हा प्रवास ऑक्टोबर २००७ मधला आणि लिखाणही तेव्हाचंच. २००७ च्या मायबोली दिवाळी अंकात हा लेख होता.
-------------------------------------------------------------------------------------------------------
"किती वळणं, आणि रस्त्याला एक पाटी नाही. काय तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले रस्ते रे!"
मी वैतागून कळवळून नवर्याला म्हटलं. आणि तो नेहमीप्रमाणे हसायला लागला
मिशीतल्या मिशीत.
गेले दोन दिवस गुहागर परिसरात फिरत होतो आणि आज निघालो होतो लाँचच्या
सफरीसाठी. आधी कामानिमित्ताने ही सफर संदीपने केलेली असल्याने त्याच्याकडून
वर्णनं ऐकली होती. त्यामुळे कोकणात ट्रीपला जायचं ठरल्यावर ही सफर करायचीच
असं वदवून घेतलं होतं त्याच्याकडून. तिथे पोचायच्या आधी मात्र माझा धीर
सुटत चालला होता. रस्त्याला पाट्या नसल्याने आम्ही दोन वेळा चुकलो होतो
रस्ता. लाँचवाल्याचा फोन येऊन गेला होता. तो कधीचा धक्क्यावर येऊन थांबला
होता.
ही सफर होती जयगड खाडीतून. फुणगुस नावाच्या गावापासून जयगड बंदरापर्यंत.
मोटर लाँचचा प्रवास होता. आणि वाटेत सावंतांचं भातगाव लागणार होतं.
संगमेश्वरहून रत्नागिरीला जाताना रत्नागिरीच्या अलिकडे २०-२५ किमी वर
हायवेच्या उजव्या बाजूला निवळी फाटा लागतो. त्या फाट्याला
लागायचे. हाच रस्ता पुढे जयगड बंदराकडे आणि गणपतिपुळ्याकडे जातो. थोड्या
वेळाने उजवीकडे भातगाव, फुणगुस असा फाटा लागतो. तिथे उजवीकडे वळायचं. मग
परत भातगाव आणि फुणगुस असे दोन फाटे लागतात. त्यातला फुणगुस फाटा पकडायचा
आणि पुढे जायचे. या नंतर रस्त्यावर पाट्यांचे दगड आहेत पण नावं असतीलच असं
नाही. साधारण खाली खाली उतरणारा रस्ता तो आपला असं समजायचं.
तर एकदाचे पोचलो फुणगुसला विचारत विचारत. दुपारचे साडेतीन झाले होते.
जेट्टीपर्यंत जायला अजून(२००७ मधे) चांगला रस्ता झाला नाहीये पण काम चालू आहे. आणि
फुणगुसच्या इथून खाडीवर पूल पण होतोय. जिथपर्यंत गाडी पोचत होती तिथे उतरून
पुढच्या तीन चार तासांसाठी तहानलाडू, भूकलाडूच्या गोष्टी काखोटीला मारून
आम्ही धक्क्याशी आलो. ड्रायव्हरला गाडी घेऊन जयगडला पाठवून दिलं. युसुफ
टेमकर म्हणजे आमचे लाँचवाले, आमची वाटच पहात होते.
पटकन मोटर लाँच मधे बसलो आणि प्रवास सुरू झाला. जयगड खाडी किंवा
शास्त्री नदी फारशी रूंद वाटत नव्हती. एका बाजूला संपूर्ण हिरवा पट्टा आणि
उजव्या बाजूला फुणगुसचा धक्का असं दृश्य दिसत होतं. बोटीमधे कडेला लागून
बसायची फळी होती. त्यात एका बाजूला मी बसले. सरळ बसले तर बसल्या बाजूच्या
समोरची विरूद्ध बाजू दिसत होती पण लाँचच्या छपराने कापल्यासारखी आणि वाकडं
बसल्यावर आपली बाजू दिसत होती. असं तीन तास जायचं? असा म्हातारा विचार आलाच
माझ्या डोक्यात. नाही म्हटलं तरी गुहागर परिसरातल्या वळणांच्या रस्त्यांनी
दमवलं होतंच. हे सगळं प्रवास सुरू होऊन चार पाच मिनिटांपर्यंतच.
