“ठकू, हे एवढं लांबरुंद कापड इकडून तिकडून गुंडाळायचं हा निव्वळ शिवण्याचा आळस आहे. किती गैरसोयीचं आणि अशास्त्रीय आहे हे.” शास्त्रीय मैत्रीण साडीवर वैतागत म्हणाली. ठकू विचार करत राह्यली.
भारतीय उपखंडातील गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये काळानुसार आणि प्रांतानुसार भरपूर विविधता आहे. जेव्हापासूनचे पक्के संदर्भ मिळतात तेव्हापासून बघितले तर कमरेवर बांधलेले वस्त्र म्हणजे अंतरीय आणि शरीराचा वरचा भाग झाकणारे वस्त्र म्हणजे उत्तरीय आणि डोक्यावर बांधलेले वस्त्र हे प्रामुख्याने दिसते. स्त्रिया व पुरुष दोघांच्याही वेशभूषेत हे दिसून येते.
अंतरीय हे कमरेपासून खालचे शरीर झाकणारे वस्त्र होते. कमरेशी एक गाठ मारून त्यावर तोलून धरलेले असे. ती गाठ कापडाच्या सुरुवातीचे एक टोक घेऊन मारलेली आहे की कापडाच्या मध्यात दोन टोके घेऊन बांधलेली आहे यावर उरलेली नेसण अवलंबून असे. कापडाच्या सुरुवातीला गाठ असेल तर शक्यतो निऱ्या घालून नेसलेले वस्त्र आणि मध्यात गाठ घेतली असेल तर निऱ्या नसलेले किंवा अगदी कमी निऱ्यांचे वस्त्र असा फरक दिसून येतो. आजही काष्ट्याची साडी आणि धोतर यांच्या नेसण्यामध्ये हा फरक आहे.. गुडघ्याच्यावर, गुडघ्याइतके, पोटरीइतके किंवा क्वचित पायघोळ असे अंतरियाचे वेगवेगळे प्रकार हे समाजातले स्थान, हुद्दा, व्यवसाय वगैरेंवर अवलंबून असत. काही ठिकाणी लुंगीसारखे गोल अंतरीयही दिसते. उत्तरीय हे ओढणी, उपरणे, शाल यासारखे प्रकरण. ते अंगावर ल्यायच्या - अंग झाकण्यासाठी पूर्ण गुंडाळून घेणे ते खांद्यावरून नुसतेच सोडून देऊन मिरवणे - अश्या वेगवेगळ्या पद्धती दिसतात. गुप्त काळाच्या आगेमागे काही प्रदेशांमध्ये स्त्रियांच्या कपड्यांच्यात हे अंतरीय आणि उत्तरीय एकत्र झालेले दिसून येते. आज आपल्याला साडी म्हणून जे माहिती आहे ते हेच. याच दरम्यान अंतरीय नेसायच्या गोल आणि काष्ट्याच्या अश्या दोन पद्धती स्पष्ट दिसतात.
डोक्यावर कापड गुंडाळून करायची पागोटी, मुंडाशी आपल्याला ऐकून माहितीयेत. कापडाच्या लांबीवर आणि डोक्याभोवती कापड गोल फिरवले जाते की क्रॉसमध्ये यावर सर्वसाधारणतः या शिरोभूषणांचा आकार अवलंबून असतो. कधी कुणाला फेटा, मुंडासे बांधताना बघितलंय? एखाद्या सवयीच्या फेटेभाद्दराच्या फेटा बांधताना दोन हातांच्या हालचाली बघा. निव्वळ नृत्य असते ते. एक हात उलटला म्हणजे दुसरा सुलटला पाहिजेच. लय कमी जास्त होऊन अजिबात चालणार नाही. तसे झाले तर फेट्याचा घट्टपणा गडबडणार आणि सगळा बेढब गोळा होऊन बसणार. या सर्वच शिरोभूषणांचा उपयोग उन्हापावसापासून संरक्षण म्हणून होतच असे पण युद्धात, हाणामारीत शस्त्राच्या घावापासूनही संरक्षण होत असे.
