Showing posts with label पाककृती. Show all posts
Showing posts with label पाककृती. Show all posts

Saturday, July 3, 2021

पुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड


त्या दिवशी पास्त्याचा मूड होता. काहीतरी Summery लाईट पास्ता हवा होता. बेसिल खूप आवडते पण फ्रेश बेसिल गेल्यावर्षी लॉकडाऊनमधे मिळालं तेवढंच त्यानंतर अजून फ्रेश बेसिलचे दर्शन झाले नाहीये. (निर्जाबै, घरात बेसिल लावा!)
नेटवर शोधल्यावर ही एक सोप्पी पाकृ मिळाली त्यात मला आदल्याच दिवशी गृहकृत्यदक्षतेचा अटॅक येऊन गेल्याने घरात पुदिना चटणी तयार होती. मग काय हाच तो दिवस, हीच ती वेळ... हा पास्ता करायचाच असे ठरले. अर्थात नेटवर सापडलेल्या रेसिपीमध्ये थोडी भर घालून.
चटणी म्हणजे पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, आले, लसूण, लिंबू, मीठ हे सगळे घालून घुर्र करून घेतले इतकेच.
घरात fusili आणून ठेवलेला होता. तो पाण्यात मीठ घालून ते उकळून शिजायला घातला.
घरात एका टोमॅटोने एका बाजूला तोंड वाकडे केले होते. हल्ली पटापट खराब होतात टो. असो.. तर त्या वाकड्या बाजूला सदगती देऊन बाकी टो चिरून घेतला.
घरात एक काकडी होती ती सोलून त्याचे पातळ काप करून घेतले. चटणीत लसूण होतीच त्यामुळे लसणीच्या तीनच छोट्या पाकळ्या सोलून तुकडून घेतल्या.
लाईट ऑलिव्ह ऑइल वर लसूण परतली, त्यात वाळका भुगा रुपातले ओरेगानो आणि बेसिल भुरभुरले. सगळ्याच मिळून एक टिपिकल अरोमा असतो. तो आल्यावर पुदिन्याची चटणी ओतली पास्त्याच्या प्रमाणात. मग टोमॅटो घातला. पुदिन्याचा करकरीत कच्चा वास जाईपर्यंत हे परतलं. मग ड्रेन करून ठेवलेला पास्ता त्यात ओतला. एकेक फुसलीला सगळं मिश्रण लागेतो ढवळला. ड्रेन केलेले पाणी घातले दोन डाव सगळे मिळून येण्यासाठी. मग वरून काकडीचे काप घातले. त्यावर मिरपूड आणि मीठ घातले. एक ढवळा मारून मग नावाला थोडेसे (बोटभर. किंवा अमूलचा छोटा ब्लॉक असतो त्यातला पाव ब्लॉक) चीज किसून घातले. ते मिक्स होईतो एकदा ढवळा मारला आणि गॅस बंद केला. आणि पास्ता उतरून झाकून ठेवला.
भाकरीच्या लोखंडी तव्यात बटर गरम केले, बारीक क्रश केलेली लसूण परतली, ओरेगानो भुरभुर, आणि ब्रेडचे अर्धे अर्धे तुकडे करून या बटरवर भाजून घेतले. लोखंडी तव्यावर केल्याने बहुतेक मस्त खमंग झाले. गार्लिक ब्रेड तय्यार.
मग प्लेटिंग. प्लेटमध्ये घेतल्यावर वरून चमचाभर एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल गार्निश म्हणून घातले. ब्रेडवर जे चमकतय ते तेच आहे.
टेस्ट मस्त आलीये. बरोबर सॅलड मस्त वाटले असते पण वसई गावात लेटयूस मिळत नाहीये मला. त्यामुळे ते राह्यले. यात अजूनही काही summery गोष्टी घालता येतील.
चीज नको असेल तर नाही घातले तरी चालेल. पन नंतरचे EV ऑलिव्ह ऑइलचे गार्निश टाळू नका.
वि सू: काकडी चुकूनही टोमॅटोबरोबर घालू नका. शेवटीच घाला. Crunch नाही गेला पाहिजे.

