त्या दिवशी तुला शांत निजलेलं पाह्यलं
तुझा वेदनारहित चेहरा
इतकं शांत कधीच नसायचीस तू
तुझ्याकडे बघत बसले होते मीवाटलं म्हणशील
"नुसती बसू नको,
उठ, काही काम कर!"
खूप वाट पाह्यली तू म्हणशील म्हणून..
आत कुणीतरी चहा केला,
कप वेगळे काढले
"ह्यातले कप नकोत,
गेल्यावर्षीचे नवीन आहेत त्यातले वापरा."
असं काहीच तू म्हणाली नाहीस
कोणी म्हणालं १५ वा अध्याय म्हणूया
म्हणला!
तुला रामरक्षा आवडायची
ती पण म्हणालो आम्ही!
अवघड उच्चार मुद्दाम चुकवले.
"असं नाही गं सोने!
त्याचा संधी असा असा होतो..
त्यामुळे उच्चार असा असायला हवा"
असं नाही म्हणालीस तू!
तू तशीच शांत निजून होतीस.
तेव्हा कळलं..
नव्हे अंगावरच आलं..
बाळपणी कधीतरी धरलेलं तुझं बोट
आज सुटलंय
कायमचं
--- नीरजा पटवर्धन