“हल्लीच्या मुलींना फार झाकपाक करायला हवी. माझ्या खापर खापर पणजीच्या काळात नुसते उत्तरीय वापरायचे. आम्ही जेमतेम स्तनपट्टे वापरले. आता मुलींना चोळ्या हव्यात. नखरे नुसते!” मौर्य काळाच्या अखेरच्या पर्वात तरुण असलेली एक पणजीबाई तिच्या गुप्त काळातल्या खापर खापर नाती, पणत्यांबद्दल वैतागत होती.
पार वैदिक काळात स्त्रियांसाठी छाती झाकायचे वेगळे वस्त्र नव्हते. पुरुषांसारखेच अंतरीय आणि उत्तरीय असे. क्वचित स्तनपट्टा असे आधारासाठी. मौर्यन कालखंडाच्या उत्तरार्धात स्तनपट्टे, कंचुक्या जास्त वापरले जाऊ लागले. गुप्त काळाने सलग शांतता आणि समृद्धी बघितली बहुतांशी. त्यामुळे जीवनमान सुधारलं. कापड, कपडे यांच्या नव्या पद्धतीही अस्तित्वात यायला लागल्या. फॅशन बदलण्याचा वेग वाढला, १०० वर्षांवर आला. आणि बायकांचे चोळ्यांचे नखरे चालू झाले. चोळ्या शिवायच्या विविध पद्धती, खास चोळ्यांसाठी विणली जाणारी कापडे, चोळ्यांवर केलेले वेगवेगळ्या प्रकारचे भरतकाम या गोष्टींचे भरपूर वैविध्य भारताच्या कपड्याच्या इतिहासात बघायला मिळते. उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार उकार स्पष्ट करणारी वस्त्रे ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं.
आज ठकू गंभीर आहे. हादरून गेलीये. जिथून तिथून गोष्टी शेवटी कपडे आणि त्यातून दिसणारे त्वचेचे चतकोर यावर येऊन थांबतायत. जोडीला संस्कृती हा शब्द तोंडीलावण्यासारखा वापरला जातोय.
सर्व बाजूंनी अंग झाकून घेण्यातच केवळ संस्कृती सामावलेली आहे. अंग झाकले असता व्यक्तीच्या सभ्यतेची ओळख पटून अत्याचार टळतात. आमच्या संस्कृतीचे कपडे हेच सभ्य असतात. ते तसे घालणाऱ्या स्त्रिया सभ्य असतात. इतर संस्कृतीतील कपडे असभ्य आणि म्हणून ते वापरणाऱ्या किंवा आपल्यासारखे कपडे न वापरणाऱ्या स्त्रियाही असभ्य. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले तर अत्याचार करणाऱ्यांची काय चूक? अश्या सुरस व चमत्कारिक संकल्पना सध्या वातावरणात तरंगताना आढळतायत.
अंग झाकून घेणे हीच संस्कृती धरायची असेल तर पार वैदिक काळापासूनच्या विविध पूर्वजांना असभ्य म्हणावे लागेल. काय ते नुसते अंतरीय नेसत बायका. आणि छाती झाकण्याचे नावच नाही. घेतलं कधी उत्तरीय तर घेतलं, नाहीतर नाही. अश्लील माणसे! वगैरे.. पण असे म्हणायचे झाले तर मग आमचे तेव्हाचे पूर्वज फार महान होते या गृहीतकाची गोची होऊन बसते. छाती झाकण्याच्या इतिहासाचा वेध घेत जाताना एक अजून गैरसोयीची वस्तुस्थिती समोर येते. कुठलीही नवीन पद्धत ही समाजाच्या उतरंडीत वरच्या स्तरावर असणाऱ्या लोकांच्यात सुरू होते आणि झिरपत झिरपत शेवटच्या घटकापर्यंत जाते. छाती झाकायची पद्धत अशीच झिरपत पुढे गेली असणार. पण काही ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत ती पोचू दिली गेली नाही. छाती झाकायची परवानगीच समाजाने काही जातीतल्या स्त्रियांना ठेवली नाही. त्यांना जन्मजात असभ्य ठरवून टाकले. स्वतःची छाती झाकायचा हक्क मिळवण्यासाठी या स्त्रियांना संघर्ष करावा लागला. ही केवळ २०० वर्षांपूर्वीच आपल्याच भारतात, केरळमध्ये घडलेली घटना आहे.
