Thursday, February 5, 2009

मिनीची आई

हा लेख मी माझ्या आईच्या, प्रा. माधवी पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त (४ नोव्हेंबर २००८) लिहिला होता. पुणे लोकसत्ता मधे प्रसिद्ध झाला होता पण त्यांनी संपूर्ण न छापता शेवटचा काही भाग जागेअभावी गाळला होता. तस्मात पूर्ण लेख इथे लिहित आहे.
--------

वाड्याच्या ओट्यावर छोटीशी मिनी बसलेली असते. आईला टाटा करत असते. मिनीची आई, गोरीपान, एक वेणी आणि खांद्याला पिशवी. "रडायचं नाही हं. अण्णांना आजीला त्रास द्यायचा नाही. आई क्लासला जाउन दोन तासात येईलच हं." आई सांगते. मिनी हसत हसत टाटा करते. आठवणींचा तळ गाठायचा झाला तर मिनीला आईची पहिली आठवण आहे ती ही. चांदणं फुलल्यासारखा आईचा लख्ख हसरा चेहरा मिनीला आजही लक्षात आहे.

गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरला रात्री मात्र ते चांदणं हरवलं होतं. आई हॉस्पिटलात होती. ती हसत नव्हती. चेहरा वेदनेनं पिळवटून निघाला होता. "नाही सहन होत गं आता. तुला माझा पॅनही उचलावा लागतो. कसतरी वाटतं." आईचा त्रास पाऊन मिनी कळवळली होती. पहाटे कधीतरी आईला ग्लानी आली होती. चेहर्‍यावर वेदनांचं जाळं. एवढीश्शी झालेली आई. बेडच्या बाजूला उभं राहून मिनी तिच्याकडे पहात होती. मिनी खूप घाबरली होती. लहानपणी दोन तासासाठी केलेला टाटा आता कायमचा तर ठरणार नाही ना ही भिती मिनीचा जीव खाऊन टाकत होती. आणि तसंच झालं ४ नोव्हेंबर २००७ च्या दुपारी सगळं असह्य होऊन आई अज्ञाताच्या प्रदेशात निघून गेली. आईच्याच एका कवितेतल्याप्रमाणे प्रकाशाची झाडं शोधायला.

१० वर्षं मिनीच्या आईनी आजाराशी लढाई केली. एका बाजूला लढत असतानाच विद्यार्थ्यांन समरसून शिकवणं, कॉलेजातले त्रास सहन करणं, स्वतःचा कवितासंग्रह प्रसिद्ध करणं, मिनीचं परदेशातलं शिक्षण आणि मग परत आल्यावर लग्न नी तिचे सणवार असं सगळं अगदी यथासांग पार पाडलं. हसतमुखानी. झाला त्रास उगाच ओठ मिटून सहन केला नाही आणि आपल्या त्रासाने सगळ्यांनी अडकावं असं अपेक्षिलंही नाही.

