Monday, March 1, 2021

प्रवास

मराठी शाळेत असल्यामुळे आमच्या शाळेच्या सहली असत. एका दिवसाच्या सहली. कुठेतरी जाऊन काहीतरी बघायचं. दिलेले सगळे डबे संपवायचे हा मुख्य कार्यक्रम असे. डब्याचा मेन्यू दरवर्षी ठरलेला होता. सकाळी खायला (नाश्ता आणि ब्रेकफास्ट हे शब्द तेव्हा रुळले नव्हते आमच्या जगात) चटणी आणि जाम सँडविचेस असायची. अश्विनी आणि माझी एकत्र असायची सँडविचेस. तिच्याकडे सगळी जॅमची आणि माझी सगळी चटणीची किंवा उलट. खायच्या वेळेला अर्ध्यांची अदलाबदल करायची असे दोघींच्या आयांनी मिळून ठरवलेले असायचे. त्यामुळे बिचारी स्कॉलर ग्रुपमधली अश्विनी बसमध्ये माझ्याबरोबर  बसायची. दुपारच्या जेवणाच्या डब्याचे मुख्य आकर्षण होते रसाच्या पोळ्या. त्या केवळ प्रवासासाठीच करायच्या असा कुणीतरी नियम घातला होता बहुतेक. त्या लुसलुशीत आणि गोडसर अश्या रसाच्या पोळ्या सहली संपल्या तश्या आयुष्यातूनही संपल्या. त्या रसाच्या पोळ्यांबरोबर जर चमचमीत अशी कांदाबटाटा काचऱ्याभाजी आणि केळं, बेदाणे घातलेला गोडच शिरा असा भरभक्कम डबा असायचा. संध्याकाळचे स्नॅक म्हणून चिवडा-लाडू-गोळ्या वगैरे दिलेले असेच. 
या खादाडीच्या दरम्यान अधेमधे खेळायचं, घसा फाटेस्तो गाणी म्हणायची. हुजूरपागेचा जयजयकार वगैरे आरोळ्या ठोकायच्या आणि संध्याकाळी घरी  यायचं. हा शाळेच्या सहलीचा कार्यक्रम. मोठे होत गेलो तसे यात खरेदी नावाच्या कार्यक्रमाची भर पडली. तिसरीतल्या लोणावळा खंडाळा सहलीला आयुष्यात पहिल्यांदाच दोनपाच रुपये हातात मिळालेले होते त्यामुळे आम्ही चिक्कीच्या दुकानात घसघशीत खरेदी केली होती लोणावळ्यात.   
चौथीत असताना मुंबईला राहायची सहल होती शाळेची. पहाटे सिंहगड पकडायला मला आणि अश्विनीला बाबांनी स्कूटरवरून सोडले होते. अश्विनीची की माझी चप्पल गाडीत चढताना रुळावर पडली आणि ती बाबांनी बाहेर काढली होती. आम्ही किंग जॉर्ज शाळेत राह्यलो होतो. तिथे त्या दिवशी एक लग्नही होते. तारापोरवाला मध्ये मासे बघितले होते. दुसऱ्यादिवशी सिंहगडनेच परत आलो होतो. घरी येताना अश्विनीच्या बाबांबरोबर आम्ही टांग्यातून घरी आलो होतो. इतकेच आठवते.  आईचा सगळाच गोतावळा मुंबईत असल्याने लहानपणापासून पुणे-मुंबई कितीतरी वेळेला केले पण टक्क लक्षात राह्यलेल्या थोडक्या वेळांपैकी हीच एक. 
रँ. र. पु. परांजपे प्राथमिक मधून हि. हा. चिं. प. हायस्कुलात आल्यावर या सहली अश्याच चालू होत्या पण त्या लक्षात नाहीत फारश्या. मग अजून मोठे झाल्यावर शाळेच्या सहली दोन किंवा तीन दिवसांच्या व्हायला लागल्या. तेव्हा मात्र त्यांचे नाव शाळेची ट्रिप असे झाले. एक दिवसाची सहल, अनेक दिवसांची ट्रिप. त्या पक्क्या लक्षात आहेत.
काळे ट्रॅव्हलसकडे त्या ट्रिप्सची व्यवस्था असायची. ट्रिपच्या आधीच शाळेत येऊन काळे काका आपल्या गडगडाटी हास्यासहित सगळ्या सूचना देऊन गेलेले असायचे.  तुकड्यांप्रमाणे बसेस आणि राहायची व्यवस्था असायची. तेव्हा तुकड्या तुकड्यांच्यातली खुन्नस; विशेषतः अ आणि ब तुकडीतली; जबरदस्त असायची. केवळ मुलींची शाळा असल्याने त्याचे पर्यावसान गंभीर मारामारीत वगैरे व्हायचे नाही. पण उगाचच नाक उडवून दाखवणे असायचे. ते ट्रिपमध्येही असायचे. 
शाळेच्या गणवेषाला 2/3/4 दिवस सुट्टी आणि दिवसभर फिरून आल्यावर रात्री सिनेमे बघून झोपी जाणे हे हायलाईटस असायचे या ट्रिप्सचे. व्हीसीआर-टीव्ही वगैरे मागवून सगळ्या मुलींना विचारून सिनेमे ठरवले जायचे. नगिना बघितला होता एका ट्रिपमध्ये. आणि घरी येऊन आईला साभिनय(स-नृत्य to be precise) स्टोरी सांगितली होती.  हैदराबादच्या ट्रिपमध्ये इतर काही तुकड्यातल्या मुलींच्या हट्टामुळे हिम्मत और मेहनत नावाचा सुपरडुपर टुकार सिनेमा पाह्यला होता. आणि खूप खिदळलो होतो. त्या खिडळण्यात आमच्या आवडत्या शिक्षिका म्हणजे संगम बाईही सामील होत्या त्यामुळे आम्हाला भारीच कूल वाटले होते.  
कॉलेजमध्ये अश्या ट्रिपा नव्हत्या पण मग एनसीसी कॅम्प, जनता राजाचे दौरे वगैरे निमित्ताने भटकंती चालूच राह्यली.
आणि मग बॉटनीच्या कलेक्शन टूर्स. वरंधा घाटातली भर पावसातली एक दिवसाची आणि बंगलोर-म्हैसूर-उटी अशी 8-10 दिवसांची कलेक्शन टूर.  कलेक्शनचे दिवसातले काही थोडे तास सोडले तर ट्रिप असल्यासारखाच भरपूर दंगा करून घेतला होता.
यानंतर मात्र आयुष्यातला मजा म्हणून प्रवास संपल्यात जमा झाला. नाटकासाठी, शिक्षणासाठी, कामासाठी प्रवास भरपूर केले.  कामासाठी जात असल्याने एकाच जागी वारंवार जात राहणे, वेगवेगळ्या पैलूतून  ती ती जागा अनुभवणे, आत उतरवणे हेही झाले. 
सध्या थांबलेय सगळेच आणि ही प्रवासाची तहान अस्वस्थ करतेय.
- नी

0 comments:

Search This Blog