Showing posts with label गंमतजंमत. Show all posts
Showing posts with label गंमतजंमत. Show all posts

Thursday, February 21, 2019

मेकप मेकप मेकप!

एकेकाळी म्हणजे इसपू वगैरे काळातच साधारण लोकांचे मेकअप करायचे मी. ब्रायडल, नाचाचे, शाळेच्या गॅदरींग्जचे वगैरे.
ब्रायडल करताना 30 रंगाच्या मुलीला 23 रंगाची करा, साडीला मॅचिंग मोरचुदी रंगाचीच शॅडो लावा, मेकपला पैसे घेता आणि गालावरचा गुलाबी रंग इतक्या कंजूषपणे काय वापरता?, असे बरेच आग्रह नवरीमुलगी आणि इतर जानोश्याचे असायचे. अहो नवरी गोड, सुंदर वगैरे दिसायला हवीये मेकपकी दुकान नाही हे समजवताना मी हैराण परेशान होऊन जायचे. त्यात मुलीच्या सासरच्यापैकी कुणी ब्युटीशीयन असली किंवा साधे थ्रेडिंग शिकत असली तरी ती आत येऊन उगाचच सासरचा तडका देऊन जाणार आणि नसलेली अक्कल पाजळणार. सासरघरची त्यामुळे तिची अक्कल भारी असाच अभिनय करायला लागणार वगैरे धमाल व्हायची. गोरी नाही दिसत असं म्हणत एका नवऱ्यामुलीच्या सासूने मेकअप टेबलावरची पावडर घेऊन केलेल्या मेकअपवरून बचाबचा चोपडून खारा दाणा करून टाकले होते. नवऱ्यामुलीचे अश्रू आणि लिंपलेली पावडर पुसून परत चेहरा होता तसा सुंदर करण्यात रिसेप्शनला स्टेजवर जायला अर्धा तास उशीर झाला होता. लग्न लागल्यानंतर काही तासातच लग्न केल्याचा पश्चात्ताप नवऱ्यामुलीला होउ लागला होता.
नाचाच्या मेकपांची अजून वेगळी तऱ्हा. एखाद्या नाचाच्या क्लासने त्यांच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलेलं असायचं. अरंगेत्रम किंवा गुरुपौर्णिमा वगैरे. भारतीय शास्त्रीय नृत्य. ठराविक प्रकारे डोळ्यांचा मेकअप ही त्या मेकअपची खासियत. मुळात पुरातन काळी जेव्हा हे नृत्य सादर होत असे तेव्हा उपलब्ध असलेली प्रकाशयोजना म्हणजे मशाली तत्सम. तर त्यांच्या उजेडात डोळ्यांच्या मुद्रा व्यवस्थित दिसाव्यात यासाठी खरंतर भरदार डोळे रेखनाचे प्रयोजन होते. मग नंतर विशिष्ट प्रकारे आयलायनिंग करणे हा नृत्यशैलीच्या आहार्य अभिनयाचा भाग बनला. आता आपल्याकडे भरपूर प्रकाश असतो स्टेजवर तर हे डोळे रेखन सौंदर्य वर्धन आणि शैलीचा भाग म्हणूनच आणि तितपतच यायला हवे. हे सगळे मला माझ्या गुरूने शिकवले होते. पण अनेक क्लासच्या गुरूंना त्यांच्या गुरूने शिकवले नसावे.
‘गर्दभी अप्सरायते’ वयातल्या गोड मुली, तलम त्वचा वगैरे असताना नको ते मेकअपचे थर असं व्हायचं. पण कार्यक्रमाचा अवधी, नाचून येणारा घाम वगैरे सगळ्यामुळे बराच वेळ टीकेल असा मेकअप करणे ही गरज असे. तसेच शैलीदार डोळे, ओठ रेखणे ही ही. पण किमान दोन मिलीमीटर रुंदीचे आयलायनिंग केले नाही तर आयत्यावेळेला नाच विसरणार असा काही शाप असावा. त्यामुळे क्लासच्या ताईंच्या गुरू मी केलेल्या मेकपवर आपल्या प्रकारे डोळे रेखत. दोन मिलीमीटर जाडीची रेषा, तीही थरथरती आणि गाल कुणी मारल्यासारखे आरक्त. सुंदर मुलीचे आरक्त घुबडात रूपांतर झालेले असे. माझा वैताग होई. आधीच स्टेज परफॉर्मन्सचं टेन्शन, त्यात हा वाढीव बटबटीत मेकअप तोही साक्षात गुरूंच्या गुरूने केलेला त्यामुळे गोंधळलेल्या मुली समोर असत. आरश्यातला स्वतःचा घुबड चेहरा बघून क्वचित डोळ्यात पाणी आलेले असे. यांच्यासमोर मी काय वैतागणार?
शाळेच्या गॅदरींग्जचे वेगळे नियम. सर्व मुलांना गालांवर गुलाबी टिळे आणि चट्टक लाल लिष्टीक (शाळेत असेच म्हणतात!) लावली नाही तर मेकअपवाल्यांना पैसे देत नाहीत. मग मुले ‘आज गोकुळात’ वर नाचणार असोत की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे बनून भिंत हलवणार असोत की कोवळा शिवबा आणि मावळे बनून रोहिडेश्वराची शपथ घेणार असोत गालावर गुलाब फुललेले आणि डाळिंबाचं दानं व्हटावरी चुरडलं असायलाच हवं. अशी समस्त शिक्षक आणि पालकांची धारणा. चुकून अशी धारणा नसली तर आम्ही कौतुकाने ज्ञानेश्वर, राधा, शिवबा, टिळक वगैरे रंगवत जायचो. अचानक राधाबालेच्या माऊलीला गालावरच्या गुलाबांची हौस यायची. मग ती आमच्या मेकपवर गुलाब फुलवायची. तिच्या गालावरचे गुलाब बघून टिळकांना आपल्याशी मेकपमध्ये पार्श्यालिटी झालीये असे वाटून रडू येऊ लागायचे. ते रडू थांबवायचे तर टिळकांचेही गाल गुलाबी. मग लागण कंटिन्यू टू ज्ञानेश्वर, शिवबा, मावळे, नाटकातले आजोबा इत्यादी. मेकअपवाले हताश!
आता काम बदललं. पण या दर्जाचा हताशपणा अजूनही अनुभवायला मिळतोच. त्याबद्दल पुढे केव्हातरी.
तळटिप: भरतनाट्यम या कलेविषयी मला अपार प्रेम आहे आणि सर्व गुरूंविषयी आदरही आहे. मात्र त्यातल्या काही गुरूंची मेकप वगैरे बाबतीतली समज थोडी अविश्वासार्ह आहे इतकेच.
- नी 

