Sunday, December 27, 2015

दोदोल - गोवन किरिस्ताव स्वीट पण संपूर्ण शाकाहारी.

लागणारा वेळ: 
दीड ते दोन तास
लागणारे जिन्नस: 
kala-gool.jpg
२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर कुठे मिळत असल्यास माहित नाही. गोवन कॅथलिक मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना विचारावे. पण या गुळाशिवाय दोदोलची योग्य चव येणार नाही.
हा काळा गूळ/ माडाचा गूळ (सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता.  )
१ टेबलस्पून गव्हाचे पीठ
चिमूटभर वेलदोडा पूड
१०-१२ काजू अर्धे केलेले. आणि हवे असल्यास बदाम

क्रमवार पाककृती: 
१. काळा गूळ बारीक किसून घ्या
२. नारळाचे दूध, नाचणीचे पिठ, काळा गूळ एकत्र करा. गुठळ्या रहाणार नाहीत आणि गूळ पुरा विरघळेल असं बघा. मी हॅण्ड ब्लेण्डरने मिक्स केलं.
३. ज्या पॅनमध/ ट्रेमधे किंवा कपांमधे दोदोल सेट करणार त्याला आधीच तुपाचा/ खो तेलाचा हात लावून घ्या.
४. जाड बुडाच्या पॅनमधे तूप/ खो तेल घाला. तापायला आले की त्यात काजू, बदाम वगैरे टाका. खरपूस परतून घ्या. गॅस कमी करा. मंद आचेवर ठेवा.
४. ना दूध, गूळ आणि ना पिठ असं मिश्रण या पॅनमधे सोडा. एका हाताने ढवळत रहा. आता गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत रहावे लागेल.
५. थोडा घट्टपणा येऊ लागला की वेलची पूड भुरभुरा. ढवळत रहा. मग १ टेबलस्पून गव्हाचे पीठ पण भुरभुरा. ढवळत रहा.
६. मिश्रण घट्ट होऊ लागले, कडा सोडू लागले आणि साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा.
७. पॅन/ ट्रे किंवा कप्समधे ओता. अर्धा तास गार व्हायला आणि सेट व्हायला द्या.
८. सेट झाले की काढा. वरून काजूने डेकोरेट करा. खा. गरम किंवा गार दोन्ही उत्तम लागते.

हे तयार झालेलं दोदोल.
वाढणी/प्रमाण: 
साधारण ७-८ कपकेक्सचे मोल्डस भरतील
अधिक टिपा: 
वड्या काढल्याप्रमाणे ट्रेमधे ओतून मग कापून याच्या वड्या पाडता येतील. किंवा छोटे छोटे कप्स भरता येतील.
वड्या म्हणलं तरी या कडक वड्या होत नाहीत. तश्या दुलदुलितच रहातात. म्हणूनच म्हणे त्याचं नाव दोदोल आहे असं एका गोव्यातल्या मैत्रिणीने सांगितलं होतं.
गोव्याला एवढ्यात कोणी जाणार असेल तर माझ्यासाठी म्हापश्याच्या स्टॅण्डजवळच्या मार्केटातून प्लीज प्लीज हा गूळ घेऊन या.