फुणगुस कधीच मागे पडलं होतं. खाडीचं पात्र मिनिटागणिक रूंदावत होतं. ऊन
होतं तरी लांबवर पसरलेलं पाणी आणि बाजूचा हिरवाकंच अवकाश डोळ्याला, मनाला
शांत करत होता. शाळेतल्या धड्यातले, तेव्हा तद्दन खोटे वाटलेले 'हिरव्या
शालूने धरीत्री नटली होती, देवाच्या कुंचल्याने काढलेले सुंदर चित्र'
इत्यादी वाकप्रचार अचानक खरे वाटायला लागले. हिरवा रंग हा इतक्या तर्हांनी
आणि हरकतींनी येऊ शकतो हे बघायला मजा वाटत होती. आपल्याला असं कधी रंगवता
येईल का असे मूर्ख विचारही येत होते डोक्यात. पण एकूणात पाण्याच्या सोनेरी
ते काळा अश्या सर्व तर्हा, मातीचं लालभडक्कपण, ती हिरवाई आणि वरती स्वच्छ
आकाश असं जे काय माझ्याभोवती होतं ते मी पिऊन घेत होते. आत आत रूजवत होते.
डोळ्यात साठवू की कॅमेर्यात साठवू असंही होत होतं.
|
फुणगुस सोडल्या सोडल्या समोरचा विस्तार |
सुरूवातीला फुणगुसनंतर बरीच छोटी छोटी गावं आहेत किनार्याला लागून आणि
त्यांचे छोटे छोटे धक्केही. तिथून तरींनी वाहतूक चालते या किनार्यापासून
त्या किनार्यापर्यंत. काही तरी मासे पकडणार्यांच्याही होत्या. त्यातल्या
एका तरीचा काढलेला फोटो. फोटो काढल्यावर या तरीतल्या मावशींनी अगदी मस्त
हात हालवून दाखवला मला.
|
तरीतल्या मावशी. |
बाजूला तरीतल्या मावशी होत्या आणि समोर वेगळंच आश्चर्य उलगडत होतं. जयगड
खाडी ही सरळसोट खाडी नाही. डोंगरांमधून वळत वळत ती जाते. त्यामुळे समोर
बघितलं की दोन्ही बाजूंनी येणारे डोंगर कुठेतरी
दूर कोपर्यात एकमेकाच्या पुढे येत ओव्हरलॅप करत असतात. त्यातून एक मस्त छायाप्रकाशाचा खेळ तयार होतो.
मग हळूहळू आपण पुढे गेलो की ते डोंगर एकमेकांपासून दूर होतात, पाणी वाढत
जातं आणि मग एखादा डोंगराचा चुकार पाय मधेच असतो की ज्याला वळसा घालून
आपली शास्त्री नदी समुद्राकडे जायचा मार्ग शोधत गेलेली असते आणि मग मागोमाग
आम्हीही. मधे मधे ही अशी बेटंही दिसायची.
|
रूंदावत जाणारं पात्र आणि मधेच दिसणारं अस्पर्श्य बेट |
आता एका बाजूला बघणं आणि दुसर्या बाजूचं राहून देणं हे शक्य होत नव्हतं
त्यामुळे मी सरळ लाँचच्या नाकावर जाऊन बसले. सगळ्या लाँचच्या पुढे मी
त्यामुळे आपण कसले सॉल्लिड आहोत असं वाटायला लागलं मला. आता समोर येणार्या
अद्भुताला मी पहिल्यांदा सामोरी जाणार होते. आमच्या लाँचशिवाय तिथल्या
परीसरात कुठलाच मानवी स्पर्श नव्हता दिसत आणि ह्या अस्पर्श्याला मी एक
माणूस पहिल्यांदा स्पर्श करणार होते असं आपलं मला वाटत होतं.
साधारण अर्धा
तास होत आलेला होता प्रवास सुरू होऊन आणि दूरवर पुसटसा एक पूल दिसायला
लागला. हाच तो नवीन झालेला राई-भातगाव पूल. तो पूल दिसायला लागल्यावर माझा
नवरा एकदमच खुशीत आला. भातगावाशी लहानपणापासूनचं नातं ना त्याचं! एवढ्या
सगळ्या निसर्गात ती मानवी अस्तित्वाची खूण मोठ्या दिमाखात उभी होती. काय
गंमत आहे ना शेवटी आपण सगळे मानवच. सुंदर निसर्ग आवडतो पण तो जर संपूर्ण
अस्पर्श्य असेल (मानवाचा स्पर्श जाणवणार नाही असा) तर भिववतो तो आपल्याला.
मग बाजूच्या गावांचे धक्के, तुरळक भातशेती, एखादी तर, एखादं एकांडं घर
किंवा आता हा पूल असं काही दिसलं की आपल्याला सुरक्षित वाटतं आणि त्याच
खुणा आपण आठवणी म्हणून घेऊन येतो..
|
लाँचचं नाक आणि दूर जिथे डोंगर जवळ आल्यासारखे दिसतात तिथे दिसणारा राई-भातगाव
पूल. |
हा पूल असा अस्पष्ट दिसायला लागल्यापासून पुलाशी पोचेतो निदान वीसएक
मिनिटं तरी जातात. वाटेत लागलेल्या गावांची नावं युसुफ टेमकर सांगत होते पण
ती सगळी लक्षात रहाणं अवघड वाटायला लागल्यावर मी नाद सोडला. तशीही मी आता
शाळेत नव्हते आणि मला कुणी "कोकणची सहल" असा निबंध लिहून आणायला सांगणार
नव्हतं. त्यामुळे नावं लक्षात ठेवण्यापेक्षा मी बाजूचं अद्भुत अनुभवत बसले.
