Saturday, September 26, 2015

गणपतीच्या आठवणी १ - गणपती बघणे आणि मिरवणूक

मी फार भाविक, धार्मिक वगैरे नाही पण पुण्यात तेही पेठांमधे वाढल्यावर गणपती आणि त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी हा माझ्या जगाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.  त्याबद्दल थोडसं..

अगदी लहानपणी म्हणजे शिशुविहारमधे असताना हिराबागेचा हलता देखावा, बाबांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे आठवतेय. स्कूटरवर मी, आई आणि बाबा फिरायचो. गणपती मंडळाच्या जवळपास स्कूटर लावायची आणि गर्दी कमी असेल तर मला चालवायचे. जास्त असेल तर मी खांद्यावर असला प्रकार. मग आम्ही तिघे स्कूटरवर मावणार नाही अश्या स्टेजला पोचलो तेव्हा आईचा गर्दीत जायचा उत्साह कमी झाला होता. बाबा आणि मी एखादा दुसरा दिवस गणपती बघायला स्कूटरीवरून जाऊन यायचो. बरेचदा लांबूनच बघितले जायचे.
विसर्जन मिरवणूक बघायला जाणे हे कर्तव्य असल्यासारखे वाटे. आई आणि बाबा दोघेही ऐन स पे मधेच वाढले. लक्ष्मी रोडपासून अगदी जवळ. त्यामुळे त्या दोघांच्याही दरवर्षी मिरवणुकीला जायच्या आठवणी होत्या. दुपारी मानाचे पहिले पाच बघायचे. घरी यायचे. संध्याकाळी लवकर जेवून मग रोषणाईचे गणपती बघायला जायचे. थोडावेळ बघून परत यायचे. मग झोप काढायची. तेव्हा काही फोन बिन नव्हतेच पण कुणीतरी चाळीत हाकारा घाले. ’मंडईचा गणपती कुंटे चौकात आला रेSSS '  की सगळी वानरसेना टक्कन जागी होऊन विजय टॉकिजच्या चौकात येऊन थांबत असे. मंडई, दगडूशेठ दोन्ही बघून घरी. आणि मग गुडुप्प. अशी आठवण आई नेहमी सांगत असे
माझ्या लहानपणीही आम्ही हेच करत असू. मात्र चाळकरी मित्रमंडळी नव्हती. दरवर्षी कोणीनाकोणी नातेवाइक पुण्यातल्या मिरवणुकीची मजा बघायला येतच असत. मग कॉलेजमधे गेल्यावर लक्ष्मी रोडच्या आसपास राहणार्‍या मित्रमंडळींची, नातेवाइकांची, मित्रांच्या नातेवाइकांची, नातेवाइकांच्या मित्रांची ओळख काढून ठिकाणा तिथे ठेवायचा आणि तिथून गणपती बघायला ये जा करायची असा प्लॅन असे.
एक वर्ष कॉलेजच्या रेडक्रॉसच्या स्टॉलवर पण बसले होते रात्रभर. सेफ वाटेल आणि जरा इंटरेस्टिंग म्युझिक असलेले मंडळ स्टॉलसमोर आले की आम्ही तिघी चौघी जणी त्यांच्या मिरवणुकीत घुसून नाचून घ्यायचो. ते पुढे सरकले की आम्ही परत स्टॉलवर.
एक अनंतचतुर्दशी फार पक्की लक्षात राह्यलेली आहे. सर्व ग्रुपपैकी मी आणि अजून एकदोन जण सोडले तर बाकी सगळ्यांनी गर्दीत जाणार नाही असा असहकार पुकारला होता. सिंहगड रोडला एका मित्राच्या घरी सगळा ग्रुप जमला होता.  त्यातच दोन मित्र मुंबईहून आलेले होते. त्या दोन मित्रांपैकी एकाशी माझी बोलाचाली बंद होती. भांडण नव्हते काही. या दोन मित्रांना पुण्याची मिरवणूक बघायचीच होती. मला जायचेच होते कारण मी पुढे भारताबाहेर शिकायला जाणार होते. तीन वर्ष गणपती अनुभवता येणार नव्हते. गणपतीची मिरवणूक अनुभवणे आणि बरोबर ज्याच्याशी बोलतच नाही तो मित्र. दुग्धशर्करा की काय तो योग. मग कधीतरी मध्यरात्री आम्ही ४-५ जण निघालो सिंहगड रोडहून चालत. पहाटेपर्यंत म्हणजे मंडई आणि दगडूशेठ जाईपर्यंत मिरवणूक अनुभवली. पण मी आणि मित्र एकमेकांशी बोललो नाही ते नाहीच. अगदी आम्ही बोलावे एकमेकांशी म्हणून बाकीचे मुद्दामून पुढे गेले आम्हाला मागे सोडून तरीही मी बोलले नाहीच. याचा फायदा झाला पुढे. तपश्चर्या फळाला आली. अखेर काही काळाने त्याच मित्राशी माझे लग्न झालेच. 
अमेरिकेतल्या तीन वर्षाच्या वास्तव्यात गणेशोत्सवात अक्षरश: तगमग व्हायची. शतकबदलाची वर्षे ती. इंटरनेट होते पण लाइव्ह स्ट्रीमिंग वगैरे गोष्टी रूळलेल्या नव्हत्या. गुगल, ऑर्कुट, फेसबुक वगैरेंचे तर अस्तित्वच नव्हते. कुणीतरी पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची टाकलेली एखादी क्लिप तीही अत्यंत लो रिझोल्युशन आणि प्रचंड बफरींग सकट यावर समाधान मानायचे. तरी त्यातला तो ढोलताशाचा आवाज आला की पाय थिरकणे वगैरे चालू व्हायचेच. ढोलताशाचा गजर ऐकून गळा दाटून वगैरे येणे तेव्हाच सुरू झाले. शिक्षण संपवून परत आले ती ऐन गणपतीतच. परत आल्याच्या दुसर्‍या दिवशी गर्दीतून माझ्या लाडक्या म-८० वरून रपेट मारून आले आणि घरी आल्यासारखे वाटले.
लग्नानंतर एक दोन वेळा मी आणि नवर्‍याने(तोच तो!) मिळून दुपारचे मानाचे पाच, संध्याकाळचे लायटींगचे काही आणि पहाटे मंडई, दगडूशेठ असे पाह्यले होते. मात्र तेव्हा हाकारे नाही. टिव्ही होता. चॅनेलवर सांगितले की मंडईचा गणपती गणपती चौकात की आमचा गणपती घरातून हाले.
ढोलताश्याच्या गजराच्या आवाजाशी, मिरवणुकीशी सगळे बाळपण जोडले गेलेले आहे. मग ते आवाज आले की घसा कोंडणे आलेच ओघाने.

Search This Blog