Tuesday, December 3, 2019

आनंदवन मोमेण्ट्स!

एक दिवस शीतल आमटेचा मेसेज आला. शीतल सोशल मिडिया मैत्रिण होती बरेच दिवस. तिला माझं वायरवर्क आवडलंय हे ती सांगेच वेळोवेळी. तर तिचा मेसेज आला की आमच्याकडे दिव्यांग लोकांसाठी वायर ज्वेलरीचं वर्कशॉप घेशील का?
आनंदवनासंबंधी महारोग्यांची सेवा, उपचार, पुनर्वसन याबद्दल थोडीफार कल्पना होती. समिधा वाचलेले असल्याने कश्या प्रकारे हे काम उभे राह्यले हे ही साधारण माहिती होतेच. जलसंधारणाच्या कामाबद्दलही पुसटशी माहिती होती. त्यामुळे कधीतरी आनंदवनाला भेट द्यायचीये हे पक्के डोक्यात होते. आता तर काय आयतीच संधी चालून आली.
पण दिव्यांग लोकांना जमेल का? वायरकामासाठी हात आणि डोळे व्यवस्थित असावे लागतात. वगैरे कुशंका मी उपस्थित केल्याच. ती ज्या दिव्यांग गटाबद्दल विचारत होती ते शक्यतो कर्णबधिर लोक असणार होते. वायरकाम करायला काही प्रॉब्लेम नव्हता. तसेच त्यांच्याशी कम्युनिकेट करायला इंटरप्रिटर बरोबर असेल हे ही तिने स्पष्ट केले. मग मी तातडीने होकार कळवून टाकला.
मग सुरू झाली सगळी जमवाजमव. तारकामाची हत्यारे आणि तारा. वरोर्‍यात तर काही मिळणार नव्हतं. मला मुंबईतल्या मार्केटांशिवाय काही माहिती नव्हतं. मुंबईतून हत्यारे, तारा घेऊन नागपुरापर्यंतचा प्रवास करणे शक्य नव्हते. एकदीड महिना, एक व्हॉटसॅप ग्रुप, शेकडो मेसेजेस, अर्धशेकडो फोनकॉल्स, वर्कशॉपच्या कोऑर्डिनेटर लोकांची फिराफिरी या सगळ्यांच्या अखेरीस मी पोचले तेव्हापर्यंत सगळे सामानही आनंदवनात पोचले.
फ्लाइट काहीच्या काही लेट झाल्याने रात्री साडेनवास म्हणजे आनंदवनाच्या मध्यरात्री मी तिथे पोचले. त्यामुळे संध्याकाळी आनंदवनात पोचल्यावर सगळे छान मांडून ठेवू, शीतलशी गप्पा मारू, आनंदवनात फिरू असे सगळे इमले हवेत फुर्र झाले. गेस्ट हाऊसमधे शिरतानाच एक बोर्ड दिसला. इथे वायफाय नाही. हे १९९५ असल्यासारखे एकमेकांशी गप्पा मारा. मग या आज्ञेचे पालन म्हणून रात्री प्रोग्राम कोऑर्डिनेटर माधवी आणि सोशल मिडियासाठी काम करणारी मधुवंती यांच्याबरोबर मध्यरात्रीपर्यंत मस्तपैकी गप्पांचा फड रंगला.
१. गप्पा मारा
nowifi.jpg
सकाळी आवरून गेस्टहाऊसच्या बाहेर आले. सुंदर ऊन आणि जिकडेतिकडे फुलझाडे. मन एकदम प्रसन्न झाले. लगेच फोटो काढणे,
गेस्टहाऊसच्या बाहेर व्होडाफोनला रेंज असल्याने फोटो फेबुवर टाकणे वगैरे उद्योग करून झाले लगेच.
२. ही ती सुंदर सकाळ
sakal.jpg
मला धुळीचा वास लगेच येतो. त्रासही होतो. नोव्हेंबर म्हणजे कोरडा महिना आणि विदर्भाची कोरडी हवा. त्यामुळे वातावरणात धूळ असणार हे मी गृहितच धरले होते. पण तशी धूळ जाणवलीच नाही. इतकी स्वच्छ हवा हे जरा अप्रूपाचेच झाले.
