Wednesday, December 22, 2010

सोंग सजवण्याची कला - ७. इकडचं नाट्य

आधीचे सहा लेख वाचून माझ्या एका प्रश्नाळू मैत्रिणीला प्रश्न पडले. अगदी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न. तिचे प्रश्न ऐकल्यावर लक्षात आलं की मी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या विसरूनच गेले बहुतेक. तिच्या प्रश्नांच्या अनुषंगानेच या महत्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते आता.
तिचा पहिला प्रश्न की भारतातल्या प्रत्येक चित्रपटाला कॉश्च्युम डिझायनर असतो का? दुसरा प्रश्न होता प्रत्येक चित्रपटाचा दिग्दर्शक वा निर्माता कॉश्च्युम्स चा विचार करत असेल का?
पहिल्या प्रश्नाचं एकदम उत्तर द्यायचं तर हो काही ठिकाणी असतो आणि काही ठिकाणी नाही असंच म्हणावं लागेल. अनेक चित्रपटांसाठी नटमंडळी आणि सहाय्यक दिग्दर्शक एकत्र जाउन दोघांना आवडतील असे कपडे विकत आणतात. मग त्या कपड्यांचा आणि व्यक्तिरेखेचा काही संबंध असो वा नसो. काही वर्षांपूर्वी मराठी सिनेमात ही पद्धत अस्तित्वात होती कारण कमी बजेटच्या मराठी चित्रपटाला म्हणे कॉश्च्यूम डिझायनरची चैन परवडत नसे.
पण कॉश्च्युम डिझायनर जिथे असतो तिथेही ते शीर्षक धारण करणारी व्यक्ती कॉश्च्युम डिझायनिंगचच काम करत असेल याची काही शाश्वती नाही. फॅशन मधे ग्लॅमर आणि आकर्षकता या गोष्टीला महत्व असते आणि मग फॅशन डिझायनर कॉश्च्यूम डिझाइन करत असला की अर्थातच ते कॉश्च्युम्समधेही उतरते. प्रत्येक कपडा दिसायला चांगला बनवण्याच्या नादात हा चित्रपट आहे की फॅशन शो असा एक घोळ झालेला आपल्याला बर्‍याच ठिकाणी दिसून येतो. फॅशन ही एका व्यक्तिला उत्तम सजवण्यापुरती असते त्यामुळे संपूर्ण फ्रेमचा विचार त्यात फारसा कुठे दिसत नाही. एका व्यक्तिला म्हणजे नटाला सजवताना व्यक्तिरेखा मागे पडते. स्टारची इमेज जपली जाते, तो स्टारच दिसतो मग तो गडचिरोलीच्या खेड्यातून आला असेल नाहीतर न्यूयॉर्कहून.
harlequino.jpg
ऐतिहासिक काळातील चित्रपट असेल तर वेशभूषा त्या काळातली वाटली पाहिजे. जे जे आणि जसं जसं त्या ठराविक काळात वापरलं जायचं ते तसंच चित्रपटात दिसलं पाहिजे. पण फॅशन डिझायनर जेव्हा डिझाइन करतो तेव्हा त्या त्या ठराविक ऐतिहासिक काळातील कपड्यांच्या पद्धतीवर आधारीत समकालीन फॅशन किंवा त्या काळापासून प्रेरणा घेऊन डिझाइन केलेले त्या त्या डिझायनरचे कलेकशन अशी ती वेशभूषा दिसते.
वेगवेगळ्या व्यक्तिरेखा त्यात कपड्यातून अधोरेखित होत नाहीत.
smeraldina-2.jpg
याचं अगदी ठळक उदाहरण द्यायचं म्हणजे संजय लीला भन्साळीच्या देवदास मधील वेशभूषा. एकेक कपडा सुंदर आणि कुशल कारागीरांकडून बनवून घेतलेला. पण त्यात बंगाली साडीची नेसण सोडली तर बंगाली वेशभूषेशी क्वचितच प्रामाणिकपणा आहे. फॅशन डिझायनरने डिझाइन केल्यामुळे प्रत्येकाला शक्य तितकं ग्लॅमरस करण्यात आलेलं आहे. त्यामुळे देवदासच्या घराण्यापेक्षा पारोचं घराणं कमी पातळीचं कसं ते काही दिसत नाही. चंद्रमुखीच्या कोठ्यावरच्या बंगाली साडी नेसलेल्या बायका आणि देवदासच्या घरातल्या बायका यांच्यात तसा काहीच फरक जाणवत नाही. काळ आणि वातावरण बघता खानदानी घरातल्या बायका आणि तवायफ यांच्या कपड्यात, ल्यायण्यात, नटण्यात फरक असायलाच हवा पण तो दिसत नाही.
