Tuesday, June 16, 2020

तिचा वेष त्याचा वेष

“त्या बिचाऱ्या दिपिकेला आपले कपडे कुलुपात ठेवावे लागत असतील नै? कधी रणवीर डल्ला मारेल काय सांगता येतंय काय? ” रणवीर सिंगचे नवीन फोटो आले की व्हॉटसॅपवर किमान पंचवीसवेळातरी हा डबडा विनोद येतो.
आपल्या मनाजोगी धडाडी न दाखवणाऱ्या पुरूषाला "बांगड्या भरा!" असा टोला मारणारे पैशाला पासरीभर असतात आणि त्यात काही चुकीचे आहे हे ही समजत नसते त्यांना. मुलीबायकांनी जीन्स घालणे यावर काही सांस्कृतिक गड्डे "आईचा पदर आणि जीन्स घातलेल्या मम्मीला पदर नसतो म्हणून मातृत्वाचा जिव्हाळा नसतो" वगैरे मंद टिप्पण्या करताना अजूनही दिसतात.
घागर्‍यामधे रणवीर
1 Ranveer wearing ghagra.jpeg

एकूणात काय जगात प्रत्येकाने चौकटीत ठरवून दिल्याप्रमाणेच स्त्री वा पुरूष व्हायचे असते आणि त्या कप्प्यातच बसायचे असते असे स्थितीवादी समाजाचे पक्के ठरलेले असते.

कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला मुलगी हे आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे. नीट विचार केला तर लक्षात येईल की हि लिंगनिश्चिती केवळ राहणी, घातलेले कपडे यांच्यावरूनच आहे. मानवजातीच्या प्रवासात खूप पूर्वी कधीतरी लिंगनिश्चिती आणि कपडे यांचा संबंध जोडला गेला आणि मग तो नियमही झाला. त्यामुळे इथे कपडे हे चक्क स्त्री वा पुरुष असण्याचे चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात.

हे कुठून सुरू होतं? जगातल्या बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये मूल चालायला लागेतो, त्याच्या आठवणी सुरू होईतो बाळ मुलगी आहे की मुलगा हे स्पष्ट करणारे कपडे शक्यतो वापरले जात नाहीत. तान्ह्या बाळांना सारखीच झबली टोपडी घातली जातात. मग बाळ मुलगा असो वा मुलगी. तान्हे बाळ हे बाळ असते. स्त्री वा पुरूष असण्याआधी माणसाचे बाळ असते. मानवजन्म आधी मग लिंगभाव हे जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृतींना मान्य होते असे म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडे झबल्याटोपड्याबरोबरच कुंच्या, वाळे, मनगट्या वगैरे बाळलेणी ही सर्वांना सारखीच घातली जातात. मूल चालूपळू लागले की मग मुलाचे वा मुलीचे कपडे दिले जातात. तिसरे वर्ष लागताना आपल्याकडे आत्याने भाचीला खण, बांगड्या घ्यायची पद्धत आहे. ही पद्धतही कदाचित तान्हेपणा संपला आणि नुसता मानवजन्म असण्याऐवजी त्याचे पुढचे कप्पे पडायला सुरू झाले हे सांगणारीच असावी. मग पुढे मुलीला गाठीची चोळी + बिनपदराची साडी, नंतर ती न्हातीधुती झाली की साडीला पदर हे सगळे टप्पे असत. मुलीला पदर आला हा वाक्प्रचार यातूनच आला.

प्रबोधनकाळादरम्यान युरोपात मुलग्यांना झगा वा झबलेसदृश कपडेच घातले जात. पाचसहा वर्षाच्या आसपास ते कपडे जाऊन ब्रीचेस म्हणजे गुडघ्यापर्यंतच्या पॅन्टस घातल्या जात. अमीरउमरावांच्या घरांमध्ये मुलाला पहिल्या ब्रीचेस देण्याचा सोहळा केला जाई. त्याला ब्रीचिंग असे म्हणतात.

ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे
2 ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे.jpg

ही झाली बरीच पुढची गोष्ट. कपड्यांच्या इतिहासाच्या मुळाशी गेले तर जगभरात मानवी संस्कृती सुरवातीची पावले टाकत होत्या तेव्हा वेशभूषेच्या उत्क्रांतीच्या त्या टप्प्यात कपड्यांमधून लिंगनिश्चिती हा उद्देश महत्वाचा नव्हता. प्राचीन ग्रीक काळात याची सुरूवात दिसते परंतू हे समाजाच्या काही घटकांपुरतेच अपेक्षित होते. रोमन कालखंडात कपड्यांचा व लिंगनिश्चितीचा परस्पर संबंध जास्त गडद झालेला दिसतो. रोमन वा ग्रीकांच्या आधी इजिप्त, बॅबिलोनियन, सुमेरियन वगैरे संस्कृती जिथे ग्रॅविटेशनल म्हणजे नेसायच्या कपड्यांवर भर असलेली वेशभूषा आहे तिथे कपड्यांचे लिंगाधारीत ध्रुवीकरण हे केवळ वरवरच्या सजावटीच्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. मात्र मूळ कपडे बरेचसे सारखेच आहेत.

आपल्याकडेही वैदीकपूर्व, वैदीक ते पार मौर्यन कालखंडाच्या सुरूवातीपर्यंत हेच दिसते. मौर्यन काळात स्त्रिया व पुरूष दोघांच्याही कपड्यांमधे अंतरीय, उत्तरीय आणि शिरोभूषण (उष्णीष) आहे. स्त्रियांनी छाती झाकणे हे ही नव्हते. पुढे गुप्त काळात कपड्यांचा हेतू लिंगनिश्चितीकडे जास्त झुकल्याचे लक्षात येते. शिरोभूषणे पुरूषांपुरतीच उरणे, स्त्रियांनी चोळ्या वा कंचुकीने छाती झाकणे, स्त्रियांनी शिरोभूषणांऐवजी विविध केशरचना करून त्या सजवणे असे काही महत्वाचे लिंगाधारित फरक दिसतात.

पुढे मुघलांच्या काळात आणि नंतर ब्रिटिश काळात बघितले तर पुरूषांचे कपडे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन झाले आणि स्त्रियांच्या मूळ असलेल्या कपड्यांमधे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन प्रभाव असलेले बदल झाले. फ्युजन व्हावे तसे. हे ही गमतीशीर आहे. त्यामुळे कपड्यांवरून माणूस वाचायचा तर पहिला मुद्दा लिंगनिश्चिती आणि मग सामाजिक दर्जा आणि इतर हेतू असे आपसूकच झाले.
यालाच समांतर कालखंडात मध्यपूर्व व युरोपियन संस्कृतींमधे मध्ययुगीन काळापासून पुढे कपड्यांमधे लिंगाधारीत फरक असणे आणि असे फरक अनिवार्य होत जाणे हे दिसते. भारतीय उपखंडात आणि पाश्चिमात्य जगातही पितृसत्ताक संस्कृती घट्ट होत जाणे, माणसाचे समाजातले स्थान व भूमिका हे त्याच्या स्त्री वा पुरूष असण्यावरून ठरणे हे ही या काळात पक्के होत गेलेले दिसते.

नागर संस्कृतीमधे स्त्रियांची भूमिका सांपत्तिक आणि सामाजिक स्थानानुसार वेगवेगळी पण घरकाम, मुले, घरगुती गोष्टी, शोभेची बाहुली, संपत्तीचे प्रदर्शन याच वर्तुळात फिरत राह्यली. अमीरउमरावांच्या घरातल्या शोभेच्या बाहुल्यांनी आपापल्या घराण्याच्या संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी ज्या ज्या वस्तू परिधान करणे अनिवार्य होत गेले त्या सगळ्या वस्तू घोळदार, परिधान करण्यात वेळखाऊ होत्या. ठराविक प्रकारे बसणे, उठणे, चालणे सोडल्यास बाकी काही हालचाली करणे त्यात निव्वळ अशक्य होते. प्रबोधनकाळापासून बघितल्यास भरभक्कम गाऊन्स, कॉर्सेटस, आतमधले पेटिकोटसचे थर या गोष्टींचा अधिकाधिक किचकट आणि जडपणाकडे होत गेलेला प्रवास याची साक्ष देईल.
रोमॅन्टिक कालखंडातील स्त्री वेष
रोमॅन्टिक कालखंडातील स्त्री वेश

स्त्रियांनी आपल्याला बंधनात टाकणार्‍या वेशभूषेत बदल करून पुरूषी किंवा सोपी वेशभूषा (जी पुरूषी दिसत असे अशी) करणे हे साधारण रोमॅन्टिक कालखंडात युरोपात घडायला सुरू झाले. १८४० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेतील तेव्हाच्या स्त्रीवादी चळवळीतील एलिझाबेथ स्मिथ मिलर, सुझन बी अँथनी, एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, मिसेस स्टोन आणि अमेलिया ब्लूमर एक वेगळ्या प्रकारचा वेष घालायला सुरूवात केली. हा वेष रोमॅन्टिक कालखंडातल्या स्त्रियांच्या कपड्यांपेक्षा सुटसुटीत होता. पाश्चिमात्य जगामधे अश्या आकृतीचे काही आधी स्त्रियांच्या वेशभूषेत आले नव्हते. ढगळी आणि पायाशी चुण्या असलेली तुम्मान आणि वरती गुडघ्यापर्यंत येणारा घोळदार गाऊन असे साधारण या वेषाचे स्वरूप होते. अमेलिया ब्लूमरने ती संपादन करत असलेल्या ‘द लिली’ या स्त्रियांच्या नियतकालिकामधे या वेषाबद्दल प्रशंसापूर्वक लिहिले. तेव्हापासून या वेषाला ब्लूमर कॉश्च्युम असे नाव मिळाले. चळवळीच्या बाहेर हा वेश फारसा प्रचलित झाला नाही. टिकेची झोडही अर्थातच बरीच उठली. चळवळीचे उद्दीष्ट झाकोळायला नको या कारणाने काही काळाने या सर्वांनीच इतर सर्व स्त्रियांप्रमाणेच वेश पत्करला. परंतू तुम्मानला पाश्चिमात्य वेशभूषेत ब्लूमर्स असे नाव मिळाले. कालांतराने या तुम्मानची उंची कमी होत ती अंतर्वस्त्रात जाऊन बसली. लहान मुलींच्या कापडी, फुग्याच्या चड्ड्यांना आता जगभरात ब्लूमर्स म्हणले जाते.
ब्लूमर कॉश्च्युम
Bloomer costume.jpg

यानंतर पहिल्या महायुद्धाने बरेच काही बदल घडवले. सैन्यात भरती होणे पुरूषांना अनिवार्य ठरल्यामुळे अनेक कार्यालयांमधे स्त्रिया काम करू लागल्या. अर्थातच याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या कपड्यांमधे पडले. स्त्रियांच्या कपड्यांच्या आकृतीमधे जास्त सरळ रेषांचा अंतर्भाव होओ लागला. एस आकारातले एडवर्डियन कपडे कालबाह्य होत गेले. स्त्रियांसाठी कार्यलयीन काम करताना वापरण्यायोग्य कोट बनू लागले. हे अर्थातच पुरूषांच्या कोटापेक्षा वेगळे होते पण पुरूषांच्या कोटांमधले अनेक फिचर्स अस्तित्वात होते.
१९१० मधील स्त्रियांचा ऑफिस लुक
5 office look 1910.jpg

पहिले महायुद्ध संपून सगळे स्थिर होईतो स्त्रियांच्या कपड्यांच्या बाह्याकृतीमधे सरळसोटपणा आला. अगदी लहान कापलेले केस आणि शरीराचे आकार सहजगत्या न दिसू देणारी बाह्याकृती याला बॉयिश लुक असे म्हणले जाई.
बॉयिश लुक
6 boyish look.jpg

यानंतर दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जेण्डर या गोष्टीचा विचारच वेगळ्या प्रकारे सुरू झाला युरोपात आणि त्यातून १९३० च्या दशकात मार्लिन डिट्रीचने या अभिनेत्रीने ट्राऊझर्स आपल्याश्या केल्या. या गोष्टींना स्टायलिश आणि फॆशनेबल स्थान दिले. याची चर्चा अर्थातच झाली. टिकेची झोड उठलीच. दिपिका रणवीरपासून आपले कपडे लपवून ठेवत असेल अश्या प्रकारचे विनोद तिच्यावरही झाले. फॅशन आणि लिंगभाव या विषयातल्या चर्चा आणि अभ्यासाला तिने जन्म दिला. टिकेची झोड उठल्यामुळे लगेचच संपून गेलेल्या ब्लूमर ड्रेस प्रमाणे हा नवीन प्रवाह मात्र अल्पायुषी ठरला नाही. स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारे पॅण्टस आपल्याश्या केल्या. मग ते लोण हळूहळू जगभर पसरले.
मार्लीन डीट्रिच
7 Marlene Dietrich.jpg

याला इतका काळ लोटलाय आणि पॅण्ट्स आणि जीन्स वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या इतकी झाली आहे की पूर्वी पुरूषांचे मानले गेलेले कपडे आता स्त्रियांच्या शरीराप्रमाणे वेगळ्या प्रकारे बेतले जातात. विमेन्स ट्राऊझर्स, विमेन्स शर्टस वगैरे. आता स्त्रियांनी पुरूषांचे कपडे घालायचे म्हणले तर एक्स्च्लुझिव असे फारसे उरलेले नाही.

युनिसेक्स म्हणजे कुठलेही जेण्डर न दर्शवणारे कपडेही मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. पण ते बहुतेक सगळे मुळातले पुरूषी या कप्प्यात असलेले कपडे आहेत. मेट्रोसेक्श्युअल पुरूषाने स्त्रियांचे म्हणावे असे कपडे क्वचित स्कार्फ आणि स्टोल वगळता आपलेसे केलेले नाहीत.

