Tuesday, March 30, 2021

कपडे, माणूसपण इत्यादी

"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?"  कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे. 

ह्याच प्रश्नाला संस्कृतीची फोडणी घालून नुकतेच उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांनी असेच एक विधान केले. फाडलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे गुडघे आणि त्यामुळे कातरून गेलेली आपली थोर संस्कृती अश्या एकमेकांशी संबंध नसलेले मुद्दे त्या विधानात होते. गुडघे उघडे ठेवणे हे  पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि अंग झाकण्याची आपली संस्कृती असेही त्यांचे म्हणणे होते. मुळात अंग झाकण्याचा अवास्तव सोस हे प्रकरणच आपल्या अनुकरणप्रियतेचे निदर्शक आहे. दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडातला हा पाश्चिमात्यांचा सोस सरळ सरळ उचलून आपली संस्कृती म्हणून खपवतो आहोत हे मुख्यमंत्री महोदय सोयीस्कररीत्या विसरून गेलेले आहेत. 

‘फाडलेल्या जीन्स मधून संस्कृती कातरून पडते’ हे एकच विधान नाही. या वाटेवरची विधाने सतत चालू आहेत. आणि ती सभ्यता किंवा सभ्यतेचे मापक  म्हणून खपून जातायत. माणसांची प्रतवारी केली जातेय त्यावरून. अमुक प्रकारचे कपडे ही आपली संस्कृती नाही असे कुणी ना कुणीतरी रोज अतिशय अपमानास्पदरित्या सांगत राहतेच.  कुणाला राहीबाई पोफळेंच्या कार्यापेक्षा त्यांनी पुरस्कार स्वीकारताना डोक्यावर पदर घेणे याचेच फक्त कौतुक वाटते. कुणाला मंगलयानाच्या बातमीतल्या फोटोत सर्व वैज्ञानिक स्त्रिया त्या वैज्ञानिक आहेत याच्यापेक्षा त्या साडी, मंगळसूत्र, कुंकू वगैरे पेहरावात आहेत हे बघून भरून येते. 

पण हे बरेचसे स्त्रियांसाठी असते. केवळ स्त्रियांच्यावर असलेली धार्मिक वा सामाजिक ड्रेसकोडची सक्ती ही वरकरणी स्त्रियांची सुरक्षितता वगैरेसाठी असते असे म्हणले जाते. आणि स्त्रीच्या  शरीराच्या झाकलेल्या क्षेत्रफळानुसार स्त्रीचे वर्गीकरण केले जाते. याच्या मुळाशी स्त्रीचे वस्तूकरण किंवा मालमत्ताकरण हे पितृसत्ताक मूल्यच आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच ठराविक चौकटीच्या बाहेरचे काही जामानिम्यात असेल तर त्या व्यक्तीला असभ्यतेचे लेबल लावले जाणे हे बालिश आणि अमानुष आहे. हे ही विसरून चालणार नाही. 

हे का आणि कसे झाले? शरीरावर ल्यायच्या गोष्टी या निव्वळ उपयुक्तता किंवा शरीर सजवणे या उद्देशांच्या पलीकडे जाऊन माणूसपणापेक्षा मोठ्या कधी झाल्या? अंगावर  परिधान करायच्या वस्तूंमध्ये वैविध्य येत गेले तसे माणसांचेही कप्पे पडत गेले. कपडे ही दृश्य संवादाची भाषा होत गेली. परिधान केलेली प्रत्येक गोष्ट एखादे चिन्हस्वरूप वापरली वा बघितली जाऊ लागली. सगळ्या जाम्यानिम्यावरून व्यक्तीबद्दल मत तयार केले जाऊ लागले. 

आणि मग हीच प्रक्रिया वळवून ठराविक ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल काय मत व्हायला हवे हे ठरवत म्हणजेच "हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" या प्रश्नाच्या भोवती फेऱ्या मारत मारतच कपडे व इतर परिधानाच्या गोष्टींचे संकेत बनवले गेले. या प्रश्नाला समाजाच्या वेगवेगळ्या उतरंडीचे असंख्य कंगोरे, पैलू, पापुद्रे सुटून मग हळूहळू त्या संकेतांचे नियम बनले. 