Saturday, December 5, 2015

सालंकृत

हा लेख २००२ सालच्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. असंच कशावरून तरी आठवण झाली त्यामुळे लेखाचे पुनरूज्जीवन करावेसे वाटले. केले.  १३ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख त्याच्या विस्कळीतपणासकट तसाच ठेवलाय. अगदीच जेमतेम बारकेसे बदल आहेत.
---------------------------------------------------------------
कधीही कुठलाही चॅनेल लावा, आजकाल सगळीकडे सोन्याने लगडलेल्या बायकाच दिसतात. एवढे दागिने घालुनहि त्या अजून दागिने नि साड्या खरेदी करत असतात. लाख दोन लाखाचे दागिने तर त्या सहज खरेदी करतात. कल्पना करा कुणा परदेशी माणसाने हे बघितले तर त्याला वाटेल ‘सोन्याचा धूर’ निघणारा काळ तो हाच बहुतेक. 
"अरे लोकांना खायला मिळत नाही  आणि दागिने कसले खरेदी करताय! भारतात लोकांच्या तिजोर्‍यात डेड मनी बनून राह्यलेलं सोनं बाजारात आलं ना तर तेवढ्या बळावर भारत श्रीमंत बनेल.”असे मानणारेही काही जण आहेत. आता हे कसे काय घडू शकते हे कळण्याइतके व्यावहरिक शहाणपण माझ्यात नाही तेव्हा अर्थातच त्यावर नो कमेंटस.
दागिने म्हणजे नुसतं सोनं नाही पण. त्यात एक संस्कृती आहे, कला आहे. आपल्याकडच्या वेशभूषेच्या  इतिहासात दागिन्यांच्या इतिहासाला वेगळे स्थान आहे. आता मला सांगा ’उत्सव’ मधे किन्वा ’मृच्छकटीकम’ मधे जर तो दागिन्यांचा सीन नसता तर  वसंतसेनेचा आणि चारुदत्ताचा रोमान्स हा कुठल्याही इतर प्रेमिकांसारखाच वाटला असता ना. दागिन्यांच्या त्या गमतीने हा रोमान्स वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवलाय. शाहीर अनंत फंदींची तर वेगळीच गंमत आहे. बाळी ह्या कानातल्या अलंकाराची बत्तीस नावे असलेली एक लावणी त्यांनी रचलीये जी ’बत्तिस बाळ्यान्ची लावणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. यावर कडी म्हणुन परशुराम शाहीराने तेहेतीस बाळ्यान्ची नावे गुंफून चढी लावणी रचली होती अशी एक गोष्ट शाहीरी जगात प्रसिद्ध आहे.
लोकसाहीत्यात किंवा जनमानसात बांगडी फुटणे किंवा वाढणे याला एक अभद्र अर्थ आहे तसाच एक जामच रोमँटिक अर्थ पण आहे.  ”नदीच्या काठावर मी पाणी भरायला गेले असताना ’तो’ आला नि त्याने छेडाछेडी सुरु केली, त्या ओढाओढीत मझ्या बांगड्या फुटल्या. आता मी घरी काय सांगू?  कशी घरच्यांना तोन्ड देउ?” असे गाणे म्हणणारी जया भादुरी आपण सगळ्यांनीच ’अभिमान’ मधे बघितलेली आहे. 
दागिने घालताना काहीजण ’शक्तिप्रदर्शन’(वजन उचलण्याचे नि पैशाचे) म्हणून घालत असतीलहि पण दागिने घालण्याचा तो अर्थ नाहीच मुळी. शरीर सुशोभित करणे हा दागिने घालण्याचा महत्वाचा उद्देश. थोडे इतिहासात डोकावाल तर शरीर सुशोभिकरणाबरोबरच लज्जारक्षण हाही उद्देश दिसून येतो. अजूनहि काहि आदीवासी जमातीत हे दिसते. ठाकूर बायका (सह्याद्रीतले आदीवासी)  आजहि चोळीवरून पदर घेत नाहित पण मण्यांच्या माळा मात्र असतातत भरगच्च. 'बॉम्बे स्वदेशी' नाहीतर तत्सम ठिकाणी मिळणार्‍या एथनिक ज्वेलरीच्या तोंडात मारतील अश्या ह्या माळा असतात.
दागिने घालण्याचा अजुन एक उद्देश इतिहासात दिसून येतो तो म्हणजे एम्फसिस किंवा लक्ष वेधणे. त्या त्या काळाप्रमाणे स्त्री देहाच्या सौंदर्याच्या कल्पना बदलत जातात आणि तो तो भाग उठून दिसावा यासाठी दागिन्यांची योजना होते. अजंठा किंवा त्याही आधीच्या लेण्यांमधे स्त्रियांनी एक कंबरपट्टा घातलेला दिसतो. तो आपल्याला माहीत असलेल्या कंबरपट्ट्यासारखा अगदी कमरेवर न बांधता बराच खाली बांधलेला आढळतो. त्या काळामधे बरिक कंबर पोटाला हलक्याश्या वळ्या आणि रूंद नितंब  हे सौंदर्याचे लक्षण होते. हे सगळे एम्फसिस करायला तो कंबरपट्टा किंवा वेशभूषेच्या इतिहासाच्या भाषेत 'गर्डल' असायचे.
मंगळसुत्र नावाचा एक दागिना ज्याच्या मागच्या भावनेचा किंवा विश्वासाचा यच्चयावत भारतीय चंदेरी दुनियेने वापरून वापरून चोथा केलेला आहे. पण स्त्रीच्या गळ्यात इतर अनेक अश्या गोष्टी घातल्या जात ज्या तिच्या विवाहित असल्याची साक्ष देत. फार जुनी नाहि शिवकालातलीच गोष्ट आहे. जवाळी नावाची एक माळ, जिच्यात खारका, बदाम, पिस्ते असत. ही माळ ब्राह्मण नवर्‍यामुलीच्या व सव्वाष्णीच्या गळ्यात आवश्यक असे.  कदाचित सासरी हाल झाले, खायला दिले नाहि तर आपले असावे म्हणून या माळेची योजना असेल का हो? 
कोल्हापुरी साज तर आपल्या सगळ्यान्च्या परिचयाचा. ह्या दागिन्यालाही मंगळसूत्राइतकेच महत्व होते. अशुभ निवारणासाठी तसेच विविध देवतांशी संबंधित अशी अनेक प्रतिके या साजात असतात. ताईत, वाघनख, बेलपान, पानडी, कारले, दोडका, कासव, मासा, नाग, भुन्गा, मोर, शन्ख, चक्र, चन्द्र, दोन तोंडे असलेला गरुड अश्या विविध पदकांनी हा साज बनलेला असे. साजामधे आज, सारखेपणा साधण्यासाठी असेल कदाचित, ही पदके कमी झालेली आढळतात. कारले या विशिष्ट पदकाला अजुन एक वेगळा अर्थ आहे. ग्रामिण भागात आजहि काही ठिकाणी कारलं डोरलं असे म्हटले जाते. कारले हे त्याच्या आकारामुळे पुरुषाचे प्रतिक मानले जाते त्यामुळे विवाहितेच्या गळ्यात हे प्रतिक असण्याची प्रथा असावी.
संकट निवारण हा एक खुप मोठा उद्देश असे दागिने घालण्यामागचा. यासाठिच दंडावर ताईत, गळ्यात वाघनख वगैरे घालतात. पुरुष व लहान मुले यांच्या अंगावर या दोन गोष्टी जास्त आढळून येतात. दुसरेपणावर दिलेल्या स्त्रीच्या गळ्यात पुतल्यांच्या माळेत एक ’सवतीचि पुतळी' असे. मृत सवतीच्या आत्म्याने त्रास देउ नये म्हणून ही घातली जात असे.
कोळी लोकांचे आयुष्य समुद्रावर अवलंबून असते. म्हणून अर्थातच त्यांच्याकडे समुद्रपूजनच्या प्रथा आहेत. कोळी बायका उजव्या हातात फक्त चांदीचा वाळा घालतात व डाव्या हातात वाट्टेल तितक्या बांगड्या. उजव्या हातातल्या बांगड्या नवर्‍याच्या आयुष्याकरता समुद्रदेवतेला अर्पण केलेल्या असतात. 
दागिन्यांचा इतिहास हा असा थोडासा डोळ्याखालून घातल्यावर मग जेव्हा मी एकेक दागिना अंगावर चढवते तेव्हा मला प्रत्येक काळातल्या स्त्रीशी काहीतरी नातं जाणवतं.
एलकुंचवारांच्या 'वाडा चिरेबंदी’ मधली वहिनी घराण्यातले जुने दागिने चढवते नि म्हणते "खरं सांगू? असं वाटते, हे सोनं नाही नुसतं. खूप काही आहे आणखी. वाटते, देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या बायका उभ्या आहेत माझ्या अवतीभवती कौतुकानं पहात. सगळ्यांच्या मायेचा स्पर्श आपल्याला लागून राह्यला असं वाटते. किती जणींनी हे घातलं, जतन केलं. कोणाकोणाचे हात, गळे ह्यांना लागले असतील.” 
हे असं किंवा त्याहूनही खूप मोठं काहीतरी मला जाणवत रहातं.

