हा लेख भारताच्या तिसर्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दिच्या निमित्ताने दैनिक लोकमतने १९ नोव्हेंबर २०१७ रोजी काढलेल्या पुरवणीत छापून आला होता. जागेअभावी थोडी काटछाट झाली होती. पूर्ण लेख इथे देत आहे. लोकमतची लिंकही लेखाखाली दिली आहे.
-----------------------------------------
आदर्श भारतीय स्त्रीचे जे चित्र एरवी उभे केले जाते ते तथाकथित सौभाग्यचिन्हे, गजरे, दागिने यांचा भरपूर वापर, लांबसडक केस अश्या गोष्टींशिवाय पूर्ण होत नाही. तरीही जिथे अधिकार आणि कणखरपणा आला तिथे या सगळ्या पारंपरिक गोष्टींना छेद दिला जातोच आहे. हे कुठून आलं?
या प्रश्नाचं उत्तर शोधत परंपरेला छेद देणार्या एका स्त्रीपाशी जाऊन पोहोचले. भारतातल्या महत्वाच्या स्त्रियांच्या यादीमधे त्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्या भारताच्या तिसर्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी.
लहानपणी घरी दूरदर्शनवरच्या बातम्या रोज लावल्या जात. इंदिराजी तेव्हा पंतप्रधान होत्या त्यामुळे बातम्यांमधे रोजच त्यांचे दर्शन घडे. आणिबाणी व नंतरच्या सर्व वादळांमधून तावून सुलाखून परत देशाचा गाडा हाकण्याच्या पदावर विराजमान झालेल्या होत्या. आणिबाणीच्या काळात दुपट्यात असलेल्या माझ्या पिढीला हा इतिहास तेव्हा माहिती असण्याची शक्यता नव्हती. पण त्या सर्व बातम्यांमधे त्यांच्याइतकं बघत राहावं असं कुणी दिसत नसे. अगदी इतक्या वर्षांनंतर आजही ते लक्षात आहे.
मी ज्या काळात आणि ज्या वातावरणात वाढले तिथे बहुतेक सर्व बायका साड्याच नेसत. साड्या नेसणार्या आई, आजी, शाळेतल्या बाई, समोरच्या काकू अश्या असंख्य स्त्रियांपेक्षा आणि टिव्हिवरच्या विविध मावश्यांच्यापेक्षा या बातम्यांमधे दिसणार्या पंतप्रधान आजी साडीमधेच असल्या तरी वेगळ्या दिसायच्या, वेगळ्या वाटायच्या. मी सहावीत असताना त्यांचा अत्यंत दुर्दैवी आणि भीषण असा अंत झाला. मग हळूहळू बातम्यांमधूनही त्यांच्या जुन्या क्लिप्स दाखवणं बंद होत गेलं. पण मनामधे अतिशय ग्रेसफुल, कणखर अशी त्यांची छबी कायम राह्यली.
काय काय होतं या छबीमधे? साधी साडीसारखी तर साडी मग ती इतकी वेगळी कशी काय? इंदिराजींचे राजकारण, निर्णय, चूक की बरोबर हा या लेखाचा विषय नाही. त्यांना मिळालेली लोकप्रियता आणि जनतेचं प्रेम बघता “क्या बात थी उनमे जो बाकीयोंमे नही?” हे त्यांच्या राहणीतून शोधायचा हा छोटासा प्रयत्न आहे
राजकीय कार्यकर्ती ते पंतप्रधानपद या सगळ्यातच कामानिमित्ताने प्रवास भरपूर, हालचाल भरपूर त्यामुळे अंगावरचे कपडे या सगळ्यासाठी सोयीचे असायला हवेत. तसेच हे काम म्हणजे लोकांशी संपर्क भरपूर. लोकांना विश्वास वाटायचा असेल तर साडीला पर्याय नाहीच. त्यातून परंपरा जपल्यासारखं होतं ना!