ghatotkach.jpg
याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुळात आपल्याकडे चित्रपटांमधे कॉश्च्युम डिझायनिंग करणारे लोक हे बहुतांशी फॅशन डिझायनर्सच असतात. कारण एकतर आपल्याकडे कॉश्च्युम डिझायनिंगच शास्त्र शिकवणार्‍या संस्था अस्तित्वातच नाहीत. पुण्यातल्या फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडीया मधे अथवा दिल्लीमधल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात कॉश्च्युम डिझायनिंगचे स्वतंत्र शिक्षण दिले जात नाही. काही फॅशन डिझायनिंगच्या इंस्टिट्यूटमधे कॉश्च्युम या विषयाची तोंडओळख हल्ली करून दिली जाते पण तेही जुजबीच.
चित्रपटांच्या कॉश्च्यूम डिझायनर्स विषयी माहीती देताना अजून एक महत्वाची व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे ती म्हणजे वैयक्तिक डिझायनर्स. प्रत्येक तारे तारक़ांचे स्वत:चे डिझायनर्स असतात. हे डिझायनर्स त्या त्या चित्रपटात केवळ आपल्या ठराविक तार्‍यांचेच कॉश्च्युम्स डिझाइन करतात. आणि उरलेल्या व्यक्तिरेखांसाठी निर्मात्याकडून एक वेगळा डिझायनर ठेवलेला असतो. यामुळे असं होतं की स्टार्स असतात ते वेगळ्या टेक्श्चरचे दिसतात आणि बाकीचे लोक वेगळे. उदाहरणार्थ स्टार नटीचे कपडे झकपक दिसत रहातात पण तिच्या आईवडिलांच्या भूमिका करणारे लोक मात्र दिसताना गरीब दिसत रहातात आणि त्याच वेळेला ते मुलीला आपल्या इस्टेटीमधून बेदखल करण्याची धमकी देत असतात. किंवा ऐतिहासिक काळातल्या चित्रपटात महत्चाच्या दोनतीन व्यक्तिरेखां ज्या साकारणारा एखादा मोठा नट असतो, तेवढ्यांवरच तपशीलात काम केले जाते बाकी सगळ्या लहानमोठ्या व्यक्तिरेखा मात्र शाळेच्या गॅदरींगसाठी ड्रेसवाल्याकडून भाडोत्री कपडे आणावेत अश्या दिसत रहातात. संपूर्ण फ्रेमची रंगसंगती, दृश्य ट्रीटमेंट याचा काहीही संबंध नसतो.
पण याला अपवाद म्हणून काही महत्वाचे चित्रपटही आहेतच. अभिजात संस्कृत नाटक मृच्छकटीक यावर बेतलेल्या उत्सव चित्रपटाची वेशभूषा ही अनेक पातळ्यांवर आदर्श म्हणावी अशी आहे. मौर्य काळ दाखवलेला आहे. कपडे व दागिने, नेसण्याच्या पद्धती, कापडांचा वापर हे सगळं त्या काळाला अनुसरून आहेच. रंगसंगती व कापडाचा पोत यामधे त्या त्या व्यक्तिरेखेचे व्यक्तिविशेष, त्यांचे समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती यांचे प्रतिबिंब आहेच पण त्याचबरोबर चित्रपटाचा विषय, सीनचा मूड, कॅमेर्‍याचे पॅटर्न या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला जाणवतो. त्याचमुळे रेखासारखी प्रसिद्ध स्टार असूनही ती रेखा न वाटता वसंतसेनाच वाटते.
कॉश्च्युम्स हा खरतर नटमंडळींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. पण कॉश्च्युम्स कडे बघण्याची नटमंडळींची दृष्टी मात्र गमतीशीर असते. एकतर आपल्या चित्रपटसृष्टीमधे नटांना नको इतकं लाडावून ठेवलं जातं. मग त्या लाडावण्याच्या ओघात नटाला काय कपडे हवेत ते पुरवा. नट खुश राह्यला पाहिजे हे एकच सूत्र बहुतांशी निर्माते आणि बर्‍याचदा दिग्दर्शकसुद्धा पाळताना दिसतात.