उगाचच त्यागमूर्ती बनण्यातलं फोलपण तिने वेळीच जाणवून दिलं होतं मिनीला पण स्वतःच्या पलिकडेही विचार करायचा असतो याचं प्रात्यक्षिक ती रोजच देत होती. चूल मूल किंवा नुसती खर्डेघाशी या पलिकडे अस्तित्व असायला हवं याची ठिणगी मिनीच्या मनात आईनीच पेटवलेली होती. मुलीच्या जातीला.. या पठडीतला राग आईनी कधी आळवला नाही. पण त्याचवेळेल मुलगी म्हणून बाहेर फिरताना काय काय सामोरं येऊ शकतं याबद्दल सावध मात्र नक्कीच केलं. दिवाळीचा फराळ, पापड, वाळवणं इत्यादी स्पेशल 'करण्या'च्या गोष्टीत मिनीला नको असताना आईनी कधी ओढलं नाही. वेळ येईल तेव्हा करशील नाहीतर मिळतं हल्ली सगळं विकत. इतका साधा दृष्टीकोन असायचा आईचा. मुलींना घरात ज्या ज्या गोष्टींमुळे अडकावं लागतं आणि मग बाहेर काही करण्यावर बंधनं येतात अश्या सगळ्या गोष्टीतून मिनीला आईनी मोकळं केलं होतं. घरत पाहुणे येणार आहेत, घरात अमुकतमुक व्रताची पुजा आहे असल्या सगळ्या वेळी 'शाळा/ कॉलेजची लेक्चर्स बुडवायची नाहीत. तू तुझ्या कामांना/ अभ्यासाला जा.' अशी मोकळीक आईनी दिलेली होती. पण आई बरीचशी महत्वाची व्रतवैकल्यं नेमाने करायची. अर्थात त्याचं फार अवडंबर न माजवता आणि फार घोळ न घालताच. उपास करणे म्हणजे पोटाला विश्रांती, सव्वाष्ण घालणे म्हणजे रोजच्यातली नसलेल्या कुणा ओळखीच्या बाईशी संपर्क असा साधा सरळ दृष्टिकोन असे. आणि यातल्या कुठल्याच गोष्टींचं मिनीवर बंधन असं नसे. वर्षातले दोन उपास मिनीला आई करायला लावायची पण पुढे दौर्‍यानिमित्त पुण्याबाहेर आणी मग नंतर शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर हे ही उपास सुटले तेव्हा त्याचा बाऊ तिने केला नाही. 'तुला पटतंय आणि झेपतंय ते कर. नाही केलं तरी काही बिघडत नाही.' इतकं साधं सरळ लॉजिक असायचं तिचं या बाबतीत.

झेपतंय तितकंच करण्याचं लॉजिक डोळसपणे जगण्याला लावलं नाही आईनी. जे जगतो ते विचारांच्यातही पटलेलं हवं हा तिचा आग्रह असायचा. मिनीच्या प्रत्येक कृतीवर ती प्रश्न विचारायची. भांडण व्हायची. मग मिनीही ते प्रशन घेऊन आपले निर्णय तपासायची. आपंच आभाळ स्वच्छ करत असायची.

वाचण्याचंही तेच. 'झेपणं बिपणं काही नाही वाचलंच पाहिजे.' हा आग्रह तिचा नेहमीच असायचा. मिनीची सगळ्यत मोठ्ठी चैन म्हणजे नेमाने मिळणारी गोष्टींची पुस्तकं. मिनी दोन दिवसात नवीन पुस्तकांचा फडशा पाडायची आणि परत आ वासायची. मुलगी वाचतेय या जाणिवेनं आई खुश व्हायची. अगदी लहान वयात मिनीला वेगळी लायब्ररी लावून दिली होती आईनी. तिथे जायचं, पुस्तक शोधायचं, बदलायचं सगळं काही एकदा दाखवून मग मिनीवर सोडून दिलं होतं. पण लहान वयात काय वाचतेय नक्की मुलगी याच्याकडे लक्ष असायचंच तिचं. वाचायच्या नादापायी मिनी बोलणीही खायची पण आईनी कधी पुस्तकापासून दूर नाही केलं मिनीला. वाचायची सवय आईनी लावलीच पण वाचलेल्यावर लिहायलाही लावलं. वाचलेल्यावर लिहिणं, परीक्षण म्हणजे काय याचे पहिले धडे १०-११ वर्षाच्या वयातच मिनीने आईकडूनच गिरवले होते.

