Tuesday, November 11, 2008

स्वच्छतेच्या बैलाला..!!

मायबोलीच्या दिवाळी अंकात माझा 'स्वच्छतेच्या बैलाला..!!' हा लेख प्रसिद्ध झाला.
-------------------------------------------------------------------
"इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?"
प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता. अत्यंत त्रासिक चेहर्‍यापासून सुरू करून मग थोबाडावर एक गलिच्छ हसू घेऊन मुस्कटात मारल्यासारखं उत्तर जयंतने फेकलं.
"मला इतर कामं आधी करू देत."
'तुम्हा पोरींचे नखरेच जास्त, काम कमी..' इत्यादी सगळं तो मनात बडबडला असणारच. नखशिखांत घाण वाटली मला. थोडक्यात लेडीज टॉयलेट ही गरज नसून चैन होती. गरजेला कुठलाही आडोसा जवळ करणे हे अपेक्षित होते. स्टारच्या सगळ्या मागण्या अजिजीने झेलणार्‍या प्रोड्युसरला युनिटमधल्या बायांसाठी फिरते टॉयलेट किंवा जास्तीची व्हॅनिटी मागवणे परवडण्यासारखे नव्हते, असेही नाही. पण प्रॉडक्शन मॅनेजरचा हा घाणेरडा ऍटिट्यूड मला तसाही नवा नाही. कामाच्या निमित्ताने मी बरीच फिरते. शहरात आणि शहराबाहेरही. सगळीकडे हेच.

रेल्वे किंवा विमानाचा प्रवास असेल तर काही प्रश्न नसतो पण बस किंवा कारने जाणार असू तर प्रवासात पाणी पिणं हे संकट होऊन बसतं. पाण्याच्या एकेका घोटाबरोबर एकेक प्रश्न उगवत असतात. वाटेत टॉयलेट मिळेल ना? कमोड असेल की इंडियन? कमोड असेल तर निदान लेडीज वेगळं असेल ना? जे काही मिळेल ते स्वच्छ असेल ना? तिथल्या खिडक्या तुटलेल्या नसतील ना? तिथे हात धुवायला पाणी मिळेल ना? हजार गोष्टी. मग पाणी पिणं टाळायचं. 'खूप वेळ कंट्रोल आहे माझा' असं अभिमानानं म्हणायचं आणि अनेक रोगांना निमंत्रण द्यायचं.

सुरूवात कधी झाली बरं या सगळ्याची?? बरोबर.. शाळेपासून.
"बाई गच्चीला जाऊ?"
असं रूपालीने विचारल्यावर सगळा वर्ग फिसफिसला होता. आपण विचारलं तर आपल्यालाही हसतील त्यापेक्षा नकोच ते. सुट्टीपर्यंत थांबू. असं म्हणत पहिल्यांदा पायावर पाय ठेवून पुढचा तास काढला होता.
'गच्चीपाण्याच्या सुट्टीत खूप मोठी रांग असते.'
'खूप घाण वास येतो.'
'तिथे पाणीच नाहीये.'
'तिथे अंधार आहे. अंधारात काही असलं तर?'
अश्या अनेक कारणातून हळूहळू 'शाळेतून घरी गेल्यावरच काय ते बघू' हे अंगवळणी पडलं.

मग थोडंसं मोठं झाल्यावर शाळेच्या वेळातही पर्याय उरेना, डाग पडण्याची भिती असे. तेव्हा मनात दाटणारी सगळी घाण, सगळी मळमळ घेऊन आत जायचं. तिथला अंधार, तिथली जळमटं, तिथे पाणी नसणं किंवा असलं तरी ते डबडं घाण असणं, नापास होणार्‍या मोठ्ठाड मुलींनी कर्कटकानी कोरून ठेवलेलं विचारवाङ्मय आणि चित्र असं सगळं सगळं सहन करत आपला कार्यभाग उरकायचा. आईकडून तिच्या लहानपणी बाजूला बसण्याबद्दल ऐकलं होतं ते बरं असं वाटायचं. "हे जे काय तुमच्या शरीरात घडतंय ते काही घाण नाहीये. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं शरीर आई होण्यासाठी तयार होऊ लागलंय." असं 'त्या' लेक्चर्समधे सांगितलं होतं खरं पण त्या लेक्चर्सच्या बाईंना कुठे त्या टॉयलेटमधे जावं लागतं बदलायला. असं काय काय डोक्यात येऊन मग ते दिवस नुसतं घाण घाण वाटायचं.

