Monday, May 18, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - १. हे सगळं कुठून येतं?


‘बरंका ठकू, वस्त्रे केवळ लज्जारक्षणाकरता असतात. कपड्यापेक्षा मनाचे सौंदर्य महत्वाचे.’ साड्या खरेदी करता करता बकूमावशीने ठकूला उपदेश केला. तलम कॉटनची साडी अंगावर लावून बघत मानेनेच ‘कशी दिसते?’ हे ठकूला विचारले. “अगदी तुझ्यासारखी!” ठकूने खुश होऊन सांगितले. ती साडी नेसल्यावर तिच्या मनाचे सौंदर्य त्या साडीवर पसरणार आणि बकूमावशी एकदम सुंदर दिसणार याची खात्रीच होती ठकूला.

पूर्वी बायकांनी सहावारी नेसावे की नऊवारी वगैरे गोष्टींवर वाद होत असत म्हणे, आजीच्या लहानपणी तिला कंपलसरी खादीच वापरावी लागे म्हणे, काका गल्फमधून जे ड्रेस मटेरियल आणतो तसलं काही आजीच्या लहानपणी मिळतच नसे म्हणे, आजोबा केवळ शिकवायला जाताना पँटशर्ट घालत, एरवी धोतर आणि सदरा.

देवळात, घरात चपला घालून वावरायचं नाही. मंगळसूत्र लग्न झालेल्या बायकाच वापरतात. पूर्वी विधवा स्त्रीला जाडेभरडे लाल लुगडे नेसून राहावे लागे. हपिसात हाफ शर्ट नसतो चालत म्हणे. हिंदी सिनेमातल्या ख्रिश्चन बायका लेस आणि फ्रीलचे झगे घालतात आणि तशीच टोपीही. शाळेत सर्व शिक्षिका साध्या वेषात म्हणजे साडी नेसून येतात. अमुक इतक्या इंचा-सेंटिमीटरांपेक्षा जास्त भाग दिसला शरीराचा तर ते चांगलं समजत नाहीत. आपण हिंदू आहोत तर लावावी ना टिकली. आपली साडी नेसायची पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.

हे असं किंवा अश्यासारखं बरंच काही अनेक ठक्यांच्या आणि ठकोबांच्या बघण्यातलं, ऐकण्यातलं, अनुभवातलं असतं. हे सगळं कुठून येतं? ते असंच का? तसं का नाही? पूर्वीच्या काळी नक्की काय असायचं? पूर्वीचा काळ म्हणजे नक्की कुठला काळ? इथे असं तर तिथे कसं असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली तर हाती लागतं ते फार गमतीशीर असतं.

माणसाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेलं आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे आख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अश्या स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो. उदाहरणार्थ बघायचे तर पार त्या तिकडे इराणातून आलेल्या पारशी स्त्रियांचा पारंपरिक वेष एक ठराविक प्रकारची साडी असा असतो किंवा कोकणच्या किनाऱ्याला येऊन पोचलेल्या ज्यू लोकांनी नऊवारी साडी आपलीशी केलेली असते किंवा बंगालातल्या एकेकाळच्या भद्र स्त्रियांच्या साडीवर घालायच्या लाल ब्लाऊजला मडमेच्या झग्यासारखी पांढरी लेस लावलेली असते इत्यादी.