आणि क्षणाक्षणाला जवळ येणारा तो पूल डोळ्यात साठवत बसले!
|
हा असा पूल आता नजरेच्या टप्प्यात न मावणारा.. |
हा एवढा थोरला पूल हळूहळू जवळ येतो आणि आपली मान हळूहळू वर वर जायला
लागते. पूल मोठा मोठा होत अगदी डोक्यावर येतो आणि मग मागे निघून जातो..
मस्त अनुभव असतो हा.
पूल मागे टाकला आणि उजव्या बाजूला भातगाव सुरू झालं. मगाच्याच सारखं
अस्पर्श्य हिरवं जंगल असलेला डोंगर. मधेच एखादी दरड कोसळल्याने उघडा पडलेला
मातीचा लाल भाग. नारळाच्या झाडांची दाटी दिसली तर ती वस्तीची खूण. इथून
जात असताना मग संदीप मला सांगत होता
"हे बघ तो पट्टा दिसतोय ना त्या
नारळीपासून ते तिथे मधेच पोपटी असं दिसतंय ना तिथवर आपली जमीन आहे.",
"त्या
तिथे ते वरती एकच झाड दिसतंय ना त्याच्या खाली ती नारळाची झाडं आहेत तिथेच
बघ एका घराचं कौलारू छप्पर दिसतंय ती आपली वाडी.. आपण गेलो होतो ना दोन
वर्षांपूर्वी ती.",
"पूर्वी गाडीचा रस्ता नव्हता भातगावात जायला. भाऊच्या
धक्क्यापासून जयगड खाडीपर्यंत बोट यायची. चांगली दोन तीन मजली. मग तिथून
गावापर्यंत यायला पडाव पाठवलेला असायचा आजीने. बोटीतून उतरून पडावात
बसायचं. आणि तीन चार तासानी भातगावला उतरायचं. आजीने गडी पाठवलेले असायचे.
ते सामान घ्यायचे, मला डोक्यावर घ्यायचे आणि मग आम्ही डोंगर चढून सकाळी
८-१० च्या सुमारास घरी पोचायचो. आदल्या दिवशी सकाळी मुंबईतून निघालेले
आम्ही असे २४ तासांनी घरी पोचायचो."
यानंतर मग आजीच्या आठवणी, घराच्या
आठवणी, गावाच्या आठवणी... मला तो तिसंग भातगाव ते दुर्गा भातगाव असा सगळा
दोन तीन डोंगरांचा परिसर एकदम ओळखीचाच वाटायला लागला. संदीपच्या आजीला मी
कधी पाह्यलं नाही पण ती पण ओळखीची वाटायला लागली.
|
भातगावचा खाडीत घुसलेला डोंगर. या डोंगराच्या मागेही भातगावचाच डोंगर आहे. |
|
लाल माती, हिरवी श्रीमंती आणि आत घुसलेल्या पाणवाटा |
|
उजव्या बाजूला भातगाव होतं तर समोर हे असं अस्सल झळाळतं सोनं |
भातगावातला शेवटचा धक्का मागे पडला. समोर बघतो तर नदी वळण घेताना दिसली.
'ही परत वळली..!' मी म्हणाले.. आणि वळण अनुभवत राह्यले.
|
अशी नदी वळली. |
योगसाधनेतलं मला
काही कळत नाही पण तपाचरणासाठी निसर्ग जवळ का करत असावेत लोक हे कळायला
लागलं होतं मला. विचार येत होते, जात होते. मला ना ते आलेले कळत होते ना
जाताना ऐकू येत होते. समोरच्या अथांगाशी तंद्री लागली होती. आता ना कुठल्या
जेट्ट्या दिसत होत्या. ना कुठल्या वाड्या वस्त्या, ना कुठली भातशेती. फक्त
जंगल. मधूनच उडणारे पक्षी एवढीच जाग आमच्या लाँचच्या आवाजापलिकडे.