लहानपणी आईबाबांच्या बरोबर प्रवासाला जाताना शक्य असेल तिथे रेल्वे असायची सुदैवाने. कारण मी नी बाबा दोघेही मोठ्ठे 'वकार युनूस!' त्यामुळे एसटीच्या भानगडीत आम्ही पडत नसू. पण आईबरोबर कोकणात जायचं तर एसटीनंच जावं लागायचं. एकदा तिसरी चौथीतली गोष्ट असेल. बरेच नातेवाईक मंडळी एकत्र कोकणात जात होतो. रात्रीचा खूप वेळाचा प्रवास. तोही एसटीने. आपापल्या आयांबरोबर एसटी स्टॅण्डवरच्या टॉयलेटमधे जायला आम्ही दोघी बहिणींनी नकार दिला. तिथली अवस्था काय वर्णावी. तिथे जायच्या रस्त्यावर बरंच आधी पुढे काय असणार आहे हे वासावरनंच कळत होतं. साधारण जिथून आडोसा सुरू होतो तिथे रात्रीचा मिणमिणता दिवा. खाली बघितलं तर जमीन सगळी ओली आणि कुठे कुठे साचलेलं पाणी नि त्यावर टाकलेली माती. पण एकाही नळाला पाणी नाही. आतली टॉयलेट्स फुटलेली नी कोरडी ठाक. आतमधे भरपूर जळमटं नि माती. त्यात एक बाई आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या बाहेरच काम उरकून मोकळी झालेली दिसली. तेव्हा ओली जमीन आणि साचलेल्या पाण्याचं गणित अगदी नीट कळलं. अश्या ठिकाणी जायला नकार दिल्यावर मग साधारण लहानपणी जे शक्य होतं ते म्हणजे पूर्णपणे बाहेर साधारण कडेचा भाग बघून सर्व भावंडांना एका लायनीत बसवलं होतं. एसटीच्या प्रवासातला हा सगळ्यात भीषण प्रकार तेव्हापासून डोक्यात बसला तो बसलाच.

शाळेनंतर कॉलेजमधे गेल्यावरही फार काही फरक नाही पडला. शाळा निदान फक्त मुलींची होती. भल्या मोठ्ठ्या शाळेच्या कुठल्याही दिशेचं टॉयलेट हे आमच्यासाठीच होतं. आता कॉलेजमधे झालं असं की क्षेत्रफळ वाढलं. वर्ग लांब लांब आणि आमच्यासाठी एकुलती एक एलआर(लेडीज रूम) ज्यात आत बरीच टॉयलेटस होती. म्हणजे दोन लेक्चर्सच्या मधे जाउन यायचं तर पुढच्या लेक्चरची पाचदहा मिनिटं गेली. नपेक्षा बंक मारलेला काय वाईट. त्यामुळे कधी टॉयलेटला जाण्यासाठी लेक्चर बंक तर कधी लेक्चरसाठी एलआरला जाणं बंक.

कॉलेजच्या काळातच नाटकासाठी दौरे, एनसीसी चे कॅम्पस इत्यादी सुरू झालं. मग 'हाल कुत्रे खात नाही' या म्हणीचा अर्थ चांगलाच लक्षात आला. दौर्‍यांना श्रीमंती थाट अर्थातच नसायचा. जिथे थांबू तिथे जसं असेल तसं टॉयलेट वापरायचं आणि निमूट पुढे जायचं. हेच अंगवळणी पडायला लागलं. अगदी त्या दिवसात सुद्धा. परत वर माझा आठ आठ तासाचा कंट्रोल आहे हे अभिमानानं मिरवायचं आपापसात. हीच गोष्ट कॅम्पची. १०-१२ दिवस ४००-५०० मुली जिथे रहाणार तिथे निदान बर्‍या टॉयलेट्सची, आंघोळीची सोय असावी असं त्यांना कधी वाटलं नाही. बहुतेक 'सैन्यात का घेत नाही तुम्हाला कळलं?' असं काहीतरी सांगायचं असेल त्यांना. पाणी कमी प्यायची सवय अशीच लागत गेली असावी.

शिक्षण संपलं. परदेशातलं शिक्षणही उरकलं आणि मुंबईत कामाला सुरूवात झाली. लग्नही झालं होतं. तेव्हा व्यवस्थित पाणी पिणे आणि एकुणात या सगळ्याच गोष्टींचा awareness, गांभीर्य इत्यादि कळून चुकलं होतं. पण म्हणून नष्टचर्य संपतं का? तर मुळीच नाही.

