Thursday, December 23, 2010

सोंग सजवण्याची कला - ८. चलता है

एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर असतं. रात्रीची निजानीज होण्याची वेळ असते. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये.
व्यक्तिरेखा पन्नाशीची खडतर आयुष्य काढलेली आणि कंटाळलेली, पिचलेली अशी बाई असते. पण सिनेमात मात्र ती केशरी गुलाबी अश्या रंगाच्या साड्या नेसते.
व्यक्तिरेखा तोंडाने एक बोलत असते आणि कपडे वेगळेच सांगत असतात. पण डिझायनर म्हणतो चलता है... कौन इतना दिखता है!
आणि माझी मैत्रिण विचारते ’प्रत्येक चित्रपटात दिग्दर्शक किंवा निर्माता कॉश्च्युम्सचा विचार करत असेल का?'
निर्माता कॉश्च्युम्सबद्दल विचार करताना मुळात बजेट या मुद्द्यावर येतो. सिनेमाचं बजेट कमी करायचं असेल तर पहिली कात्री कॉश्च्युमच्या खर्चावर चालवली जाते. नटांचे नातेवाईक आणि त्यांची पंचतारांकीत उस्तवार ही अनेकदा निर्मात्याला कॉश्च्युम्सच्या खर्चापेक्षा महत्वाची वाटत असते.
Vikram-10.jpg
एका ठिकाणी असंच झालं. कॉश्च्युम्सच्या गरजेच्या बजेटच्या एक चतुर्थांश मधे कॉश्च्युम्स बसव असं एका निर्मिती प्रमुख म्हणवणार्‍या माणसाने सांगितलं. ’अरे भाजीवाल्याकडून भाजी घेतानाही इतकं बार्गेनिंग करत नाही आपण!’ असं मनात म्हणत मी तिथून निघाले. अजून दुसर्‍या एका ठिकाणी १८८०-१८९० च्या काळातल्या एका कथेवरचा होऊ घातलेला चित्रपट माझ्याकडे डिझायनिंगसाठी एक निर्मिती सल्लागार घेऊन आला. जुन्या ओळखीची आठवण देत मला कमी पैशात काम करण्याची विनंती करू लागला. ऐतिहासिक काळ उभा करायचा तर कपड्यांचं बजेट जास्त असायला हवं हे त्याच्या गावीही नाही. जुन्या ओळखीखातर मी स्वतःचे पैसे घेतले नाहीत तरी कापड दुकानदार, शिंपी, बाकी सगळा कॉश्च्युमचा ताफा फुकटात काम करणार नाही. १०० रू मीटरचं कापड २ रू मीटरने मिळत नाही हे त्यांना पटायलाच तयार नाही. यावर निर्माता म्हणे मॉबमधे गावातल्या लोकांचे आहेत तेच कपडे वापरायचे. पण १८८० पासून २००५ या १२५ वर्षांच्या काळात गावातले कपडेही बदललेत हे त्याला मान्य नव्हतंच. मग दिग्दर्शक म्हणे की तसंही दुष्काळाची वेळ आहे म्हणजे लोक कमीच कपडे घालणार. डोक्याला फेटे नसतीलच. हे तर्कशास्त्र माझ्यासाठी अनाकलनीय होतं. दुष्काळ सुरू झाल्यावर माणसे नवीन कपडे घेणार नाहीत, त्यांना आहेत ते कपडे धुवायला पाणी मिळणार नाही त्यामुळे कपडे खूप मळके आणि जुने असतील पण दुष्काळ सुरू झाला म्हणून अंगावरचे कपडे कसे काढून टाकतील? फेटा रोजच्या वापरात तसाही नसतो पण पागोटी आणि मुंडाशी तर असतातच ना आणि काहीही झालं तरी दुष्काळाच्या परिस्थितीतही १८८० चा काळ लक्षात घेता गावातला माणूस गावात फिरताना किंवा प्रतिष्ठीत व्यक्तीसमोर उघड्या डोक्याने कसा जाईल? असं आपलं माझं लॉजिक. शेवटी 'नीरजा बदलली आता. मोठी समजायला लागली स्वतःला!' अश्या तात्पर्यावर समोरच्याने चर्चा संपवली.
काही ठिकाणी जिथे बजेटचा विचार करायची गरज नसते तिथे कॉश्च्युम्सच्या बाबतीत नट खुश म्हणजे दिग्दर्शक खुश आणि निर्माता खुश. कथा, व्यक्तिरेखा इत्यादी गेल्या उडत. आणि सगळा चकचकाट बघून, आपल्या आवडत्या नटनटीला नवीन आणि ट्रेण्डी अवतारात पाहून पंखे आणि अनुकरणवादी खुश असा सगळा खुशीचा मामला असतो.
Hangman-07.jpg
तर काही ठिकाणी दिग्दर्शकाला तपशीलात काम करणारे लोकच नको असतात. असंच एका चित्रपटाचं कॉश्च्युम डिझाइन मी करत होते. इथल्या लोकांसाठी फिल्म बनवत नाही मी असं म्हणत दिग्दर्शक एक मसाला फिल्म इंग्रजीतून बनवत होता. चित्रपटाच्या दृश्यात्मकतेकडे नीट लक्ष द्यायचंय अश्या वाक्यांमुळे मला या दिग्दर्शकाबद्दल खूपच आशा निर्माण झाली होती. मी आपलं प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ठराविक रंगसंगती, प्रत्येकाचा एक ठराविक लुक जो व्यक्तिरेखेच्या ग्राफबरोबर बदलत जाईल असलं काय काय ठरवलं. भरपूर स्केचेस, भरपूर पेपरवर्क केलं. ती फाइल बघून दिग्दर्शकाने ओके दिला. मी खुश की ’वा चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करतोय आपण. मी अजून उत्साहात त्याला सिनेमॅटोग्राफरच्या लायटींग पॅटर्न, रंगसंगती, टेक्श्चर बद्दल विचारायला गेले. तेव्हा उत्तर काहीच आलं नाही. मग जेव्हा सगळे कपडे बनून आले तेव्हा एकेका व्यक्तिरेखेची ठराविक रंगसंगती बघून दिग्दर्शकाचा पापड मोडला.
"ये क्या डीझाइन है! सारे कलर्स आने चाहीये ना कपडोंमे?"
"सर, कॅरेक्टर का कलर पॅलेट हमने तय किया था." इति मी.
"तो क्या हुआ? सारे कलर्स नही आये तो व्हिज्युअल अच्छा नही दिखेगा. सारे कलर्स आने चाहीये. बाकी इतना किसीको समझता नही है. वो सब चल जाता है!" ’अरे काय रंगपंचमी आहे काय मी मनातल्या मनात चरफडले.
अशी आपल्या चित्रपटक्षेत्राला या चलता है ची लागण झालेली आहे. बारीकसारीक तपशील तर सोडूनच द्या पण ठळक ठळक गोष्टी सुद्धा ’चलता है!’ म्हणत दुर्लक्षिल्या जातात. त्यामुळे तंत्रज्ञ कितीही चांगला असला तरी दिग्दर्शकाला प्रत्येक तंत्राच्या ताकदीचा अंदाजच नसेल तर त्या चांगल्या तंत्रज्ञाचंही लोणचं घातलं जातं. आणि मग कधीतरी मोगल काळातील सीन असतो. व्यक्तिरेखा सम्राज्ञीची असते. पण झिरझिरीत ओढणी लेवून आल्याने ती मुजरेवाली ’कनिज’ दिसत असते. तिच्या बरोबरीच्या सख्यांच्या ओढण्या सिंथेटिक कापडांच्या दिसत असतात. त्या सगळ्यांच्या कपड्याला लावलेल्या सेफ्टिपिना दिसत असतात. सिंथेटिक कापड आणि सेफ्टिपिना दोन्ही मोगल काळात अस्तित्वात नव्हतं हे जगजाहीर असतं. तरी माझी मैत्रिण म्हणते हिंदी सिनेमात इतकं कशाला बघायचं आपण? तेवढं तर चालतंच ना!
आपण एकुणातच तडजोड करणारी माणसं. गोष्टी चालवून घेण्याची अतोनात सवय आपल्याला. त्यामुळे प्रेक्षकच ’चलता है’ म्हणतात. मग काही प्रश्नच नसतो. कधी कधी वाटतं मला की चुकून एखाद्या दिवशी प्रेक्षकांनी हे चालवून घेणं सोडलं तर काय होईल? तेव्हा तरी आम्ही ’चलता है!’ सोडून देऊन आपली पद्धत बदलण्याचा प्रयत्न करू? की प्रेक्षकांना मूर्ख बनवतच राहू? असो.
हा या मालिकेचा समारोपाचा लेख. प्रेक्षक तडजोड करायचं आणि आम्ही ’चलता है!’ म्हणणं लवकरच सोडून देऊ एवढ्या आशेवर समाप्त करतेय. आठ लेखांच्या या मालिकेच्या शेवटी काही जणांना तरी या ’सोंग सजवण्याच्या कलेचं’ म्हणणं कळलं तरी माझं लिहिणं सुफळ संपूर्ण झालं. शेवटी काय रांधणार्‍याच्या कौशल्याबरोबरच जेवणार्‍याचं हवंनको तेवढंच महत्वाचं असतं नाही का? बघा विचार करून....
---नीरजा पटवर्धन

