Saturday, November 5, 2016

नी च्या कहाणीची दोन वर्षे!

फेसबुकवर ’आजच्या दिवशी त्या वर्षी’ असा खेळ चालतो रोज. त्या खेळात आजच्या भागात दाखवलं की माझ्या ताराबाई दगडूराम उद्योगाचे नामकरण दोन वर्षांपूर्वी पाच नोव्हेंबरलाच झाले.
मी नुसत्याच तारा वळत होते, दगड गुंडाळत होते, त्यातून चित्र शोधत होते, काही थोडे सुंदर असे हातून घडलेही होते. त्याच वेळेला एका मैत्रिणीने ’नेकलेस करून देशील का?’ विचारले. तोही विकत. केला, विकला, दिला. पण देताना काहीतरी नाव हवे मग मी स्वत:च्याच पुरेपूर प्रेमात असल्याने आणि नी म्हणूनच लिखाण करत असल्याने तेच नाव माझ्या तारादगडीय अभिव्यक्तीलाही चिकटवून टाकले. 
विकली गेलेली ही पहिली वस्तू














यानंतर ६ महिन्यांनी एप्रिल २०१५ मधे मी ’नी’ चे पहिले कलेक्शन लॉंच केले. फेसबुक पेजवर. वरती तुम्हाला नी क्रिएशनची लिंक मिळेलच. तेच हे पेज.
पहिल्या कलेक्शनमधे फक्त कानातली होती. थोडी अगदी साधी, ऑफिसयोग्य अशी तर काही जरा अजून थोडी मोठी आणि मजेमजेच्या ठिकाणी जायला वापरता येतील अशी. ते कलेक्शन आवडले लोकांना. पटापटा विकले गेले.
हे पहिले कानातल्यांचे कलेक्शन 

वर्षभरात इतर सगळे उद्योग सांभाळून थोडी पेंडंटस केली. स्वत:साठी काही बनवले. काही प्रयोग केले. नंतर वर्षभराने एप्रिल २०१६ मधे दुसरे कलेक्शन आणले. त्यात कानातली, पेंडंटस व गळ्यातली अश्या तिन्ही गोष्टी होत्या.

हे दुसरे कलेक्शन

हे झाल्यावर मला आठवले की ’आपण ब्लॉगरही आहोत तर आपल्याला येतंय त्या सगळ्याच कलाकुसरींबद्दल, आपल्या डिझायनिंगबद्दल का नाही लिहू?’ पण हे सगळे लिखाण वेगळ्या ठिकाणी असायला हवे. या ठराविक विषयाला वाह्यलेला वेगळा ब्लॉग हवा. तसेच या कलाकुसरीत रस असणार्‍य़ा लोकांपर्यंत पोचायचे तर मराठीचा आग्रह सोडायला हवा. इंग्लिशमधे लिहायला हवे. मराठी येणारे वाचतीलच पण न येणारेही वाचू शकतील. क्राफ्ट, डिझायनिंग, त्याची तंत्रे याबद्दल जरा अजून व्यापक प्रमाणात देवाणघेवाण होईल आणि त्या निमित्ताने इंग्लिशही सुधारेल. असा सगळा विचार करून एक क्राफ्ट ब्लॉग काढायचे ठरले.

वर्डप्रेस की ब्लॉगर? लेआऊट कसा? वगैरे वगैरे सगळ्यातून जात माझा नवीन ब्लॉग गेल्या महिन्यात चालू केला. हा माझा नवीन ब्लॉग.
इथे माझे लिखाण फॉलो करत असाल तर तिथेही करा.
तिथे लिहिणार आहे याचा अर्थ इथे भेट नाहीच असे नाही पण मी इथे धुमकेतू सारख्या नियमित अनियमितपणे लिहिते हे तुम्हाला माहितीच आहे. तर भेटूच परत माझ्या पुढच्या धुमकेतू चक्करीच्या वेळेला.
- नी

Thursday, November 3, 2016

दिवाळी दिवाळी दिवाळी!

दिवाळीच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी दिवाळी अंक हा एकमेव प्रकार मला हल्ली आपलासा वाटतो.  अनेक नवेजुने लेखक आपापले सुंदर लिखाण खास दिवाळी अंकांसाठी राखून ठेवतात. त्यामुळे वाचणार्‍याला मेजवानीच असते. 
हल्ली जरा आमचे येथे लिहिण्याचे परत मनावर घेतलेले असल्याने त्या मेजवानीतला इलुसा वाटा माझ्याकडूनही आहे. 
यावर्षी दोन दिवाळी अंकांमधे माझे लिखाण आहे. दोन्ही अंक आंतरजालावर आहेत त्यामुळे सर्वांना सहज वाचता येतील असे  आहेत. 

- लेडिजबायकांसाठी आणलेली भिकार पोर्ट वाइन हातात घेऊन संहिता अमाप कंटाळून बसली होती. पोर्ट वाइनचा ग्लास तिच्या हातात खुपसला गेला तेव्हापासून तिला कंटाळा आला होता. आपण हिच्यासाठी वेगळी बायकांची दारू आणलीये त्यामुळे आपण होस्ट म्हणून एकदम ढिंग्च्यॅक्क आहोत अशा खुशीत राजोपाध्येने पाऊच फोडून तिचा ग्लास भरून दिला होता. - 


२. ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट - शीर्षकात गोष्ट असे असले तरी हा एक लेख आहे. डिजिटल दिवाळी या दिवाळी अंकात. 
- पहिल्यांदा हॉटेलमधे जाऊन पास्ता खाल्ल्यावर त्यातल्या चीजने घशात कसेतरी झाले होते. नंतर बरेच दिवस कुठलीही वस्तू ऑर्डर करताना ठकू चीज नको म्हणूनच सांगे. ९८ साली सदाशिव पेठेतून उठून अमेरिकेत गेल्यामुळे ठकूला अभारतीय पदार्थांची फारशी ओळख नव्हती. जिभेला चीज हे प्रकरण फारसे माहिती नव्हते. डोमिनोजचा पि्झ्झा पुण्यात तेव्हा मिळायला लागला होता, पण ते सगळं पुलाच्या पलीकडे. पुलाच्या अलीकडच्या सर्वसाधारण जिभांना त्या चवी तेव्हा फार माहिती नव्हत्या. -  

वाचा, कमेंटा, कळवा, नाचा..  मजा करा!