८ वाजता ब्रेकफास्टची वेळ असते. साधा, पोटभरीचा आणि चविष्ट ब्रेकफास्ट झाला. कॅण्टिनचे वैशिष्ट्य म्हणजे खाऊन झाले की आपापली ताटवाटीचमचा वगैरे आपणच घासून टाकायचे. लोकांना सहजपणे ताटवाटी घासता यावी यासाठी नळांची रांग, ताट ठेवायला तिपाई, प्रत्येक दोन नळांच्या मधे साबणाचे पाणी आणि स्पंज ठेवलेली बादली, एका बाजूला सगळे खरकटे टाकून द्यायला ठेवलेली बादली आणि घासून झाल्यावर सगळे निथळत ठेवायचे टेबल अशी एकदम शिस्तशीर व्यवस्था आहे. हा प्रकार मला फारच आवडला.
सकाळी नऊ वाजता वर्कशॉप सुरू झाले. हे वर्कशॉप म्हणजे छंदवर्ग नाही. सुरूवात जरी छंदवर्गासारखी असली तरी इथे शिकवायचे आहे त्याचा उद्देश शिकणार्‍यांसाठी पुढे जाऊन रोजगारनिर्मिती व्हावी हा आहे. त्यामुळे जे काही शिकवायचे त्यात परफेक्शन, फिनेस याची पूर्ण ओळख करून द्यायची ही एक गोष्ट मी लक्षात ठेवली होती. तीन कर्णबधिर लोक आणि एक अस्थिव्यंग असलेली व्यक्ती यांच्यासह एकूण आठनऊ लोक होते वर्कशॉपमधे. हत्यारांची ओळख करून देताना आपले म्हणणे डेफ लोकांपर्यंत पोचेल का? त्यांना समजेल का? वगैरे धाकधुक होती मनात. पण इंटरप्रिटरच्या मदतीने तो भाग पार झाला. साइन लँग्वेज मला अजिबातच येत नाही पण काही खुणा या निव्वळ लॉजिकवर असतात असेही लक्षात आले.
३. वर्कशॉपमधील बॅनर
Banner at workshop.jpg
वर्कशॉपमधे मी अगदी बेसिक स्पायरल, गाठ यांच्यापासून सुरू करते. त्यासाठी मी एक छोटेसे वर्कबुकही तयार केलेले आहे. एकेका स्पेसिमेनचे चित्र, नाव आणि वायरची मापे व इतर नोंदी करण्यासाठी बरीच रिकामी जागा असे आहे त्या वर्कबुकात. कर्णबधिर मुलींसाठी ते जास्त उपयोगाचे ठरले असावे असे वाटते. स्वतः शीतलही सुरूवातीला वर्कशॉपला बसली होती. अर्थात आनंदवनाची सीईओ ही जबाबदारी पार पाडत असताना वर्कशॉपला जास्त वेळ थांबणे तिला शक्य नव्हतेच. पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच-सहापर्यंत चालले वर्कशॉप. मधे एक तास जेवायची सुट्टी फक्त. संध्याकाळपर्यंत सगळ्यांची बोटे हुळहुळी झाली होती हे खरे पण प्रत्येकाची पाचसहा लिंक्सची इजिप्शियन कॉइल तयारही झाली होती.
४. विद्यार्थ्यांची पहिलीवहिली इजिप्शियन कॉइल
Egyptian coil day 1.jpg
संध्याकाळी डॉ. विकास आमटे यांना भेटायचे ठरले होते. माधवीबरोबर त्यांच्या ऑफिसमधे गेले. त्याआधी वर्कशॉपमधे केलेल्या इजिप्शियन कॉइल्स शीतलने त्यांना दाखवलेल्या होत्या. ते काम खूपच आवडलेले होते त्यांना. एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटायचे म्हणजे दडपणच होते जरा. पण माणूस एकदम दिलखुलास. दहा वर्षांपूर्वी संदीप तिकडे जाऊन आला होता. ते त्यांच्या लक्षात होते. आणि वर्कशॉपबद्दल त्यांच्याकडून कौतुक ऐकल्यावर मी रिलॅक्सच झाले.
