Tuesday, March 30, 2021

कपडे, माणूसपण इत्यादी

"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?"  कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे. 

ह्याच प्रश्नाला संस्कृतीची फोडणी घालून नुकतेच उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांनी असेच एक विधान केले. फाडलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे गुडघे आणि त्यामुळे कातरून गेलेली आपली थोर संस्कृती अश्या एकमेकांशी संबंध नसलेले मुद्दे त्या विधानात होते. गुडघे उघडे ठेवणे हे  पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि अंग झाकण्याची आपली संस्कृती असेही त्यांचे म्हणणे होते. मुळात अंग झाकण्याचा अवास्तव सोस हे प्रकरणच आपल्या अनुकरणप्रियतेचे निदर्शक आहे. दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडातला हा पाश्चिमात्यांचा सोस सरळ सरळ उचलून आपली संस्कृती म्हणून खपवतो आहोत हे मुख्यमंत्री महोदय सोयीस्कररीत्या विसरून गेलेले आहेत. 

‘फाडलेल्या जीन्स मधून संस्कृती कातरून पडते’ हे एकच विधान नाही. या वाटेवरची विधाने सतत चालू आहेत. आणि ती सभ्यता किंवा सभ्यतेचे मापक  म्हणून खपून जातायत. माणसांची प्रतवारी केली जातेय त्यावरून. अमुक प्रकारचे कपडे ही आपली संस्कृती नाही असे कुणी ना कुणीतरी रोज अतिशय अपमानास्पदरित्या सांगत राहतेच.  कुणाला राहीबाई पोफळेंच्या कार्यापेक्षा त्यांनी पुरस्कार स्वीकारताना डोक्यावर पदर घेणे याचेच फक्त कौतुक वाटते. कुणाला मंगलयानाच्या बातमीतल्या फोटोत सर्व वैज्ञानिक स्त्रिया त्या वैज्ञानिक आहेत याच्यापेक्षा त्या साडी, मंगळसूत्र, कुंकू वगैरे पेहरावात आहेत हे बघून भरून येते. 

पण हे बरेचसे स्त्रियांसाठी असते. केवळ स्त्रियांच्यावर असलेली धार्मिक वा सामाजिक ड्रेसकोडची सक्ती ही वरकरणी स्त्रियांची सुरक्षितता वगैरेसाठी असते असे म्हणले जाते. आणि स्त्रीच्या  शरीराच्या झाकलेल्या क्षेत्रफळानुसार स्त्रीचे वर्गीकरण केले जाते. याच्या मुळाशी स्त्रीचे वस्तूकरण किंवा मालमत्ताकरण हे पितृसत्ताक मूल्यच आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच ठराविक चौकटीच्या बाहेरचे काही जामानिम्यात असेल तर त्या व्यक्तीला असभ्यतेचे लेबल लावले जाणे हे बालिश आणि अमानुष आहे. हे ही विसरून चालणार नाही. 

हे का आणि कसे झाले? शरीरावर ल्यायच्या गोष्टी या निव्वळ उपयुक्तता किंवा शरीर सजवणे या उद्देशांच्या पलीकडे जाऊन माणूसपणापेक्षा मोठ्या कधी झाल्या? अंगावर  परिधान करायच्या वस्तूंमध्ये वैविध्य येत गेले तसे माणसांचेही कप्पे पडत गेले. कपडे ही दृश्य संवादाची भाषा होत गेली. परिधान केलेली प्रत्येक गोष्ट एखादे चिन्हस्वरूप वापरली वा बघितली जाऊ लागली. सगळ्या जाम्यानिम्यावरून व्यक्तीबद्दल मत तयार केले जाऊ लागले. 

आणि मग हीच प्रक्रिया वळवून ठराविक ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल काय मत व्हायला हवे हे ठरवत म्हणजेच "हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" या प्रश्नाच्या भोवती फेऱ्या मारत मारतच कपडे व इतर परिधानाच्या गोष्टींचे संकेत बनवले गेले. या प्रश्नाला समाजाच्या वेगवेगळ्या उतरंडीचे असंख्य कंगोरे, पैलू, पापुद्रे सुटून मग हळूहळू त्या संकेतांचे नियम बनले. 