वाचलेल्यावर लिहिण्याचे धडे गिरवता गिरवता मिनीनी आईकडून लिखाणाचेही धडे गिरवले. आईच्या मदतीने मिनीनी पहिली कविता लिहिली कधीतरी लहानपणी. आईनी कौतुक केलं. घरातल्या सगळ्यांना कविता दाखवली. पण मुलगी आता कवी झाली असं समजून डोक्यावर नाही घेऊन बसली. मिनीनी लिहायला हवं म्हणून मिनीच्या वेडेपणाच्या सगळ्या कळा सोसत राह्यली. असह्य झाल्या की आपल्या कवितेतून, लिखाणातून मोकळी होत राह्यली. मिनीला कवितेचं बक्षिस मिळालं, मिनीला फिरोदियामधे लिखाणाचं बक्षिस मिळालं.. एवढ्याश्या बक्षिसाने आई केवढी सुखावत रहायची. "तुला माझ्यापेक्षा चांगलं लिहीता येतं. तू लिहित रहा गं." आई म्हणायची. आईशी भांडायच्या काळात तिच्या प्रत्येक गोष्टीला नाकारताना मिनीनी लिहिणंही नाकारलं. आई कळवळली असणार पण काही म्हणाली नाही. आणि एकदा अचानक बांध फुटल्यासारखी मिनी लिहायला लागली. मग तिला मिळालेल्या बक्षिसाच्यावेळी आजारातही सगळं सहन करत मिनीसाठी समारंभाला आली होती. मिनीपेक्षा बहुतेक आईच खुश झाली होती.

तेव्हा वाटलं असेल का तिला की 'मुलीला आता सूर मिळाला तिचा. आता आपली गरज संपली' ? म्हणून गेली असेल का त्यानंतर महिन्याभरात निघून? प्रकाशची झाडं शोधायला असं सगळ्यांनाच सोडून जावं लागतं का? आईचा कवितासंग्रह हातात धरून मिनी विचार करते. उत्तरं मिळत नाहीत.

कसं जगायचं असतं आईशिवाय? निपचित अश्या आईकडे बघत मिनीनी आईलाच विचारलं होतं. आईनी काही उत्तर नाही दिलं. ती तशीच निपचित होती. हिरवी साडी, कपाळावर कुंकू, तोंडात तुळशीपत्र. सगळा शेवटचा साज मिनीने केला आईला. लहानपणी आई मिनीला तिटीपावडर लावून द्यायची ज्या प्रेमानं तसाच अगदी. आईचा चेहरा तेव्हा वेदनारहीत झाला होता.

मिनीला आईबरोबर शेवटपर्यंत रहायचं होतं. आगीच्या तोंडात आईचा देह अस ढकलून देताना पाह्यला तिने. त्या आगीत जाताना आईला खूप भाजलं असणार. आई त्रासली, ओरडली असेल. आपण काही करू शकलो नाही. विद्युतदाहिनीची झडप बंद झाली. आपण सगळे तिला तसंच तिथं सोडून निघून आलो. तिच्या एवढ्या हौसेच्या घरातून तिला बाहेर काढलं आपण आणि असं आगीच्या तोंडी देऊन आलो. मिनी आजही स्वतःला माफ करू शकत नाही.

आई नसलेलं हे पहिलं वर्ष मिनीच्या झोळीतलं. आईशिवाय जगणं हे ही आईकडूनच शिकतेय मिनी. मिनी खूप लहान होती. मिनीची आज्जी, मिनीच्या आईची आई आजारी होती म्हणून आईची धावपळ चालत असलेली मिनीला आठवतेय. मग एकदा मिनीनी विचारलं होतं "आज्जी कुठंय?" आईनी मिनीला समजावलं होतं, "आजी खूप आजारी आहे म्हणून तिला मामाकडे नेलंय." आईचा गळा कोंडला होता बहुतेक. मिनीला तसं कळलं नव्हतं पण परत हा प्रश्न विचारायला नको एवढं मात्र नक्की कळलं होतं. स्वतःच्या आईच्या आठवणी काढून हसणारी, उदास होणारी आई मिनीनी लहानपणापासून पाह्यली होती. स्वतःच्या आयुष्यातला हा मोठ्ठा खड्डा मिनीला कधी दिसू दिला नव्हता आईनी.

मिनीनी वचन दिलंय आईला. आईला भेटायला त्या आगीत शेवटी जाणारच आहे मिनी. आपला देह तिथे पोचेपर्यंत आईनी दिलेले वाचनाचे, लिखाणाचे, डोळसपणे जगण्याचे आणि आईशिवाय जगण्याचेही वळसे मिनी नक्कीच गिरवत रहाणार आहे.

-नी

Search This Blog