Sunday, December 5, 2010

सोंग सजवण्याची कला - २. अमेरिकेतील शिक्षण

"अमेरीकेतला किती महिन्याचा कोर्स होता हा तुझा कॉश्च्युम डिझायनिंगचा?" या प्रश्नावर तीन वर्ष म्हणजे सहा सेमिस्टर्स असं उत्तर दिल्यावर "काय करता काय इतकी वर्ष तुम्ही" असा प्रश्न येतो आपसूक. त्याचं उत्तर द्यायचा हा थोडासा प्रयत्न करतेय आजच्या लेखात.
पुण्याच्या ललित कला केंद्रात नाटकामधे एम. ए. करताना हे जाणवलं होतं की वेशभूषेचं शिक्षण तर घ्यायला हवंय हे नक्की पण कुठे? भारतात तर कुठे सोय नव्हती. सतीश आळेकरांच्यामुळे आमच्या ललित कला केंद्रात युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया (यू.एस.ए.) चे तेव्हाचे नाट्यविभागप्रमुख डॉ. फार्ली रिचमंड आले होते. त्यांच्याशी भेट झाली आणि त्यातून पुढचा मार्ग मिळाला. जी.आर.ई., टोफेल, असल्या वळणांच्यातून जात आमचं विमान एकदाचं जॉर्जियाप्रांती एम एफ ए(मास्टर ऑफ फाइन आर्ट) ही पदवी घेण्यासाठी उतरलं.
कॉश्च्यूम डिझायनिंग च्या अनुषंगाने एकेका विषयाचे शिक्षण सुरू झाले. कॉश्च्यूम डिझायनरला ज्या नाटकासाठी वा सिनेमासाठी कॉश्च्यूम डिझाइन करायचे असतात त्याच्या इतर अनेक अंगांचा विचार करता यावा लागतो आणि त्यातलं ज्ञान असावं लागतं. त्यामुळे केवळ कपडेपटाबद्दल न शिकता इतरही गोष्टी शिकायला लागल्या.
तिथल्या तीनही वर्षाच्या सहा सेमिस्टर्स मिळून मी सीन पेंटींग(नेपथ्य रंगविणे), रिसर्च मेथडॉलॉजी (संशोधन पद्धती), स्क्रिप्ट अ‍ॅनेलिसिस (संहितेचा अभ्यास), थिएटर हिस्टरी - १ व २ (नाट्यकलेचा इतिहास), सीन डिझाइन (नेपथ्य संकल्पन), कॉश्च्यूम डिझाइन (वेशसंकल्पन), फॅब्रिक सरफेस टेक्निकस (कापड रंगविण्याच्या पद्धती), कॉश्च्यूम ऍन्ड डेकॉर हिस्टरी - १ व २ (कपड्यांचा व वास्तू सजवण्याचा इतिहास), लाइट डिझाइन (प्रकाशयोजना), इत्यादी विषय घेतले होते.
नाटक वा सिनेमाची सुरूवात होते लिखित संहितेपासून. हे लिहिलेलं नाटक पूर्ण पचवल्याशिवाय कोणीच पुढे जाउ शकत नाही. संहिता पचवली तरच त्यातल्या व्यक्तिरेखांच्या पोटात शिरता येईल, त्या ओळखीच्या होतील आणि मग त्यांचं सोंग कसं सजवायचं ते त्या स्वत:च सांगतील. तेव्हा संहिता महत्वाची. संहिता पचवताना संहितेचा पोत, शैली, विषय, आशय, काळ, लेखकाची संकल्पना इत्यादी गोष्टी वाचता यायला हव्या. त्यासाठी निरनिराळ्या लेखनशैलींची माहिती हवी. तसेच संहितेची मांडणी म्हणजे सुरूवात, मध्य व शेवट, प्रवेशसंख्या, घटनांचा वेग, बदलाच्या जागा इत्यादी सगळं समजून घेता यायला हवं. हे सगळं मिळून होतो संहितेचा अभ्यास हा विषय. या वर्गामधे अनेकप्रकारची नाटके आणि छोटे छोटे प्रवेश अभ्यासासाठी वाचून काढले गेले. यामुळे आता हातात संहिता आल्यावर त्यावर विचार करणे आणि काम करणे हे सोपे व्हायला लागले.