हल्ली प्रवास करताना वर म्हणल्याप्रमाणे by road असेल तर चिंताच चिंता असतात. अजूनही छोट्या ठिकाणची एस्ट्यांची टॉयलेट्स त्याच भयाण अवस्थेत असतात. अजूनही गावंढळ बायका आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या आडोश्याच्या भागातच बसतात. छोटेमोठे धाबे भरपूर असतात. पण तिथे टॉयलेट असतंच असं नाही. असलं तर एकच जे अंधारं, इकडनं झाकलं तर तिकडे उघडं पडतंय अश्या स्वरूपाचं आणि अतीव घाण असं असतं. चकचकीत हॉटेल शोधण्याशिवाय आणि तिथल्या माजोरीला तोंड देण्याशिवाय पर्याय नसतो. बर एवढं करूनही तिथे लेडीज टॉयलेट वेगळं असेलच आणि ते स्वच्छ असेलच याची खात्री नाही. पेट्रोल पंपावर लेडीज टॉयलेट वेगळं असतं ते बर्‍याचदा तिथे काम करणारी पोरं स्वत:चं खाजगी टॉयलेट म्हणून वापरतात. आडवळणाच्या प्रवासात असल्या ठिकाणी जाण्यापेक्षा झाडाझाडोर्‍याचा, दगडांचा आडोसा शोधून तिकडे जाणे हे जास्त स्वच्छ वाटतं.

'प्रवासात कुठे थांबायचं?' यावरून आमच्या दोघांच्यात (मी आणि नवरा) एकतरी प्रेमसंवाद ठरलेला असतो. आजवरच्या अनुभवाने मी paranoid असते की हा कुठेतरी भयाण जागी थांबवणार गाडी. किंवा ड्रायव्हरने थांबवली अश्या कुठल्याही जागी तर त्याला काही म्हणणार नाही. मग होतं miniature World War III. नवरा बरोबर नसेल आणि बरोबर केवळ ड्रायव्हर असेल किंवा असे लोक असतील की ज्यांना योग्य टॉयलेट हवं असं मी सांगू शकत नाही किंवा सांगितलं तरी त्यांच्या स्वच्छच्या व्याख्या वेगळ्या असतात तर मग मी केवळ देवाची प्रार्थनाच करू शकते. सगळा प्रवास याच टेन्शनमधे. कधी निर्लज्जपणे याबद्दल बोललेच तर मग वरती शूटवरचा जो अनुभव दिलाय त्याची पुनरावृत्ती. अगदी ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर फिरतानाही यात काही फरक नाही.

हा प्रवासातला अनुभव पण मुंबईतल्या मुंबईत फिरताना होणारी फरपट काही कमी नसते हो. कापडाचं, कपड्याचं मार्केट एका ठिकाणी तर टेलर दुसर्‍या ठिकाणी, डाय करणारा अजून तिसर्‍या ठिकाणी. प्रॉडक्शनचं ऑफिस अजून एका ठिकाणी. अशी त्रि च नाही तर अनेकस्थळी यात्रा मला एका दिवसात पार पाडायची असते. पाण्याची बाटली बरोबर ठेवलेली असते पण पुढच्या दोन तासात टॉयलेट मिळेलच याची खात्री नसतेच. सुलभची अवस्था काही ठिकाणी बरी म्हणावी इतपतच आहे. पण तिथेही माझ्या हातातली खरेदीची (कामाच्या खरेदीची) बोचकी ठेवायची कुठे हा प्रश्न असतोच. लोकलच्या स्टेशन्सवरची टॉयलेटस हा एक मोठ्ठा विषय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने चर्चेला घेतला होता, तेव्हा त्या लेखातून मिळालेलं चित्र भयाण होतं. अर्धवट फुटलेल्या भिंती, पाणी नसणं, लेडीज टॉयलेट हे सगळ्यांच्या नजरेसमोर असणं, खिडकीच्या जागी फक्त रिकामा चौकोन, लेडीज टॉयलेटमधे छक्के, गर्दुले, दलाल, बेघर कुटुंब यातल्या कुणाचं तरी राज्य असणं हे सगळं सगळं त्यात फोटोसहित होतं. कुणीतरी विषयाला तोंड फोडलं यावर बरं वाटलं होतं पण नंतर काहीच नाही. रेल्वे प्रशासन किंवा अजून यासंदर्भातले इतर विभाग यातल्या कोणालाच त्याविषयी काही करावं असं वाटलं नाही. माझ्यासारख्या अनेक जणींच्या रोजच्या hygiene शी संबंधित असलेला हा विषय कुणालाच लक्ष घालावं इतका महत्त्वाचा वाटला नाही.