Wednesday, December 22, 2010

सोंग सजवण्याची कला - ७. इकडचं नाट्य

आधीचे सहा लेख वाचून माझ्या एका प्रश्नाळू मैत्रिणीला प्रश्न पडले. अगदी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न. तिचे प्रश्न ऐकल्यावर लक्षात आलं की मी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या विसरूनच गेले बहुतेक. तिच्या प्रश्नांच्या अनुषंगानेच या महत्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते आता.
तिचा पहिला प्रश्न की भारतातल्या प्रत्येक चित्रपटाला कॉश्च्युम डिझायनर असतो का? दुसरा प्रश्न होता प्रत्येक चित्रपटाचा दिग्दर्शक वा निर्माता कॉश्च्युम्स चा विचार करत असेल का?
पहिल्या प्रश्नाचं एकदम उत्तर द्यायचं तर हो काही ठिकाणी असतो आणि काही ठिकाणी नाही असंच म्हणावं लागेल. अनेक चित्रपटांसाठी नटमंडळी आणि सहाय्यक दिग्दर्शक एकत्र जाउन दोघांना आवडतील असे कपडे विकत आणतात. मग त्या कपड्यांचा आणि व्यक्तिरेखेचा काही संबंध असो वा नसो. काही वर्षांपूर्वी मराठी सिनेमात ही पद्धत अस्तित्वात होती कारण कमी बजेटच्या मराठी चित्रपटाला म्हणे कॉश्च्यूम डिझायनरची चैन परवडत नसे.
पण कॉश्च्युम डिझायनर जिथे असतो तिथेही ते शीर्षक धारण करणारी व्यक्ती कॉश्च्युम डिझायनिंगचच काम करत असेल याची काही शाश्वती नाही. फॅशन मधे ग्लॅमर आणि आकर्षकता या गोष्टीला महत्व असते आणि मग फॅशन डिझायनर कॉश्च्यूम डिझाइन करत असला की अर्थातच ते कॉश्च्युम्समधेही उतरते. प्रत्येक कपडा दिसायला चांगला बनवण्याच्या नादात हा चित्रपट आहे की फॅशन शो असा एक घोळ झालेला आपल्याला बर्‍याच ठिकाणी दिसून येतो. फॅशन ही एका व्यक्तिला उत्तम सजवण्यापुरती असते त्यामुळे संपूर्ण फ्रेमचा विचार त्यात फारसा कुठे दिसत नाही. एका व्यक्तिला म्हणजे नटाला सजवताना व्यक्तिरेखा मागे पडते. स्टारची इमेज जपली जाते, तो स्टारच दिसतो मग तो गडचिरोलीच्या खेड्यातून आला असेल नाहीतर न्यूयॉर्कहून.
harlequino.jpg
ऐतिहासिक काळातील चित्रपट असेल तर वेशभूषा त्या काळातली वाटली पाहिजे. जे जे आणि जसं जसं त्या ठराविक काळात वापरलं जायचं ते तसंच चित्रपटात दिसलं पाहिजे. पण फॅशन डिझायनर जेव्हा डिझाइन करतो तेव्हा त्या त्या ठराविक ऐतिहासिक काळातील कपड्यांच्या पद्धतीवर आधारीत समकालीन फॅशन किंवा त्या काळापासून प्रेरणा घेऊन डिझाइन केलेले त्या त्या डिझायनरचे कलेकशन अशी ती वेशभूषा दिसते.
वेगवेगळ्या व्यक्तिरेखा त्यात कपड्यातून अधोरेखित होत नाहीत.
smeraldina-2.jpg
याचं अगदी ठळक उदाहरण द्यायचं म्हणजे संजय लीला भन्साळीच्या देवदास मधील वेशभूषा. एकेक कपडा सुंदर आणि कुशल कारागीरांकडून बनवून घेतलेला. पण त्यात बंगाली साडीची नेसण सोडली तर बंगाली वेशभूषेशी क्वचितच प्रामाणिकपणा आहे. फॅशन डिझायनरने डिझाइन केल्यामुळे प्रत्येकाला शक्य तितकं ग्लॅमरस करण्यात आलेलं आहे. त्यामुळे देवदासच्या घराण्यापेक्षा पारोचं घराणं कमी पातळीचं कसं ते काही दिसत नाही. चंद्रमुखीच्या कोठ्यावरच्या बंगाली साडी नेसलेल्या बायका आणि देवदासच्या घरातल्या बायका यांच्यात तसा काहीच फरक जाणवत नाही. काळ आणि वातावरण बघता खानदानी घरातल्या बायका आणि तवायफ यांच्या कपड्यात, ल्यायण्यात, नटण्यात फरक असायलाच हवा पण तो दिसत नाही.
ghatotkach.jpg
याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुळात आपल्याकडे चित्रपटांमधे कॉश्च्युम डिझायनिंग करणारे लोक हे बहुतांशी फॅशन डिझायनर्सच असतात. कारण एकतर आपल्याकडे कॉश्च्युम डिझायनिंगच शास्त्र शिकवणार्‍या संस्था अस्तित्वातच नाहीत. पुण्यातल्या फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडीया मधे अथवा दिल्लीमधल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात कॉश्च्युम डिझायनिंगचे स्वतंत्र शिक्षण दिले जात नाही. काही फॅशन डिझायनिंगच्या इंस्टिट्यूटमधे कॉश्च्युम या विषयाची तोंडओळख हल्ली करून दिली जाते पण तेही जुजबीच.
चित्रपटांच्या कॉश्च्यूम डिझायनर्स विषयी माहीती देताना अजून एक महत्वाची व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे ती म्हणजे वैयक्तिक डिझायनर्स. प्रत्येक तारे तारक़ांचे स्वत:चे डिझायनर्स असतात. हे डिझायनर्स त्या त्या चित्रपटात केवळ आपल्या ठराविक तार्‍यांचेच कॉश्च्युम्स डिझाइन करतात. आणि उरलेल्या व्यक्तिरेखांसाठी निर्मात्याकडून एक वेगळा डिझायनर ठेवलेला असतो. यामुळे असं होतं की स्टार्स असतात ते वेगळ्या टेक्श्चरचे दिसतात आणि बाकीचे लोक वेगळे. उदाहरणार्थ स्टार नटीचे कपडे झकपक दिसत रहातात पण तिच्या आईवडिलांच्या भूमिका करणारे लोक मात्र दिसताना गरीब दिसत रहातात आणि त्याच वेळेला ते मुलीला आपल्या इस्टेटीमधून बेदखल करण्याची धमकी देत असतात. किंवा ऐतिहासिक काळातल्या चित्रपटात महत्चाच्या दोनतीन व्यक्तिरेखां ज्या साकारणारा एखादा मोठा नट असतो, तेवढ्यांवरच तपशीलात काम केले जाते बाकी सगळ्या लहानमोठ्या व्यक्तिरेखा मात्र शाळेच्या गॅदरींगसाठी ड्रेसवाल्याकडून भाडोत्री कपडे आणावेत अश्या दिसत रहातात. संपूर्ण फ्रेमची रंगसंगती, दृश्य ट्रीटमेंट याचा काहीही संबंध नसतो.
पण याला अपवाद म्हणून काही महत्वाचे चित्रपटही आहेतच. अभिजात संस्कृत नाटक मृच्छकटीक यावर बेतलेल्या उत्सव चित्रपटाची वेशभूषा ही अनेक पातळ्यांवर आदर्श म्हणावी अशी आहे. मौर्य काळ दाखवलेला आहे. कपडे व दागिने, नेसण्याच्या पद्धती, कापडांचा वापर हे सगळं त्या काळाला अनुसरून आहेच. रंगसंगती व कापडाचा पोत यामधे त्या त्या व्यक्तिरेखेचे व्यक्तिविशेष, त्यांचे समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती यांचे प्रतिबिंब आहेच पण त्याचबरोबर चित्रपटाचा विषय, सीनचा मूड, कॅमेर्‍याचे पॅटर्न या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला जाणवतो. त्याचमुळे रेखासारखी प्रसिद्ध स्टार असूनही ती रेखा न वाटता वसंतसेनाच वाटते.
कॉश्च्युम्स हा खरतर नटमंडळींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. पण कॉश्च्युम्स कडे बघण्याची नटमंडळींची दृष्टी मात्र गमतीशीर असते. एकतर आपल्या चित्रपटसृष्टीमधे नटांना नको इतकं लाडावून ठेवलं जातं. मग त्या लाडावण्याच्या ओघात नटाला काय कपडे हवेत ते पुरवा. नट खुश राह्यला पाहिजे हे एकच सूत्र बहुतांशी निर्माते आणि बर्‍याचदा दिग्दर्शकसुद्धा पाळताना दिसतात.
व्यक्तिरेखेची गरज आहे पण नटाला कॉटनचे कपडे आवडत नाहीत. नटीला अजून दागिने हवेत. नटाला कडक इस्त्री केलेलेच कपडे हवेत. नटीची ठराविक इमेज आहे त्यामुळे काही झालं तरी चकचकीत मेकप करणारच. प्रत्येक सीनला नवा कपडा हवा. फ्रेममधल्या इतर सर्वांपेक्षा मी सिनीयर आहे त्यामुळे माझा कपडा सगळ्यात उंची आणि वेगळा दिसला पाहिजे, कपडा रिपीट झाला की नटाला आवडत नाही असे अनेक हट्ट आपल्या चित्रपटसृष्टीत इतके रूजलेत की त्यात काही वावगं आहे हेही विसरायला झालंय. इतकं की 'लोग तो स्टार को देखने आते है तुम्हारे कपडे देखने थोडी ना आते है' असं एक बिन्डोक वाक्य वेळोवेळी फेकलं जातं. अरे पण लोक स्टारला बघायला आले म्हणजे स्टारने कधीच व्यक्तिरेखेसारखं दिसू नये असं थोडीच आहे?
संहितेच्या अभ्यासापासून ते कपडे बनण्यापर्यंत डिझायनरची काही प्रोसेस असते, विचारप्रक्रिया असते त्याबरहुकूम कपडे बनलेले असतात. ती संपूर्ण प्रक्रिया नाकारून नटांनी आपल्या मनाला आवडेल अश्या कपड्यांचा हट्ट धरणे किंवा आहेत त्यात हवे तसे बदल करणे हे अतिशय चूक आहे. संपूर्ण चित्रपटाच्या दृश्यात्मकतेवर याचा परिणाम होतो. नटाकडे व्हिज्युअल सेन्स असेलच आणि असलाच तरी त्याच्याकडे विषयाचा अभ्यास असेलच असे नाही. आणि हे सगळं असलं तरी कॉश्च्युम डिझायनर चा व्हिज्युअल सेन्स आणि त्या विषयाचा अभ्यास, समज या गोष्टींच्यासाठी त्याला निवडलेले असते आणि नटाला अभिनयासाठी. पण फार कमी अभिनेत्यांना ही गोष्ट समजते. बाकी सर्वांना कॉश्च्युम डिझायनर हा त्यांच्या अटेंडण्टच्या ताफ्यातलाच एक गडी वाटत असतो तंत्रज्ञ नव्हे.
असं असलं तरी इथल्या कॉश्च्युम डिझायनर्स विषयी बोलताना या सगळ्यातून आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या एका महत्वाच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. ते नाव म्हणजे भारतात पहिलं ऑस्कर खेचून आणणार्‍या गांधी चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनर भानू अथैय्या. कृष्णधवल काळातल्या सिआयडी (१९५६), प्यासा (१९५७), कागज के फूल (१९५९) अश्या सिनेमांच्यापासून ध्यासपर्व (२००१), लगान (२००१), स्वदेस(२००४) अश्या आत्ताच्या सिनेमांपर्यंत कैक चित्रपटांचे कॉश्च्युम्स डिझाइन केलेल्या ह्या आपल्याकडच्या सगळ्यात ज्येष्ठ अश्या कॉश्च्युम डिझायनर. त्यांच्या कामामधे आपल्याला स्टारशरण, ग्लॅमरशरण अशी वेशभूषा क्वचितच बघायला मिळते. मुळात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनी असल्यामुळे पेंटिंगची जाण त्यांच्या कामात दिसून येतेच. पण भारतातलं पहिलं ऑस्कर ज्या कलेसाठी मिळालं ती कला मात्र आज आपल्या चित्रपटसृष्टीमधे अजूनही कमी महत्वाची मानली जाते.
यावर उपाय म्हणजे जास्तीतजास्त चांगलं काम करत रहाणं हेच असं कोणीतरी म्हणालं मधे. तर मी ते काम करायला जावं खरं. पण मैत्रिणीनी विचारलेल्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर तर दिलं पाहीजे. तेव्हा त्या उत्तरासाठी पुढचा म्हणजे शेवटचा लेख राखून ठेवते.
---नीरजा पटवर्धन

Tuesday, December 21, 2010

सोंग सजवण्याची कला - ६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे.

