Saturday, December 5, 2015

सालंकृत

हा लेख २००२ सालच्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. असंच कशावरून तरी आठवण झाली त्यामुळे लेखाचे पुनरूज्जीवन करावेसे वाटले. केले.  १३ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख त्याच्या विस्कळीतपणासकट तसाच ठेवलाय. अगदीच जेमतेम बारकेसे बदल आहेत.
---------------------------------------------------------------
कधीही कुठलाही चॅनेल लावा, आजकाल सगळीकडे सोन्याने लगडलेल्या बायकाच दिसतात. एवढे दागिने घालुनहि त्या अजून दागिने नि साड्या खरेदी करत असतात. लाख दोन लाखाचे दागिने तर त्या सहज खरेदी करतात. कल्पना करा कुणा परदेशी माणसाने हे बघितले तर त्याला वाटेल ‘सोन्याचा धूर’ निघणारा काळ तो हाच बहुतेक. 
"अरे लोकांना खायला मिळत नाही  आणि दागिने कसले खरेदी करताय! भारतात लोकांच्या तिजोर्‍यात डेड मनी बनून राह्यलेलं सोनं बाजारात आलं ना तर तेवढ्या बळावर भारत श्रीमंत बनेल.”असे मानणारेही काही जण आहेत. आता हे कसे काय घडू शकते हे कळण्याइतके व्यावहरिक शहाणपण माझ्यात नाही तेव्हा अर्थातच त्यावर नो कमेंटस.
दागिने म्हणजे नुसतं सोनं नाही पण. त्यात एक संस्कृती आहे, कला आहे. आपल्याकडच्या वेशभूषेच्या  इतिहासात दागिन्यांच्या इतिहासाला वेगळे स्थान आहे. आता मला सांगा ’उत्सव’ मधे किन्वा ’मृच्छकटीकम’ मधे जर तो दागिन्यांचा सीन नसता तर  वसंतसेनेचा आणि चारुदत्ताचा रोमान्स हा कुठल्याही इतर प्रेमिकांसारखाच वाटला असता ना. दागिन्यांच्या त्या गमतीने हा रोमान्स वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवलाय. शाहीर अनंत फंदींची तर वेगळीच गंमत आहे. बाळी ह्या कानातल्या अलंकाराची बत्तीस नावे असलेली एक लावणी त्यांनी रचलीये जी ’बत्तिस बाळ्यान्ची लावणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. यावर कडी म्हणुन परशुराम शाहीराने तेहेतीस बाळ्यान्ची नावे गुंफून चढी लावणी रचली होती अशी एक गोष्ट शाहीरी जगात प्रसिद्ध आहे.
लोकसाहीत्यात किंवा जनमानसात बांगडी फुटणे किंवा वाढणे याला एक अभद्र अर्थ आहे तसाच एक जामच रोमँटिक अर्थ पण आहे.  ”नदीच्या काठावर मी पाणी भरायला गेले असताना ’तो’ आला नि त्याने छेडाछेडी सुरु केली, त्या ओढाओढीत मझ्या बांगड्या फुटल्या. आता मी घरी काय सांगू?  कशी घरच्यांना तोन्ड देउ?” असे गाणे म्हणणारी जया भादुरी आपण सगळ्यांनीच ’अभिमान’ मधे बघितलेली आहे. 
दागिने घालताना काहीजण ’शक्तिप्रदर्शन’(वजन उचलण्याचे नि पैशाचे) म्हणून घालत असतीलहि पण दागिने घालण्याचा तो अर्थ नाहीच मुळी. शरीर सुशोभित करणे हा दागिने घालण्याचा महत्वाचा उद्देश. थोडे इतिहासात डोकावाल तर शरीर सुशोभिकरणाबरोबरच लज्जारक्षण हाही उद्देश दिसून येतो. अजूनहि काहि आदीवासी जमातीत हे दिसते. ठाकूर बायका (सह्याद्रीतले आदीवासी)  आजहि चोळीवरून पदर घेत नाहित पण मण्यांच्या माळा मात्र असतातत भरगच्च. 'बॉम्बे स्वदेशी' नाहीतर तत्सम ठिकाणी मिळणार्‍या एथनिक ज्वेलरीच्या तोंडात मारतील अश्या ह्या माळा असतात.
दागिने घालण्याचा अजुन एक उद्देश इतिहासात दिसून येतो तो म्हणजे एम्फसिस किंवा लक्ष वेधणे. त्या त्या काळाप्रमाणे स्त्री देहाच्या सौंदर्याच्या कल्पना बदलत जातात आणि तो तो भाग उठून दिसावा यासाठी दागिन्यांची योजना होते. अजंठा किंवा त्याही आधीच्या लेण्यांमधे स्त्रियांनी एक कंबरपट्टा घातलेला दिसतो. तो आपल्याला माहीत असलेल्या कंबरपट्ट्यासारखा अगदी कमरेवर न बांधता बराच खाली बांधलेला आढळतो. त्या काळामधे बरिक कंबर पोटाला हलक्याश्या वळ्या आणि रूंद नितंब  हे सौंदर्याचे लक्षण होते. हे सगळे एम्फसिस करायला तो कंबरपट्टा किंवा वेशभूषेच्या इतिहासाच्या भाषेत 'गर्डल' असायचे.
