’मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ ’चालेल. करूया!’ असा एक संवाद आमच्यात घडला तो दिवस.
एका वर्षी गणपतीच्या आदल्या दिवशी आकेरीला देवधरांच्या घरी जाऊन पोचलो तो दिवस.
प्रत्येक दौर्यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा, नदीचा हिरवा वास. त्याच्या बरोबरच्या कुठल्या तरी पिशवीतून निघालेलं एखादं रानफूल, एखादा दगड आणि माणसांच्या रग्गड कहाण्या.
एक मुलगी आहे, तिचं नदीशी नातं आहे.. पटकथेने आकार घ्यायला केलेली सुरूवात.
मी पहिल्यांदा त्याच्याबरोबर नद्या फिरायला सुरूवात केली तेव्हा त्या निसर्गाला भिडताना आलेलं दडपण. त्या दडपणाचं हळूहळू मैत्रीत झालेलं रूपांतर.
कृष्णापूरला जाताना कडवळजवळ नदीतल्या कातळावर लायकेन्स सदृश काही दिसले. इसवीसनापूर्वी शिकलेल्या बॉटनीला स्मरून कातळावर हात फिरवून ’हे लायकेन्स असतील तर हे असंच राहूदेत, अजून वाढूदेत !’ अशी प्रार्थना केली होती तो दिवस.
खळाळतं पाणी, वाहतं पाणी नजरेला, पायाला भिडल्यावर आपोआपच माझी तंद्री लागणं.
राजेंद्र केरकरांच्या घरून डबा घेऊन नद्या फिरायला निघणारी आम्ही माणसं. वरती कृष्णापूरला एका वहिनींच्या अंगणात जेवणे, हात धुवायला प्रत्येक घराच्या बाजूला झरा. झर्यात पाय बुडवून बसायचं, पाण्याशी खेळायचं. कंटाळा येईलच कसा?
पौर्णिमा केरकरांचा ओव्यांचा संग्रह.
ऑडिशन आणि वर्कशॉपला आलेले असंख्य जण. त्यात सापडत गेलेली आमची माणसं. एका ऑडिशनला समोर आलेली पूनम. हिचंच नदीशी नातं असणार.
डॉ. हर्षदा देवधरची वीस रूपयाच्या नोटेची कविता. डॉ. प्रसाद देवधरबरोबर फिरताना उमजत गेलेलं कोकण, कोकणातलं गाव, कोकणी माणूस आणि राजकारण. पाण्याचं, जमिनीचं, निसर्गाचं राजकारण.
गोव्याचा श्रीकांत जोशी, त्याचं फार्म आणि तिथे येणारे मोर. आमचं गोव्यातलं घरच असल्यासारखं. असं निघून नसतं जायचं रे श्रीकांत! आता माझ्या आणि संदीपच्या डोक्यावर हात ठेवून ’सूरज कही भी जाये, तुमपर ना धूप आये!’ कोण म्हणणार?
नदीचे रंग, झाडांचे पोत, ऋतूंची रूपे.. ’एकेक शीर जाणतेय मी!’ याची अनुभूती. माझे पहिलेच कलादिग्दर्शन. आणि बरोबर कितव्यांदातरी केलेले वेशसंकल्पनही.
पैश्याची वाट बघणे आणि थांबून राहणे.
शूटींग. पहाटे पहाटे वाडीत तलावाच्या बाजूला कार्स, व्हॅन्स, ट्रक्स मिळून १५ -१६ गाड्यांचा जथ्था. सगळ्या गाड्या रांगेने लोकेशनवर पोचणार.
आकेरी तिठ्याचे दोन बंगले. आमचे हेडक्वार्टर्स.
तिथे दोन शेड्युल्सच्या दरम्यान कलाकारांच्या तालमी आणि वर्कशॉप्स.
सिंधुदुर्गात जाऊन राह्यलेले आम्ही सगळे.
पोस्ट प्रॉडक्शनच्या काळात निर्माती म्हणून अनेक गोष्टी शिकत जाणे.
कष्ट आणि भरपूर ताण.
अजून असंख्य बारीक सारीक गोष्टी.
या प्रवासाचे साथीदार आणि साक्षीदार असलेले असंख्य मित्र व सहकारी.
या सगळ्या सगळ्यातून आता फिल्म रिलीज होतेय. पुढच्या महिन्यात, सप्टेंबरमधे.
तुमच्या शुभेच्छा गृहित धरते आहे.
- नी