वेगवेगळे मुद्दे धरून हे नियम घडवलेले असतात, घडत असतात. बदलतही असतात. नियम आहेत म्हणजे ते पाळलेच पाहिजेत अशी अपेक्षा असते. पाळले न गेल्यास त्याचे परिणामही भोगावे लागणारच अशी धारणा होणे साहजिक आहे.  पण हे इतकं साधं, सोपं, सरळ, एकरेषीय नसतं. 

ड्रेसकोडमध्ये कपडे कसे असावेत याचे नुसते सूचन केलेले असते. ते सभ्य असावेत किंवा तत्सम असे नुसते संकेत असतात. अश्यावेळी अनेक अर्थ संभवतात आणि संघर्ष होतो. अशीच एक घटना याच आठवड्यात घडली. गुजरात विधानसभेत जीन्स व टीशर्ट घालून आल्याबद्दल आमदार विमल चुडासामा यांना बाहेर काढले गेले. वास्तविक पाहता विधानसभेचा काहीही लिखित ड्रेसकोड नाही. ‘मला याच कपड्यात बघून मतदारांनी निवडून दिले त्यामुळे मी त्याच कपड्यात असणे योग्य आहे.’ असा युक्तिवाद चुडासामा यांनी केला. तो मान्य  झाला नाही. 

जगभरात विविध देशांच्या संसदेत गेल्या काही वर्षांमध्ये एक राजकीय विधान म्हणून किंवा निषेध म्हणून पाश्चिमात्य किंवा मूळ युरोपियन असलेल्या ड्रेसकोडला आव्हान दिले जाते आहे. भारतीय राजकीय पोशाखांच्या संदर्भात बघायचे तर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १९३१ साली इंग्लंडच्या राजाला भेटायला जाताना सभ्यतेच्या सर्व कल्पनांना धुडकावून लावून गांधीजी खादीचे धोतर आणि शाल लेवून गेले होते. सभ्यतेच्या कल्पना आणि वावर याबाबत काटेकोर असणाऱ्या इंग्रजांच्या जगात यावरून गदारोळ उठला नसता तरच नवल. गांधीजींनी अतिशय हुशारीने केलेले हे राजकीय विधान होते. जाडेभरडे, अर्धे कपडे घालणाऱ्या जनतेने तश्याच प्रकारचे कपडे घालून इंग्लंडच्या राजाला भेटायला गेलेल्या माणसाला आपला, आपल्यातला आणि म्हणून आपला नेता मानणे हे साहजिकच. खादीच्या चळवळीच्या परिणामस्वरूप स्वातंत्र्यानंतर कैक वर्षे भारतीय राजकीय पोशाख खादीचे भारतीय वळणाचे कपडे असाच राह्यला. हे भारतीयत्व मानलं गेलं होतं. विविधतेत एकता या तत्त्वाचे हे थोडे भाबडे स्वरूप म्हणता येईल.  उदारीकरणानंतर आणि मग नवीन शतकात राजकारणात आलेल्यांना खादीचे ऐतिहासिक महत्व माहिती असले तरी ते स्वतःच्या जगण्याचा भाग म्हणून बघता येणे अशक्य होते. ते ज्यांचे नेते म्हणून आले त्यांनाही त्यांच्यासारखाच वाटणारा जीन्स टीशर्टवाला नेता आपला वाटणे हे ओघानेच आले. 

जगभरात कुठेही जीन्स व टीशर्ट या गोष्टींना फॉर्मल म्हणून मान्यता नाही हे खरे असले तरी फॉर्मल या गोष्टीच्या व्याख्या धूसर नक्की होतायत. त्यामुळे अश्या मान्यतांचा बाऊ आपण न करणे हेच योग्य ठरेल. 