“मग हे लेख लिहिल्यावर नवीन ऑर्डर मिळाली की नाही?"
"कसली?"
"कपड्यांची? तू फॅशन डिझायनर आहेस ना?"
"मी फॅशन डिझायनर नाहीये रे मी कॉश्च्युम डिझायनर आहे." शक्य तितक्या शांतपणे मी एकाला उत्तर दिले. हे मला नवीन नाही.
"तेच ते गं! तेही कपडेच बनवतात आणि तुम्हीही, काय फरक मग तुमच्यात!" असही एका भोचक मावशींनी एकदा फटकारलं होतं. तुमच्याही डोक्यात आला असेलच हा प्रश्न. थोडं त्यावरच बोलूया आपण.
हो फॅशन डिझायनर्स आणि कॉश्च्युम डिझायनर्स दोघेही कपडेच डिझाइन करतात. पण दोन्ही पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. कारण दोन्हीचा हेतू वेगळा आहे. फॅशन डिझायनर्स हे मुळात डिझाइन करतात लोकांसाठी. खर्‍याखुर्‍या लोकांनी त्यांच्या रोजच्या आयुष्यात काय कपडे घालावेत, कसे रंग वापरावेत, कुठले कापड वापरावे आणि कश्या प्रकारचे कपडे कुठे जाताना घालावेत हे सगळं सूचित करतात ते फॅशन डिझायनर्स. यांचा तयार झालेला एकेक कपडा हा स्वतंत्र कलाकृती असू शकतो. उत्तम कारागिरीचे उदाहरण असू शकतो. कारण फॅशन ही मुळात डोळ्याला सुखावणारी, माणसाला आकर्षित करणारी असावी लागते.
नाटक, चित्रपट, नृत्यनाट्य इत्यादिंमधील नटांनी/नर्तकांनी घालायचे कपडे ठरवणारे ते आम्ही कॉश्च्यूम डिझायनर्स. आता नाटक, चित्रपट वा नृत्यनाट्य ह्या तिन्ही कला म्हणजे कथा सांगण्याची विविध माध्यमे आहेत. या माधमांची परिणामकारकता वाढवणार्‍या महत्वाच्या साधनांपैकी कॉश्च्युम्स हे एक महत्वाचे साधन आहे. कपडे घालणार्‍याच्या आवडीनिवडी आणि व्यक्तिमत्व यापेक्षा इथे त्या त्या कथेतली व्यक्तिरेखा महत्वाची असते. असलेल्या नटाच्या अंगावर कपडे चढवून त्याचे त्या व्यक्तिरेखेत रूपांतर करायचे असते. अंगावर चढवलेला कपडा हा त्या व्यक्तिरेखेचा रोजचा कपडा आहे असे वाटणे महत्वाचे असते. या ठिकाणी कॉश्च्युम्स हे नुसते कपडे नसून त्या त्या व्यक्तिरेखेचं चिन्हं म्हणून यावे लागतात. अर्थात त्यामुळेच एकेक कॉश्च्युम हा संपूर्ण कलाकृतीचा एक महत्वाचा भाग असतो वेगळी कलाकृती नव्हे. तस्मात कॉश्च्युम डिझाइन ही कला नाट्य वा चित्रपटकलेचे महत्वाचे अंग आहे.
हा झाला मूळ उद्देशांच्यातला फरक. ज्याचा परिणाम अर्थातच डिझायनिंग च्या विचारांवर होतो. फॅशन डिझायनिंग करताना व्यक्तिचे व कपड्याचे सौंदर्य खुलवणे हा एक महत्वाचा मुद्दा होऊन बसतो. वरच्या दर्जाचे शिवणकाम, अतिशय उत्तम भरतकाम, खरी सोन्याची जर, खर्‍या सोन्याचे उत्तम कारागिरी असलेले दागिने इत्यादी गोष्टी गरजेच्या ठरतात. अगदी हातात घेऊन बघितले तरी कुठेही कारागिरीच्या दर्जामधे शंका घेण्यास जागा नाही अशी वस्तू बनणे अपेक्षित असते. या उच्च दर्जाच्या कारागिरीला कुत्यूर (Couture) असे म्हणले जाते.
Kumbhar-04.jpg
या सगळ्या वस्तू कॉश्च्यूममधे गरजेच्या असतातच असं नाही. अश्या प्रकारचे कपडे घालणारी व्यक्तिरेखा असेल तर हरकत नाही पण त्यातही व्यक्तिरेखेचा स्वभाव, काळ या महत्वाच्या गोष्टी ठरतात.पण आपली व्यक्तिरेखा सामान्य माणसाची असेल तर त्याठिकाणी हा कुत्यूर चा वापर चालणारच नाही. अनेकदा नाटकात कपडे पटकन बदलायचे असतात तर कधी बजेट कमी असते तर कधी एखादी वेगळीच अद्भुत व्यक्तिरेखा असते अश्या अनेक कारणांनी आपण कपड्यांच्या कारागिरीतल्या उच्च दर्जापासून दूर जातो. तेव्हा त्याला कॉश्च्युम म्हणले जाते. खरेखुरे दागिने नसून खर्‍यासारखे दागिने, रेशमासारख्या दिसणार्‍या कपड्यातून बनवलेले रेशमी म्हणवले जाणारे कपडे अश्या अनेक गोष्टी कॉश्च्युममधे वापरल्या जातात आणि त्या रंगमंचावरून वा कॅमेर्‍यातून अगदी यथायोग्यही दिसतात. त्यामुळेच हे सगळं विचारात घेता दोन्हीच्या शिक्षणातही खूप फरक असणार हे ओघाने आलंच.
फॅशन डिझायनरला एकुणात समकालीन दृश्य जाणीव (लोकांना आजच्या काळात दृश्य गोष्टींमधे कश्या प्रकारच्या गोष्टी बघायला आवडतात), बाजारातली मागणी, वावराच्या हिशोबाने कोणाची कपडयांची गरज काय आह, वस्त्रोद्योग आणि फॅशन व्यापार यासंदर्भातला अभ्यास इत्यादी गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
तर कॉश्च्युम डिझायनरला कथा, कथेची हाताळणी व व्यक्तिरेखा अभ्यासून मग ती ती व्यक्तिरेखा कश्या प्रकारचे कपडे घालत असेल, कथा व हाताळणीच्या अनुषंगाने त्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, मानसशास्त्र, दिग्दर्शकीय हाताळणी, कॅमेरा, लाईटस याचा अभ्यास करावा लागतो.
Natasamrat-Beginning-1.jpg
हे असले तरी कपड्यांचा इतिहास, कपडे तयार करण्याच्या पद्धती, कापडांची तपशीलवार माहीती, रंग, रेषा, आकार, पोत इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास दोघांनाही करावा लागतो. पण गंमत काय होते की हे सगळं कोणालाच माहीत नसतं आणि मग मी कॉश्च्युम डिझायनर आहे असं म्हणलं की लोक मनातल्या मनात हा म्हणजे शिंपी असं म्हणून मोकळे होतात.
एकदा तर एकांनी कहरच केला. एका मोठ्या गावात एका शैक्षणिक प्रतिष्ठानात श्वास चित्रपटाचं स्क्रिनिंग होतं. तिथे मी, संदीप सावंत आणि संदीप कुलकर्णी असे तिघे गेलो होतो. स्क्रिनिंग नंतर आम्हाला तिघांना स्टेजवर बोलावले गेले आणि गुच्छ बिच्छ देणे इत्यादी सोपस्कार पार पडले. सत्कार आटोपल्यावर स्टेजवरून उतरून खाली येताना नट आणि दिग्दर्शकद्वयीला विद्यार्थ्यांनी घेरलं. मी हळूच बाहेर येऊन या दोघांची वाट पहात होते तेवढ्यात आतून एक जोडपे बाहेर आले. मला बघितल्यावर ते थबकले आणि म्हणाले
"अभिनंदन."
माझा आनंद गगनात मावेना. म्हटलं वा इतक्या आडगावात कॉश्च्युम डिझायनरच्या कामाला अभिनंदन करावसं वाटणारे लोक मिळाले!!
तेवढ्यात ते म्हणाले "तुमचं काम छान झालं होतं. पण तुम्ही प्रत्यक्षात वेगळ्या दिसता."
माझा फुगा फुटला. स्टेजवर याही बाईला गुच्छ मिळाला म्हणजे ही ती नटीच असणार असा विचार करून ते मलाच अमृता समजून अभिनंदन करत होते बहुतेक.
"मी नटी नाहीये. मी नव्हतं काम केलं सिनेमात." मी सांगितलं.
"मग काय केलंत तुम्ही?"
"मी कॉश्च्युम डिझायनर होते या सिनेमाची. सगळ्यां नटांनी सिनेमात काय कपडे घालायचे ते मी ठरवलं."
मी आपलं उत्साहात समजावयला गेले. त्यावर त्यांचा चेहरा पारच पडला.
"हो का? सॉरी हं!" असं म्हणून ते झर्रकन वळले आणि चालू लागले.
तुम्हाला कॉश्च्युम डिझायनिंगचं काम करावं लागतंय म्हणून सॉरी असं त्यांना म्हणायचं होतं की कॉश्च्युम डिझायनर आहात तरी आम्ही तुमचं अभिनंदन केलं त्याबद्दल सॉरी म्हणायचं होतं त्यांना हे मला अजूनही कळलेलं नाही.
अश्यांच्या प्रतिक्रियांवर मीही 'बिच्चारे यांना काहीच कळत नाही' असं मनात म्हणत हसून दाखवते. पण दुसर्‍याच दिवशी माझे कपडे शिवणार्‍या टेलरच्या पावतीवर कॉश्च्युम डिझायनर असं छापलेलं मी पाहते आणि मलाच बिच्चारं वाटायला लागतं. हे खरंय की आपल्याकडे कॉश्च्युम डिझायनर या संज्ञेचे निकष स्पष्ट नसल्याने कोणाला नक्की काय म्हणायचे याबाबत फार मोठा गोंधळ आहे.
Kumbhar-01.jpg
एखाद्या नाटकाचे कपडे शिवून देणाराही स्वत:ला डिझायनर म्हणवतो. एखाद्या सिरीयलच्या ठिकाणी स्पॉन्सर केलेल्या कपड्यांच्यातून कंटिन्युइटी बघून कपडे देणाराही स्वत:ला डिझायनर म्हणवतो. कपडे भाड्याने देणारा ड्रेसवालाच अनेकदा अश्या तथाकथित डिझायनर्स ना सांगत असतो "ये फलाणा कॅरेक्टर है ना बेन, तो उसका कपडा ऐसाही होता है .येही लेके जावो." आणि ते त्याच वस्तू घेउनही जातात. त्यांना दोष देण्यातही काही अर्थ नाही म्हणा. मालिकांमधे इतपत विचार करून काम करायला वेळच नसतो. सगळ्याच गोष्टी कमीतकमी वेळात करता येणे हेच सगळ्यात महत्वाचे होऊन बसलेले असते तिथे त्याला ते तरी काय करणार.
इथवर या लेखमालेचा प्रवास आला. माझ्या शिक्षणाविषयी, माझ्या कामाविषयी तुम्हाला बरंच काही सांगितलं ते माझ महत्व ठसवायला नाही. ही कॉश्च्युम डिझायनिंगची कला आणि पर्यायाने सगळीच दृश्यात्मकता ही संपूर्ण चित्रात कशी नि किती महत्वाची आहे याचा थोडासा तरी अंदाज तुम्हाला यावा यासाठी हा सगळा प्रपंच.
खूप अभ्यास केला इथवर आता पुढच्या एक-दोन लेखात थोड्या गमतीजमती बघूया आणि लेखमालेचा शेवट करू या.. काय म्हणता?
--- नीरजा पटवर्धन