मॉल्स, मॅक्डोनाल्डस, सिसिडी, बरीस्ता इत्यादी यांचा चंगळवादाशी संबंध जोडा तुम्ही पण त्यांनी आमची किंचित का होईना सोय बघितलीये हे विसरता कामा नये. कारण फिरत असताना अधेमधे कुठे खावं आणि तिथेच टॉयलेट वापरावं तर अनेक छोटी छोटी हॉटेल्स तर बिना टॉयलेटचीच असतात. मॉल्स सोडा पण या बाकीच्या ठिकाणचं टॉयलेट वापरण्यासाठी मला एका वेळेला किमान ५० रूपये त्या त्या ठिकाणी खर्चावे लागतात त्याचं काय! दिवसाला केवळ टॉयलेटला जाता यावे म्हणून दिडशे दोनशे (किंवा गरजेनुसार जास्त) रूपये खर्च करणे हे कुणाला नि कसं परवडावं? गरोदर बाया काय करत असतील अश्या वेळेला? हे सगळे प्रश्न चिवचिवत रहातातच.

बर मॉल्स सोडून या इतर ठिकाणी लेडीज आणि जेन्टस अशी वेगळी टॉयलेटस नसतात. आणि त्यातून तो कमोड असतो. डिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर ही आपल्याकडे अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे. आणि टॉयलेट पेपर बहुधा संपलेलाच असतो. कमोडची सीट वापरताना वर ठेवावी हे बहुतांशी भारतीय पुरुषांना माहीत नसतं किंवा ते तसं करणं हे त्यांच्या इगोला झेपण्यासारखं नसतं. त्यामुळे अश्या ठिकाणी जाणं हे अनेक रोगांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. "शेवटी आपल्याला तिथे बसायचं असतं. कसलंही infection आपल्यालाच आधी होणार ना!" एका मैत्रिणीचं वाक्य सतत पटत रहातं. सीसीडी वा बरिस्ताच नव्हे तर अनेक मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्स मधे नियमानुसार असायला हवे म्हणून एक टॉयलेट असते, जे कुक, साफसफाई करणारी पोरे, इतर स्टाफ आणि ग्राहक असे सगळ्यांसाठीच असते. आता हे असे कमोडवाले टॉयलेट बायकांनी वापरायच्या लायकीचे असेल का याचा तुम्हीच अंदाज घ्या. आणि हे केवळ उडपी टाइप्सच्या हॉटेल्सबद्दल नाही तर दादर, पार्ला, जुहू, लोखंडवाला अश्या ठिकाणची 'अपमार्केट' म्हणता येईल अशी रेस्टॉरंट्स पण आहेत जिथे टॉयलेट मात्र एकच आहे. त्यामुळे चांगल्या कॉफीशॉपमधे बराच वेळ बसायचं असेल तर मग मेरियाट किंवा ऑर्किड किंवा तशी ४-५ तारेवाली हॉटेल्स बरी पडतात. कारण तिथे वेगळी वेगळी टॉयलेटस असतात आणि एकदम स्वच्छही असतात. पण हे ज्याला परवडेल त्याला. सामान्य उत्पन्न असलेल्या बाईने बाहेर 'जाऊच' नये का मग? आणि गेली तरी पाणी पिऊ नये, प्यायलंच तर भरपूर चालावं उन्हातून म्हणजे घाम येउन जाईल आणि जायची गरजच भासणार नाही? आणि पिरीयडच्या दिवसात तर घराच्या बाहेर पडूच नये?

पॅथोलॉजीवाली डॉक्टर मैत्रिण माझ्याशी गप्पा मारत होती.
"मधे एक केस आली होती. २०-२५ वर्षांची मुलगी. युरिन एकदम व्हाईट. पासिंगच्या वेळेला जळजळ प्रचंड. मी तिला विचारलं की पाणी पितेस का भरपूर तर म्हणे कसं पिणार? फिरण्याचा जॉब माझा. जाणार कुठे? ती मुलगी सकाळी घरून निघायच्या आधी जायची ते पार संध्याकाळी घरी येईपर्यंत तशीच. पण एकुणातच अश्या कारणांनी युरिन इन्फेक्शन असण्याचं प्रमाण खूप वाढलंय."
"काय करणार गं. नसतंच शक्य कुठे जाणं. थांबावंच लागतं. कंट्रोल ठेवावाच लागतो."
"पण याचे परिणाम काय होतील कळतंय का? एकतर हे असलं इन्फेक्शन म्हणजे त्रास. बर तेवढ्यावर भागत नाही. उद्या या मुलीचं लग्न होणार. सगळ्या गोष्टी शेवटी एकाच जागी. किती त्रास? आणि pregnant राहिल्यावर हे असं न जाणं म्हणजे तिच्या आणि बाळाच्या आरोग्याशीही खेळच की गं."
"पण मग करायचं काय नि कसं? सगळं सोडून घरी बसणं हा तर उपाय होत नाही ना!"
या वाक्याशी सगळं संभाषण संपलं. अनुत्तरितच.

