Saturday, July 3, 2021

पुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड


त्या दिवशी पास्त्याचा मूड होता. काहीतरी Summery लाईट पास्ता हवा होता. बेसिल खूप आवडते पण फ्रेश बेसिल गेल्यावर्षी लॉकडाऊनमधे मिळालं तेवढंच त्यानंतर अजून फ्रेश बेसिलचे दर्शन झाले नाहीये. (निर्जाबै, घरात बेसिल लावा!)
नेटवर शोधल्यावर ही एक सोप्पी पाकृ मिळाली त्यात मला आदल्याच दिवशी गृहकृत्यदक्षतेचा अटॅक येऊन गेल्याने घरात पुदिना चटणी तयार होती. मग काय हाच तो दिवस, हीच ती वेळ... हा पास्ता करायचाच असे ठरले. अर्थात नेटवर सापडलेल्या रेसिपीमध्ये थोडी भर घालून.
चटणी म्हणजे पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, आले, लसूण, लिंबू, मीठ हे सगळे घालून घुर्र करून घेतले इतकेच.
घरात fusili आणून ठेवलेला होता. तो पाण्यात मीठ घालून ते उकळून शिजायला घातला.
घरात एका टोमॅटोने एका बाजूला तोंड वाकडे केले होते. हल्ली पटापट खराब होतात टो. असो.. तर त्या वाकड्या बाजूला सदगती देऊन बाकी टो चिरून घेतला.
घरात एक काकडी होती ती सोलून त्याचे पातळ काप करून घेतले. चटणीत लसूण होतीच त्यामुळे लसणीच्या तीनच छोट्या पाकळ्या सोलून तुकडून घेतल्या.
लाईट ऑलिव्ह ऑइल वर लसूण परतली, त्यात वाळका भुगा रुपातले ओरेगानो आणि बेसिल भुरभुरले. सगळ्याच मिळून एक टिपिकल अरोमा असतो. तो आल्यावर पुदिन्याची चटणी ओतली पास्त्याच्या प्रमाणात. मग टोमॅटो घातला. पुदिन्याचा करकरीत कच्चा वास जाईपर्यंत हे परतलं. मग ड्रेन करून ठेवलेला पास्ता त्यात ओतला. एकेक फुसलीला सगळं मिश्रण लागेतो ढवळला. ड्रेन केलेले पाणी घातले दोन डाव सगळे मिळून येण्यासाठी. मग वरून काकडीचे काप घातले. त्यावर मिरपूड आणि मीठ घातले. एक ढवळा मारून मग नावाला थोडेसे (बोटभर. किंवा अमूलचा छोटा ब्लॉक असतो त्यातला पाव ब्लॉक) चीज किसून घातले. ते मिक्स होईतो एकदा ढवळा मारला आणि गॅस बंद केला. आणि पास्ता उतरून झाकून ठेवला.
भाकरीच्या लोखंडी तव्यात बटर गरम केले, बारीक क्रश केलेली लसूण परतली, ओरेगानो भुरभुर, आणि ब्रेडचे अर्धे अर्धे तुकडे करून या बटरवर भाजून घेतले. लोखंडी तव्यावर केल्याने बहुतेक मस्त खमंग झाले. गार्लिक ब्रेड तय्यार.
मग प्लेटिंग. प्लेटमध्ये घेतल्यावर वरून चमचाभर एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल गार्निश म्हणून घातले. ब्रेडवर जे चमकतय ते तेच आहे.
टेस्ट मस्त आलीये. बरोबर सॅलड मस्त वाटले असते पण वसई गावात लेटयूस मिळत नाहीये मला. त्यामुळे ते राह्यले. यात अजूनही काही summery गोष्टी घालता येतील.
चीज नको असेल तर नाही घातले तरी चालेल. पन नंतरचे EV ऑलिव्ह ऑइलचे गार्निश टाळू नका.
वि सू: काकडी चुकूनही टोमॅटोबरोबर घालू नका. शेवटीच घाला. Crunch नाही गेला पाहिजे.

Tuesday, March 30, 2021

कपडे, माणूसपण इत्यादी

"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?"  कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे. 

ह्याच प्रश्नाला संस्कृतीची फोडणी घालून नुकतेच उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांनी असेच एक विधान केले. फाडलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे गुडघे आणि त्यामुळे कातरून गेलेली आपली थोर संस्कृती अश्या एकमेकांशी संबंध नसलेले मुद्दे त्या विधानात होते. गुडघे उघडे ठेवणे हे  पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि अंग झाकण्याची आपली संस्कृती असेही त्यांचे म्हणणे होते. मुळात अंग झाकण्याचा अवास्तव सोस हे प्रकरणच आपल्या अनुकरणप्रियतेचे निदर्शक आहे. दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडातला हा पाश्चिमात्यांचा सोस सरळ सरळ उचलून आपली संस्कृती म्हणून खपवतो आहोत हे मुख्यमंत्री महोदय सोयीस्कररीत्या विसरून गेलेले आहेत. 

‘फाडलेल्या जीन्स मधून संस्कृती कातरून पडते’ हे एकच विधान नाही. या वाटेवरची विधाने सतत चालू आहेत. आणि ती सभ्यता किंवा सभ्यतेचे मापक  म्हणून खपून जातायत. माणसांची प्रतवारी केली जातेय त्यावरून. अमुक प्रकारचे कपडे ही आपली संस्कृती नाही असे कुणी ना कुणीतरी रोज अतिशय अपमानास्पदरित्या सांगत राहतेच.  कुणाला राहीबाई पोफळेंच्या कार्यापेक्षा त्यांनी पुरस्कार स्वीकारताना डोक्यावर पदर घेणे याचेच फक्त कौतुक वाटते. कुणाला मंगलयानाच्या बातमीतल्या फोटोत सर्व वैज्ञानिक स्त्रिया त्या वैज्ञानिक आहेत याच्यापेक्षा त्या साडी, मंगळसूत्र, कुंकू वगैरे पेहरावात आहेत हे बघून भरून येते. 

पण हे बरेचसे स्त्रियांसाठी असते. केवळ स्त्रियांच्यावर असलेली धार्मिक वा सामाजिक ड्रेसकोडची सक्ती ही वरकरणी स्त्रियांची सुरक्षितता वगैरेसाठी असते असे म्हणले जाते. आणि स्त्रीच्या  शरीराच्या झाकलेल्या क्षेत्रफळानुसार स्त्रीचे वर्गीकरण केले जाते. याच्या मुळाशी स्त्रीचे वस्तूकरण किंवा मालमत्ताकरण हे पितृसत्ताक मूल्यच आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच ठराविक चौकटीच्या बाहेरचे काही जामानिम्यात असेल तर त्या व्यक्तीला असभ्यतेचे लेबल लावले जाणे हे बालिश आणि अमानुष आहे. हे ही विसरून चालणार नाही. 

हे का आणि कसे झाले? शरीरावर ल्यायच्या गोष्टी या निव्वळ उपयुक्तता किंवा शरीर सजवणे या उद्देशांच्या पलीकडे जाऊन माणूसपणापेक्षा मोठ्या कधी झाल्या? अंगावर  परिधान करायच्या वस्तूंमध्ये वैविध्य येत गेले तसे माणसांचेही कप्पे पडत गेले. कपडे ही दृश्य संवादाची भाषा होत गेली. परिधान केलेली प्रत्येक गोष्ट एखादे चिन्हस्वरूप वापरली वा बघितली जाऊ लागली. सगळ्या जाम्यानिम्यावरून व्यक्तीबद्दल मत तयार केले जाऊ लागले. 

आणि मग हीच प्रक्रिया वळवून ठराविक ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल काय मत व्हायला हवे हे ठरवत म्हणजेच "हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" या प्रश्नाच्या भोवती फेऱ्या मारत मारतच कपडे व इतर परिधानाच्या गोष्टींचे संकेत बनवले गेले. या प्रश्नाला समाजाच्या वेगवेगळ्या उतरंडीचे असंख्य कंगोरे, पैलू, पापुद्रे सुटून मग हळूहळू त्या संकेतांचे नियम बनले. 

वेगवेगळे मुद्दे धरून हे नियम घडवलेले असतात, घडत असतात. बदलतही असतात. नियम आहेत म्हणजे ते पाळलेच पाहिजेत अशी अपेक्षा असते. पाळले न गेल्यास त्याचे परिणामही भोगावे लागणारच अशी धारणा होणे साहजिक आहे.  पण हे इतकं साधं, सोपं, सरळ, एकरेषीय नसतं. 

ड्रेसकोडमध्ये कपडे कसे असावेत याचे नुसते सूचन केलेले असते. ते सभ्य असावेत किंवा तत्सम असे नुसते संकेत असतात. अश्यावेळी अनेक अर्थ संभवतात आणि संघर्ष होतो. अशीच एक घटना याच आठवड्यात घडली. गुजरात विधानसभेत जीन्स व टीशर्ट घालून आल्याबद्दल आमदार विमल चुडासामा यांना बाहेर काढले गेले. वास्तविक पाहता विधानसभेचा काहीही लिखित ड्रेसकोड नाही. ‘मला याच कपड्यात बघून मतदारांनी निवडून दिले त्यामुळे मी त्याच कपड्यात असणे योग्य आहे.’ असा युक्तिवाद चुडासामा यांनी केला. तो मान्य  झाला नाही. 