संस्कृती ही हवाबंद डब्यात ठेवून दिलेली कधीही न बदलणारी अशी गोष्ट नसते. एक संस्कृती (आपली) चांगली आणि एक प्रकारची संस्कृती (त्यांची) वाईट असेही काही नसते. त्या त्या जगातले राजकीय, सामाजिक, आर्थिक वातावरण, हवामान या सगळ्यांचा जो राहणीमानावर परिणाम होत असतो त्यातून ती ती संस्कृती बनत असते. आणि बदलतही असते. मुळातल्या मानवी प्रेरणांना धरूनही संस्कृती प्रवाही असते.
मानवाच्या मूलभूत प्रेरणांपैकी लैंगिक आकर्षण ही महत्वाची बाब. त्यामुळे अर्थातच जोडीदार होऊ शकेल अश्या व्यक्तीला आकर्षित करून घेण्याची इच्छा नैसर्गिकच. त्यासाठी शरीर सजवणे, दाखवणे हे ही नैसर्गिक. पण प्रदेशांप्रमाणे, काळाप्रमाणे आकर्षून घेण्यासाठी उघडे ठेवायचे शरीराचे चतकोर जरी वेगळे असले तरी ‘या जागा उघड्या ठेवणे म्हणजे असभ्य’ हे सूत्र सर्व संस्कृतींमध्ये समान आढळते.
मग एका संस्कृतीत पायातल्या चपला काढणे हे आदर दाखवण्याचे लक्षण समजले जाते तर दुसरीकडे पावलाचा भाग उघडा ठेवणे, स्टॉकिंग्ज न घालणे, उघडे पाउल दाखवणे हे लैंगिक संबंधासाठी आमंत्रण आणि अर्थातच असभ्य समजले जाई. फार दूर कशाला जा? आपल्याकडेच उत्तरेत डोक्यावरून पदर घेणे हे सभ्य आणि विनयशील स्त्रीचे लक्षण मानले जाते तर दक्षिणेत डोक्यावरून पदर हा भागच अस्तित्वात नाही. बुरखा हे ही एक असेच उदाहरण. तर पोटाचा भाग उघडा पडतो अश्या साडीचे सभ्य आणि विनयशील म्हणून कौतुक का बरे केले जाते? हा प्रश्न पूर्वी पाश्चात्यांना आणि आता आम्हाला तुम्हालाही पडतोय.
अंग झाकणे म्हणजे संस्कृती या संकल्पनेबरोबरच साडी म्हणजे संस्कृती बरोब्बर उलटी संकल्पनाही वातावरणात आहेच. लग्न झालेल्या बाईने साडीऎवजी दुसरे काही सुटसुटीत घालून मोठ्या माणसांसमोर जाणे म्हणजे ज्येष्ठांचा अपमान या विनोदी संकल्पनेने तर ठकूलाही छळलंय. आख्खी नव्वार साडी पण ओचे उचलून उचलून शॉर्टस घातल्यासारखी तोकडी केलेली, पदर कमरेपासून खांद्यावरून जाऊन परत कमरेशी खोचलेला पण काहीही न झाकणारा एक अश्यातश्या मापाचे ब्लाऊज मात्र अंगात अडकवलेले. हे असले तरीही ती लांबलचक ट्राऊझर्स आणि वर बंद गळ्याचा ढगळ टीशर्ट घातलेल्या बाईपेक्षा सभ्य समजली जाते. ट्राऊझर्सवालीचे शरीर जास्त झाकलेले असूनही.
कपड्यांच्या इतिहासाच्या मुळाशी जाताना आपण बघितले की हवामान, नैसर्गिक उपलब्धता या गोष्टींवर त्या त्या प्रदेशातले कपडे ठरत जातात. एखादी गोष्ट हवामानाची, वातावरणाची गरज म्हणून आवश्यक होऊन जाते. तिची पद्धत बनते आणि मग त्या गोष्टीला धर्माची, संस्कृतीची लेबले चिकटतात. माणसांच्या स्थलांतरांमुळे या पद्धती लेबलांसकट इकडून तिकडे जातात. कधी त्या पद्धती नावीन्य म्हणून उत्सुकतेने आत्मसात केल्या जातात तर कधी परक्यांच्या पद्धती म्हणून तिरस्काराच्या धनी बनतात.
