“ पूर्वी दरबारात राजगायक वगैरे असायचे तसे राज-फॅशन डिझायनर्सही असतील ना गं ठकू? म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या एलिझाबेथ राणीच्या दरबारात किंवा आपल्याकडे म्हणायचं तर पेशव्यांच्या दरबारात?” मकूचा प्रश्न गमतीशीर होता. ‘नक्की कुठून उत्तर सुरू करायचे?’ ठकू विचारात पडली.
पूर्वी कसं व्हायचं, ‘मोठ्या वाड्यातल्या धाकल्या बाईसाहेबांचा शालू पाह्यला ना पर्वा लग्नात. मला तस्साच हवाय.’ असं सरदारीणबाईंच्या तोंडून यायचा अवकाश, त्यांची खास दासी आपल्या दासीजगतामधल्या ओळखीपाळखी वापरून मोठ्या वाड्यात नवीन आलेला शालू बनारसच्या कुठल्या मागावरून आला याचा पक्का शोध घ्याय्ची. आणि सरदारीणबाईंच्या पेटीत अजून एका शालूची भर पडायची.
युरोपातही हेच घडायचं. अमिरउमरावांच्या पदरी उत्तम प्रकारचे शिंपीकाम, भरतकाम करणारे लोक असायचे. आवडलेल्या नवीन पद्धतीचे शिवणकाम, भरतकाम स्वत:कडेही असावे ही इच्छा तोंडातून निघाली की असेच खास दासी माहिती काढायची आणि हवे ते काम करवून घ्यायची.
थोड्याफार फरकाने हे असंच घडत शरीर सजावण्याच्या इतिहासाची कथा पुढे जात राहते. पण कपडे, कापडे, विणकाम, भरतकाम, दागिने घडवण्याची कला या आणि अश्या अनेक गोष्टींचा मिळून एक उद्योग, एक जग आहे. त्याच्या मुळाशी जाऊन बघितलं तर मकूच्या प्रश्नाचं उत्तर मिळायची शक्यता.
युरोपियन प्रबोधनकाळाच्या अखेरीस बराच काळ युरोपचे राजकीय व आर्थिक सत्ताकेंद्र स्पेन होते. चौदावा लुई जेव्हा फ्रान्सच्या गादीवर आला तेव्हा कपड्यांच्या फॅशनमध्ये स्पेन अग्रेसर होते, तर उंची कापडे, महागड्या वस्तू हे युरोपात वेगवेगळ्या ठिकाणाहून फ्रान्समध्ये आणले जात होते. स्पॅनिश फॅशनवर त्यांच्या कॅथॉलिक धर्माचा पगडा असल्याने त्यात गंभीर आणि सभ्य म्हणले जातील अश्या रंगांचा वापर, लक्षात येईल अश्या मोठ्या बदलाला अनुकूल नसणे, दाखवेगिरी नसणे, विविध वस्तू वापरण्याच्या बाबतीत परवानग्या किंवा बंदी या सगळ्या गोष्टी होत्या.
चौदाव्या लुईने फॅशनचे हे रूप मोडून काढले. युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्या द्वारे नियंत्रण ठेवण्याची त्याची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ व शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचे केंद्र फ्रान्स असले पाहिजे, या गोष्टी जगाने फ्रेंचांकडून शिकल्या पाहिजेत आणि फ्रेंचांकडूनच घेतल्याही पाहिजेत अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडे, कपडे, आभूषणे आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्याने घडवून आणले.
व्हर्साय येथे त्याने बांधलेल्या खास गढीमध्ये पार्ट्या आणि मेजवान्या झडत. तिथे फॅशन, संगीत, चित्रशिल्पकला, नृत्य व नाट्यकला, पाककला यातल्या उच्च दर्जाच्या कलाकृती अनुभवायला मिळत. तिथे प्रवेश मिळण्यासाठी तुमच्या कपड्यांचा, आभूषणांचा दर्जा फारच वरचा असणे अपेक्षित असे. या ‘वरच्या’ दर्जाचे काही अलिखित नियम होते. ज्या नियमांमध्ये अतिशय महागड्या आणि दुर्मिळ वस्तूंचा समावेश होता. या वस्तू फ्रान्समध्येच बनलेल्या असत. तिथे प्रवेश मिळणे हे मानाचे आणि राजाची मर्जी संपादन करण्यासाठी गरजेचे असल्याने या विलासी वस्तू ही जरुरीची गोष्ट बनली.