याच्यामागे लिंगाधारित प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचा हातभार मोठा आहे. जगभराच्या पितृसत्ताक संस्कृतींमधे पुरूषाला एका उच्चासनावर ठेवून मुळातून खूप कमकुवत आणि अहंकारी बनवून ठेवले आहे. स्त्रियांचे कपडे वापरणे याचा अर्थ आपल्या पुरूषत्वात कमतरता असा घेतला जाईल, स्त्रियांच्यासारखे कमी समजले जाईल की काय ही सुप्त भिती नक्की आहे. त्यामुळे रणवीर सिंग जेव्हा साडी, घागरा वगैरे कपडे घालून मिरवतो तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाला आणि पुरूषी अहंकारावर मात करण्याला आपसूकच दाद दिली जाते.
8 bangalore.jpg

परंतू स्त्रियांनी जश्या पॅण्ट्स आपल्याश्या केल्या तसे पुरूषांनी साड्या, स्कर्टस आपलेसे करणे घडेल याची शक्यता मात्र कमी दिसते. लिंगाधारित अहंकार वगैरे लोप पावेल असे धरले तरीही ही शक्यता कमी दिसते. हे विसरता येणार नाही की आजघडीला स्त्रियांचे कपडे म्हणून जे कपडे आहेत ते उदयाला आले तेव्हा समाजातले स्त्रियांचे स्थान, करायची कामे हे सगळे पक्के ठरलेले होते. माजघर ते शोभेची बाहुली हा परीघ होता. आणि त्यामुळे कपड्यांमधे वावरायची, बसाउठायची सोय, सुटसुटीतपणा कमी आणि नखरा जास्त हा प्रकार नक्कीच होता. आजच्या स्त्रियांच्या म्हणल्या गेलेल्या कपड्यांमधे या गोष्टी दिसतातच. त्यामुळे सोय, सुटसुटीतपणा या मुद्द्यावर पुरूषांनी हे कपडे आपलेसे करणे फारसे शक्य दिसत नाही.

पण इतका वेळ आपण स्त्री व पुरूष या दोनच जेण्डर्सविषयी बोललो. तृतीयपंथी, शरीर एका जेण्डरचे व मन दुसऱ्या जेण्डरचे, लिंगबदल केलेले, ठराविक जेण्डरच्या कप्प्यात स्वत:ला बसवू न इच्छिणारे वगैरे अनेक लोक जगतात आहेत. ही सगळी वेगवेगळी जेण्डर्स मानली जाईन त्या त्या जेण्डरप्रमाणे कपडे असा बदल पुढच्या काळात दिसेल की सगळेच कप्पे बरखास्त होऊन कपड्यांमधे जेण्डरचा संदर्भच राहणार नाही या दिशेने कपड्यांची कहाणी पुढे जाईल हे सांगणे आत्ता तरी अशक्य आहे. परंतू सगळ्यांना मानवी समानतेवर वागवता येणे हे मात्र महत्वाचे आहे आणि कपडे व त्याला लागून येणारे लिंगाधारित पूर्वग्रह टाकून देणे हे त्यादिशेने पहिले पाऊल ठरेल.

- नी
(पुन्हा स्त्री उवाच या डिजिटल अंकात ८ मार्च २०२० रोजी प्रकाशित)

Saturday, June 13, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - १२. अजून थोडी इतिहासाची पाने!

“कपड्यांची कथा! पण या सगळ्या कथेचा आपल्या आयुष्याशी कुठे संबंध येतो?” हुशार मकूने हुशार प्रश्न विचारला. ठकू समजावून सांगू लागली.

अंगावर ल्यायलेली प्रत्येक गोष्ट, कपाटातली प्रत्येक वस्तू या सगळ्या कथेचा एक भाग आहे. आपलं कपाट उघडून पहा. सत्राशेसाठ प्रकारचे कपडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कापडे, वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे. ठराविक ठिकाणी घालायचे ठराविक कपडे आहेत. ‘मेरावाला क्रीम’ पासून म्हणाल तितके रंग आणि छटा आहेत. आपण मध्यमवर्गीयच आहोत, काटकसरीही आहोत पण कपड्यांचं कपाट भरून वाहतंय.

काही पिढयांच्या मागे अगदी जुजबी कपडे असायचे. रोजचे दोनतीन, एखाददोन ठेवणीतले आणि ऐपतीप्रमाणे अजून एखादा दुसरा कपड्यांचा जोड ही परिस्थिती बहुतेक सर्वच मध्यमवर्गीय माणसांची. गरीबाच्या घरात गाठी आणि ठिगळं मारलेल्या किंवा जोड लावलेल्या साड्या. बारकी पोरं अर्धी उघडीच. एकूणात माणशी एका बोचक्याचा ऐवज.

जुनी माणसे कशी थोडक्यात समाधानी होती हे सांगायला ही प्रस्तावना नाही. तेव्हाची माणसे समाधानी नक्कीच नव्हती नाहीतर आज आपली कपाटं भरून वाह्णाली नसती.

Elias_Howe_sewing_machine.jpg
आहे त्या स्थितीत समाधानी न राहण्यातूनच मानवाने वेगवेगळे शोध लावले. शिवणाचे मशीन, विजेवर चालणारे माग, बटणे किंवा नाड्यांऐवजी झिप या गोष्टींचे शोध लागले आणि एका कपडा बनायचा वेग कैक पटींनी वाढला. कपड्यांची उपलब्धता वाढली आणि किंमती कमी झाल्या. सामान्यांच्या घरात कपड्यांची संख्या वाढली.

माहितीच्या देवाणघेवाणीची साधने विकसित होत गेली. हाताने प्रति काढून माहिती प्रसारित करण्यापासून सुरुवात होऊन तार, फोन, फॅक्स असे करत करत आता गाडी आंतरजालापर्यंत आली. दळणवळण घोडागाडी, सांडणीस्वार, मोठे जहाज, रेल्वे, बसेस, विमाने अश्या साधनांनी वेगवान होत गेले. इतर सर्व माहितीबरोबर कपड्यांच्या पद्धती आणि प्रत्यक्ष कपडे, दागिने वगैरेही जगभर पोचू लागले. वाढत्या वेगाबरोबर किंमती परवडतील अश्या मापात यायला लागल्या. माणसाला शरीर सजवायच्या वैविध्याची हौस होतीच. कपाटात दोन खण वाढवायची गरज पडलीच.

आणि मग आले कृत्रिम धागे. अमाप प्रमाणात कपड्यांचे उत्पादन यातून शक्य झाले. हे घडायच्या थोडेच आधी जगाने दोन महायुद्धे आणि त्यातून निर्माण झालेला अभाव सोसला होता. त्यामुळे या अमाप उत्पादनाचे प्रचंड जोरात स्वागत झाले. किंमती अश्या आल्या की अगदी जेमतेम उत्पन्न असलेल्या गटालाही हौसेमौजेचे चार वेगवेगळे कपडे असणे शक्य झाले. तर तुमचीआमची कपाटे भरून वाहण्याकडे वेगाने वाटचाल सुरू झाली.

आता आपल्या कपाटात हातमागाचे शुद्ध सुती कापड असलेले कुडते असतात, एखादी इरकल असते, एखादी पैठणी, एखादी बनारस, एखादी जोडाजोड साडी असते. ही कापडे आणि त्यांचे रंग भारतीय वस्त्रकलेच्या वारश्याचा एक धागा असतो. धिबिडगा वापराच्या जीन्स असतात ज्याच्या रंगाचे नाते काही पिढयांपूर्वीच्या आपल्याच निळीशी असते. पूर्वी स्त्रियांसाठीही पुरुषांच्यासाठीच्याच आकाराने बनणाऱ्या जीन्स व इतर ट्राऊझर्स आता स्त्रियांसाठी म्हणून वेगळ्या बनू लागलेल्या असतात. जीवशास्त्रीय लिंग, लिंगभाव आणि त्याप्रमाणे ठरणारे समाजातले स्थान यासंदर्भात घडत गेलेल्या बदलांचे प्रतिबिंब म्हणावे असा हा ट्राऊझर्सच्या आकारातला बदल म्हणता येऊ शकतो.

स्त्रिया घरगुती वा शेतीचे कष्ट किंवा शोभेची बाहुली एवढ्याच भूमिकांमधून बाहेर आल्या आहेत/ येत आहेत हे स्त्रियांच्या बाकी कपड्यांच्यातही दिसतेच. वावरासाठी सुटसुटीत अश्या कपड्यांना पसंती, पूर्ण जामानिमा करायला कमीतकमी वेळ लागेल असे कपडे, आभूषणे आणि केशरचना हे सर्व बदल स्त्रियांचे समाजातले बदलत चाललेले स्थान, भूमिका यांचेच प्रतिबिंब आहे.

केवळ बाह्य कपडेच नाहीत तर अंतर्वस्त्रांचा प्रवासही हेच दाखवतो. शरीराला विशिष्ट आकार यावा म्हणून ठराविक मापाच्या पिंजऱ्यात म्हणजे कॉर्सेटमध्ये शरीर बांधून ठेवण्यापासून ते जास्तीत शरीराच्या नैसर्गिक आकाराप्रमाणे, हालचालींना सुटसुटीत अशी अंतर्वस्त्रे हा खूप मोठा प्रवास आतल्या कपड्यांनी केला आहे. प्रत्येक बदलाच्या मागे सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत.
York_corset.jpg

जगभरात राजकीय आणि सामाजिक उलथापालथ कपड्यांच्या कथेला नाट्यमय वळण द्यायला कारणीभूत झालेली आहे. उदाहरणादाखल बघायचे तर युरोपात सामान्यांचे समजले जाणारे रंग आणि इतर वैशिष्ट्ये फ्रेंच राज्यक्रान्तीनंतर (१७९० चे दशक) अमीर उमरावांच्या कपड्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून बसली.

आपल्याकडचे उदाहरण बघायचे तर स्वदेशीच्या चळवळीतून प्रतिष्ठा पावलेले जाडेभरडे खादीचे कापड तत्व म्हणून अनेक एतद्देशीय श्रीमंतांनीही आपलेसे केले. स्वातंत्र्यानंतर आपली तत्वे सिद्ध करायला खादीच्या कपड्यांचा वापर सुरू झाला. या कपड्यांशिवाय शिवाय राजकारणात प्रवेश मिळत नसावा अशी शंका यावी इतके सगळे राजकीय नेते खादीमय असत, अजूनही असतात.

या सगळ्यामुळे खादीमध्येच भरपूर वैविध्य मिळायला लागले. मग खादीचे रंगीत कुडते हा चित्रकार, पत्रकार वगैरेंचा गणवेश होऊन गेला. तर स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींमुळे हातमागाच्या साड्या हा भारतीय विदुषींचा गणवेश झाला.

कृत्रिम धागे, ते रंगवायच्या पद्धती, कृत्रिम डाय यांच्यामुळे आधीपर्यंत न मिळालेल्या रंगांच्या छटा कपड्यांच्यात मिळू लागल्या. महायुद्धांनी बदललेले जगाचे संदर्भ आणि आधुनिक चित्रकलेचा उदय यांनी पाश्चिमात्य जगाची सौंदर्यदृष्टी बऱ्याच प्रमाणात बदलली. आजवर कपड्यांमध्ये न बघितलेले आकार १९५०-६० मध्ये कपड्यांमध्ये आले.

१९६०-७० च्या दशकात उदयाला आलेली हिप्पी विचारसरणी, त्यांचे संगीत आणि त्यांचा कपड्यांवर पडलेला प्रभाव हे सामाजिक तत्वज्ञान आणि कपडे यांची सांगड घातले गेलेले आधुनिक काळातले सगळ्यात मोठ्ठे उदाहरण म्हणता येईल. अमेरिकेत उदय झालेल्या या विचारसरणीच्या मुळाशी आशियाई तत्वज्ञान, युरोपातली सामान्यांची वा भटक्यांची जीवनशैली असे धागे होते. पूर्व युरोपातले विशिष्ट भरतकाम केलेले पारंपरिक शर्टस, भारतातले बांधणी पद्धतीने रंगवलेले कापड, सैलसर कुडते अश्या सगळ्या गोष्टी हिप्पी लोकांच्या कपड्यांच्यातही दिसून येतात.
new-hi_201812173435.jpg

गेल्या पंचवीसतीस वर्षात जगभरात वाढत चाललेल्या मूलतत्त्ववादी कट्टर विचारामुळे अनेकांना आपापल्या कळपाच्या (धर्म, पंथ, जात इत्यादी) खुणा अंगावर बाळगणे अनिवार्य वाटू लागले आहे. याची अनेक ढळढळीत उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघत असतोच.

आपल्या अंगावरच्या प्रत्येक वस्तूच्या मागे अशी एकेक कथा आहे. आपण रोज आपल्या अंगावर उद्याच्या इतिहासाचे एकेक पान लेऊन वावरत आहोत.