नाही, हे नखरे नाहीत किंवा अतिस्वच्छता नाही. पंचतारांकित सोयींची अपेक्षाही नाही. किमान सुविधांची गरज आहे.
पूर्वीच्या बायका कसं करायच्या हा युक्तिवादही उपयोगाचा नाहीये. कारण, पूर्वीच्या बायका पण प्रवास करायच्या आणि हे सगळं सहन करायच्या. पण एकतर त्यांनी लाजेकाजेपोटी हे सहन केलं असेल आणि कदाचित आम्ही आज जितक्या फिरतो तितक्या त्या सगळ्या फिरत नसणार त्यामुळे ह्या समस्या तेव्हा काहीजणींच्याच असणार.

एवढा त्रास होतो तर बसा घरातच असं काही मध्ययुगीन मानसिकतेची माणसं म्हणतीलच पण तेही उत्तर नाही, निश्चितच नाही. गरजेच्या वेळेला लेडीज टॉयलेट मिळणं ही एक बेसिक गोष्ट आहे. हा बेसिक हक्क आहे. आणि दुर्दैवानं हे आपल्या विविध व्यवस्थांपैकी कुठल्याच व्यवस्थेत महत्त्वाचं मानलेलं दिसत नाही. कुणालाच त्याचं महत्त्व जाणवत नाही.

मग काय करायचं? आपण आपलं भरपूर पाणी प्यायचं नि आपले आपल्याला परवडतील आणि झेपतील असे उपाय शोधायचे हे नक्की. मग ते मॉल मधे घुसणे, प्रत्येक उपनगरात एक तरी ओळखीचं घर मॅनेज करणे, सगळी किळस बाजूला ठेवून सुलभमधे शिरणे, हॉटेलमधे किंवा ऑफिसेसमधे गेल्यावर निर्लज्जपणे टॉयलेट विचारणे, टॉयलेट विचारल्यानंतर उत्तर देणार्‍याच्या चेहर्‍यावरचे सगळे घाणेरडे भाव दुर्लक्षित करणे, प्रवासात/ बाहेरगावच्या शूटवर योग्य टॉयलेटसाठी भांडण करणे यातले काहीही असो... आणि त्यातूनही चिडचिड उरलीच तर असा लेख लिहायचा...

तेव्हा (हातामधे प्यायच्या पाण्याची मोठ्ठी बाटली घेऊन) स्वच्छता आणि आरोग्याच्या नावाने.... चांगभलं...! चिअर्स...!!

-------------------------------------------------------------------------------


लोकांनी मनापासून प्रतिक्रिया दिल्याच पण या संदर्भात काही करायला हवे ही भावना मूळ धरू लागली. त्यानुसार या विषयावर एक चर्चाही सुरू केलीये मायबोलीवर. लेख आणि चर्चा दोन्हीची माहिती तुम्हाला कळावी म्हणून ब्लॉगवर दुवे टाकतेय. जरूर वाचा. तुमच्या मनात काय येतंय तेही आम्हाला कळूद्या. मायबोलीवर वा इमेलने आम्हाला कळवा. सहभागी व्हा.
-नी

Saturday, November 8, 2008

व्हॉट काइंड ऑफ आयडीया दुबेजी इज....

कालची मेजवानी....
द दुबे शो
स्थळ - पृथ्वी थिएटर, जुहू
सादरकर्ते/ सूत्रधार - सुनील शानबाग आणि आकाश खुराना.

