Saturday, June 13, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - १२. अजून थोडी इतिहासाची पाने!

“कपड्यांची कथा! पण या सगळ्या कथेचा आपल्या आयुष्याशी कुठे संबंध येतो?” हुशार मकूने हुशार प्रश्न विचारला. ठकू समजावून सांगू लागली.

अंगावर ल्यायलेली प्रत्येक गोष्ट, कपाटातली प्रत्येक वस्तू या सगळ्या कथेचा एक भाग आहे. आपलं कपाट उघडून पहा. सत्राशेसाठ प्रकारचे कपडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कापडे, वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे. ठराविक ठिकाणी घालायचे ठराविक कपडे आहेत. ‘मेरावाला क्रीम’ पासून म्हणाल तितके रंग आणि छटा आहेत. आपण मध्यमवर्गीयच आहोत, काटकसरीही आहोत पण कपड्यांचं कपाट भरून वाहतंय.

काही पिढयांच्या मागे अगदी जुजबी कपडे असायचे. रोजचे दोनतीन, एखाददोन ठेवणीतले आणि ऐपतीप्रमाणे अजून एखादा दुसरा कपड्यांचा जोड ही परिस्थिती बहुतेक सर्वच मध्यमवर्गीय माणसांची. गरीबाच्या घरात गाठी आणि ठिगळं मारलेल्या किंवा जोड लावलेल्या साड्या. बारकी पोरं अर्धी उघडीच. एकूणात माणशी एका बोचक्याचा ऐवज.

जुनी माणसे कशी थोडक्यात समाधानी होती हे सांगायला ही प्रस्तावना नाही. तेव्हाची माणसे समाधानी नक्कीच नव्हती नाहीतर आज आपली कपाटं भरून वाह्णाली नसती.

Elias_Howe_sewing_machine.jpg
आहे त्या स्थितीत समाधानी न राहण्यातूनच मानवाने वेगवेगळे शोध लावले. शिवणाचे मशीन, विजेवर चालणारे माग, बटणे किंवा नाड्यांऐवजी झिप या गोष्टींचे शोध लागले आणि एका कपडा बनायचा वेग कैक पटींनी वाढला. कपड्यांची उपलब्धता वाढली आणि किंमती कमी झाल्या. सामान्यांच्या घरात कपड्यांची संख्या वाढली.

माहितीच्या देवाणघेवाणीची साधने विकसित होत गेली. हाताने प्रति काढून माहिती प्रसारित करण्यापासून सुरुवात होऊन तार, फोन, फॅक्स असे करत करत आता गाडी आंतरजालापर्यंत आली. दळणवळण घोडागाडी, सांडणीस्वार, मोठे जहाज, रेल्वे, बसेस, विमाने अश्या साधनांनी वेगवान होत गेले. इतर सर्व माहितीबरोबर कपड्यांच्या पद्धती आणि प्रत्यक्ष कपडे, दागिने वगैरेही जगभर पोचू लागले. वाढत्या वेगाबरोबर किंमती परवडतील अश्या मापात यायला लागल्या. माणसाला शरीर सजवायच्या वैविध्याची हौस होतीच. कपाटात दोन खण वाढवायची गरज पडलीच.

आणि मग आले कृत्रिम धागे. अमाप प्रमाणात कपड्यांचे उत्पादन यातून शक्य झाले. हे घडायच्या थोडेच आधी जगाने दोन महायुद्धे आणि त्यातून निर्माण झालेला अभाव सोसला होता. त्यामुळे या अमाप उत्पादनाचे प्रचंड जोरात स्वागत झाले. किंमती अश्या आल्या की अगदी जेमतेम उत्पन्न असलेल्या गटालाही हौसेमौजेचे चार वेगवेगळे कपडे असणे शक्य झाले. तर तुमचीआमची कपाटे भरून वाहण्याकडे वेगाने वाटचाल सुरू झाली.

आता आपल्या कपाटात हातमागाचे शुद्ध सुती कापड असलेले कुडते असतात, एखादी इरकल असते, एखादी पैठणी, एखादी बनारस, एखादी जोडाजोड साडी असते. ही कापडे आणि त्यांचे रंग भारतीय वस्त्रकलेच्या वारश्याचा एक धागा असतो. धिबिडगा वापराच्या जीन्स असतात ज्याच्या रंगाचे नाते काही पिढयांपूर्वीच्या आपल्याच निळीशी असते. पूर्वी स्त्रियांसाठीही पुरुषांच्यासाठीच्याच आकाराने बनणाऱ्या जीन्स व इतर ट्राऊझर्स आता स्त्रियांसाठी म्हणून वेगळ्या बनू लागलेल्या असतात. जीवशास्त्रीय लिंग, लिंगभाव आणि त्याप्रमाणे ठरणारे समाजातले स्थान यासंदर्भात घडत गेलेल्या बदलांचे प्रतिबिंब म्हणावे असा हा ट्राऊझर्सच्या आकारातला बदल म्हणता येऊ शकतो.