Monday, February 26, 2018

फ्लॉवरची 'सा. खि.' भाजी

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
एक फ्लॉवर
एक छोटा बटाटा (ऑप्शनल आहे)
तूप (फोडणीसाठी) - २ छोटे चमचे किंवा फ्लॉवरच्या क्वांटिटिप्रमाणे
जिरे, हिरवी मिरची, मीठ, लिंबू
दाण्याचे कूट
किंचित साखर
कोथिंबीर
क्रमवार पाककृती: 
फ्लॉवर व्यवस्थित बघून मग बारीक चिरून, धुवून घेणे.
साखर, मीठ, लिंबू आणि दाण्याचे कूट याच वेळेला फ्लॉवरमधे मिक्स करायला हरकत नाही. 
बटाट्याच्या पातळ काचर्‍या करून घेणे.
कढईत तूप घेणे, वितळवणे
फोडणीत जिरे, तडतडल्यावर हिरवी मिरची घालणे
त्यात बटाट्याच्या काचर्‍या परतून किंचित वाफ.
काचर्‍या शिजल्या की बारीक चिरलेला फ्लॉवर (साखर, मीठ, दा कू आणि लिंबू मिश्रीत) कढईत घालणे. परतणे.
साखर, मीठ, दा कू आणि लिंबू हे आधी घातले नसल्यास आता घालणे.
मिक्स करणे, परतणे, फ्लॉवर शिजेपर्यंत एक वाफ काढणे... 
भाजी तय्यार!
वरून सढळ हाताने बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवणे
वाढणी/प्रमाण: 
साधारण २ माणसांसाठी दोन भाजी पोर्शन्स प्रत्येकी.
अधिक टिपा: 
ज्या मुलांना फ्लॉवरच्या नेहमीच्या भाजीचा वास आवडत नाही ती मुले ही भाजी मिटक्या मारत खातील.
डब्यात देण्यासाठी, पोळीभाजीचा रोल करून देण्यासाठी म्हणून एकदम उत्तम भाजी.
ही भाजी दह्याबरोबर अप्रतिम लागते.
पोळीबरोबरच खायची गरज नाही. नुसती प्लेटमधे साबुदाणा खिचडीसारखी घेऊन वरून घट्ट दह्याची कवडी आणि उपासाचे लिंबू लोणचे... अहाहा स्वर्ग!!
माहितीचा स्रोत: 
माझ्या आईची रेसिपी

Wednesday, September 14, 2016

लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea)

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फाचे तुकडे
कोकाकोला
लिंबू
पुदिन्याची पाने
उंच ग्लास
दारवा
५ व्हाइट दारवा
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)
क्रमवार पाककृती: 
उंच ग्लासाच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.
ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.
मग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.
पाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.
नवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.
दारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.
गार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.
ग्लासला लिंबाची चकती खोचायची.
आणि मग चांगभलं!! 
वाढणी/प्रमाण: 
असा एक ग्लास करायचा. :)
अधिक टिपा: 
आपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.
यानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.
माहितीचा स्रोत: 
माझ्या अ‍ॅSथेन्स, जॉSज्या च्या डाऊनटाऊनात द ग्लोब म्हणून बार होता(अजूनही असेल कदाचित!). आजवर चाखलेल्या लंब बेटावरच्या बर्फाळ चहांपैकी सर्वात उत्तम त्या ठिकाणी असायचा. तिथल्या रेसिपीला इंटरनेटवरच्या रेसिपीने गुणून ही रेसिपी झालेली आहे.