दुबेजींच्या कारकिर्दीचा लेखाजोखा. त्यांच्या अभिनेत्यांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार. जुनी क्लिपिंग्ज. दुबे आणि वर्कशॉप्स आणि त्यातले excercises. all the things that hee keeps saying and he has said before... important, eccentric.. all of it. A real tribute to Dubeyji...त्यांच्या सगळ्या स्टुडण्टस कडून.. रत्ना पाठक शहा, सुलभा देशपांडे, नीला भागवत, उत्कर्ष मजुमदार यांच्यासारख्या दिग्गजांनी सांगितलेल्या आठवणी, त्रिशला, दिव्या आणि इरा या आमच्या पिढीतल्या दुब्यांच्या मुलींनी शेअर केलेल्या गोष्टी. किशोर कदमचं दुब्यांबद्दलचं बोलणं. सातासमुद्रापलिकडून अलकनंदा समर्थ यांनी पाठवलेली क्लिपिंग्ज आणि आठवणी, चेतन जायच्या आधी त्याने दुबेजी आणि सावल्याच्या प्रोसेस विषयी बोललेलं त्याचं क्लिपिंग (इथे मात्र I choked) दुब्यांच्या नाटकातले काही तुकडे.... असं अजून खुप सारं.. आणि हे सगळं बघताना प्रेक्षकांच्यात बसलेल्या दुबेजींची expressions बघत राहणं..
२ तास... खूप मज्जा, खूप दंगा, आपल्या गुरूबद्दल परत एकदा खूप काही वाटणं, खाल्लेल्या शिव्या, घातलेले वाद आठवणं.... मोठ्ठी मेजवानी...

नंतर दुबेजींच्याबरोबर खूप उशीरापर्यंत गप्पा नेहमीप्रमाणेच..

Should Thank Sanjana and Prithvi for this..
Muahhh.. Love you Dubeyji!!

Sunday, November 2, 2008

दिवाळीचं लिखाण...

ऑनलाइन दिवाळी अंकाची प्रथा चालू करण्याचं श्रेय www.maayboli.com या संकेतस्थळाला जातं. मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंकाचं हे यंदाचं ९वे वर्ष. हा दिवाळी अंक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2008/

त्यात या ठिकाणी माझा लेख आहे. जरूर वाचा.
http://vishesh.maayboli.com/node/26

झुंजुमुंजु नावाचा एक दिवाळी अंक आहे. ज्यावर राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र मुखपृष्ठावर आहे. या अंकात पण माझी एक कथा आली आहे.

रेषेवरची अक्षरे हा एक मराठी ब्लॊगविश्वातल्या ब्लॊगज चा दिवाळी अंक आहे.
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1
यामधेही माझी एक कविता आहे.

Sunday, September 28, 2008

प्रिय मित्रा!!

क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या 'प्रिय' या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही

या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे....

-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच

हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखवून जाण्यासाठी..

या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भितीही वाटली.

प्रिय मित्रा,
मला सांग रे
तात्कालिकची मर्यादा किती?
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?

सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!

-नी

Saturday, September 20, 2008

सूर्यास्त

गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.

Friday, September 19, 2008

ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी

"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

Tuesday, May 6, 2008

पोर्ट्रेट - मेराल्डिनागेल्या आठवड्यात पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे 'मी एक माझे दोन' हे कॉमेदिया देलार्त पठडीचे नाटक सादर झाले. कपडे अर्थातच मी डिझाइन केले होते. त्यातल्या एका व्यक्तिरेखेचे हे रंगमंचाच्या मागे काढलेले छायाचित्र.
कॅमेरा निकॉन कूलपिक्स एल १५, ८ मेगापिक्सल. ऑटो फोकस विथ ३ एक्स ऑप्टिकल झूम.
सेटिंग - सीन:पोर्ट्रेट.
फ्लॅश नाही.
लाइटिंग म्हणजे मागे पब्लिक तडफडू नये म्हणून एक ६० चा बल्ब वरती टांगला होता तेवढाच. बाकी अंधार. फोटो काढला तेव्हा संध्याकाळचे ७:३० - ८ झाले होते.
तयार झालेल्या निगेटिव्ह स्पेसेस, शार्प हायलाइटस, पिरियड चा फिल या सगळ्यामुळे मला इंटरेस्टिंग वाटला. थोडासा पेंटिंगसदृश वाटला. तुम्हाला काय वाटतंय बघा. दिग्गजांच्या प्रामाणिक कॉमेंटस अपेक्षित आहेत.

Thursday, April 3, 2008

मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!

"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."
मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन ऐकत होतो.
"असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्‍या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्‍याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका महान वास अजून कशाचा असू शकेल असं वाटत नाही."
आम्ही गाडीत आधीच बसलो होतो.
पहिल्या पावसात, नव्याकोर्‍या लेदर सीटस असलेल्या बीएमडब्ल्यूमधे मोगर्‍याचा गजरा हातात घेऊन बसायचं.. सुखाची परमावधीच की. झालं! ठरलं! हे कधीतरी जमलं पाहिजेच.

