Wednesday, September 14, 2016

लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea)

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फाचे तुकडे
कोकाकोला
लिंबू
पुदिन्याची पाने
उंच ग्लास
दारवा
५ व्हाइट दारवा
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)
क्रमवार पाककृती: 
उंच ग्लासाच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.
ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.
मग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.
पाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.
नवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.
दारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.
गार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.
ग्लासला लिंबाची चकती खोचायची.
आणि मग चांगभलं!! 
वाढणी/प्रमाण: 
असा एक ग्लास करायचा. :)
अधिक टिपा: 
आपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.
यानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.
माहितीचा स्रोत: 
माझ्या अ‍ॅSथेन्स, जॉSज्या च्या डाऊनटाऊनात द ग्लोब म्हणून बार होता(अजूनही असेल कदाचित!). आजवर चाखलेल्या लंब बेटावरच्या बर्फाळ चहांपैकी सर्वात उत्तम त्या ठिकाणी असायचा. तिथल्या रेसिपीला इंटरनेटवरच्या रेसिपीने गुणून ही रेसिपी झालेली आहे.

- नी

कैरी मार्गारिटा व कैरी आंबा मार्गारिटा

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ:  
तयारी + ५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फ
कैरीचा रस
पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस (ऑप्शनल)
मीठ
मिक्सर
दारवा
व्हाइट/ सिल्व्हर टकिला
कुठलीही ऑरेंज लिक्यॉर - ट्रिपल सेक(Triple Seq) किंवा कॉनत्रॉ/ कॉनत्रु/ कॉन्ट्रो(Cointreau)
क्रमवार पाककृती: 
लागणारा वेळ हा कैरीचा रस काढायला लागणारा वेळ न लक्षात घेता दिलेला आहे. कैरीचा रस ही पूर्वतयारी आहे. तो विकतचा असल्यास (असतो का हे माहित नाही) त्याचे प्रमाण चव घेऊन मग ठरवावे. शक्यतो स्वतःच करावा.

कैरीचा रस काढायची पद्धत -
कैरीची साले काढून तुकडे करायचे. ते तुकडे मिक्सरमधून अगदी गंधासारखे बारीक वाटण होईल एवढे फिरवायचे. यासाठी थोडे पाणी घालावेच लागेल. पण गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नये.
हे वाटण कापडातून गाळून घ्यावे. पटकन सगळे गाळले जाणार नाही तर सरळ कापडात पुरचुंडी करून चक्क्यासारखे टांगून खाली पातेले ठेवायचे. तास दीड तास ठेवून द्या आणि कंटाळा आला की शेवटी ती पुरचुंडी पिळून घ्या.
हा रस बाटलीत/ डब्यात भरून फ्रिजात (त्याच दिवशी बनवायची असेल तर) किंवा डिप फ्रिजात (दोन तीन दिवसांनी करायची असेल तर) ठेवून द्या.
आंबा फ्लेवरही आणायचा असेल तर आपल्या आवडीप्रमाणे हापूस/ पायरीच्या व्यवस्थित पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस करून ठेवावे. हे मात्र आयत्यावेळेलाच कारण पिकलेल्या आंब्याची चव कापून ठेवल्यावर उतरते हे आपल्याला माहित आहेच.
शक्य झाल्यास प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या तासभर आधी मार्गारिटाच्या ग्लासांच्या कडा कैरी रसाने किंचित ओल्या करून त्यावर मीठ लावून ते ग्लासेस फ्रीजमधे ठेवून द्यावे.
आता प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या वेळेस करायच्या गोष्टी
एरवी मार्गारिटामधे लिंबाचा रस असतो. इथे आपण कैरीचा रस हा लिंबाच्या रसाऐवजी वापरत आहोत. लिंबापेक्षा कैरीचा रस आंबट जास्त असतो त्यामुळे आपण काढलेल्या रसाची चव घेऊन मग पाणी घालून थोडा डायल्युट करावा. मात्र डायल्युट करून स्टोर करू नये. ते आयत्या वेळेलाच करावे.
टकिला (२ भाग) + ऑरेंज लिक्योर(१ भाग) + कैरीचा डायल्युटेड रस(दीड भाग) + बर्फ (१ भाग) असे मिक्सरात घालावे एकदा फिरवावे. बर्फाचा चुरा होणे गरजेचे. हेच हॅण्ड ब्लेण्डरनेही करता येऊ शकते.
मग फ्रिजातले फ्रॉस्ट केलेले ग्लासेस काढून त्यात हे मिश्रण ओतावे. एका ग्लासामधे एकूण साधारण ७५ मिली एवढे मिश्रण ओतावे.
बर्फाऐवजी बर्फचुरा तयार असेल तर तो १ भाग बर्फचुरा आधीच प्रत्येक ग्लासात भरावा. मग मिक्सरात/ ब्लेंडरमधे वेगळा बर्फ घालू नये.
असे गारेगार झालेले ग्लास लग्गेच लोकांना प्यायला द्यावे.
आंबा फ्लेवर मार्गारिटा -
वरच्या सगळ्या मिश्रणात अर्धा भाग एवढे आंब्याचे तुकडे/ रस घालावे. मिक्सरमधून फिरवताना तुकडे/ रस अगदी एकजीव व्हायची गरज नाही. पण पिताना मोठे मोठे तुकडे किंवा रसाच्या गुठळ्याही यायला नकोत मधे मधे एवढेच फिरवावे.
चीअर्स!!!
वाढणी/प्रमाण: 
अंदाजपंचे दाहोदरसे!
अधिक टिपा: 
ओरिजिनल मार्गारिटामधे टकिला : ऑरेंज लिक्योर : लिंबाचा रस : फ्लेवर याचे प्रमाण थोडे वेगळे असते. हे प्रमाण आपण आपल्या टॉलरन्स आणि चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. कैरी-आंबा मार्गारिटा साठी मी वर दिलेले प्रमाण माझ्यासाठी आणि माझ्या मित्रमंडळींच्यात आवडलेले आहे. तुम्ही प्रयोग करून टकिला वाढवू शकता 
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, विविध ठिकाणी घेतलेली मार्गारिटाची चव, प्रयोग