- नीरजा पटवर्धन
------------
संदर्भ:
•    Ancient Indian Costume – Roshen Alkazi
•    मराठा कालखंडातील महाराष्ट्राचे अलंकार: (इ. स. १६०० ते १८५०) – म. वि. सोवनी यांचा थिसीस.
•    वादा चिरेबंदी – महेश एलकुंचवार
•    स्त्री-पुरुष – छाया दातार
•    शिवकालातील व पेशवेकालीन स्त्री जीवन – डॉ. शारदा देशमुख

Wednesday, October 28, 2015

तुम्ही काय करता?

"मी गोग्गोड वनिता समाज इथून बोलतेय. नटमोगरी मेकपकर यांनी नंबर दिलाय तुमचा."
मेकपकर बाईंचं नाव ऐकून मी जरा सावध झाले. नेहमीप्रमाणेच कसलीतरी प्रचंड धावपळ चालू होती. डोक्यात पुढच्या चार पाच दिवसांच्या कामांची यादी फिरत होती. त्यात मेकपकर बाईंच्या रेफरन्सने फोन.

"आम्ही ना खूप छान कामे करतो. मेकपकर बाई तर आमच्या अगदी नेहमीच्या आहेत."
मी अजूनच धास्तावले.
"२४ तारखेला आमच्या मंडळाचा कार्यक्रम आहे. तिथे आम्ही मंगळागौरीचे पारंपारिक खेळ आधुनिक गाण्यांवर करून दाखवणार आहोत. आम्ही सगळ्या नऊवारी नेसणार आहोत. आम्ही एकूण १५ जणी आहोत. तर तुम्ही येऊ शकाल का?"
"मी? कशासाठी यायचंय मी?"
"तुम्हाला नऊवारी साडी नेसवता येते ना?"
"हो येते."
"तर आम्हाला साड्या नेसवायला या तुम्ही. तुमचा रिक्षाचा खर्च देऊ आम्ही. पत्ता लिहून घेता का?"
"मला नऊवारी साडी नेसवता येते पण ते काही माझं काम नाहीये. मी कॉश्च्युम डिझायनर आहे."
"पण मेकपकर बाईंनी तर सांगितले की तुम्ही साड्या नेसायला शिकवता."
"हो शिकवते. पण ते नाटकाचे विद्यार्थी असतात. त्यांना कॉश्च्युम डिझायनिंग हा विषय असतो अभ्यासाला. तो संपूर्ण विषय मी शिकवते. त्या विषयाच्या अंतर्गत हा एक टॉपिक असतो. तो ही मी शिकवते. साड्या नेसवायला जाणे हे माझे काम नाहीये."
"पण येतं ना तुम्हाला?"
"अहो तुमच्या लक्षात येतंय का? मी कॉश्च्युम डिझायनर आहे. शूटसवर माझ्या हाताखाली कपडे नेसवायला माणसं असतात. ते त्यांचं काम असतं. मला येतं म्हणजे तो माझा व्यवसाय नाहीये."
"पण आम्ही रिक्षाचा खर्च देऊ ना."
"कुठून? विलेपार्ल्यापासून?"
"तुम्ही अमुक पेठेत राहता हे सांगितलंय मेकपकर बाईंनी आम्हाला."
"रहायचे. आता मी मुंबईत राहते."
"पण नाहीच का जमणार? मेकपकर बाईंनी आम्हाला एवढं सांगितलं होतं."
"मेकपकर बाईंना सांगा आधी कॉश्च्युम डिझायनर म्हणजे काय ते समजून घ्या." (निघाल्या प्रमुख व्हायला..!)
"आमचा अगदीच प्रॉब्लेम होणारे हो."
"मी काय करू? तुमचा प्रश्न आहे तो."

मी वैतागून फोन बंद केला. मेकपकर बाई तीनहजार सातशे त्रेपन्नाव्या वेळेला डोक्यात गेल्या.
----------------------------------
तळटिप: या किश्श्यातील व्यक्तींचे कुणा खर्‍याखुर्‍या व्यक्तींशी साम्य आढळल्यास योगायोग समजू नये
--------------------------------

- नी

Sunday, October 11, 2015

सुरक्षितता वगैरे!