संहिता अभ्यासताना त्याबरोबरचा महत्वाचा मोठा विषय म्हणजे नाट्यकलेचा इतिहास. ह्या विषयाची व्याप्ती आभाळाएवढी. एक नाटक आपण करत असतो ते करण्याच्या काही ठराविक पद्धती असतात ज्या आभाळातून पडलेल्या नसतात. त्या तश्या तश्या घडण्यामागे बरीच उलथापालथ झालेली असते. हा सगळा प्रवास अभ्यासणं मनोरंजक तर असतंच आणि तेवढंच महत्वाचंही असतं. मी हा विषय एकूण दोन सेमिस्टर्स अभ्यासला. प्राचीन नाट्यकला ते रोमँटिक थिएटर अशी एक सेमिस्टर आणि वास्तवतावादापासून पोस्टमॉडर्निझमच्या काळापर्यंत अशी दुसरी सेमिस्टर. हा इतिहास अभ्यासताना प्रत्येक प्रकारचं किमान एकेक तरी नाटक वाचलं जाणं अपेक्षित होतं. त्यामुळे निदान २०-२५ नाटके तरी दोन सेमिस्टर्स मिळून वाचून काढली गेली.
नाट्यकलेच्या इतिहासानंतर येतो कपडे व वास्तू सजवण्याचा इतिहास. प्राचीन काळापासून लोकांचे कपडे आणि डेकॉर म्हणजे भिंती आणि खिडक्यांचे तपशील, फर्निचर, गाद्यागिरद्यांपासून शोभेच्या सर्व वस्तूंपर्यंत सगळं कसं होतं हे असतंच पण ते तसंच का होतं हे पण या मधे येतं. जनजीवन, हवामान, सामाजिक व्यवस्था, शास्त्रीय शोध, कलात्मक आवडीनिवडी या काळाप्रमाणे आणि प्रदेशाप्रमाणे बदलत असतात आणि त्याप्रमाणे वेशभूषा, डेकॉर, वास्तूकला हे सर्वही. हा अभ्यास करताना एखादा कपड्याचा वा फर्निचरचा प्रकार जेव्हा अस्तित्वात येतो त्यामागे काय काय असतं याची समज येते आणि ही समज प्रत्यक्ष डिझाइन करताना महत्वाची ठरते.
कॉश्च्यूम हिस्टरीच्या दोन सेमिस्टर्स घेतल्या होत्या. ज्यात प्राचीन ते आधुनिक याचा धावता आढावा पहिल्या सेमिस्टरमधे तर फ्रेंच राज्यक्रांतीपासून आजपर्यंतचा आढावा अजून बारकाईने दुसर्‍या सेमिस्टरमधे घेतला गेला.
"ही सगळी तर पूर्वतयारी झाली पण खरोखर डिझायनिंग करायला शिकता की नाही तुम्ही?" असा प्रश्न विचारालच आता. तर हो१ शिकतो ना! त्यासाठी वेगळा केवळ कॉश्च्यूम डिझायनिंगचा वर्ग असतो. यात कापडांचे प्रकार, चित्राचे रंग, रेषा, आकार इत्यादींच्याबद्दल तपशीलात अभ्यास करायचा असतो. आणि मग काही नाटकांचे कॉश्च्यूम्स डिझाइन करायचे असतात. नाटक वाचून त्याचा विचार, संशोधन इत्यादी सगळं करून मग आधी कच्चं चित्र आणि मग रंगांच्यासकट पक्क चित्र काढून त्याबरोबर आपल्याला जे कापड अपेक्षित आहे त्या कापडाचे छोटे तुकडे बरोबर जोडण्यापर्यंत सगळी प्रक्रिया करायची असते. पुढे प्रत्यक्ष कपडा बनवणे या वर्गात अपेक्षित नसते.
flapper.jpg
माझं स्पेशलायझेशन कॉश्च्यूम या विषयात असल्यामुळे कॉश्च्यूम डिझायनिंगच्या दोन सेमिस्टर्स मी घेणे अपेक्षित होते. ह्या दोन सेमिस्टर्स मिळून एकुणात अशी ८ नाटकांचे पेपरवर कॉश्च्यूम डिझाइन केले.
arcadia.jpg