ते सांगत होते. बाबा आमट्यांबद्दल, त्यांच्या आईबद्दल, पत्नीबद्दल, मुलीबद्दल, आनंदवनाबद्दल, तिथल्या जगण्याच्या संकल्पनेबद्दल, त्यांच्या लहानपणाबद्दल, बाबा आमट्यांना मिळालेल्या सेवन्थ नोबेलबद्दल, पुलंच्या दरवर्षी आनंदवनात येण्याबद्दल, पर्यावरणाबद्दल,
हा आश्रम नाही. हे जगणं आहे. ही चॅरिटी नाही, 'चॅन्सिटी' (चान्स + चॅरिटी) आहे. इथे नव्या कल्पनांचे, बदलांचे स्वागत आहे.
आनंदवन ही काय कल्पना आहे नक्की याची ओळख होण्याचा माझा प्रवास तिथे सुरू झाला.
त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक शिळा आणि काही दगड रचून एक इन्स्टॉलेशन सारखे केलेले आहे. ही माझी स्मरणशिला. मीच तयार करून ठेवलीये असं हसत हसत म्हणाले. वयाने आधीच्या पिढीतली पण मित्र असलेली कित्येक मंडळी आठवली.
दुसर्‍या दिवशी सकाळी आनंदवन बघण्यासाठी फिरायचे ठरले. आर्किटेक्ट अमृता माझ्याबरोबर आली होती. सुरूवात केली ती मियावाकीच्या धर्तीवर केलेल्या अटल आनंदवन डेन्स फॉरेस्ट या प्रकल्पापासून. शीतल या प्रकल्पाची प्रमुख आहे. मियावाकीची कल्पना समजून घेत, प्रयोगाला मिळत असलेल्या यशाबद्दल अवाक होत तो सगळा भाग फिरलो. मग श्र्द्धावनाकडे निघालो. वाटेत शेती, अप्रतिम तळे, त्यात बदके, तळ्याच्या बाजूला बसायची जागा असे काय काय दिसत होतेच.
५. एका तळ्यात होती (हे नाव देणे मराठी माणसांना कंपलसरी असते)
badake.jpg
आनंदवनाचा सगळा परीसर जुन्या बंद झालेल्या कोळशाच्या खाणीवर उभा आहे. हे सांगितल्याशिवाय कुणाचाही विश्वास बसणार नाही. माणसांच्या पुनर्वसनाबरोबरच निसर्गाचे पुनर्वसनही केलेले आहे. हायवेच्या दुसर्‍या बाजूला औष्णिक वीज केंद्राच्या चिमण्या धूर ओकतायत, पलिकडे अजूनही चालू असलेली एक कोळशाची खाण आहे. अश्या परिस्थितीत हवेत प्रदूषणाने होणारी घुसमट जाणवायला हवी पण आनंदवनात त्याचा मागमूसही नाही.
श्रद्धावनाच्या इथे माणसाच्या विकासासाठी धारातीर्थी पडलेल्या वृक्षांची आणि मुलाच्या सोसापायी गर्भातच मारल्या गेलेल्या मुलींची स्मरणशिला आहे. हे काहीतरी वेगळेच.
६. स्मरणशिला
smaranashila.jpg
अजून वेगळे म्हणजे आजवर आनंदवनात जेवढे कार्यकर्ते होऊन गेले त्या सगळ्यांच्या नावे एकेक झाड लावलेलं आहे. म्हणून हे श्रद्धावन. याच झाडांच्या सावलीत बाबा आमटे आणि साधनाताई आमटेही विसावा घेतायत. मी एरवी बधीर काळजाची बाई आहे पण तिथल्या वातावरणात माझ्याही डोळ्यात पाणी आलं.