'उद्याच्या दिवशी काहीही काम करावं लागणार नाहीये. उद्या 'सेफ्टी डे' आहे.' असं सर्वांना सांगितलं गेलं तेव्हा मी चकीत झाले होते. जिथे तासावर कामाचे पैसे मिळतात अश्या ठिकाणी 'सेफ्टी डे' पायी आख्खा दिवस बिनकामाचा घालवूनही कामाचे तास धरले जाणार होते. हे कळल्यावर मी अजून जास्त चकीत झाले.
युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामधे शिकत असताना, समर सेमिस्टरमधे, सॅन्टा फे ऑपेरा या समर थिएटर कंपनीत त्या वर्षी मी इंटर्नशिप करायला गेले होते. त्यावर्षी सॅन्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमधे स्टिचर अप्रेंटिस होते. तो माझा पहिलाच उन्हाळा होता तिथला. काम चालू झाल्याच्या दोन तीन दिवसातच हा सेफ्टी डे असणार होता. 'कैत्तरी फिरंगी फ्याड!' हे आलंच डोक्यात. पण प्रत्येकाला सेफ्टी डे ला हजेरी लावणे कंपलसरी होते त्यामुळे बघू तरी काय गंमत असं म्हणत दुसर्‍या दिवशी ऑपेराच्या रांचवर पोचले.
सेफ्टी लेडी नावाने ओळखली जाणारी एक इंस्ट्रक्टर लेक्चर द्यायला आली होती. आल्याआल्या तिने एक मोठे बुकलेट दिले. ज्यामधे ऑपेरा रांचवर किंवा ऑपेराच्या विविध शॉप्समधे वापरल्या जाणार्‍या वस्तू आणि त्यांच्यासंदर्भाने शक्य असलेले धोके आणि त्यासाठी घ्यायची काळजी, मस्ट डूज, मस्ट डोण्टस यांच्याबद्दल तपशीलात वर्णन होते.
हातशिलाईची सुई, सर्जींग किंवा ओव्हरलॉकिंगचे मशीन, प्रॉप शॉप वा सीन शॉपमधे वापरली जाणारी महाकाय आणि भयावह मशिनरी, कॉश्च्युम क्राफ्ट, प्रॉप शॉप, डाय शॉप, मिलिनरी, मेकप वगैरें विभागात वापरली जाणारी रसायने हे सगळंच किती आणि कसं धोकादायक आहे ते सांगितलं गेलं. हे सगळं वापरताना घ्यायची काळजी व नियम सांगितले गेले. उदाहरणार्थ हातशिलाई करताना थिंबल वापरणे कंपलसरी, सर्जर किंवा ओव्हरलॉक मशीन वापरताना हातांची पोझिशन कशी ठेवायची? सर्व मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्स कंपलसरी, विविध स्प्रे पेंटस वापरताना उघड्यावर/ मोकळ्या हवेवर वापरायचे आणि हातमोजे-सेफ्टी गॉगल्स-रेस्पिरेटर घालूनच ते काम करायचे, अ‍ॅसिटोन हाताळताना रेस्पिरेटर आणि अ‍ॅसिटोनला दाद न देणारे हातमोजे घातलेच पाहिजेत, काही मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्सबरोबर कानात रबरी बोळे वापरलेच पाहिजेत वगैरे.
हे नियम पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी काही लोक कायम रांचवर असणार होते. नियम न पाळणार्‍यांना मेमो मिळणार होते. सर्व नियम पाळून चुकून अपघात झालाच म्हणजे अगदी एखाद्या तुलनेने कमी घातक वस्तूचा/ रसायनाचा कण डोळ्यात गेला तरी तो अपघातच. तर तो झाला तर काय खबरदारी घ्यायची याचेही प्रशिक्षण झालेच. इतका छोटा अपघात असला तरी त्याची नोंद सेफ्टी रजिस्टरमधे झाली पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित रिव्ह्यू नोंद करून ठेवला जायला हवा हे ही कंपलसरी होते.
हे सगळं शिकवलं जाताना सेफ्टी लेडी जी होती ती भरपूर विनोदांची पखरण करत शिकवत होती त्यामुळे काही गोष्टी फारच पक्क्या स्मरणात राह्यल्या. उदाहरणार्थ 'सेन्सटायझेशन' ही प्रक्रिया. एखाद्या वस्तूच्या वारंवार वापराने त्या वस्तूची अ‍ॅलर्जी निर्माण होते हा या शब्दाचा थोडक्यात अर्थ. हे अर्थात ठराविक केमिकल्स/ वस्तूंच्या बाबतीतच होते. त्या केमिकल्सची यादी बुकलेटात होती. ती अर्थातच डोक्यावरून गेली. त्यातल्या एका केमिकलचे नाव घेऊन तिने सांगितले "हे म्हणजे तुम्ही वापरता ते रबर लॅटेक्स, जे ग्लोव्ह्ज आणि मेकपमधे वापरले जाते." हे एवढं सिन्सियरली सांगून मग 'आणि बघा ते लॅटेक्स कशात वापरतात ते... ' अशी टिप्पणी हवेत सोडून दिली. तिसर्‍या सेकंदाला संपूर्ण जनता खिदळत होेती. आणि सेन्सटायझेशन आमच्या डोक्यात पक्के झालेले होते.
सेफ्टी डे झाला. कामे सुरू झाली. पहिल्या वर्षी मी केवळ स्टिचिंगमधे होते आणि अप्रेंटिस असल्याने हातशिलाईच करायला लागायची बहुतेकवेळा त्यामुळे या सेफ्टी गाइडलाइन्सचा फारसा मुद्दा आला नाही. नंतरच्या उन्हाळ्यात मी कॉश्च्युम क्राफ्टमधे गेले. मग त्यावर्षी विविध प्रकारचे मास्कस ते रेस्पिरेटर्स आणि ते कश्याकश्यापासून सुरक्षितता देऊ शकतात वगैरे सगळ्यांबद्दल शिकवले गेले. रेस्पिरेटर्सची फिटींग्ज करून, माझ्या चेहर्‍याच्या आकाराला योग्य असा रेस्पिरेटर मला दिला गेला. दोन तीन प्रकारचे ग्लोव्ह्ज दिले गेले. नियमही समजावले गेले.

safety-gear.jpg
स्प्रे पेंट करण्यास सज्ज अशी मी.



