स्वातंत्र्यपूर्व काळातला जन्म, जडणघडण आणि वाढणं, वडिलांचं स्वातंत्र्य लढ्याच्या अगदी केंद्रस्थानी असणं या सगळ्यामुळे इंदिराजींनी आपल्या कपड्यांमधे खादीचा मुबलक वापर करणं हे तर ओघाने आलंच. पंडीत नेहरू तुरूंगात असताना त्यांनी विणलेली खादीची गुलाबी साडी लेऊन इंदिराजी विवाहबद्ध झाल्या होत्या.
ब्रिटिशांनी इथले पारंपरिक उद्योगधंदे आणि कारागीर देशोधडीला लावले. याला विरोध म्हणून स्वदेशी चळवळ, खादी या संकल्पना निर्माण झाल्या हा इतिहास आपल्याला माहितीच आहे. स्वातंत्र्योत्तर काळामधे पारंपरिक कला, हस्तकला यांना उत्तेजन मिळावे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले गेले. इंदिराजींच्या कारकिर्दीत त्यांनी या पारंपरिक हस्तकला व हातमागाच्या उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष लक्ष घातले.
याचाच एक भाग म्हणून खादीच्या बरोबरीने पारंपरिक हातमागावर, पारंपरिक विणकरांनी विणलेल्या साड्या हा त्यांच्या कपड्यांचा एक महत्वाचा भाग होता. शक्यतो सुतीच पण कधी कधी विशेष निमित्ताने त्या रेशमी साड्याही वापरत. देशभरातल्या विविध प्रकारच्या हातमागाच्या साड्या त्या वापरत असत. इतकेच नव्हे तर एखाद्या ठिकाणी जाताना ज्या राज्याला, ज्या गावाला भेट द्यायची त्या राज्याची परंपरा असलेली साडी नेसणे, तिथली परंपरा असलेल्या वस्तूंचा वापर करणे हे त्या कटाक्षाने करत. ते ही असे की नेसलेल्या साडीवरून ’अमुक राज्याचे पारंपरिक कापड तमुक आहे.’ असे सामान्य जनतेचे शिक्षण व्हावे. साड्यांची निवड करताना त्यांचे रंग वा त्यावर असलेली नक्षी या सर्वांमधे साधेपणा, डोळ्याला सुखद, अंगावर न येणारे रंग वा नक्षी आणि श्रीमंतीचे प्रदर्शन न करताही अभिरूची जपणे या निकषांवर निवड केली जात असे. जिथल्या तिथल्या जनतेला ही ’आपली’ पंतप्रधान आहे हे वाटू देण्यात या गोष्टीचा फार मोठा वाटा होता.
हे झालं साड्यांच्या कापडाविषयी. त्यांच्या साडीची नेसण हा त्यांच्या ग्रेसफुल आणि कणखर दिसण्यातला दुसरा महत्वाचा भाग. स्टार्च केलेली सुती साडी. निर्या व्यवस्थित इस्त्री केल्यासारख्या जुळवलेल्या. सभासंमेलनांमधे डोक्यावरून घेतलेला पदर तर कामकाजाच्या वेळेस हालचालींच्या आड येणार नाही असा एका खांद्यावर असलेला पदर. ही काही त्यांच्या नेसणीची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
कुठूनही शरीर दिसायला वाव नाही असे पूर्ण गळाबंद आणि कमरेपर्यंत येणारे ब्लाऊज ही त्यांच्या कपड्यांमधली एक महत्वाची गोष्ट आहे. अंगभर कपडे, व्यवस्थित सर्व बाजूंनी झाकलेले शरीर म्हणजे आदरच आदर हे बालिश व्हिक्टोरियन समीकरण आजही आपल्या मानसिकतेत घट्ट रुतून बसलेले आहे. त्यांच्या काळात तर या समीकरणाचा पगडा भरपूर असणार. त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या काळात त्यांना ’गुंगी गुडिया’ म्हणून हेटाळले गेले होते, स्त्रियांचे म्हणणे गंभीरपणे घ्यायची परंपरा जगात कुठेच नव्हती तशी आपल्याकडेही नव्हतीच. याचा सामना त्यांनी केला होता त्यामुळे त्यांच्या कापड,चोपड, आभूषणे यातल्या प्रत्येक निवडीच्या मागे जनमानसातल्या आदरणीय गोष्टी कुठल्या याचे भान जाणवते.