या वस्तूंची लाट पसरत गेली. चौदाव्या लुईने याच काळात युरोपभर युद्धेही केली. एरवी युद्धामुळे देशाची आर्थिक घडी विस्कळीत होते पण फ्रान्समध्ये बनणाऱ्या उच्च अभिरुचीच्या, चैनीच्या वस्तूंच्या विक्रीने फ्रान्सचा खजिना भरतच राह्यला.
या कालखंडाला बरोक कालखंड म्हणले जाते. भडक, उंची फॅशन, खूप जास्त सजावट या सगळ्यासाठी हा कालखंड ओळखला जातो. याच कालखंडात उंची आणि दर्जेदार काम असलेल्या कपड्यांसाठी ओत म्हणजे उच्च आणि कुत्यूर म्हणजे सुबक कारागिरी हे मिळून ओत कुत्यूर ही खास संज्ञा रूढ झाली. याचबरोबर या कालखंडात बदल, नाविन्य या गोष्टी अतिशय महत्वाच्या बनल्या. ऋतूप्रमाणे बदलणारी फॅशन ही संकल्पना याच काळात आली. त्या त्या ऋतूला योग्य अशी कापडे आणि वेश यांचे काही नियम बनले. त्या त्या ऋतूप्रमाणेच कापडांचा वापर व्हायला हवा हे बंधनकारक झाले. समाजातले स्थान टिकवायचे असेल तर ही सगळी चैन नसून गरज आहे असा सगळा माहौल होता तो अजून गडद झाला.
साहजिकच फॅशनप्रमाणे राहणी ठेवायची तर फॅशनची माहिती सगळीकडे पोचणे गरजेचे झाले. मग लाकडावर चित्र कोरून आणि रंगवून बनवलेल्या फॅशन प्लेटस अस्तित्वात आल्या. त्या बघून त्याबरहुकूम कपडे बनवून घेणे हा पायंडा पडला. फ्रान्समध्ये बनणाऱ्या चैनीच्या वस्तूंचा प्रचार व्हावा म्हणून चौदाव्या लुईने या फॅशन प्लेटसना आर्थिक पाठबळ दिले होते. नवीन फॅशन दाखवणारे चित्र इतकेच या प्लेटसचे स्वरूप नव्हते. प्रत्येक चित्राला एक शीर्षक असे, एखादी ओळ लिहिलेली असे. हा मजकूर गमतीशीर, आकर्षक तर असेच आणि अनेकदा त्यात लैंगिकतेचा सूचक उल्लेख असे जेणेकरून या फॅशनचा मोह पडावा. याच बरोबरीने छोट्या लाकडी बाहुल्यांचाही वापर फॅशनचा प्रसार व्हावा म्हणून केला गेला. सर्व बारकाव्यानिशी शिवलेली ड्रेसची छोटी प्रतिकृती या बाहुल्यांवर चढवून त्या बाहुल्या पाठवल्या जाऊ लागल्या.
यांच्यानंतर साधारण शतकाभराने सोळाव्या लुईच्या बायकोने मारी आंत्वानेतने - तीच ‘भाकरी नाहीतर केक खा’ फेम - तिने या वातावरणात अजून भर घातली. एकदा घातलेला कपडा परत घालणे हे कमीपणाचे, चुकीचे समजले गेले. काहीतरी वेगळे काम, महत्वाचा आणि महागडा बदल त्या कपड्यात केल्याशिवाय तोच कपडा परत अंगाला लागेना. फ्रेंच राज्यक्रान्तिने मारी आंत्वानेतचा, फ्रेंच विलासी जीवनाचा शेवट केला पण ओत कुत्यूर, उच्च दर्जाची कारागिरी, अभिरुची याबाबतीत फ्रेंचांचा वरचष्मा अगदी विसाव्या शतकातही कायम राह्यला.