स्त्रिया घरगुती वा शेतीचे कष्ट किंवा शोभेची बाहुली एवढ्याच भूमिकांमधून बाहेर आल्या आहेत/ येत आहेत हे स्त्रियांच्या बाकी कपड्यांच्यातही दिसतेच. वावरासाठी सुटसुटीत अश्या कपड्यांना पसंती, पूर्ण जामानिमा करायला कमीतकमी वेळ लागेल असे कपडे, आभूषणे आणि केशरचना हे सर्व बदल स्त्रियांचे समाजातले बदलत चाललेले स्थान, भूमिका यांचेच प्रतिबिंब आहे.

केवळ बाह्य कपडेच नाहीत तर अंतर्वस्त्रांचा प्रवासही हेच दाखवतो. शरीराला विशिष्ट आकार यावा म्हणून ठराविक मापाच्या पिंजऱ्यात म्हणजे कॉर्सेटमध्ये शरीर बांधून ठेवण्यापासून ते जास्तीत शरीराच्या नैसर्गिक आकाराप्रमाणे, हालचालींना सुटसुटीत अशी अंतर्वस्त्रे हा खूप मोठा प्रवास आतल्या कपड्यांनी केला आहे. प्रत्येक बदलाच्या मागे सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत.
York_corset.jpg

जगभरात राजकीय आणि सामाजिक उलथापालथ कपड्यांच्या कथेला नाट्यमय वळण द्यायला कारणीभूत झालेली आहे. उदाहरणादाखल बघायचे तर युरोपात सामान्यांचे समजले जाणारे रंग आणि इतर वैशिष्ट्ये फ्रेंच राज्यक्रान्तीनंतर (१७९० चे दशक) अमीर उमरावांच्या कपड्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून बसली.

आपल्याकडचे उदाहरण बघायचे तर स्वदेशीच्या चळवळीतून प्रतिष्ठा पावलेले जाडेभरडे खादीचे कापड तत्व म्हणून अनेक एतद्देशीय श्रीमंतांनीही आपलेसे केले. स्वातंत्र्यानंतर आपली तत्वे सिद्ध करायला खादीच्या कपड्यांचा वापर सुरू झाला. या कपड्यांशिवाय शिवाय राजकारणात प्रवेश मिळत नसावा अशी शंका यावी इतके सगळे राजकीय नेते खादीमय असत, अजूनही असतात.

या सगळ्यामुळे खादीमध्येच भरपूर वैविध्य मिळायला लागले. मग खादीचे रंगीत कुडते हा चित्रकार, पत्रकार वगैरेंचा गणवेश होऊन गेला. तर स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींमुळे हातमागाच्या साड्या हा भारतीय विदुषींचा गणवेश झाला.

कृत्रिम धागे, ते रंगवायच्या पद्धती, कृत्रिम डाय यांच्यामुळे आधीपर्यंत न मिळालेल्या रंगांच्या छटा कपड्यांच्यात मिळू लागल्या. महायुद्धांनी बदललेले जगाचे संदर्भ आणि आधुनिक चित्रकलेचा उदय यांनी पाश्चिमात्य जगाची सौंदर्यदृष्टी बऱ्याच प्रमाणात बदलली. आजवर कपड्यांमध्ये न बघितलेले आकार १९५०-६० मध्ये कपड्यांमध्ये आले.

१९६०-७० च्या दशकात उदयाला आलेली हिप्पी विचारसरणी, त्यांचे संगीत आणि त्यांचा कपड्यांवर पडलेला प्रभाव हे सामाजिक तत्वज्ञान आणि कपडे यांची सांगड घातले गेलेले आधुनिक काळातले सगळ्यात मोठ्ठे उदाहरण म्हणता येईल. अमेरिकेत उदय झालेल्या या विचारसरणीच्या मुळाशी आशियाई तत्वज्ञान, युरोपातली सामान्यांची वा भटक्यांची जीवनशैली असे धागे होते. पूर्व युरोपातले विशिष्ट भरतकाम केलेले पारंपरिक शर्टस, भारतातले बांधणी पद्धतीने रंगवलेले कापड, सैलसर कुडते अश्या सगळ्या गोष्टी हिप्पी लोकांच्या कपड्यांच्यातही दिसून येतात.
new-hi_201812173435.jpg

गेल्या पंचवीसतीस वर्षात जगभरात वाढत चाललेल्या मूलतत्त्ववादी कट्टर विचारामुळे अनेकांना आपापल्या कळपाच्या (धर्म, पंथ, जात इत्यादी) खुणा अंगावर बाळगणे अनिवार्य वाटू लागले आहे. याची अनेक ढळढळीत उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघत असतोच.

आपल्या अंगावरच्या प्रत्येक वस्तूच्या मागे अशी एकेक कथा आहे. आपण रोज आपल्या अंगावर उद्याच्या इतिहासाचे एकेक पान लेऊन वावरत आहोत.

गेल्या वर्षभरात कपड्यांच्या इतिहासाची काही मोजकी पाने वाचकांसमोर मांडली. अजून गंमतीजंमतीची बरीच पाने आहेत. परंतु आता थांबायला हवे. माणसाच्या कातडीवरचे आवरण आणि त्याचा इतिहास हे मानवाच्या इतिहासातले अतिशय महत्वाचे प्रकरण आहे ही जाणीव करून देत या लेखमालेचा समारोप करत आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - डिसेंबर २०१८ मधे प्रकाशित)
अजून थोडी इतिहासाची पानं - २५ डिसेंबर 

0 comments:

Search This Blog