जगभरात विविध देशांच्या संसदेत गेल्या काही वर्षांमध्ये एक राजकीय विधान म्हणून किंवा निषेध म्हणून पाश्चिमात्य किंवा मूळ युरोपियन असलेल्या ड्रेसकोडला आव्हान दिले जाते आहे. भारतीय राजकीय पोशाखांच्या संदर्भात बघायचे तर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १९३१ साली इंग्लंडच्या राजाला भेटायला जाताना सभ्यतेच्या सर्व कल्पनांना धुडकावून लावून गांधीजी खादीचे धोतर आणि शाल लेवून गेले होते. सभ्यतेच्या कल्पना आणि वावर याबाबत काटेकोर असणाऱ्या इंग्रजांच्या जगात यावरून गदारोळ उठला नसता तरच नवल. गांधीजींनी अतिशय हुशारीने केलेले हे राजकीय विधान होते. जाडेभरडे, अर्धे कपडे घालणाऱ्या जनतेने तश्याच प्रकारचे कपडे घालून इंग्लंडच्या राजाला भेटायला गेलेल्या माणसाला आपला, आपल्यातला आणि म्हणून आपला नेता मानणे हे साहजिकच. खादीच्या चळवळीच्या परिणामस्वरूप स्वातंत्र्यानंतर कैक वर्षे भारतीय राजकीय पोशाख खादीचे भारतीय वळणाचे कपडे असाच राह्यला. हे भारतीयत्व मानलं गेलं होतं. विविधतेत एकता या तत्त्वाचे हे थोडे भाबडे स्वरूप म्हणता येईल.  उदारीकरणानंतर आणि मग नवीन शतकात राजकारणात आलेल्यांना खादीचे ऐतिहासिक महत्व माहिती असले तरी ते स्वतःच्या जगण्याचा भाग म्हणून बघता येणे अशक्य होते. ते ज्यांचे नेते म्हणून आले त्यांनाही त्यांच्यासारखाच वाटणारा जीन्स टीशर्टवाला नेता आपला वाटणे हे ओघानेच आले. 

जगभरात कुठेही जीन्स व टीशर्ट या गोष्टींना फॉर्मल म्हणून मान्यता नाही हे खरे असले तरी फॉर्मल या गोष्टीच्या व्याख्या धूसर नक्की होतायत. त्यामुळे अश्या मान्यतांचा बाऊ आपण न करणे हेच योग्य ठरेल. 

पण यामुळे  कपड्यांवरून माणसाचा अंदाज बांधणे थांबणार नाही. शेवटी कपडे हे दृश्य संवादाचे एक साधन आहे. कपड्यांना बघून समोरच्या माणसाबद्दल आडाखे बांधणे ही मानवी प्रवृत्ती आहे. आजवर बघितलेल्या माणसांच्यावर आधारित हे आडाखे बांधणे प्रत्येकाच्या नकळत होतच असते. होतच राहणार. पण या सगळ्यापेक्षा माणूस आणि माणूसपण मोठं आहे, असायला हवं ही जाणीव मात्र पक्की ठेवायला हवी.

- नी

---------

हा लेख दैनिक लोकमतमध्ये २३ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता. ही त्याची लिंक

कोणी, कसे कपडे घालावे, हे कोण ठरवणार?

Monday, March 1, 2021

प्रवास

मराठी शाळेत असल्यामुळे आमच्या शाळेच्या सहली असत. एका दिवसाच्या सहली. कुठेतरी जाऊन काहीतरी बघायचं. दिलेले सगळे डबे संपवायचे हा मुख्य कार्यक्रम असे. डब्याचा मेन्यू दरवर्षी ठरलेला होता. सकाळी खायला (नाश्ता आणि ब्रेकफास्ट हे शब्द तेव्हा रुळले नव्हते आमच्या जगात) चटणी आणि जाम सँडविचेस असायची. अश्विनी आणि माझी एकत्र असायची सँडविचेस. तिच्याकडे सगळी जॅमची आणि माझी सगळी चटणीची किंवा उलट. खायच्या वेळेला अर्ध्यांची अदलाबदल करायची असे दोघींच्या आयांनी मिळून ठरवलेले असायचे. त्यामुळे बिचारी स्कॉलर ग्रुपमधली अश्विनी बसमध्ये माझ्याबरोबर  बसायची. दुपारच्या जेवणाच्या डब्याचे मुख्य आकर्षण होते रसाच्या पोळ्या. त्या केवळ प्रवासासाठीच करायच्या असा कुणीतरी नियम घातला होता बहुतेक. त्या लुसलुशीत आणि गोडसर अश्या रसाच्या पोळ्या सहली संपल्या तश्या आयुष्यातूनही संपल्या. त्या रसाच्या पोळ्यांबरोबर जर चमचमीत अशी कांदाबटाटा काचऱ्याभाजी आणि केळं, बेदाणे घातलेला गोडच शिरा असा भरभक्कम डबा असायचा. संध्याकाळचे स्नॅक म्हणून चिवडा-लाडू-गोळ्या वगैरे दिलेले असेच. 
या खादाडीच्या दरम्यान अधेमधे खेळायचं, घसा फाटेस्तो गाणी म्हणायची. हुजूरपागेचा जयजयकार वगैरे आरोळ्या ठोकायच्या आणि संध्याकाळी घरी  यायचं. हा शाळेच्या सहलीचा कार्यक्रम. मोठे होत गेलो तसे यात खरेदी नावाच्या कार्यक्रमाची भर पडली. तिसरीतल्या लोणावळा खंडाळा सहलीला आयुष्यात पहिल्यांदाच दोनपाच रुपये हातात मिळालेले होते त्यामुळे आम्ही चिक्कीच्या दुकानात घसघशीत खरेदी केली होती लोणावळ्यात.   
चौथीत असताना मुंबईला राहायची सहल होती शाळेची. पहाटे सिंहगड पकडायला मला आणि अश्विनीला बाबांनी स्कूटरवरून सोडले होते. अश्विनीची की माझी चप्पल गाडीत चढताना रुळावर पडली आणि ती बाबांनी बाहेर काढली होती. आम्ही किंग जॉर्ज शाळेत राह्यलो होतो. तिथे त्या दिवशी एक लग्नही होते. तारापोरवाला मध्ये मासे बघितले होते. दुसऱ्यादिवशी सिंहगडनेच परत आलो होतो. घरी येताना अश्विनीच्या बाबांबरोबर आम्ही टांग्यातून घरी आलो होतो. इतकेच आठवते.  आईचा सगळाच गोतावळा मुंबईत असल्याने लहानपणापासून पुणे-मुंबई कितीतरी वेळेला केले पण टक्क लक्षात राह्यलेल्या थोडक्या वेळांपैकी हीच एक. 
रँ. र. पु. परांजपे प्राथमिक मधून हि. हा. चिं. प. हायस्कुलात आल्यावर या सहली अश्याच चालू होत्या पण त्या लक्षात नाहीत फारश्या. मग अजून मोठे झाल्यावर शाळेच्या सहली दोन किंवा तीन दिवसांच्या व्हायला लागल्या. तेव्हा मात्र त्यांचे नाव शाळेची ट्रिप असे झाले. एक दिवसाची सहल, अनेक दिवसांची ट्रिप. त्या पक्क्या लक्षात आहेत.
काळे ट्रॅव्हलसकडे त्या ट्रिप्सची व्यवस्था असायची. ट्रिपच्या आधीच शाळेत येऊन काळे काका आपल्या गडगडाटी हास्यासहित सगळ्या सूचना देऊन गेलेले असायचे.  तुकड्यांप्रमाणे बसेस आणि राहायची व्यवस्था असायची. तेव्हा तुकड्या तुकड्यांच्यातली खुन्नस; विशेषतः अ आणि ब तुकडीतली; जबरदस्त असायची. केवळ मुलींची शाळा असल्याने त्याचे पर्यावसान गंभीर मारामारीत वगैरे व्हायचे नाही. पण उगाचच नाक उडवून दाखवणे असायचे. ते ट्रिपमध्येही असायचे. 
शाळेच्या गणवेषाला 2/3/4 दिवस सुट्टी आणि दिवसभर फिरून आल्यावर रात्री सिनेमे बघून झोपी जाणे हे हायलाईटस असायचे या ट्रिप्सचे. व्हीसीआर-टीव्ही वगैरे मागवून सगळ्या मुलींना विचारून सिनेमे ठरवले जायचे. नगिना बघितला होता एका ट्रिपमध्ये. आणि घरी येऊन आईला साभिनय(स-नृत्य to be precise) स्टोरी सांगितली होती.  हैदराबादच्या ट्रिपमध्ये इतर काही तुकड्यातल्या मुलींच्या हट्टामुळे हिम्मत और मेहनत नावाचा सुपरडुपर टुकार सिनेमा पाह्यला होता. आणि खूप खिदळलो होतो. त्या खिडळण्यात आमच्या आवडत्या शिक्षिका म्हणजे संगम बाईही सामील होत्या त्यामुळे आम्हाला भारीच कूल वाटले होते.  
कॉलेजमध्ये अश्या ट्रिपा नव्हत्या पण मग एनसीसी कॅम्प, जनता राजाचे दौरे वगैरे निमित्ताने भटकंती चालूच राह्यली.
आणि मग बॉटनीच्या कलेक्शन टूर्स. वरंधा घाटातली भर पावसातली एक दिवसाची आणि बंगलोर-म्हैसूर-उटी अशी 8-10 दिवसांची कलेक्शन टूर.  कलेक्शनचे दिवसातले काही थोडे तास सोडले तर ट्रिप असल्यासारखाच भरपूर दंगा करून घेतला होता.
यानंतर मात्र आयुष्यातला मजा म्हणून प्रवास संपल्यात जमा झाला. नाटकासाठी, शिक्षणासाठी, कामासाठी प्रवास भरपूर केले.  कामासाठी जात असल्याने एकाच जागी वारंवार जात राहणे, वेगवेगळ्या पैलूतून  ती ती जागा अनुभवणे, आत उतरवणे हेही झाले. 
सध्या थांबलेय सगळेच आणि ही प्रवासाची तहान अस्वस्थ करतेय.
- नी