Thursday, December 16, 2010

सोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास

“तू श्वासचे कॉश्च्युम डिझाइन केलेस म्हणजे तुला नटांनी सांगितले ते कपडे आणून दिलेस की तू ठरवलेस?" एका मुलाखतकाराने भर सभेमधे मला प्रश्न विचारला. मी अवाक. पण श्वाससाठी कॉश्च्युम डिझायनिंग केलंस म्हणजे केलं काय नक्की हा प्रश्न पडलाच असेल अनेकांना. त्याबद्दलच बोलूया.
चित्रपटाचा महत्वाचा घटक असतो दिग्दर्शक. त्याला दृश्य भागाबद्दल आस्था असेल, समज असेल तरच चित्रपट चांगला दिसतो. जे प्रेक्षकांपर्यंत पोचवायचंय ते पोचवू शकतो. प्रत्येक फ्रेम हे एक पेंटींग असतं असा विचार करणं गरजेचं असतं. तेव्हा दिग्दर्शकाच्या डोक्यात काय दृश्य आहे याचा विचार आणि बाकीच्या घटकांचा अभ्यास हा आधी आला. इथे दिग्दर्शकाच्या मनामधे चित्रपटाची ट्रीटमेंट अतिशय स्पष्ट होती. साधेपणा हा सगळ्यात महत्वाचा होता. चमकदार, भडक अश्या शब्दांना थारा नव्हता. वापरला जाणार कॅमेरा व फिल्म या संदर्भाने रंगसंगती बद्दल तसेच पटकथेची मांडणी, प्रत्येक व्यक्तिरेखेची पटकथेतील गोष्ट यांबद्दल समजवून घेतलं दिग्दर्शकाकडून. नटमंडळी वेगळी न दिसता व्यक्तिरेखाच दिसली पाहिजे हे महत्वाचे. कपडे वेगळे दिसून येणं, जाणवणं ही चूकच गोष्ट असते हे कायम डोक्यात ठेवले.
साधेपणा हा आपोआप येत नाही. तो आणावा लागतो. तेव्हा कपड्यांच्या अनुषंगाने साधेपणाचे काही निकष ठरवले. ते साधारणपणे असे होते
१. भडक आणि अंगावर येणारे रंग, चमकदार कापड इत्यादी गोष्टी टाळायच्या. अगदी मॉबमधे सुद्धा.
२. हाय कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन टाळायचे उदाहरणार्थ पांढरा शर्ट व काळी पँट, कारण त्यामुळे चित्र भडक होऊ शकते.
३. महत्वाच्या व्यक्तिरेखा मॉब समोर उठून दिसाव्यात यासाठी इतर लोकांपेक्षा वेगळ्या आणि उठावदार रंगाचे कपडे देणं ही पद्धत टाळायची.
४. कुठलाही कपडा कोरा करकरीत वाटता कामा नये. सुखवस्तू माणूसही रोज नवे कोरे कपडे घालत नाही. असलेले धुवून वापरतो तेव्हा ते कपड्यांचं वापरलेपण आलंच पाहिजे.
मग हॉस्पिटल, क़ॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टरचा दवाखाना, रस्ते, काही मेडीकल सोशल वर्कर्स,त्यांचे सपोर्ट ग्रुप्स तसेच कोकणातले गाव अश्या अनेक ठिकाणांचा कपड्यांसाठी रिसर्च सुरू झाला. कथा आजची असल्याने खूप सारे संदर्भ डोळ्यासमोरच होते केवळ ते उचलण्याची गरज होती.
Doctor.jpg
चित्रपटात आपल्याला पहिल्यांदा दिसते ती व्यक्तिरेखा म्हणजे ऑन्कोसर्जन मिलिंद साने. व्यवसायाने सर्जन असलेला हा माणूस अतिशय बिझी आणि प्रथितयश आहे. कॅन्सर या शब्दानेच घाबरून गेलेल्या रूग्णाला आणि नातेवाइकांना याचं असणंही बरं वाटणारं आहे. आता डॉक्टर म्हणजे फॉर्मल शर्ट-पँट शिवाय वेगळा काही कपडा असणार नाही अर्थातच. पण दोन्हीतला कलर कॉन्ट्रास्ट कमी ठेवायलाच हवा कारण या डॉक्टरबद्दल एक आदर नि सच्चेपणा वाटायला हवा. शर्टचे रंग अतिशय सोबर, फिके आणि प्लेझंट. शर्टाचा दर्जा चांगल्यातला, ब्रॅन्डेड असा सगळा विचार केला. कथेतला मूळ अनुभव डॉ. शैलेश पुणतांबेकरांचा आहे. त्यांच्या कपड्यांचं निरीक्षण करताना लक्षात आलं की या माणसाकडे कदाचित एकाच रंगाचे, वेगवेगळ्या ब्रॅण्डस चे आणि किंचितच फरक असलेले सहा शर्टस असू शकतात किंवा आहेतच. थोडक्यात एका ठराविक पद्धतीच्या पलिकडे त्यांचे कपडे जाणार नाहीत. या सार्‍यातून डॉक्टर मिलिंद साने उभा राह्यला.
20-Doctor-trying-to-explain.jpg
शहरातली दुसरी महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे आसावरी. मेडीकल सोशल वर्कर. नुकतेच शिक्षण संपलेली. रूग्ण आणि डॉक्टर्स यांच्यातला दुवा. कॅन्सरच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला रूग्णाला मदत करणे हे तिचं काम. पेशंटला तिचं असणं हे प्लेझंट वाटलं पाहिजे. अनेक मेडिकल सोशल वर्कर्स जेव्हा पाह्यल्या तेव्हा त्यातल्या कुणीही गबाळे कपडे घातलेलं दिसलं नाही. तेव्हा अर्थातच सोशल वर्कर या इमेज ला छेद देणारे कपडे वापरले. अबोली आणि पिवळ्या छटांचे फिक्या रंगाचे लखनवी सलवार सूट हे कुणाच्याही अंगावर कधीही प्लेझंटच दिसतात. ते वापरले. पण ऑपरेशनच्या दिवशी सकाळी लवकर हॉस्पिटलात येताना आसावरीला सलवार सूट वागवायला वेळ मिळणारच नाही हे उघड होते त्यामुळे फॉर्मल ट्राउझर्स आणि फॉर्मल शर्ट असा आजच्या काळातल्या वर्कींग वुमन प्रकारचा कॉश्च्युम निवडला.
kokanatil-mandali.jpg
कोकणातून आलेली महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे आजोबा. कोकणातल्या छोट्याश्या खेड्यातले साठीच्या घरातले एक गृहस्थ. झाडंमाडं असणारं कुटुंब आणि आजोबा कुटुंबप्रमुख व्यक्ती. घरात पैसाअडका रग्गड म्हणावा असा नसला तरी दोन वेळची भ्रांत नाही. कष्टाची सवय आणि राहणीमधे साधेपणा हे ओघाने आलंच. कोकणात फिरताना एक लक्षात आलं की कोकणातला माणूस मग तो परिस्थितीने अगदी व्यवस्थित असला तरी त्याच्या त्याच्या कम्फर्ट झोनमधे तो कमरेला पंचा आणि वरती उघडा असाच असतो बर्‍याचदा.
01.jpg
गावाबाहेर जाताना हा माणूस लांबरूंद धोतर वरती सदरा इत्यादी घालून जातो. तेच इथे आजोबांसाठी केलं त्यामुळे शहरात आलेले आजोबा धोतर, सदरा, खांद्यावर पंचा आणि टोपी या वेषात दिसतात पण कोकणात मात्र बागेत काम करताना, समुद्रावर जाताना केवळ पंचा लावलेले, गावातल्या गावात धोतर आणि बंडी घातलेले अश्या विविध कपड्यात दिसतात.
Ajoba-va-parashya-01.jpg
त्यांचा नातू परश्या ही व्यक्तिरेखा कोकणातली दुसरी व्यक्तिरेखा. सर्वसाधारणपणे हाफ चड्डी आणि वरती शर्ट असे कपडे. मध्यम किंमतीचे आणि त्यातल्या त्यात छोट्या गावात जरा नवीन पद्धतीचे वाटतील असे. हाफ चड्डी ही बहुतांशी शाळेची खाकी चड्डीच असू शकते. अगदी ठिकठाक घरातला मुलगा असला तरी छोट्याश्या खेड्यातली पद्धत अशी शाळेच्या खाकी चड्डीवर वेगळा शर्ट घालून पोराला लग्नाकार्याला पण घेऊन जातील.
parashya-va-aai.jpg
लहान मुलांनी कायम आपले आवरल्यासारखं कपडे करून बसायचं ही पद्धत शहरातली. ते खेड्यात दिसणार नाही. लहान मूल हे खेळून मळलेलं आणि साध्या कपड्यातच दिसणार. घरात, बागेत वावरत असताना नुसतीच हाफ चड्डी किंवा बनियन आणि खाली हनुमान चड्डी असाच वेश असणार.
हे झाले या दोघांचे सर्वसाधारण कपडे. पण आजोबा आणि परश्याच्या बाबतीत कपड्यांमधे एक अजून महत्वाची गोष्ट केली होती. ऑपरेशन एक दिवसाने पुढे गेल्यावर आजोबा हॉस्पिटलमधून पळून जाऊन परश्याला शहर दाखवायला घेऊन जातात, शहर दाखवतात आणि परत येतात या भागात त्यांचे कपडे बदलल्याचे आपल्याला दिसत नाहीत. कारण ते योग्यही नाही.
Ajoba-va-parashya-03.jpg
पण खरंतर या भागात या दोघांचे कपड्याचे एकसारखेच असणारे चार सेटस वापरले आहेत. हॉस्पिटलमधून निघून जाताना कपडे जरा धुवट असतील पण दिवसभर शहरात फिरणार. रस्त्याने आणि तेही पायी किंवा रिक्षाने म्हणजे घाम आणि धूळीने कपडे मळणारच. ते मैदानात जातात तिथे कपड्याला माती लागणार. लहान मूल आहे ते मातीचे हात कपड्याला पुसणार, खातान अंगावर कुठेतरी सांडणार आणि असं सगळं करून आल्यावर दिसतील ते कपडे जातानाच्या कपड्यांपेक्षा मळलेले असणारच. शूटींग आपण काही चित्रपटाच्या क्रमाने करत नाही म्हणजे एकच कपडा ठेवून तो मळवला तर नंतर जेव्हा आधीचं शूट करू तेव्हा तो चुकीचा दिसणार असा सगळा विचार करून चार सेटस वापरायचे ठरले. मग ते शहरात कुठे कुठे जातात आणि तिथे कसे वावरतील व त्यामुळे कपडे कुठे कुठे मळू शकतील याचा अंदाज घेऊन एका क्रमाने ते चारही कपडे मळवले.
परश्याचा मामा हा खेड्यातला २०-२२ वर्षांचा तरूण मुलगा. गावच्या ठिकाणी मिळेल अशी पँट आणि बाहेर ठेवलेला चेक्सचा ढगळ शर्ट असं एक प्रातिनिधीक रूप त्याला दिलं.
परश्याची आई म्हणजे साधारण तिशी बत्तिशीची खेड्यातली बाई. आज या वयाची बाई नक्कीच काठापदराच्या कॉटनच्या साड्या नेसत नाही. स्वस्त, टिकाऊ आणि वापरायला सोप्या सिंथेटिक साड्याच नेसते. तश्या तिच्यासाठी घेतल्या. तिची साडीवरची ब्लाउजेस मुद्दामून कुडाळच्या बाजारातून शिवून घेतली.
मॉबमधील लोकांना स्वत:चे कपडे घालून यायला सांगितले होते. रंग आणि पद्धत सांगितली होती. तरीही काही भडक वा चकचकीत कपडे आलेच तर ते बदलता यावे यासाठी काही डल कलरच्या शाली, साध्या साड्या, साधे शर्टस असं काय काय तयार ठेवलं होतं. मॉबचे आणि सगळ्या व्यक्तिरेखांचे कपडे वापरलेले वाटावेत यासाठी प्रत्येक कपडा गरम पाण्यातून काढणे, चहाच्या पाण्यात ठेवून देऊन त्याला पिवळट छटा आणणे, कोकणातली तांबडी माती पाण्यात उकळवून त्यात कपडे बुडवून ठेवणे, डाग पडल्याजागी बुटपॉलिशचा वापर असे अनेक उपाय वापरले होते. काही कपडे तर जुन्या बाजारातून विकत घेतले होते. आणि मग स्वच्छतेसाठी म्हणून ते ड्रायक्लिन करून घेतले.
आता म्हणाल "हे तुम्ही म्हणताय म्हणून समजतंय पण एवढं काही केल्याचं असं कळलं नव्हतं"
तर मग द्या टाळी तेच तर करायचं होतं!
माझा एक प्रोफेसर म्हणतो त्याप्रमाणे 'प्रेक्षकाला काय केलं हे वाचता येणार नाहीच पण त्याचा परिणाम त्याच्यापर्यंत नक्कीच पोचतो.'
shevat.jpg
---नीरजा पटवर्धन

