Tuesday, December 21, 2010

सोंग सजवण्याची कला - ६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे.

“मग हे लेख लिहिल्यावर नवीन ऑर्डर मिळाली की नाही?"
"कसली?"
"कपड्यांची? तू फॅशन डिझायनर आहेस ना?"
"मी फॅशन डिझायनर नाहीये रे मी कॉश्च्युम डिझायनर आहे." शक्य तितक्या शांतपणे मी एकाला उत्तर दिले. हे मला नवीन नाही.
"तेच ते गं! तेही कपडेच बनवतात आणि तुम्हीही, काय फरक मग तुमच्यात!" असही एका भोचक मावशींनी एकदा फटकारलं होतं. तुमच्याही डोक्यात आला असेलच हा प्रश्न. थोडं त्यावरच बोलूया आपण.
हो फॅशन डिझायनर्स आणि कॉश्च्युम डिझायनर्स दोघेही कपडेच डिझाइन करतात. पण दोन्ही पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. कारण दोन्हीचा हेतू वेगळा आहे. फॅशन डिझायनर्स हे मुळात डिझाइन करतात लोकांसाठी. खर्‍याखुर्‍या लोकांनी त्यांच्या रोजच्या आयुष्यात काय कपडे घालावेत, कसे रंग वापरावेत, कुठले कापड वापरावे आणि कश्या प्रकारचे कपडे कुठे जाताना घालावेत हे सगळं सूचित करतात ते फॅशन डिझायनर्स. यांचा तयार झालेला एकेक कपडा हा स्वतंत्र कलाकृती असू शकतो. उत्तम कारागिरीचे उदाहरण असू शकतो. कारण फॅशन ही मुळात डोळ्याला सुखावणारी, माणसाला आकर्षित करणारी असावी लागते.
नाटक, चित्रपट, नृत्यनाट्य इत्यादिंमधील नटांनी/नर्तकांनी घालायचे कपडे ठरवणारे ते आम्ही कॉश्च्यूम डिझायनर्स. आता नाटक, चित्रपट वा नृत्यनाट्य ह्या तिन्ही कला म्हणजे कथा सांगण्याची विविध माध्यमे आहेत. या माधमांची परिणामकारकता वाढवणार्‍या महत्वाच्या साधनांपैकी कॉश्च्युम्स हे एक महत्वाचे साधन आहे. कपडे घालणार्‍याच्या आवडीनिवडी आणि व्यक्तिमत्व यापेक्षा इथे त्या त्या कथेतली व्यक्तिरेखा महत्वाची असते. असलेल्या नटाच्या अंगावर कपडे चढवून त्याचे त्या व्यक्तिरेखेत रूपांतर करायचे असते. अंगावर चढवलेला कपडा हा त्या व्यक्तिरेखेचा रोजचा कपडा आहे असे वाटणे महत्वाचे असते. या ठिकाणी कॉश्च्युम्स हे नुसते कपडे नसून त्या त्या व्यक्तिरेखेचं चिन्हं म्हणून यावे लागतात. अर्थात त्यामुळेच एकेक कॉश्च्युम हा संपूर्ण कलाकृतीचा एक महत्वाचा भाग असतो वेगळी कलाकृती नव्हे. तस्मात कॉश्च्युम डिझाइन ही कला नाट्य वा चित्रपटकलेचे महत्वाचे अंग आहे.
हा झाला मूळ उद्देशांच्यातला फरक. ज्याचा परिणाम अर्थातच डिझायनिंग च्या विचारांवर होतो. फॅशन डिझायनिंग करताना व्यक्तिचे व कपड्याचे सौंदर्य खुलवणे हा एक महत्वाचा मुद्दा होऊन बसतो. वरच्या दर्जाचे शिवणकाम, अतिशय उत्तम भरतकाम, खरी सोन्याची जर, खर्‍या सोन्याचे उत्तम कारागिरी असलेले दागिने इत्यादी गोष्टी गरजेच्या ठरतात. अगदी हातात घेऊन बघितले तरी कुठेही कारागिरीच्या दर्जामधे शंका घेण्यास जागा नाही अशी वस्तू बनणे अपेक्षित असते. या उच्च दर्जाच्या कारागिरीला कुत्यूर (Couture) असे म्हणले जाते.
Kumbhar-04.jpg
या सगळ्या वस्तू कॉश्च्यूममधे गरजेच्या असतातच असं नाही. अश्या प्रकारचे कपडे घालणारी व्यक्तिरेखा असेल तर हरकत नाही पण त्यातही व्यक्तिरेखेचा स्वभाव, काळ या महत्वाच्या गोष्टी ठरतात.पण आपली व्यक्तिरेखा सामान्य माणसाची असेल तर त्याठिकाणी हा कुत्यूर चा वापर चालणारच नाही. अनेकदा नाटकात कपडे पटकन बदलायचे असतात तर कधी बजेट कमी असते तर कधी एखादी वेगळीच अद्भुत व्यक्तिरेखा असते अश्या अनेक कारणांनी आपण कपड्यांच्या कारागिरीतल्या उच्च दर्जापासून दूर जातो. तेव्हा त्याला कॉश्च्युम म्हणले जाते. खरेखुरे दागिने नसून खर्‍यासारखे दागिने, रेशमासारख्या दिसणार्‍या कपड्यातून बनवलेले रेशमी म्हणवले जाणारे कपडे अश्या अनेक गोष्टी कॉश्च्युममधे वापरल्या जातात आणि त्या रंगमंचावरून वा कॅमेर्‍यातून अगदी यथायोग्यही दिसतात. त्यामुळेच हे सगळं विचारात घेता दोन्हीच्या शिक्षणातही खूप फरक असणार हे ओघाने आलंच.
फॅशन डिझायनरला एकुणात समकालीन दृश्य जाणीव (लोकांना आजच्या काळात दृश्य गोष्टींमधे कश्या प्रकारच्या गोष्टी बघायला आवडतात), बाजारातली मागणी, वावराच्या हिशोबाने कोणाची कपडयांची गरज काय आह, वस्त्रोद्योग आणि फॅशन व्यापार यासंदर्भातला अभ्यास इत्यादी गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