मौर्य कालखंडात सुरुवातीला तुरळक प्रमाणात स्त्रियांच्या डोक्यावरही ही अशी बांधलेली शिरोभूषणे दिसतात; जी नंतरच्या कालखंडात नाहीत. नंतर स्त्रिया डोके आच्छादण्यासाठी ओढणीसदृश वस्तू वापरू लागल्या.
अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते. भारतीय उपखंडाचा किंवा प्राचीन भारताचा विस्तार पार गांधार म्हणजे अफगाणिस्तानापर्यंत मानला जातो. तिथेही हे दुटांगीकरण दिसून आलेले आहे. कापडाच्या मध्यात गाठ घालून एक बाजू मागे काष्ट्यासारखी आणि दुसऱ्या बाजूचा पंखा करून पुढेच ठेवलेला किंवा दुसरी बाजू चक्क पदरासारखी खांद्यावर घेतलेली असा निऱ्या नसलेल्या साडीचा प्रकार बघायला मिळतो. गुप्त काळाच्या आसपास मात्र अजंठामध्ये आपल्याला माहिती असलेली निऱ्या घालून नेसलेली काष्ट्याची साडीही दिसते.
साधारण नेसूच्या पद्धतींचे बेसिक गणित लक्षात यायला लागले की मग विविध काळातील मूर्ती, शिल्पे बघताना त्या मूर्तीच आपल्याला त्यांची नेसूची पद्धत उलगडून सांगू लागतात. गाठ कमरेवर नक्की कुठे आहे पुढे की एका बाजूला? कमरेवरची गाठ कापडावर नक्की कुठेय? निऱ्या आहेत की नाहीत. असल्या तर किती आहेत? नेसणं गोल आहे की काष्ट्याचे? पायघोळ निऱ्या असल्या तरी पायावर बाहेरच्या बाजूला वस्त्र किंचित उचलल्यासारखे आहे तर इथे नक्की काष्टा घातलेला आहे वगैरे सगळे या मूर्तीना जरा नीट निरखून पाह्यले तर समजू शकते.
इथे मी मुद्दामून नव्वार हा शब्द टाळते आहे. नव्वार किंवा नऊवार हे कापडाच्या लांबीचे माप आहे. नेसायची पद्धत नाही आणि नऊवार लांब असलेली साडी नेसायच्या किमान ८-१० किंवा जास्तच पद्धती महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात मिळतील. काही राजघराणी वा सरदार घराण्यांच्यातल्या स्त्रिया अकरा बारा वाराची साडी नेसत असाही एक संदर्भ मिळालेला आहे. त्यामुळे काष्ट्याची वा गोल असेच साड्यांचे वर्गीकरण केलेले योग्य ठरेल.
साडीच्या एका टोकाला गाठ आणि मग निऱ्या घालून नेसणे आणि निऱ्या, गाठी असं काही न करता एकावर एक बरेच वेढे घेऊन नेसणे असे साड्यांच्या नेसण्याच्या पद्धतींचे दोन भाग करता येतील. निऱ्या घालून नेसायच्या साड्यांचे प्रदेशानुसार आणि जमातींनुसार अजून प्रकार आहेत. या दुसऱ्या प्रकारात पदरासकटचे आणि पदराशिवायचे असेही प्रकार आहेत. ठाणे जिल्ह्यातले वारली आदिवासी, रायगडातले कातकरी आणि ठाकर आदिवासी, मुंबईच्या कोळणी, मुंबईतलाच आगरी समाज, रत्नागिरीतला कुणबी समाज, सिंधुदुर्गातला आणि गोव्यातला धनगर समाज अश्यांच्या साडी नेसायच्या पद्धती या दुसऱ्या पद्धतीत येतात.