Wednesday, December 15, 2010

सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं

यावेळेला खर्‍याखुर्‍या नाटकाच्या मी केलेल्या डिझायनिंगबद्दल बोलायचं आपलं ठरलंय गेल्या वेळेलाच तेव्हा नमनाला घडाभर तेल नको ओतायला. जाउया तिकडच्या नाटकांकडे, डिझायनिंगकडे.
यूजीए मधलं पहिलं वर्ष प्रत्यक्ष डिझायनिंग करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारीचं गेलं. पण उन्हाळ्यात सँटा फे ऑपेरा मधे मात्र संधी मिळाली. तिथे विद्यार्थी डिझायनर्सना अप्रेंटीस ट्रेनिंग मधल्या अप्रेंटीस शोकेससाठी वेगवेगळ्या ऑपेरामधले एकेक प्रवेश डिझाइन करायला मिळायचे. या डिझायनिंगसाठी काडीचंही बजेट नसायचं. पण कंपनीकडे ४० वर्षांपेक्षा जास्त काळात त्यांच्याइथे झालेल्या ऑपेरांच्या कपड्यांचा स्टॉक होता. सगळे कपडे अतिशय व्यवस्थित जतन केलेले होते. त्यातल्या वस्तू वापरायची आम्हाला मुभा होती पण तशीच्या तशी नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा गाउन आहे तर तो मूळ वस्तू म्हणून घ्यायचा आणि मग त्या त्या व्यक्तिरेखेप्रमाणे त्यावर कधी कापडे लपेटून वा कधी दागिन्यांनी मढवून वा कधी रंग बदलून नवीन वेशभूषा तयार करायची असे.
माझ्या वाट्याला 'सॅम्सन एट दलिला' या ऑपेरामधला एक सीन आला होता ज्यात दलिला आणि पुजारी मिळून सॅम्सनला संपवायचा कट करत असतात. त्यासाठी दलिलाने सॅम्सनला आपल्या सौंदर्याने आणि प्रेमाच्या नाटकाने भूलवून मारण्याबद्दल संवाद चाललेला असतो असा तो सीन. दलिला आणि पुजारी दोघंही पॅलेस्टिनी. ही कथा बायबलमधली. बॅबिलोनियन वा असिरीयन संस्कृतींचा पगडा यांच्या राहणीमानावर होता. त्याचा अभ्यास केल्यावर जे मिळालं त्याच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत डिझाइन केलेली ही वेशभूषा. कापड शिवून वापरण्याबरोबरच कापड गुंडाळून वापरण्याची असिरीयन पद्धत, सुंदर मुलींनी पोटरीवर घातलेले दागिने हा त्या काळातला महत्वाचा तपशील अश्या गोष्टी उचलून डिझाइन तयार केले.
Samson-Et-Dalila---Dalila.jpg
या शोकेस साठी डिझायनर पण आम्हीच आणि बनवणारे पण आम्हीच असायचो त्यामुळे आपलं कागदावरचं डिझाइन प्रत्यक्ष्यात आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा पहिला धडा इथे मिळाला.
दुसर्‍या वर्षात यूजीए मधे प्रत्यक्ष डिझायनिंगची घडी अवतरली. पिकासो ऍट द लॅपिन एजिल या नावाचे स्टीव्ह मार्टिन या हॉलिवूडमधील नटाने लिहिलेले नाटक मी डिझाइन केले. नाटकाचा काळ १९०४ आणि स्थळ पॅरीसमधील लॅपिन एजिल नावाचा बार. नाटकात पिकासो आणि आइनस्टाइन भेटल्याचे दाखवलेय. आणि कहर म्हणजे भविष्यातून, अंगावर तार्‍याची धूळ बाळगत एल्व्हिस प्रिस्ले पण अवतरतो याच नाटकात. नाटक अर्थातच वास्तवाला धरून नाही, नाटकाची जातकुळी विनोदाची आणि कल्पनाविलास भरपूर त्यामुळे डिझायनिंगमधे वास्तवाशी फारकत घेणे सहज शक्य होते. तरीही त्या त्या काळाची, व्यक्तिरेखांच्या सामाजिक स्थानाची जी जी म्हणून वैशिष्ठये होती ती तर असायलाच हवी होती. पण त्याच्या काटेकोर तपशीलात, रंगांच्या निवडीमधे, कापडाच्या निवडीमधे काही अंशी स्वातंत्र्य होतं.
Picasso-At-the-Lapin-Agile-(3)---The-bar.jpg
व्यक्तिरेखेचा स्वभाव आणि नाटकातलं स्थान या गोष्टी कपड्यांच्या ऐतिहासिक तपशीलापेक्षा काही अंशी वरचढ झाल्या तरी चालण्यासारखं होतं. हे जरी खरं असलं तरी अभ्यास करताना १९०४ च्या कपड्यांचा, त्या काळच्या पॅरिसचा आणि पिकासो व आइनस्टाइन या २० व्या शतकातल्या दोन सगळ्यात प्रसिद्ध व्यक्तिरेखांचा अभ्यास अत्यंत बारकाईने करणे जरूरीचे होते. १९०४ चा काळ बघता पुरूषांच्या कपड्यात तपकीरी, काळा, राखाडी व निळा हे रंग जास्त प्रमाणात असणार होते पण नाटकाच्या नेपथ्यामधे शिसवी आणि महागनी लाकडाच्या रंगाचाच वापर असल्याने तपकीरी व काळा हे रंग बाजूला टाकले. त्यामुळे उरले मग राखाडी आणि निळा हे रंग. तेच वापरले पुरूषांच्या कपड्यात. स्त्री व्यक्तिरेखांच्यातली बार मधली वेट्रेस होती तिच्यासाठी लाल रंग, १९०४ च्या संदर्भाने थोडा उच्छृंखल वाटेल असा स्कर्ट आणि कॉर्सलेट वापरलं आणि दुसरी जी कुणा पुरूषामुळे भारावून गेलेली, निरागस मुलगी होती तिच्यासाठी हलके रंग वापरले.
त्याच वर्षी दुसरं नाटक डिझाइन केलं ते म्हणजे 'अ‍ॅब्डकशन ऑफ सीता'. रामायणाची गोष्ट आणि इंडोनेशियन केचक प्रकाराचं नृत्यनाट्य असं या नाटकाचं स्वरूप. केचक नृत्यनाट्य स्टायलाइज्ड पठडीचं. आपल्याकडच्या यक्षगान, दशावतार यांच्यासारखं. याचीही एक ठराविक वेशभूषा असते. व्यक्तिरेखांचे रंग, पोत, इतर साज सगळं सगळं सुष्टदुष्ट च्या कोष्टकाप्रमाणे ठरलेलं असतं. मूळ केचक ची वेशभूषा वापरणं वा बनवणं जॉर्जिया मधे शक्य नव्हतंच. बहुतांशी वस्तू जॉर्जिया मधे मिळण्यासारख्या नव्हत्या. तसेच करणारी नटमंडळी ही सगळी अमेरीकन, ज्यांचे केचक पद्धतीचे नृत्यकौशल्य नसल्यासारखेच होते. आणि त्यातून असा अवजड कपडा घालून हे अनोळखी पद्धतीचे नृत्य करणे यातल्या कोणालाच जमण्यासारखे नव्हते. मूळ केचकपासून फारकत घेऊन दोन महत्वाचे बदल या सादरीकरणात होते ते म्हणजे कोरसमधे मुलीही होत्या. मूळ केचकमधे केवळ स्त्री व्यक्तिरेखांच्यापुरत्याच मुली असतात आणि कोरसमधील लोक कमरेला एक धोतर व त्यावरून गुंडाळलेले पांढरे काळे चौकडीचे कापड या वेषात असतात. दुसरा बदल म्हणजे कोरस व व्यक्तिरेखा करणारी नटमंडळी वेगवेगळी नसून कोरसमधीलच व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करत होती. मूळ केचकमधे कोरस चा गट वेगळा असतो आणि व्यक्तिरेखा करणारे वेगळे. व्यक्तिरेखांची वेशभूषा अत्यंत एलॅबोरेट आणि चढवायला खूप वेळ लागणारी अशी असते. हे सगळं विचारात घेता प्रथम मूळ केचकच्या कपड्यांचा अभ्यास महत्वाचा होता. त्यानंतर बाकी सगळ्या मुद्यांना धरून त्यात बदल करणे गरजेचे होते.
Abduction-of-Sita-(2)---Laxman,-Ram,-Seeta.jpg
कोरसचा वेश संपूर्ण वेळ अंगावर असणार होता. अगदी एखादा नट व्यक्तिरेखा बनून येतो तेव्हासुद्धा हा बेस कॉश्च्यूम म्हणून असणारच होता. मग कोरसच्या मूळ कपड्यातल्या तंग धोतराच्या जागी गुडघ्याच्या खालपर्यंत येईल अशी इंडोनेशियन त्वचेच्या रंगाची पँट वरती त्याच रंगाचा टिशर्ट आणि कमरेला काळे पांढरे चौकडीचे कापड अशी वेशभूषा निर्माण झाली. व्यक्तिरेखा बनून येताना याच कपड्यावर दोन गोष्टी अंगावर चढवल्या की झाले अशी व्यवस्था केली होती. खूप सारे जरीचे कापड केचकच्या मूळ कपड्यात वापरले जाते त्यासाठी कपड्यावर सोनेरी रंगाने स्टेन्सिलिंग करून हवा तो परिणाम साधला गेला.
Abduction-of-Sita.jpg
तिसर्‍या वर्षात द क्रुसिबल हे आर्थर मिलरचं नाटक केलं. नुसतंच डिझाइन केलं असं नाही तर हे माझं थिसीस प्रॉडकशन असल्याने त्या प्रोसेसवर थिसीस लिहून तो डिफेन्डही केला. हे नाटक मिलरने लिहिलं १९५२ मधे पण नाटकाचा काळ आहे १६९२ चा अमेरीकेतील मॅसेच्युसेटस येथील सेलम या गावातला. हा काळ म्हणजे अमेरीकेत युरोपियन लोक येऊन वसण्याचा काळ. सेलम मधे वसलेले हे लोक सगळे प्युरिटन या प्रोटेस्टंट पंथातले खिश्चन लोक. अत्यंत कडवी धर्मनिष्ठा आणि ज्या ज्या गोष्टीचा आनंद उपभोगता येतो ते ते पापकर्म आहे अशी धार्मिक धारणा असलेले हे लोक. अत्यंत प्रतिकूल हवामानाला तोंड देत नव्या भूमीत टिकू पाहणारे लोक. साहजिकच चेटूक, मंत्रतंत्र यांच्यावर प्रचंड विश्वास आणि त्याची भितीही. या सगळ्यातून १६९२ साली ज्या चेटक्यांच्या सुनावण्या झाल्या सेलम मधे, ज्यात एका वेळेला १९० पेक्षा जास्ती लोकांना एकदम फाशी देण्यात आली या घटनेभोवती हे नाटक फिरते. नाटकाच्या दिग्दर्शकाला कपड्यांमधे त्या काळाची एक सर्वसाधारणत: लाईन आलेली हवी होती. बारीक बारीक तपशीलांच्यात फेरफार केलेले त्याला चालणार होते.
The-Crucible-04-John-Procter-home.jpg
नाटकाच्या दृश्यतेसंदर्भात दिग्दर्शकाने 'अंधाराने वेढलेलं एक छोटसं जग, ज्या जगातले सगळे अंधारातल्या अस्तित्वांना घाबरलेले आहेत अशी एक ओळ सांगितली होती.' त्यावरून आम्ही तिघांनी म्हणजे मी, सेट डिझायनर व लाईट डिझायनर, आम्ही तिघांनी आपली डिझाइन कॉन्सेप्ट बनवली. मी पहिली फारकत रंगांशी घेतली. खडतर आयुष्य आणि धर्माची काटेकोर बंधने यांनी जखडलेल्या या लोकांचं आयुष्य मला रंगहीन वाटलं. त्यामुळे त्यांच्या कपड्यात काळा, पांढरा व राखाडी एवढेच रंग वापरले. पण अंधश्रद्धा, भिती, तसेच लोभ आणि सूडकरी प्रवृत्ती या सगळ्या एका रोगासारख्या आहेत आणि ज्यांना लागण झालीये त्यांच्या कपड्यात लाल रंग आहे जो दृश्यागणिक वाढत जातो असं दाखवलं. चेटक्यांच्या सुनावण्यांच्या संदर्भात अभ्यास करत असताना या विषयावरचं एक पेंटींग मिळालं होतं त्यामधे लाल रंगाचा वापर होता जो काळाला अनुसरून नव्हता. त्यावरून ही लाल रंगाची कल्पना डोक्यात आली होती. ह्या नाटकाच्या डिझाइन प्रोसेसबद्दल थिसीस लिहून तो डिफेन्ड करणे हा माझ्या अभ्यासक्रमाचाच शेवटचा भाग होता.
या सगळ्या प्रक्रीयेतून तावून सुलाखून निघून तीन वर्षांनी एम एफ ए (ड्रामा-डिझाइन-कॉश्च्यूम) अशी डिग्री हातात पडली. आणि मी मायदेशी परतले.
--- नीरजा पटवर्धन