- नी

Wednesday, September 14, 2016

लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea)

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फाचे तुकडे
कोकाकोला
लिंबू
पुदिन्याची पाने
उंच ग्लास
दारवा
५ व्हाइट दारवा
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)
क्रमवार पाककृती: 
उंच ग्लासाच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.
ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.
मग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.
पाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.
नवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.
दारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.
गार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.
ग्लासला लिंबाची चकती खोचायची.
आणि मग चांगभलं!! 
वाढणी/प्रमाण: 
असा एक ग्लास करायचा. :)
अधिक टिपा: 
आपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.
यानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.
माहितीचा स्रोत: 
माझ्या अ‍ॅSथेन्स, जॉSज्या च्या डाऊनटाऊनात द ग्लोब म्हणून बार होता(अजूनही असेल कदाचित!). आजवर चाखलेल्या लंब बेटावरच्या बर्फाळ चहांपैकी सर्वात उत्तम त्या ठिकाणी असायचा. तिथल्या रेसिपीला इंटरनेटवरच्या रेसिपीने गुणून ही रेसिपी झालेली आहे.

- नी

कैरी मार्गारिटा व कैरी आंबा मार्गारिटा

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ:  
तयारी + ५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फ
कैरीचा रस
पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस (ऑप्शनल)
मीठ
मिक्सर
दारवा
व्हाइट/ सिल्व्हर टकिला
कुठलीही ऑरेंज लिक्यॉर - ट्रिपल सेक(Triple Seq) किंवा कॉनत्रॉ/ कॉनत्रु/ कॉन्ट्रो(Cointreau)
क्रमवार पाककृती: 
लागणारा वेळ हा कैरीचा रस काढायला लागणारा वेळ न लक्षात घेता दिलेला आहे. कैरीचा रस ही पूर्वतयारी आहे. तो विकतचा असल्यास (असतो का हे माहित नाही) त्याचे प्रमाण चव घेऊन मग ठरवावे. शक्यतो स्वतःच करावा.

कैरीचा रस काढायची पद्धत -
कैरीची साले काढून तुकडे करायचे. ते तुकडे मिक्सरमधून अगदी गंधासारखे बारीक वाटण होईल एवढे फिरवायचे. यासाठी थोडे पाणी घालावेच लागेल. पण गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नये.
हे वाटण कापडातून गाळून घ्यावे. पटकन सगळे गाळले जाणार नाही तर सरळ कापडात पुरचुंडी करून चक्क्यासारखे टांगून खाली पातेले ठेवायचे. तास दीड तास ठेवून द्या आणि कंटाळा आला की शेवटी ती पुरचुंडी पिळून घ्या.
हा रस बाटलीत/ डब्यात भरून फ्रिजात (त्याच दिवशी बनवायची असेल तर) किंवा डिप फ्रिजात (दोन तीन दिवसांनी करायची असेल तर) ठेवून द्या.
आंबा फ्लेवरही आणायचा असेल तर आपल्या आवडीप्रमाणे हापूस/ पायरीच्या व्यवस्थित पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस करून ठेवावे. हे मात्र आयत्यावेळेलाच कारण पिकलेल्या आंब्याची चव कापून ठेवल्यावर उतरते हे आपल्याला माहित आहेच.
शक्य झाल्यास प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या तासभर आधी मार्गारिटाच्या ग्लासांच्या कडा कैरी रसाने किंचित ओल्या करून त्यावर मीठ लावून ते ग्लासेस फ्रीजमधे ठेवून द्यावे.
आता प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या वेळेस करायच्या गोष्टी
एरवी मार्गारिटामधे लिंबाचा रस असतो. इथे आपण कैरीचा रस हा लिंबाच्या रसाऐवजी वापरत आहोत. लिंबापेक्षा कैरीचा रस आंबट जास्त असतो त्यामुळे आपण काढलेल्या रसाची चव घेऊन मग पाणी घालून थोडा डायल्युट करावा. मात्र डायल्युट करून स्टोर करू नये. ते आयत्या वेळेलाच करावे.
टकिला (२ भाग) + ऑरेंज लिक्योर(१ भाग) + कैरीचा डायल्युटेड रस(दीड भाग) + बर्फ (१ भाग) असे मिक्सरात घालावे एकदा फिरवावे. बर्फाचा चुरा होणे गरजेचे. हेच हॅण्ड ब्लेण्डरनेही करता येऊ शकते.
मग फ्रिजातले फ्रॉस्ट केलेले ग्लासेस काढून त्यात हे मिश्रण ओतावे. एका ग्लासामधे एकूण साधारण ७५ मिली एवढे मिश्रण ओतावे.
बर्फाऐवजी बर्फचुरा तयार असेल तर तो १ भाग बर्फचुरा आधीच प्रत्येक ग्लासात भरावा. मग मिक्सरात/ ब्लेंडरमधे वेगळा बर्फ घालू नये.
असे गारेगार झालेले ग्लास लग्गेच लोकांना प्यायला द्यावे.
आंबा फ्लेवर मार्गारिटा -
वरच्या सगळ्या मिश्रणात अर्धा भाग एवढे आंब्याचे तुकडे/ रस घालावे. मिक्सरमधून फिरवताना तुकडे/ रस अगदी एकजीव व्हायची गरज नाही. पण पिताना मोठे मोठे तुकडे किंवा रसाच्या गुठळ्याही यायला नकोत मधे मधे एवढेच फिरवावे.
चीअर्स!!!
वाढणी/प्रमाण: 
अंदाजपंचे दाहोदरसे!
अधिक टिपा: 
ओरिजिनल मार्गारिटामधे टकिला : ऑरेंज लिक्योर : लिंबाचा रस : फ्लेवर याचे प्रमाण थोडे वेगळे असते. हे प्रमाण आपण आपल्या टॉलरन्स आणि चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. कैरी-आंबा मार्गारिटा साठी मी वर दिलेले प्रमाण माझ्यासाठी आणि माझ्या मित्रमंडळींच्यात आवडलेले आहे. तुम्ही प्रयोग करून टकिला वाढवू शकता 
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, विविध ठिकाणी घेतलेली मार्गारिटाची चव, प्रयोग

- नी

Monday, September 12, 2016

सबटायटल्सच्या नावानं!!