मराठी भाषा दिन

भ्रमणध्वनीवरून चेहरेपुस्तकावर मराठीत टपाल लिहून आजचा मराठी भाषा दिनाचा सोहळा करायचा आहे. त्यानिमित्ताने काही मराठी वाक्ये.  अश्या स्वरूपाच्या वाक्यांचा आपल्या वाचेत विनियोग केला की मराठीचे सुवर्णयुग साकारलेच म्हणून समजा. 
१. स्वयंचलित दुचाकी लत्ताप्रहाराने कार्यान्वित करण्याऐवजी हातदंडावर असलेली कळ दाबून कार्यान्वित करण्याचे नवीन तंत्रज्ञान आताशा उपयोजिले जाते.
२. पद्धत जामानिम्यात अलंकारांबरोबरच शिरोवस्त्रे व शिरोभूषणे, पट्टे, कालगणक डबी,  चक्षुसुख भिंगे, झोळ्या, बटवे आणि पादत्राणे यांचा समावेश असतो. 
3. कलाकुसरसामान विकणाऱ्या दुकानात  विनाआम्ल कागद, पाणीरंग, कृत्रिमरंग, तेलरंग, कडककापडफलक, कुंचले, झरलेखण्या, शिसलेखण्या, चिकटघोळ, चिकटपट्ट्या, चिकट्याची बंदूक, मणी, दोरे, सुया, लोकर,  उष्णतावरोधक सफेद व रंगीत पुठ्ठे आणि इतर अनेक वस्तू मिळतात. 

तसेच वस्तूंना व कृतींना मराठी प्रतिशब्द मिळेपर्यंत त्यांना विचारात अथवा विनियोगात घ्यायचे नाही अशी आज या मराठी भाषा दिनी आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. 

- नी

#प्रतिशब्द_आतंकवाद #मराठीभाषादिन_नव्हे_दीन #प्रतिशब्दसंस्कृतप्रचुरचहवा

 गरजूंसाठी(असे लोक आहेत) सूचना: प्रत्येक शब्दाला ओढूनताणून मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या वा तयार करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या मराठीवाचव्या जनांच्या फुकाच्या अट्टाहासासंदर्भाने उपहासात्मक विनोद म्हणून ही पोस्ट लिहिलेली आहे. 
मराठीच्या आग्रहाबद्दल माझे तारतम्य शाबूत आहे. त्याबद्दल शंका घेऊ नये आणि मला लेक्चर मारू नये. धन्यवाद!

वास

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला निमशहरी किंवा ग्रामीण भागात रस्त्यांवर  एक विशिष्ट वास असतो. बटाट्याचा खीस घालावा त्या जातकुळीचा वास असतो तो. कशाचा नक्की ते माहीत नाही पण असतो. 
एवढे वर्षांच्या सगळ्या फिरफिरीत तो वास, आजूबाजूचे मावळत जाणारे वातावरण, दिवसाचे काम संपवून राहण्याच्या ठिकाणी परत जायचा प्रवास, लोक घरी जातायत आणि आपण हॉटेलवर जातोय - आपण इथले नाही हे अधोरेखित होणे,  हा वास येतो तिथे आपलं काही असण्याची ओढ असं सगळं आणि अजून बरंच त्या वासाशी जोडलेलं आहे. 
एक काळ असा होता की ही फिराफीरी इतकी सततची होती की त्या वासाची सवय झाली होती. इतकी की तेच घर वाटे. उबदार वाटे. मग ते फिरणं थांबलं. तो वास आठवणीत राह्यला.  आणि सगळंच तुटल्यासारखं झालं. 
हल्लीच इकडे आसपासच भटकत असताना एका संध्याकाळी हवेला त्या वासाची नोट होती. मी थांबले. वासाची दिशा शोधायचा प्रयत्न केला. हरवली ती नोट. 
फिरायला हवं, मला सतत फिरायला हवं.
- नी

Saturday, February 13, 2021

माझं काम माझा अभिमान

#माझं_काम_माझा_अभिमान अश्या हॅशटॅगने आपल्या कामाबद्दल, आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल लिहायचे असे फेसबुकवर सुरू होते. 
त्यात माझ्या  not so प्रेरणादायी वगैरे प्रवासाबद्दल.. प्रवास कसला.. इकडून तिकडे उडयांच्याबद्दल लिहून काढले. ती ही पोस्ट. 
सुरुवात करण्यापूर्वी हा वैधानिक इशारा.
हा माझा प्रवास असल्याने त्यात मी मी मी मी खूप आहेच. त्याला पर्याय नाही.  दुसरं म्हणजे ही काही परिस्थितीशी दोन हात प्रकारच्या संघर्षाची गोष्ट नाही. जो काय थोडाफार संघर्ष असेल तो 'आपुला आपणासी' प्रकारचाच आहे. स्टोरी बडी और बडी बोरिंग है. 
----------------