पैसा कमवायचाच हे परत एकदा अधोरेखित झालं होतं डोक्यात. बास झालं आता कलेसाठी समर्पण.
इतकं खपलो, आत्ता पैसा नाही कमावला तर कधी?
येणार्‍या कामाचं बजेट विचारल्याशिवाय बाकी काही बोलायचंच नाही असा परत एकदा मी निश्चय केला. आणि मोबाइल वाजला. नोकियाचं ते जुनं पुराणं मॉडेल बघत मी स्वत:लाच वचन दिलं की आता बास ही गरीबी.

नृत्यांगना अमुक तमुक नवीन बॅले करतायत त्यासाठी त्यांनी डिझाइन करायला बोलावलं. शक्यच नव्हतं वेळेचं. घरात एका पाठोपाठ एक ८ दिवसाच्या अंतरानी दोन लग्नं होती. अगदी जवळची. पण घरातली धावपळ बाजूला ठेवून मी गेले धावत. जेवढं शक्य तेवढं करून दिलं. हाती आला एक चेक ज्यावरची रक्कम बघून स्पॉटबॉय पण लाजला असता. वर 'तुला वेळ नव्हताच ना तपशीलात सगळं करायला त्यामुळे या ताइंनीच सगळं निभावून नेलं.' अशी उगाच गिल्टी वाटायला लावायची मखलाशी. निश्चय गेला तेल लावत!

नंतर दिल्लीहून फोन होता. एका बाइंचा. कुठूनकुठून त्यांना माझा संदर्भ मिळाला होता. आणि आता त्यांना त्यांच्या पुस्तकातल्या महाराष्ट्राच्या विभागासाठी माझ्या 'एक्सपर्टीज' ची गरज होती.
दिल्लीवाला फोन, मधाळ हिंदी आणि माझ्या 'एक्सपर्टीज' चा उल्लेख. पैशाचं विचारायचं राहूनच गेलं ना.
बाईंच्या सहायिकेबरोबर इकडे फिर, तिकडचे फोटो काढ असं करत करत ४ - ५ दिवस नुसतेच निघून गेले. यातच मराठी साडी नेसवून दाखवायला त्या मागच्या नृत्यांगनेच्या एका नवख्या शिष्येचे दोन तास मागितले तर नृत्यांगना बाई म्हणतात, "पैशे किती देणार?"
"मी नंतर फोन करते!"
आता आयत्यावेळेला काही प्रात्यक्षिक स्वत:वर काही अश्याच एका दत्तूवर दाखवून. दिल्लीवालीचं काम पूर्ण झालं.
दिल्लीहून एक इमेल आला (यावेळेला फोन नाही!) आभाराचा.
आमचा खिसा रिकामाच राह्यला.

मराठी फिल्म करायचीये म्हणून जुनी ओळख सांगत एक जण आला. ऐतिहासिक चित्रपट. आणि बजेट म्हणाल तर डोकीच्या वस्तूलाही पुरणार नाही. इथे आमचा निश्चय होता मोठा. कपड्यांचे एवढे, माझे एवढे. जमत असेल तर ठिक नाहीतर जाउदेत. "आपली जुनी ओळख म्हणून मी तुझ्याकडे आलो. आणि तू एवढं बजेट सांगतेस?" "अरे पण ऐतिहासिक करायचं तर बजेट लागतं तेवढं. नगाला नग वस्तू वापरायच्यात का? शेवटी माझ्या reputation चा पण प्रश्न आहे." "पण ही काय रक्कम झाली?" "तुला १०० चा मॉब हवा, २५ ब्रिटिश शिपाई आणि २५ ब्रिटिश पोलिस हवेत, महत्वाच्या व्यक्तिरेखा १०, भरपूर ऍक्शन सीक्वेन्स म्हणजे कपडे डबल डबल एवढं सगळं जमवायचं/ बनवायचं तेही इतिहासाप्रमाणे तर किमान दोन लाख तरी नकोत? आणि मी, माझे असिस्टंट राबणार ५० दिवस मग मला काहीतरी पैसे मिळायला नकोत? माझ्या असिस्टंटस ना काहितरी द्यायला नको?" "ते काय मला माहित नाही. तुझ्या पेमेंटसकट कपड्याचं सगळं ८०००० मधे भागव!" "शक्य नाही तू दुसरी व्यक्ती बघ!"
माझ्यावर पैशाची हाव असल्याचा शिक्का बसला.
माझा खिसा रिकामाच होता तेव्हा.

तशी तक्रार अशी काहीच नाही. पण चांगलं काम तेच ज्यात पैसे मिळतात मग ते कितीही अ आणि अ का असेना हे आता पटायला लागलंय.
सध्या मला मोगरा परवडतो. पावसाचा वास आपला आपण येत असला तरी तो उपभोगायला सवड होत नाही आणि बीएमडब्ल्यू चं चित्रही मी विकत घेतलेलं नाही.