- नी

Monday, September 12, 2016

सबटायटल्सच्या नावानं!!

एवढ्यातच सबटायटल्स किती विचित्र असतात यासंदर्भातले उदगार वाचायला मिळाले. ते वाचून सबटायटल्स या प्रकाराबद्दल ’जे जे आपल्यास ठावे, ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन!’ या भावनेने सबटायटल्स बद्दल काही प्रवचन करणार आहे.
तुम्हाला चित्रपट ज्या भाषेतला आहे ती भाषा येत असेल तर ती सबटायटल्स तुम्ही वाचण्यासाठी नाहीत. सिनेमा बघा. सबटायटल्स वाचण्यात आपला वेळ घालवू नका. पण ते करायचेच असेल तर निदान काही मुद्दे लक्षात घ्या.
पुस्तकाचे भाषांतर व सबटायटल्स यात भाषांतर हा समान धागा असला तरी जमीन अस्मानाचा फरक असतो. पुस्तकाचा आस्वाद घेताना पुस्तकातील मजकूर हे एकमेव साधन असते. जे मूळ भाषेत लिहिले असेल ते दुसर्‍या भाषेतही नेमकेपणाने पोचवण्यासाठीही भाषांतरीत मजकूर हेच साधन असते. त्यामुळे तो मजकूर जास्तीत जास्त नेमकेपणाने, मूळ भाषेचा लहेजा सांभाळत पण दुसर्‍या भाषेतही आपसूक वाटेल अश्या प्रकारे आणावा लागतो. कधी कधी काही संकल्पना ज्या मूळ भाषेशी निगडीत संस्कृतीत अगदीच रोजच्या असतात त्या दुसर्‍या भाषेत जाताना त्या संस्कृतीला अनोळखी असतील तर थोड्या विस्ताराने समजावून द्याव्याही लागतात. तसेच मूळ भाषेत एखादे वाक्य ४ शब्दांचे असेल तर त्याचे भाषांतर करताना ७ शब्द करण्याची मुभा नक्कीच असते.
सबटायटल्स ही चित्रपटातली मौखिक भाषा न समजणार्‍याला टेकू म्हणूनच केवळ आलेली असतात/ असायला हवीत. चित्रभाषा ही बरीचशी जागतिक असते. आणि चित्रपटात सिनेमामधे समोर जे दिसत असते, ऐकू येत असते - म्हणजे भाषा कळली नाही तरी भाषेचा ताल, बोलणार्‍याच्या स्वरांचे चढ उतार वगैरे - यातून बरेच काही पोचत असते. पोचायला हवे. याउपर जे तपशील असतात ते सबटायटल्समधून पोचतात.
चित्रपट बघतानाच ही सबटायटल्स वाचली जातात त्यामुळे बघणार्‍याला ते वाचण्यासाठी वेगळे श्रम घ्यावे लागणार नाहीत, सिनेमा बघण्याकडे त्याचे दुर्लक्ष होणार नाही अश्या प्रकारे ही सबटायटल्स ठेवावी लागतात.
फ्रेममधली मूळ अ‍ॅक्शन झाकली जाऊ नये म्हणून फ्रेमच्या तळाला सबटायटल्स असतात. पण अगदी पाताळात गेल्यासारखी तळाच्या कडेला चिकटून ठेवून चालत नाही. त्यामुळे एका सबटायटलमधे दोनच ओळी योग्य ठरतात. त्याहून जास्त ओळी सिनेमा बघायला अडथळा आणू लागतात.
तसेच फ्रेमच्या डाव्या कडेपासून उजव्या कडेपर्यंत पसरलेली सबटायटल्स चित्रपटाच्या पडद्यासाठी त्रासदायक होतील. प्रत्येक संवादाच्या वेळेला बघणारा माणूस सबटायटल्स वाचण्यासाठी डावीकडून उजवीकडे नजर फिरवू शकत नाही. चक्कर येईल ना राव असे करून! :) त्यामुळे एका दृष्टीक्षेपात ते वाक्य वाचता यावे लागते. म्हणजेच डावी व उजवीकडून साधारण मध्यात असे ते वाक्य ठेवावे लागते. म्हणून चित्रपटांमधे एका ओळीत साधारण ३७ कॅरेक्टर्स विथ स्पेस यापलिकडे जाता येत नाही असा एक नियम आहे.