Thursday, November 3, 2016

दिवाळी दिवाळी दिवाळी!

दिवाळीच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी दिवाळी अंक हा एकमेव प्रकार मला हल्ली आपलासा वाटतो.  अनेक नवेजुने लेखक आपापले सुंदर लिखाण खास दिवाळी अंकांसाठी राखून ठेवतात. त्यामुळे वाचणार्‍याला मेजवानीच असते. 
हल्ली जरा आमचे येथे लिहिण्याचे परत मनावर घेतलेले असल्याने त्या मेजवानीतला इलुसा वाटा माझ्याकडूनही आहे. 
यावर्षी दोन दिवाळी अंकांमधे माझे लिखाण आहे. दोन्ही अंक आंतरजालावर आहेत त्यामुळे सर्वांना सहज वाचता येतील असे  आहेत. 

- लेडिजबायकांसाठी आणलेली भिकार पोर्ट वाइन हातात घेऊन संहिता अमाप कंटाळून बसली होती. पोर्ट वाइनचा ग्लास तिच्या हातात खुपसला गेला तेव्हापासून तिला कंटाळा आला होता. आपण हिच्यासाठी वेगळी बायकांची दारू आणलीये त्यामुळे आपण होस्ट म्हणून एकदम ढिंग्च्यॅक्क आहोत अशा खुशीत राजोपाध्येने पाऊच फोडून तिचा ग्लास भरून दिला होता. - 


२. ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट - शीर्षकात गोष्ट असे असले तरी हा एक लेख आहे. डिजिटल दिवाळी या दिवाळी अंकात. 
- पहिल्यांदा हॉटेलमधे जाऊन पास्ता खाल्ल्यावर त्यातल्या चीजने घशात कसेतरी झाले होते. नंतर बरेच दिवस कुठलीही वस्तू ऑर्डर करताना ठकू चीज नको म्हणूनच सांगे. ९८ साली सदाशिव पेठेतून उठून अमेरिकेत गेल्यामुळे ठकूला अभारतीय पदार्थांची फारशी ओळख नव्हती. जिभेला चीज हे प्रकरण फारसे माहिती नव्हते. डोमिनोजचा पि्झ्झा पुण्यात तेव्हा मिळायला लागला होता, पण ते सगळं पुलाच्या पलीकडे. पुलाच्या अलीकडच्या सर्वसाधारण जिभांना त्या चवी तेव्हा फार माहिती नव्हत्या. -  

वाचा, कमेंटा, कळवा, नाचा..  मजा करा!

- नी

Wednesday, October 28, 2015

तुम्ही काय करता?

"मी गोग्गोड वनिता समाज इथून बोलतेय. नटमोगरी मेकपकर यांनी नंबर दिलाय तुमचा."
मेकपकर बाईंचं नाव ऐकून मी जरा सावध झाले. नेहमीप्रमाणेच कसलीतरी प्रचंड धावपळ चालू होती. डोक्यात पुढच्या चार पाच दिवसांच्या कामांची यादी फिरत होती. त्यात मेकपकर बाईंच्या रेफरन्सने फोन.

"आम्ही ना खूप छान कामे करतो. मेकपकर बाई तर आमच्या अगदी नेहमीच्या आहेत."
मी अजूनच धास्तावले.
"२४ तारखेला आमच्या मंडळाचा कार्यक्रम आहे. तिथे आम्ही मंगळागौरीचे पारंपारिक खेळ आधुनिक गाण्यांवर करून दाखवणार आहोत. आम्ही सगळ्या नऊवारी नेसणार आहोत. आम्ही एकूण १५ जणी आहोत. तर तुम्ही येऊ शकाल का?"
"मी? कशासाठी यायचंय मी?"
"तुम्हाला नऊवारी साडी नेसवता येते ना?"
"हो येते."
"तर आम्हाला साड्या नेसवायला या तुम्ही. तुमचा रिक्षाचा खर्च देऊ आम्ही. पत्ता लिहून घेता का?"
"मला नऊवारी साडी नेसवता येते पण ते काही माझं काम नाहीये. मी कॉश्च्युम डिझायनर आहे."
"पण मेकपकर बाईंनी तर सांगितले की तुम्ही साड्या नेसायला शिकवता."
"हो शिकवते. पण ते नाटकाचे विद्यार्थी असतात. त्यांना कॉश्च्युम डिझायनिंग हा विषय असतो अभ्यासाला. तो संपूर्ण विषय मी शिकवते. त्या विषयाच्या अंतर्गत हा एक टॉपिक असतो. तो ही मी शिकवते. साड्या नेसवायला जाणे हे माझे काम नाहीये."
"पण येतं ना तुम्हाला?"
"अहो तुमच्या लक्षात येतंय का? मी कॉश्च्युम डिझायनर आहे. शूटसवर माझ्या हाताखाली कपडे नेसवायला माणसं असतात. ते त्यांचं काम असतं. मला येतं म्हणजे तो माझा व्यवसाय नाहीये."
"पण आम्ही रिक्षाचा खर्च देऊ ना."
"कुठून? विलेपार्ल्यापासून?"
"तुम्ही अमुक पेठेत राहता हे सांगितलंय मेकपकर बाईंनी आम्हाला."
"रहायचे. आता मी मुंबईत राहते."
"पण नाहीच का जमणार? मेकपकर बाईंनी आम्हाला एवढं सांगितलं होतं."
"मेकपकर बाईंना सांगा आधी कॉश्च्युम डिझायनर म्हणजे काय ते समजून घ्या." (निघाल्या प्रमुख व्हायला..!)
"आमचा अगदीच प्रॉब्लेम होणारे हो."
"मी काय करू? तुमचा प्रश्न आहे तो."

मी वैतागून फोन बंद केला. मेकपकर बाई तीनहजार सातशे त्रेपन्नाव्या वेळेला डोक्यात गेल्या.
----------------------------------
तळटिप: या किश्श्यातील व्यक्तींचे कुणा खर्‍याखुर्‍या व्यक्तींशी साम्य आढळल्यास योगायोग समजू नये
--------------------------------

- नी

Search This Blog