वेगवेगळे मुद्दे धरून हे नियम घडवलेले असतात, घडत असतात. बदलतही असतात. नियम आहेत म्हणजे ते पाळलेच पाहिजेत अशी अपेक्षा असते. पाळले न गेल्यास त्याचे परिणामही भोगावे लागणारच अशी धारणा होणे साहजिक आहे.  पण हे इतकं साधं, सोपं, सरळ, एकरेषीय नसतं. 

ड्रेसकोडमध्ये कपडे कसे असावेत याचे नुसते सूचन केलेले असते. ते सभ्य असावेत किंवा तत्सम असे नुसते संकेत असतात. अश्यावेळी अनेक अर्थ संभवतात आणि संघर्ष होतो. अशीच एक घटना याच आठवड्यात घडली. गुजरात विधानसभेत जीन्स व टीशर्ट घालून आल्याबद्दल आमदार विमल चुडासामा यांना बाहेर काढले गेले. वास्तविक पाहता विधानसभेचा काहीही लिखित ड्रेसकोड नाही. ‘मला याच कपड्यात बघून मतदारांनी निवडून दिले त्यामुळे मी त्याच कपड्यात असणे योग्य आहे.’ असा युक्तिवाद चुडासामा यांनी केला. तो मान्य  झाला नाही. 

जगभरात विविध देशांच्या संसदेत गेल्या काही वर्षांमध्ये एक राजकीय विधान म्हणून किंवा निषेध म्हणून पाश्चिमात्य किंवा मूळ युरोपियन असलेल्या ड्रेसकोडला आव्हान दिले जाते आहे. भारतीय राजकीय पोशाखांच्या संदर्भात बघायचे तर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १९३१ साली इंग्लंडच्या राजाला भेटायला जाताना सभ्यतेच्या सर्व कल्पनांना धुडकावून लावून गांधीजी खादीचे धोतर आणि शाल लेवून गेले होते. सभ्यतेच्या कल्पना आणि वावर याबाबत काटेकोर असणाऱ्या इंग्रजांच्या जगात यावरून गदारोळ उठला नसता तरच नवल. गांधीजींनी अतिशय हुशारीने केलेले हे राजकीय विधान होते. जाडेभरडे, अर्धे कपडे घालणाऱ्या जनतेने तश्याच प्रकारचे कपडे घालून इंग्लंडच्या राजाला भेटायला गेलेल्या माणसाला आपला, आपल्यातला आणि म्हणून आपला नेता मानणे हे साहजिकच. खादीच्या चळवळीच्या परिणामस्वरूप स्वातंत्र्यानंतर कैक वर्षे भारतीय राजकीय पोशाख खादीचे भारतीय वळणाचे कपडे असाच राह्यला. हे भारतीयत्व मानलं गेलं होतं. विविधतेत एकता या तत्त्वाचे हे थोडे भाबडे स्वरूप म्हणता येईल.  उदारीकरणानंतर आणि मग नवीन शतकात राजकारणात आलेल्यांना खादीचे ऐतिहासिक महत्व माहिती असले तरी ते स्वतःच्या जगण्याचा भाग म्हणून बघता येणे अशक्य होते. ते ज्यांचे नेते म्हणून आले त्यांनाही त्यांच्यासारखाच वाटणारा जीन्स टीशर्टवाला नेता आपला वाटणे हे ओघानेच आले. 

जगभरात कुठेही जीन्स व टीशर्ट या गोष्टींना फॉर्मल म्हणून मान्यता नाही हे खरे असले तरी फॉर्मल या गोष्टीच्या व्याख्या धूसर नक्की होतायत. त्यामुळे अश्या मान्यतांचा बाऊ आपण न करणे हेच योग्य ठरेल. 

पण यामुळे  कपड्यांवरून माणसाचा अंदाज बांधणे थांबणार नाही. शेवटी कपडे हे दृश्य संवादाचे एक साधन आहे. कपड्यांना बघून समोरच्या माणसाबद्दल आडाखे बांधणे ही मानवी प्रवृत्ती आहे. आजवर बघितलेल्या माणसांच्यावर आधारित हे आडाखे बांधणे प्रत्येकाच्या नकळत होतच असते. होतच राहणार. पण या सगळ्यापेक्षा माणूस आणि माणूसपण मोठं आहे, असायला हवं ही जाणीव मात्र पक्की ठेवायला हवी.

- नी

---------

हा लेख दैनिक लोकमतमध्ये २३ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता. ही त्याची लिंक

कोणी, कसे कपडे घालावे, हे कोण ठरवणार?

Search This Blog