Monday, December 13, 2010

सोंग सजवण्याची कला - ३. डिझायनिंग पूर्वी

"काय करता काय तीन वर्ष कॉश्च्यूमच्या शिक्षणामधे?" या प्रश्नाचं उत्तर देताना खूप सार्‍या विषयांचा पाढा वाचून तर झाला "पण त्या सगळ्याचा उपयोग करायला शिकवलं की नाही तुम्हाला?" असा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात वळवळला असणारच. तेव्हा त्याबद्दलच गप्पा मारू याच पण त्या आधी डिझायनिंगची पूर्वतयारी समजून घेऊया थोडी.
मी शिकायला गेले होते ती असिस्टंटशिपवर. म्हणजे मास्टर्स डिग्रीला शिकतानाच बरोबरीने विद्यापीठात तुमच्या विषयाशी निगडीत असं काम आठवड्यातले ठराविक तास करायचं आणि त्याबदल्यात तुमची शिक्षणाची फी भरली जाते आणि वर थोडेसे पैसे मिळतात जे घरभाडं, जेवणखाण, पुस्तकं, आर्ट मटेरियल आणि इतर गरजेच्या वस्तूंमधे उडून जातात.
abduction-of-sita.jpg
नाटकाच्या विभागामधले डिझाइनचे विद्यार्थी शिकवण्याच्या ऐवजी शॉप्स मधे काम करतात. प्रत्यक्ष डिझायनिंग करायच्या आधी अजून काही तयारी अपेक्षित असते जी या शॉप्समधे काम करताना होते. मी कॉश्च्यूमची त्यामुळे कॉश्च्यूम शॉपमधे काम करत होते. हे शॉप म्हणजे दुकान नव्हे. हे नाट्यविभागाचे कॉश्च्यूम शॉप जिथे दरवर्षी होणार्‍या नाटकांचे कपडे जतन करून ठेवले जातात, नवीन नाटकांसाठी कपडे बनवले जातात, दागिने, पर्सेस, टोप्या, चपला-बूट, मुखवटे सगळं काही ठेवलेलं असतं आणि ते बनवायची दुरूस्त करायची व्यवस्थाही तिथेच असते. कापडचोपड, बटणं, चेन अश्या वस्तू आणण्यापासून ते रंगीत तालमीपर्यंत सगळ्या कॉश्च्यूम संदर्भातल्या गोष्टी इथे घडतात.
masks.jpg
कुठल्याही प्रकारचा कपडा बनवणं, बूट रंगवणं, कापड रंगवणं, कॉश्च्यूमसाठी दागिने बनवणं असं सगळं सगळं इथेच केलं जातं. तर अश्या या कॉश्च्यूम शॉपमधे मी काम करत होते. या शॉपचा सगळा कारभार पाहणारी शॉप हेड सोडली तर बाकी सगळे माझ्यासारखेच मास्टर्स चे विद्यार्थी किंवा काही बॅचलर्स डिग्रीचेही विद्यार्थी.
या व्यवस्थेमुळे विभागाच्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाचे सर्व कॉश्च्यूम्स आमच्या हातातूनच बनून पुढे जात. प्रत्येक सेमिस्टरला किमान तीन तरी नाटकांच्या कपड्यावर काम केलं जाई. त्यामुळे सहा सेमिस्टर्स मधे कॉश्च्यूम्स बनवणे ज्याला आम्ही कॉश्च्यूम कन्स्ट्रक्शन म्हणतो त्याचा भरपूर अनुभव मिळाला. ग्रीक पद्धतीचे कपडे, कॉमेडिया डेलार्टे ची वेशभूषा, मुखवटे बनवणे, वेगवेगळ्या ऐतिहासिक काळातले वेगवेगळे कपडे आणि त्यांचे डिझायनिंग व कपडा बनणे या दोन्हीमधले तपशील अगदी बारकाईने कळले तसेच अनेक प्रकारच्या कापडांवर काम केलं गेलं त्यामुळे कुठलं कापड कसं वागत आणि त्याने आपल्याला हवे ते करायचे असेल तर काय करायला हवें, कुठल्या कापडाचा उपयोग कशासाठी होतो ह्याचाही अंदाज आला.
आमच्या डिपार्टमेंटला होणार्‍या नाटकाचं कॉश्च्यूम डिझायन आमच्यापैकीच म्हणजे माझ्यासारख्याच ग्रॅड स्टुडंटपैकी कुणीतरी केलेलं असे किंवा मग आमची प्रोफेसर सिल्विया पनाल असे. शॉपमधल्या एका भिंतीवर त्या त्या नाटकाची सगळी डिझाइन्स म्हणजे डिझायनरने काढलेली व्यक्तिरेखेची चित्रे लावलेली असत. डिझायनर एकदा सगळ्या शॉपमधल्या सगळ्यांना प्रत्येक कॉश्च्यूम तपशीलात समजावून देई. तो कसा बनायला हवा याविषयी चर्चा केली जाई. त्यामुळे डिझायनरशी संवाद कसा होतो, आपल्या डिझाइन्सवर काम करणार्‍याला काय काय प्रश्न असू शकतात आणि त्यांची उत्तरे कशी द्यायची याचा चांगलाच अनुभव मिळत होता. कॉश्च्यूम डिझायनरला स्वत:ला पुढे जाऊन कधी कपडे बनवण्यात उतरण्याची गरज पडत नाही सर्वसाधारणत: पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यातच. तर आणि तरच डिझायनर आपल्याला कश्या प्रकारचा कॉश्च्यूम हवा आहे हे सांगू शकेल.
म्हणजे आपल्याकडच्या संदर्भात बघायचं तर कसं की एखादी कॉश्च्यूम डिझायनर आहे जिला नव्वार साडी नेसता येत नाही. त्यामुळे तिला माहितीच नाहीत नव्वार नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती मग थोड्या जुन्या काळातली वेशभूषा डिझाइन करताना ब्राह्मणी साडी होते पायघोळ आणि पदर हा एवढा मोठ्ठा जे अगदीच काळाशी विसंगत असतं आणि मग दिसताना काही केल्या ते पात्र त्या त्या काळातलं वाटत नाही. तर यासाठी कॉश्च्यूम कसा बनणार याचं ज्ञान आणि अनुभव दोन्ही असायला हवे डिझायनरला. शॉपमधे काम करण्याने हा अनुभव भरपूर मिळाला.
उन्हाळ्याच्या तीन महिन्यात असिस्टंटशिप नसायची त्यामुळे मी व्हिसाचे नियम पाळत माझ्याच विषयाशी निगडीत इंटर्नशिप केली सॅन्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्यूम शॉपमधे. तीनही वर्षं. सॅन्टा फे ऑपेराचं कॉश्च्यूम शॉप बघून माझे डोळेच विस्फारले गेले. इथे शिवणकामाचे सात गट होते ज्यात प्रत्येकी आठ-नउ लोक काम करत होते. प्रत्येक गटाकडे प्रत्येक ऑपेरामधले ठराविक कपडे वाटून दिलेले असत. त्याच कपड्यांवर त्या गटाने काम करायचे. प्रत्येक गटातली मुख्य व्यक्ती असते तिला ड्रेपर म्हणतात. हे ड्रेपर लोक खूपच अनुभवी असतात. आपल्या गटाकडे आलेल्या कामामधले नवीन बनवायचे जे सगळे कपडे असत त्यासाठी गायकाच्या मापाप्रमाणे डमी बनवून त्याबरहुकूम प्रत्येक पॅटर्न बनवणे तसेच आपल्या गटाच्या कामाची योग्य ती आखणी करणे हे ड्रेपरचे काम. केलेल्या पॅटर्नप्रमाणे कापड बेतणे हे करण्यासाठी ड्रेपर आणि फर्स्ट हॅण्ड या पदाची व्यक्ती. मग स्टिचर्स आणि स्टिचर अ‍ॅप्रेन्टिस अशी उतरती भाजणी. कामाच्या पसार्‍यानुसार एका ड्रेपरच्या हाताखाली किती फर्स्ट हॅण्ड, स्टिचर्स, अ‍ॅप्रेन्टिस असत हे ठरत असते. शिवणकामाबरोबरचकॉश्च्युम शॉपमधे एक डाय शॉप असते जिथे कपडे डाय करणे, रंगविणे इत्यादी सगळ्या गोष्टी होत होत्या. एक क्राफ्ट विभाग जिथे पायापासून गळ्यापर्यंत सगळ्या ऍक्सेसरीज वर काम केलं जाई आणि एक मिलिनरी विभाग जिथे डोक्यावर घालायच्या सर्व प्रकारच्या टोप्यांवर केवळ काम चाले.
chilkhat.jpg
पहिल्या वर्षी मी स्टिचर आणि ड्रेसर ऍप्रेंटिस होते. ड्रेसर म्हणून काम ऑपेरांच्या रंगीत तालमीला सुरू होई. त्या त्या व्यक्तीचा जो कॉश्च्यूम असेल तो त्या व्यक्तीला कसा चढवायचा हे शिकवलं जाई. ऐतिहासिक युरोपियन कपड्यांमधले बहुतांशी कपडे हे व्यक्ती आपले आपण घालू शकत नाही. एक किंवा क्वचित दोन तीन लोकांनी मिळून तो त्या व्यक्तीच्या अंगावर चढवावा लागतो आणि तो कसा चढवायचा याच्या काही ठराविक पद्धती असतात. कॉर्सेट नावाचं प्रकरण बांधायला सवय नसलेल्या माणसाला चाळीस मिनिटेही लागू शकतात. तसेच अनेकदा ऑपेरा गायकाला एक सीन करून आल्यावर दुसर्‍या सीनला जायच्या आधी कॉश्च्यूम बदलणं अपेक्षित असतं पण संपूर्ण बदलायला वेळ नसतो मग त्यावेळेला तो बदल करण्यासाठी त्याला मदतीला अनेक जण असतातच पण कपडे बनवणार्‍यालाही ते कपडे पटकन बदलता यावे यासाठी क्लुप्त्या कराव्या लागतात.
एका ऑपेरामधे एका दृश्यात एक्झिट घेतल्यावर पुढच्या दृश्यासाठी प्रवेश करण्याआधी एक बरोक शैलीतला गाउन काढून एका ननचे जाडेभरडे आणि आकार उकार नसलेले कपडे घालणे अपेक्षित होतं. आणि त्या गायिकेला यासाठी वेळ होता केवळ चाळीस-पन्नास सेकंद. एवढ्याश्या वेळात कॉर्सेटचं लेसिंग निघणं शक्यच नव्हतं त्यामुळे तो ड्रेस ज्या शिवणगटाकडे होता त्या गटाच्या ड्रेपरने एक मस्त आयडीया लढवली. कपड्याला रिविट मारून त्यातून लेसिंग करण्याऐवजी कापडी लूप्स तयार केले आणि त्यातून एक पातळ पट्टी सरकवली. मधे जी जागा तयार झाली त्यातून लेसिंग केले. गाउन काढताना केवळ ती पट्टी ओढून काढावी लागे जेणेकरून संपूर्ण लेसिंग क्षणार्धात निघून येत असे. अश्या अनेक क्लुप्त्या इथे मी शिकले.
moti-kam.jpg
दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षी मी क्राफ्ट विभागात क्राफ्ट अप्रेंटिस आणि मग क्राफ्ट असिस्टंट म्हणून काम केलं. चामड्याचं काम म्हणजे बूटांचे आकार बदलणे, रंग बदलणे, चिलखत बनवणे, सिलिकॉन मोल्डिंग, वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे, हॅण्ड प्रॉप्स (पर्सेस, बटवे, पॅरॅसोल, काठ्या इत्यादी) बनवणे असं सगळं या क्राफ्टच्या काळात केलं. ज्याचा आज काम करताना प्रचंड उपयोग होतोय.
sporans.jpg
सॅन्टा फे ऑपेरा चे लोक आपल्या सगळ्या शॉप्स च्या लोकांसाठी प्रत्येक ऑपेरा ओपन होण्याआधी एक डिझाइन प्रेझेंटेशन ठेवत असत. ज्यामधे त्या त्या ऑपेराचे दिग्दर्शक आणि नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा असे तीनही डिझायनर्स येत आणि जे काही डिझाइन त्यांनी केलेलं आहे ते तसं का? कश्यापद्धतीने ते सध्याच्या डिझाइनवर येऊन ठेपले? डिझाइनचे जे निर्णय आहेत ते तसेच का घेतले? संपूर्ण ऑपेराकडे ते कश्या दृष्टीने पाहतात? एकेक व्यक्तिरेखा ते कश्यापद्धतीने उभी करतात इत्यादी सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जायच्या. प्रश्न विचारता यायचे आणि जगातल्या मोठ्या मोठ्या डिझायनर्स आणि ऑपेरा दिग्दर्शकांच्याशी संवाद साधता यायचा.
यामधे एकदा फॉलस्टाफ नावाच्या ऑपेराचे ब्रिटीश दिग्दर्शक सर जॉन मिलर ह्यांनी एकुणात डिझायनिंग बद्दल बोलताना एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती ती म्हणजे
"लॅव्हिश इज व्हल्गर, न्युडिटी इजन्ट." म्हणजे 'नग्नता नाही तर अति भपका, चकमकाट हा हिडीस असतो.'
आपल्या हल्लीच्या सिरीयल्सचं हिडीसपण दाखवायला हे वाक्य पुरेसं आहे नाही का? हे वाक्य, हा विचार आजही काम करत असताना ब्रह्मवाक्य असल्यासारखं जपून ठेवलेला आहे. अशी सगळी पूर्वतयारी करून घेऊन मग पुढे खर्‍या नाटकाच्या डिझायनिंग कडे प्रवास सुरू झाला. पण त्याबद्दल पुढच्या लेखात सांगते. तूर्तास हे पाठ करा
'लॅव्हिश इज व्हल्गर.'
---नीरजा पटवर्धन
तटी: या लेखातील सर्वात पहिली चित्रे म्हणजे अ‍ॅब्डक्शन ऑफ सीता मधील चित्रे वगळता बाकी सर्व चित्रांच्यातील वस्तू मी केवळ बनवल्या आहेत डिझायनरच्या सांगण्यानुसार. अ‍ॅब्डक्शन ऑफ सीता या प्रयोगाचे कॉश्च्युम्स मात्र मी डिझाइन ही केलेत आणि त्यांवरचे पेंटींगही केलेय.