पण माझा पिंड भारतीय होता. नियम पाळण्याची चालढकल, 'चलता है!', 'इतनेसे क्या होनेवाला है!' हे सगळं हाडीमाशी खिळलं होतं. मग एकदा घामामुळे वैतागून सेफ्टी गॉगल्स बाजूला ठेवून स्प्रे पेंट करायला घेतले आणि नेमकी वार्‍याने दिशा बदलली. वाळवंटातला वारा तो, वेग आणि ताकद भरपूर. खालच्या दिशेने केलेला स्प्रे वार्‍याने उडून डोळ्यात गेला. डोळे धुणे बिणे झाल्यावर, सेफ्टी रूममधे अ‍ॅक्सिडेंट रिपोर्ट वगैरे झाला. माझाच निष्काळजीपणा होता वगैरे मी लिहून दिले. मग माझ्यावर अजूनच करड्या नजरेने लक्ष ठेवण्यात यायला लागले. कुठल्या तरी केमिकलचा वापर करताना ठराविक ग्लोव्ह्ज घातले नाहीत म्हणून मला मेमो मिळाला. यानंतर मला सेफ्टी रूममधे असे न वागण्याबद्दल आणि मी किती मोठ्या रिस्कस घेते आहे याबद्दल सांगण्यात आले. मेमोज नंतरची स्टेप पे क्ट ही होती त्या दडपणाने का होईना मला अक्कल आली आणि मी माझ्याच भल्याचे नियम पाळू लागले. हे कदाचित ऑपेरा कंपनीने कुठल्याही लॉसूटपासून किंवा तत्सम कॉम्प्लिकेशन्सपासून स्वतःचा 'अ‍ॅस वाचवणे' असेल पण नियम योग्य आणि गरजेचे होते आणि माझ्या भल्याचेच होते यात वाद नाही.
कट टू ’मेरा भारत महान!’
आपापल्या कामाच्या परिघातले, स्वत:च्या भल्यासाठी असलेले नियम पाळताना फार कमी लोक दिसतात. विविध यंत्रे, रसायने यासंदर्भाने असे नियम असतात ते पाळायचे असतात याबद्दलची जागरूकता बहुतेक मोठे कारखाने कदाचित सोडले तर बाकी कुठेही नाही. छोट्य़ा उद्योगांच्यात, शेतीसारख्या उद्योगात तर अजिबातच नाही.
सुरक्षिततेचे नियम हे आपल्याला चोचले, फ्याडं, जास्तीचा शहाणपणा वगैरेच वाटत असतात. पळवाटा काढण्यात तर आपण माहिर असतो. धबधबा, कडे, समुद्र याठिकाणी फिरायला गेलेल्यांचे अपघाती मृत्यू किंवा लोकलच्या टपावर चढल्याने वीजेचा धक्का बसून झालेला मृत्यू ही काही अतिशय चपखल उदाहरणे. हातशिलाई करणार्‍याच्या उजव्या हाताजवळ(माणूस डावरा असेल तर डाव्या हाताजवळ) बसू नये नाहीतरे सुई डोळ्यात जाईल. असं मला लहानपणापासून आजी आणि आई सांगत आल्या. आयुष्यात भरपूर हातशिलाई केलेली असल्याने त्याचे कारण आणि महत्व मला कळते. साध्या शिवणकामात असे नियम आपल्याकडे आहेत तर याचा अर्थ इतर सर्व ठिकाणीही पारंपरिकरित्या असे नियम असणार कदाचित त्याला देवाधर्माचा रंग लावलेला असेल पण नियम असणार.
मग हे सगळं कुठे गेलं? स्वतःच्या जिवाबद्दल आपण इतके निष्काळजी का आणि कधी झालो? वापरायच्या वस्तू अचानक बदलल्या गेल्याने गोंधळ होणे शक्य आहे पण नियम पाळणे आणि सुरक्षित राहणे याचे महत्व वाटेनासे का झाले? एवढा स्वतःचा जीव स्वस्त का वाटायला लागला?
इतकी अति माणसे सर्वत्र असल्याने जोवर आपला वा जवळच्यांचा जीव जात नाही तोवर माणसाच्या जीवाचे महत्व समजत नाही असे म्हणायचे का?
मला काही होणार नाही हा फालतू आत्मविश्वास कुठे जन्म घेतो नक्की? किंवा मला काही का होईना कुणाला फरक पडणारे हा न्यूनगंड आधी जन्माला येत असावा का?
प्रश्न बरेच, उत्तरे नाहीत. प्रश्नांकडे लक्ष जाणे अवघड दिसते. मधे अजून बरेच महत्वाचे प्रश्न उभे असावेत ज्यांचा पूर्ण खातमा झाल्याशिवाय यंत्रणा लक्ष देणार नाही. तर तुम्ही आम्ही निदान आपापल्या परिघापुरते सुरक्षिततेचे नियम पाळत राहण्याचे बघूया.