गेल्या वर्षभरात कपड्यांच्या इतिहासाची काही मोजकी पाने वाचकांसमोर मांडली. अजून गंमतीजंमतीची बरीच पाने आहेत. परंतु आता थांबायला हवे. माणसाच्या कातडीवरचे आवरण आणि त्याचा इतिहास हे मानवाच्या इतिहासातले अतिशय महत्वाचे प्रकरण आहे ही जाणीव करून देत या लेखमालेचा समारोप करत आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - डिसेंबर २०१८ मधे प्रकाशित)
अजून थोडी इतिहासाची पानं - २५ डिसेंबर 

Friday, June 12, 2020

प्रमोदबन - २

प्रमोदबनच्या घरात दार उघडल्या उघडल्या समोरच्या खिडकीला लागून कडाप्पा होता. म्हणजे भिंतीत बसवलेला ओटा होता ज्याचा वापर एखाद्या साइड टेबलसारखा होत असे. त्याच्या खाली भिंतीमध्ये चपला ठेवायचे शेल्फ होते. त्याचे नाव कडाप्पा कारण त्या ओट्याला वरती कडाप्पा घातलेला होता. तसा तो स्वैपाकघरातही ओट्याला आणि भांडी ठेवायच्या फडताळसदृश जागेला घातलेला होता. पण स्वैपाकघरात होते ते ओटा आणि शेल्फ. हा बाहेर होता त्याचेच नाव कडाप्पा. त्या कडाप्प्यावर बसून गोष्टीचं पुस्तक वाचणे हा मला अक्षरओळख झाली तेव्हापासूनचा आवडता उद्योग होता. 
पुढे जेव्हा फोन आला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा कडाप्प्यावर झाली. आई जशी मावशीशी भरपूर वेळ फोनवर बोले तसेच आपणही कडाप्प्यावर बसून फोनवर बोलत बसावे असे मला नेहमी वाटायचे. आम्ही पुरेशी वर्षे त्या घरात राह्यलो असतो तर घडलेही असते. फोननंतर टिव्ही आला आणि टिव्ही बघायची माझी जागा मी कडाप्प्यावर नक्की केली. 
आईने घर एक्के घर हा मंत्र टाकून दिला तेव्हापासून मग कडाप्प्याचा वापर निरोपानिरोपीसाठीही होऊ लागला. 'यायला उशीर होईल', 'भात लावायचा आहे', 'मी वरती लीनाकडे खेळायला गेले आहे', 'नीरजाला स्काऊटला सोडून मी शशीकडे जातो.' वगैरे निरोप आई, बाबा, मी, अधूनमधून असणारे आजी आणि बापू एकमेकांना लिहून ठेवत असू. दार उघडल्यावर समोर चपला काढताना समोरच निरोप दिसल्याने, "मी वाचलाच नाही." वगैरे बहाणे करताच येऊ नयेत म्हणून तो बाहेरच्या खोलीत, कडाप्प्यावर लिहिला जाई. ही आयडिया बहुतेकतरी आईची असावी.
बाहेरचे कुणी आले की बारक्या पोरांना घरात पिटाळणे हे जनरितीप्रमाणे आमच्याही घरात होते. मग ते बाहेरचे कितीही इंटरेस्टिंग का असेनात. मला वाटायचे आपण कडाप्प्याखाली लपलो तर आपल्याला पिटाळणार नाहीत आतमधे. पण मी पडले बिचारी एकटीच. माझ्याकडे दुर्लक्षच होत नसे कधी.

पिटाऴल्यानंतर मी जायचे ते कडाप्प्यानंतरच्या महत्वाच्या दुसऱ्या जागेत म्हणजे सर्कशीच्या पडद्यामागे. त्या काळच्या बिल्डींगींमधे भिंतीला काटकोनात दुसरी दोन अडीच फुट खोल भिंत घालून मग त्यावरती माळ्याची स्लॅब घालत असत. खाली जे तयार होई त्याला आजकालच्या भाषेत क्लॉजेट स्पेस म्हणता येईल. अशी एक जागा होती स्वैपाकघरात. तिथे खाली वर्षाचे धान्य भरलेले डबेडुबे ठेवलेले होते. अजूनही इतर अनेक गोष्टी होत्या. माझे शाळेचे दप्तर तिथे असायचे. ती जागा पडदा टाकून झाकलेली होती. माझ्या तेव्हाच्या वयाला अनुसरून विविध कार्टून प्राणी छापलेल्या कापडाचा तो लांबरूंद पडदा होता. तो सर्कशीचा पडदा. पिटाऴल्यानंतर मी त्या पडद्याआड जाऊन बसे कारण बाहेर हॉलमधे काय बोलतायत हे तिथे व्यवस्थित ऐकू यायचे. कधी कधी स्वैपाकघरातून पिटाळली गेल्यावरही मी नजरा चुकवून पडद्यामागे जाऊन बसायचे. मी लहान असल्याने आईवडील आपल्यापेक्षा कावळे असतात हे मला तेव्हा माहित नव्हते. मला कळू नये असे काहीही इंटरेस्टिंग बोलायचे असेल तर आलेल्या लोकांशी अचानक इंग्लिशमधे बोलले जाई. माझ्या कानावर पडण्यासारखे असे ते तद्दन कंटाळवाणेच असे.
या छापलेल्या सर्कशीच्या पडद्याआड मी बरेच उद्योग केलेत. सर्कशीचाच पडदा. असर तो होनेवाला था! लालूकाका - म्हणजे माझा धाकटा काका - त्याने मस्कतहून आणलेले एकदम मस्त खोडरबर आणि टोकयंत्र, त्याने आणलेल्या रंगीत पेन्सिली, कुणीतरी भेट म्हणून दिलेली गोष्टींची पुस्तके आणि असेच बरेच काही जे मला शाळेत नेऊन खराब करायचे नाही असे सांगितले जायचे त्यातल्या दप्तरात मावण्यासारख्या त्या सगळ्या गोष्टी मी दप्तरात भरून शाळेत नेऊन मिरवायचे. हा उद्योग सर्कशीच्या पडद्याआडच केला जायचा. गोष्टीचे पुस्तक कपड्यात लपवून 'ध्यानमंदीरात' जाणे या उद्योगातही हा पडदा महत्वपूर्ण कामगिरी निभावायाचा. अर्थात यातले सगळे पकडले जायचे. मग 'प्रेमळ' भाषेत माझे समुपदेशन व्हायचे. त्या समुपदेशनानंतर, देवापुढे उभे राहून 'मी चुकले' असं म्हणायची खडतर शिक्षा व्हायची. त्यानंतर डोळे गाळायला मग सर्कशीचा पडदाच असायचा. तिथली ऊब आणि अंधुक उजेड मला बरे वाटायला लावायचा.

खिडकीपाशी कडाप्प्यावर बसून पुस्तके वाचणारी मी हे स्वप्न कधीतरी पुरे करायचे आहेच. त्यासाठी आणि एकूणच जगण्याची धडपड करताना मधे मधे हातपाय आत वळवून जगाशी संपर्क बंद करून, स्वत:च्या आत उतरत, स्वत:ला सावरत, स्वत:ला बरे करत थोडे थांबायचे असते तेव्हा मनातल्या मनात तो सर्कशीचा पडदा मी आजही गुंडाळून घेते.
- नी

Wednesday, June 10, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - ११. शब्देविण संवादु

“बाह्य सौंदर्याला अर्थ नाही. मनाचे सौंदर्य महत्वाचे.” सोशल मिडियावर एका ढुढ्ढाचार्यांनी ठामपणे आपले मत मांडले. मग कातडी आणि त्यावरच्या आवरणाकडे लक्ष देणाऱ्या बायकामुलींच्या गाभ्यात कांदेबटाटे आणि दुष्टपणा ठासून भरलेला असतो तो कसा हे सांगणाऱ्या प्रतिक्रियांचा त्या मतावर पाऊस पडू लागला.

यात चुकीचे काही नाही. आपल्याला हेच शिकवलेले असते पहिल्यापासून. प्रत्यक्षात मात्र आपण उलट वागत असतो. कातडी आणि आवरणावरूनच व्यक्तीचे मोजमाप करत असतो.

जीन्स घातलेली मुलगी म्हणजे स्वैपाक करता येत नसणार. लिपस्टिक लावली की बायकांचा मनमिळावूपणा गायब होतो. व्यवस्थित मेकअप केला असेल तर ललना माठ असणार. मंगळसूत्र घातलं की संस्कारच संस्कार. मिनी स्कर्ट किंवा शॉर्ट ड्रेस असेल तर बया छचोर. हे आणि असे हजारो आडाखे. यात गाव, शहर, वर्तुळ याप्रमाणे थोडे इकडेतिकडे इतकंच. पण आडाखे असतातच. खरंतर नुसते आडाखे नाहीत तर हे त्यांच्यासाठी अगदी काळ्या दगडावरच्या रेघेसारखं ठाम वैश्विक सत्य असतं.

हे आडाखे खरे ठरवणारी जेवढी उदाहरणे तेवढीच खोटी ठरवणारीही उदाहरणे असतातच. तरीही आवरण काहीच सांगत नाही हेही खरे नव्हे. आवरण आणि गाभा यांचं नातं इतकं वरवरचं, इतकं एकास एक प्रकारचं नसतं.

माणसाची राहणी हा पूर्ण व्यक्तिमत्वाचा आरसा असतो,एखाददुसऱ्या वैशिष्ट्याचा नाही. हे माणसाचे व्यक्तिमत्व जनुकीय मांडणीबरोबरच जन्मापासून असलेली परिस्थिती, घटना, बदल, स्वभाव, आजूबाजूचे वातावरण आणि माणसे या आणि अश्या हजारो लहानमोठ्या गोष्टींचे बनलेले असते, बदलत असते. या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब माणसाच्या कपडे-दागिने-चपला-त्वचा-केस या सर्व गोष्टींबद्दलच्या निर्णयामध्ये पडते.

यामुळेच एकाच वर्गात असलेली मुले गणवेश नसेल तर वेगवेगळी दिसतात. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांच्या राहणीमध्ये प्रत्येकीचा आपापला बाज असतो. एकाच घरात राहणारी एक पिढी कपड्याचोपड्यांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते.

अंगावरचे कपडे, राहणी आणि त्यावरून बांधलेले आडाखे यांचा संबंध नाही असेही नाही आणि ही चोख वस्तुस्थितीही म्हणता येणार नाही. हे आडाखे म्हणजे शक्यता असतात. माणूस पहिल्यांदा समोर आला की त्याला वा तिला जोखण्यासाठी गृहीत धरलेल्या शक्यता.

मात्र इतिहासात डोकावून बघितले तर या कपडे वाचण्याच्या आणि समजण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध गमतीजमती बघायला मिळतील.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माणसाचे लिंग. राहणी व घातलेल्या कपड्यांवरून व्यक्ती स्त्री आहे वा पुरुष आहे हे कळते. कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला मुलगी हे आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे. पण नीट विचार केला तर लक्षात येईल की हि लिंगनिश्चिती केवळ राहणी, घातलेले कपडे यांच्यावरूनच आहे. लिंगनिश्चिती आणि कपडे यांचा संबंध जोडला गेला आणि मग तो नियमही झाला. त्यामुळे इथे कपडे हे चक्क स्त्री वा पुरुष असण्याचे चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात.
452px-Vintage_photo_of_an_Indian_Grandfather_and_two_young_kids.jpg

School_going_Indian_boys_in_the_1910s.jpg
दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वय. जगातल्या बहुतेक संस्कृतींमध्ये मूल चालायला लागेतो, त्याच्या आठवणी सुरू होईतो बाळ मुलगी आहे की मुलगा हे स्पष्ट करणारे कपडे क्वचित वापरले जातात. झबली, टोपडी, कुंच्या तसेच वाळे, मनगट्या वगैरे बाळलेणी ही दोघांनाही सारखीच घातली जातात. मानवजन्म आधी मग लिंगभाव हे अधोरेखित करणारी ही पद्धत आता मुलग्यांसाठी निळा रंग आणि मुलींसाठी गुलाबी रंग असल्या अमेरिकन पद्धतीने पुसून काढली जातेय. प्रबोधनकाळादरम्यान युरोपात मुलगे पाचसहा वर्षांचे झाले की त्यांना झगा वा झबलंसदृश कपडे जाऊन ब्रीचेस म्हणजे गुडघ्यापर्यंतच्या पॅन्टस घातल्या जात. अमीरउमरावांच्या घरांमध्ये मुलाला पहिल्या ब्रीचेस देण्याचा सोहळा केला जाई. त्याला ब्रीचिंग असे म्हणत.

जगभरात लहान मुले वयात आल्यानंतर कपड्यांची पद्धत, प्रकार बदलला जातो. त्याचे विविध जागी आणि विविध काळात तपशील वेगवेगळे आहेत पण हे होते नक्की. आपल्याकडे पूर्वी मुलींची साडी नेसण्याची सुरुवात व्हायची. मुलीला पदर येणे म्हणजे मुलगी मोठी होणे हा वाकप्रचारही याच बदलाशी निगडित आहे. लहान मुलगी ते षोडशा या रूपांतरामध्ये वयाबरोबर स्कर्टची लांबी वाढत जाणे हे ही युरोपियन व अमेरिकन इतिहासात दिसून येते. अगदी हल्लीहल्ली पर्यंत आपल्याकडेही वयात येताना हाफपँट ते फुलपँट असा मुलांचा प्रवास होत होता. मुलींचा स्कर्ट ते पंजाबी ड्रेस असा प्रवास होत होता.

यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे समाजातले स्थान दर्शवणे. समाजातल्या उतरंडीवरचे स्थान हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. व्यवसाय, व्यावसायिक स्थान, घराणे, जात, वैवाहिक स्थिती, आर्थिक स्थिती या सगळ्या गोष्टी माणसाचे समाजातले स्थान ठरवतात. जगभर वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात या सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे कपड्यांमधून दाखवल्या गेलेल्या आहेत. अमुक जातीच्या पगड्या आणि स्त्रियांची साडी नेसण्याची पद्धत, एखाद्या पदाची वस्त्रे वा गणवेश, स्त्रियांच्या गळ्यातले मंगळसूत्र, स्त्रियांचे लाल आलवण, ब्राह्मणांचे जानवे, भिकबाळीचा मान, किनखापाची वस्त्रे, सम्राज्ञीच्याच पायात असणारे सोन्याचे पैंजण ही काही भारतीय उदाहरणे. प्राचीन रोमन काळात टोगा या वस्त्राचा मान असलेले महत्वाचे पुरुष, ठराविक प्रकारचे रेशीम वापरण्याची परवानगी असलेले चौदाव्या शतकातले इंग्लंडमधले अमीरउमराव, या संदर्भातले चौदाव्या शतकातले इंग्लंडमधले नियम, ठराविक प्रकारची नक्षी असलेले कपडे वापरायची परवानगी असलेले आफ्रिकेतील एका जमातीचे राजे इत्यादी काही देशोदेशीची उदाहरणे.

लिंग, वय, सामाजिक स्थान याला धरून येणारे राहणीचे नियम, बदलाचे सोहळे, फरक हे सगळे बदलत बदलत आता इतिहासजमा झालेले आहे. जीवशास्त्रीय लिंगाचे चिन्ह म्हणून येणारे कपडे हे प्रकरण कालबाह्य होण्याकडे मुंगीच्या गतीने वाटचाल सुरू झालेली आहे. समाजातले त्या त्या लिंगाच्या व्यक्तींचे काम किंवा सामाजिक अस्तित्व यात होत गेलेले बदल याला कारणीभूत आहेत. लहान मुले आणि तरुण मंडळी यांच्या कपड्यांच्यातले फरक आता तितके स्पष्टपणे दिसत नाहीत. लहान मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून गणले जाणे आणि लहान मुलांचे बाल्य गायब होणे या दोन्ही गोष्टींची हि नांदी आहे. ठराविक व्यावसायिक गणवेश सोडले तर सामाजिक स्थानाप्रमाणे कपडे घालण्याचे कायदे निघून गेलेले आहेत. हे समानतेकडे एक पाऊल म्हणून बघता येऊ शकते.

