Thursday, December 16, 2010

सोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास

“तू श्वासचे कॉश्च्युम डिझाइन केलेस म्हणजे तुला नटांनी सांगितले ते कपडे आणून दिलेस की तू ठरवलेस?" एका मुलाखतकाराने भर सभेमधे मला प्रश्न विचारला. मी अवाक. पण श्वाससाठी कॉश्च्युम डिझायनिंग केलंस म्हणजे केलं काय नक्की हा प्रश्न पडलाच असेल अनेकांना. त्याबद्दलच बोलूया.
चित्रपटाचा महत्वाचा घटक असतो दिग्दर्शक. त्याला दृश्य भागाबद्दल आस्था असेल, समज असेल तरच चित्रपट चांगला दिसतो. जे प्रेक्षकांपर्यंत पोचवायचंय ते पोचवू शकतो. प्रत्येक फ्रेम हे एक पेंटींग असतं असा विचार करणं गरजेचं असतं. तेव्हा दिग्दर्शकाच्या डोक्यात काय दृश्य आहे याचा विचार आणि बाकीच्या घटकांचा अभ्यास हा आधी आला. इथे दिग्दर्शकाच्या मनामधे चित्रपटाची ट्रीटमेंट अतिशय स्पष्ट होती. साधेपणा हा सगळ्यात महत्वाचा होता. चमकदार, भडक अश्या शब्दांना थारा नव्हता. वापरला जाणार कॅमेरा व फिल्म या संदर्भाने रंगसंगती बद्दल तसेच पटकथेची मांडणी, प्रत्येक व्यक्तिरेखेची पटकथेतील गोष्ट यांबद्दल समजवून घेतलं दिग्दर्शकाकडून. नटमंडळी वेगळी न दिसता व्यक्तिरेखाच दिसली पाहिजे हे महत्वाचे. कपडे वेगळे दिसून येणं, जाणवणं ही चूकच गोष्ट असते हे कायम डोक्यात ठेवले.
साधेपणा हा आपोआप येत नाही. तो आणावा लागतो. तेव्हा कपड्यांच्या अनुषंगाने साधेपणाचे काही निकष ठरवले. ते साधारणपणे असे होते
१. भडक आणि अंगावर येणारे रंग, चमकदार कापड इत्यादी गोष्टी टाळायच्या. अगदी मॉबमधे सुद्धा.
२. हाय कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन टाळायचे उदाहरणार्थ पांढरा शर्ट व काळी पँट, कारण त्यामुळे चित्र भडक होऊ शकते.
३. महत्वाच्या व्यक्तिरेखा मॉब समोर उठून दिसाव्यात यासाठी इतर लोकांपेक्षा वेगळ्या आणि उठावदार रंगाचे कपडे देणं ही पद्धत टाळायची.
४. कुठलाही कपडा कोरा करकरीत वाटता कामा नये. सुखवस्तू माणूसही रोज नवे कोरे कपडे घालत नाही. असलेले धुवून वापरतो तेव्हा ते कपड्यांचं वापरलेपण आलंच पाहिजे.
मग हॉस्पिटल, क़ॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टरचा दवाखाना, रस्ते, काही मेडीकल सोशल वर्कर्स,त्यांचे सपोर्ट ग्रुप्स तसेच कोकणातले गाव अश्या अनेक ठिकाणांचा कपड्यांसाठी रिसर्च सुरू झाला. कथा आजची असल्याने खूप सारे संदर्भ डोळ्यासमोरच होते केवळ ते उचलण्याची गरज होती.
Doctor.jpg
चित्रपटात आपल्याला पहिल्यांदा दिसते ती व्यक्तिरेखा म्हणजे ऑन्कोसर्जन मिलिंद साने. व्यवसायाने सर्जन असलेला हा माणूस अतिशय बिझी आणि प्रथितयश आहे. कॅन्सर या शब्दानेच घाबरून गेलेल्या रूग्णाला आणि नातेवाइकांना याचं असणंही बरं वाटणारं आहे. आता डॉक्टर म्हणजे फॉर्मल शर्ट-पँट शिवाय वेगळा काही कपडा असणार नाही अर्थातच. पण दोन्हीतला कलर कॉन्ट्रास्ट कमी ठेवायलाच हवा कारण या डॉक्टरबद्दल एक आदर नि सच्चेपणा वाटायला हवा. शर्टचे रंग अतिशय सोबर, फिके आणि प्लेझंट. शर्टाचा दर्जा चांगल्यातला, ब्रॅन्डेड असा सगळा विचार केला. कथेतला मूळ अनुभव डॉ. शैलेश पुणतांबेकरांचा आहे. त्यांच्या कपड्यांचं निरीक्षण करताना लक्षात आलं की या माणसाकडे कदाचित एकाच रंगाचे, वेगवेगळ्या ब्रॅण्डस चे आणि किंचितच फरक असलेले सहा शर्टस असू शकतात किंवा आहेतच. थोडक्यात एका ठराविक पद्धतीच्या पलिकडे त्यांचे कपडे जाणार नाहीत. या सार्‍यातून डॉक्टर मिलिंद साने उभा राह्यला.