एवढ्यातच सबटायटल्स किती विचित्र असतात यासंदर्भातले उदगार वाचायला मिळाले. ते वाचून सबटायटल्स या प्रकाराबद्दल ’जे जे आपल्यास ठावे, ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन!’ या भावनेने सबटायटल्स बद्दल काही प्रवचन करणार आहे.
तुम्हाला चित्रपट ज्या भाषेतला आहे ती भाषा येत असेल तर ती सबटायटल्स तुम्ही वाचण्यासाठी नाहीत. सिनेमा बघा. सबटायटल्स वाचण्यात आपला वेळ घालवू नका. पण ते करायचेच असेल तर निदान काही मुद्दे लक्षात घ्या.
पुस्तकाचे भाषांतर व सबटायटल्स यात भाषांतर हा समान धागा असला तरी जमीन अस्मानाचा फरक असतो. पुस्तकाचा आस्वाद घेताना पुस्तकातील मजकूर हे एकमेव साधन असते. जे मूळ भाषेत लिहिले असेल ते दुसर्‍या भाषेतही नेमकेपणाने पोचवण्यासाठीही भाषांतरीत मजकूर हेच साधन असते. त्यामुळे तो मजकूर जास्तीत जास्त नेमकेपणाने, मूळ भाषेचा लहेजा सांभाळत पण दुसर्‍या भाषेतही आपसूक वाटेल अश्या प्रकारे आणावा लागतो. कधी कधी काही संकल्पना ज्या मूळ भाषेशी निगडीत संस्कृतीत अगदीच रोजच्या असतात त्या दुसर्‍या भाषेत जाताना त्या संस्कृतीला अनोळखी असतील तर थोड्या विस्ताराने समजावून द्याव्याही लागतात. तसेच मूळ भाषेत एखादे वाक्य ४ शब्दांचे असेल तर त्याचे भाषांतर करताना ७ शब्द करण्याची मुभा नक्कीच असते.
सबटायटल्स ही चित्रपटातली मौखिक भाषा न समजणार्‍याला टेकू म्हणूनच केवळ आलेली असतात/ असायला हवीत. चित्रभाषा ही बरीचशी जागतिक असते. आणि चित्रपटात सिनेमामधे समोर जे दिसत असते, ऐकू येत असते - म्हणजे भाषा कळली नाही तरी भाषेचा ताल, बोलणार्‍याच्या स्वरांचे चढ उतार वगैरे - यातून बरेच काही पोचत असते. पोचायला हवे. याउपर जे तपशील असतात ते सबटायटल्समधून पोचतात.
चित्रपट बघतानाच ही सबटायटल्स वाचली जातात त्यामुळे बघणार्‍याला ते वाचण्यासाठी वेगळे श्रम घ्यावे लागणार नाहीत, सिनेमा बघण्याकडे त्याचे दुर्लक्ष होणार नाही अश्या प्रकारे ही सबटायटल्स ठेवावी लागतात.
फ्रेममधली मूळ अ‍ॅक्शन झाकली जाऊ नये म्हणून फ्रेमच्या तळाला सबटायटल्स असतात. पण अगदी पाताळात गेल्यासारखी तळाच्या कडेला चिकटून ठेवून चालत नाही. त्यामुळे एका सबटायटलमधे दोनच ओळी योग्य ठरतात. त्याहून जास्त ओळी सिनेमा बघायला अडथळा आणू लागतात.
तसेच फ्रेमच्या डाव्या कडेपासून उजव्या कडेपर्यंत पसरलेली सबटायटल्स चित्रपटाच्या पडद्यासाठी त्रासदायक होतील. प्रत्येक संवादाच्या वेळेला बघणारा माणूस सबटायटल्स वाचण्यासाठी डावीकडून उजवीकडे नजर फिरवू शकत नाही. चक्कर येईल ना राव असे करून! :) त्यामुळे एका दृष्टीक्षेपात ते वाक्य वाचता यावे लागते. म्हणजेच डावी व उजवीकडून साधारण मध्यात असे ते वाक्य ठेवावे लागते. म्हणून चित्रपटांमधे एका ओळीत साधारण ३७ कॅरेक्टर्स विथ स्पेस यापलिकडे जाता येत नाही असा एक नियम आहे.
म्हणजे एक सबटायटल हे एका ओळीत जास्तीत जास्त ३७ कॅरेक्टर्स (विथ स्पेस) अश्या जास्तीत जास्त दोन ओळी एवढेच असू शकते.
आता यानंतर महत्वाचा म्हणजे वाक्य बोलण्यासाठी लागलेला वेळ. एक वाक्य बोलायला उदाहरणार्थ तीन सेकंद लागली असतील तर त्या वाक्याचे सबटायटल हे ही तेवढाच वेळ म्हणजे तीन सेकंदच दाखवता येते. ते तेवढ्यातच वाचून पुरे व्हावे लागते कारण त्या तीन सेकंदांच्या नंतर पुढचा संवाद असतो आणि पुढचे सबटायटल असते.
या सगळ्या बंधनांमुळे सबटायटल्समधे भाषा लालित्य अर्थातच कमी असते. म्हणजे आता बघा की ३७ कॅरेक्टर्समधे बसवताना शब्दाचे स्पेलिंग जितके लहान तितके बरे हे करावे लागणार. मग निवडलेला शब्द भाषालालित्य पातळीवर जरा कमी मार्कांचा असू शकतो.
सगळ्या संकल्पना जशाच्या तश्या भाषांतरीत होत नाहीत. एका भाषेत २ शब्दात जे सांगून होते ते इंग्रजीत लिहायला १० शब्दांचे वाक्य खर्ची घालावे लागते. ते तर शक्य नसते. मग कधी शब्दश: भाषांतर किंवा कधी जेमतेम सूचक भाषांतर केले जाते कारण बाकीचा मुद्दा संदर्भाने कळायला पडद्यावरची अ‍ॅक्शन असतेच.
जेव्हा चित्रपटाची मौखिक भाषा ही ग्रामीण, ठराविक लहेजाची वगैरे असते किंवा म्हणी, वाकप्रचारांचा अंतर्भाव असतो किंवा काव्यात्म शब्द असतात तेव्हा या सगळ्या बंधनात राहून केलेले भाषांतर थोडे कृत्रिमच वाटते. त्याला पर्याय नाही.
सबटायटल्स जेव्हा भाषांतरीत करण्यासाठी भाषांतरकाराकडे येतात तेव्हा ते शॉट बाय शॉट संवाद तोडलेले असतात किंवा सबटायटलचे पंचिंग जसे केले जाणार त्याप्रमाणे संवाद तोडलेले असतात. आणि ते तसेच भाषांतरीत करायचे असते.
एखादे बोललेले वाक्य लांबलचक असते. त्याचे दोन भाग पडू शकत असतात. अश्या वेळेला अनेकदा मराठीत जसे बोलले जाते त्याच्या बरोबर उलट म्हणजे दुसरा भाग आधी आणि पहिला भाग नंतर अशी रचना इंग्रजीत जास्त बरोबर असते. पण हे करता येत नाही. कारण जे बोलले आहे तेच त्या वेळेला सबटायटलमधे येणे सर्वसाधारणत: अपेक्षित असते.
अश्या अनेक कारणांमुळे सबटायटल्स हा उत्तम इंग्रजी साहित्याचा नमुना होऊ शकत नाही. अर्थात या सगळ्या मुद्द्यांना विचारात घेऊनही सबटायटल्स भाषांतरीत करणार्‍या व्यक्तीच्या कौशल्याचेही योगदान महत्वाचे असतेच.
सबटायटल्स म्हणजे काहीतरी विचित्र भाषांतर अश्या प्रकारच्या टिप्पण्या करण्याआधी हे सगळे ध्यानात घेतले जावे एवढीच एक अपेक्षा.
बाकी हल्ली सगळेच सूज्ञ, तज्ञ वगैरे असतातच..

