Monday, May 18, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - २. नेसूचं आख्यान

“ठकू, हे बघ तुमचा तो कोण सब्यसाची काय म्हणतोय. भारतीय स्त्रियांना साडी नेसता येत नसेल तर लाजा वाटल्या पाहिजेत म्हणे! चला एकाला तरी संस्कृतीची चाड आहे या जगात. साडी म्हणजे आपली संस्कृती आहे. यासाठी म्हणूनच सांगतो की स्त्रियांनी साडीच नेसावी. आख्ख्या जगात कुठेही अश्या प्रकारचे वस्त्र नाही. फार बुद्धिमान होते आपले भारतीय लोक.” शेजारचे सांस्कृतिक काका राष्ट्रप्रेमाने निथळत म्हणाले. “मी पण साडीच घातलीये. तीही नव्वारी.” सांस्कृतिक काकांची सांस्कृतिक पत्नी सलवारीला पदर फुटलेला असा एक ड्रेस घालून बाहेर येत म्हणाली. साडी ‘घालणे’ हे ठकूच्या कानाला जोरदार चावले तरी समोरचा नव्वारीच्या नावाने असलेला विनोद बघून तिला काही हसू आवरेना.

आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रे ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो.

जेव्हा मानवाने कपडे घालायला सुरुवात केली तेव्हा प्राण्यांचे कातडे वा कापड अंगाभोवती गुंडाळूनच सुरुवात केली. मग त्या गोष्टी अंगावर टिकवण्यासाठी, उबेसाठी वेगवेगळी साधने आणि पद्धती वापरल्या गेल्या. प्राण्यांचे कातडे गाठी मारून अंगावर टिकवणे शक्य नव्हते. तिथे काटे, सुया वगैरेंचा वापर झाला आणि त्यातून शिवणकलेचा जन्म झाला. मात्र कापड हे कातड्यापेक्षा अर्थातच पातळ होते. परत ते हवे तेवढे बनवता येत होते आणि कातड्यापेक्षा लवचिक असल्याने गाठी मारणे, खोचणे वगैरे शक्य होते. यातून मग कापड गुंडाळून बनवायच्या वस्त्रांचा इतिहास तयार झाला.

हे सारखं गुंडाळणे गुंडाळणे म्हणण्याने काहीतरी बोळा वा बोंगा प्रकारची वस्त्रे डोळ्यापुढे येत असतात. तेच ड्रेप किंवा रॅप असं टोपीकराच्या भाषेत म्हणलं की एकदम टापटीप, नीटनेटके वाटते. आपल्याकडे नेसणे, बांधणे अशी क्रियापदे आहेत. हिंदीत तर ओढना असेही क्रियापद वापरले जाते. काही प्रकारच्या साड्यांच्या नेसणीला बोलीभाषेत चक्क लावणे हे ही क्रियापद वापरले जाते. विशेषतः जी साडी निऱ्या घालून नेसायच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारे कमरेभोवती वेढे घेऊन लिंपल्यासारखी नेसली जाते त्याला साडी लावणे असेच म्हणाले जाते. साडी पूर्णपणे व्यवस्थित न नेसता नुसतीच अंग झाकण्यासाठी तात्पुरती नेसली जाते तिला साडी उभी लावणे असाही शब्द आहे. पण या सगळ्यांसाठी सध्या सोयीचे आणि त्यातल्या त्यात चपखल असे एकच काही म्हणायचे तर गुंडाळणे हा शब्द वापरण्याशिवाय पर्याय नाही. तर तोच वापरूया आणि त्यातले बोळापण, बोंगापण विसरायचा प्रयत्न करूया.

जगभरात जिथे जिथे कापडापासून(लिनन, सुती किंवा लोकर) वस्त्रसज्जेची सुरुवात दिसते तिथे तिथे ही अंगाभोवती गुंडाळून तयार केलेली वस्त्रे दिसतात. कंबरेभोवती कापड गुंडाळून घेतल्यावर कमरेपासून खालचा भाग झाकला जातो. आता हे कापड तिथेच राहायला हवे तर मग तिथे गाठ मारायला हवी. वेगवेगळे स्कर्ट ते लुंगी यातून तयार झाले. वरच्या भागासाठी दुसरे कापड गुंडाळून घेतले. शाली, खेस, चादर, उत्तरीय, उपरणे, ओढणी इत्यादींचा जन्म झाला. खालचे व वरचे कापड एक केले. खालच्या कापडाचा गाठीच्या पुढचा भाग खांद्यावरून घेतला. साडीच्या पूर्वजाचा जन्म झाला. इतकी साधी गोष्ट आहे. आणि अर्थातच ही फक्त भारतात घडलेली नाही.