तर कॉश्च्युम डिझायनरला कथा, कथेची हाताळणी व व्यक्तिरेखा अभ्यासून मग ती ती व्यक्तिरेखा कश्या प्रकारचे कपडे घालत असेल, कथा व हाताळणीच्या अनुषंगाने त्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, मानसशास्त्र, दिग्दर्शकीय हाताळणी, कॅमेरा, लाईटस याचा अभ्यास करावा लागतो.
Natasamrat-Beginning-1.jpg
हे असले तरी कपड्यांचा इतिहास, कपडे तयार करण्याच्या पद्धती, कापडांची तपशीलवार माहीती, रंग, रेषा, आकार, पोत इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास दोघांनाही करावा लागतो. पण गंमत काय होते की हे सगळं कोणालाच माहीत नसतं आणि मग मी कॉश्च्युम डिझायनर आहे असं म्हणलं की लोक मनातल्या मनात हा म्हणजे शिंपी असं म्हणून मोकळे होतात.
एकदा तर एकांनी कहरच केला. एका मोठ्या गावात एका शैक्षणिक प्रतिष्ठानात श्वास चित्रपटाचं स्क्रिनिंग होतं. तिथे मी, संदीप सावंत आणि संदीप कुलकर्णी असे तिघे गेलो होतो. स्क्रिनिंग नंतर आम्हाला तिघांना स्टेजवर बोलावले गेले आणि गुच्छ बिच्छ देणे इत्यादी सोपस्कार पार पडले. सत्कार आटोपल्यावर स्टेजवरून उतरून खाली येताना नट आणि दिग्दर्शकद्वयीला विद्यार्थ्यांनी घेरलं. मी हळूच बाहेर येऊन या दोघांची वाट पहात होते तेवढ्यात आतून एक जोडपे बाहेर आले. मला बघितल्यावर ते थबकले आणि म्हणाले
"अभिनंदन."
माझा आनंद गगनात मावेना. म्हटलं वा इतक्या आडगावात कॉश्च्युम डिझायनरच्या कामाला अभिनंदन करावसं वाटणारे लोक मिळाले!!
तेवढ्यात ते म्हणाले "तुमचं काम छान झालं होतं. पण तुम्ही प्रत्यक्षात वेगळ्या दिसता."
माझा फुगा फुटला. स्टेजवर याही बाईला गुच्छ मिळाला म्हणजे ही ती नटीच असणार असा विचार करून ते मलाच अमृता समजून अभिनंदन करत होते बहुतेक.
"मी नटी नाहीये. मी नव्हतं काम केलं सिनेमात." मी सांगितलं.
"मग काय केलंत तुम्ही?"
"मी कॉश्च्युम डिझायनर होते या सिनेमाची. सगळ्यां नटांनी सिनेमात काय कपडे घालायचे ते मी ठरवलं."
मी आपलं उत्साहात समजावयला गेले. त्यावर त्यांचा चेहरा पारच पडला.
"हो का? सॉरी हं!" असं म्हणून ते झर्रकन वळले आणि चालू लागले.
तुम्हाला कॉश्च्युम डिझायनिंगचं काम करावं लागतंय म्हणून सॉरी असं त्यांना म्हणायचं होतं की कॉश्च्युम डिझायनर आहात तरी आम्ही तुमचं अभिनंदन केलं त्याबद्दल सॉरी म्हणायचं होतं त्यांना हे मला अजूनही कळलेलं नाही.
अश्यांच्या प्रतिक्रियांवर मीही 'बिच्चारे यांना काहीच कळत नाही' असं मनात म्हणत हसून दाखवते. पण दुसर्‍याच दिवशी माझे कपडे शिवणार्‍या टेलरच्या पावतीवर कॉश्च्युम डिझायनर असं छापलेलं मी पाहते आणि मलाच बिच्चारं वाटायला लागतं. हे खरंय की आपल्याकडे कॉश्च्युम डिझायनर या संज्ञेचे निकष स्पष्ट नसल्याने कोणाला नक्की काय म्हणायचे याबाबत फार मोठा गोंधळ आहे.
Kumbhar-01.jpg
एखाद्या नाटकाचे कपडे शिवून देणाराही स्वत:ला डिझायनर म्हणवतो. एखाद्या सिरीयलच्या ठिकाणी स्पॉन्सर केलेल्या कपड्यांच्यातून कंटिन्युइटी बघून कपडे देणाराही स्वत:ला डिझायनर म्हणवतो. कपडे भाड्याने देणारा ड्रेसवालाच अनेकदा अश्या तथाकथित डिझायनर्स ना सांगत असतो "ये फलाणा कॅरेक्टर है ना बेन, तो उसका कपडा ऐसाही होता है .येही लेके जावो." आणि ते त्याच वस्तू घेउनही जातात. त्यांना दोष देण्यातही काही अर्थ नाही म्हणा. मालिकांमधे इतपत विचार करून काम करायला वेळच नसतो. सगळ्याच गोष्टी कमीतकमी वेळात करता येणे हेच सगळ्यात महत्वाचे होऊन बसलेले असते तिथे त्याला ते तरी काय करणार.
इथवर या लेखमालेचा प्रवास आला. माझ्या शिक्षणाविषयी, माझ्या कामाविषयी तुम्हाला बरंच काही सांगितलं ते माझ महत्व ठसवायला नाही. ही कॉश्च्युम डिझायनिंगची कला आणि पर्यायाने सगळीच दृश्यात्मकता ही संपूर्ण चित्रात कशी नि किती महत्वाची आहे याचा थोडासा तरी अंदाज तुम्हाला यावा यासाठी हा सगळा प्रपंच.
खूप अभ्यास केला इथवर आता पुढच्या एक-दोन लेखात थोड्या गमतीजमती बघूया आणि लेखमालेचा शेवट करू या.. काय म्हणता?
--- नीरजा पटवर्धन