- नी

Wednesday, February 17, 2016

अद्भुताचा प्रवास!

हा प्रवास ऑक्टोबर २००७ मधला आणि लिखाणही तेव्हाचंच. २००७ च्या मायबोली दिवाळी अंकात हा लेख होता. 
-------------------------------------------------------------------------------------------------------
"किती वळणं, आणि रस्त्याला एक पाटी नाही. काय तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले रस्ते रे!" मी वैतागून कळवळून नवर्‍याला म्हटलं. आणि तो नेहमीप्रमाणे हसायला लागला मिशीतल्या मिशीत.
गेले दोन दिवस गुहागर परिसरात फिरत होतो आणि आज निघालो होतो लाँचच्या सफरीसाठी. आधी कामानिमित्ताने ही सफर संदीपने केलेली असल्याने त्याच्याकडून वर्णनं ऐकली होती. त्यामुळे कोकणात ट्रीपला जायचं ठरल्यावर ही सफर करायचीच असं वदवून घेतलं होतं त्याच्याकडून. तिथे पोचायच्या आधी मात्र माझा धीर सुटत चालला होता. रस्त्याला पाट्या नसल्याने आम्ही दोन वेळा चुकलो होतो रस्ता. लाँचवाल्याचा फोन येऊन गेला होता. तो कधीचा धक्क्यावर येऊन थांबला होता.
ही सफर होती जयगड खाडीतून. फुणगुस नावाच्या गावापासून जयगड बंदरापर्यंत. मोटर लाँचचा प्रवास होता. आणि वाटेत सावंतांचं भातगाव लागणार होतं. संगमेश्वरहून रत्नागिरीला जाताना रत्नागिरीच्या अलिकडे २०-२५ किमी वर हायवेच्या उजव्या बाजूला निवळी फाटा लागतो. त्या फाट्याला लागायचे. हाच रस्ता पुढे जयगड बंदराकडे आणि गणपतिपुळ्याकडे जातो. थोड्या वेळाने उजवीकडे भातगाव, फुणगुस असा फाटा लागतो. तिथे उजवीकडे वळायचं. मग परत भातगाव आणि फुणगुस असे दोन फाटे लागतात. त्यातला फुणगुस फाटा पकडायचा आणि पुढे जायचे. या नंतर रस्त्यावर पाट्यांचे दगड आहेत पण नावं असतीलच असं नाही. साधारण खाली खाली उतरणारा रस्ता तो आपला असं समजायचं.
तर एकदाचे पोचलो फुणगुसला विचारत विचारत. दुपारचे साडेतीन झाले होते. जेट्टीपर्यंत जायला अजून(२००७ मधे) चांगला रस्ता झाला नाहीये पण काम चालू आहे. आणि फुणगुसच्या इथून खाडीवर पूल पण होतोय. जिथपर्यंत गाडी पोचत होती तिथे उतरून पुढच्या तीन चार तासांसाठी तहानलाडू, भूकलाडूच्या गोष्टी काखोटीला मारून आम्ही धक्क्याशी आलो. ड्रायव्हरला गाडी घेऊन जयगडला पाठवून दिलं. युसुफ टेमकर म्हणजे आमचे लाँचवाले, आमची वाटच पहात होते.
पटकन मोटर लाँच मधे बसलो आणि प्रवास सुरू झाला. जयगड खाडी किंवा शास्त्री नदी फारशी रूंद वाटत नव्हती. एका बाजूला संपूर्ण हिरवा पट्टा आणि उजव्या बाजूला फुणगुसचा धक्का असं दृश्य दिसत होतं. बोटीमधे कडेला लागून बसायची फळी होती. त्यात एका बाजूला मी बसले. सरळ बसले तर बसल्या बाजूच्या समोरची विरूद्ध बाजू दिसत होती पण लाँचच्या छपराने कापल्यासारखी आणि वाकडं बसल्यावर आपली बाजू दिसत होती. असं तीन तास जायचं? असा म्हातारा विचार आलाच माझ्या डोक्यात. नाही म्हटलं तरी गुहागर परिसरातल्या वळणांच्या रस्त्यांनी दमवलं होतंच. हे सगळं प्रवास सुरू होऊन चार पाच मिनिटांपर्यंतच.
फुणगुस कधीच मागे पडलं होतं. खाडीचं पात्र मिनिटागणिक रूंदावत होतं. ऊन होतं तरी लांबवर पसरलेलं पाणी आणि बाजूचा हिरवाकंच अवकाश डोळ्याला, मनाला शांत करत होता. शाळेतल्या धड्यातले, तेव्हा तद्दन खोटे वाटलेले 'हिरव्या शालूने धरीत्री नटली होती, देवाच्या कुंचल्याने काढलेले सुंदर चित्र' इत्यादी वाकप्रचार अचानक खरे वाटायला लागले. हिरवा रंग हा इतक्या तर्‍हांनी आणि हरकतींनी येऊ शकतो हे बघायला मजा वाटत होती. आपल्याला असं कधी रंगवता येईल का असे मूर्ख विचारही येत होते डोक्यात. पण एकूणात पाण्याच्या सोनेरी ते काळा अश्या सर्व तर्‍हा, मातीचं लालभडक्कपण, ती हिरवाई आणि वरती स्वच्छ आकाश असं जे काय माझ्याभोवती होतं ते मी पिऊन घेत होते. आत आत रूजवत होते. डोळ्यात साठवू की कॅमेर्‍यात साठवू असंही होत होतं.

फुणगुस सोडल्या सोडल्या समोरचा विस्तार
 

सुरूवातीला फुणगुसनंतर बरीच छोटी छोटी गावं आहेत किनार्‍याला लागून आणि त्यांचे छोटे छोटे धक्केही. तिथून तरींनी वाहतूक चालते या किनार्‍यापासून त्या किनार्‍यापर्यंत. काही तरी मासे पकडणार्‍यांच्याही होत्या. त्यातल्या एका तरीचा काढलेला फोटो. फोटो काढल्यावर या तरीतल्या मावशींनी अगदी मस्त हात हालवून दाखवला मला.
तरीतल्या मावशी.


बाजूला तरीतल्या मावशी होत्या आणि समोर वेगळंच आश्चर्य उलगडत होतं. जयगड खाडी ही सरळसोट खाडी नाही. डोंगरांमधून वळत वळत ती जाते. त्यामुळे समोर बघितलं की दोन्ही बाजूंनी येणारे डोंगर कुठेतरी दूर कोपर्‍यात एकमेकाच्या पुढे येत ओव्हरलॅप करत असतात. त्यातून एक मस्त छायाप्रकाशाचा खेळ तयार होतो. मग हळूहळू आपण पुढे गेलो की ते डोंगर एकमेकांपासून दूर होतात, पाणी वाढत जातं आणि मग एखादा डोंगराचा चुकार पाय मधेच असतो की ज्याला वळसा घालून आपली शास्त्री नदी समुद्राकडे जायचा मार्ग शोधत गेलेली असते आणि मग मागोमाग आम्हीही. मधे मधे ही अशी बेटंही दिसायची.

