंब पडतो. पहिल्या पावसाचा त्वचेला पहिला स्पर्श. काय घडतंय हे समजायला तिला काही क्षण लागतात. तोवर दुसरा, मग तिसरा थेंब पडतो. तिचा चेहरा आनंदाने चिंब. हातावर पाण्याचे थेंब झेलत ती गिरकी घेते. तिच्या आजूबाजूला अश्याच तिच्यासारख्या मैत्रिणी. पावसाशी खेळणाऱ्या. प्रत्येकीचा पाऊस वेगळा. हळूहळू जमिनीवर पाणी थोडेसे. ती त्यात जोरात उडी मारते. तिच्या मैत्रिणीच्या अंगावर ते पाणी उडते. मग मैत्रीण पण तेच करते. असा सगळा खेळ. थोड्याच वेळात त्या सगळ्या जणी नखशिखांत भिजलेल्या, मातीचिखलाने माखलेल्या. वरून पडणारे पाणी आणि हातापायाच्या तळव्याशी लोण्यासारख्या चिखलाचा स्पर्श ती अनुभवत राहते. हळूहळू अंतर्मुख होते. तिच्या मैत्रिणीही. एका हातावर थोडीशी माती घेऊन एकेक जण उभी राहते. सगळं चित्र बदललेलं. तळव्यावर ठेवलेल्या मातीकडे बघून मग समोर बघत कविता म्हणायला सुरू करते. मंचावरचा प्रकाश बदलतो. ती आणि सगळ्या मैत्रिणी समोरच्या प्रेक्षकाला पावसातून बाहेर काढून वेगळीकडे नेतात आणि अंधारात दिसेनाश्या होतात.’
खोट्या पावसाची खोटी आठवण. खोट्या पावसात भिजण्याची आठवण. प्रत्येक प्रयोगात पाऊस खोटा होता पण प्रत्येक प्रयोगात आम्ही खऱ्याच भिजलो होतो हे पक्कं आठवतंय. तू खरा येतोस तेव्हा असंच भिजायचं असतं हे तेव्हाच माझं ठरलं होतं.
वाळवंटातले डोंगर बघत राहता येतील अश्या जागी काम करायचे. तिथे तू आलास आणि मी अशीच भिजले. खरोखरीचा आलास. जून-जुलैचे म्हणजे खास तुझेच महिने. तिथलं ऋतूचं गणित वेगळं पण माझ्यासाठी हे तुझेच महिने. समोर लांबचलांब बॅकडेक. त्याच्या पलिकडे वाळवंटातले डोंगर. त्यातून कोलोरॅडोला जाणारा रस्ता. डोंगराच्या वर भगभगीत आकाश. तू यायला झालास की समोरच्या चित्रात लगबग सुरू व्हायची. पाच मिनिटात भगभगणारे आकाश खरोखरीच गडद जांभळं व्हायचं. वाळूच्या रंगाचे डोंगर आणि त्यावरची खुरटी झुडपे फोटोशॉपमध्ये सॅच्युरेशन कमी करावे तशी रंगहीन आणि काळपट होत जायची. बॅकडेकच्या फरशीवर वाळवंटाची पिवळी झाक पडलेली असायची ती गायब व्हायची. तिथे बर्फगार राखाडी रंग पसरायचा. जिथे काम करायचे त्या इमारतीचा अॅडोबी गुलाबी रंग नक्की दिसत राहायचा. तुझ्या रेषा मधेच प्रकाश पकडून चमकायच्या. माझ्या हातात कधी कुणाचे शूज रंगवायला असायचे तर कधी चामड्याचे पट्टे तयार करायचे असायचे कधी पुरुषांच्या स्कॉटिश पर्सेस नाहीतर कधी चित्रविचित्र दागिने. माझे हात काम करत राहायचे. डोळे तुला पिऊन घ्यायला उतावीळ. आल्या पावसात भिजायची असोशी माझ्याशिवाय कोणालाच नाही. हे खास भारतीयत्व वगैरे म्हणावं का? पंधरा मिनिटांच्या ब्रेकमध्ये तुझ्या अगदी काठावर उभे राहायचे. हळूच स्वतःचीच नजर चुकवून दोन तीन पावलं पुढे जायचे. तोवर कुणीतरी टोकायचेच. सर्दी होईल वगैरे म्हणून नाही. पण तुला असे भेटणे ही मज्जा म्हणून करायची गोष्टच नाही म्हणून. मी काठाशी परत. मी त्या फिरंगी मैत्रिणींना मॉन्सून ट्रेक्स बद्दल सांगायला जाई आणि एरवीचं हायकिंग ठीके पण तू कोसळत असतानाच जायचं काय नडलंय हे त्यांना कळत नसे. तिथे तू येतच असतोस अधूनमधून. आमच्याकडे वर्षातून चार महिने आणि तेही उन्हाळ्याने चांगले भाजून काढल्यावर. म्हणून बहुतेक तुझं कौतुक इतकं.
आता माझ्या शहरात तू वेड्यासारखा येतोस. छळतोस. पण तूच तर मला या शहराला आपलंसं करायला भाग पाडलंस. माझं शहर म्हणायला भाग पाडलंस. नरीमन पॉइंटला मी छत्री उघडली आणि “आपुन आया तो भिगनेका! क्या!” अशी दादागिरी करत ती तू उलटीपालटी करून टाकलीस. हे शहर मी सुंदरही करतो अनेकदा असं खडसावून सांगितलंस. मग एकदा एका आलिशान ठिकाणी कुणाला तरी भेटायला थांबलेले असताना खिडकीतून तू दिसत होतास. इतका जोरदार तुझा आवाज, तुझा वेग. मी खिडकीशी आले, खिडकीतून बाहेर पडले की खिडकीच विरघळली माहिती नाही. माझा आकार मात्र विरघळला होता. एकमेकांच्या आरपार जात होतो आपण. मी कोसळत होते तुझ्यासारखी अथक. नाचत होते. पण मी नव्हतेच. मी तू होते की तू मी होतास? कुणीतरी चहा विचारेपर्यंत मी अशीच आकारहीन होते. हातात चहाचा कप घेऊन मी खिडकीबाहेर बघितलं आणि तू डोळे मिचकावून परत कोसळायला लागलास. ही तुझीमाझी गंमत.
इकडचे तिकडचे शब्दांचे महापूर, तुझं असून अडचण नसून खोळंबा असणं हे सगळं तुझ्या एका स्पर्शाने गायब होतं. मी आपली गंमत परत जगते. थोडी जगण्याची तलखी कमी होते. जगण्याने श्वास कोंडल्यासारखा झालेला असतो तो जरा मोकळा होतो. थोडं बरं वाटतं. थोडी कविता सुचते.
- नी
-------------------
दैनिक लोकमत, मंथन पुरवणी, १५ जुलै २०१८ मधल्या लेखाची ही लिंक.
तू आणि मी... पावसासोबतचा दिलखुलास संवाद.

Search This Blog