माणसाने कापड, रंग यांच्या साहाय्याने शरीर झाकायला आणि सजवायला सुरू केले तेव्हापासून कातडीवरचे आवरण हे त्या माणसाबद्दल बरंच काही सांगणारी दृश्यभाषा आहे. आणि ती वाचायला शिकणं ही मजेची गोष्ट आहे.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - नोव्हेंबर २०१८ मधे प्रकाशित)
शब्देविण संवादु! - २७ नोव्हेंबर

Sunday, June 7, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - १०. साधेपणाच्या नोंदी

“ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाह्यलीस का तिची? कॉटन बिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाईन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात? ”  ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रीणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूज काकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता. मस्तपैकी हातमागावरची साधी कॉटन साडी नेसल्या होत्या. ठकूच्या मैत्रिणीची साडी चारशे रुपयांची आणि कुजबूज काकूंची साधी साडी हातमागाची म्हणजे हजार दीडहजाराच्या घरातली तरी असावीच. ठकूने हसून खांदे उडवले. 

सुती कपडे, सुती साड्या, साडी व इतर भारतीय कपडे, मळखाऊ रंग, छोटे दागिने, कोल्हापुरी चपला या सगळ्या वस्तू साधेपणाचे मानक समजल्या जातात.  

तसेच आजच्या ताज्या ताज्या फॅशनला धरून राहणी नसणे, कपडे अंगभर असणे,  चारचौघांच्यात मिसळून जाणारी राहणी, नजरेत न खुपणारे किंवा वेगळे उठून न दिसणारे असे रंग आणि आकार, शरीराचे आकार उकार अधोरेखित न करणारे, जाम्यानिम्यावर फारसा खर्च न करणे, कष्ट न करणे किंवा केलेच तर केलेला खर्च आणि कष्ट कळू न देणारे कपडे व इतर वस्तू, पटकन आवरून होईल असा वेष आणि केस, मेकअप नाही किंवा असेल तर दिसत नाही  अश्या सगळ्या गोष्टींना साधेपणाचा शिक्का आहे. पैसे आणि वेळेत काटकसर ज्या जामानिम्यात होते ते साधे असा याचा अर्थ. 

पण कार्यकर्त्या बाईचा असो वा घरगुती बाईचा साधेपणा हा हातमागाच्या सुती साडीतच असतो वगैरे गणिते नाटकासिनेमांचे कपडे ठरवताना ठकूला सततच ऐकायला लागतात. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या साधेपणाचे ठराविक गणवेश याची कोष्टकं आपल्याकडे पक्की आहेत. 

कशी ठरली असतील ही कोष्टकं? काहीच दशकांपूर्वीपर्यंत हातमाग आणि यंत्रमाग दोन्हींवर तयार होणारे कापड हे सुती, रेशमी किंवा लोकरीचे असे. रेशीम वा लोकर या दोन्हीचे नैसर्गिक उत्पादन कापसापेक्षा कमी. तेही ठराविक प्रदेशांपुरतेच. त्यातून मिळणारे कापड अजूनच कमी. त्यामुळे अर्थातच रेशमी दुर्मिळ आणि म्हणून महागडे प्रकरण. लोकर रेशमापेक्षा सहज मिळणारी पण सगळ्या ऋतूंमध्ये चालण्यासारखी नाही. तस्मात तीही ठेवणीपुरतीच. त्यामुळे सामान्य माणसांसाठी रोजच्या वापरात सुती कपडेच असत. लग्नाकार्यापुरते, पुजेबिजेपुरते एखाद दुसरे ठेवणीतले रेशमी वस्त्र असे. क्वचित इतर कार्यक्रमांसाठी जायला लागलेच तर एखाददुसरी जरा चांगल्यातली सुती आणि जरीच्या चार रेघा असलेली साडी असे. काठाच्या खणाच्या चारदोन चोळ्या त्यातली एखादी जरीची. असलेल्या साड्यांवर त्याच आलटून पालटून घातल्या जात. चोळ्या जाऊन ब्लाऊजेस आली तरी प्रकार तोच. 

कापडांसाठीचा नैसर्गिक कच्चा माल अगदी कापूस म्हणले तरी एका मर्यादेबाहेर उपलब्ध होत नाहीच. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांकडे असलेली कपड्यांची संख्याही मर्यादित असे. सुती कपडे म्हणजे साधेपणा हे प्रकरण तेव्हापासूनचे. यात नंतर खादीचा काळ आला. मग काय  रंगवलेले काठ, जरीकाडी अजिबात नाही अशी जाडीभरडी साडी ही साधेपणाची परिसीमाच झाली. 

या वातावरणात नायलॉन, पॉलिएस्टर वगैरेंनी प्रवेश केला. वेगळे कापड आणि त्यात रंग, छपाई इत्यादींमध्ये नाविन्य, दिसायला रेशमी पण रेशमाची किंमत नाही अश्या विविध चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेली साडी ही भलतीच फॅशनेबल मानली जाऊ लागली आणि सुती किंवा खादी साड्यांना साधेपणाबरोबर जुनाटपणाचा, पोक्तपणाचा शिक्का मिळाला.     

कुठलीही नवी फॅशन समाजाच्या वरच्या समजल्या जाणाऱ्या, आर्थिक रित्या बलाढ्य असलेल्या वर्गात लोकप्रिय होते आणि मग ‘महाजनो येन गत:’ प्रमाणे इतर लोक अनुकरण करू लागतात. त्यामुळे अर्थातच जुन्या झालेल्या फॅशन्स वापरणारे लोक हे समाजाच्या खालच्या पायरीवर समजले जातात. ज्यांना नवीन फॅशन परवडत नाही असे ते साधे लोक  असे मानले जाते. 

सिंथेटिकचे नाविन्य ओसरले, कुठल्याही मिश्रणाविना, प्रक्रियेविना शुद्ध सुती कापड ही परीकथा होउन बसली,  हातमागावरचे कपडे जवळपास दुर्मिळ झाले पण तरी कॉटनची साडी म्हणजे साधी आणि पोक्त या संकल्पनेने आपली जागा अजून पूर्णपणे सोडलेली नाही.  कार्यकर्तीचा अपेक्षित गणवेश अजून तरी बदलला नाहीये. 

कार्यकर्ती गणवेशातली हातमागाची कॉटनची साडी स्वस्त नसते. तिचे शंभर चोचले असतात. रंग सांभाळण्यासाठी ड्रायक्लीनच करा नाहीतर धुवायची तर वेगळी धुवा, हाताने घुळुघुळु गोंजारतच धुवा आणि सावलीतच सुकवा. मग स्टार्च करा. आणि हे एवढं सगळं फक्त एका दिवसाच्या वापरापुरते. परत वापरायची तर सगळा लूप परत. अशी चार वेळा धुवा मग रंगांचं भूत होणं ठरलेलंच. तर एकीकडे सिंथेटिक साडी स्वस्त, धुवायला सोपी, वाळते पटकन, इस्त्री बिस्त्री लागत नाही  आणि साधारणतः कशीही धुतली तरी कल्पांतापर्यंत रंगाला, कापडाला ढिम्म काही होत नाही. सिंथेटिक साडी सगळ्या दृष्टीने हातमाग कॉटनच्या साडीपेक्षा सोपी पडते. 

ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रिणीचे म्हणणे हेच आहे. तिच्यासाठी हाच सोपेपणा म्हणजे साधेपणा आहे. अजून दुसरं म्हणजे स्वस्त, सोपी, टिकाऊ आणि तरीही रंगीत अशी सिंथेटिक साडी आज घडीला ग्रामीण भागात तरी साडी नेसणाऱ्या प्रत्येकीने आपलीशी केली आहे. अश्या भागात सामाजिक काम करताना हातमागाची कॉटन साडी नेसून आलेल्या बाईपेक्षा त्यांच्यासारखीच साडी नेसणारी बाई बायकांना जवळची वाटते. आपल्यासारखीच साधी आहे ही हिला कळेल माझं काय म्हणणं आहे ते हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होतो. त्यांच्यापर्यंत पोचताना हा नसलेला फरक तिचे बरेच काम करून देतो. तिच्या परिघात हाच साधेपणा आहे. आणि अशी साधी राहणी ही तिच्या कामाची गरज आहे. 

साधी राहणी या गोष्टीचे आयाम ज्याच्या त्याच्या आर्थिक, सामाजिक परिस्थिती, वय, व्यवसाय, प्रदेश याला धरून बदलत असतात.  पण साधेपणाचा आग्रह असतोच. साधेपणाच का? कारण आपल्या देशाला साधेपणाचे किंवा साधेपणा या शब्दाचे विचित्र आकर्षण आहे. दिसणे, राहणी, कपडे आणि माणसाच्या गाभ्याचा काही संबंध नाही हे संतपरंपरेनेही सतत सांगितलं आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी हा सुविचार पिढ्यानपिढ्या आपल्या डोक्यात घट्ट ठोकून बसवलेला आहे. आणि याचे बरोब्बर चुकीचे अर्थ आपण घेतलेले आहेत. 

साधे राह्यले की उच्च विचारसरणी आपोआप येतेच अंगात अशी आपली खात्री आहे. जसे चारचौघात शांत बसणारा माणूस खूप विचारी, ज्ञानी वगैरे समजला जातो तसा साधे राहणारा माणूस विश्वासार्ह असतो. साधे राहणाऱ्या माणसाला विषयाचं गांभिर्य कळतं. अशी बरीच समीकरणं आपल्याकडे आहेत.  आणि त्यामुळेच आपल्याकडे साधेपणाचा दंभ आहे. दंभ आला की प्रदर्शन आले. ‘आम्ही किती साधे आहोत!’ हे जाहीर करत राहायची गरजही आली. साधेपणाचे हे असे अतोनात कौतुक आहे. 

खरंतर वेगवेगळ्या प्रकारे शरीर सजवणे ही मानवाची मूळ प्रवृत्ती आहे. वेगळ्या, नवीन वस्तू लेवून बघायला सगळ्यांनाच आवडते शक्यतो. पण ते शक्य असतेच असे नाही. सामाजिक चौकटी ते खिश्याची कुवत अशी अनेक कारणे असू शकतात. अश्या वेळेला साधेपणा उपयोगाला येतो. बहुतेकदा साधेपणा हे अभावग्रस्ततेवर घातलेले पांघरूण असते. क्वचित एखाद्या तत्वासाठी ठरवून गरजा कमी केल्यावर आलेला साधेपणा असतो. आणि खूप वेळेला साधेपणाचे प्रदर्शन असते. 

या साधेपणाच्या प्रदर्शनात राहणी आधी विचार नंतर असा घोळ झालेला असल्याने साधेपणा ही राखायची गोष्ट होते. साधेपणा राखणे काही सोप्पे काम नव्हे. त्यासाठी मग साधेपणाच्या गणवेशाच्या कोष्टकांची गरज भासतेच. डोळ्यात भरणार नाहीत असे पण तरी अगदीच टुकार दिसणार नाहीत असे रंग, पोत आणि कपड्यांचे आकार शोधायचे. साधेपणाला मॅचिंग असे तितकेच साधे दागिने वा इतर गोष्टी शोधायच्या. बर साधेपणा हवा असल्याने ते मॅचिंग केल्याचे कळताही कामा नये. म्हणजे कष्ट वाढले अजून. या सगळ्यात त्या उच्च विचारसरणीचं अंमळ राहूनच  जातं आणि आपल्या साधेपणाच्या व्याख्येबाहेरचा जामानिमा दिसले की नाकं मुरडायला सुरुवात होते. मग ही तथाकथित साधी माणसे बायकांनी लावलेल्या लिप्स्टीक्स, बायकांचे पार्लरमध्ये जाणे वगैरे गोष्टींवर कुत्सितपणाच्या फोडणीसकट भरपूर विनोद करू लागतात.  

पण राहणीतला आपसूक साधेपणा, नाईलाजाचा साधेपणा आणि दाखवायचा साधेपणा वेगवेगळा जाणवतोच. यानेच माणसाच्या कातडीवरचे आवरण आणि त्याचा गाभा यांचे एकमेकांशी असलेले नाते अधोरेखित होते.  या नात्याबद्दल पुढच्या वेळेला तपशिलात चर्चा करूया. 

आता दिवाळी तोंडावर आलीये. साधेपणाला ठेवा बाजूला. सणाचा आनंद गाभ्यापासून आवरणापर्यंत फुलूदेत.  मस्त हसा आणि मस्त दिसा. शुभ दीपावली. 

- नी 
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - ऑक्टोबर २०१८ मधे प्रकाशित)
 साधेपणाच्या नोंदी ३० क्टोबर 

कापडाचोपडाच्या गोष्टी - ९. कुत्यूरोद्योग

“ पूर्वी दरबारात राजगायक वगैरे असायचे तसे राज-फॅशन डिझायनर्सही असतील ना गं ठकू? म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या एलिझाबेथ राणीच्या दरबारात किंवा आपल्याकडे म्हणायचं तर पेशव्यांच्या दरबारात?” मकूचा प्रश्न गमतीशीर होता. ‘नक्की कुठून उत्तर सुरू करायचे?’ ठकू विचारात पडली.

पूर्वी कसं व्हायचं, ‘मोठ्या वाड्यातल्या धाकल्या बाईसाहेबांचा शालू पाह्यला ना पर्वा लग्नात. मला तस्साच हवाय.’ असं सरदारीणबाईंच्या तोंडून यायचा अवकाश, त्यांची खास दासी आपल्या दासीजगतामधल्या ओळखीपाळखी वापरून मोठ्या वाड्यात नवीन आलेला शालू बनारसच्या कुठल्या मागावरून आला याचा पक्का शोध घ्याय्ची. आणि सरदारीणबाईंच्या पेटीत अजून एका शालूची भर पडायची.