मंगळसुत्र नावाचा एक दागिना ज्याच्या मागच्या भावनेचा किंवा विश्वासाचा यच्चयावत भारतीय चंदेरी दुनियेने वापरून वापरून चोथा केलेला आहे. पण स्त्रीच्या गळ्यात इतर अनेक अश्या गोष्टी घातल्या जात ज्या तिच्या विवाहित असल्याची साक्ष देत. फार जुनी नाहि शिवकालातलीच गोष्ट आहे. जवाळी नावाची एक माळ, जिच्यात खारका, बदाम, पिस्ते असत. ही माळ ब्राह्मण नवर्‍यामुलीच्या व सव्वाष्णीच्या गळ्यात आवश्यक असे.  कदाचित सासरी हाल झाले, खायला दिले नाहि तर आपले असावे म्हणून या माळेची योजना असेल का हो? 
कोल्हापुरी साज तर आपल्या सगळ्यान्च्या परिचयाचा. ह्या दागिन्यालाही मंगळसूत्राइतकेच महत्व होते. अशुभ निवारणासाठी तसेच विविध देवतांशी संबंधित अशी अनेक प्रतिके या साजात असतात. ताईत, वाघनख, बेलपान, पानडी, कारले, दोडका, कासव, मासा, नाग, भुन्गा, मोर, शन्ख, चक्र, चन्द्र, दोन तोंडे असलेला गरुड अश्या विविध पदकांनी हा साज बनलेला असे. साजामधे आज, सारखेपणा साधण्यासाठी असेल कदाचित, ही पदके कमी झालेली आढळतात. कारले या विशिष्ट पदकाला अजुन एक वेगळा अर्थ आहे. ग्रामिण भागात आजहि काही ठिकाणी कारलं डोरलं असे म्हटले जाते. कारले हे त्याच्या आकारामुळे पुरुषाचे प्रतिक मानले जाते त्यामुळे विवाहितेच्या गळ्यात हे प्रतिक असण्याची प्रथा असावी.
संकट निवारण हा एक खुप मोठा उद्देश असे दागिने घालण्यामागचा. यासाठिच दंडावर ताईत, गळ्यात वाघनख वगैरे घालतात. पुरुष व लहान मुले यांच्या अंगावर या दोन गोष्टी जास्त आढळून येतात. दुसरेपणावर दिलेल्या स्त्रीच्या गळ्यात पुतल्यांच्या माळेत एक ’सवतीचि पुतळी' असे. मृत सवतीच्या आत्म्याने त्रास देउ नये म्हणून ही घातली जात असे.
कोळी लोकांचे आयुष्य समुद्रावर अवलंबून असते. म्हणून अर्थातच त्यांच्याकडे समुद्रपूजनच्या प्रथा आहेत. कोळी बायका उजव्या हातात फक्त चांदीचा वाळा घालतात व डाव्या हातात वाट्टेल तितक्या बांगड्या. उजव्या हातातल्या बांगड्या नवर्‍याच्या आयुष्याकरता समुद्रदेवतेला अर्पण केलेल्या असतात. 
दागिन्यांचा इतिहास हा असा थोडासा डोळ्याखालून घातल्यावर मग जेव्हा मी एकेक दागिना अंगावर चढवते तेव्हा मला प्रत्येक काळातल्या स्त्रीशी काहीतरी नातं जाणवतं.
एलकुंचवारांच्या 'वाडा चिरेबंदी’ मधली वहिनी घराण्यातले जुने दागिने चढवते नि म्हणते "खरं सांगू? असं वाटते, हे सोनं नाही नुसतं. खूप काही आहे आणखी. वाटते, देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या बायका उभ्या आहेत माझ्या अवतीभवती कौतुकानं पहात. सगळ्यांच्या मायेचा स्पर्श आपल्याला लागून राह्यला असं वाटते. किती जणींनी हे घातलं, जतन केलं. कोणाकोणाचे हात, गळे ह्यांना लागले असतील.” 
हे असं किंवा त्याहूनही खूप मोठं काहीतरी मला जाणवत रहातं.

- नीरजा पटवर्धन
------------
संदर्भ:
•    Ancient Indian Costume – Roshen Alkazi
•    मराठा कालखंडातील महाराष्ट्राचे अलंकार: (इ. स. १६०० ते १८५०) – म. वि. सोवनी यांचा थिसीस.
•    वादा चिरेबंदी – महेश एलकुंचवार
•    स्त्री-पुरुष – छाया दातार
•    शिवकालातील व पेशवेकालीन स्त्री जीवन – डॉ. शारदा देशमुख

2 comments:

अंजली मायदेव said...

मस्त गं निरे,आवडला

SAVITA said...

surekh lekh

Search This Blog