- नी

कैरी मार्गारिटा व कैरी आंबा मार्गारिटा

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ:  
तयारी + ५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फ
कैरीचा रस
पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस (ऑप्शनल)
मीठ
मिक्सर
दारवा
व्हाइट/ सिल्व्हर टकिला
कुठलीही ऑरेंज लिक्यॉर - ट्रिपल सेक(Triple Seq) किंवा कॉनत्रॉ/ कॉनत्रु/ कॉन्ट्रो(Cointreau)
क्रमवार पाककृती: 
लागणारा वेळ हा कैरीचा रस काढायला लागणारा वेळ न लक्षात घेता दिलेला आहे. कैरीचा रस ही पूर्वतयारी आहे. तो विकतचा असल्यास (असतो का हे माहित नाही) त्याचे प्रमाण चव घेऊन मग ठरवावे. शक्यतो स्वतःच करावा.

कैरीचा रस काढायची पद्धत -
कैरीची साले काढून तुकडे करायचे. ते तुकडे मिक्सरमधून अगदी गंधासारखे बारीक वाटण होईल एवढे फिरवायचे. यासाठी थोडे पाणी घालावेच लागेल. पण गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नये.
हे वाटण कापडातून गाळून घ्यावे. पटकन सगळे गाळले जाणार नाही तर सरळ कापडात पुरचुंडी करून चक्क्यासारखे टांगून खाली पातेले ठेवायचे. तास दीड तास ठेवून द्या आणि कंटाळा आला की शेवटी ती पुरचुंडी पिळून घ्या.
हा रस बाटलीत/ डब्यात भरून फ्रिजात (त्याच दिवशी बनवायची असेल तर) किंवा डिप फ्रिजात (दोन तीन दिवसांनी करायची असेल तर) ठेवून द्या.
आंबा फ्लेवरही आणायचा असेल तर आपल्या आवडीप्रमाणे हापूस/ पायरीच्या व्यवस्थित पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस करून ठेवावे. हे मात्र आयत्यावेळेलाच कारण पिकलेल्या आंब्याची चव कापून ठेवल्यावर उतरते हे आपल्याला माहित आहेच.
शक्य झाल्यास प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या तासभर आधी मार्गारिटाच्या ग्लासांच्या कडा कैरी रसाने किंचित ओल्या करून त्यावर मीठ लावून ते ग्लासेस फ्रीजमधे ठेवून द्यावे.
आता प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या वेळेस करायच्या गोष्टी
एरवी मार्गारिटामधे लिंबाचा रस असतो. इथे आपण कैरीचा रस हा लिंबाच्या रसाऐवजी वापरत आहोत. लिंबापेक्षा कैरीचा रस आंबट जास्त असतो त्यामुळे आपण काढलेल्या रसाची चव घेऊन मग पाणी घालून थोडा डायल्युट करावा. मात्र डायल्युट करून स्टोर करू नये. ते आयत्या वेळेलाच करावे.
टकिला (२ भाग) + ऑरेंज लिक्योर(१ भाग) + कैरीचा डायल्युटेड रस(दीड भाग) + बर्फ (१ भाग) असे मिक्सरात घालावे एकदा फिरवावे. बर्फाचा चुरा होणे गरजेचे. हेच हॅण्ड ब्लेण्डरनेही करता येऊ शकते.
मग फ्रिजातले फ्रॉस्ट केलेले ग्लासेस काढून त्यात हे मिश्रण ओतावे. एका ग्लासामधे एकूण साधारण ७५ मिली एवढे मिश्रण ओतावे.
बर्फाऐवजी बर्फचुरा तयार असेल तर तो १ भाग बर्फचुरा आधीच प्रत्येक ग्लासात भरावा. मग मिक्सरात/ ब्लेंडरमधे वेगळा बर्फ घालू नये.
असे गारेगार झालेले ग्लास लग्गेच लोकांना प्यायला द्यावे.
आंबा फ्लेवर मार्गारिटा -
वरच्या सगळ्या मिश्रणात अर्धा भाग एवढे आंब्याचे तुकडे/ रस घालावे. मिक्सरमधून फिरवताना तुकडे/ रस अगदी एकजीव व्हायची गरज नाही. पण पिताना मोठे मोठे तुकडे किंवा रसाच्या गुठळ्याही यायला नकोत मधे मधे एवढेच फिरवावे.
चीअर्स!!!
वाढणी/प्रमाण: 
अंदाजपंचे दाहोदरसे!
अधिक टिपा: 
ओरिजिनल मार्गारिटामधे टकिला : ऑरेंज लिक्योर : लिंबाचा रस : फ्लेवर याचे प्रमाण थोडे वेगळे असते. हे प्रमाण आपण आपल्या टॉलरन्स आणि चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. कैरी-आंबा मार्गारिटा साठी मी वर दिलेले प्रमाण माझ्यासाठी आणि माझ्या मित्रमंडळींच्यात आवडलेले आहे. तुम्ही प्रयोग करून टकिला वाढवू शकता 
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, विविध ठिकाणी घेतलेली मार्गारिटाची चव, प्रयोग