20-Doctor-trying-to-explain.jpg
शहरातली दुसरी महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे आसावरी. मेडीकल सोशल वर्कर. नुकतेच शिक्षण संपलेली. रूग्ण आणि डॉक्टर्स यांच्यातला दुवा. कॅन्सरच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला रूग्णाला मदत करणे हे तिचं काम. पेशंटला तिचं असणं हे प्लेझंट वाटलं पाहिजे. अनेक मेडिकल सोशल वर्कर्स जेव्हा पाह्यल्या तेव्हा त्यातल्या कुणीही गबाळे कपडे घातलेलं दिसलं नाही. तेव्हा अर्थातच सोशल वर्कर या इमेज ला छेद देणारे कपडे वापरले. अबोली आणि पिवळ्या छटांचे फिक्या रंगाचे लखनवी सलवार सूट हे कुणाच्याही अंगावर कधीही प्लेझंटच दिसतात. ते वापरले. पण ऑपरेशनच्या दिवशी सकाळी लवकर हॉस्पिटलात येताना आसावरीला सलवार सूट वागवायला वेळ मिळणारच नाही हे उघड होते त्यामुळे फॉर्मल ट्राउझर्स आणि फॉर्मल शर्ट असा आजच्या काळातल्या वर्कींग वुमन प्रकारचा कॉश्च्युम निवडला.
kokanatil-mandali.jpg
कोकणातून आलेली महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे आजोबा. कोकणातल्या छोट्याश्या खेड्यातले साठीच्या घरातले एक गृहस्थ. झाडंमाडं असणारं कुटुंब आणि आजोबा कुटुंबप्रमुख व्यक्ती. घरात पैसाअडका रग्गड म्हणावा असा नसला तरी दोन वेळची भ्रांत नाही. कष्टाची सवय आणि राहणीमधे साधेपणा हे ओघाने आलंच. कोकणात फिरताना एक लक्षात आलं की कोकणातला माणूस मग तो परिस्थितीने अगदी व्यवस्थित असला तरी त्याच्या त्याच्या कम्फर्ट झोनमधे तो कमरेला पंचा आणि वरती उघडा असाच असतो बर्‍याचदा.
01.jpg
गावाबाहेर जाताना हा माणूस लांबरूंद धोतर वरती सदरा इत्यादी घालून जातो. तेच इथे आजोबांसाठी केलं त्यामुळे शहरात आलेले आजोबा धोतर, सदरा, खांद्यावर पंचा आणि टोपी या वेषात दिसतात पण कोकणात मात्र बागेत काम करताना, समुद्रावर जाताना केवळ पंचा लावलेले, गावातल्या गावात धोतर आणि बंडी घातलेले अश्या विविध कपड्यात दिसतात.
Ajoba-va-parashya-01.jpg
त्यांचा नातू परश्या ही व्यक्तिरेखा कोकणातली दुसरी व्यक्तिरेखा. सर्वसाधारणपणे हाफ चड्डी आणि वरती शर्ट असे कपडे. मध्यम किंमतीचे आणि त्यातल्या त्यात छोट्या गावात जरा नवीन पद्धतीचे वाटतील असे. हाफ चड्डी ही बहुतांशी शाळेची खाकी चड्डीच असू शकते. अगदी ठिकठाक घरातला मुलगा असला तरी छोट्याश्या खेड्यातली पद्धत अशी शाळेच्या खाकी चड्डीवर वेगळा शर्ट घालून पोराला लग्नाकार्याला पण घेऊन जातील.
parashya-va-aai.jpg
लहान मुलांनी कायम आपले आवरल्यासारखं कपडे करून बसायचं ही पद्धत शहरातली. ते खेड्यात दिसणार नाही. लहान मूल हे खेळून मळलेलं आणि साध्या कपड्यातच दिसणार. घरात, बागेत वावरत असताना नुसतीच हाफ चड्डी किंवा बनियन आणि खाली हनुमान चड्डी असाच वेश असणार.
हे झाले या दोघांचे सर्वसाधारण कपडे. पण आजोबा आणि परश्याच्या बाबतीत कपड्यांमधे एक अजून महत्वाची गोष्ट केली होती. ऑपरेशन एक दिवसाने पुढे गेल्यावर आजोबा हॉस्पिटलमधून पळून जाऊन परश्याला शहर दाखवायला घेऊन जातात, शहर दाखवतात आणि परत येतात या भागात त्यांचे कपडे बदलल्याचे आपल्याला दिसत नाहीत. कारण ते योग्यही नाही.