युरोपातही हेच घडायचं. अमिरउमरावांच्या पदरी उत्तम प्रकारचे शिंपीकाम, भरतकाम करणारे लोक असायचे. आवडलेल्या नवीन पद्धतीचे शिवणकाम, भरतकाम स्वत:कडेही असावे ही इच्छा तोंडातून निघाली की असेच खास दासी माहिती काढायची आणि हवे ते काम करवून घ्यायची.

थोड्याफार फरकाने हे असंच घडत शरीर सजावण्याच्या इतिहासाची कथा पुढे जात राहते. पण कपडे, कापडे, विणकाम, भरतकाम, दागिने घडवण्याची कला या आणि अश्या अनेक गोष्टींचा मिळून एक उद्योग, एक जग आहे. त्याच्या मुळाशी जाऊन बघितलं तर मकूच्या प्रश्नाचं उत्तर मिळायची शक्यता.

युरोपियन प्रबोधनकाळाच्या अखेरीस बराच काळ युरोपचे राजकीय व आर्थिक सत्ताकेंद्र स्पेन होते. चौदावा लुई जेव्हा फ्रान्सच्या गादीवर आला तेव्हा कपड्यांच्या फॅशनमध्ये स्पेन अग्रेसर होते, तर उंची कापडे, महागड्या वस्तू हे युरोपात वेगवेगळ्या ठिकाणाहून फ्रान्समध्ये आणले जात होते. स्पॅनिश फॅशनवर त्यांच्या कॅथॉलिक धर्माचा पगडा असल्याने त्यात गंभीर आणि सभ्य म्हणले जातील अश्या रंगांचा वापर, लक्षात येईल अश्या मोठ्या बदलाला अनुकूल नसणे, दाखवेगिरी नसणे, विविध वस्तू वापरण्याच्या बाबतीत परवानग्या किंवा बंदी या सगळ्या गोष्टी होत्या.

चौदाव्या लुईने फॅशनचे हे रूप मोडून काढले. युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्या द्वारे नियंत्रण ठेवण्याची त्याची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ व शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचे केंद्र फ्रान्स असले पाहिजे, या गोष्टी जगाने फ्रेंचांकडून शिकल्या पाहिजेत आणि फ्रेंचांकडूनच घेतल्याही पाहिजेत अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडे, कपडे, आभूषणे आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्याने घडवून आणले.
Louis_XIV_Rigaud_Condé_Chantilly.jpg

व्हर्साय येथे त्याने बांधलेल्या खास गढीमध्ये पार्ट्या आणि मेजवान्या झडत. तिथे फॅशन, संगीत, चित्रशिल्पकला, नृत्य व नाट्यकला, पाककला यातल्या उच्च दर्जाच्या कलाकृती अनुभवायला मिळत. तिथे प्रवेश मिळण्यासाठी तुमच्या कपड्यांचा, आभूषणांचा दर्जा फारच वरचा असणे अपेक्षित असे. या ‘वरच्या’ दर्जाचे काही अलिखित नियम होते. ज्या नियमांमध्ये अतिशय महागड्या आणि दुर्मिळ वस्तूंचा समावेश होता. या वस्तू फ्रान्समध्येच बनलेल्या असत. तिथे प्रवेश मिळणे हे मानाचे आणि राजाची मर्जी संपादन करण्यासाठी गरजेचे असल्याने या विलासी वस्तू ही जरुरीची गोष्ट बनली.
Engraving_of_a_1682_ball_given_by_Louis_XIV_of_France_(Almanach_royal).jpg
या वस्तूंची लाट पसरत गेली. चौदाव्या लुईने याच काळात युरोपभर युद्धेही केली. एरवी युद्धामुळे देशाची आर्थिक घडी विस्कळीत होते पण फ्रान्समध्ये बनणाऱ्या उच्च अभिरुचीच्या, चैनीच्या वस्तूंच्या विक्रीने फ्रान्सचा खजिना भरतच राह्यला.

या कालखंडाला बरोक कालखंड म्हणले जाते. भडक, उंची फॅशन, खूप जास्त सजावट या सगळ्यासाठी हा कालखंड ओळखला जातो. याच कालखंडात उंची आणि दर्जेदार काम असलेल्या कपड्यांसाठी ओत म्हणजे उच्च आणि कुत्यूर म्हणजे सुबक कारागिरी हे मिळून ओत कुत्यूर ही खास संज्ञा रूढ झाली. याचबरोबर या कालखंडात बदल, नाविन्य या गोष्टी अतिशय महत्वाच्या बनल्या. ऋतूप्रमाणे बदलणारी फॅशन ही संकल्पना याच काळात आली. त्या त्या ऋतूला योग्य अशी कापडे आणि वेश यांचे काही नियम बनले. त्या त्या ऋतूप्रमाणेच कापडांचा वापर व्हायला हवा हे बंधनकारक झाले. समाजातले स्थान टिकवायचे असेल तर ही सगळी चैन नसून गरज आहे असा सगळा माहौल होता तो अजून गडद झाला.
Barockkostüme_(Brockhaus).jpg

साहजिकच फॅशनप्रमाणे राहणी ठेवायची तर फॅशनची माहिती सगळीकडे पोचणे गरजेचे झाले. मग लाकडावर चित्र कोरून आणि रंगवून बनवलेल्या फॅशन प्लेटस अस्तित्वात आल्या. त्या बघून त्याबरहुकूम कपडे बनवून घेणे हा पायंडा पडला. फ्रान्समध्ये बनणाऱ्या चैनीच्या वस्तूंचा प्रचार व्हावा म्हणून चौदाव्या लुईने या फॅशन प्लेटसना आर्थिक पाठबळ दिले होते. नवीन फॅशन दाखवणारे चित्र इतकेच या प्लेटसचे स्वरूप नव्हते. प्रत्येक चित्राला एक शीर्षक असे, एखादी ओळ लिहिलेली असे. हा मजकूर गमतीशीर, आकर्षक तर असेच आणि अनेकदा त्यात लैंगिकतेचा सूचक उल्लेख असे जेणेकरून या फॅशनचा मोह पडावा. याच बरोबरीने छोट्या लाकडी बाहुल्यांचाही वापर फॅशनचा प्रसार व्हावा म्हणून केला गेला. सर्व बारकाव्यानिशी शिवलेली ड्रेसची छोटी प्रतिकृती या बाहुल्यांवर चढवून त्या बाहुल्या पाठवल्या जाऊ लागल्या.

यांच्यानंतर साधारण शतकाभराने सोळाव्या लुईच्या बायकोने मारी आंत्वानेतने - तीच ‘भाकरी नाहीतर केक खा’ फेम - तिने या वातावरणात अजून भर घातली. एकदा घातलेला कपडा परत घालणे हे कमीपणाचे, चुकीचे समजले गेले. काहीतरी वेगळे काम, महत्वाचा आणि महागडा बदल त्या कपड्यात केल्याशिवाय तोच कपडा परत अंगाला लागेना. फ्रेंच राज्यक्रान्तिने मारी आंत्वानेतचा, फ्रेंच विलासी जीवनाचा शेवट केला पण ओत कुत्यूर, उच्च दर्जाची कारागिरी, अभिरुची याबाबतीत फ्रेंचांचा वरचष्मा अगदी विसाव्या शतकातही कायम राह्यला.
Marie_Antoinette_de_France.jpg

फ्रेंच राज्यक्रान्तीनंतरही पॅरिस हे फॅशनचे मुख्य केंद्र राह्यले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, दर्जेदार शिंपीकामाचे ज्ञान असलेला कुणी एक इंग्लंडहून पॅरिसमध्ये आला. फ्रान्समधल्या एका नावाजलेल्या कापड दुकानात काम करता करता आपल्या फ्रेंच बायकोसाठी तो नव्या आणि वेगळ्या फॅशनचे कपडे बनवू लागला. ते बघून गिऱ्हाईक चौकशी करू लागले. त्यानंतर १८५८ साली त्याने पॅरिसमध्ये स्वतःच्या कुत्युर दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गाउन्स बनवून त्याचे खर्‍याखुर्‍या माणसांच्या अंगावर त्यांचे प्रदर्शन करण्याची सुरूवात केली. प्रत्येक गाऊन अंगावर घातल्यावर कसा दिसेल, हालचाली करताना कसा दिसेल वगैरे गोष्टींचे प्रात्यक्षिकच सादर होऊ लागले. ही नवीन कल्पना पॅरिसच्या फॅशन जगतामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. अश्या रीतीने फॅशन शो या संकल्पनेचा उगम झाला. ही कल्पना लढवणारा इंग्लंडहून आलेला माणूस म्हणजे चार्ल्स फ्रेडरिक वर्थ. फॅशन जगतामधला हा पहिला फॅशन डिझायनर. आपण केलेली डिझाइन्स कुणी स्वतः:च्या नावावर खपवू नये म्हणून बनवलेल्या गाऊन्समध्ये स्वतःच्या नावाचे लेबल लावणाराही हा पहिला माणूस.
Charles_Frederick_Worth_(Mars_1895).jpg

वर्थने आणि त्याच्या मुलांनी १८६८ साली पॅरिसमधल्या सर्व कुत्यूर दुकानांची मिळून एक संघटना बनवली. शॉम्ब्र सॅंदिकाल दे ल कुत्यूर हे त्या संघटनेचे नाव. कुत्यूर दुकानांनी बनवलेल्या डिझाइन्सची नक्कल होउ नये हा या संघटनेचा उद्देश होता. एखादे कुत्यूर दुकान खरोखरीचे कुत्यूर आहे वा नाही याचे प्रमाणीकरण ही संघटना करत असे. या संघटनेने शिक्कामोर्तब केल्याशिवाय ओत कुत्यूरचे स्पेशल लेबल लावायला परवानगी नसे. तसेच प्रताधिकार, नक्कल वगैरे गोष्टींच्या बाबतीतही ही संघटना कुत्यूर दुकानांचे अधिकार जपत असे. संघटनेचे प्रमाणीकरण मिळण्यासाठी त्या त्या कुत्यूरियेला म्हणजे डिझायनरला अमुक एवढी पूर्णपणे नवी अशी डिझाइन्स सादर करावी लागत. वर्षातून किमान दोन वेळा नवीन कलेक्शन्स तसेच डिझायनरकडे तांत्रिक काम करणारे किमान वीस लोक पूर्णवेळ कामाला अश्याही काही अटी असत. अश्या प्रकारे चौदाव्या लुईच्या इच्छेप्रमाणे फ्रेंच फॅशनचे, अभिरुचीचे नाक त्याच्यानंतरही कैक वर्षे वर राह्यले.
Imperial_Russian_court_dress_by_Charles_Frederick_Worth,_Paris,_about_1888_01.jpg

आजही ही संघटना कार्यरत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे सगळेच उतरणीला लागले आहे. ओत कुत्यूर नाही पण दुसऱ्या वा तिसऱ्या दर्जावर असणारी अनेक लेबल्स अस्तित्वात आलेली आहेत. जी कुत्यूरची मागणी पुरवण्यासाठी सक्षम आहेत. मात्र अभिरुचीची दिशा ठरवणे, त्या बळावर अर्थकारणावर पकड ठेवणे असा चौदाव्या लुईचा उद्योग केवळ युरोपातच नव्हे तर जगभरात भलताच फोफावलेला आहे.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - सप्टेंबर २०१८ मधे प्रकाशित)
कूत्यूरोद्योग - २५ सप्टेंबर 

कापडाचोपडाच्या गोष्टी - ८. बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी

Wovensouls-antique-phulkari-textile-embroidery-150.jpg
“त्या भरतकामाच्या ओढण्या केवढ्या स्वस्त आहेत त्या अमुक साईटवर. ते हातमाग प्रदर्शनवाले पाचपट महाग विकत होते. तिथे मला आवडली होती ना सेम तश्शीच मिळाली साईटवर. लगेच घेतली.” मकू म्हणाली. मकूच्या ओढणीचे रंग सोडले तर हातमाग प्रदर्शनातल्या ओढणीची सर नव्हती त्या ओढणीला. “हेच झालं होतं ना त्या बिहोरच्या जाकिटांचं? बघितलं मी फेसबुकवर त्या व्हिडिओमध्ये.” ठकूला मकूबद्दल अपार दया दाटून आली “ते वेगळं आणि हे वेगळं!” ठकू सांगू लागली.

बिहोर हा रोमानिया या देशातला एक तालुका. तिथल्या पारंपरिक जामानिम्यात ठराविक प्रकारे भरतकाम केलेले शर्ट, चामड्याची भरतकाम केलेली जॅकेट्स आणि त्या भरतकामाशी मेळ खाणारे बारीक मण्यांचे विणलेले दागिने यांचा समावेश होतो. या सगळ्या वस्तू एकत्र आणि ठराविक प्रकारे वापरल्या तर त्यांच्या पारंपरिक वेशभूषेला अर्थ प्राप्त होतो पण त्या वेगवेगळ्याही इतक्या सुंदर आहेत की एखादीच वस्तूही आपण वापरू शकतो आपला वेष सजवायला. डियोरने तेच केले. बिहोरच्या जामानिम्यातले फक्त जॅकेटस आणि कोट उचलले. तसेच्या तसे आपल्या कारागिरांकडून बनवून घेतले आणि डियोर हे लेबल लावून आपलीच नवीन कलाकृती असल्याच्या थाटात बाजारात आणले. आणि अर्थातच त्यांच्या लेबलाच्या इतर वस्तूंप्रमाणेच अव्वाच्या सव्वा किंमत लावून विकायला ठेवले. या सगळ्यामध्ये ना बिहोरचा कुठे उल्लेख ना कलेच्या मूळ स्रोताची कदर.