Saturday, September 26, 2015

गणपतीच्या आठवणी १ - गणपती बघणे आणि मिरवणूक

मी फार भाविक, धार्मिक वगैरे नाही पण पुण्यात तेही पेठांमधे वाढल्यावर गणपती आणि त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी हा माझ्या जगाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.  त्याबद्दल थोडसं..

अगदी लहानपणी म्हणजे शिशुविहारमधे असताना हिराबागेचा हलता देखावा, बाबांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे आठवतेय. स्कूटरवर मी, आई आणि बाबा फिरायचो. गणपती मंडळाच्या जवळपास स्कूटर लावायची आणि गर्दी कमी असेल तर मला चालवायचे. जास्त असेल तर मी खांद्यावर असला प्रकार. मग आम्ही तिघे स्कूटरवर मावणार नाही अश्या स्टेजला पोचलो तेव्हा आईचा गर्दीत जायचा उत्साह कमी झाला होता. बाबा आणि मी एखादा दुसरा दिवस गणपती बघायला स्कूटरीवरून जाऊन यायचो. बरेचदा लांबूनच बघितले जायचे.
विसर्जन मिरवणूक बघायला जाणे हे कर्तव्य असल्यासारखे वाटे. आई आणि बाबा दोघेही ऐन स पे मधेच वाढले. लक्ष्मी रोडपासून अगदी जवळ. त्यामुळे त्या दोघांच्याही दरवर्षी मिरवणुकीला जायच्या आठवणी होत्या. दुपारी मानाचे पहिले पाच बघायचे. घरी यायचे. संध्याकाळी लवकर जेवून मग रोषणाईचे गणपती बघायला जायचे. थोडावेळ बघून परत यायचे. मग झोप काढायची. तेव्हा काही फोन बिन नव्हतेच पण कुणीतरी चाळीत हाकारा घाले. ’मंडईचा गणपती कुंटे चौकात आला रेSSS '  की सगळी वानरसेना टक्कन जागी होऊन विजय टॉकिजच्या चौकात येऊन थांबत असे. मंडई, दगडूशेठ दोन्ही बघून घरी. आणि मग गुडुप्प. अशी आठवण आई नेहमी सांगत असे
माझ्या लहानपणीही आम्ही हेच करत असू. मात्र चाळकरी मित्रमंडळी नव्हती. दरवर्षी कोणीनाकोणी नातेवाइक पुण्यातल्या मिरवणुकीची मजा बघायला येतच असत. मग कॉलेजमधे गेल्यावर लक्ष्मी रोडच्या आसपास राहणार्‍या मित्रमंडळींची, नातेवाइकांची, मित्रांच्या नातेवाइकांची, नातेवाइकांच्या मित्रांची ओळख काढून ठिकाणा तिथे ठेवायचा आणि तिथून गणपती बघायला ये जा करायची असा प्लॅन असे.
एक वर्ष कॉलेजच्या रेडक्रॉसच्या स्टॉलवर पण बसले होते रात्रभर. सेफ वाटेल आणि जरा इंटरेस्टिंग म्युझिक असलेले मंडळ स्टॉलसमोर आले की आम्ही तिघी चौघी जणी त्यांच्या मिरवणुकीत घुसून नाचून घ्यायचो. ते पुढे सरकले की आम्ही परत स्टॉलवर.
एक अनंतचतुर्दशी फार पक्की लक्षात राह्यलेली आहे. सर्व ग्रुपपैकी मी आणि अजून एकदोन जण सोडले तर बाकी सगळ्यांनी गर्दीत जाणार नाही असा असहकार पुकारला होता. सिंहगड रोडला एका मित्राच्या घरी सगळा ग्रुप जमला होता.  त्यातच दोन मित्र मुंबईहून आलेले होते. त्या दोन मित्रांपैकी एकाशी माझी बोलाचाली बंद होती. भांडण नव्हते काही. या दोन मित्रांना पुण्याची मिरवणूक बघायचीच होती. मला जायचेच होते कारण मी पुढे भारताबाहेर शिकायला जाणार होते. तीन वर्ष गणपती अनुभवता येणार नव्हते. गणपतीची मिरवणूक अनुभवणे आणि बरोबर ज्याच्याशी बोलतच नाही तो मित्र. दुग्धशर्करा की काय तो योग. मग कधीतरी मध्यरात्री आम्ही ४-५ जण निघालो सिंहगड रोडहून चालत. पहाटेपर्यंत म्हणजे मंडई आणि दगडूशेठ जाईपर्यंत मिरवणूक अनुभवली. पण मी आणि मित्र एकमेकांशी बोललो नाही ते नाहीच. अगदी आम्ही बोलावे एकमेकांशी म्हणून बाकीचे मुद्दामून पुढे गेले आम्हाला मागे सोडून तरीही मी बोलले नाहीच. याचा फायदा झाला पुढे. तपश्चर्या फळाला आली. अखेर काही काळाने त्याच मित्राशी माझे लग्न झालेच. 
अमेरिकेतल्या तीन वर्षाच्या वास्तव्यात गणेशोत्सवात अक्षरश: तगमग व्हायची. शतकबदलाची वर्षे ती. इंटरनेट होते पण लाइव्ह स्ट्रीमिंग वगैरे गोष्टी रूळलेल्या नव्हत्या. गुगल, ऑर्कुट, फेसबुक वगैरेंचे तर अस्तित्वच नव्हते. कुणीतरी पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची टाकलेली एखादी क्लिप तीही अत्यंत लो रिझोल्युशन आणि प्रचंड बफरींग सकट यावर समाधान मानायचे. तरी त्यातला तो ढोलताशाचा आवाज आला की पाय थिरकणे वगैरे चालू व्हायचेच. ढोलताशाचा गजर ऐकून गळा दाटून वगैरे येणे तेव्हाच सुरू झाले. शिक्षण संपवून परत आले ती ऐन गणपतीतच. परत आल्याच्या दुसर्‍या दिवशी गर्दीतून माझ्या लाडक्या म-८० वरून रपेट मारून आले आणि घरी आल्यासारखे वाटले.
लग्नानंतर एक दोन वेळा मी आणि नवर्‍याने(तोच तो!) मिळून दुपारचे मानाचे पाच, संध्याकाळचे लायटींगचे काही आणि पहाटे मंडई, दगडूशेठ असे पाह्यले होते. मात्र तेव्हा हाकारे नाही. टिव्ही होता. चॅनेलवर सांगितले की मंडईचा गणपती गणपती चौकात की आमचा गणपती घरातून हाले.
ढोलताश्याच्या गजराच्या आवाजाशी, मिरवणुकीशी सगळे बाळपण जोडले गेलेले आहे. मग ते आवाज आले की घसा कोंडणे आलेच ओघाने.

