Showing posts with label बातमी. Show all posts
Showing posts with label बातमी. Show all posts

Monday, November 8, 2010

हितगुज दिवाळी अंक - २०१०

मायबोलीचा (www.maayboli.com) हितगुज दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.
मायबोलीच्या दिवाळी अंकापासून साधारण ११ वर्षापूर्वी ऑनलाइन दिवाळी अंक ही संकल्पना सुरू झाली आणि मग ती अनेकांनी उचलली.
यावर्षीच्या दिवाळी अंकाची खासियत म्हणजे चार ठराविक विषय. 
    * रंग उमलल्या मनांचे
    * निसर्गायण
    * कला आणि जाणिवा
    * वेगळ्या वाटा,नवी क्षितिजे
या चार विषयांना वाह्यलेला हा अंक आहे.
मुखपृष्ठ थोडं चाकोरीपेक्षा वेगळं आणि कलात्मक आहे. साधेपणा हे या अंकाचे वैशिष्ठ्य आहे. विषयानुसार आणि लेखनप्रकारानुसार दोन्ही पद्धतीने सर्व लिखाणाची वर्गवारी केलेली असल्याने शोधायला सोपे जाते.
या अंकाचा दुवा
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2010/index.html

या अंकामधे कला आणि जाणिवा या भागात मी एका चित्रकाराची थोडी माहिती देणारा लेख लिहिला आहे. चित्रकाराचे नाव आहे जाँ मिशेल बास्किया. माझ्या लेखाचे शीर्षक आहे 'सेमो म्हणे'. हा लेख या अंकात वाचा इथे http://vishesh.maayboli.com/node/762

- नीरजा पटवर्धन

Wednesday, July 28, 2010

कलात्म

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कलाजगताबद्दल एक विशेषांक काढला आहे माइंड अ‍ॅण्ड मिडीया या संस्थेने.
एकूण दोन भागात असलेल्या या विषेशांकाचे नाव कलात्म असे आहे. अतिथी संपादक स्वतः डॉ. श्रीराम लागू आहेत. ऐल आणि पैल असे दोन भाग आहेत. एकूण मिळून साधारण ८० लेख आहेत.
रवी परांजपे, डॉ. द भि कुलकर्णी, प्रभा अत्रे, शांता गोखले, सुरेश तळवलकर, मीना कर्णिक, श्यामला वनारसे, शमा भाटे, सुधीर गाडगीळ, विठ्ठल उमप, माधव वझे, वामन केंद्रे, प्रवीण भोळे, कमलेश वालावलकर, दासू वैद्य, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, राजन खान, चंद्रकांत कुलकर्णी, रंगनाथ पाठारे, नागराज मंजुळे, मंगेश हाडवळे, समीर विद्वांस, वैभव आरेकर, चैतन्य कुंटे, हिमांशू स्मार्त अश्या अनेक विविध कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या लेख/ मुलाखतींबरोबरच कलाकारण या विभागात सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे अश्या काही राजकारणी लोकांशी केलेली कलाविषयक बातचीत हे ही आहे.
संग्रही ठेवावेत असे अंक आहेत.
हे दोन अंक आणि संजय आवटे यांचं कला कल्पतरूंचे आरव - आनंदाचे झरे जपायचे कसे? हे पुस्तक असा संच सध्या सवलतीच्या दरात (रू. ३००) उपलब्धही आहे. त्यासाठी 08975969338 - ऋतुजा मुळे या क्रमांकावर संपर्क करा.

जाता जाता माझाही एक लेख यात आहे. पण माझ्या लेखापेक्षा काही खरंच खूप महत्वाचे लेख आहेत म्हणून हे इथे सांगतेय.

Wednesday, April 21, 2010

बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.

आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=63994:2010-04-20-18-24-39&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.


तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा हा स्कॅन. वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.



हे असं खोटं छापून येण्याची ही पहिली वेळ नाही.

'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक हे संदीप सावंतच होते. पटकथा आणि संवादही संदीप सावंत यांचेच होते.
अरूण नलावडे यांचा चित्रपटाच्या दिग्दर्शनाशी काहीही संबंध नाही. ते निर्माते आणि प्रमुख नट होते.
तरीही आजवर अनेकदा लोकसत्ताच नाही तर इतर विविध मोठ्या वृत्तपत्रांमधेही अतिशय सहजपणे दिग्दर्शकाच्या नावाच्या ठिकाणी अरूण नलावडे यांचेच नाव बिनदिक्कतपणे छापून आलेले आहे.

चित्रपटाच्या श्रेयनामावली मधे ही चूक नाही. नटमंडळी आणि तंत्रज्ञ(यापैकी मी एक) यांच्याही मनात दिग्दर्शक संदीप सावंतच याबद्दल संभ्रम नाही.