'मोठेपणी कोण होणार?' याची उत्तरं लहानपणी सतत बदलत असतात. माझीही होती.  फरक इतकाच की वयाने वाढल्यावरही ती बदलतीच राह्यली. 
मेडिकल वा इंजिनिअरिंगच्या वाटेला जाणार नाही हे शाळेतच पक्के करून टाकल्यावर मग दहावीनंतर 'कोठे जावे, काय करावे, काही कळेना' अशी अवस्था होती. मग बरे मार्क होते म्हणून सायन्सची वाट धरली. 
कॉलेजात असताना नाटकाचा किडा चावला. काही वर्कशॉप्स केली. तिथून काही चांगले ग्रुप्स मिळाले. चांगली माणसे भेटली.  हे आवडतंय असं झालं. पण माझ्याकडे कॉन्फिडन्सची बोंब. कोण काम देणार होतं मला? मला थोडीच जमणार होतं?  इथेच माझी गाडी अडकलेली. अपवाद वगळता बहुतेक मित्रमंडळी अवसानघातकीच होती. त्यामुळे आपण काहीतरी करायचं ठरवायचं आणि मित्रमंडळींनी आपल्याला हसायचं हे ठरलेलंच. 
याच दरम्यान विक्रम गायकवाडकडे मेकप शिकले.  मग हे बरंय असं वाटलं. हाताने काहीतरी रंगवणे, घडवणे हे आयुष्यात असायलाच हवे. नाही जमणार त्याशिवाय हे यावेळेला थोडंसं स्पष्ट व्हायला लागलं. 
बीएस्सी उरकल्यावर आता सायन्स पुरे हे पक्के ठरवले. एम ए नाटक शिकायला पुणे विद्यापीठात गेले.  मित्रमंडळी हसायचीच. मला सवय झाली होती त्याची. त्यामुळे दुनिया फाट्यावर वगैरे मी आपोआप शिकले. विद्यापिठात  शिकत असताना इतिहास पहिल्यांदा मनापासून आवडायला लागला.  एम ए करत असतानाच ग्रीप्सची काही नाटके, वामन केंद्रे यांनी डिरेक्ट केलेलं एक नाटक वगैरे केले. 
याच काळात कॉश्च्युमच्या जगाशी तोंडओळख झाली. आणि मी हेच करायचं ठरवलं. करायचं तर शिकायला हवे. ते कुठे शिकावं हे शोधू गेले तर देशात कॉश्च्युम डिझायनिंगचा कोर्सच नाही हे लक्षात आले. त्याच वेळेला युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाचे तेव्हाचे नाट्यविभागप्रमुख डॉ. फार्ली रिचमंड आमच्या ललित कला केंद्रात(पुणे विद्यापीठ) आले होते  ते जॉsज्याला कॉश्च्युम शिकायला चल म्हणाले.  मग मी गेलेच तिकडे कॉश्च्युम मध्ये (नाटकाच्याच विभागात) तीन वर्षांचे एमएफए करायला. मित्रमंडळी खदखदून हसली.  
ती तीन वर्षे माझ्या आयुष्यातली सगळ्यात भन्नाट वर्षे होती. शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्य, क्षणाक्षणाला येणारे नवीन अनुभव, समोर येत जाणाऱ्या नवीन संकल्पना, हळूहळू तुटून गेलेली झापडं हे सगळं होतं. तेव्हा नाटक शिकणे यावर हसायची मराठी किंवा थोडीफार भारतीय परंपरा असल्याने आमच्या डिपार्टमेंटला मी सोडून एकही भारतीय व्यक्ती नव्हती. त्यामुळे देशी कोंडाळ्यापासून वाचले. जगभरातले लोक मिळाले. सगळे नाटकवाले त्यामुळे देशी लोकांपेक्षा 'माझिया जातीचे'. तिथे असताना तीन उन्हाळी सेमिस्टर्समध्ये सॅण्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमध्ये काम केले. पहिल्या वर्षी शिवणविभागात तर पुढची दोन वर्षे कॉश्च्युम क्राफ्ट विभागात. कॉश्च्युम क्राफ्ट मध्ये चपलाबूट, बेल्टस, दागिने, मुखवटे वगैरे सर्व गोष्टी येतात. त्या त्या सीझनमधल्या ऑपेरांच्यासाठी डिझाईनबरहुकूम या सर्व वस्तू बनवणे हे या विभागाचे काम. इथे तारकाम व इतर दागिने बनवणे, लेदरचे बेसिक काम, विविध प्रकारची रंगवारंगवी, विविध प्रकारचे मटेरियल हाताळणे हे शिकले.  शिकले असं वाटलंच नाही इतकी मजा यायची हे करताना. सॅण्टा फे हे गावही जादुई आहे. नेटिव्ह अमेरिकन आणि हिस्पॅनिक संस्कृतीच्या खुणा जागोजागी आहेत. तिथली चित्रसंस्कृती, डिझाईन-संस्कृती आपल्याला माहिती असणाऱ्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे आणि तितकीच सुंदरही. माझ्या डोक्यातल्या चौकटी मोडायला इथे सुरुवात झाली. 
मग परत आल्यावर  कॉश्च्युममधे काम सुरू केले आणि पुण्याला विद्यापिठात,  ललित कला केंद्रात नाटकाच्या एम ए च्या मुलांना  कॉश्च्युम आणि मेकप शिकवायला सुरूवात केली.  मला शिकवायला आवडतंय हे लक्षात यायला लागले. 
मुंबईत कामाची सुरूवात केली तेव्हाच तीनचार वर्ष ठरवून ठेवलेल्या नवऱ्याशी लग्नही करून टाकले.  एकत्र काम करत होतो. ती मजा होतीच. आमची दोघांची एकत्र म्हणजे तो दिग्दर्शक आणि मी  कॉश्च्युम डिझायनर म्हणून केलेली पहिली फिल्म झाली. तिला प्रचंड यश मिळाले.  हे काम करायची संधी मला माझ्या डिग्रीच्या बळावरच मिळाली होती पण माझ्या कामाला  दिग्दर्शकाची बायको असे लेबल लागले. एकदा बायकोपणामुळे सगळं मिळतंय असं जगाने ठरवलं तुमच्याबद्दल की मग तुमचे शिक्षण, तुमचे काम, तुमची गुणवत्ता हे भारतीय डोळ्यांना चुकूनही दिसत नाही.  ती मजा माझ्याबाबतीतही झाली. अजूनही होते. 
२००५ मधे दिल्लीच्या रिता कपूर यांनी त्यांच्या मोठ्या प्रकल्पातल्या एका भागाबद्दल मदत करण्यासाठी विचारले. तेव्हा मला रिता कपूर कोण ते काहीही माहिती नव्हते पण नऊवारी साडीचा विषय होता. नाही म्हणणे शक्यच नव्हते. नऊवारी साड्यांची नेसण या संदर्भाने त्यांना माहिती द्यायची होती. एकेकाळी जाणता राजामधे काम केलेले असल्याने नऊवारी नेसण्याचे काही बेसिक प्रकार येत होतेच. ते सांगितले आणि त्यांच्या फोटोग्राफरबरोबर वाड्यावस्त्यांवर जाऊन कातकरी, ठाकरी, कोळी, आग्री वगैरे साड्यांची नेसणही शिकून घेतली. नंतर वर्षभरात दिल्लीवारी झाली तेव्हा रिता कपूर यांच्या स्टुडिओ/  ऑफिसमधले दृश्य बघितले तेव्हा त्यांचा हा प्रकल्प किती मोठा आणि किती महत्वाचा आहे हे लक्षात आले. माझे त्या प्रकल्पातले काम झाले होते पण माझ्या डोक्यात किडा पडला होता. पुढे नदी वाहतेच्या रिसर्चसाठी फिरताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातल्या वेगवेगळ्या जातींजमातींच्या साडी नेसण्याच्या पद्धती गोळा करायला, फोटो/ व्हिडिओ काढून ठेवायला सुरूवात केली होती. त्या त्या लोकांचे जगणे आणि त्यांच्या साड्या नेसण्याच्या पद्धती यांची सांगड घालणे, या सगळ्यात एक सूत्र काही मिळतेय का ते बघणे हे माझ्याही नकळत माझ्या डोक्यात चालू झालेले होते. एकही पुस्तक मात्र मला नेसण्याच्या पद्धतींविषयी, त्या इतिहासाविषयी फार काही सांगत नव्हते.  अखेर २०१०-२०११ दरम्यान कधीतरी रिता कपूरचा 'Sarees: Tradition and Beyond' नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. भारतभरातील साड्यांचा इतका मोठा पसारा आणि तरीही योग्य माहिती असलेला हा एकमेव ग्रंथ आहे. या विषयात अभ्यास असलेल्यांना या ग्रंथाचे महत्व नक्कीच कळेल. मराठी साड्यांच्या नेसण पद्धतींबद्दल रिता कपूरने त्या ग्रंथात मला क्रेडिट दिलेले आहे. हे काहीतरी भन्नाट होते. कामापुरता रिसर्च पासून रिसर्च हेच काम हा एक मार्ग मला खुणावू लागला. त्या मार्गावरच्या एका प्रकल्पाला हात घालण्याचा प्रयत्न आता चालू आहे. 
नाटकाचा किडा स्वस्थ बसवेना म्हणून एक कवितांचा रंगमंचीय आविष्कार धर्तीवरचं प्रकरण उभं केलं. संकल्पना, कवितांची निवड, त्यातून संहिता तयार करणे, दिग्दर्शन वगैरे माझे. खूप शिकले मी हे करताना. अकरा प्रयोग झाले आणि एवढ्या लोकांची मोट बांधत सगळी मॅनेजमेंट खेचणे मला झेपेनासे झाले. मग बंद केले ते.  
एक दिवस सतीश मनवरने त्याच्या नाटकासाठी विचारले. मनस्विनीने लिहिलेले नाटक सतीश दिग्दर्शित करत होता. खूप वर्षांनी रंगमंचावर उभे राहायचे हे फार मस्त वाटले. मजा आली होती. अभिनय ही बाब आपल्याला कधीही जमणारी नाही असे जे मी ठरवले होते कधीच्याकाळी त्याला सुरुंग लागला. बरं जमलं होतं तेही. अर्थात त्यात यापुढे जाऊन काही प्रयत्न करावे इतपत बळ माझ्याच्याने एकवटले नाही. जे शिकलेय त्यातच काम करायला हवे हा विचार सगळीकडून पक्का घट्ट बसवलेला होता. तो खिळखिळा व्हायला अजून वेळ होता.
याच दरम्यान लिहायची ऊर्जा छळू लागली. पेनाने कागदावर लिहायची गरज आता उरलेली नव्हती. युनिकोड देवनागरी जगात आलेले होते. वाईट अक्षरापायी आता काही अडणार नव्हते.  मग ब्लॉगिंग सुरू केले. मी लिहिलेलं आवडतंय लोकांना असे वाटल्याने नियमित ब्लॉगिंग करत राह्यले. कथा लिहिणे सुरू केले. काही कथांना साप्ताहिक सकाळ, मिळून साऱ्याजणी वगैरेंची बक्षिसे मिळाली. मी लिहायला सुरू केले हे बघून सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईला झाला. पहिल्या कथेला बक्षीस मिळाल्याचे बघितले तिने आणि महिन्याभरात ती गेली. माझं सगळं बळ संपलं. पण मी लिहीत राह्यले. कथा, कविता आणि ब्लॉग्ज वगैरे. 
मग पेणमधल्या एका एनजीओसाठी एक डॉक्युही करून दिली. तेही आवडले काम. 
दरम्यानच्या काळात कॉश्च्युम्सचे काम करत होतेच छोटेमोठे. करत राह्यले पण हळूहळू त्यात मजा यायची बंद झाली.  या इंडस्ट्रीची मागणी आणि मी जे शिकून आले होते ते याचा मेळ बसेना. 
एकदा तुम्ही एखाद्या विषयात स्पेशलाईज्ड शिक्षण घेतलेत की त्या तेवढ्याच गोष्टीपलिकडच्या इतर कशातलेही तुमचे काम, मत, विचार हे पूर्ण इनव्हॅलीड होतात. 'कॉश्च्युम करताय ना तर तेवढे नीट पुरवा, उगाच सीनच्या  व्हिज्युअल ट्रीटमेंटमध्ये आणि बाकी फ्रेमच्या रंगसंगतीमध्ये नाक खुपसू नका.' असा साधारण खाक्या असतो. आणि मला या गोष्टी समजून न घेता कॉश्च्युम्स करणे मेंदूला थकवणारे व्हायला लागले होते. व्यक्तिरेखा कपड्यातून घडवताना जी क्रिएटिव्ह गंमत असते ती मिळेना. कपडे पुरवठादार म्हणून काम करताना कंटाळा येऊ लागला.  त्यातच नाटक, लिखाण, डॉक्युमेकिंग वगैरे करताना जी तरतरी यायची मेंदूला ती सोसाने शिक्षण घेतलेल्या या विषयात काम करताना मिळत नव्हती. मग चालढकलही व्हायचीच अर्थात. 
यातच नदी वाहते स्वतः प्रोड्युस करायचा निर्णय आम्ही घेतला. त्याचे सर्व ताण, वेळेची मागणी, हजारो नव्या गोष्टी शिकणे हे सगळे संदीपपेक्षा कणभर कमी पण माझ्याही वाट्याला होतेच. अशी मी अनेक गोष्टीत विखुरलेली होते. 
'आपण या गोष्टीत स्पेशलाईज्ड शिक्षण घेतलंय. त्यामुळे यातच काम करणे, यातच पुढे जाणे, यातच एक्सेल करणे हे आणि हेच अनिवार्य आहे. मुख्य आहे. बाकी सगळे दुय्यम.'  हे भूत मानेवर घट्ट जखडून बसले होते. आणि कॉश्च्युमच्या पलिकडच्या शक्यता माझ्या मलाच दिसत होत्या.  या दोन्हीत झगडा चालू होता माझ्या आत. परिणामी बाहेरच्या बाजूला मी अजूनच डल पडत चालले होते. असे व्हायला लागले की तुमच्यावर फुल्या मारणाऱ्यांची कमतरता नसतेच. 
हा झगडा निपटण्यासाठी म्हणा किंवा हात शिवशिवत होते म्हणून म्हणा किंवा अजून काही कारणाने  म्हणा, मी काहीतरी कलाकुसर सुरू करायला हवी हे ठरवले. सॅण्टा फे ऑपेरामध्ये काम करताना तारेच्या कामाची अगदी तोंडओळख झाली होती.  आता  तार आणि कापड असे काहीतरी सुचत होते. ज्याची सुरुवात कमी जागेत, थोडक्या खर्चात करणे शक्य होते. मग एक दिवस सम्राट (तुळशीबाग) मधून तारेचे एक पाकीट आणले. ती भयानक तार आणि कापडांचे मणी बनवून त्यातून एक नेकलेस सारखे करून पाह्यले. मजा आली. जे झाले होते ते काही खास नव्हते पण. ती तार अगदीच टुकार होती. ही 2011 मधली गोष्ट. फेसबुकवर वायर रॅप ज्वेलरी नेटवर्क नावाच्या ग्रुपमध्ये बरंच शिकायला मिळत होतं. तार कामातल्या कलाकुसरीबद्दलही आणि तारकलाकार म्हणून एथिक्सबद्दलही.  ते सगळे पल्याडच्या देशांच्यातले लोक. एकही वस्तू कुठे मिळेल कुणीच सांगू शकत नव्हते. मग एक दिवस भुलेश्वर गाठले. या दुकानातून त्या दुकानात शोधत शोधत तांब्याच्या तारांची दोन भेंडोळी आणि अगदी बेसिक हत्यारे घेऊन आले. आणि सुरू केले तारा वळणे.  चुकत,माकत, शिकत प्रवास सुरु झाला. २०१३ मधे मी पहिला संपूर्ण नेकलेस बनवला एका मैत्रिणीला गिफ्ट द्यायला. पण अजून तरी माझी स्टाइल किंवा असे काहीच सापडलेले नव्हते. 
एक दिवस असेच सराव म्हणून घरात असलेला एक दगड तारेने बांधून बघितला. पॉलिश न केलेली तार आणि दगडाचे रांगडेपण या दोघांची एकमेकांशी कुंडली चांगलीच जुळली आणि मला माझी शैली मिळाली. तेव्हा आमचे नदी वाहतेचे शूटींग सुरू व्हायच्या बेतात होते. प्रॉडक्शन डिझायनर म्हणून माझे काम सुरू झालेले होते. एका सीनमधे नदीतल्या साती आसरांशी नाते सांगणाऱ्या सात मुली असणार होत्या. नदी, माती, दगड, झाडे, पाने, आकाश, निसर्ग या सगळ्याचा भाग असल्याप्रमाणे त्या दिसणे अपेक्षित होते. त्या सातही जणींना काही थोडके असे दगडाचे तारेत बांधलेले दागिने घालायचे ठरवले. त्याप्रमाणे प्रत्येकीला एकेक नेकलेस आणि एकेक केसात माळायचा दागिना बनवला. नदी, निसर्ग आणि रस्टिक असे काहीतरी अस्तित्व या गोष्टींनी डिफाइन केले. 
नदी वाहतेच्या भरपूर जबाबदाऱ्यांच्यात मला ठिकाणावर राहायला तारांनी मदत केली हे नक्की. त्यात माझे काहीतरी सापडत होते. नदी वाहतेचे शूटिंग संपेस्तोवर माझा आतला झगडा संपत आला होता.  माझी कॉश्च्युम डिझायनर म्हणून ओळख रेटत राहायचे भूत फेकून द्यायचे मी ठरवले होते. तारकामाचे रूपांतर व्यवसायात करता येईल कदाचित ह्या विचाराने उचल खाल्ली होती. तारकामात हळूहळू प्रगती होत होती. एका मैत्रिणीने माझ्याकडून दगडाचे तारेत बांधलेले पेंडंट आणि तारेची चेन असे नेकलेस करून घेतले. ती माझी या कामातली बोहनी. तिला द्यायचे म्हणून मग माझ्या ब्रॅण्डचे नाव नी नक्की केले. पण प्रत्यक्ष दागिन्यांचे कलेक्शन वगैरे असे काही तेव्हा करण्याइतकी माझी तयारी झालेली नव्हती.
याच दरम्यान एका नाटकाच्या कॉश्च्युम डिझायनिंगचे काम आले.  बाई(विजया मेहता) डिरेक्ट करत होत्या. काम करायला मजा आलीच पण बाकी त्यांच्या हातात नसलेले अनेक फॅक्टर्स होते. काम चांगले झाले तरी इथे मी स्वतःला लांबून तपासत राह्यले आणि अखेर माझ्या आवडत्या कामापासून तात्पुरती किंवा कायमची फारकत घेण्याचे  ठरवले.  स्वत:शीच ठरवले पण ती हिंमत गोळा करायला बरंच बळ लागलं होतं.  हे नाटकाचे प्रोजेक्ट मधेच थांबले एकदोन महिन्यांसाठी. आणि मी ठरवले आता खेळ फार झाले. आता निर्णय झालाय तर पुढच्या वाटेची काहीतरी ठोस सुरूवात व्हायला हवी. आणि नाव ठरल्यावर तब्बल 6-7 महिन्यांनी 10 एप्रिल 2015 ला माझे पहिले कलेक्शन मी फेसबुक पेजवर लॉन्च केले. छान रिस्पॊन्स होता लोकांचा.  मी ही शिकत होते. तेव्हापासून आतापर्यंत 5 छोटी छोटी कलेक्शन्स, कलेक्शन शिवायच असेच एकेकटे दागिने,  अगणित कस्टम डिझाइण्ड दागिने बनवले आहेत.  माझे तारेतले क्राफ्ट, मटेरियलची समज यांचा आलेख चढता ठेवायचा प्रयत्न आहे.  काही गोष्टी मी पहिल्यापासून ठरवल्या होत्या त्या आजही पाळतेय. एक म्हणजे बाजारात ज्या प्रकारचे, ज्या पोताचे दागिने मिळत होते ते बघून मला कंटाळा आला होता म्हणून मला काहीतरी वेगळे हवे होते. ही दिशा, हा हेतू सोडायचा नाही. आणि दुसरे म्हणजे कुठलेही ठराविक ट्युटोरियल बघून त्याबरहुकूम वस्तू बनवणार नाही. ट्युटोरियल हे टेक्निक शिकण्यापुरतेच असेल, तयार झालेली वस्तू पूर्णपणे माझ्या शैलीची, माझ्या डोक्यातून आलेली असेल. 
आता कुठे तारेची नस समजायला लागलीय.  आता तारांच्यातून ब्रह्मांड उभं होताना दिसतंय डोक्यात.  व्यवसाय म्हणूनही या मार्गावरचे दिवे हळूहळू उजळतायत अशी शक्यता वाटायला लागलीये. 
नी च्या पहिल्या पाच वर्षात माझ्या बाकी आयुष्यातही प्रचंड उलथापालथ झाली. त्यातून आम्ही तावून सुलाखून जातो आहोत अजूनही. अनेक पातळ्यांवरची ओढाताण चाालोो आहे.  यात टिकून राहायला मला माझ्या तारकामाचा सर्वच पातळ्यांवर  खूप उपयोग झाला हे नक्की.  पार्ल्यातून वसईला राहायला जाणे हे ही घडले या काळात. वसईने शांतता आणि होप्स दिल्या आहेत. 
याच पाच वर्षात अजून एक महत्वाची गोष्ट घडली. एम ए करत असताना इतिहास आवडू लागला हे मी आधी सांगितले आहेच. एम एफ ए करत असताना वेशभूषेचा इतिहास असा विषय होता. इतिहास ही कशी आपल्या सगळ्या सगळ्याला कारणीभूत गोष्ट असते याचा प्रत्यय ठायी ठायी येऊ लागला. त्याबद्दल थोडे थोडे लिहायला सुरू केले होते. 2018 मधे कपड्याच्या इतिहासातल्या गमतीजमतींबद्दल, प्रवाहांबद्दल, समजुतींबद्दल मी एक सदर लिहिले. तसे त्रोटक स्वरुपाचेच होते पण ते लिहिले जाणे मला गरजेचे वाटत होते. त्यावर पुढे करायचे काम माझी वाट बघते आहे. 
कोविडने जग थांबले तेव्हा ड्रामा स्कूल, मुंबई या संस्थेत कॉश्च्युम आणि सेट डिझाइन शिकवत होते तसेच तिथल्या डिझाइन विभागाची प्रमुख म्हणूनही काम बघत होते. अर्थात व्हिजिटिंग. हे वर्ष शिकवण्याचे काम सगळे थांबलेच आहे. पण जग जाग्यावर येईल, संस्था, विद्यापिठेही जाग्यावर येतील आणि नाट्यविभाग सुरू होतीलच. तेव्हा मी शिकवत असेनच. 