जगभरातल्या सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या संस्कृतींपैकी सिंधू संस्कृतीबरोबरच ईजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृतींमध्ये गुंडाळलेली वस्त्रे दिसतात. वस्त्र गुंडाळलेली एक मूर्ती मेसोपोटेमिया (सुमेर) मध्ये सापडलेली आहे. ही मूर्ती पूर्ण आहे त्यामुळे ते वस्त्र आधी कमरेशी गुंडाळून मग खांद्यावर घेतलेले असावे हे कळते. ज्यांना साडी नेसता येते त्यांना हे वाचून आपली सहावारी साडी मेसोपोटेमियाची कृपा आहे असे वाटेल. पण ते तसे नाही. हे अगदी साध्या प्रकारचे गुंडाळणे आहे आणि ते बहुतेक सगळीकडेच सुरुवातीच्या काळात दिसते.

चित्र १ - मेसोपोटेमियन, सुमेरियन मनुष्य (इसपू २२००)
1. meso 1.jpg

याच मेसोपोटेमियामध्ये कमरेशी कापड गुंडाळून बनवलेला स्कर्टही आहे आणि कापड खांद्यावरून मागेपुढे नेऊन, बांधून तयार केलेला टॉपही आहे. या वर्णनाने हा ड्रेस एखाद्या हॉट वगैरे तरुणीचा आहे असा समज होईल. तर तसे अजिबात नाही. हा ड्रेस सैन्यातल्या पुरुषांचा आहे. स्त्रियांच्या कपड्यातही स्कर्ट आहे आणि बांधून बनवलेल्या टॉप ऐवजी शालीसारखी गुंडाळलेली केप आहे. एकच कापड कमरेभोवती वा छातीभोवती गुंडाळून मग खांद्यावरून घेऊन बनवलेला ड्रेस आहे. यासाठी भरपूर रुंद कापड लागत असे. याचा अर्थ तेवढे रुंद माग अस्तित्वात होते असे म्हणायला हरकत नाही.

चित्र २ - मेसोपोटेमिया ड्रेपिंग
2. meso2.jpg

जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी तिसरी म्हणजे ईजिप्शियन संस्कृती. त्यांचे कापड लिनन होते. सुती कापड त्यांना माहिती झालेले नव्हते. पण कपडे अंगाभोवती गुंडाळून वस्त्रे बनवण्याची आयडिया त्यांना माहिती होती. कमरेशी कापडाची पट्टी गुंडाळून लंगोटासारखे वस्त्र मग त्यावरून मिनीस्कर्टसारखे वस्त्र असा सर्वसामान्य इजिप्शियन पुरुषांचा पोशाख दिसतो. हा मिनीस्कर्ट म्हणजे एक प्रकारची लुंगीच. अगदी कमी पन्ह्याच्या कापडाची लुंगी. कधी कधी हुद्द्यानुसार या स्कर्टची लांबी पार घोट्यापर्यंतही असे. कमरेवरच्या शरीरावर कापडाच्या पट्ट्या वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळलेल्या असत. या पट्टयांचा उपयोग अंग झाकण्यापेक्षा विविध कामे करताना घाम शोषून घेण्यासाठी होत असे. स्त्रियांच्या कपड्यांमध्येही या सगळ्या गोष्टी असतच. तसेच मोठ्या चौरस आकाराचे कापड शरीराभोवती विशिष्ट प्रकारे गुंडाळून एक गाऊनसारखे वस्त्रही वापरले जात होते.