रूंदावत जाणारं पात्र आणि मधेच दिसणारं अस्पर्श्य बेट
आता एका बाजूला बघणं आणि दुसर्‍या बाजूचं राहून देणं हे शक्य होत नव्हतं त्यामुळे मी सरळ लाँचच्या नाकावर जाऊन बसले. सगळ्या लाँचच्या पुढे मी त्यामुळे आपण कसले सॉल्लिड आहोत असं वाटायला लागलं मला. आता समोर येणार्‍या अद्भुताला मी पहिल्यांदा सामोरी जाणार होते. आमच्या लाँचशिवाय तिथल्या परीसरात कुठलाच मानवी स्पर्श नव्हता दिसत आणि ह्या अस्पर्श्याला मी एक माणूस पहिल्यांदा स्पर्श करणार होते असं आपलं मला वाटत होतं.
 साधारण अर्धा तास होत आलेला होता प्रवास सुरू होऊन आणि दूरवर पुसटसा एक पूल दिसायला लागला. हाच तो नवीन झालेला राई-भातगाव पूल. तो पूल दिसायला लागल्यावर माझा नवरा एकदमच खुशीत आला. भातगावाशी लहानपणापासूनचं नातं ना त्याचं! एवढ्या सगळ्या निसर्गात ती मानवी अस्तित्वाची खूण मोठ्या दिमाखात उभी होती. काय गंमत आहे ना शेवटी आपण सगळे मानवच. सुंदर निसर्ग आवडतो पण तो जर संपूर्ण अस्पर्श्य असेल (मानवाचा स्पर्श जाणवणार नाही असा) तर भिववतो तो आपल्याला. मग बाजूच्या गावांचे धक्के, तुरळक भातशेती, एखादी तर, एखादं एकांडं घर किंवा आता हा पूल असं काही दिसलं की आपल्याला सुरक्षित वाटतं आणि त्याच खुणा आपण आठवणी म्हणून घेऊन येतो..
लाँचचं नाक आणि दूर जिथे डोंगर जवळ आल्यासारखे दिसतात तिथे दिसणारा राई-भातगाव पूल.
 हा पूल असा अस्पष्ट दिसायला लागल्यापासून पुलाशी पोचेतो निदान वीसएक मिनिटं तरी जातात. वाटेत लागलेल्या गावांची नावं युसुफ टेमकर सांगत होते पण ती सगळी लक्षात रहाणं अवघड वाटायला लागल्यावर मी नाद सोडला. तशीही मी आता शाळेत नव्हते आणि मला कुणी "कोकणची सहल" असा निबंध लिहून आणायला सांगणार नव्हतं. त्यामुळे नावं लक्षात ठेवण्यापेक्षा मी बाजूचं अद्भुत अनुभवत बसले. आणि क्षणाक्षणाला जवळ येणारा तो पूल डोळ्यात साठवत बसले!
हा असा पूल आता नजरेच्या टप्प्यात न मावणारा..
हा एवढा थोरला पूल हळूहळू जवळ येतो आणि आपली मान हळूहळू वर वर जायला लागते. पूल मोठा मोठा होत अगदी डोक्यावर येतो आणि मग मागे निघून जातो.. मस्त अनुभव असतो हा. 
पूल मागे टाकला आणि उजव्या बाजूला भातगाव सुरू झालं. मगाच्याच सारखं अस्पर्श्य हिरवं जंगल असलेला डोंगर. मधेच एखादी दरड कोसळल्याने उघडा पडलेला मातीचा लाल भाग. नारळाच्या झाडांची दाटी दिसली तर ती वस्तीची खूण. इथून जात असताना मग संदीप मला सांगत होता
"हे बघ तो पट्टा दिसतोय ना त्या नारळीपासून ते तिथे मधेच पोपटी असं दिसतंय ना तिथवर आपली जमीन आहे.",
"त्या तिथे ते वरती एकच झाड दिसतंय ना त्याच्या खाली ती नारळाची झाडं आहेत तिथेच बघ एका घराचं कौलारू छप्पर दिसतंय ती आपली वाडी.. आपण गेलो होतो ना दोन वर्षांपूर्वी ती.",
"पूर्वी गाडीचा रस्ता नव्हता भातगावात जायला. भाऊच्या धक्क्यापासून जयगड खाडीपर्यंत बोट यायची. चांगली दोन तीन मजली. मग तिथून गावापर्यंत यायला पडाव पाठवलेला असायचा आजीने. बोटीतून उतरून पडावात बसायचं. आणि तीन चार तासानी भातगावला उतरायचं. आजीने गडी पाठवलेले असायचे. ते सामान घ्यायचे, मला डोक्यावर घ्यायचे आणि मग आम्ही डोंगर चढून सकाळी ८-१० च्या सुमारास घरी पोचायचो. आदल्या दिवशी सकाळी मुंबईतून निघालेले आम्ही असे २४ तासांनी घरी पोचायचो."
यानंतर मग आजीच्या आठवणी, घराच्या आठवणी, गावाच्या आठवणी... मला तो तिसंग भातगाव ते दुर्गा भातगाव असा सगळा दोन तीन डोंगरांचा परिसर एकदम ओळखीचाच वाटायला लागला. संदीपच्या आजीला मी कधी पाह्यलं नाही पण ती पण ओळखीची वाटायला लागली.

भातगावचा खाडीत घुसलेला डोंगर. या डोंगराच्या मागेही भातगावचाच डोंगर आहे.
 
लाल माती, हिरवी श्रीमंती आणि आत घुसलेल्या पाणवाटा


उजव्या बाजूला भातगाव होतं तर समोर हे असं अस्सल झळाळतं सोनं

भातगावातला शेवटचा धक्का मागे पडला. समोर बघतो तर नदी वळण घेताना दिसली. 'ही परत वळली..!' मी म्हणाले.. आणि वळण अनुभवत राह्यले.
अशी नदी वळली.
 योगसाधनेतलं मला काही कळत नाही पण तपाचरणासाठी निसर्ग जवळ का करत असावेत लोक हे कळायला लागलं होतं मला. विचार येत होते, जात होते. मला ना ते आलेले कळत होते ना जाताना ऐकू येत होते. समोरच्या अथांगाशी तंद्री लागली होती. आता ना कुठल्या जेट्ट्या दिसत होत्या. ना कुठल्या वाड्या वस्त्या, ना कुठली भातशेती. फक्त जंगल. मधूनच उडणारे पक्षी एवढीच जाग आमच्या लाँचच्या आवाजापलिकडे.


चिरतंद्रा... मी नव्हे नदी..