तरीही ही चूक अधूनमधून कोणी ना कोणी करत असतंच.

याला काय म्हणायचं?

नटालाच केवळ ग्रेट मानण्याच्या सामान्यांच्या वृत्तीतून पत्रकारही सुटले नाहीत असं मानायचं?
कि दिग्दर्शक आणि प्रमुख नट यात मोठा फरक असतो हेच या पत्रकारांना समजत नाहीये?
कि जाणूनबुजून नरो वा कुंजरो वा करत काही व्यक्तींकडून पत्रकारांची दिशाभूल केली जातेय?
कि लोकांची दिशाभूल करण्याचं काही व्यक्तींनी कंत्राटच दिलंय?

आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?

आजवर आम्ही (मी आणि संदीप सावंत) यासंदर्भात सार्वजनिकरित्या कधी बोललो नव्हतो. पण हा हेतुपुरस्सर वा हलगर्जीपणाने केला गेलेला माहितीचा प्रसार आता आमच्या नवीन कामासाठी त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे हे बोलण्याची गरज पडली आहे.

Monday, January 18, 2010

ब्लॉग, ब्लॉगर्स, ब्लॉगिंग....

दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी दुपारी  ४ वाजता पुण्यातल्या पु.ल.देशपांडे उद्यानात मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा पार पडला. ही कल्पना सुचलेल्यांचे आणि सुचल्यानंतर ती सत्यात उतरवणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. आभारसुद्धा!


मेळावा छान झाला अनेक अर्थाने. अनावश्यक औपचारीकता वगळलेली होती पण तरी उगाच अघळपघळ स्वरूप नव्हते. थोडक्यात, सुटसुटीत पण तरीही खूप काही महत्वाच्या गोष्टींची सुरूवात म्हणून मानला जाईल असा छान मेळावा.

मेळाव्यामधे काही छान मुद्दे मांडले गेले आयोजकांकडून आणि माध्यमाइटस वाल्यांकडून (योगेश जोशी आणि प्रसन्न जोशी). तसंच प्रत्येक जण स्वतःची थोडक्यात ओळख करून देत असताना त्यातूनही काही चांगले मुद्दे चर्चेत आले.

ते सगळे एकत्रित स्वरूपात असे...
१. एकूण साहित्यविश्वातलं आणि आयुष्यातलं ब्लॉगिंगचं स्थान, महत्व, कारण इत्यादी.
२. ब्लॉगवरील उस्फूर्त लेखन हा साहित्याचाच भाग असल्याने साहित्य संमेलनाध्यक्ष द.भि.कुलकर्णी यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ब्लॉगबद्दल बोलण्यासाठी निवेदन देणे
३. मराठी ब्लॉगर्सचे एकत्रित अस्तित्व म्हणून गूगल किंवा याहूग्रुपची सुरूवात करणे
४. ब्लॉगसंबंधी तांत्रिक माहीतीची देवाणघेवाण
५. ब्लॉगद्वारे किंवा ब्लॉगिंग चळवळीद्वारे काय काय घडवता येऊ शकते, साध्य करता येऊ शकते
६. ब्लॉग किंवा ऑनलाइन लिखाणातून होणारे वाङ्मयचौर्य आणि त्याबाबतीत काय करता येऊ शकते.
७. मराठी भाषेच्या उत्कर्षाविषयी केले जाणारे प्रयत्न.

हे सगळं चर्चून झाल्यावर वैयक्तिकरित्या ब्लॉगर्सनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि मग हळूहळू सगळे पांगले.

यापुढे...
माझ्यासारख्या केवळ स्वान्त सुखाय ब्लॉग लिहिणारीला किंवा खरंतर कळ आल्यावर रहावत नाही म्हणून लिहिणारीला सगळी चर्चा, उद्दिष्टे पटली असली तरी पचतीलच, झेपतीलच असं नाही. उदाहरणार्थ मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काही प्रयत्न करणे. मी मराठीत लिहित असले तरी ते मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी नव्हे. मला मराठीतंच व्यक्त होता येतं म्हणून मी मराठीत लिहिते. माझ्या लिखाणात बरेचसे शब्द मराठी येत असले तरी प्रत्येक विंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द असं मी करत नाही किंवा अश्या अट्टाहासाने मराठीचा उत्कर्ष होईल असा काही माझा गैरसमज नाही. यातला फोलपणा राजीव सरांनी कधीच समजावून दिलेला आहे. मग मी मराठी भाषेला तारक काम करते की मारक.. माहीत नाही..