त्यांचे दागिने व आभूषणे यात एक रूद्राक्षाची माळ व एक मनगटी घड्याळ या दोनच वस्तूंचा समावेश होता. बाकी सोन्यामोत्याचे हार, कर्णफुलं, बांगड्या वगैरे गोष्टींना पूर्णपणे फाटा दिलेला होता. यामधे स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी याबरोबरच उपयुक्तता, सोय याचाही भाग होता. सुरूवातीपासूनच त्यांनी दागिन्यांना बराचसा फाटाच दिलेला होता. मात्र १९६० साली त्यांच्या पतिच्या निधनानंतर त्यांचे काहीच दागिने न घालणे हे मात्र जनतेच्या दृष्टीने आदरणीय ठरून गेले असावे.
साडीवरून ट्रेंच कोट असे भारतीय व पाश्चात्य फॅशनचे एकत्रीकरण त्यांनी बरेचदा केले. अतिशय ग्रेसफुली केले. परंपरा व आधुनिकता यांचा संगम असा एक घासून गुळगुळीत झालेला पण तरीही चपखल वाक्प्रचार इथे वापरता येईल.
व्यवस्थित बसवलेले छोटे केस आणि त्यात एक पांढर्या केसांची बट ही खास त्यांची ओळख म्हणता यावी अशी गोष्ट. १९६० च्या दशकाच्या शेवटी त्यांनी आपले केस कापून लहान केले आणि एक पांढरी बट सोडून देऊन बाकी सर्व काळे ठेवले. नंतर वेळोवेळी ते तसेच ठेवण्यासाठी हेअरड्रेसरकडून टचप करून घेतले जात असत.
हवी तशी साडी शोधणे, त्यावर हव्या त्या रंगाचा ब्लाऊजपीस मिळवणे, टेलरच्या मागे लागून वेळच्या वेळेला ब्लाऊज शिवून घेणे आणि कपड्यांची बाकी सगळी उस्तवार करायला पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला वेळ असण्याची शक्यता नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मदतनीस हा त्यांच्या राहणीचा अविभाज्य भाग होता. साधेपणा राखायचा तरी त्याला वेगळे कष्ट असतात हे खरे असले तरीही पूर्ण गेटप ही त्यांची डोळसपणे केलेली निवड होती हे नक्कीच
पारंपरिक हस्तकलांचे महत्व ओळखून त्यांच्यामागे उभे राहतानाच इंदिराजींनी अनेक कुचकामी परंपरांना छेद दिला. बायकांनी मान खाली घालून गरीब गायीसारखे असावे, विधवा स्त्रीने एकभुक्त रहावे, जाडेभरडे ल्यावे, जगासमोर तोंड दाखवू नये वगैरे मूर्ख समजुतींना तर त्यांनी कचर्यासारखे उडवून लावले.
परंपरां, पारंपरिक गोष्टी यातले काय निवडायचे, काय टाकायचे याबाबत प्रत्येक भारतीय स्त्रियांसाठी त्यांनी एक अप्रत्यक्षरित्या वस्तुपाठच घालून दिला आहे. एकिकडे ’परंपरांचा अभिमान’ म्हणून सर्वच जुन्या गोष्टी प्राणपणाने जपत राहायच्या तर दुसरीकडे ’एतद्देशीय ते ते सर्व कुचकामी’ असा टोकाचा दुराग्रह अश्या वातावरणात हा नीरक्षीरविवेक मला खूप महत्वाचा वाटतो.
- नीरजा पटवर्धन
----------------------------
लोकमतची लिंक