कॉश्च्यूम डिझायनिंगच्या वर्गाबरोबरच कॉश्च्यूम मेकिंग म्हणजे हे सगळे डिझायनिंग केलेले कपडे बनवणे याचेही प्रशिक्षण होतंच होतं. त्यातले दोन महत्वाचे विषयांचे मी शिक्षण घेतले ते म्हणजे फॅब्रिक सरफेस टेक्निक आणि बेसिक्स ऑफ ड्रेपिंग हे होते. फॅब्रिक सरफेस टेक्निक म्हणजे कापड रंगवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचे शिक्षण. यात डाय करणे म्हणजे रंगात कापड बुडवून कापड रंगवणे आणि कापडाला वरून रंग लावून एका बाजूनेच कापड रंगवणे/ कापडावर रंगांनी चित्र काढणे अश्या दोन्ही प्रकारातल्या अनेक पद्धती शिकवल्या होत्या. याच्या मी दोन सेमिस्टर्स घेतल्या होत्या. आणि एकुणात १५ वेगवेगळे नमुने तयार केले होते.
block-printing.jpg
दुसरा महत्वाचा वर्ग म्हणजे बेसिक्स ऑफ ड्रेपिंग. म्हणजेच कापड शरीराप्रमाणे दुमडून, वळवून मग त्यानुसार कापून त्यावरून कापड बेतण्यासाठी पॅटर्न तयार करणे हे होय.
वेशसंकल्पन करणार्‍याला इतर डिझायनिंगच्या तंत्रांचीही व्यवस्थित माहिती हवी. यासाठी आमच्या युनिव्हर्सिटीमधे इतर डिझायनिंग पैकी म्हणजे नेपथ्य व प्रकाशयोजना यांपैकी एका विषयाच्या दोन सेमिस्टर्स आणि दुसर्‍या विषयाची एक सेमिस्टर घेणे अपेक्षित होते. या वर्गांचे स्वरूपही कॉश्च्यूम डिझायनिंगच्या वर्गांच्यासारखेच असायचे. एक नाटक घेऊन त्याचे नेपथ्य डिझाइन करणे, त्याचा ग्राउंडप्लान बनवणे आणि सेटची छोटी प्रतिकृती बनवणे हे अपेक्षित असायचे. मी नेपथ्याच्या दोन सेमिस्टर्स घेतल्या होत्या. या मधे एकुणात ६ नाटकांचे नेपथ्य डिझाइन केले होते. तसेच प्रकाशयोजनेची एक सेमिस्टर होती त्यात एकुणात 1 नृत्याचा कार्यक्रम आणि 2 नाटके यांची प्रकाशयोजना डिझाइन केली होती.
वेशभूषेबरोबर शिवणकामातल्या काही महत्वाच्या गोष्टी शिकणे अपेक्षित होते तसेच नेपथ्याच्या बरोबर सीन पेंटिंग शिकणेही अपेक्षित होते. सीन पेंटींग म्हणजे नेपथ्य रंगवणे. यामधला अगदी सुरूवातीचा भाग म्हणजे कोर्‍या जागेवर वेगळ्या प्रकारचा पृष्ठभाग रंगवणे. उदाहरणार्थ विटांच्या भिंतीचा पृष्ठभाग, स्टेन्सिल ने केलेली नक्षी, प्लास्टर व स्टको चा पृष्ठभाग, संगमरवर, लाकूड इत्यादी.
vita.jpg
या सगळ्याबरोबर दुसर्‍याने केलेल्या कामाचा अभ्यास करणे. त्यावर टिप्पणी करणे याही गोष्टी महत्वाच्या होत्या. आपल्या स्वत:च्या कामाकडे बघण्याची दृष्टी त्यातून मिळू शकते. यासाठी डिझाइन सेमिनार ह्याचाही अभ्यासक्रमात अंतर्भाव केलेला होता. यात एखाद्या डिझाइनिंगचा अभ्यास करणे, त्यावर प्रतिक्रिया देणे, ही प्रतिक्रिया मुद्देसूद पद्धतीने निबंधात मांडणे आणि सगळ्यांच्या समोर तो निबंध सादर करणे अशी प्रक्रिया असायची. एखादा मोठा डिझायनर, एखादा महत्वाचा नाट्यप्रयोग, एखाद्या ठराविक काळातली वेशभूषा, एखाद्या ठराविक नाट्यशैलीतील वेशभूषा असे एकूण चार निबंध मी लिहून सादर केले होते. ह्या सार्‍या शिक्षणाबरोबरच खरोखरीची नाटके डिझाइन करणे आणि त्यातून शिकणे हा महत्वाचा मुद्दा होताच. पण त्याबद्दल पुढच्या लेखात बोलूया.
---नीरजा पटवर्धन

1 comments:

Raj said...

Cool template. :)

Search This Blog