Sunday, December 5, 2010

सोंग सजवण्याची कला - २. अमेरिकेतील शिक्षण

"अमेरीकेतला किती महिन्याचा कोर्स होता हा तुझा कॉश्च्युम डिझायनिंगचा?" या प्रश्नावर तीन वर्ष म्हणजे सहा सेमिस्टर्स असं उत्तर दिल्यावर "काय करता काय इतकी वर्ष तुम्ही" असा प्रश्न येतो आपसूक. त्याचं उत्तर द्यायचा हा थोडासा प्रयत्न करतेय आजच्या लेखात.
पुण्याच्या ललित कला केंद्रात नाटकामधे एम. ए. करताना हे जाणवलं होतं की वेशभूषेचं शिक्षण तर घ्यायला हवंय हे नक्की पण कुठे? भारतात तर कुठे सोय नव्हती. सतीश आळेकरांच्यामुळे आमच्या ललित कला केंद्रात युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया (यू.एस.ए.) चे तेव्हाचे नाट्यविभागप्रमुख डॉ. फार्ली रिचमंड आले होते. त्यांच्याशी भेट झाली आणि त्यातून पुढचा मार्ग मिळाला. जी.आर.ई., टोफेल, असल्या वळणांच्यातून जात आमचं विमान एकदाचं जॉर्जियाप्रांती एम एफ ए(मास्टर ऑफ फाइन आर्ट) ही पदवी घेण्यासाठी उतरलं.
कॉश्च्यूम डिझायनिंग च्या अनुषंगाने एकेका विषयाचे शिक्षण सुरू झाले. कॉश्च्यूम डिझायनरला ज्या नाटकासाठी वा सिनेमासाठी कॉश्च्यूम डिझाइन करायचे असतात त्याच्या इतर अनेक अंगांचा विचार करता यावा लागतो आणि त्यातलं ज्ञान असावं लागतं. त्यामुळे केवळ कपडेपटाबद्दल न शिकता इतरही गोष्टी शिकायला लागल्या.
तिथल्या तीनही वर्षाच्या सहा सेमिस्टर्स मिळून मी सीन पेंटींग(नेपथ्य रंगविणे), रिसर्च मेथडॉलॉजी (संशोधन पद्धती), स्क्रिप्ट अ‍ॅनेलिसिस (संहितेचा अभ्यास), थिएटर हिस्टरी - १ व २ (नाट्यकलेचा इतिहास), सीन डिझाइन (नेपथ्य संकल्पन), कॉश्च्यूम डिझाइन (वेशसंकल्पन), फॅब्रिक सरफेस टेक्निकस (कापड रंगविण्याच्या पद्धती), कॉश्च्यूम ऍन्ड डेकॉर हिस्टरी - १ व २ (कपड्यांचा व वास्तू सजवण्याचा इतिहास), लाइट डिझाइन (प्रकाशयोजना), इत्यादी विषय घेतले होते.
नाटक वा सिनेमाची सुरूवात होते लिखित संहितेपासून. हे लिहिलेलं नाटक पूर्ण पचवल्याशिवाय कोणीच पुढे जाउ शकत नाही. संहिता पचवली तरच त्यातल्या व्यक्तिरेखांच्या पोटात शिरता येईल, त्या ओळखीच्या होतील आणि मग त्यांचं सोंग कसं सजवायचं ते त्या स्वत:च सांगतील. तेव्हा संहिता महत्वाची. संहिता पचवताना संहितेचा पोत, शैली, विषय, आशय, काळ, लेखकाची संकल्पना इत्यादी गोष्टी वाचता यायला हव्या. त्यासाठी निरनिराळ्या लेखनशैलींची माहिती हवी. तसेच संहितेची मांडणी म्हणजे सुरूवात, मध्य व शेवट, प्रवेशसंख्या, घटनांचा वेग, बदलाच्या जागा इत्यादी सगळं समजून घेता यायला हवं. हे सगळं मिळून होतो संहितेचा अभ्यास हा विषय. या वर्गामधे अनेकप्रकारची नाटके आणि छोटे छोटे प्रवेश अभ्यासासाठी वाचून काढले गेले. यामुळे आता हातात संहिता आल्यावर त्यावर विचार करणे आणि काम करणे हे सोपे व्हायला लागले.
संहिता अभ्यासताना त्याबरोबरचा महत्वाचा मोठा विषय म्हणजे नाट्यकलेचा इतिहास. ह्या विषयाची व्याप्ती आभाळाएवढी. एक नाटक आपण करत असतो ते करण्याच्या काही ठराविक पद्धती असतात ज्या आभाळातून पडलेल्या नसतात. त्या तश्या तश्या घडण्यामागे बरीच उलथापालथ झालेली असते. हा सगळा प्रवास अभ्यासणं मनोरंजक तर असतंच आणि तेवढंच महत्वाचंही असतं. मी हा विषय एकूण दोन सेमिस्टर्स अभ्यासला. प्राचीन नाट्यकला ते रोमँटिक थिएटर अशी एक सेमिस्टर आणि वास्तवतावादापासून पोस्टमॉडर्निझमच्या काळापर्यंत अशी दुसरी सेमिस्टर. हा इतिहास अभ्यासताना प्रत्येक प्रकारचं किमान एकेक तरी नाटक वाचलं जाणं अपेक्षित होतं. त्यामुळे निदान २०-२५ नाटके तरी दोन सेमिस्टर्स मिळून वाचून काढली गेली.
नाट्यकलेच्या इतिहासानंतर येतो कपडे व वास्तू सजवण्याचा इतिहास. प्राचीन काळापासून लोकांचे कपडे आणि डेकॉर म्हणजे भिंती आणि खिडक्यांचे तपशील, फर्निचर, गाद्यागिरद्यांपासून शोभेच्या सर्व वस्तूंपर्यंत सगळं कसं होतं हे असतंच पण ते तसंच का होतं हे पण या मधे येतं. जनजीवन, हवामान, सामाजिक व्यवस्था, शास्त्रीय शोध, कलात्मक आवडीनिवडी या काळाप्रमाणे आणि प्रदेशाप्रमाणे बदलत असतात आणि त्याप्रमाणे वेशभूषा, डेकॉर, वास्तूकला हे सर्वही. हा अभ्यास करताना एखादा कपड्याचा वा फर्निचरचा प्रकार जेव्हा अस्तित्वात येतो त्यामागे काय काय असतं याची समज येते आणि ही समज प्रत्यक्ष डिझाइन करताना महत्वाची ठरते.
कॉश्च्यूम हिस्टरीच्या दोन सेमिस्टर्स घेतल्या होत्या. ज्यात प्राचीन ते आधुनिक याचा धावता आढावा पहिल्या सेमिस्टरमधे तर फ्रेंच राज्यक्रांतीपासून आजपर्यंतचा आढावा अजून बारकाईने दुसर्‍या सेमिस्टरमधे घेतला गेला.
"ही सगळी तर पूर्वतयारी झाली पण खरोखर डिझायनिंग करायला शिकता की नाही तुम्ही?" असा प्रश्न विचारालच आता. तर हो१ शिकतो ना! त्यासाठी वेगळा केवळ कॉश्च्यूम डिझायनिंगचा वर्ग असतो. यात कापडांचे प्रकार, चित्राचे रंग, रेषा, आकार इत्यादींच्याबद्दल तपशीलात अभ्यास करायचा असतो. आणि मग काही नाटकांचे कॉश्च्यूम्स डिझाइन करायचे असतात. नाटक वाचून त्याचा विचार, संशोधन इत्यादी सगळं करून मग आधी कच्चं चित्र आणि मग रंगांच्यासकट पक्क चित्र काढून त्याबरोबर आपल्याला जे कापड अपेक्षित आहे त्या कापडाचे छोटे तुकडे बरोबर जोडण्यापर्यंत सगळी प्रक्रिया करायची असते. पुढे प्रत्यक्ष कपडा बनवणे या वर्गात अपेक्षित नसते.
flapper.jpg
माझं स्पेशलायझेशन कॉश्च्यूम या विषयात असल्यामुळे कॉश्च्यूम डिझायनिंगच्या दोन सेमिस्टर्स मी घेणे अपेक्षित होते. ह्या दोन सेमिस्टर्स मिळून एकुणात अशी ८ नाटकांचे पेपरवर कॉश्च्यूम डिझाइन केले.
arcadia.jpg
कॉश्च्यूम डिझायनिंगच्या वर्गाबरोबरच कॉश्च्यूम मेकिंग म्हणजे हे सगळे डिझायनिंग केलेले कपडे बनवणे याचेही प्रशिक्षण होतंच होतं. त्यातले दोन महत्वाचे विषयांचे मी शिक्षण घेतले ते म्हणजे फॅब्रिक सरफेस टेक्निक आणि बेसिक्स ऑफ ड्रेपिंग हे होते. फॅब्रिक सरफेस टेक्निक म्हणजे कापड रंगवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचे शिक्षण. यात डाय करणे म्हणजे रंगात कापड बुडवून कापड रंगवणे आणि कापडाला वरून रंग लावून एका बाजूनेच कापड रंगवणे/ कापडावर रंगांनी चित्र काढणे अश्या दोन्ही प्रकारातल्या अनेक पद्धती शिकवल्या होत्या. याच्या मी दोन सेमिस्टर्स घेतल्या होत्या. आणि एकुणात १५ वेगवेगळे नमुने तयार केले होते.
block-printing.jpg
दुसरा महत्वाचा वर्ग म्हणजे बेसिक्स ऑफ ड्रेपिंग. म्हणजेच कापड शरीराप्रमाणे दुमडून, वळवून मग त्यानुसार कापून त्यावरून कापड बेतण्यासाठी पॅटर्न तयार करणे हे होय.
वेशसंकल्पन करणार्‍याला इतर डिझायनिंगच्या तंत्रांचीही व्यवस्थित माहिती हवी. यासाठी आमच्या युनिव्हर्सिटीमधे इतर डिझायनिंग पैकी म्हणजे नेपथ्य व प्रकाशयोजना यांपैकी एका विषयाच्या दोन सेमिस्टर्स आणि दुसर्‍या विषयाची एक सेमिस्टर घेणे अपेक्षित होते. या वर्गांचे स्वरूपही कॉश्च्यूम डिझायनिंगच्या वर्गांच्यासारखेच असायचे. एक नाटक घेऊन त्याचे नेपथ्य डिझाइन करणे, त्याचा ग्राउंडप्लान बनवणे आणि सेटची छोटी प्रतिकृती बनवणे हे अपेक्षित असायचे. मी नेपथ्याच्या दोन सेमिस्टर्स घेतल्या होत्या. या मधे एकुणात ६ नाटकांचे नेपथ्य डिझाइन केले होते. तसेच प्रकाशयोजनेची एक सेमिस्टर होती त्यात एकुणात 1 नृत्याचा कार्यक्रम आणि 2 नाटके यांची प्रकाशयोजना डिझाइन केली होती.
वेशभूषेबरोबर शिवणकामातल्या काही महत्वाच्या गोष्टी शिकणे अपेक्षित होते तसेच नेपथ्याच्या बरोबर सीन पेंटिंग शिकणेही अपेक्षित होते. सीन पेंटींग म्हणजे नेपथ्य रंगवणे. यामधला अगदी सुरूवातीचा भाग म्हणजे कोर्‍या जागेवर वेगळ्या प्रकारचा पृष्ठभाग रंगवणे. उदाहरणार्थ विटांच्या भिंतीचा पृष्ठभाग, स्टेन्सिल ने केलेली नक्षी, प्लास्टर व स्टको चा पृष्ठभाग, संगमरवर, लाकूड इत्यादी.
vita.jpg
या सगळ्याबरोबर दुसर्‍याने केलेल्या कामाचा अभ्यास करणे. त्यावर टिप्पणी करणे याही गोष्टी महत्वाच्या होत्या. आपल्या स्वत:च्या कामाकडे बघण्याची दृष्टी त्यातून मिळू शकते. यासाठी डिझाइन सेमिनार ह्याचाही अभ्यासक्रमात अंतर्भाव केलेला होता. यात एखाद्या डिझाइनिंगचा अभ्यास करणे, त्यावर प्रतिक्रिया देणे, ही प्रतिक्रिया मुद्देसूद पद्धतीने निबंधात मांडणे आणि सगळ्यांच्या समोर तो निबंध सादर करणे अशी प्रक्रिया असायची. एखादा मोठा डिझायनर, एखादा महत्वाचा नाट्यप्रयोग, एखाद्या ठराविक काळातली वेशभूषा, एखाद्या ठराविक नाट्यशैलीतील वेशभूषा असे एकूण चार निबंध मी लिहून सादर केले होते. ह्या सार्‍या शिक्षणाबरोबरच खरोखरीची नाटके डिझाइन करणे आणि त्यातून शिकणे हा महत्वाचा मुद्दा होताच. पण त्याबद्दल पुढच्या लेखात बोलूया.
---नीरजा पटवर्धन

Thursday, December 2, 2010

सोंग सजवण्याची कला - १. बजेटच नाही.