आपल्या हवामानाला साजेसे, इकडून तिकडून हवा खेळती राहील असे गुंडाळलेले कपडे ही आपली मूळ पद्धत. प्रांताप्रमाणे कापडाचा प्रकार, नसण्याचा प्रकार, कपड्याची लांबी यात फरक आहेत पण मुळात उगाचची झाकपाक केलेली नाही. तीच पद्धत रुळलेली असल्याने शरीराच्या दिसणाऱ्या भागाच्या आकारावर सभ्यतेचे मोजमाप ठरत नसे. मग मुघल आपल्या पद्धती आणि समजुती घेऊन आले. ते जिथून आले तिथली नैसर्गिक परिस्थिती बघता अंगच काय पण चेहरा झाकून घेणे ही त्यांची गरज होती. जेत्यांच्या पद्धती म्हणून घुंघट, डोक्यावरून पदर, सर्व कपड्यांवरून गुंडाळून घेण्याचा एक शेला वगैरे गोष्टी भारतीय कपड्यात उत्तरेपासून निदान महाराष्ट्रापर्यंत तरी व्यवस्थित स्थान मिळवून बसल्या.
मग ब्रिटिशांच्या बरोबर त्यांचे अनेक थर असलेले कपडे आले. हात, पावले, पोट उघडे असलेले कपडे असभ्य आहेत याची जाणीव इथल्या अडाणी लोकांना त्यांनी करून दिली. राणी व्हिक्टोरिया च्या काळात ब्रिटिशांचा झेंडा भारतभर प्रस्थापित झालेला होता. शरीराचा चेहरा सोडून प्रत्येक इंच न इंच झाकणे यासाठी राणी व्हिक्टोरियाचा काळ प्रसिद्ध आहे. जे मूळ देशी तेच इथेही लागू झाले.
मोकळ्याढाकळ्या साडीच्या आत परकराचा एक थर वाढला. त्याही आतमध्ये स्टॉकिंग्ज, पायात बंद शूज, हातात कोपरापर्यंत हातमोजे आणि सगळ्यांच्या वरून डोक्यावरून पदर असलेली साडी असला विनोदी अवतार ऐन उन्हाळ्यात भारतात अनेक ठिकाणच्या अमीरउमरावांच्या घरातल्या स्त्रिया सहन करत असत. ‘माझे सत्याचे प्रयोग’ यामध्ये कस्तुरबांच्या अश्या वेषाचे वर्णन आहे. हेच तथाकथित सभ्यतेचे संस्कार ब्रिटिश सरकारात नोकरी असणाऱ्या पुरुषांच्या कपड्यांवरही झाले. मग संपूर्ण भारतातील पुरुषांनी ते अंगिकारले.
अंग झाकण्याला भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळाले. स्त्रियांनी संस्कृती सांभाळायची असते त्यामुळे पारंपरिक कपड्यांचा त्यांना त्याग करता आला नाही तर त्या पारंपरिक कपड्यांना अंग झाकण्यातूनच संस्कृती या संकल्पनेची जोड द्यावी लागली. आणि अंग झाकायचे पण साडीच हवी अश्या पारंपरिक कात्रीत आपण बायका कायमच्या सापडलो. मग आपल्याला नव्वार नेसताना घोटा झाकला गेला पाहिजेच, पोटरीचा एक मिलीमीटर भागही दिसता कामा नये हे गरजेचे वाटायला लागले. साडी नेसताना खूप अंग उघडे असते ते नको वाटायला लागले. पण तरी जीन्स म्हणजे परक्यांच्या संस्कृतीची नक्कल म्हणून अनेकांना असभ्य वाटू लागली.
कपड्यांच्या लांबीरूंदीवर सगळे खापर फोडणाऱ्या, जबाबदारी नाकारणाऱ्या युक्तिवादाला हे थोडेसे उत्तर. संस्कृतीचा प्रवाह आणि त्यात मिसळणाऱ्या पद्धती यांच्याबद्दल अजून गप्पा मारूया पुढच्या लेखात.
- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - एप्रिल २०१८ मधे प्रकाशित)
'झाकपाक' - २४ एप्रिल
0 comments:
Post a Comment