पण यामुळे  कपड्यांवरून माणसाचा अंदाज बांधणे थांबणार नाही. शेवटी कपडे हे दृश्य संवादाचे एक साधन आहे. कपड्यांना बघून समोरच्या माणसाबद्दल आडाखे बांधणे ही मानवी प्रवृत्ती आहे. आजवर बघितलेल्या माणसांच्यावर आधारित हे आडाखे बांधणे प्रत्येकाच्या नकळत होतच असते. होतच राहणार. पण या सगळ्यापेक्षा माणूस आणि माणूसपण मोठं आहे, असायला हवं ही जाणीव मात्र पक्की ठेवायला हवी.

- नी

---------

हा लेख दैनिक लोकमतमध्ये २३ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता. ही त्याची लिंक

कोणी, कसे कपडे घालावे, हे कोण ठरवणार?

Monday, March 1, 2021

प्रवास

मराठी शाळेत असल्यामुळे आमच्या शाळेच्या सहली असत. एका दिवसाच्या सहली. कुठेतरी जाऊन काहीतरी बघायचं. दिलेले सगळे डबे संपवायचे हा मुख्य कार्यक्रम असे. डब्याचा मेन्यू दरवर्षी ठरलेला होता. सकाळी खायला (नाश्ता आणि ब्रेकफास्ट हे शब्द तेव्हा रुळले नव्हते आमच्या जगात) चटणी आणि जाम सँडविचेस असायची. अश्विनी आणि माझी एकत्र असायची सँडविचेस. तिच्याकडे सगळी जॅमची आणि माझी सगळी चटणीची किंवा उलट. खायच्या वेळेला अर्ध्यांची अदलाबदल करायची असे दोघींच्या आयांनी मिळून ठरवलेले असायचे. त्यामुळे बिचारी स्कॉलर ग्रुपमधली अश्विनी बसमध्ये माझ्याबरोबर  बसायची. दुपारच्या जेवणाच्या डब्याचे मुख्य आकर्षण होते रसाच्या पोळ्या. त्या केवळ प्रवासासाठीच करायच्या असा कुणीतरी नियम घातला होता बहुतेक. त्या लुसलुशीत आणि गोडसर अश्या रसाच्या पोळ्या सहली संपल्या तश्या आयुष्यातूनही संपल्या. त्या रसाच्या पोळ्यांबरोबर जर चमचमीत अशी कांदाबटाटा काचऱ्याभाजी आणि केळं, बेदाणे घातलेला गोडच शिरा असा भरभक्कम डबा असायचा. संध्याकाळचे स्नॅक म्हणून चिवडा-लाडू-गोळ्या वगैरे दिलेले असेच. 
या खादाडीच्या दरम्यान अधेमधे खेळायचं, घसा फाटेस्तो गाणी म्हणायची. हुजूरपागेचा जयजयकार वगैरे आरोळ्या ठोकायच्या आणि संध्याकाळी घरी  यायचं. हा शाळेच्या सहलीचा कार्यक्रम. मोठे होत गेलो तसे यात खरेदी नावाच्या कार्यक्रमाची भर पडली. तिसरीतल्या लोणावळा खंडाळा सहलीला आयुष्यात पहिल्यांदाच दोनपाच रुपये हातात मिळालेले होते त्यामुळे आम्ही चिक्कीच्या दुकानात घसघशीत खरेदी केली होती लोणावळ्यात.   
चौथीत असताना मुंबईला राहायची सहल होती शाळेची. पहाटे सिंहगड पकडायला मला आणि अश्विनीला बाबांनी स्कूटरवरून सोडले होते. अश्विनीची की माझी चप्पल गाडीत चढताना रुळावर पडली आणि ती बाबांनी बाहेर काढली होती. आम्ही किंग जॉर्ज शाळेत राह्यलो होतो. तिथे त्या दिवशी एक लग्नही होते. तारापोरवाला मध्ये मासे बघितले होते. दुसऱ्यादिवशी सिंहगडनेच परत आलो होतो. घरी येताना अश्विनीच्या बाबांबरोबर आम्ही टांग्यातून घरी आलो होतो. इतकेच आठवते.  आईचा सगळाच गोतावळा मुंबईत असल्याने लहानपणापासून पुणे-मुंबई कितीतरी वेळेला केले पण टक्क लक्षात राह्यलेल्या थोडक्या वेळांपैकी हीच एक. 