4 comments:

Anagha said...

:) आता तू वैतागशील कदाचित, पण मी एकदा केलेलं हे कॉशच्युम डिझायनींगचं काम! म्हणजे लेकीला केलेलं डालमेशियन! कुत्रा! मग सगळा पांढरा ड्रेस शिवला होता आणि बसले होते रात्रभर त्यावर काळे गोळे गोळे शिवत! एक कान काळा एक कान पांढरा! :p आणि सगळ्यांना तुझ्या कामाचं स्वरूप न कळल्यामुळे हे असे गोंधळ नेहेमीच होत असणार! तरी तू बरीच समजुतीने घेतेयस! :)

साधक said...

तुमचे लेख येण्यापूर्वी या कामाकडे कधी लक्षच गेलं नव्हतं. आता त्यातली जटिलता कळत आहे. लेख माला संपवत आहात पण ती वृत्तपत्रांमध्ये छापून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायला हवी. भविष्यात तुमचे चॅलेजिंग अनुभव छायाचित्रांसकट वाचायला आवडतील
शुभेच्छा.

नीरजा पटवर्धन said...

अनघा, हा फोटो बघायला आवडेल.. संमजुतीने कसलं गं.. जमवते कसं तरी...:)
साधक, ही लेखमाला प्रहारमधे दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेली आहे. ती परत ब्लॊगवर टाकलीये फक्त. :)

Amogh said...
This comment has been removed by a blog administrator.

Search This Blog