सूर्यास्ताची वेळ होत चालली होती आणि खास आमच्यासाठी सूर्य, जंगल, नदी सगळ्यांनी मिळून रंगांचा खास खेळ ठेवला होता. आणि आम्ही क्षणोक्षणी अवाक होण्यापलिकडे काही करू शकत नव्हतो. फोटो काढले, डोळे भरून पाह्यलं, मनभरून पिऊन घेतलं पण तरी ती सगळी गंमत आमच्या कवेत मावेचना. एक अजून गंमत दिसत होती. आत्तापर्यंत दूरवरूनच नदी नक्की उजवीकडे वळतेय की डावीकडे ते कळत होतं पण आता पात्र इतकं रूंदावलं होतं आणि समोरचा पाण्याचा विस्तार उजव्या व डाव्या दोन्ही बाजूला वळतोय कारण नाकाडासमोर डोंगर आलाय असं दिसायला लागलं. मग आता आपली लाँच उजवीकडे वळेल की डावीकडे अश्या गप्पा दर वळणाला सुरू झाल्या. नाकासमोर डोंगर आणि वरती सूर्य आल्याने ही गंमत कॅमेर्‍यात साठवता आली नाही.

असं सोन्याचं पाणी

नंतर मधेच कुठेतरी प्लॅस्टीकचा किंवा थर्माकोलचा एखादा ठोकळा पाण्यावर तरंगताना दिसायचा. आता असे बरेच ठोकळे दिसायला लागले. तिथे जाळी टाकलीयेत मासे पकडायला टेमकरांनी माहिती पुरवली. याच वेळेला परत लोकवस्ती दिसायला लागली. गाव तर अगदी काठाला वसलेलं. दुमजली घरं, नारळाची सरळसोट खोडं, काठालगत मासेमारीच्या बोटी आणि मशिदीचा निळा मिनार. स्टिल लाइफ काढण्यासाठी मांडून ठेवतात ना तसं सगळं सुबक आणि सूर्यास्तापूर्वीचा मॅजिक लाइट असल्याने अगदी तीटपावडर केल्यासारखं देखणं दिसत होतं. आणि हे असं दोन्ही बाजूला होतं.
 
डावीकडचं जांभारी गाव

उजवीकडचं कालाले गाव
मच्छिमारीच्या होड्या.

ही गावं संपताना मधे परत वळण आलंच. नदी डावीकडे वळत होती. आणि लाइटशोचा फिनाले दिमाखात चालू झाला होता. नदी डावीकडे वळल्यावर समोर फिनालेचे क्षण दिसायला लागले.

 
सूर्यास्ताच्या उंबरठ्यावर  

 
सूर्यास्त

सूर्यास्तानंतर

सूर्यास्तानंतर

आता पाण्यावर संध्याप्रकाशाची चांदी होती. सव्वासहा-साडेसहाचा सुमार होता. उजव्या बाजूला पाण्याच्यापलिकडे डोंगराची धूसर किनार दिसत होती. चांदीच्या पाण्यात दूर लांबवर एक एकांडा मच्छीमार एकांड्या तरीतून हिंडत होता. डाव्या बाजूचा डोंगर जवळच होता पण पाण्यात मिसळून गेला होता. अंधार चढत चालला होता. समोर डोंगराचा काळा पट्टा. खाली पाण्यात आणि वर आकाशात सूर्य गेला तरी त्याच्या पावलांच्या न विरलेल्या केशरी खुणा. त्याच्याही वर निखळ निळं आकाश आणि एकदम वरती चंद्राची कोर झोकात चमकायला लागली होती.

The Grand Finale

हा नवाच अध्याय उलगडत होता या रंगांच्या खेळाचा. तेवढ्यात आम्ही थोडेसे डाव्याबाजूला वळलो आणि अचानक डावीकडची डोंगर रांग संपली नी समोर दूरवर फक्त पाणी होतं. एक बोटीचा लख्ख ठिपका त्या पाण्यात लांबवर दिसत होता. आम्ही समुद्राजवळ आलो होतो. नदी आणि समुद्राची भेट झाली होती. अंगावर शहारा आला. काहीतरी अलौकिक आपल्याला स्पर्श करतंय. आपल्यातल्या आदीम समर्पणाला हाकारतंय असं काहीसं.. खळ्ळ्कन एक खारा थेंब ओघळला. आणि मी संदीपकडे पाह्यलं. तिथेही असं अथांग पाणी दिसलं.

काही क्षण हे अनुभवण्यात गेले तोच समोर दिवे, लोकवस्तीच्या खुणा, मोठ्ठी जेट्टी, नवरात्रीचा मंडप असं सगळं दिसायला लागलं. जयगड बंदर आलं होतं आणि हा जीवघेण्या अद्भुताचा प्रवास संपला होता.

- नी

Tuesday, February 16, 2016

देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!

'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!'
असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्‍या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती. भारीच वाटली होती ती युक्ती.
मी लग्गेच अमलात आणले ते. सर्व वह्यांवर लिहिले. पेपरात प्रत्येक पानाच्या डोक्यावर लिहायचा विचार होता पण माझा लिखाणाचा वेग इतका सुपरफास्ट असायचा की बरेचदा पेपर लिहून पूर्ण व्हायचा नाही त्यात ही ब्याद कुठे लिहीत बसा. देव बघेल तेव्हा त्याला पहिले पान दिसेलच की. असा सोयीस्कर विचार करून मी हे वाक्य फक्त पहिल्या पानावरच लिहिले.
इयत्ता तिसरीत मला तसेही बरे मार्कच पडायचे, तेवढेच याही परिक्षेत पडले. वाक्य लिहिण्याचा स्पेशल असर काही दिसला नाही. मात्र पेपरात पहिल्या पानावर लिहिलेल्या वाक्यांबद्दल वर्गशिक्षिका बाईंकडून त्यांची आख्खं विश्व इकडचं तिकडे हलेल अश्या पावरची स्पेशल थोबाडित मात्र मिळाली.
तेव्हा शिक्षकांनी थोडेफार फटके हाणले तरी पालक आकांडतांडव करत नसत त्यामुळे घरी येऊन थोबाडितचे सांगितल्यावर 'तू काय केलं होतंस?' हाच प्रश्न पहिला. उत्तरादाखल भारी युक्ती आईला सांगण्यात आली.
आईने डोक्यावर हात मारला, स्वतःच्याच. लिहिलेल्या वाक्याचा अर्थ नीट स्पष्ट करून सांगण्यात आला. अभ्यासाशिवाय, स्वतःच्या प्रयत्नांशिवाय तरणोपाय नाही हे नीटच बसवले डोक्यात. परिक्षेला जाताना देवाला नमस्कार करणे हे फारतर केलेल्या अभ्यासाचा शांतपणे विचार करण्यापुरते उपयोगी पडते. हे पक्कं बसलं डोक्यात. आणि शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमधे अजूनच खोल कोरलं गेलं.