हे झालं नंतरचं, अगदी मुळाशी जायचं तर कपड्यांची सुरुवात झाली तिथे बघावं लागेल. पाषाणयुगातल्या काही गुहांमधली चित्रे आपल्याला मानवाने कपड्यांचा वापर सुरू केल्याचा पुरावा देतात. साधारण ३३,००० वर्षांपूर्वी. साधारण २७००० वर्षांपूर्वीच्या काही खापरांवर कापडाच्या धाग्यांचे अंश चिकटलेले मिळाले आहेत. अजून काही खापरांवर कपडे घातलेल्या माणसांची चित्रे आहेत. पण विणलेला असा कापडाचा तुकडा हा साधारण इसपू (इसवीसनपूर्व) ६५०० ते ७००० वर्षांपूर्वीचा आहे. हा सुती म्हणजे कापसापासून बनलेल्या कापडाचा तुकडा नाही. सध्यातरी शास्त्रज्ञ याला लिनेन म्हणजे जवसाच्या खोडापासून बनवलेल्या धाग्यातून विणलेले कापड मानतात. जवसाच्या शेतीचे पुरावेही या जवळच्या कालखंडात आणि परिसरात मिळालेले आहेत. जवसाची शेती आणि त्या कापडाच्या तुकड्याची वीण बघता धाग्यांपासून कापड विणायची कला इसपू ६५००-७००० च्याही बरीच आधी अवगत झाली असावी असे दिसते.

ऊन, पाऊस, थंडी यांच्यापासून संरक्षण म्हणून मानवाने कपडे वापरायला सुरुवात केली असे आपण शाळेत शिकलो. पण या संरक्षणाच्याही आधीपासून माणसाने स्वतःच्या शरीराला सजवणे सुरू केले होते. कधी झाडांची पाने अंगावर चिकटवणे, प्राण्यांच्या कातडीचा, नखांचा वापर, माती, दगड, फुलं यांच्यापासून मिळालेल्या रंगांनी अंगभर नक्षी काढणे, दगड, शंख, शिंपले, फुलं अश्या वस्तूंच्या माळा अंगावर घालणे आणि विविध प्रकारचे कपडे परिधान करणे अश्या अनेक प्रकारे शरीर सजवले जात असे. स्थलांतर केल्यावर नवीन हवामानाशी जुळवून घेता यावे, संरक्षण व्हावे यासाठीही कपड्यांचा वापर सुरू झाला.

एकाच रंगाचे कपडे, एकाच प्रकारच्या चपला रोज घालणे याचा जसा आजच्या मानवाला कंटाळा येतो तसाच तेव्हाच्याही मानवाला येत असणारच. आणि ड्रेस कोड असायला तो तेव्हा हापिसात, शाळेत वगैरे जात नव्हता. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या प्रकारे सजवून बघणे होता होते. त्यातून शरीर सजवण्याच्या पद्धती, प्रकार बदलत होते. नुसतंच संरक्षण हा हेतू असता तर हे बदल घडले नसते. वेगवेगळ्या प्रकारे कापड बनवण्याच्या प्रकारांचा शोध लागला नसता.

या मानवाला निसर्गातल्या बहुतेक सगळ्या गोष्टींचा कार्यकारणभाव माहिती नव्हता. जगण्याची इच्छा, मृत्यूची भीती या प्रेरणा नक्कीच होत्या. मग अमुक प्रकारे माळ घातली की अंधार पडल्यावर भीती वाटत नाही. अमुक एका प्राण्याचे नख बरोबर बाळगले की ढग भिववत नाहीत असे अनेक आडाखे योगायोगाच्या आधारांवर त्याने मांडले. तश्याप्रकारे ठरावीक वस्तू वापरू लागला आणि गंडेदोरे, ताईत व तत्सम सगळ्या बाजारपेठेला त्याने जन्म दिला.

शरीर सजवायच्या वेगवेगळ्या पद्धती बनत गेल्या त्याच सुमारास माणसांनी कळपाने, गटाने, टोळीने राहायला सुरुवात केली होती. टोळीतले स्थान, केलेले कर्तृत्व, मारलेल्या प्राण्यांची संख्या या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे सजावट शरीरावर दिसू लागली. बुजलेले व्रण परत रंगवून शिकारीतल्या कर्तृत्वाची ओळख राहिल असे बघणे वगैरे गोष्टी सुरू झाल्या. यानंतर हजारो वर्षांनी, पंधराव्या शतकामध्ये, युरोपात पुरुषांच्या कपड्यांच्या बाह्यांना ठराविक अंतरावर छोटे छोटे कटस देऊन आतमधून वेगळ्या रंगाचे कापड लावायची पद्धत सापडते. रेनेसाँसच्या (इसवीसन १४००-१६००) अखेरीपर्यंत ही पद्धत स्त्रियांच्या गाऊन्सच्या बाह्यांवरही पसरल्याचे दिसून येते. या पद्धतीचे मूळ आपले शौर्य मिरवण्याची हौस यात असावे असा एक मतप्रवाह आहे. कपड्यांवर ज्या प्रकारे फाडले जाई ते तलवारीचे घाव असल्याप्रमाणे दिसत असे. तलवारीचा घाव आणि आतमधून वाहणारे रक्त असे शरीरावर मिरवणारा तो शूरवीर योद्धा मानला जाई.