बहुतेक सर्व पारंपरिक कलाकृतींची डिझाइन्स ही अतिशय सुंदर आणि परिपूर्ण म्हणावी अशी असतात. सगळे घटक अगदी योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात असतात त्यात. याचे कारण म्हणजे एकाच प्रकारच्या रचनेवर, वस्तूवर अनेक पिढयांनी काम केलेले असते. एकेक बारीक बारीक तपशील अनेक पर्यायांच्यातून जाऊन शेवटी चपखल तेवढाच उरलेला असतो. कलाकृतीमध्ये वर्षोनुवर्षे आपली भर घालत गेलेल्या असंख्य अनाम कलाकारांचे हात, डोकं त्या वस्तूच्यामागे असतात. यामुळे अश्या कलाकृती प्रचंड लोकप्रिय होतात. तेच झाले. तब्बल तीसहजार पौंड अशी दणदणीत किंमत असूनही डियोर लेबल लावलेले हे जॅकेट लोकप्रिय झाले. त्याबद्दल चर्चाही सुरू झाली.

होता होता ही चर्चा पोचली हे सुंदर काम करणाऱ्या बिहोरमधल्या अश्या असंख्य कलाकार मावश्या, आज्यांपर्यंत. तिथे हे असं भरतकाम करून करून आता अनेक हात आणि डोळे थकलेले होते. या वस्तूंना मागणी नाही म्हणून त्या बनवून उदरनिर्वाह चालत नाही हे स्वीकारलेले हात आणि डोळे. मरू घातलेली ही पारंपरिक कला. हे एकीकडे आणि दुसरीकडे नाव डियोरचे.

1C105E8.jpg
रोमानिया देशाच्या एका फॅशनला वाह्यलेल्या मासिकाने मात्र बिहोरच्या बरोबर राहायचं ठरवलं. आयुष्यभर भरतकाम करणाऱ्या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक आणि हे मासिक यांनी एकत्र येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला आणि आपल्या हातानी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अश्या किमतीत ऑनलाईन विकायला सुरूवात केली. ‘हे आमचे पारंपरिक कपडे आहेत. कुणा लेबलाची जहागीर नाही.’ हे ही त्यांनी ठणकावून सांगितले. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला. एवढेच नव्हे तर डियोरच्या अंगणात म्हणजे पॅरिसमध्ये या ब्रॅण्डला ओळखही मिळाली. आजघडीला पुढच्या साडेचार वर्षांचा खर्च निघेल एवढे प्री-बुकिंग त्यांच्याकडे झालेले आहे.

एखाद्या हिंदी सिनेमाची कथा वाटावी अशी ही गोष्ट. बलाढ्य दुष्ट शत्रूचा पराजय या गोष्टीला टाळ्या वाजवून झाल्यानंतर यातल्या अजून महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे पारंपरिक कला आणि ती साकार करणारा कलाकार जगायला हवा असेल तर व्यापारीकरणाला पर्याय नाही हा मुद्दा इथेही अधोरेखित होताना दिसतो. योग्य त्या व्यक्तीला, समाजगटाला योग्य तो मोबदला मिळत असेल तर त्याचे व्यापारीकरण स्वागतार्हही आहे. तसेच व्यापारीकरण करताना कलेच्या मूळ स्वरूपाबद्दल, उद्देश्याबद्दल अडमुठे राहूनही उपयोग नाही. परिपूर्ण जामानिम्यासाठी जॅकेट, शर्ट, मण्यांचे दागिने हे सर्व पाहिजे, त्यातल्या प्रत्येक रूपचिन्हाला एक अर्थ आहे. संपूर्ण नक्षी म्हणजे एक सांकेतिक भाषा आहे. याची माहिती नोंदवली जाणे महत्त्वाचेच पण त्या वस्तू वेगळ्या प्रकारे वापरल्या जाणे हा बदल इथे स्वीकारला गेला हे ही तितकेच महत्वाचे. कलेचा प्रवाह असा पुढे जात राहतो.

या पार्श्वभूमीवर आता भारतीय गोष्टींकडे बघायचे झाल्यास काही प्रमाणात याच मुद्द्यांना दुजोरा मिळतो. आपल्याकडचे राजस्थानी आरसेकाम, कच्छी कशिदाकारी, वारली चित्रकला, कापड रंगवण्याची अजरख ही पद्धती या सगळ्यांचा इतिहास आणि आजचे स्वरूप बघितले तर व्यापारीकरणाला पर्याय नाही हे लक्षात येते. अश्या प्रकारच्या विक्रीव्यवस्थेची अपरिहार्यता आपल्या देशात एक धोरण म्हणून पूर्वीच स्वीकारलेली आहे हे लक्षात येतं. याचं मूळ भारताच्या इतिहासात आहे.

आपण पेसलीबद्दल मागे बोललो. मसाल्याच्या पदार्थांच्या खालोखाल भारतातील कापडकलेतले वैविध्य, मुबलकता या अभिमानास्पद गोष्टींनी आपल्याला पारतंत्र्याच्या दाराशी नेलं त्याची गोष्टही आपण बघितली आहे. इथून कच्चा माल नेऊन इंग्लंडातल्या मागांवर कापड बनवून दामदुपटीने आपल्यालाच विकणे आणि त्यांच्यासाठी हा बाजार खुला राहावा म्हणून इथले हातमाग आणि पारंपरिक विणकरांवर बंदी आणणे अश्या गोष्टी इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत केल्या. त्याच्याविरुद्ध उठावही झाले. त्याला उत्तर म्हणून चरखा आणि खादि अस्तित्वात आले.

इंग्रज निघून गेल्यावर भारतापुढे अनेक आव्हाने होती त्यातले महत्वाचे म्हणजे आपली देश म्हणून ओळख निर्माण करणे हे होते. आपलं म्हणावं असं बरंचसं मोडकळीला आलं होतं. त्याचे संवर्धन करणे, जतन करणे हे अतिशय गरजेचे होते. विविध प्रकारचे पारंपरिक विणकर आणि कापडनिर्मितीचे कलाकार, हातमाग हे सगळे घटक जगवण्यासाठी, त्यांच्या कामाच्या नोंदी ठेवण्यासाठी, त्यांच्या कलेचे पुनरुज्जीवन व्हावे याचे प्रयत्न करण्यासाठी सरकारी पातळीवर काही महत्वाची धोरणे आखली गेली आणि प्रयत्नही केले गेले. या कलाकारांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली गेली. श्रीमती पुपुल जयकर यांचे या संपूर्ण कार्यात खूप मोठे योगदान आहे. खादीची सरकारी दुकाने, कॉटेज एम्पोरियम्स, विविध राज्यांची एम्पोरियम्स वगैरे सर्व या प्रयत्नांमधूनच आलेले आहेत. फॅब इंडिया व तत्सम अनेक खाजगी ब्रॅण्डस हे ही याच तत्वावर चालवले जातात. भारतातले अनेक डिझायनर्स पारंपरिक कारागीर आणि विणकरांना बरोबर घेऊन आपली निर्मिती करतात. सध्या अनेक प्रकारच्या विणींचे पुनरुज्जीवन करणे हे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. एकेकाळी ज्या साड्यांना गरीबाच्या, जुनाट वगैरे लेखले गेले त्या साड्या नव्या रूपात आज काही वर्तुळात उच्च दर्जाची फॅशन म्हणून वापरल्या जातायत. याचे चपखल उदाहरण म्हणजे गोव्याच्या कुणबी साड्या किंवा उत्तरेतल्या गमछा साड्या.

तरीही सर्व चित्र सुंदर आणि आशादायी आहेच हे म्हणता येणार नाही. ते तसे का वगैरेचा उहापोह न करता पारंपरिक कलांना आश्रय मिळावा यासाठी काही प्रयत्न झाले होते इतकेच लक्षात घेऊ.

तरीही आपल्याला हस्तकलांचे महत्व पुरेसे कळलेले नाही. एखादी ओढणी हाताने भरतकाम करून बनवण्यातले सौंदर्य आणि मशीनवर केलेल्या भरतकामाचे ठोकळेबाज सौंदर्य यातला आपल्याला फरक कळत नाही. लोकसंख्या अमाप असल्याने मानवी कष्टांची किंमत आपल्या लेखी नगण्य आहे. त्यामुळे पारंपारिकरित्या हाताने बनवलेल्या वस्तूंना वेगळी किंमत देण्याची मानसिकता आपल्याकडे नाही. विकसनशील देश असल्याने आपले सरासरी दरडोई उत्पन्नही बेतासबात आहे. अश्या पार्श्वभूमीवर खरोखरी हाताने भरलेल्या ओढणीची किंमत न परवडणे आणि मशीनवरच्या ओढणीवर खुश होणे हे आपसूकच होते. त्यामुळे ठकूने मकूला दोष देणे हे फारसे योग्य नाही.

व्यापारीकरण होताना एक प्रकार असतो तो म्हणजे योग्य त्या कारागिरांना योग्य ते मूल्य मिळते आणि ग्राहकालाही अस्सल वस्तू मिळते. दुसरा प्रकार असतो तो मशीनवरच्या ओढणीचा. अस्सल वस्तूच्या स्वस्त नकला बाजारात उपलब्ध होत राहतात. अस्सल वस्तूचे महत्व, वेगळेपणा कमी करून टाकतात. तिसरे व्यापारीकरण म्हणजे चक्क डियोरसारख्या ब्रॅण्डसनी केलेली ढापाढापी. हे जगभरात भरपूर वेळा घडले आहे. बिहोरचे उदाहरण हे अपवादात्मक म्हणूनच बघितले पाहिजे. पारंपरिक कला आपले डिझाईन म्हणून आणण्याची आणि ते खपून गेल्याची असंख्य उदाहरणे आहेतच. ब्रॅण्डस, लेबल्स आणि त्यांच्या नावावर एखादी गोष्ट होणे ही सगळी प्रक्रिया काय आणि कशी आहे याबद्दल बघूया पुढच्या लेखात.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - ऑगस्ट २०१८ मधे प्रकाशित)
बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट

कापडाचोपडाची गोष्ट - ७. थांब सेलिना बिंदी लावते

“आज काय खास? इतकं तयार होऊन आलीयेस!” ठकूच्या कपड्यांकडे बघून सातासमुद्रापारच्या देशात कुणीतरी साडेसहाशेव्यांदा हा प्रश्न ठकूला विचारला. आपल्या मळखाऊ रंगाच्या, पिदडायच्या सलवार कुर्त्याकडे बघून ठकूला प्रश्नकर्त्याबद्दल साडेसहाशेव्यांदा सहानुभूती दाटून आली. सहाशेएकावन्नावी वेळ आलीच नाही. ठकूने रोजच्या वापरातून सलवार कुर्ते काढूनच टाकले. भारतात परत येताना ते सगळे ठकूने यमीपेक्षा पाचशेपट गोरी असलेल्या आपल्या मैत्रिणीला देऊन टाकले. मैत्रिणीने ते कौतुकाने मिरवत वापरले.

जगामध्ये वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रदेशात अश्या मैत्रिणी असतील. आपलं रूप सजवायला वेगळं, नवीन काहीतरी मिळाल्याच्या उत्साहात त्यांनी अश्याच एकमेकींच्या वस्तू वापरल्या असतील आणि कदाचित कपड्यांच्या इतिहासाला नवे वळण लागले असेल. हे आपण पाह्यलं. पण हे तेवढंच आहे का?

जेव्हा एखादी पाश्चिमात्य कन्या टिकल्या लावून एखाद्या वधूसारखे नटते तेव्हा आपल्या मिश्र प्रतिक्रिया असतात. एकतर असा जामानिमा केल्यानंतर त्या आपल्याला माहिती असलेल्या प्रकारे वावरत नाहीत. त्यामुळे ‘कुठून आलं हे येडं!’ असं वाटून आपल्याला हसायला येतं. मग ‘बघा बघा गोऱ्या लोकांनाही आमच्या संस्कृतीचे कौतुक!’ असा प्रखर अभिमान आमच्या हृदयात जागृत होतो. मग हे सगळं करून ती मॅडोना, शकिरा, व्हेनेसा किंवा सेलिना तिच्या नृत्यात मादक हालचाली करते तेव्हा आम्हाला ‘संस्कृतीचा अपमान!’ वगैरे वाटतो. हे अतिशय विनोदी आहे. आणि दांभिकही. जे या तारकांनी केले तेच बॉलिवूडच्या आयटम सॉंगमध्ये एखाद्या नर्तिकेने केले तर मात्र कसलाही अपमान ना होता आम्ही मिटक्या मारता बघू शकतो. तिथे कुंकवाचा अडसर येत नाही.
bindiw.jpg

खरंतर कुंकू हिंदू स्त्रीच्या वैवाहिक स्थिती निदर्शक प्रतीकांपैकी एक असे कैक शतके मानले गेले आहे. मानसिकता बदलत जाते आहे तसे विधवेने कुंकू लावणे निषिद्ध आणि सव्वाष्ण बाईने कुंकू लावलेच पाहिजे वगैरे नियमांचा कट्टरपणा बराचसा कमी झालेला आहे. स्त्रिया समाजामध्ये स्वतः:ची ओळख निर्माण करत आहेत. वैवाहिक स्थिती ही प्रदर्शन करायची गोष्ट नसून अतिशय खाजगी गोष्ट आहे या कारणाने अनेक स्त्रियांनी तथाकथित सौभाग्यचिन्हे नाकारली आहेत. कुठल्याही स्वरूपातले कुंकू हे आता अनेक भारतीय स्त्रिया केवळ चेहरा सजवण्याची वस्तू म्हणूनच वापरायला लागल्या आहेत. आणि या सजावटीसाठी भरपूर प्रकारच्या टिकल्या बाजारात उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मॅडोनापासून सेलिना गोमेझपर्यंत सगळ्यांनी टिकल्या वापरणे यात ‘इतका आरडाओरडा का?’ हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