कट टू पाचेक वर्षांपूर्वीची एक घटना.
"आपण या भागात शूट करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला इथले सगळे रस्ते माहिती हवेत. आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा इथून गेलोय. तेव्हाच तुम्हाला रस्ता लक्षात ठेवायचा सांगितलेले आहे. आता ड्रायव्हर वेगळा आहे. त्याला मुंढरपर्यंतचा रस्ता तुम्ही सांगायचा."
दिग्दर्शकाने त्याच्या तीनही एडीजना सांगितले. रत्नागिरी शहरातून राई-भातगाव पुलाच्या मार्गे आम्हाला मुंढर गावात पोचायचे होते. रत्नागिरीत कामे आटपता आटपता संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. मला राई-भातगाव पुलापर्यंतचा रस्ता माहित नव्हता. पुढचा फारच ओळखीचा होता. शहरातून बाहेर पडतानाचा फाटा योग्य तो निवडला आणि मग निघालो. बराच वेळ जात राह्यलो तरी राई-भातगाव पूल येण्याचे चिन्ह दिसेना. डोंगरातला रस्ता, अंधाराची वेळ त्यामुळे रस्ता चुकलोय हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. बर चुकलोय तर नक्की कुठे चुकलोय हे कळायला मार्ग नाही. आता काय करायचे?
एडी १ - अं अं अं
एडी २ - रस्ता चुकलो? रस्ता चुकलो? (खिशातून फोन काढून त्यात कुठल्या तरी गुरूच्या भजनाची ऑडिओ सुरू केली.)
एडी ३ - कुणाला तरी विचारायला पाहिजे.
ड्रायव्हर - आता कसा रस्ता कळणार? ( गाडीत वाजत असलेले किशोरकुमारचे गाणे बंद करून टाकले. खिशातून मोबाइल काढून कुठल्या तरी गुरूच्या फोटोचा वॉलपेपर बघून फोन डोक्याला लावणे सुरू)
दिग्दर्शक, मी आणि एडी ३ यांच्यात अजून थोडी वाक्यांची देवाणघेवाण होऊन आहे त्या रस्त्याने पुढे जाऊया. जे पहिलं गाव लागेल तिथे विचारूया. असे ठरले. गेलो.
वाटेत एक उजवे वळण आमचे सुटले होते त्यामुळे आम्ही पुळ्याच्या दिशेने निघालो होतो. पहिले जे गाव लागले तिथे हा उलगडा झाला. मग अजून चार पाच जणांना विचारल्यावर योग्य तो रस्ता कसा सापडेल तेही कळले. तसे गेलो. इप्सित स्थळी पोचलो. एक तासा दीडतासाचा उशीर झाला फारतर.
खाली उतरून किंवा गाडीतच बसून रस्त्याने येणार्‍या माणसाला थांबवून रस्ता विचारणे वगैरे करायला भाविक मंडळींची हिंमत होत नव्हती. कर्णकटू भजन सतत मोठ्ठ्या आवाजात ऐकणे आणि सतत फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे यापलिकडे त्यांचे प्रयत्न जात नव्हते.
राई-भातगावच्या पुलावर आल्यावर पुढच्या रस्त्याबद्दल कुणालाच प्रश्न नव्हता. त्यामुळे पुलाशी पोचल्यावर 'चला आता प्रश्न नाही!' अशी आमची प्रतिक्रिया तर भाविक मंडळींचे भजन, नमस्कार, जप वगैरे चालूच होते. मुंढरला पोचल्यावर एडी २ म्हणे, 'स्वामींनी वाचवले!'. सर्वांनीच कपालबडवती करून घेतली तिथे.
कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. आपल्यापेक्षा अनुभव जास्त असलेले लोक पॉइंटर्स देऊ शकतात. त्याचा विचार करण्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. श्रद्धेचा उपयोग फारतर मार्ग शोधताना डोके शांत ठेवायला होऊ शकतो. तुम्ही मनाने पुरेसे घट्ट असाल तर त्याचीही गरज नाही. मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही.
तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास कर!' हेच अंतिम वगैरे सत्य...
डिंगडाँग...
- नी

Sunday, January 3, 2016

नटसम्राटाचे साम्राज्य..

मायबोली.कॊम दरवर्षी मराठी भाषा दिवस आयोजित करते. २०१२ च्या वर्षी कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कुसुमाग्रजांचे साहित्य हा महत्वाचा विषय होता. त्यानिमित्ताने खालीले लेख लिहिला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------

नाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते.
नटसम्राटच्या संहितेचे मूळ शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’मध्ये आहे हे सर्वज्ञातच आहे. किंग लिअर ते नटसम्राट या प्रवासाबद्दल शिरवाडकरांनीच काही टिपणे केलेली आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात मनावर ताण आला की, नाट्यप्रयोगात शिरणारा नट अशी व्यक्तिरेखा असलेल्या एका इंग्रजी सिनेमाबद्दल शिरवाडकरांनी ऐकले होते. नानासाहेब फाटकांनी ’किंग लिअर’चे रूपांतर करण्याची विनंती शिरवाडकरांना केली होती. परंतु रूपांतर करताना प्रमुख व्यक्तिरेखा राजा न रहाता रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट त्यांना दिसू लागला. हा सम्राट त्यांना नानासाहेब फाटकांच्याच व्यक्तिरेखेत मिळाला. कधीकाळी ऐकलेली सिनेमातील व्यक्तिरेखा, ’किंग लिअर’च्या कथेचा सांगाडा, नानासाहेब फाटकांचे व्यक्तिमत्व आणि अखेरीस जेव्हा नटसम्राट कागदावर उतरले तेव्हाचे शिरवाडकरांचे वय या सर्व गोष्टींच्या मिश्रणातून नटसम्राट प्रत्यक्षात आले.
२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी.
गडकर्‍यांच्या ’एकच प्याला’नंतर जवळजवळ ५० वर्षांनी इतके अभूतपूर्व भाषासौंदर्य घेऊन येणारे नाटक म्हणून तेव्हापासून या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले. नटसम्राट या नाटकाला १९७० सालचा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला तर या नाटकाच्या लिखाणासाठी शिरवाडकरांना १९७४ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी केली होती. नटसम्राटच्या संवादांच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबच्या लांब स्वगते. या बाबत डॉ. लागू सांगतात की लहानपणी, सकाळी देवापुढे बसून स्तोत्रे पाठ करण्याची सवय त्यांना उपयोगी पडली. साधारण २८१ प्रयोगानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करणे थांबवले. त्यांच्यानंतर अनेकांनी ही भूमिका केली. प्रत्येकाने आपापल्या परीने या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला डॉ. लागूंशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावे लागले.
डॉ. लागूंच्या नंतर ही भूमिका समर्थपणे पेलली दत्ता भट यांनी. दत्ता भटांचा खडा आवाज व भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे बेलवलकरांच्या व्यक्तिरेखेला वेगळे परिमाण मिळाले. त्यांचा नटसम्राट अपरिमित गाजला. दत्ता भटांनी नटसम्राटचे ४०० प्रयोग केले. त्यांनाही नंतर प्रकृती-अस्वास्थ्यामुळे नटसम्राट करणे थांबवावे लागले. नंतर १९७७च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली. त्यांनी आधीच्या दोघांचा नटसम्राट पाहिला नव्हता. याचमुळे ठराविक साच्यापेक्षा वेगळा नटसम्राट उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. १९७९ च्या सुमारास याच संचामधे चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारायला सुरुवात केली. याही नटसम्राटाला प्रेक्षक व समीक्षकांची चांगली दाद मिळाली.
या चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणार्‍या एकच अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादशील अश्या त्यांनी साकारलेल्या कावेरीची छाप पुसणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.
नंतर १९८२ साली अरविंद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली यशवंत दत्त यांनी बेलवलकर व सुलभा देशपांडे यांनी कावेरी साकारली. स्वतः शिरवाडकरांनी ‘आत्तापर्यंतचा मला सगळ्यात भावलेला नटसम्राट’ अशी पावती या नटसम्राटाला दिली होती. या प्रयोगाचे दिग्दर्शकीय वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील बाकीची पात्रे म्हणजे मुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.
नंतर परत एकदा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. यानंतर नटसम्राटाच्या भूमिकेत राजा गोसावी व कावेरीच्या भूमिकेत उषा नाडकर्णी असाही एक प्रयोग करण्यात आला. उषा नाडकर्णींच्या कावेरीने वाहवा मिळवली पण गोसावींचा नटसम्राट मात्र लोकांना फारसा आवडला नाही.
पहिल्या नटसम्राटानंतर दत्ता भटांपासून राजा गोसावींपर्यंत अनेक अभिनेत्यांनी नटसम्राटाचे आव्हान स्वीकारून झाल्यानंतर १९८६ साली डॉ. लागूंनी पुन्हा एकदा नटसम्राट पेलले. यावेळेला दिग्दर्शक होते माधव वाटवे आणि कावेरी साकारत होत्या सुहास जोशी. या नटसम्राटालाही लोकांची मान्यता मिळाली. सुहास जोशींची थोडी वेगळ्या पद्धतीने उभी केलेली कावेरीही लोकांना आवडली.
यानंतरही अनेकांनी नटसम्राटला हात घालण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग म्हणजे लक्ष्मण देशपांडे व अनुया दळवी यांनी केलेला द्विपात्री नटसम्राटाचा प्रयोग. या प्रयोगाचे दिग्दर्शनही प्राध्यापक लक्षमण देशपांडे यांचेच होते. देशपांड्यांनी नाटक द्विपात्री करून त्याचे रुपडेच बदलून टाकले. यासाठी संशोधन करून संहितेचे पुन्हा संपादन केले. नेपथ्य, नाटकातील स्वगते व पार्श्वसंगीत यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार केला. गणपतराव बेलवलकर आणि कावेरी या दोन पात्रांव्यतिरिक्त बाकी पात्रे उल्लेखापुरतीच ठेवली. अगदीच गरज पडली तेव्हा त्यांचे संवाद नुसते ऐकवले. हा प्रयोग म्हणून यशस्वी झाला असे समीक्षकांनी मांडले आहे.
मराठी भाषेतून इतर भारतीय भाषांत अनुवादित केल्या गेलेल्या महत्त्वाच्या मराठी नाटकांपैकी नटसम्राट हे एक. या नाटकाचे इंग्रजी, गुजराथी, हिंदी आणि तेलुगू भाषांतील अनुवाद आणि नाट्यप्रयोग दोन्ही भरपूर गाजले.
काही अनुवाद :
इंग्रजी: द लास्ट सीन - अनु. - वसंत लिमये
हिंदी: नटसम्राट - अनु. र. श. केळकर.
तेलुगू :नाटकांतम - अनु. उदयभानू
गुजराथी: २ अनुवाद१. बहुत नाच्यो गोपाला - कांती मडीया२. हमारी दुनिया तमारी दुनिया - प्रवीण सोलंकी


हिंदीमधे ३ - ४ वेगवेगळ्या दिगदर्शकांनी हे नाटक केले आहे.
तेलुगूमधे नाटकांतम - संस्था रंगधारा - जानेवारी १९९८. दिग्दर्शन: प्राध्यापक भास्कर शेवाळकर. प्रमुख भूमिका: चाटला श्रीरामलू
गुजराथीमधे
१. बहुत नाच्यो गोपाला - १९७४ दिग्दर्शन: कांती मडीया. प्रमुख भूमिका: चंद्रकांत भट
२. हमारी दुनिया तमारी दुनिया - १९९५ दिग्दर्शन व प्रमुख भूमिका: सिद्धार्थ रांदेरीया
अजूनही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आपापल्या परीने हे धनुष्य पेलायचा प्रयत्न करताना दिसतात.
हा झाला या नाटकाचा इतिहास.

माझ्या पिढीने लहानपणी नटसम्राटचे वादळी वारे ऐकले. किंचित कळत्या वयात दूरदर्शनवर नटसम्राट बघितले. नववी-दहावीच्या काळात हे नाटक वाचले, उतारे पाठ केले आणि चोख भाषेत म्हणून दाखवून सगळ्यांकडून शाबासकी मिळवली. तेव्हापासूनच नटसम्राटच्या संदर्भाने सतत डोक्यात दोन वेगळ्या टोकाची मते येत असत. मराठी शाळेत शिकल्याने आणि वाचनाचा किडा वेळेवर डसल्याने नटसम्राटच्या लिखाणातले भाषासौंदर्य, नाटकाची बांधणी हे प्रचंड आवडत असे आणि त्याच वेळेला अप्पासाहेबांचा भाबडेपणा त्रासदायक होत असे. त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले!
मग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला.
मधे प्रसारभारतीच्या उपक्रमांतर्गत दूरदर्शनसाठी ६ भागांमधे नटसम्राट करून दिले. त्यावेळेला अभ्यास करताना पुन्हा तेच जाणवत राहिले. मुलगा-सून, मुलगी-जावई हे खलनायक न वाटता परिस्थितीची बाहुली आहेत हे जाणवू लागले. नाटक आशय-विषय-कथेच्या बाबतीत मनातून उतरत गेले. भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.

- नीरजा पटवर्धन
तळटीप: वरील लेखातील सर्व संदर्भ एन सी पी ए, मुंबई येथील ग्रंथालयातील 'नटसम्राट'च्या संदर्भ संग्रहातून घेतले आहेत.

Search This Blog