भारतातले हवामान उष्ण त्यामुळे अंगावरचे कपडे हे हवा खेळती राहील असे हवेत. कपड्याचे एकावर एक थर असता कामा नयेत. गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये गरजेचा भाग झाकला जाऊन बाकी भागात हवा खेळती राहते. पूर्वीचे अंतरीय असो वा आताची काष्ट्याची साडी, काष्टा हा सगळ्या वेढ्यांच्या वर असतो त्यामुळे नैसर्गिक विधींच्यासाठीही संपूर्ण वस्त्र उतरवायची गरज पडत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी समाजाच्या साड्या आणि सिंधुदुर्गातल्या ख्रिश्चन समाजाच्या साड्या अश्या प्रकारे नेसल्या जातात की मांडीशी चक्क खिसे तयार होतात. एखाद्या कार्गो बर्म्यूडाला असावेत तसे. त्यामध्ये काजू, भाजी, मोबाईल, घराच्या चिमणीसाठी मण्यांची माळ, कव्हर घातलेले आधार कार्ड असे सगळे मावू शकते. ठाकर, कातकरी अश्या आदिवासी जमातींचे वास्तव्य जास्त करून डोंगरात असते. आयुष्य कष्टाचे, झाडांवर चढणे, डोक्यावर बोजा घेऊन डोंगर चढून पार करणे हे नेहमीचेच. अश्या वेळेला कमरेशी भरपूर वेढे घालून नेसलेली साडी पाठीला आधार देणारी होत असावी. हे सगळे उलगडायला लागल्यावर साडीला किंवा गुंडाळलेल्या वस्त्राला अशास्त्रीय म्हणणे चुकीचे वाटायला लागते.
गोल अथवा काष्टा नेसायच्या विविध पद्धती या अनेक पिढ्यांच्या वापरातून हळूहळू परिपूर्ण बनत आलेल्या आहेत. साड्यांच्या नेसण्यातून, त्यांच्या काठांच्या रुळण्यातून तयार होणारे आकार, शरीराच्या आकाराबरोबर असलेला त्यांचा ताल, तोल याची पारंपरिक रचना बघितली तर त्यामध्ये एक गंमत आहे. बांधून अंगावर बसवला तरी शेवटी हा प्रवाहच आहे. झुळझुळ वाहणारा एक प्रवाह अंगावर इकडून तिकडून लपेटला तरी त्यातले वाहणे थांबत नाही. काष्टा मागे खोचल्यावर पुढे निऱ्यांना पडणाऱ्या चुण्या, त्यांची वळणे या सगळ्यांना पदराच्या काठाच्या रेषेने दिलेला छेद आणि मग त्या काठाला समांतर जाणाऱ्या पदरावरच्या चुण्या ही एक सुंदर रचना आहे. एका खांद्यावर सुरू झालेली काठाची रेषा दुसऱ्या बाजूच्या गुडघ्याच्या खालपर्यंत खेचली जाते तेव्हा त्यातून तयार होणारी लय संपूर्ण रचनेचा तोल सांभाळत असते, संपूर्ण रचनेला वाहती ठेवत असते.
पण आपण भारतीय आता नको इतक्या आखीव आणि बंदिस्त चकामकाटाला इतके भुललोय की हे मूळचे सौंदर्य विसरूनच गेलोय. साडीच्या नेसण्याच्या सौंदर्याकडे, रचनेकडे आम्ही बघतच नाही. त्यात साडी म्हणजे संस्कृती, साडी नेसणे म्हणजे घरातल्या लोकांविषयी आदर वगैरे भंपक संकल्पना वापरून आजही लग्न झालेल्या बाईवर साडी नसण्याचे दडपण आणले जाते. “त्या सोमण काकू तर साडी आणि बूट घालून मॅरेथॉनही धावतात.” या फोडणीची हल्ली भर पडलीये. घरातली एक सासू आणि परत ही ‘मनातली सासू’.. साडी नेसण्याचा सासुरवास नुसता!
या सगळ्यामुळे आम्हाला एकतर साडीबद्दलच राग उत्पन्न होतो पण तरीही संस्कृती जपायचीच असते मग साडीच्या रचनेचा विचार न करता, कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या जिजामाता किंवा बेळगाव सिल्क साडीला विचित्र चुण्या घालून, त्या इस्त्रीने बसवून, त्यावरून मशीनची शिवण फिरवून बनवलेले एक प्रकरण साडी म्हणून वापरले जाते. ती तसली साडी ‘घालून’ (हल्ली म्हणे ‘साडी घालतात’) आमच्या संस्कृतीचे प्रचंड भले होते.
कुठल्या कपड्यांमधून संस्कृतीचे खरंच किती भले होते त्याबद्दल जरा पुढच्या महिन्यात गप्पा मारूया.
- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - मार्च २०१८ मधे प्रकाशित)
'साडी नेसणं...' - २७ मार्च
0 comments:
Post a Comment