पुरातन लिनेनचं कापड वापरणाऱ्या मानवाच्या टोळ्यांचा समाज बनत गेला तसा समाजाचे नियम बनत गेले. आणि मग सभ्यतेच्या कल्पनांचाही उगम झाला. शरीराचे नाजूक भाग आधी संरक्षणासाठी आणि मग सभ्यता म्हणून झाकले जाऊ लागले. त्यापलीकडे जाऊन शरीराचे ठराविक भाग झाकण्याचा संबंध सभ्यतेशी जोडला गेला. आणि लज्जारक्षण हा अजून एक पैलू कपड्यांना मिळाला.

माणसांच्या टोळ्या जगाच्या ज्या ज्या प्रदेशात स्थिरावल्या तिथले हवामान, तिथे उपलब्ध असलेल्या वस्तू, तिथे पिकू शकणाऱ्या गोष्टी, तिथल्या गरजा या सगळ्याला धरून त्यांच्या कपड्यांचे स्वरूप ठरत गेले. जगभरातले कपडे बघितले तर या प्रादेशिक वैशिष्टयांवरून दोन गट करता येऊ शकतात. एक म्हणजे शरीराच्या आकारानुसार शिवून तयार केलेले कपडे आणि सलग कापड अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळून तयार केलेले कपडे असे जगभरातल्या कपड्यांचे दोन गट आपल्याला करता येऊ शकतात. जिथे उष्ण हवामान आहे तिथे कापूस पिकू शकतो आणि त्यातून लांबच्या लांब कापड विणता येऊ शकते. हवामान उष्ण असल्याने कपडे असे हवेत ज्यात महत्वाच्या भागांचे सरंक्षण होईल आणि हवाही खेळती राहिल. यातून शरीराभोवती गुंडाळून तयार करायच्या कपड्यांचा जन्म झाला. तर जिथे थंड हवामान आहे तिथे कापूस किंवा जवस पिकू शकत नाही. पण प्राणी मोठ्या संख्येने असतात. मग प्राण्यांना मारून त्यांचे कातडे कपड्यासाठी वापरणे गरजेचे झाले. कपडे उबदार असायला हवेत तर ते अंगाबरोबर असायला हवेत. त्यात हवा शिरून चालणार नाही. यातून शिवणाच्या कलेचा उदय झाला. लोकरीसाठी मेंढ्या पाळणे, त्यांच्या लोकरीतून धागा बनवून त्यातून उबदार कपडे बनवणे हे मानवाला माहिती व्हायच्या बरेच आधीपासून कातड्याचे दोन तुकडे एकमेकांना शिवून जोडणे हे अस्तित्वात आलेले होते. जगातली हातशिलाईची सगळ्यात जुनी सुई ही पक्ष्याच्या हाडापासून बनवलेली आहे. आजपासून ५०००० वर्षांपूर्वी. पक्ष्याची हाडे, लाकूड, हस्तीदंत, तांबं असा प्रवास करत करत आजच्या सुईच्या जवळ जाणारी लोखंडाची सुई इसपू तिसऱ्या शतकात बनलेली आढळते.