पण इजिप्तच्या गुंडाळलेल्या वस्त्रसज्जेचे सर्वात महत्वाचे प्रकरण ज्याचे तंत्र आजही डिझायनर्सना मोहात पाडते ते म्हणजे ईजिप्शियन चुण्या. अगदी बारीक, पट्टीने आखून बनवल्या असाव्यात अश्या एकसारख्या चुण्या. वेगवेगळ्या दिशेने या चुण्या घातलेल्या असत. त्यामुळे कापड अंगाभोवती बसवल्यावर त्या चुण्या विशिष्ट प्रकारे अंगाभोवती पडत असत. इथे परत कपड्यांचा मूळ उद्देश शरीर सजवणे हाच असणार हे अधोरेखित होते.

चित्र ३ - ईजिप्शियन सीन
3. egypt.jpg

यानंतर आलेल्या प्राचीन संस्कृती म्हणजे ग्रीक आणि मग रोमन. या दोन्ही संस्कृतींमध्ये शिवलेल्या आणि गुंडाळलेल्या दोन्ही प्रकारचे कपडे आहेत. शिवलेले कपडे हे शक्यतो अंगाबरोबर असलेला एक पहिला पापुद्रा या स्वरूपाचे तर गुंडाळलेले कपडे हे पूर्ण आकृतीचा आकार उकार ठरवणारे, माणसाला तपशील देणारे, माणसाचे तपशील दाखवणारे वगैरे आहेत. कापडे लिनन आणि लोकरीची आहेत पण सुती कापडही दिसते.

भरपूर रुंद असलेले कापड घेऊन त्याला ठराविक घड्या घालून बनवायचे कायटोन, पेप्लॉस, एक्झोमिस अश्या नावांचे साध्या ट्यूनिक सारखे ड्रेसेस बघायला मिळतात. दोन्ही खांद्यावरून किंवा एकाच खांद्यावर आणि उंचीनुसार ही नावे ठरतात. शालीसारखे एका किंवा दोन खांद्यावरून वागवायचे प्रकरणही आहे. त्याला पुरूषांच्यात हायमेशन आणि स्त्रियांच्यात डायप्लेक्स म्हणले जात असे.

चित्र ४ - ग्रीक सीन
4. greek.jpg

ग्रीकांच्या लगेच नंतरच्या रोमन संस्कृतीने ग्रीक वेशसज्जेतल्या अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. पण रोमन संस्कृतीतले महत्वाचे असे गुंडाळलेले वस्त्र म्हणजे टोगा. हे वस्त्र मानाचे होते. समाजातल्या ठराविक स्तरातील पुरुषांनाच हे वस्त्र वापरायचा अधिकार होता. स्त्रियांसाठी एक ओढणीसारखे वस्त्र डोक्यावरून घेतलेले असे त्याला पल्ला असे नाव होते. हे सभ्य स्त्रियांसाठी अनिवार्य होते.

चित्र ५ - रोमन सीन
5. roman.jpg

टोगा हा शब्द आपल्याकडे मुघल वेशभूषेमध्ये किंचित रूप बदलून चोगा म्हणून आलेला आढळतो. तेही सर्वात बाहेरचे असलेले वस्त्र आहे. पण टोगा नेसला जातो चोगा हा अंगरख्यासारखा शिवलेला असतो. स्त्रियांच्या डोक्यावरून घ्यायच्या छोट्या ओढणीसदृश वस्त्राला पल्ला म्हणले जाणे आणि आपल्याकडे साडीच्या पदरालाही पल्ला म्हणले जाणे ही अजून एक गम्मत इथे दिसते. आता या गमती नुसत्या योगायोग म्हणून आहेत की मानवाच्या स्थलांतरात, कपड्यांच्या प्रवासात यांचा खरंच एकमेकांशी संबंध आहे? हा एक वेगळा विषय आहे.

यानंतरच्या विविध संस्कृतींमध्ये गुंडाळायचा कपडे हे शाल, ओढणी यासारखेच मुख्यत्वेकरून दिसतात. आफ्रिकन आणि काही दक्षिण अमेरिकन संस्कृतींमध्ये डोक्याला गुंडाळायच्या टापश्या दिसतात. परंतू त्यापलीकडे गुंडाळलेल्या कपड्यांची विविधता ही मात्र भारतीय उपखंडातच टिकून आहे. त्या वस्त्रांबद्दल पुढच्या वेळेला जाणून घेऊया.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - फेब्रु. २०१८ मधे प्रकाशित)
नेसूचे आख्यान - २७ फेब्रुवारी 

0 comments:

Search This Blog