याच काळात कधीतरी मी माझे असे कैक गोष्टीत विखुरलेले असणे स्वत:शीच स्वीकारले. करीअर उपदेश वगैरे असतात त्यात सांगितले जाते की तुम्हाला अखेरीस एक काहीतरी काम करायला हवे. एक काहीतरी तुमचे शीर्षक असायला हवे अन्यथा तुम्हाला व्यावसायिक म्हणून पुरेश्या गांभिर्याने स्वीकारले जाणार नाही. हे सूत्रही तसे ओव्हररेटेड आहे. मुळात फ्रीलान्सर असायचे तेच एका खुंटाला बांधले न जाण्यासाठी तर मग तुम्हाला दहा गोष्टी खुणावत असतील आणि त्यातल्या चार गोष्टी तुम्ही उत्तम करू शकत असाल तर एकच एक ओळख हवी याचा सोस फार छळतो तुम्हाला. त्यापेक्षा असू द्यावी विखुरलेली ओळख. 
अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जग वयाचा फार मोठा बागुलबुवा करून बसतं. अमुक एका वयानंतर नवी सुरूवात असूच शकत नाही अशी समजूत करून ठेवलेली असते जगाची. त्या अमुक वयाच्या टप्प्यानंतरही माणूस म्हणून मनात, शरीरात आख्खा डाव परत नव्याने खेळता येण्याची ताकद असते. हे मी मानते, अनुभवते आहे त्यामुळे दहा वर्षांनी कदाचित या माझ्या उड्यांमधे काहीतरी वेगळ्यात गोष्टीची भर पडलेली असूच शकते कुणी सांगावं! 
   