जानेवारी २००८ ते मार्च २००८ या कालावधीत प्रहार या वृत्तपत्राच्या रिलॅक्स या दर शनिवारी प्रसिद्ध होणार्‍या पुरवणीमधे माझ्या व्यवसायासंदर्भाने मी ८ लेखांची मालिका लिहीली होती. त्यावेळेला शक्य न झाल्यामुळे इथे युनिकोड स्वरूपात ते टाकू शकले नव्हते. आता सर्व लेख एकेक करून परत टाकणारे. हा त्यातला पहिला.
----------------------------------------------------------------------------------------------
"आम्ही कधी कॉश्च्यूमचा विचार केलाच नाही कारण बजेटच नसायचं" असं माझे विद्यार्थी त्यांनी आधी केलेल्या एकांकिका, नाटकं याबद्दल सांगतात.
"आत्ताचं तर नाटक आहे कॉश्च्यूम्सची काही गरज नाही त्यात पैसे नकोत घालवायला" असं तर मी खूप वेळा बरोबरच्यांकडून ऐकत आलेय.
मग काय आयुष्यभर पिचलेल्या बाईच्या अंगावर कडक स्टार्च केलेली कॉटनची कोरी साडी, १९५० मधल्या व्यक्तिरेखांच्या अंगावर १९९० मधले कपडे, घरातलं वातावरण कडक आणि सोवळं असलेल्या मुलीच्या अंगावर जीन्स आणि मॉड टिशर्ट असं काहीही असायचं आणि बहुतांशी लोकांना ते चुकीचं वाटायचं नाही. तेव्हा नेहमीच हा प्रश्न पडायचा की हे असं का? पैसे नाहीत म्हणून कुणाच्या घरातून आणलेले कपडे वापरताना आपण काहीच विचार करायचा नसतो का? साडीच्या जागी साडी आणि शर्टाच्या जागी शर्ट इतकंच कसं चालेल? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले प्रेक्षक ह्या गोष्टीचा स्वीकार करतात? नगाला नग कपडे असणं मग त्यांचा रंग, कापडाचा पोत, कपड्याचा नवेजुनेपणा कश्याचाही संबंध व्यक्तिरेखेशी असला नसला तरी फरक पडत नाही प्रेक्षकांना? व्यक्तिरेखेचे बारकावे, तिच्या कपड्यामागचं त्या त्या व्यक्तिरेखेचं तर्कशास्त्र याचा विचार कुणालाच का करावासा वाटत नाही? असे सगळे प्रश्न पडायचे. क्वचित अश्या पडलेल्या प्रश्नांवरून कुणी चेष्टाही केली. पण हळूहळू जेव्हा मी स्वत: नाटकाच्या कपड्यांची जबाबदारी घ्यायला लागले तेव्हा हे प्रश्न अजून स्पष्ट व्हायला लागले. असे प्रश्न पडण्यामधे चूक काही नाही हे ही पटायला लागलं. आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा प्रवास सुरू झाला.
आपण रोजचे कपडे घालताना आपल्या व्यक्तिमत्वाला योग्य ते कपडे विचार करून घालतो का असं कुणी विचारलं तर साहजिकच हसायला येईल. माझा स्वभाव अमुकतमुक आहे म्हणून मी अमुक तमुकच्या जवळ जाणार्‍या रंगाचे कपडे घालते असं क़ुणीच म्हणत नाही. आपल्या कपाटात जे काही असतं त्यातला एक कपडा आपण निवडतो. निवडताना जिथे जायचंय त्या ठिकाणाला, कार्यक्रमाला योग्य काय इतपतच विचार करतो. म्हणजे ट्रेकला जाताना साडी, नोकरीच्या मुलाखतीला जाताना ट्रॅकसूट आणि लग्नकार्याला जाताना फाटक्या शॉर्टस असं आपण काही करत नाही नक्कीच पण त्यापलिकडे आपण विचार करत नाही हे ही खरं.
अगदी हेच होतं नाटका सिनेमाचे कॉश्च्यूम्स ठरवताना. लग्नाचा सीन आहे म्हणजे जरीची साडी इतपतच विचार केला जातो पण त्या व्यक्तिरेखेला कुठल्या प्रकारची साडी परवडेल? बाकीच्या व्यक्तिरेखांच्या संदर्भात प्रत्येक व्यक्तिरेखा किती उठून दिसेल वा मिळून जाईल? इत्यादी गोष्टी विचारात घ्यायची गरज आपल्याला वाटत नाही. कारण आपल्याकडे म्हणे बजेटच नसतं.
पण हाच घोळ आहे. आपल्या रोजच्या कपड्यांच्याबाबतीत आपलं आपलं वेशसंकल्पन आपल्या नकळत झालेलं असतं. आपलं आपलं व्यक्तिमत्व, जडणघडण, पेशा, शिक्षण अश्या बर्याच गोष्टी आपल्या आवडीनिवडींवर परिणाम करत असतात. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व आपल्या कपड्यात दिसत असतंच. तेव्हा आपल्या कपाटात जे असतं ते आपल्या व्यक्तित्वाचं प्रतिबिंब असतं.
पण नाटका-सिनेमातल्या काल्पनिक व्यक्तिरेखेसाठी कपडे निवडणं हे असं सोपं नसतं. तिथे मात्र व्यक्तिमत्वाचाही विचार करावा लागतो. मुळात कपडे विकत घेणं/ शिवून घेणं यासाठी आणि मग नंतर दृश्यामधील ठिकाण, वेळ इत्यादींसाठी.
माझ्या सुरूवातीच्या काळात फारसे पैसे नसतानाही वेशभूषा करण्याचा बराच अनुभव माझ्या गाठी जमा होत होता. त्यातला सगळ्यात मोलाचा अनुभव म्हणजे पुणे विद्यापीठात शिकत असताना मी दिग्दर्शित केलेलं पु. शि. रेग्यांचं रङगपांचालिक हे नाटक. त्या नाटकाचं कॉश्च्यूम डिझाइनही मीच केलं होतं. हे नाटक महाभारतातील एका छोट्याश्या भागाला स्पर्श करणारं. पु शि रेग्यांच्या दैवी लेखणीतून आलेलं. भाषा म्हणजे निखळ सौंदर्य. नाटकामधे उत्तरा ह्या व्यक्तिरेखेचा अल्लड आणि बृहन्नडेमधील पुरूषाच्या प्रेमात पडलेली षोडषा ते अभिमन्यूशी लग्नाला मान्यता देणारी परिपक्व स्त्री हा प्रवास आहे. तिच्याबरोबर तिच्या दोन सख्या आहेत. या सगळ्या मिळून बाहुल्यांचा खेळ खेळत असताना हे नाटक घडत जातं. महाभारताची वेशभूषा जी विविध मालिकांच्यातून वा संगीत नाटकांतून बघितली होती त्याचा इथे उपयोगही नव्हता आणि तशी आर्थिक व्यवस्थाही उपलब्ध नव्हती. महाभारत कालीन वेशभूषेचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं होतं की मालिकेप्रमाणे, नाटकाप्रमाणे चकचकीत कपडे आणि दागिने हे खरंतर त्या काळाच्या दृष्टीने अयोग्यच आहे.
चमकणारं कापड हे रंगमंचावर तितकंसं योग्यही नाही कारण ते प्रकाशयोजनेसाठी त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा प्रकाश खूप परावर्तित न करणार्‍या पोताचं कापड वापरलं जायला हवं. महाभारतकालीन वस्त्र नेसण्याची पद्धत जी होती त्याचा वेगवेगळ्या पुस्तकांवरून अभ्यास करत होतेच त्यातून एक निश्चित झालं होतं की जे काही कापड वापरलं जायला हवंय ते नेसता येईल असं पातळ आणि चुण्या पडतील असं हवं. म्हणजे अर्थातच सुती कापड हा पर्याय पुढे आला. ९६-९७ च्या दरम्यान पातळ आणि सुती ओढण्यांची खूप पद्धत आली होती. या ओढण्यांची कापडं ताग्यातून अगदी स्वस्तात मिळत. अस्तराच्या कापडापेक्षा किंचित जाड असलेलं हे कापड अनेक रंगात आणि ४४ इंचाच्या पन्ह्यात(म्हणजे नेसायला योग्य) येत असे. आता ते क्वचित ठिकाणीच मिळतं. तर याच प्रकारचं कापड सगळ्या व्यक्तिरेखांसाठी वापरायचं ठरवलं.
uttara.jpg
उत्तरा ही अल्लड व निरागस आहे त्यामुळे तिच्या अंगावर अजिबात मलीनता नसलेले रंग वापरायचे ठरले. ते रंग तिच्यातलं राजकन्या असणं हे ही पुढे आणतील असा विचार केला होता.
तिच्या सख्या ह्या तिच्यापेक्षा खालच्या स्तरावरच्या असल्याने त्यांचे रंग थोडे गडद व मळकट ठेवले. तसेच नाटकामधे त्या सख्या दोन आहेत की एकच आहे असा संभ्रम पडावा अश्या अनेक जागा आहेत त्यामुळे त्यांचे रंग एकमेकींच्या जवळपासचे ठेवले. सोनेरी दागिन्यांची चमक ते खोटे असल्याने विचित्र असते. आणि रंगमंचावरील प्रकाशात ते पिवळे आणि विचित्र दिसतात. नाटकाची जातकुळी ही वास्तवतावादी नसल्याने दागिने हे सोन्याच्या रंगाचे असायची गरज नव्हतीच. पण एखाद्या प्राचीन शिल्पाप्रमाणे ठराविक ठिकाणी दागिने असावेच लागणार होते. महाभारताचा काळ विचारात घेता दागिने फार बारीक नक्षीचे असणं अपेक्षित नव्हतं आणि रंगमंचावरून त्या दागिन्यांचा योग्य तो परिणाम साधलं जाणं गरजेचं होतं. थोडक्यात ठसठशीत, न चमकणारे पण अंगावरच्या कपड्यांच्या रंगांवर उठून दिसणारे दागिने असायला हवे होते आणि हे सगळं करण्यासाठी ज्याला आपण झिरो बजेट म्हणू ते अस्तित्वात होतं.
uttara-photo.jpg
सोनेरी नको आणि चमक नको असं ठरवल्यावर पर्याय उरला तो म्हणजे चंदेरी ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा. पुण्यात रविवार पेठेत स्टीलचे पैंजण घाउक बाजारात किलोवर मिळत असत ते घेऊन मग त्याला ऑक्सिडाइज्ड पॉलिश लावून घेतले. आणि हे पैंजण मग दुहेरी तिहेरी करून गळ्यातला हार, कंबरपट्टा, खांद्यावरचे अलंकार, केशरचना सजवण्यासाठी असे सगळीकडे वापरले.
तसेच बरोबर मोत्यांचा वापर भरपूर करायचा ठरलं. मोती हे रंगमंचावरून दिसताना ठसठशीत आणि राजघराण्यासाठी अत्यंत योग्य दिसतात. घाउक बाजारातून प्लास्टिक मोत्याचे घोस घेतले. ते सुद्धा वजनावर घेतले होते. रंगमंचावरून ते असे दिसले खरे मोती असते तरी काही वेगळे दिसले नसते.
uttara-and-vanini.jpg
मग नंतर मेटल एम्बॉसिंग वापरून प्राचीन काळातील दिसतील असे दागिने बनवणे, ऐतिहासिक वा पौराणिक काळातील कापडासाठी मांजरपाट डाय करून वापरणे, जरीच्या कामाऐवजी सोनेरी रंगाने ठसे मारून कापड जरतारी बनवणे अश्या अनेक गमतीजमती या लो बजेटच्यापायी किंवा हव्या त्या वस्तूंची उपलब्धता नसण्यापायी केल्या. अश्या काही गोष्टी अमेरीकेला शिकायला जाण्याआधी काम करता करता शिकले होते आणि बर्‍याच अमेरिकेतील शिक्षणात शिकले. ज्याबद्दल पुढच्या लेखात सांगीनच. अश्या क्लुप्त्या, युक्त्या करणं ही तर लो बजेट मधली गंमत आहे. काहीच नसताना उपलब्ध असलेल्या वस्तूंच्यातूनच आपल्याला हवं ते बनवता आलं पाहिजे हे पहिलं तत्व सगळ्यात महत्वाचं. शेवटी लो बजेट हे फक्त खिशाचं असतं बुद्धीचं असून उपयोगी नाही.
--- नीरजा पटवर्धन

Search This Blog