तिथे भोवती विविध प्रकारचे दगड आणून ठेवलेले आहेत. एकसेएक देखणे दगड. आपल्या नैसर्गिक आणि पॉलिश बिलिश न केलेल्या रूपात. "ही विकासभाऊंची आवड. त्यांना माहितीयेत कुठले कुठले दगड आहेत ते." अमृताने माहिती पुरवली. दगड आवडणारी माणसे म्हणजे काय एकदम भारीच की.
श्रद्धावनातून मग आम्ही वर्कशॉप्सकडे आलो. ग्रिटींग्ज विभागात गनिकाका वेगळ्याच प्रकारे पेंटिंग्ज बनवतात. मक्याच्या कणसाची साल, भाताचे उरलेले तूस, केळीचे सुकलेले साल अश्या गोष्टींचे कोलाज करतात. अगदी पोर्ट्रेटस सुद्धा. कमाल आहे तो प्रकार.
७. पोर्ट्रेटस
ganikakaportraits.jpg
तिथून टेक्स्टाइल विभागात गेलो. तिथे मी रमणार हे उघड होतंच. हातमाग, पॉवरलूम्स दोन्ही बघितले. १००% कॉटन तेही इतके सायीसारखे तलम मऊ. सुख आहे त्या कापडाचा स्पर्श म्हणजे. असं कापड हवं रोजचं रोज. काही झालं तरी कापडाचा मऊपणा सुखावतच राहील. विरार ट्रेनमधे काही होवो, तरी चिडायला होणारच नाही.
तिथून स्वरानंदवन या ऑर्केस्ट्राच्या हॉलमधे गेलो. शारीरीक वा मानसिकरित्या दिव्यांग माणसाकडे एक कमतरता भरून काढायला दुसर्‍या कुठल्यातरी क्षमतेचे भन्नाट दान मिळालेले असते याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणावे अशी सुंदर गाणी ऐकली.
एव्हाना वर्कशॉपची वेळ झाली होती त्यामुळे पटकन कॅण्टिनला जाऊन पोहे खाऊन घेतले आणि वर्कशॉप सुरू केले. विद्यार्थ्यांची कालची एक्साइटमेंट किंचित कमी झालेली होती. पहिला जमून गेलेला स्पायरल आता वेडावाकडा होत होता. बोटांच्या हुळहुळीचं करायचं काय समजत नव्हतं. आणि शिकवणार्‍या निर्जाबै दुष्टासारख्या पंधरा लिंक पूर्ण करा तरीही म्हणून ढकलत होत्या.
८. वर्कशॉप
Nee teaching.jpg
दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या दिवशी कस लागतो तुमच्या पेशन्सचा, तुमच्या बोटांचा, तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का नाही याचाही. ती प्रक्रिया सुरू झाली होती. एखाद दोन लोक वगळता सगळे टिकून होते.
दोन कर्णबधिर मुलींशी संवाद साधणे थोडे थोडे जमायला लागलेय असे वाटत होते. पुढच्या वर्कशॉपच्या आधी काही किवर्ड्स शिकून यायचेत साइन लँग्वेजमधले हे स्वतःशीच नोंद करून ठेवले.
दुपारी साडेचारला मला निघावे लागणार होते. नागपूरमधला ट्रॅफिक पार करून विमानतळावर वेळेत पोचायचे होते. त्यामुळे सूचना, फोटो, गप्पा अश्या सगळ्यात घाई घाई करत मी निघाले. या सगळ्यात शीतलशी गप्पा आणि चर्चा हा कार्यक्रम राहूनच गेला. पण ही मैत्रिण मात्र फारच आवडली.
'तुमची पुरेशी प्रॅक्टिस झाली नाही तर मी परत येणार नाही' असे बजावून निघाले खरी पण मला माहितीये मी जात राहणार आहे परत तिथे. आत्ता कुठे आनंदवनाची बारीकशी झलक बघितलीये. अजून बरंच बघायचंय, समजून घ्यायचंय. जमलंच तर काही कामही करायचंय. बघूया.
- नी

Search This Blog