माणसे एका जागी स्थिरावली, त्यांचा समाज बनला आणि मग त्यातून संस्कृती बनली. जगभरातल्या सगळ्यात प्राचीन संस्कृतींपैकी एक भारतीय उपखंडात सापडते. जिच्याबद्दल आपण शाळेत शिकलो ती मोहेंजोदरो आणि हरप्पाची सिंधू संस्कृती. इथे मिळालेल्या अवशेषांच्यात एक पूर्ण जीवनशैली आहे. माणसांची घरे आहेत. त्यांची भांडीकुंडी आहेत. एक राजा आहे, एक नर्तिका आहे, या संस्कृतीची नाणी आहेत. पण या काळातल्या कपड्यांबद्दल मात्र अगदी जुजबी पुरावे आहेत. कापडाचोपडाचे अवशेष अस्तित्वात नाहीत. पण सापडलेल्या काही मूर्तीमध्ये कपड्यांच्या रेषा आहेत. हे कपडे म्हणजे शक्यतो शरीराभोवती कापड गुंडाळून तयार केलेले कपडे आहेत. तसेच बहुतांश मूर्ती या कपड्यांशिवायही आहेत. संशोधकांच्या मते तेव्हा सुती, लिनेन आणि कमी प्रतीचे रेशमी कापड वापरले जात होते. प्रत्यक्ष कपडे, कापडे काही मिळालेली नसली तरी सिंधूच्या तीरावर वसलेल्या या संस्कृतीतले स्त्रीपुरुष विविध प्रकारचे दागिने घालत होते हे सिद्ध करणाऱ्या अनेक वस्तू मिळालेल्या आहेत. कपड्यांशिवाय असलेल्या मूर्तीही दागिन्यांच्याशिवाय नाहीत. शरीर सजवण्याच्या प्रेरणेचा हात माणसाने इथेही सोडलेला दिसत नाही. लाकूड, प्राण्यांची हाडे, हस्तिदंत, वेगवेगळे धातू, पितळ्यासारखे मिश्र धातू, माती, लॅपिस लजुली सारखे खडे व मणी यांचा दागिन्यांमध्ये वापर केलेला दिसतो. खड्यांना धातूचे कोंदण करण्याची कला या संस्कृतीतील माणसाला अवगत होती. जगभरात दागिने बनवायच्या कलेची सुरुवात ही पहिल्यांदा सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते.

या काळाला वेदपूर्व कालखंड म्हणले जाते. रामायण आणि महाभारत घडले असल्यास या काळानंतरच आणि पहिले भारतीय साम्राज्य (मौर्य साम्राज्य) उदयाला यायच्या आधी म्हणजे वैदिक कालखंडाच्या दरम्यान घडले असू शकते असा संशोधकांचा मतप्रवाह आहे. या दोन्ही कालखंडांना एकेका बाजूला ठेवून मग रामायण आणि महाभारत काळातले कपडे, दागिने यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला तर जे चित्र मिळतं ते मात्र आपल्याला चक्रावून टाकणारं असतं.

लहानपणापासून बघितलेले सागर आणि चोप्रांच्या सिरीयलमधल्यासारखे प्लास्टिकची चमक असलेले पायघोळ धोतर राम नेसत नाही. व्हेलवेट, मोत्यांच्या माळा आणि जरिचा भरपूर वापर केलेले युद्धाचे चिलखत नसते. सीता व्यवस्थित शिवलेले फुलं कटोरी ब्लाऊज घालत नाही. जिथे बघावं तिथे जर लावून चकचकीत केलेला कृष्णाचा ड्रेस नसतो. युद्धामध्येही न मळणारे कपडे चुकूनही सापडत नाहीत.

आता हे कसे काय बरे? ही आणि वेशभूषेच्या हजारो वर्षांच्या प्रवासातल्या अजून अश्याच गमतीजमती या लेखमालेत तुम्हाला सांगणार आहे.

- नी 
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - जाने. २०१८ मधे प्रकाशित)
हे सर्व कुठून येते? २९ जानेवारी २०१८

0 comments:

Search This Blog