Ajoba-va-parashya-03.jpg
पण खरंतर या भागात या दोघांचे कपड्याचे एकसारखेच असणारे चार सेटस वापरले आहेत. हॉस्पिटलमधून निघून जाताना कपडे जरा धुवट असतील पण दिवसभर शहरात फिरणार. रस्त्याने आणि तेही पायी किंवा रिक्षाने म्हणजे घाम आणि धूळीने कपडे मळणारच. ते मैदानात जातात तिथे कपड्याला माती लागणार. लहान मूल आहे ते मातीचे हात कपड्याला पुसणार, खातान अंगावर कुठेतरी सांडणार आणि असं सगळं करून आल्यावर दिसतील ते कपडे जातानाच्या कपड्यांपेक्षा मळलेले असणारच. शूटींग आपण काही चित्रपटाच्या क्रमाने करत नाही म्हणजे एकच कपडा ठेवून तो मळवला तर नंतर जेव्हा आधीचं शूट करू तेव्हा तो चुकीचा दिसणार असा सगळा विचार करून चार सेटस वापरायचे ठरले. मग ते शहरात कुठे कुठे जातात आणि तिथे कसे वावरतील व त्यामुळे कपडे कुठे कुठे मळू शकतील याचा अंदाज घेऊन एका क्रमाने ते चारही कपडे मळवले.
परश्याचा मामा हा खेड्यातला २०-२२ वर्षांचा तरूण मुलगा. गावच्या ठिकाणी मिळेल अशी पँट आणि बाहेर ठेवलेला चेक्सचा ढगळ शर्ट असं एक प्रातिनिधीक रूप त्याला दिलं.
परश्याची आई म्हणजे साधारण तिशी बत्तिशीची खेड्यातली बाई. आज या वयाची बाई नक्कीच काठापदराच्या कॉटनच्या साड्या नेसत नाही. स्वस्त, टिकाऊ आणि वापरायला सोप्या सिंथेटिक साड्याच नेसते. तश्या तिच्यासाठी घेतल्या. तिची साडीवरची ब्लाउजेस मुद्दामून कुडाळच्या बाजारातून शिवून घेतली.
मॉबमधील लोकांना स्वत:चे कपडे घालून यायला सांगितले होते. रंग आणि पद्धत सांगितली होती. तरीही काही भडक वा चकचकीत कपडे आलेच तर ते बदलता यावे यासाठी काही डल कलरच्या शाली, साध्या साड्या, साधे शर्टस असं काय काय तयार ठेवलं होतं. मॉबचे आणि सगळ्या व्यक्तिरेखांचे कपडे वापरलेले वाटावेत यासाठी प्रत्येक कपडा गरम पाण्यातून काढणे, चहाच्या पाण्यात ठेवून देऊन त्याला पिवळट छटा आणणे, कोकणातली तांबडी माती पाण्यात उकळवून त्यात कपडे बुडवून ठेवणे, डाग पडल्याजागी बुटपॉलिशचा वापर असे अनेक उपाय वापरले होते. काही कपडे तर जुन्या बाजारातून विकत घेतले होते. आणि मग स्वच्छतेसाठी म्हणून ते ड्रायक्लिन करून घेतले.
आता म्हणाल "हे तुम्ही म्हणताय म्हणून समजतंय पण एवढं काही केल्याचं असं कळलं नव्हतं"
तर मग द्या टाळी तेच तर करायचं होतं!
माझा एक प्रोफेसर म्हणतो त्याप्रमाणे 'प्रेक्षकाला काय केलं हे वाचता येणार नाहीच पण त्याचा परिणाम त्याच्यापर्यंत नक्कीच पोचतो.'
shevat.jpg
---नीरजा पटवर्धन

3 comments:

Anagha said...
This comment has been removed by the author.
Anagha said...

'आता म्हणाल "हे तुम्ही म्हणताय म्हणून समजतंय पण एवढं काही केल्याचं असं कळलं नव्हतं"
तर मग द्या टाळी तेच तर करायचं होतं!
माझा एक प्रोफेसर म्हणतो त्याप्रमाणे 'प्रेक्षकाला काय केलं हे वाचता येणार नाहीच पण त्याचा परिणाम त्याच्यापर्यंत नक्कीच पोचतो.'

अगदी कळलंच मला तू काय म्हणतेयस ते! :)
आणि काही केलंय हे न कळण्यामागच तुझं कौशल्य! Proud of you! :)

नीरजा पटवर्धन said...

धन्स गो बाय!

Search This Blog