व्यक्तिरेखेची गरज आहे पण नटाला कॉटनचे कपडे आवडत नाहीत. नटीला अजून दागिने हवेत. नटाला कडक इस्त्री केलेलेच कपडे हवेत. नटीची ठराविक इमेज आहे त्यामुळे काही झालं तरी चकचकीत मेकप करणारच. प्रत्येक सीनला नवा कपडा हवा. फ्रेममधल्या इतर सर्वांपेक्षा मी सिनीयर आहे त्यामुळे माझा कपडा सगळ्यात उंची आणि वेगळा दिसला पाहिजे, कपडा रिपीट झाला की नटाला आवडत नाही असे अनेक हट्ट आपल्या चित्रपटसृष्टीत इतके रूजलेत की त्यात काही वावगं आहे हेही विसरायला झालंय. इतकं की 'लोग तो स्टार को देखने आते है तुम्हारे कपडे देखने थोडी ना आते है' असं एक बिन्डोक वाक्य वेळोवेळी फेकलं जातं. अरे पण लोक स्टारला बघायला आले म्हणजे स्टारने कधीच व्यक्तिरेखेसारखं दिसू नये असं थोडीच आहे?
संहितेच्या अभ्यासापासून ते कपडे बनण्यापर्यंत डिझायनरची काही प्रोसेस असते, विचारप्रक्रिया असते त्याबरहुकूम कपडे बनलेले असतात. ती संपूर्ण प्रक्रिया नाकारून नटांनी आपल्या मनाला आवडेल अश्या कपड्यांचा हट्ट धरणे किंवा आहेत त्यात हवे तसे बदल करणे हे अतिशय चूक आहे. संपूर्ण चित्रपटाच्या दृश्यात्मकतेवर याचा परिणाम होतो. नटाकडे व्हिज्युअल सेन्स असेलच आणि असलाच तरी त्याच्याकडे विषयाचा अभ्यास असेलच असे नाही. आणि हे सगळं असलं तरी कॉश्च्युम डिझायनर चा व्हिज्युअल सेन्स आणि त्या विषयाचा अभ्यास, समज या गोष्टींच्यासाठी त्याला निवडलेले असते आणि नटाला अभिनयासाठी. पण फार कमी अभिनेत्यांना ही गोष्ट समजते. बाकी सर्वांना कॉश्च्युम डिझायनर हा त्यांच्या अटेंडण्टच्या ताफ्यातलाच एक गडी वाटत असतो तंत्रज्ञ नव्हे.
असं असलं तरी इथल्या कॉश्च्युम डिझायनर्स विषयी बोलताना या सगळ्यातून आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या एका महत्वाच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. ते नाव म्हणजे भारतात पहिलं ऑस्कर खेचून आणणार्‍या गांधी चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनर भानू अथैय्या. कृष्णधवल काळातल्या सिआयडी (१९५६), प्यासा (१९५७), कागज के फूल (१९५९) अश्या सिनेमांच्यापासून ध्यासपर्व (२००१), लगान (२००१), स्वदेस(२००४) अश्या आत्ताच्या सिनेमांपर्यंत कैक चित्रपटांचे कॉश्च्युम्स डिझाइन केलेल्या ह्या आपल्याकडच्या सगळ्यात ज्येष्ठ अश्या कॉश्च्युम डिझायनर. त्यांच्या कामामधे आपल्याला स्टारशरण, ग्लॅमरशरण अशी वेशभूषा क्वचितच बघायला मिळते. मुळात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनी असल्यामुळे पेंटिंगची जाण त्यांच्या कामात दिसून येतेच. पण भारतातलं पहिलं ऑस्कर ज्या कलेसाठी मिळालं ती कला मात्र आज आपल्या चित्रपटसृष्टीमधे अजूनही कमी महत्वाची मानली जाते.
यावर उपाय म्हणजे जास्तीतजास्त चांगलं काम करत रहाणं हेच असं कोणीतरी म्हणालं मधे. तर मी ते काम करायला जावं खरं. पण मैत्रिणीनी विचारलेल्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर तर दिलं पाहीजे. तेव्हा त्या उत्तरासाठी पुढचा म्हणजे शेवटचा लेख राखून ठेवते.
---नीरजा पटवर्धन

2 comments:

Anagha said...

मला हे वाचता वाचता 'जैत रे जैत' आठवला. त्यातील वेशभूषा मला वाटतं विषयाला साजेश्याच होत्या. तुलाही असंच वाटतं का? तुझे हे लेख ज्यांना चित्रपट बघायला आवडतो त्यांनी वाचायलाच हवेत....खूप माहितीशीर आहेत. :)

नीरजा पटवर्धन said...

हो जैत रे जैत निश्चितच उत्तम होता या बाबतीत.

Search This Blog