- नी

Sunday, December 27, 2015

दोदोल - गोवन किरिस्ताव स्वीट पण संपूर्ण शाकाहारी.

लागणारा वेळ: 
दीड ते दोन तास
लागणारे जिन्नस: 
kala-gool.jpg
२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर कुठे मिळत असल्यास माहित नाही. गोवन कॅथलिक मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना विचारावे. पण या गुळाशिवाय दोदोलची योग्य चव येणार नाही.
हा काळा गूळ/ माडाचा गूळ (सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता.  )
१ टेबलस्पून गव्हाचे पीठ
चिमूटभर वेलदोडा पूड
१०-१२ काजू अर्धे केलेले. आणि हवे असल्यास बदाम

क्रमवार पाककृती: 
१. काळा गूळ बारीक किसून घ्या
२. नारळाचे दूध, नाचणीचे पिठ, काळा गूळ एकत्र करा. गुठळ्या रहाणार नाहीत आणि गूळ पुरा विरघळेल असं बघा. मी हॅण्ड ब्लेण्डरने मिक्स केलं.
३. ज्या पॅनमध/ ट्रेमधे किंवा कपांमधे दोदोल सेट करणार त्याला आधीच तुपाचा/ खो तेलाचा हात लावून घ्या.
४. जाड बुडाच्या पॅनमधे तूप/ खो तेल घाला. तापायला आले की त्यात काजू, बदाम वगैरे टाका. खरपूस परतून घ्या. गॅस कमी करा. मंद आचेवर ठेवा.
४. ना दूध, गूळ आणि ना पिठ असं मिश्रण या पॅनमधे सोडा. एका हाताने ढवळत रहा. आता गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत रहावे लागेल.
५. थोडा घट्टपणा येऊ लागला की वेलची पूड भुरभुरा. ढवळत रहा. मग १ टेबलस्पून गव्हाचे पीठ पण भुरभुरा. ढवळत रहा.
६. मिश्रण घट्ट होऊ लागले, कडा सोडू लागले आणि साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा.
७. पॅन/ ट्रे किंवा कप्समधे ओता. अर्धा तास गार व्हायला आणि सेट व्हायला द्या.
८. सेट झाले की काढा. वरून काजूने डेकोरेट करा. खा. गरम किंवा गार दोन्ही उत्तम लागते.

हे तयार झालेलं दोदोल.
वाढणी/प्रमाण: 
साधारण ७-८ कपकेक्सचे मोल्डस भरतील
अधिक टिपा: 
वड्या काढल्याप्रमाणे ट्रेमधे ओतून मग कापून याच्या वड्या पाडता येतील. किंवा छोटे छोटे कप्स भरता येतील.
वड्या म्हणलं तरी या कडक वड्या होत नाहीत. तश्या दुलदुलितच रहातात. म्हणूनच म्हणे त्याचं नाव दोदोल आहे असं एका गोव्यातल्या मैत्रिणीने सांगितलं होतं.
गोव्याला एवढ्यात कोणी जाणार असेल तर माझ्यासाठी म्हापश्याच्या स्टॅण्डजवळच्या मार्केटातून प्लीज प्लीज हा गूळ घेऊन या.

Search This Blog