Friday, August 21, 2015

रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..

आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.
मग कधीतरी हा राग थोडासा निवळायला लागला.

मुंबईकडे चाललेल्या गाडीत कुणीतरी कुणालातरी विचारलं ’तू आजच परत जाणारेस का संध्याकाळी?’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्‍या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्‍या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्‍या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्‍या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का? तर अर्थातच पोटासाठी. पुण्यातल्या हॉस्पिटलात बदली करून मिळत नव्हती काही कारणाने आणि नोकरी सोडणे परवडण्यासारखे नव्हते मग लटका.

एक मैत्रिण होती. तिची तिच्या बँकेच्या मुंबई ब्रांचला बदली झाली होती. मैत्रिणीचं माहेर पुण्यात. सासर नाशिकला. नवर्‍याची नोकरी बदली करून घेण्यासारखी नाही. बदली घेतली नाही तर नोकरी सोडायला लागायची परिस्थिती. ते शक्य नाही. नाशिकला मुलीला सांभाळणारे कोणी नाही. मग मैत्रिण मुलीला घेऊन चक्क माहेरी रहायला आली. आठवडाभर तिची आई सांभाळे मुलीला आणि ही रोज पु-मु अपडाऊन. शनिवारी नवरा पुण्यात येत असे या दोघींना भेटायला किंवा कधी ही जात असे.  माहेरी रहायचं, मूल आईच्या भरवश्यावर सोडायचं या सगळ्याचं नाही म्हणलं तरी दडपण येतंच. मग ते कमी करायला माहेरी जेवढा वेळ घरात असे तेवढा वेळ जास्तीत जास्त घरातली कामं करायची. पैशाने मदत करायची वगैरे आलंच. ती सांगायची पासमुळे मिळेल ती गाडी, मिळेल तिथे बसून पुण्याला परत येता येते. बसायला नीट सीट मिळाली तर तेवढाच आराम मिळतो. नाहीतर मग दारात, कधी कुठल्या लांब पल्ल्याच्या तीन टियरवाल्या एक्स्प्रेसच्या वरच्या बर्थवर किंवा दोन सीटसच्या मधोमध जमिनीवर असं कुठेही बसून यावे लागते.

अशा हजारो कहाण्या. सगळ्या नोकरीपायी धावणार्‍या, घरातून बाहेर पडायची आणि पोचायची वेळ अशी की कुणाशी काही संवाद व्हायची सोय नाही पण घरच्या जबाबदार्‍या पार पाडल्या नाहीत तर टोमणे हाणायला सगळे तयार. बहुतेक सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. सुट्टीचा दिवस हा अपराधभावाने केवळ घरासाठी लिहून दिलेला. शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती ही फक्त रेल्वेच्या प्रवासात.

बसायची जागा मिळणे आणि तिथे थोडावेळ शांतपणे बसता येणे, सगळं काही विसरता येणे, आपल्यासारख्याच बाकीच्या सगळ्यांबरोबर थोडेसे हास्यविनोद करता येणे हे एकमेव सुखनिधान आयुष्यातलं. ते कुणी काढून घेतंय म्हणल्यावर तडफड होणारच. कायदा, नियम माहिती असले तरी चिडचिड होणार. जी समोरच्याला समजणार नाहीच. मग यातून येत असेल ती बसायच्या जागेची अरेरावी वगैरे. खरंतर अर्ध्या अधिक जणी थोड्या थोड्या वेळाने जरा वेळ तू बस गं. मग अमुक स्टेशनला मी बसेन परत वगैरेही करतात एकदा तुम्ही त्यांच्या आतल्या ग्रुपच्या जवळपास पोचलात की.

शेवटी कधीतरी जाणार्‍याला एकदाच तीन चार तास बसायचे असते सीटवर आणि यांच्यासाठी रोजची लढाई.  अरेरावी, इतरांना बसू न देणे वगैरे गोष्टी नियमबाह्य, समाजासाठी अयोग्य वगैरे ठिकच. त्याचे समर्थन नाही पण या सगळ्यांच्या आयुष्यातल्या एकमेव विश्रांतीचे काय? प्रश्न बाकी राहतोच... 

- नी

Tuesday, August 11, 2015

रेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या!