|
चिरतंद्रा... मी नव्हे नदी.. |
सूर्यास्ताची वेळ होत चालली होती आणि खास आमच्यासाठी सूर्य, जंगल, नदी
सगळ्यांनी मिळून रंगांचा खास खेळ ठेवला होता. आणि आम्ही क्षणोक्षणी अवाक
होण्यापलिकडे काही करू शकत नव्हतो. फोटो काढले, डोळे भरून पाह्यलं, मनभरून
पिऊन घेतलं पण तरी ती सगळी गंमत आमच्या कवेत मावेचना. एक अजून गंमत दिसत
होती. आत्तापर्यंत दूरवरूनच नदी नक्की उजवीकडे वळतेय की डावीकडे ते कळत
होतं पण आता पात्र इतकं रूंदावलं होतं आणि समोरचा पाण्याचा विस्तार उजव्या व
डाव्या दोन्ही बाजूला वळतोय कारण नाकाडासमोर डोंगर आलाय असं दिसायला
लागलं. मग आता आपली लाँच उजवीकडे वळेल की डावीकडे अश्या गप्पा दर वळणाला
सुरू झाल्या. नाकासमोर डोंगर आणि वरती सूर्य आल्याने ही गंमत कॅमेर्यात
साठवता आली नाही.
|
असं सोन्याचं पाणी |
नंतर मधेच कुठेतरी प्लॅस्टीकचा किंवा थर्माकोलचा एखादा ठोकळा पाण्यावर
तरंगताना दिसायचा. आता असे बरेच ठोकळे दिसायला लागले. तिथे जाळी टाकलीयेत
मासे पकडायला टेमकरांनी माहिती पुरवली. याच वेळेला परत लोकवस्ती दिसायला
लागली. गाव तर अगदी काठाला वसलेलं. दुमजली घरं, नारळाची सरळसोट खोडं,
काठालगत मासेमारीच्या बोटी आणि मशिदीचा निळा मिनार. स्टिल लाइफ काढण्यासाठी
मांडून ठेवतात ना तसं सगळं सुबक आणि सूर्यास्तापूर्वीचा मॅजिक लाइट
असल्याने अगदी तीटपावडर केल्यासारखं देखणं दिसत होतं. आणि हे असं दोन्ही
बाजूला होतं.
|
डावीकडचं जांभारी गाव |
|
उजवीकडचं कालाले गाव |
|
मच्छिमारीच्या होड्या. |
ही गावं संपताना मधे परत वळण आलंच. नदी डावीकडे वळत होती. आणि लाइटशोचा फिनाले दिमाखात चालू झाला होता. नदी डावीकडे वळल्यावर समोर फिनालेचे क्षण दिसायला लागले.
|
सूर्यास्ताच्या उंबरठ्यावर | |
|
सूर्यास्त |
|
सूर्यास्तानंतर |
|
सूर्यास्तानंतर |
आता पाण्यावर संध्याप्रकाशाची चांदी होती. सव्वासहा-साडेसहाचा सुमार
होता. उजव्या बाजूला पाण्याच्यापलिकडे डोंगराची धूसर किनार दिसत होती.
चांदीच्या पाण्यात दूर लांबवर एक एकांडा मच्छीमार एकांड्या तरीतून हिंडत
होता. डाव्या बाजूचा डोंगर जवळच होता पण पाण्यात मिसळून गेला होता. अंधार
चढत चालला होता. समोर डोंगराचा काळा पट्टा. खाली पाण्यात आणि वर आकाशात
सूर्य गेला तरी त्याच्या पावलांच्या न विरलेल्या केशरी खुणा. त्याच्याही वर
निखळ निळं आकाश आणि एकदम वरती चंद्राची कोर झोकात चमकायला लागली होती.
|
The Grand Finale |
हा नवाच अध्याय उलगडत होता या रंगांच्या खेळाचा. तेवढ्यात आम्ही थोडेसे
डाव्याबाजूला वळलो आणि अचानक डावीकडची डोंगर रांग संपली नी समोर दूरवर फक्त
पाणी होतं. एक बोटीचा लख्ख ठिपका त्या पाण्यात लांबवर दिसत होता. आम्ही
समुद्राजवळ आलो होतो. नदी आणि समुद्राची भेट झाली होती. अंगावर शहारा आला.
काहीतरी अलौकिक आपल्याला स्पर्श करतंय. आपल्यातल्या आदीम समर्पणाला
हाकारतंय असं काहीसं.. खळ्ळ्कन एक खारा थेंब ओघळला. आणि मी संदीपकडे
पाह्यलं. तिथेही असं अथांग पाणी दिसलं.
काही क्षण हे अनुभवण्यात गेले तोच समोर दिवे, लोकवस्तीच्या खुणा, मोठ्ठी
जेट्टी, नवरात्रीचा मंडप असं सगळं दिसायला लागलं. जयगड बंदर आलं होतं आणि
हा जीवघेण्या अद्भुताचा प्रवास संपला होता.
- नी