फ्रेंच राज्यक्रान्तीनंतरही पॅरिस हे फॅशनचे मुख्य केंद्र राह्यले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, दर्जेदार शिंपीकामाचे ज्ञान असलेला कुणी एक इंग्लंडहून पॅरिसमध्ये आला. फ्रान्समधल्या एका नावाजलेल्या कापड दुकानात काम करता करता आपल्या फ्रेंच बायकोसाठी तो नव्या आणि वेगळ्या फॅशनचे कपडे बनवू लागला. ते बघून गिऱ्हाईक चौकशी करू लागले. त्यानंतर १८५८ साली त्याने पॅरिसमध्ये स्वतःच्या कुत्युर दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गाउन्स बनवून त्याचे खर्याखुर्या माणसांच्या अंगावर त्यांचे प्रदर्शन करण्याची सुरूवात केली. प्रत्येक गाऊन अंगावर घातल्यावर कसा दिसेल, हालचाली करताना कसा दिसेल वगैरे गोष्टींचे प्रात्यक्षिकच सादर होऊ लागले. ही नवीन कल्पना पॅरिसच्या फॅशन जगतामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. अश्या रीतीने फॅशन शो या संकल्पनेचा उगम झाला. ही कल्पना लढवणारा इंग्लंडहून आलेला माणूस म्हणजे चार्ल्स फ्रेडरिक वर्थ. फॅशन जगतामधला हा पहिला फॅशन डिझायनर. आपण केलेली डिझाइन्स कुणी स्वतः:च्या नावावर खपवू नये म्हणून बनवलेल्या गाऊन्समध्ये स्वतःच्या नावाचे लेबल लावणाराही हा पहिला माणूस.
वर्थने आणि त्याच्या मुलांनी १८६८ साली पॅरिसमधल्या सर्व कुत्यूर दुकानांची मिळून एक संघटना बनवली. शॉम्ब्र सॅंदिकाल दे ल कुत्यूर हे त्या संघटनेचे नाव. कुत्यूर दुकानांनी बनवलेल्या डिझाइन्सची नक्कल होउ नये हा या संघटनेचा उद्देश होता. एखादे कुत्यूर दुकान खरोखरीचे कुत्यूर आहे वा नाही याचे प्रमाणीकरण ही संघटना करत असे. या संघटनेने शिक्कामोर्तब केल्याशिवाय ओत कुत्यूरचे स्पेशल लेबल लावायला परवानगी नसे. तसेच प्रताधिकार, नक्कल वगैरे गोष्टींच्या बाबतीतही ही संघटना कुत्यूर दुकानांचे अधिकार जपत असे. संघटनेचे प्रमाणीकरण मिळण्यासाठी त्या त्या कुत्यूरियेला म्हणजे डिझायनरला अमुक एवढी पूर्णपणे नवी अशी डिझाइन्स सादर करावी लागत. वर्षातून किमान दोन वेळा नवीन कलेक्शन्स तसेच डिझायनरकडे तांत्रिक काम करणारे किमान वीस लोक पूर्णवेळ कामाला अश्याही काही अटी असत. अश्या प्रकारे चौदाव्या लुईच्या इच्छेप्रमाणे फ्रेंच फॅशनचे, अभिरुचीचे नाक त्याच्यानंतरही कैक वर्षे वर राह्यले.
आजही ही संघटना कार्यरत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे सगळेच उतरणीला लागले आहे. ओत कुत्यूर नाही पण दुसऱ्या वा तिसऱ्या दर्जावर असणारी अनेक लेबल्स अस्तित्वात आलेली आहेत. जी कुत्यूरची मागणी पुरवण्यासाठी सक्षम आहेत. मात्र अभिरुचीची दिशा ठरवणे, त्या बळावर अर्थकारणावर पकड ठेवणे असा चौदाव्या लुईचा उद्योग केवळ युरोपातच नव्हे तर जगभरात भलताच फोफावलेला आहे.
- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - सप्टेंबर २०१८ मधे प्रकाशित)
कूत्यूरोद्योग - २५ सप्टेंबर
0 comments:
Post a Comment