पाश्चिमात्य जगामध्ये विविध संस्कृतींची पार्श्वभूमी असलेले लोक राहतात. तिथे जाऊन मुख्य धारेत समाविष्ट होण्यासाठी त्यांनी आपले म्हणून बरोबर आणलेले जे काही आहे त्यातले बरेच त्यांची इच्छा असो नसो टाकून दिलेले आहे. जिथे आपण राहतो त्या समाजाचा भाग होण्यासाठी त्यांनी ती किंमत मोजली आहे. आपली सांस्कृतिक ओळख पटकन डोळ्यावर येणार नाही याबद्दल प्रयत्न केले आहेत. पण ज्या ठळक गोष्टी त्यांचे बाहेरचे असणे अधोरेखित करत होत्या त्याच गोष्टी मुख्यधारेतल्या तारेतारकांनी उजमेखून वापरल्या आहेत. त्या वस्तूंना अनोखेपणाचे लेबल लावून, त्या वस्तूंचा मुळातला अर्थ, मुळातले कारण या कशाचाही संदर्भ लक्षात न घेता वापरल्या आहेत आणि आजही वापरल्या जात आहेत. अनोखेपणा, गूढ आणि म्हणून मादक अशी एक प्रतिमा या वस्तूंच्या द्वारे उभी केली जाते आणि विकली जाते. त्या त्या संस्कृतीची पार्श्वभूमी असलेल्या बहुतेक सगळ्याच लोकांकडे बघायचा दृष्टिकोन या लेबलांमुळे गढूळ झालेला आहे. उदाहरणार्थ वेगळ्या संस्कृतीतली, रंगाने काळीसावळी असलेली, कुंकू किंवा मांगटिका वापरणारी, नेसायचे वस्त्र वापरणारी स्त्री ही केवळ एक सुखावणारे, छेडणारे लैंगिक आकर्षण यापुरतीच किंवा रोमानियाच्या भटक्या समाजातले लोक हे जगाचे नियम मोडून जगणारे, चोऱ्यामाऱ्या करणारे, शरीरसंबंधाच्या बाबतीत अगदीच धरबंध नसलेले लोक अशी काही समीकरणे बनतात. मिश्र समाजात प्रतीकांच्या अस्मिता या फार कडवट, कर्मठ होतात. आणि त्यामुळे मानापमानही टोकाचेच. आपल्या संस्कृतीच्या वस्तू आपण वापरायला बंधन पण कुणी सेलिना तिच्या गाण्याला ‘आदिम आणि मध्यपूर्वेची डूब’ देण्यासाठी बॉलिवूड आणि टिकल्या वापरते ते स्वीकारले जाते. हा विरोधाभास विविध संस्कृतीतील लोकांना मुख्य धारेपासून वेगळा काढतो. त्यांना असुरक्षित वाटायला लावू शकतो.

या विषयाबद्दल गेल्या काहीच वर्षांमध्ये तपशिलात आणि गांभिर्याने चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या संस्कृतीशी जोडलेली चिन्हे, प्रतीके, वस्तू इत्यादींची देवाणघेवाण होणे हे अपरिहार्य आहेच. काही प्रमाणात स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य वा अयोग्य याबद्दल अजून अनेक पातळ्यांवर संभ्रम आहेत. अयोग्य असण्याची ओरड कधी टोकाला जाऊन दोन समूहांमध्ये पक्क्या भिंती घालण्याचे काम करते आहे तर यात काहीच चूक नाही हे विधान टोकाला जाऊन पूर्णपणे असंवेदनशील व अनिर्बंध व्यवहाराचे समर्थन करण्यासाठी उभे ठाकते आहे.

पाश्चिमात्य विश्व हे काही प्रमाणात संपूर्ण जगाची मुख्याधारा म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थातच त्यांचे अंधानुकरण जगभर केले जाते. भारतही याला अपवाद नाही. आपणही पाश्चिमात्य जगाच्या पावलावर पाऊल ठेवून इतर संस्कृतींमधील रूपचिन्हांचा, प्रतिकांचा यथेच्छ वापर करतो.

हे झालं बाहेरच्या देशांमधल्या संस्कृतींविषयी पण इथल्याइथे आपल्याच देशातल्या गोष्टींचे आपण काय करतो तेही बघण्यासारखे आहे. इथे प्रांतानुसार, भाषेनुसार इतक्या अनेक संस्कृती नांदतात. प्रत्येकाचे पारंपरिक कपडे आणि त्याबरोबरचे रितीरिवाज वेगळे. स्वातंत्र्यानंतर या सर्व संस्कृती एकत्र नांदाव्या यासाठी तयार केलेले ‘विविधतेत एकता’ हे एक ब्रीदवाक्य. शालेय अभ्यासक्रमामध्ये हे कायमच महत्वाचा भाग होते. ती विविधतेतली एकता सिद्ध करण्यासाठी दरवर्षी प्रत्येक शाळेत गॅदरिंगला एक तरी कार्यक्रम असायचाच ज्यात किमान दहापंधरा राज्यांचे कपडे घातलेले विद्यार्थी स्टेजवर येऊन जयहिंद म्हणत असत. आजही हे चालू असतेच शाळांमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी.

विविधतेत एकता, राष्ट्रीय एकात्मता वगैरे साधण्यासाठी जो वेश केलेला आहे तो तपशिलात योग्य आहे का? अर्थाचा अनर्थ होईल अश्या चुका तर नाहीत? वगैरे मुद्दे इथे खिजगणतीतही नसतात. साचे ठरलेले असतात. मराठी स्त्री म्हणल्यावर वाईट रित्या शिवलेली, मोक्याच्या ठिकाणी घट्ट अशी नऊवारी साडी आणि नाकात टीचभर नथ हे यावेच लागते. बंगाली स्त्रीला पांढऱ्या आणि लाल साडीशिवाय पर्याय नसतो. मुस्लिम स्त्रीने सलवार कुर्ता, डोक्यावरून गुंडाळलेली ओढणी हे घालून हाताने ‘आदाब’ करावेच लागते. परत आपले राजकीय नेते ज्या ज्या प्रदेशात जातील तिथले शिरस्त्राण, कपडे घालून लोकांशी समन्वय साधायचा प्रयत्न करत असतात. असा आपल्या संस्कृतीचा नसलेला जामानिमा करून मिरवण्यानेच त्या संस्कृतीचा आदर राखला जातो असे समीकरण आपल्या डोक्यात पक्के आहे.
vividhatame ekata.jpg

हीच मानसिकता मग इतर वस्तूंच्या वापरात पण येते. भारतीय समाजाच्या मुख्य धारेच्या काठावर असलेल्या गटांच्या रोजच्या जगण्यातल्या पारंपरिक वस्तू आपण याच मानसिकतेने वापरतो. विविध कानाकोपऱ्यातल्या आदिवासी जमातींच्या दागिन्यांचा वापर, वारली, मधुबनी सारख्या चित्रशैलींचा कपड्यांमध्ये वापर अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. त्या शैलीचा, वस्तूंचा मूळ उद्देश बाजूला पडून केवळ त्यातल्या निव्वळ सुंदरतेला धरून त्या वापरल्या जातात. याबद्दल त्या त्या कलेचे, वस्तूंचे मूळ ज्या समाजगटाकडे आहे त्यांचे म्हणणे काय असू शकते हा वेगळ्या समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. पण परंपरांचे व्यापारीकरण होते यात वाद नाही.

अश्या पारंपरिक वस्तूंचे, रूपचिन्हांचे व्यापारीकरण टाळण्यासाठी आपण हा वापर थांबवायला हवा असे सांगण्याचा या लेखाचा उद्देश नाही. तसे घडणेही योग्य नाही. या विविध वस्तू, चिन्हे, प्रतिके, शैली आणि त्यांची तंत्रे हा आपला फार महत्वाचा वारसा आहे. या वस्तू पार्ंपरिकरित्या घडवणारे कलाकार लोक जगणे, त्यांची कला जगणे, वाढणे हे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी कलाकारांना, कारागिरांना राजाश्रय असायचा. तसेच वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यामुळे कला जगणे शक्य होते. या दोन्हीही व्यवस्था आजच्या अर्थकारणात उरलेल्या नाहीत. तस्मात कलांचे, कौशल्याचे जतन व्हायचे असेल, कारागीर, कलाकार जगायचे असतील तर व्यापारीकरण नक्कीच आवश्यक आहे. किती, कसे आणि कुठे हा काही प्रमाणात तारतम्याचा भाग आहे. त्याबद्दल आणि पारंपरिक वस्त्रे, दागिने आणि इतर कलांचे पुनरुज्जीवन आणि व्यापारीकरण याबद्दल पुढच्या वेळेस तपशिलात चर्चा करूया.

- नी 
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - जुलै २०१८ मधे प्रकाशित)
थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै

कापडाचोपडाच्या गोष्टी - ६. भारतीय वारसा

“ती आंब्याची कुयरी असते ना ती म्हणे पेसली गावातल्या सूचिपर्णी वृक्षाचा बदाम आहे. खरंय तू म्हणतेस ते. आपलं काही नाहीच.” देशाभिमानी काकू दु:खाने कळवळून म्हणाल्या. पेसली गावात सूचीपर्णी वृक्ष? आणि त्याला बदाम? ठकूने डोक्याला हात लावला. कुयरीच्याही आधी जगभर झालेल्या देवाणघेवाणीची गोष्ट त्यांना सांगू लागली.

पार सिंधु संस्कृतीपासून म्हणजे इसवीसनपूर्व २५०० पासून भारतात कापसाच्या लागवडीचे पुरावे मिळतात. इसवीसनपूर्व १५०० च्या आसपास कापसापासून बनवलेल्या सुती कापडाचे उल्लेख मिळतात. आद्य इतिहासकार हिरोडोटस(इसपू ५ वे शतक) याने ‘मेंढीच्या लोकरीपेक्षा सौंदर्य आणि उपयुक्तता यात वरचढ असलेले कापड’ असा भारतीय सुती कापडाचा उल्लेख केला आहे. चरख्यावर सुती कापड बनवण्याची कलाही भारतातच पहिल्यांदा विकसित झाली. याच काळाच्या आगेमागे मेक्सिको देशात, इंका संस्कृतीमध्येही असेच पुरावे सापडतात.

प्रवासी, व्यापारी, जेते, आक्रमण करणारी सैन्ये आपल्या पद्धती दुसरीकडे घेऊन जातात आणि दुसरीकडे वेगळे वाटलेले, आवडलेले आपल्याबरोबर घेऊन जातात.

रोमन सम्राट सिकंदराने जेव्हा भारतावर चढाई केली (इसपू ३२०) तेव्हा त्याच्याबरोबर आलेल्या शिपायांनी इथले सुती कापड वापरणे सुरू केले. त्यांच्या लोकरी कपड्यांपेक्षा हे सुती कापड त्यांना जास्त सुटसुटीत आणि उपयोगी वाटले. सिकंदराच्या युद्धनीतीपैकी ही एक होती. जो प्रदेश सर करण्यासाठी तो जात असे तिथला पेहराव तो आपलासा करत असे. तसे करून स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करत असे. सर्व जग पादाक्रान्त करण्याच्या प्रयत्नात सिकंदराने अश्या विविध संस्कृतींमधील वेशभूषा आणि चालीरीती उचलल्या. भारतातून परत गेलेल्या त्याच्या फौजांनी त्यांच्याबरोबर या पद्धतीही बरोबर नेल्या.

याच कालखंडादरम्यान (इसपू ५०० - ३०० ) इजिप्त, पर्शिया, तुर्कस्तान आणि भारत या मार्गे चीनपर्यंत महत्वाचा व्यापारी मार्ग सुरू झाला होता. चिनी रेशीम, दारूगोळ्याची दारू व मसाले या गोष्टींची या मार्गावरून ने-आण होत असे. हे इसवीसनाच्या सहाव्या शतकापर्यंत चालले. या मार्गालाच पुढे ‘सिल्क रूट’ हे नाव दिले गेले. सहाव्या शतकात बिझेन्टाईन सम्राट जस्टिनियन याने गुप्तहेर पाठवून चीनचे रेशीम बनवण्याचे रहस्य आणि किडे चोरले. मग याच किडयांच्यातून तेव्हाचे तिथले श्रीमंत, अमीर उमराव वगैरे लोकांसाठी बिझेन्टाईन रेशीम बनवण्याचा उद्योग उभा राह्यला.

यानंतर युरिपियन कॅथॉलिक क्रुसेडर्सनी इस्तंबूलवर ताबा मिळवला तेव्हा म्हणजे मध्ययुगामध्ये युरोपियन कपडे हे एकरंगी व साधे होते. कपड्यांवर फारशी कलाकुसर केलेली नसे. त्यामानाने मध्यपूर्वेतील कपडे हे सुंदर आणि वैविध्यपूर्ण होते. भरतकाम, ठसे वापरून नक्षी छापणे, चौकड, पट्ट्या अश्या विविध प्रकारे कपड्यांवर काम केलेले होते. घोळदार रेशमी झगे, विविध प्रकारचे काम केलेली वैशिष्ट्यपूर्ण कापडे असलेल्या या नवीन शैलीची वेशभूषा क्रुसेडर्सनी आपल्याबरोबर युरोपात नेली. चर्चच्या वेशभूषेमध्येही या गोष्टींचा समावेश झाला. त्या पद्धतीची झाक आजही कॅथॉलिक चर्चच्या पदाधिकाऱ्यांच्या वेशभूषेमध्ये दिसून येते. या घटनेमध्ये कापडांचे प्रकार, कपड्यांच्या पद्धती याबरोबरच विविध प्रकारची रूपचिन्हे म्हणजे मोटिफ (Motif) यांचा प्रवास ही तेवढाच महत्वाचा आहे.

रूपचिन्हे (मोटिफ) हे प्रकरण कुठल्याही चित्राचा वा नक्षीचा आत्मा म्हणता येईल. एखादे छोटेसे चित्र वा आकार एखाद्या प्रकारच्या, प्रदेशाच्या चित्रशैलीत वारंवार दिसते किंवा त्या चित्रशैलीचे मूळ शोधण्यासाठी महत्वाचे ठरते किंवा त्या चित्रचौकटीला संदर्भांचे तपशील देते अश्या आकाराला/ चित्राला त्या शैलीचे रूपचिन्ह म्हणता येईल.