मृण्मयीच्या रेलकथांवरून स्फूर्ती घेऊन माझ्या काही रेलकथा.
१.
नेपथ्य - पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा लेडीज पासहोल्डर डबा. डे क्वी मधे लेडीज पासहोल्डर्सचा वेगळा डबा असतो. बाकी गाड्यांच्यातला लेडीज डबा हा जनरल + पासहोल्डर्स असा असतो.
पहिल्यांदाच काढलेला पु-मु पास. लग्नही नुकतंच झालेलं. सासर मुंबई. माहेर पुणे. आणि खूप सारी कामेही अजून पुण्यातच होती त्यामुळे बसपेक्षा पास काढणे स्वस्त पडेल म्हणून सेकंड क्लासचा पास काढला.
सकाळी रिक्षावाल्यांच्या मिनतवार्‍या करत डे क्वी च्या वेळेआधी २० मिनिटे पोचले. लेडीज पासहोल्डर डबा शोधून त्यात शिरले. शिरल्या शिरल्या 'पासवालोंके लिये है. टिकटवाले जाओ जनरलमे!' अश्या वाक्यांनी माझे स्वागत केले. "माझा पण पासच आहे. दोनच दिवसांपूर्वी काढलाय." असे मी ही ठणकावून सांगितले.
एका रिकाम्या दिसलेल्या जागी बसायला गेले. बूड टेकवणार इतक्यात एका काकूंनी तिथे आपली पर्स आपटली. ह्या 'सहा जागा धरलेल्या आहेत. दुसरीकडे जा.' असं सुनावलं. हाच प्रकार अजून दोन तीन ठिकाणी घडल्यावर मग एका ठिकाणी बसले ते आता धरलेली जागा सांगितली तरी हलायचंच नाही हे ठरवून. पण चक्क ती जागा धरलेली नव्हती.
गाडी सुटायला ५ मिनिटे असताना सर्व डबा खच्चून भरला. सहा जागांच्या बाकड्यावर आठ जणी तर आरामात बसलेल्या होत्या.
गाडी सुटली. हळूहळू मी नवीन पासहोल्डर आहे हे आता सर्व नेहमीच्या बायकांना कळले. कुणीही माझ्याकडे 'तिकीटवाल्यांनी त्या डब्यात जा!' सांगायला आले की कुठून तरी "अगं नवीन पासहोल्डर आहे!" असा हाकारा येत होता.
मी आता बसल्या जागी जरा पेंगत होते तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर टपटप करून जागे केले. डोळे उघडले तर समोर कुणीतरी खाऊचा डबा धरला होता. अनोळखी माणसांकडून काही खायचे प्यायचे घेऊ नये असा नियम मी कैक वर्षांपासून पाठ केला होता. पण सर्वांचे डबे डबाभर फिरताना दिसले. मी समोरच्या डब्यातला थोडासा खाऊ तोंडात टाकला.
मग गप्पा सुरू झाल्या. तुम्ही कोण, आम्ही कोण वगैरे वगैरे. माझं दोनतीन महिन्यांपूर्वीच लग्न झालंय, मी पुण्याला तासांवर शिकवते विद्यापिठात, माहेर पुणे, सासर मुंबई, नाटक सिनेमातलं कपड्यांचं काम करते वगैरे सर्व तपशील कळले. मी रोज येणार नाहीये पण महिन्यातून ३-४ वेळा तरी येणेजाणे होईल म्हणून पास काढलाय हे ही त्यांना कळले.
नवीन लग्न आणि हातात बांगड्या नाहीत? नवर्‍याचं आणि तुझं आडनाव एकच का नाही? तू फिरतेस तर नवर्‍याच्या जेवणाचे काय? असले भोचक प्रश्न कुणीही विचारले नाहीत. नवीन लग्न झालेली मुलगी इतका प्रवास करते तर सासरी कुणी बोलत नाही ना? अशी काळजीवाहू चौकशी मात्र झाली.
कर्जतच्या इथे शेजारच्या ताईंनी दोन बटाटेवडे विकत घेतले. पिशवीतून दोन डबे काढले. त्यातला एक उघडला. तो रिकामा होता. झाकणामधे वड्यांचे आवरण काढून ठेवून आतली भाजी डब्यात घेतली. मग दुसर्‍या डब्यातली पोळी काढून पोळीभाजी खाऊन टाकली. मी बघत होते. काय करणार आज भाजी करायला वेळच नाही झाला असं ओशाळं हसत त्यांनी सगळ्यांना सांगितलं. त्या हडपसरला राहणार्‍या होत्या. डे क्वी ची वेळ सकाळी ७:१० ची. ह्डपसरला पीएमटी मिळणार कधी आणि स्टेशनला पोचणार कधी? किमान साडेपाच सहाला तरी निघत असाव्यात घरातून. आणि भाजी न केल्याबद्दल ओशाळवाण्या झाल्या होत्या? माझी सासू तर मी मुंबईत असायचे तेव्हाही स्वैपाकाची अपेक्षा करत नसायची. एकूणात गमतीशीरच सगळे.
सगळ्यांनी माझी माहिती विचारली तशी त्यांचीही त्यांनी सांगितली. त्याबद्दल पुढे कधीतरी...

- नी

Thursday, May 21, 2015

'नी' ची कहाणी

हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.
यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.
_MG_0232_m_scr_swapnali_0.jpg
यानंतर ही कला वापरून बनवलेल्या वस्तू (सध्या फक्त कानातली) 'नी' या लेबलखाली लाँच केल्या.
१० एप्रिल रोजी मराठी स्त्रियांपुरत्या असलेल्या एका संकेतस्थळावर याचे छोटे ओपनिंग केले.
मग १५ एप्रिल रोजी फेसबुक पेज सर्वांसाठी खुले केले.
ही फेसबुक पेजची लिंक  https://www.facebook.com/NeeCreation- नी

Search This Blog