हा माझा प्रवास कुणाला फार प्रेरणादायी वगैरे असणार नाहीये पण कुणा माझ्याइतकेच विखुरले असलेलीला किंवा चाळीशीनंतर नवीन नवीन स्वप्ने पडत असलेल्या कुणाला  'आहे कुणीतरी सोबतीला!' इतके वाटले तरी पुरे आहे. 

सध्यासाठी समाप्त!

-नी

Friday, September 25, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - सर्व लेखांचे दुवे.

 

वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं. तर तेच सगळं तुमच्या पर्यंत पोचावं म्हणून जानेवारी २०१८ मधे लोकमतमधे हा विषय घेऊन सदर लिहिले होते. सदराचे नाव ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी माहिती असे काहीसे स्वरूप आहे या सदराचे. या सदरातील सर्व लेख तसेच याच विषयावरचे इतरत्र लिहिलेले लेख हे सगळे याच ब्लॉगवर आहेत. पण लेबलने शोधल्यावर सगळे लेख एकदम सापडत नाहीत म्हणून इथे सर्व लेखांचे दुवे इथे टाकते आहे.
 • माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेले आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे अख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो.    हे सर्व कुठून येते? २९ जानेवारी २०१८
 • आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो.  
  नेसूचे आख्यान 
  - २७ फेब्रुवारी 
 • अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते. 
  'साडी नेसणं...' 
  - २७ मार्च 
 • उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार-उकार स्पष्ट करणारी वस्रं ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं.. 
  'झाकपाक' 
  २४ एप्रिल
 • माणसं प्रवास करतात, स्थलांतर करतात, नवीन प्रदेश पादाक्रांत करतात. आपल्या जगण्याच्या पद्धती या नवीन ठिकाणी घेऊन जातात आणि नवीन ठिकाणच्या पद्धती आत्मसात करतात. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो आणि संस्कृतीची कथा नवं वळण घेते..
  आपलं काय काय म्हणायचं? - २९ मे 

 • ब्रिटिश भारतात आले तोपर्यंत भारताच्या वस्त्नकलेनं खूप प्रगती केलेली होती. भारतभरात प्रदेशानुसार कापड विणण्याचे प्रकार, त्यावरची नक्षी, कलाकुसर, कापड रंगवण्याची भारतीय साधनं आणि प्रक्रि या या सर्व गोष्टींचं प्रचंड वैविध्य होतं. काश्मिरी शालींबरोबरच याही सगळ्याची युरोपातून आलेल्या व्यापार्‍यांना भुरळ पडली. 
  भारतीय वारसा - २६ जून

 • एखाद्या संस्कृतीशी जोडलेली प्रतीकं, चिन्हं यांची देवाणघेवाण होणं हे अपरिहार्य आहेच,काही प्रमाणात!ते स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य आणि अयोग्य याविषयी मात्र अजून संभ्रम आहेत.
  थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै
 • रोमानिया देशाचं फॅशनला वाहिलेलं एक मासिक.बिहोरच्या लोकांबरोबर त्यांच्या पारंपरिक भरतकाम कलेसाठी उभं राहिलं. आयुष्यभर भरतकाम करणा-या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक अणि हे मासिक यांनी एकत्र येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला. आपल्या हातांनी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून, पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत ऑनलाइन विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला. 
  बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट
 • युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्याद्वारे नियंत्नण ठेवण्याची चौदाव्या लुईची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ,शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचं केंद्र फ्रान्स असलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडं,कपडे, आभूषणं आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्यानं घडवून आणलं.
  कूत्यूरोद्योग - २५ सप्टेंबर 

 • ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाहिलीस का तिची? कॉटनबिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाइन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात?’ ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रिणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूजकाकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता.  
  साधेपणाच्या नोंदी ३० क्टोबर 
 • माणसानं कापड, रंग यांच्या साहाय्यानं शरीर झाकायला आणि सजवायला सुरू केलं तेव्हापासून कातडीवरचं आवरण हे त्या माणसाबद्दल बरंच काही सांगणारी दृश्यभाषा आहे. आणि ती वाचायला शिकणं ही मजेची गोष्ट आहे.
  शब्देविण संवादु! - २७ नोव्हेंबर
 • जानेवारीपासून 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे सदर लिहिले. आजच्या 'अजून थोडी इतिहासाची पानं!' या लेखाने सदराचा समारोप करते आहे.  अजून थोडी इतिहासाची पानं - २५ डिसेंबर   
-----------------------------------

 • एखादी वस्तू अंगावर असणे वा नसणे यामुळे चळवळ होत नाही असे म्हणणारे एखादी वस्तू अंगावर असण्यानेच स्त्रीच्या चारित्र्याची ग्वाही मिळते हे मात्र छातीठोकपणे म्हणतात. हे गमतीशीर जरूर आहे पण यात नवल वाटण्यासारखं काही नाही. लाज, इभ्रत, प्रतिष्ठा या केवळ बाईनेच जपायच्या गोष्टी असताना ते सगळं वेशीवर टांगून आपलं एक अंतर्वस्त्र या बाया जाळतात म्हणजे त्यांची डोकीच फिरली असली पाहिजेत असं सहजपणे समजणारा समाज अजून जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहे. 
  आतली गोष्ट! 'माहेर' मासिक मार्च २०११ महिला दिन विशेषांक

 • लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्‍या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता.
  गुंडाळलेल्या कापडाची कहाणी!! - मायबोली गणेशोत्सव २००९ 

 • हॅण्डलूमची टापटिपीने नेसलेली साडीडोळ्यात  घुसणारे रंगअगदी मोजके किंवा नसलेलेच दागिने आणि इतर गोष्टीव्यवस्थित बसवलेले छोटे केससाधेपणानीटनेटकेपणा पुरेपूरहा जामानिमा केलेली व्यक्ती दिसली की आपोआपच ती व्यक्ती विद्वानकर्तुत्ववानउच्चपदस्थआदरणीय इत्यादी असणार असा आपला सर्वांचा समज होतोआदरणीय विदुषी वेशभूषेचा गाभा अजूनही साधारण हाच आहे
  साडीवरून ट्रेंचकोट! दैनिक लोकमत १९ नोव्हेंबर २०१७ 