मध्यपूर्वेच्या प्रदेशांमध्ये बुटा हे रूपचिन्ह गालिचा व इतर कापडांमध्ये वापरले जात असे. आंब्याच्या कोयीसदृश असलेला हा आकार भारतीय कलेमध्येही सृजनाचे प्रतीक म्हणून प्रचलित होता. अजूनही आहे. ही आपली कोयरी. अकबराच्या काळात या आकाराचा वा रूपचिन्हाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात काश्मिरी शालींमध्ये झाला. काश्मिरी शालीवर कोयरी असलीच पाहिजे असे समीकरण निर्माण झाले. या शालींची लोकप्रियता भरपूर होती.

ब्रिटिश इथे आले तोपर्यंत भारताच्या वस्त्रकलेने खूप प्रगती केलेली होती. भारतभरात प्रदेशानुसार कापडे विणण्याचे प्रकार, त्यावरची नक्षी, कलाकुसर, कापड रंगवण्याची भारतीय साधने व प्रक्रिया या सर्व गोष्टींचे प्रचंड वैविध्य होते. काश्मिरी शालींबरोबरच याही सगळ्याची युरोपातून आलेल्या व्यापाऱ्यांना भुरळ पडली नसती तरच नवल. सुंदर झळझळीत निळ्या रंगासाठी भारतीय नीळ, पिवळ्या रंगासाठी हळद, लाल रंगासाठी मंजिष्ठा या गोष्टी इथून उचलल्या गेल्या. इस. १८०० पर्यंत या सगळ्याबरोबरचजागतिक वस्त्रप्रावरणांच्या शब्दकोशामध्ये भारतीय मूळ असलेले पजामा, डंगरी/ डोंगरी, खाकी, कॅलिको हे शब्द त्यांच्या संकल्पनांसकट भरती झालेले होते.
नीळ
2 Indigo-Historische_Farbstoffsammlung (1).jpg

१८०० च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने भरपूर शाली इथून ब्रिटनला नेल्या. नंतर इसवीसन १८०५ मध्ये पेसली या स्कॉटलंडमधल्या गावी या शालींचे उत्पादन सुरू केले. संपूर्ण युरोपभर या शाली आणि कोयरीचा आकार लोकप्रिय झाला. हे रूपचिन्ह पेसली (Paisley) गावाच्या नावाने ओळखले जाऊ लागले. १८४० मध्ये या रूपचिन्हाचा प्रताधिकार पेसली गावाच्या नावे केला गेला. जागतिक वस्त्रप्रावरणांमधे प्रताधिकाराची ही पहिली घटना.

पेसली शॉल
1 Shawl_LACMA_M.84.244.1 (1).jpg

भारताच्या पारतंत्र्याची ही सुरूवात होती. आपला सगळ्यात महत्वाचा गुण किंवा आपले बलस्थानच आपल्या मुळावर कसे येते याचे याहून उत्तम उदाहरण सापडणे अवघडच.

युरोपियन कपड्यांमध्ये पेसली बरोबरच भारतीय कापड, नक्षी यांचा वापर अठराव्या शतकाच्या शेवटी सुरू झाल्याचे दिसून येते. सुंदर सुंदर ब्रॉकेड कापडे, छापाचे सुती कापड यावरची इतर रूपचिन्हेही भारतातून घेतल्याचे दिसून येते. यातले महत्वाचे उदाहरण म्हणजे भारतातून निर्यात केलेली तलम छापील मलमल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दोन दशकांमध्ये एम्पायर प्रकारच्या गाऊन्समध्ये ही तलम मलमल मोठ्या प्रमाणावर वापरली गेल्याचे दिसते. हे मलमलचे गाऊन्स आणि थंडीसाठी काश्मिरी पश्मिना शाल असा वेश म्हणजे तेव्हाच्या युरोपियन समाजातले वरचे स्थान असे सरळ गणित होते.

एम्पायर गाऊन्स आणि पेसली शॉल
3 एम्पिरे.jpg

राणी व्हिक्टोरियाच्या काळात ब्रिटिश वसाहतींमधील व अन्य युरोपबाह्य जगातील विविध सुंदर आणि वैचित्र्यपूर्ण वस्तूंची प्रदर्शने युरोप व अमेरिकेत भरवली गेली. यामध्ये कपडे, सजावटीच्या वस्तू, वेगळी दिसणारी माणसे हे सगळेच मांडून ठेवलेले असे. ही आवड लक्षात घेऊन लिबर्टी ऑफ लंडन या दुकानाने अश्या विविध वस्तू विकण्यासाठी वेगळी दालने उघडली होती.

या सर्व जाणिवा घेऊन विसावे शतक आले. दिगियेव (Sergei Diaghilev) या रशियन दिग्दर्शकाच्या बॅले रूस या कंपनीने आपल्या नेपथ्य आणि वेशभूषेतून वेगळ्याच सौंदर्यजाणिवा समोर ठेवल्या. लिऑन बाक्स्तच्या (Leon Bakst) या डिझाइन्सनी या जगात खळबळ उडवून दिली. मध्यपूर्व, भारत आणि अतिपूर्वेकडचे देश यांच्याकडून विविध घटक घेऊन ते युरोपियन संदर्भात वापरून हे नेपथ्य आणि वेशभूषेचे संकल्पन केले गेले होते.
बॅले रूस
4 Scheherazade1914.jpg

लिऑन बाक्स्त
5 leonbakst.jpg

१९११ दरम्यान पॉल इरीब(Paul Iribe) या फॅशन डिझायनरने यातला एक मोठा एमरल्ड घेऊन त्याच्या भोवती इतर रत्ने बसवून एक ब्रोच बनवला. आर्ट डेको या कालखंडाच्या फॅशनचा हा एक महत्वाचा नमुना मानला जातो. या काळाच्या फॅशनवर मध्यपूर्व, भारत आणि अतिपूर्वेचे देश येथील सौंदर्यजाणिवांची झाक होती. पॉल पॉरें(Paul Poiret) हा ही एक महत्वाचा आर्ट डेको फॅशन डिझायनर. विविध रंगी, तयार व दिसायला नाजूक पगड्या हा त्याच्या डिझाईन्सचा महत्वाचा घटक होता. आर्ट डेको काळातल्या युरोपियन स्त्रियांच्या सर्वोच्च फॅशनमध्ये या पगड्यांना मानाचे स्थान होते. हीच गोष्ट राजेमहाराजे वापरत अश्या मोत्यांच्या लांब माळांची होती.

पॉल पॉरें पगडी
6 Book_Illustration,_Les_choses_de_Paul_Poiret_vues_par_Georges_Lepape_(Items_by_Paul_Poiret_as_seen_by_George_Lepape),_Woman_in_a_Turban,_plate_6,_1911_(CH_68775933) (1).jpg

डिझायनर पॉल पॉरें तसेच अर्टे(Erte - Romain de Tirtoff - https://martinlawrence.com/erte/ ) या चित्रशिल्पकाराच्या आर्ट डेको कपड्यांच्या बाह्याकृती बघितल्या तर तुम्मन आणि कुर्ता, सलवार आणि कुर्ता, सकच्छ व विकच्छ साड्या या कपड्यांच्या बाह्याकृतींशी साम्य जाणवते. दुटांगीकरण करताना पडणाऱ्या चुण्या, कापडांची वळणे यांचे निरीक्षण करून त्यांना कपड्यात स्थान दिल्याचे कळते. नेसलेल्या कपड्यांची आठवण करून देणाऱ्या प्रवाही रेषा हे या दोघांच्या संरचनांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. बाह्याकृती सकच्छ किंवा दुटांगीकरण केलेली वाटली तरी हे मुळात स्कर्टसच आहेत. युरोपियनीकरण करताना म्हणा किंवा प्रत्यक्षातल्या नेसणीचे गूढ न उलगडल्यामुळे म्हणा त्यातून साधर्म्य असलेल्या पण भारतीय नसलेल्या रचना निर्माण झालेल्या आहेत.

देवाणघेवाण आणि त्यातून वेशभूषेची कथा कशी आकार घेते हे आपण बघितले. या सगळ्याकडे आपण कसं बघायचं याबद्दल थोडं बोलूया पुढच्यावेळी.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - जून  २०१८ मधे प्रकाशित)
भारतीय वारसा - २६ जून

Saturday, June 6, 2020

प्रमोदबन - १

काही गोष्टी विनाकारण आठवत राहतात. अगदी लख्खपणे आठवत राहतात. मांजरांसारख्या पायात येत राहतात. मग त्यांना उचलून घ्यावे लागते. लाड करावे लागतात. त्या लिहून मोकळे होण्याशिवाय पर्याय नसतो. तसे कुठलाही ट्रिगर नसताना छळतेय प्रमोदबन सध्या.
नाही प्रमोदबन हे कुठल्याही अभयारण्याचे, जंगलाचे किंवा संस्थेचे नाव नाही. माझ्या बालपणाच्या सगळ्या आठवणी जिथून सुरू होतात ती जागा आहे प्रमोदबन.
शुक्रवारात, बाफना पेट्रोल पंपाकडून अकरा मारुतीकडे जाणाऱ्या गल्लीत झालेली पहिली बिल्डिंग. म्हणजे ओनरशिप अपार्टमेंट वगैरे असलेली पहिली. पुण्याच्या पेठांमध्ये पूर्ण किंवा अर्धे वाडे पाडून तेव्हढ्याश्या जागेत बिल्डिंग्ज बांधायच्या पर्वाची ती सुरुवात होती. आम्ही तिथे राहात होतो तोवर ज्या आगाशे वाड्याचा अर्धा तुकडा पाडून आमची बिल्डिंग झाली होती त्यातला उरलेला वाडा शेजारी मौजूद होता. आणि तो आमच्या कानिटकर वाड्यापेक्षा गूढरम्य वाटायचा.
मी दोन वर्षांची असताना आम्ही तिथे राहायला गेलो. पुढची दहा वर्षे आम्ही तिथे होतो. अडीच वर्षांची असताना मला तिथून जवळच्या शिशुशाळेत घातले. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची ती मॉटेसरी होती. बाफना पेट्रोल पंप, चिंचेची तालीम, अकरा मारूतीची गल्ली हे सगळे लहानपणी आईने पाठ करून घेतले होते. तेव्हा घरी फोनही नव्हता. आणि हरवले तर पत्ता सांगता यायला हवा ना. घरातून टमाकटुमुक करत निघायचे, बाफनाचा चौक क्रॉस करायचा मग दोन चार उड्या उड्या पावलं टाकायची की डावीकडे आमची शिशुविहार यायची. तिची गम्मत नंतर सांगणारे.
आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो. स्वैपाकघराची खिडकी आणि बेडरूमची गॅलरी रस्त्याच्या बाजूला होती. घराचे दार आणि हॉल बिल्डिंगच्या आतल्या बाजूला. बेडरूमच्या खाली बिल्डिंगचे गेट होते तर स्वैपाकघराखाली डॉ. अरविंद लेल्यांचा दवाखाना. माझ्या आठवणीत अगदी सुरूवातीला फारतर ते स्वतः त्या दवाखान्यात असायचे. नंतर ते राजकारणात जास्त सक्रिय झाले आणि मग तो दवाखाना डॉ. रोंघे चालवू लागले. पण नाव डॉ. लेल्यांचेच होते. त्यांचा राहता वाडा मंडईजवळ होता.
बहुतेक ७७ किंवा ७८ सालची गोष्ट असेल. आई घरीच असायची. त्या दिवशी शाळेत गेलेच नव्हते किंवा मला शाळेतून घेऊन आई नुकतीच घरी आली होती. अचानक आरडाओरडा ऐकू आला आणि आमच्या घरावर दगडफेक झाली. किचन आणि बेडरूमची गॅलरी दोन्ही रस्त्याला लागून होते. दोन्हीकडून दगड आले. काचा बिचा फुटल्या. ओट्यावर दगड पडले. गॅलरीत पडले. एक जागा होती जिथे किचन किंवा गॅलरी कुठूनही दगड आला तरी लागणार नाही अशी. तिथे मी आणि आई बसून होतो. मग थोड्या वेळाने दगडफेक करणारी माणसे गेली. नंतर पोलिस आले. कुठे दगड पडले, किती नुकसान झाले वगैरे वगैरे पंचनामा झाला.
आई थोडी घाबरलेली असणार तेव्हा पण मी जाम एक्सायटेड होते त्या दिवशी. काहीतरी सॉलिड घडलंय आपल्या घरात म्हणून. घटनेचं गांभिर्य कळण्याचं वय नव्हतंच ते. नंतर कळलं ते असं की लेल्यांचा दवाखाना खाली होता. डॉ. लेले आणिबाणी नंतर कसबापेठ मतदारसंघातून निवडून आले होते. तर त्या रागावर बहुतेक इंदिरा समर्थकांनी लेल्यांच्या दवाखान्यावर आणि घरावर (नीचे दुकान, उपर मकान असे गृहित धरून) दगडफेक केली. मला आयुष्यात नंतर जेव्हा जेव्हा हे आठवले तेव्हा ‘इतका कसा काय राँग नंबर लागू शकतो?’ याचे प्रत्येक वेळेला आश्चर्य वाटत आलेय. पण तेव्हा बिल्डींगमधे, वाड्यात एखाद्या घरी फोन असायचा असा काळ होता. टिव्ही पण मजल्यावर एखाद्यांकडे असलातर असला वगैरे. त्यामुळे सगळ्यांना सगळं माहिती नसे. तर कदाचित कार्यकर्त्यांना दगड पुरवून छू म्हणेपर्यंत योग्य पत्ता पोचला नसावा त्यांच्याकडे.
त्यानंतर बरेच वर्ष घरी आल्यागेल्या कुणाकुणाला ‘घरावर दगडफेक झाली तर ही जागा एकदम सेफ आहे. अजिबात दगड लागणार नाही.’ असे मी सांगायचे हे आठवतंय. पाऊस पडला की इथे थांबलो तर भिजणार नाही हे जसे सांगावे तसे मी सांगायचे. मग कधीतरी ‘दगडफेक काही पावसासारखी नॉर्मल नसते.’ असा साक्षात्कार झाला आणि ते बंद पडले.

प्रमोदबनमधल्या आठवणींना वाट करून देण्याची ही सुरुवात. बघू तुम्हाला आवडतायत का ते!
- नी

Search This Blog