रँ. र. पु. परांजपे प्राथमिक मधून हि. हा. चिं. प. हायस्कुलात आल्यावर या सहली अश्याच चालू होत्या पण त्या लक्षात नाहीत फारश्या. मग अजून मोठे झाल्यावर शाळेच्या सहली दोन किंवा तीन दिवसांच्या व्हायला लागल्या. तेव्हा मात्र त्यांचे नाव शाळेची ट्रिप असे झाले. एक दिवसाची सहल, अनेक दिवसांची ट्रिप. त्या पक्क्या लक्षात आहेत.
काळे ट्रॅव्हलसकडे त्या ट्रिप्सची व्यवस्था असायची. ट्रिपच्या आधीच शाळेत येऊन काळे काका आपल्या गडगडाटी हास्यासहित सगळ्या सूचना देऊन गेलेले असायचे.  तुकड्यांप्रमाणे बसेस आणि राहायची व्यवस्था असायची. तेव्हा तुकड्या तुकड्यांच्यातली खुन्नस; विशेषतः अ आणि ब तुकडीतली; जबरदस्त असायची. केवळ मुलींची शाळा असल्याने त्याचे पर्यावसान गंभीर मारामारीत वगैरे व्हायचे नाही. पण उगाचच नाक उडवून दाखवणे असायचे. ते ट्रिपमध्येही असायचे. 
शाळेच्या गणवेषाला 2/3/4 दिवस सुट्टी आणि दिवसभर फिरून आल्यावर रात्री सिनेमे बघून झोपी जाणे हे हायलाईटस असायचे या ट्रिप्सचे. व्हीसीआर-टीव्ही वगैरे मागवून सगळ्या मुलींना विचारून सिनेमे ठरवले जायचे. नगिना बघितला होता एका ट्रिपमध्ये. आणि घरी येऊन आईला साभिनय(स-नृत्य to be precise) स्टोरी सांगितली होती.  हैदराबादच्या ट्रिपमध्ये इतर काही तुकड्यातल्या मुलींच्या हट्टामुळे हिम्मत और मेहनत नावाचा सुपरडुपर टुकार सिनेमा पाह्यला होता. आणि खूप खिदळलो होतो. त्या खिडळण्यात आमच्या आवडत्या शिक्षिका म्हणजे संगम बाईही सामील होत्या त्यामुळे आम्हाला भारीच कूल वाटले होते.  
कॉलेजमध्ये अश्या ट्रिपा नव्हत्या पण मग एनसीसी कॅम्प, जनता राजाचे दौरे वगैरे निमित्ताने भटकंती चालूच राह्यली.
आणि मग बॉटनीच्या कलेक्शन टूर्स. वरंधा घाटातली भर पावसातली एक दिवसाची आणि बंगलोर-म्हैसूर-उटी अशी 8-10 दिवसांची कलेक्शन टूर.  कलेक्शनचे दिवसातले काही थोडे तास सोडले तर ट्रिप असल्यासारखाच भरपूर दंगा करून घेतला होता.
यानंतर मात्र आयुष्यातला मजा म्हणून प्रवास संपल्यात जमा झाला. नाटकासाठी, शिक्षणासाठी, कामासाठी प्रवास भरपूर केले.  कामासाठी जात असल्याने एकाच जागी वारंवार जात राहणे, वेगवेगळ्या पैलूतून  ती ती जागा अनुभवणे, आत उतरवणे हेही झाले. 
सध्या थांबलेय सगळेच आणि ही प्रवासाची तहान अस्वस्थ करतेय.
- नी

