बरेच दिवसांपासून वाचेन म्हणत होते ते शेवटी काल संपवलं वाचून.
इथे लिहितेय म्हणजे पुस्तक खूप महत्वाचं वाटतंय मला असं काही नाही. रादर अजिबातच नाही वाटत म्हणून हा प्रपंच. तुम्ही स्वतः किंवा जवळपासचं कोणी अमेरिकेत असेल, कधीतरी अमेरिकेत राहून आला असेल तर हे पुस्तक तुमचा इंटरेस्ट टिकवून ठेवेल अन्यथा शक्यता कमी.
लेखिकेने केलेल्या मेहनतीचे कौतुक. ३०-४० वर्षांच्याही बरंच आधी अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांच्या अजिबात माहित नसलेल्या कहाण्या आणि त्यांची पाय रोवायची धडपड याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती माहिती खरंच इंटरेस्टिंग आहे. इथे माझ्यादृष्टीने या पुस्तकाचे प्लस पॉइंटस संपले.
पुस्तकात अमेरिकेबद्दल वाईट लिहिले हो म्हणून ज्यांच्याबद्दल रडले गेलेय त्या रमेश मंत्री, सुभाष भेण्डे आणि बाळ सामंत यांचंही काही वाचलं नाही. रमेश मंत्री आणि सुभाष भेण्डे दोघांची अमेरिकेबद्दलची जी पुस्तकं होती त्याची मुखपृष्ठ आवाज-जत्रा टाइपची चावट असल्याचं आठवतंय (हा समजुतीचा घोटाळा असू शकतो) त्यावरून त्या पुस्तकांना हात लावायची गरज वाटली नाही. अमेरिकेतील सर्वांनी ह्या लेखकांना सिरीयसली घेऊन फार दु:ख करून घेतले हे लेखिकेचे म्हणणे थोडे जास्त बढाचढाकेच वाटते.
एकुणात रिपिटेशन प्रचंड आहे. काही अंशी भारतात राह्यलेल्यांना धडा शिकवायला अधोरेखित केलेले मुद्दे असल्यासारखे वाटले.
३०-४० वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या पिढीच्या धाडसाबद्दल जे लिहिलेय त्याचे कौतुक आहे निश्चित पण ज्यांच्यात धाडस होते ते अमेरिकेत गेले आणि ज्यांच्यात धाडस नव्हतं ते भारतात राहून नुसतेच टोमणे मारत राह्यले अश्या प्रकारचे ठोकताळे पटले नाहीत. त्या बाबतीत हे पुस्तक प्रचंड एकांगी होते.
काही मुद्दे तर अगदी डोक्यात जाणारे. देशात आल्यावर हक्काने उकडीचे मोदक खायला आत्याकडे जायचं असेल तर आत्याने मुलीसाठी स्थळ बघ म्हणलेलं का खटकावं बुवा? किंवा तिने विकतचे मोदक वाढले तर आत्यापण आता थकलीये आणि काळ बदललाय याची जाणीव न होता हृदय का भळभळावं?
एकुणातच भारतात महिन्याभराच्या सुट्टीसाठी आल्यावर झालेल्या बदलांनी केलेले अपेक्षाभंग फारसे पचनी न पडलेले सगळ्या अनुभवांच्यात लक्षात येतं. पण भारतातल्या आपल्या घरांमधे बदल होणारच यातली अपरिहार्यता का कळत नाही? किंवा का समजून घेता आली नाही? ते बदल म्हणजे जखम असल्यासारखं उराशी का बाळगलं गेलं हा प्रश्न सतत पडत होता. भारतात आल्यावर सतत प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत आमच्याकडे असं नाहीये असं म्हणण्याबद्दल 'आपल्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून खरी परिस्थिती लपवली' हे जरा जास्तच उगाच सारवासारव केल्यासारखं होतं. नाहीच पटलं. इथल्यांच्या प्रत्येक कुजक्या शेर्याटोमण्यांनी घायाळ होणार्यांना आपल्याकडून असे शेरेटोमणे जात नाहीयेत ना याचं भान का उरलं नाही म्हणे?
मात्र यासंदर्भात अमान मोमीनांचा पुस्तकात आलेला दृष्टीकोन एकदम रिफ्रेशिंग आणि जास्त प्रॅक्टिकल वाटला मलातरी.
शेवटाला येताना इकडचे-तिकडचे हा वाद संपवायच्या गोष्टी करत करत लेखिका परत इकडचे-तिकडचेची पाचर मारूनच ठेवते.
एकुणात ठराविक अजेंड्यासाठी 'लिहून घेतलंय' की काय पुस्तक अशी शंका आल्याशिवाय रहात नाही.
ज्यांनी वाचले नसेल त्यांनी नाही वाचले तरी आयुष्यात काही बिघडणार नाही. अर्थात भेळेचा कागदही वाचून काढण्याइतके वाचन अंगी मुरले असेल तर घ्या बापडे...
- नी