 • माणसाचे कपडे ही दृश्य संवादाची भाषा असतेएखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या ठराविक ठिकाणी जे काही मत तयार होते ते त्या व्यक्तीने कपडे काय आणि कसे घातलेतकेस कसे राखलेतदागिने वगैरे काय आहेत वा नाहीयेत इत्यादी सगळ्या जामानिम्यावरून. 
  ड्रेस कोडची बहुरंगी भानगड २० मे २०१८ महानगर

 • “त्या बिचाऱ्या दिपिकेला आपले कपडे कुलुपात ठेवावे लागत असतील नै? कधी रणवीर डल्ला मारेल काय सांगता येतंय काय? ” रणवीर सिंगचे नवीन फोटो आले की व्हॉटसॅपवर किमान पंचवीसवेळातरी हा डबडा विनोद येतो. 
  तिचा वेष त्याचा वेष पुन्हा स्त्री उवाच या डिजिटल अंकात ८ मार्च २०२०
 • "हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?"  कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे.  
  कपडे, माणूसपण इत्यादी - दैनिक लोकमत २३ मार्च २०२१ 

Tuesday, June 16, 2020

तिचा वेष त्याचा वेष

“त्या बिचाऱ्या दिपिकेला आपले कपडे कुलुपात ठेवावे लागत असतील नै? कधी रणवीर डल्ला मारेल काय सांगता येतंय काय? ” रणवीर सिंगचे नवीन फोटो आले की व्हॉटसॅपवर किमान पंचवीसवेळातरी हा डबडा विनोद येतो.
आपल्या मनाजोगी धडाडी न दाखवणाऱ्या पुरूषाला "बांगड्या भरा!" असा टोला मारणारे पैशाला पासरीभर असतात आणि त्यात काही चुकीचे आहे हे ही समजत नसते त्यांना. मुलीबायकांनी जीन्स घालणे यावर काही सांस्कृतिक गड्डे "आईचा पदर आणि जीन्स घातलेल्या मम्मीला पदर नसतो म्हणून मातृत्वाचा जिव्हाळा नसतो" वगैरे मंद टिप्पण्या करताना अजूनही दिसतात.
घागर्‍यामधे रणवीर
1 Ranveer wearing ghagra.jpeg

एकूणात काय जगात प्रत्येकाने चौकटीत ठरवून दिल्याप्रमाणेच स्त्री वा पुरूष व्हायचे असते आणि त्या कप्प्यातच बसायचे असते असे स्थितीवादी समाजाचे पक्के ठरलेले असते.

कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला मुलगी हे आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे. नीट विचार केला तर लक्षात येईल की हि लिंगनिश्चिती केवळ राहणी, घातलेले कपडे यांच्यावरूनच आहे. मानवजातीच्या प्रवासात खूप पूर्वी कधीतरी लिंगनिश्चिती आणि कपडे यांचा संबंध जोडला गेला आणि मग तो नियमही झाला. त्यामुळे इथे कपडे हे चक्क स्त्री वा पुरुष असण्याचे चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात.

हे कुठून सुरू होतं? जगातल्या बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये मूल चालायला लागेतो, त्याच्या आठवणी सुरू होईतो बाळ मुलगी आहे की मुलगा हे स्पष्ट करणारे कपडे शक्यतो वापरले जात नाहीत. तान्ह्या बाळांना सारखीच झबली टोपडी घातली जातात. मग बाळ मुलगा असो वा मुलगी. तान्हे बाळ हे बाळ असते. स्त्री वा पुरूष असण्याआधी माणसाचे बाळ असते. मानवजन्म आधी मग लिंगभाव हे जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृतींना मान्य होते असे म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडे झबल्याटोपड्याबरोबरच कुंच्या, वाळे, मनगट्या वगैरे बाळलेणी ही सर्वांना सारखीच घातली जातात. मूल चालूपळू लागले की मग मुलाचे वा मुलीचे कपडे दिले जातात. तिसरे वर्ष लागताना आपल्याकडे आत्याने भाचीला खण, बांगड्या घ्यायची पद्धत आहे. ही पद्धतही कदाचित तान्हेपणा संपला आणि नुसता मानवजन्म असण्याऐवजी त्याचे पुढचे कप्पे पडायला सुरू झाले हे सांगणारीच असावी. मग पुढे मुलीला गाठीची चोळी + बिनपदराची साडी, नंतर ती न्हातीधुती झाली की साडीला पदर हे सगळे टप्पे असत. मुलीला पदर आला हा वाक्प्रचार यातूनच आला.

प्रबोधनकाळादरम्यान युरोपात मुलग्यांना झगा वा झबलेसदृश कपडेच घातले जात. पाचसहा वर्षाच्या आसपास ते कपडे जाऊन ब्रीचेस म्हणजे गुडघ्यापर्यंतच्या पॅन्टस घातल्या जात. अमीरउमरावांच्या घरांमध्ये मुलाला पहिल्या ब्रीचेस देण्याचा सोहळा केला जाई. त्याला ब्रीचिंग असे म्हणतात.

ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे
2 ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे.jpg

ही झाली बरीच पुढची गोष्ट. कपड्यांच्या इतिहासाच्या मुळाशी गेले तर जगभरात मानवी संस्कृती सुरवातीची पावले टाकत होत्या तेव्हा वेशभूषेच्या उत्क्रांतीच्या त्या टप्प्यात कपड्यांमधून लिंगनिश्चिती हा उद्देश महत्वाचा नव्हता. प्राचीन ग्रीक काळात याची सुरूवात दिसते परंतू हे समाजाच्या काही घटकांपुरतेच अपेक्षित होते. रोमन कालखंडात कपड्यांचा व लिंगनिश्चितीचा परस्पर संबंध जास्त गडद झालेला दिसतो. रोमन वा ग्रीकांच्या आधी इजिप्त, बॅबिलोनियन, सुमेरियन वगैरे संस्कृती जिथे ग्रॅविटेशनल म्हणजे नेसायच्या कपड्यांवर भर असलेली वेशभूषा आहे तिथे कपड्यांचे लिंगाधारीत ध्रुवीकरण हे केवळ वरवरच्या सजावटीच्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. मात्र मूळ कपडे बरेचसे सारखेच आहेत.

आपल्याकडेही वैदीकपूर्व, वैदीक ते पार मौर्यन कालखंडाच्या सुरूवातीपर्यंत हेच दिसते. मौर्यन काळात स्त्रिया व पुरूष दोघांच्याही कपड्यांमधे अंतरीय, उत्तरीय आणि शिरोभूषण (उष्णीष) आहे. स्त्रियांनी छाती झाकणे हे ही नव्हते. पुढे गुप्त काळात कपड्यांचा हेतू लिंगनिश्चितीकडे जास्त झुकल्याचे लक्षात येते. शिरोभूषणे पुरूषांपुरतीच उरणे, स्त्रियांनी चोळ्या वा कंचुकीने छाती झाकणे, स्त्रियांनी शिरोभूषणांऐवजी विविध केशरचना करून त्या सजवणे असे काही महत्वाचे लिंगाधारित फरक दिसतात.

पुढे मुघलांच्या काळात आणि नंतर ब्रिटिश काळात बघितले तर पुरूषांचे कपडे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन झाले आणि स्त्रियांच्या मूळ असलेल्या कपड्यांमधे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन प्रभाव असलेले बदल झाले. फ्युजन व्हावे तसे. हे ही गमतीशीर आहे. त्यामुळे कपड्यांवरून माणूस वाचायचा तर पहिला मुद्दा लिंगनिश्चिती आणि मग सामाजिक दर्जा आणि इतर हेतू असे आपसूकच झाले.
यालाच समांतर कालखंडात मध्यपूर्व व युरोपियन संस्कृतींमधे मध्ययुगीन काळापासून पुढे कपड्यांमधे लिंगाधारीत फरक असणे आणि असे फरक अनिवार्य होत जाणे हे दिसते. भारतीय उपखंडात आणि पाश्चिमात्य जगातही पितृसत्ताक संस्कृती घट्ट होत जाणे, माणसाचे समाजातले स्थान व भूमिका हे त्याच्या स्त्री वा पुरूष असण्यावरून ठरणे हे ही या काळात पक्के होत गेलेले दिसते.