ऑनलाइन किंवा ब्लॉगवरच्या वाङ्मयचौर्याच्या समस्येसाठी परिणामकारक कायदे/ नियम आणि यंत्रणा अजूनतरी अस्तित्वात नाहीत.  मराठी ब्लॉगर्सचं किंवा एकुणात सर्वच ब्लॉगर्सचं एकत्रित अस्तित्व या गोष्टी अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करू शकेल का? कुणी वकील ब्लॉगर किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइटस संदर्भात काम करणारं कुणी मार्गदर्शन करू शकेलच. अचाट महत्वाकांक्षी कल्पना आहे पण याबाबतीत विचार करायला काय हरकत आहे नाही का?

मेळाव्याबद्दलचे बाकीचे वृत्तांत इथे बघू शकता..


- नी

Friday, November 20, 2009

ब्लॉग माझा

आज सकाळी एक मेल येऊन थडकली मेलबॉक्समधे.
त्यात लिहिलं होतं की माझ्या आतल्यासहीत माणूस या ब्लॉगला म्हणजे तुम्ही आत्ता वाचताय त्या माझ्या ब्लॉगला स्टार माझाच्या मराठी ब्लॉगस्पर्धेत दुसरं बक्षिस मिळालं.
मलातरी आनंद झाला बुवा आणि तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याचा मोह काही आवरला नाही. स्वतःचं कौतुक करून घ्यायला कोणाला आवडत नाही. (तुम्हालाही आवडतंच की!)तर म्हणून हे पोस्ट..

हा पूर्ण रिझल्ट.
RESULT OF BLOG MAJHA 2009 COMPETITION

FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra
http://manatale.wordpress.com

Neeraja Patwardhan
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

Dipak Shinde
http://bhunga.blogspot.com

REMARKABLE PARTICIPATION:
Hariprasad Bhalerao
www.chhota-don.blogspot.com

Devdatta Ganar
http://maajhianudini.blogspot.com/

Medha Sakpal
www.medhasakpal.wordpress.com

Salil Chaudhary
www.netbhet.com

Pramod Dev
http://purvaanubhava.blogspot.com/

Raj Kumar Jain
http://rajkiranjain.blogspot.com

Minanath Dhaske
http://minanath.blogspot.com

Vijaysinh Holam
http://policenama.blogspot.com

deepak kulkarni
http://aschkaahitri.blogspot.com/

Anand Ghare
http://anandghan.blogspot.com

-नी

Sunday, September 27, 2009

उत्तेजनार्थ...!

'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं.
मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं.

दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी. तो काही यावर्षी आला नाही तेव्हा मी आपलं मला केळं मिळालं असं समजून चालले होते. आणि अचानक आज कळलं अगदीच केळं नाही तर निदान उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं.

असो तर बातमी ही की माझ्या कथेला उत्तेजनार्थ का होईना बक्षिस मिळालंय. ब्लॉगवर पिडीएफ कशी चढवायची हे शिकले की त्या कथेची ही लिंक इथे टाकेन. साप्ताहिक सकाळच्या आज प्रसिद्ध झालेल्या कथा विशेषांकात माझी कथा छापलेली नाहीये पण पुढच्या एक दोन अंकांमधे ती छापली जाणार आहे.

उत्तेजनार्थ का होईना १२००-१५०० च्या गठ्ठ्यातून आपण १० मधे आलो हे काही छोटं प्रकरण नाही अशी स्वतःचीच पाठ थोपटत मी फेसबुकमधे स्टेटस अपडेट करायला गेले. उत्तेजनार्थ बक्षिसाचं भाषांतर Consolation Prize असं लिहिलं आणि मी थबकले.

हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले.

पण मग परत मायमराठीतला मजकुर आठवला. तिथे माझं बक्षिस उत्तेजनार्थ होतं. 'तू बरं लिहितेस गं पण काय करणार बाकीच्यांच्या कथा तुझ्या पेक्षा खूप चांगल्या होत्या. तुझी कथा पहिल्या पाचात नाही येऊ शकली. पण म्हणून निराश व्हायची गरज नाही. तू अजून चांगलं लिहावंस. अजून चांगला प्रयत्न करावास म्हणून तुला उत्तेजनार्थ बक्षिस देतोय आम्ही' असं म्हणणारं उत्तेजनार्थ बक्षिस. तेव्हा पहिल्या पाचात आलीस म्हणजे कायमच येशील असं नाही असा गर्वाचा फुगा फोडणारं, आता लिही परत पहिल्या पाचांपेक्षा जास्त चांगलं असं आवाहन करणारं उत्तेजनार्थ बक्षिस.

दहाच मिनिटात या बक्षिसाने केवढं शिक्षण केलं माझं. आणि माझं नशीब हे की हे समजायची अक्कल परमेश्वरानी माझ्या डोक्यात घातली.

तेव्हा आता त्या दिल्या अकलेला जागून तरी का होईना लिहिणे, लिहीत रहाणे क्रमप्राप्त आहे.
तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!!

-नी

Search This Blog