मराठी भाषा दिन

भ्रमणध्वनीवरून चेहरेपुस्तकावर मराठीत टपाल लिहून आजचा मराठी भाषा दिनाचा सोहळा करायचा आहे. त्यानिमित्ताने काही मराठी वाक्ये.  अश्या स्वरूपाच्या वाक्यांचा आपल्या वाचेत विनियोग केला की मराठीचे सुवर्णयुग साकारलेच म्हणून समजा. 
१. स्वयंचलित दुचाकी लत्ताप्रहाराने कार्यान्वित करण्याऐवजी हातदंडावर असलेली कळ दाबून कार्यान्वित करण्याचे नवीन तंत्रज्ञान आताशा उपयोजिले जाते.
२. पद्धत जामानिम्यात अलंकारांबरोबरच शिरोवस्त्रे व शिरोभूषणे, पट्टे, कालगणक डबी,  चक्षुसुख भिंगे, झोळ्या, बटवे आणि पादत्राणे यांचा समावेश असतो. 
3. कलाकुसरसामान विकणाऱ्या दुकानात  विनाआम्ल कागद, पाणीरंग, कृत्रिमरंग, तेलरंग, कडककापडफलक, कुंचले, झरलेखण्या, शिसलेखण्या, चिकटघोळ, चिकटपट्ट्या, चिकट्याची बंदूक, मणी, दोरे, सुया, लोकर,  उष्णतावरोधक सफेद व रंगीत पुठ्ठे आणि इतर अनेक वस्तू मिळतात. 

तसेच वस्तूंना व कृतींना मराठी प्रतिशब्द मिळेपर्यंत त्यांना विचारात अथवा विनियोगात घ्यायचे नाही अशी आज या मराठी भाषा दिनी आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. 

- नी

#प्रतिशब्द_आतंकवाद #मराठीभाषादिन_नव्हे_दीन #प्रतिशब्दसंस्कृतप्रचुरचहवा

 गरजूंसाठी(असे लोक आहेत) सूचना: प्रत्येक शब्दाला ओढूनताणून मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या वा तयार करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या मराठीवाचव्या जनांच्या फुकाच्या अट्टाहासासंदर्भाने उपहासात्मक विनोद म्हणून ही पोस्ट लिहिलेली आहे. 
मराठीच्या आग्रहाबद्दल माझे तारतम्य शाबूत आहे. त्याबद्दल शंका घेऊ नये आणि मला लेक्चर मारू नये. धन्यवाद!

वास

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला निमशहरी किंवा ग्रामीण भागात रस्त्यांवर  एक विशिष्ट वास असतो. बटाट्याचा खीस घालावा त्या जातकुळीचा वास असतो तो. कशाचा नक्की ते माहीत नाही पण असतो. 
एवढे वर्षांच्या सगळ्या फिरफिरीत तो वास, आजूबाजूचे मावळत जाणारे वातावरण, दिवसाचे काम संपवून राहण्याच्या ठिकाणी परत जायचा प्रवास, लोक घरी जातायत आणि आपण हॉटेलवर जातोय - आपण इथले नाही हे अधोरेखित होणे,  हा वास येतो तिथे आपलं काही असण्याची ओढ असं सगळं आणि अजून बरंच त्या वासाशी जोडलेलं आहे. 
एक काळ असा होता की ही फिराफीरी इतकी सततची होती की त्या वासाची सवय झाली होती. इतकी की तेच घर वाटे. उबदार वाटे. मग ते फिरणं थांबलं. तो वास आठवणीत राह्यला.  आणि सगळंच तुटल्यासारखं झालं. 
हल्लीच इकडे आसपासच भटकत असताना एका संध्याकाळी हवेला त्या वासाची नोट होती. मी थांबले. वासाची दिशा शोधायचा प्रयत्न केला. हरवली ती नोट. 
फिरायला हवं, मला सतत फिरायला हवं.
- नी

Search This Blog