नागर संस्कृतीमधे स्त्रियांची भूमिका सांपत्तिक आणि सामाजिक स्थानानुसार वेगवेगळी पण घरकाम, मुले, घरगुती गोष्टी, शोभेची बाहुली, संपत्तीचे प्रदर्शन याच वर्तुळात फिरत राह्यली. अमीरउमरावांच्या घरातल्या शोभेच्या बाहुल्यांनी आपापल्या घराण्याच्या संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी ज्या ज्या वस्तू परिधान करणे अनिवार्य होत गेले त्या सगळ्या वस्तू घोळदार, परिधान करण्यात वेळखाऊ होत्या. ठराविक प्रकारे बसणे, उठणे, चालणे सोडल्यास बाकी काही हालचाली करणे त्यात निव्वळ अशक्य होते. प्रबोधनकाळापासून बघितल्यास भरभक्कम गाऊन्स, कॉर्सेटस, आतमधले पेटिकोटसचे थर या गोष्टींचा अधिकाधिक किचकट आणि जडपणाकडे होत गेलेला प्रवास याची साक्ष देईल.
रोमॅन्टिक कालखंडातील स्त्री वेष
रोमॅन्टिक कालखंडातील स्त्री वेश

स्त्रियांनी आपल्याला बंधनात टाकणार्‍या वेशभूषेत बदल करून पुरूषी किंवा सोपी वेशभूषा (जी पुरूषी दिसत असे अशी) करणे हे साधारण रोमॅन्टिक कालखंडात युरोपात घडायला सुरू झाले. १८४० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेतील तेव्हाच्या स्त्रीवादी चळवळीतील एलिझाबेथ स्मिथ मिलर, सुझन बी अँथनी, एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, मिसेस स्टोन आणि अमेलिया ब्लूमर एक वेगळ्या प्रकारचा वेष घालायला सुरूवात केली. हा वेष रोमॅन्टिक कालखंडातल्या स्त्रियांच्या कपड्यांपेक्षा सुटसुटीत होता. पाश्चिमात्य जगामधे अश्या आकृतीचे काही आधी स्त्रियांच्या वेशभूषेत आले नव्हते. ढगळी आणि पायाशी चुण्या असलेली तुम्मान आणि वरती गुडघ्यापर्यंत येणारा घोळदार गाऊन असे साधारण या वेषाचे स्वरूप होते. अमेलिया ब्लूमरने ती संपादन करत असलेल्या ‘द लिली’ या स्त्रियांच्या नियतकालिकामधे या वेषाबद्दल प्रशंसापूर्वक लिहिले. तेव्हापासून या वेषाला ब्लूमर कॉश्च्युम असे नाव मिळाले. चळवळीच्या बाहेर हा वेश फारसा प्रचलित झाला नाही. टिकेची झोडही अर्थातच बरीच उठली. चळवळीचे उद्दीष्ट झाकोळायला नको या कारणाने काही काळाने या सर्वांनीच इतर सर्व स्त्रियांप्रमाणेच वेश पत्करला. परंतू तुम्मानला पाश्चिमात्य वेशभूषेत ब्लूमर्स असे नाव मिळाले. कालांतराने या तुम्मानची उंची कमी होत ती अंतर्वस्त्रात जाऊन बसली. लहान मुलींच्या कापडी, फुग्याच्या चड्ड्यांना आता जगभरात ब्लूमर्स म्हणले जाते.
ब्लूमर कॉश्च्युम
Bloomer costume.jpg

यानंतर पहिल्या महायुद्धाने बरेच काही बदल घडवले. सैन्यात भरती होणे पुरूषांना अनिवार्य ठरल्यामुळे अनेक कार्यालयांमधे स्त्रिया काम करू लागल्या. अर्थातच याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या कपड्यांमधे पडले. स्त्रियांच्या कपड्यांच्या आकृतीमधे जास्त सरळ रेषांचा अंतर्भाव होओ लागला. एस आकारातले एडवर्डियन कपडे कालबाह्य होत गेले. स्त्रियांसाठी कार्यलयीन काम करताना वापरण्यायोग्य कोट बनू लागले. हे अर्थातच पुरूषांच्या कोटापेक्षा वेगळे होते पण पुरूषांच्या कोटांमधले अनेक फिचर्स अस्तित्वात होते.
१९१० मधील स्त्रियांचा ऑफिस लुक
5 office look 1910.jpg

पहिले महायुद्ध संपून सगळे स्थिर होईतो स्त्रियांच्या कपड्यांच्या बाह्याकृतीमधे सरळसोटपणा आला. अगदी लहान कापलेले केस आणि शरीराचे आकार सहजगत्या न दिसू देणारी बाह्याकृती याला बॉयिश लुक असे म्हणले जाई.
बॉयिश लुक
6 boyish look.jpg

यानंतर दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जेण्डर या गोष्टीचा विचारच वेगळ्या प्रकारे सुरू झाला युरोपात आणि त्यातून १९३० च्या दशकात मार्लिन डिट्रीचने या अभिनेत्रीने ट्राऊझर्स आपल्याश्या केल्या. या गोष्टींना स्टायलिश आणि फॆशनेबल स्थान दिले. याची चर्चा अर्थातच झाली. टिकेची झोड उठलीच. दिपिका रणवीरपासून आपले कपडे लपवून ठेवत असेल अश्या प्रकारचे विनोद तिच्यावरही झाले. फॅशन आणि लिंगभाव या विषयातल्या चर्चा आणि अभ्यासाला तिने जन्म दिला. टिकेची झोड उठल्यामुळे लगेचच संपून गेलेल्या ब्लूमर ड्रेस प्रमाणे हा नवीन प्रवाह मात्र अल्पायुषी ठरला नाही. स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारे पॅण्टस आपल्याश्या केल्या. मग ते लोण हळूहळू जगभर पसरले.
मार्लीन डीट्रिच
7 Marlene Dietrich.jpg

याला इतका काळ लोटलाय आणि पॅण्ट्स आणि जीन्स वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या इतकी झाली आहे की पूर्वी पुरूषांचे मानले गेलेले कपडे आता स्त्रियांच्या शरीराप्रमाणे वेगळ्या प्रकारे बेतले जातात. विमेन्स ट्राऊझर्स, विमेन्स शर्टस वगैरे. आता स्त्रियांनी पुरूषांचे कपडे घालायचे म्हणले तर एक्स्च्लुझिव असे फारसे उरलेले नाही.

युनिसेक्स म्हणजे कुठलेही जेण्डर न दर्शवणारे कपडेही मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. पण ते बहुतेक सगळे मुळातले पुरूषी या कप्प्यात असलेले कपडे आहेत. मेट्रोसेक्श्युअल पुरूषाने स्त्रियांचे म्हणावे असे कपडे क्वचित स्कार्फ आणि स्टोल वगळता आपलेसे केलेले नाहीत.

याच्यामागे लिंगाधारित प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचा हातभार मोठा आहे. जगभराच्या पितृसत्ताक संस्कृतींमधे पुरूषाला एका उच्चासनावर ठेवून मुळातून खूप कमकुवत आणि अहंकारी बनवून ठेवले आहे. स्त्रियांचे कपडे वापरणे याचा अर्थ आपल्या पुरूषत्वात कमतरता असा घेतला जाईल, स्त्रियांच्यासारखे कमी समजले जाईल की काय ही सुप्त भिती नक्की आहे. त्यामुळे रणवीर सिंग जेव्हा साडी, घागरा वगैरे कपडे घालून मिरवतो तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाला आणि पुरूषी अहंकारावर मात करण्याला आपसूकच दाद दिली जाते.
8 bangalore.jpg

परंतू स्त्रियांनी जश्या पॅण्ट्स आपल्याश्या केल्या तसे पुरूषांनी साड्या, स्कर्टस आपलेसे करणे घडेल याची शक्यता मात्र कमी दिसते. लिंगाधारित अहंकार वगैरे लोप पावेल असे धरले तरीही ही शक्यता कमी दिसते. हे विसरता येणार नाही की आजघडीला स्त्रियांचे कपडे म्हणून जे कपडे आहेत ते उदयाला आले तेव्हा समाजातले स्त्रियांचे स्थान, करायची कामे हे सगळे पक्के ठरलेले होते. माजघर ते शोभेची बाहुली हा परीघ होता. आणि त्यामुळे कपड्यांमधे वावरायची, बसाउठायची सोय, सुटसुटीतपणा कमी आणि नखरा जास्त हा प्रकार नक्कीच होता. आजच्या स्त्रियांच्या म्हणल्या गेलेल्या कपड्यांमधे या गोष्टी दिसतातच. त्यामुळे सोय, सुटसुटीतपणा या मुद्द्यावर पुरूषांनी हे कपडे आपलेसे करणे फारसे शक्य दिसत नाही.

पण इतका वेळ आपण स्त्री व पुरूष या दोनच जेण्डर्सविषयी बोललो. तृतीयपंथी, शरीर एका जेण्डरचे व मन दुसऱ्या जेण्डरचे, लिंगबदल केलेले, ठराविक जेण्डरच्या कप्प्यात स्वत:ला बसवू न इच्छिणारे वगैरे अनेक लोक जगतात आहेत. ही सगळी वेगवेगळी जेण्डर्स मानली जाईन त्या त्या जेण्डरप्रमाणे कपडे असा बदल पुढच्या काळात दिसेल की सगळेच कप्पे बरखास्त होऊन कपड्यांमधे जेण्डरचा संदर्भच राहणार नाही या दिशेने कपड्यांची कहाणी पुढे जाईल हे सांगणे आत्ता तरी अशक्य आहे. परंतू सगळ्यांना मानवी समानतेवर वागवता येणे हे मात्र महत्वाचे आहे आणि कपडे व त्याला लागून येणारे लिंगाधारित पूर्वग्रह टाकून देणे हे त्यादिशेने पहिले पाऊल ठरेल.

- नी
(पुन्हा स्त्री उवाच या डिजिटल अंकात ८ मार्च २०२० रोजी प्रकाशित)

Search This Blog