म्हणजे एक सबटायटल हे एका ओळीत जास्तीत जास्त ३७ कॅरेक्टर्स (विथ स्पेस) अश्या जास्तीत जास्त दोन ओळी एवढेच असू शकते.
आता यानंतर महत्वाचा म्हणजे वाक्य बोलण्यासाठी लागलेला वेळ. एक वाक्य बोलायला उदाहरणार्थ तीन सेकंद लागली असतील तर त्या वाक्याचे सबटायटल हे ही तेवढाच वेळ म्हणजे तीन सेकंदच दाखवता येते. ते तेवढ्यातच वाचून पुरे व्हावे लागते कारण त्या तीन सेकंदांच्या नंतर पुढचा संवाद असतो आणि पुढचे सबटायटल असते.
या सगळ्या बंधनांमुळे सबटायटल्समधे भाषा लालित्य अर्थातच कमी असते. म्हणजे आता बघा की ३७ कॅरेक्टर्समधे बसवताना शब्दाचे स्पेलिंग जितके लहान तितके बरे हे करावे लागणार. मग निवडलेला शब्द भाषालालित्य पातळीवर जरा कमी मार्कांचा असू शकतो.
सगळ्या संकल्पना जशाच्या तश्या भाषांतरीत होत नाहीत. एका भाषेत २ शब्दात जे सांगून होते ते इंग्रजीत लिहायला १० शब्दांचे वाक्य खर्ची घालावे लागते. ते तर शक्य नसते. मग कधी शब्दश: भाषांतर किंवा कधी जेमतेम सूचक भाषांतर केले जाते कारण बाकीचा मुद्दा संदर्भाने कळायला पडद्यावरची अ‍ॅक्शन असतेच.
जेव्हा चित्रपटाची मौखिक भाषा ही ग्रामीण, ठराविक लहेजाची वगैरे असते किंवा म्हणी, वाकप्रचारांचा अंतर्भाव असतो किंवा काव्यात्म शब्द असतात तेव्हा या सगळ्या बंधनात राहून केलेले भाषांतर थोडे कृत्रिमच वाटते. त्याला पर्याय नाही.
सबटायटल्स जेव्हा भाषांतरीत करण्यासाठी भाषांतरकाराकडे येतात तेव्हा ते शॉट बाय शॉट संवाद तोडलेले असतात किंवा सबटायटलचे पंचिंग जसे केले जाणार त्याप्रमाणे संवाद तोडलेले असतात. आणि ते तसेच भाषांतरीत करायचे असते.
एखादे बोललेले वाक्य लांबलचक असते. त्याचे दोन भाग पडू शकत असतात. अश्या वेळेला अनेकदा मराठीत जसे बोलले जाते त्याच्या बरोबर उलट म्हणजे दुसरा भाग आधी आणि पहिला भाग नंतर अशी रचना इंग्रजीत जास्त बरोबर असते. पण हे करता येत नाही. कारण जे बोलले आहे तेच त्या वेळेला सबटायटलमधे येणे सर्वसाधारणत: अपेक्षित असते.
अश्या अनेक कारणांमुळे सबटायटल्स हा उत्तम इंग्रजी साहित्याचा नमुना होऊ शकत नाही. अर्थात या सगळ्या मुद्द्यांना विचारात घेऊनही सबटायटल्स भाषांतरीत करणार्‍या व्यक्तीच्या कौशल्याचेही योगदान महत्वाचे असतेच.
सबटायटल्स म्हणजे काहीतरी विचित्र भाषांतर अश्या प्रकारच्या टिप्पण्या करण्याआधी हे सगळे ध्यानात घेतले जावे एवढीच एक अपेक्षा.
बाकी हल्ली सगळेच सूज्ञ, तज्ञ वगैरे असतातच..

- नी

Search This Blog