Monday, January 28, 2008

वळू

ऑक्टोबर मधे प्रीव्ह्यू पाह्यला होता.चित्रपट मला अजिबात आवडला नाही.
गोष्ट म्हणायची तर गावात देवाला सोडलेला वळू असतो तो हिंसक होतो. त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसरला त्या वळूला पकडायला बोलावतात. त्या ऑफिसरबरोबर त्याचा अतिउत्साही Docu-maker भाऊही असतो.
वळूला पकडायला गावात फारेश्ट चं येणं, सोबत डाक्यूमेंट्रीचं गावात येणं, गावातल्या लोकांनी डुरक्या (वळू) च्या गोष्टी सांगणं यातून गाव आणि व्यक्तिरेखा उलगडत जातात. शेवटी वळू पकडला जातो. फारेश्ट त्याला घेऊन जातो आणि गावात दुसर्‍या एका गायीला गोर्‍हा होतो तो नवीन वळू असं सांगत चित्रपट संपतो.
वळू आणि त्याला पकडणे इत्यादी गोष्टींचा एक metaphor म्हणून वापर करायचा आणि परिस्थितीवर भाष्य करायचे की केवळ एक गावरान विनोदी ढंगातला सिनेमा करायचा यामधे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचा गोंधळ दिसतो. त्यामुळे मधेच परिस्थितीवर भाष्य करायच्या नादाला जाता जाता परत ग्रामीण विनोदाकडे गाडी घसरते. साध्य काहीच नाही.
गावाचं वातावरण तपशीलात दाखवायचं या सोसापोटी सभेला जाताना छोट्या पोराला त्याची आई देवळाच्या बाहेरच शू करायला धरते ह्या दृश्याने चित्रपटात भर काहीच पडत नाही अगदी विनोदनिर्मिती सुद्धा. सतत बिघडलेल्या पोटाने घाण वास सोडणारा किंवा लोटा घेऊन जाणारा देवळाचा पुजारी या व्यक्तिरेखेसाठी दिलीप प्रभावळकर कशासाठी हवेत? कोणीही करेल की ते. सतत संडासला जाणे यापलिकडे ही व्यक्तिरेखा काहीच फारसं करताना दिसत नाही. बर या प्रकारच्या विनोदांना किती वेळा हसायचं?
फारेष्टचा भाऊ डाक्यूमेंट्री ह्याने मराठी किती कृत्रिम बोलावं याला काही अर्थच नाही. वृषसेन दाभोळकर हा नट इतकंही वाईट मराठी बोलत नाही (माझ्या नाटकातला मुलगा आहे, मी याला लहानपणापासून ओळखते. थोडी कृत्रिम झाक आहे मराठीमधे पण एकदा सांगितल्यावर हे बाळ सुतासारखं सरळ मराठी बोलू लागतं हा अनुभव आहे.) आणि ते सुधारून घेणे हे दिग्दर्शकाचे काम नाही का?
अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून खूप ताकदीचा आहे हे आता माहित होऊन जुनं झालं पण इथे त्याचाही गोंधळ उडाल्यासारखा वाटतो. विनोदी अंगाने जाणारे मर्मभेदी भाष्य अश्या काहीश्या presentation format मधे तो जायला बघतो. त्यामुळे अभिनयाची शैलीही थोडी लाउड, caricature सारखी त्याने ठेवली आहे. ते चित्रपटाला कुठेही मदत करत नाही. पण याठिकाणी दोष बिचार्‍या अतुलचा नाही, पटकथेच्या form, lack of focus यांचा व दिग्दर्शकाचाच आहे असं जाणवत रहातं. अतुलला कपड्यात कृपया stir-ups देऊ नयेत. वरचं शरीर कमावलेलं आणि खाली मोराचे काटकुळे पाय हे अतिशय विचित्र दिसतं.
अमृता सुभाष मात्र तिच्या व्यक्तिरेखेमधे चोख बसलीये. तिच्या अभिनय पद्धतीला जाणारी भडक, लाउड व्यक्तिरेखाच तिला मिळाल्यामुळे ते जमून गेलेय.
बाकी सगळं जिथल्या तिथे ठीक. कपडे गावाच्या मानाने फारच स्वच्छ आणि नवेकोरे वाटतात. तसंच सगळं visual ही. नाटकाच्या सेटसारखं बनवलेलं वाटतं.
हे सगळ दिसत रहातं कारण पटकथेतल्या गोंधळामुळे आपण नाट्यापासून तुटत रहतो.
एक उत्तम potential असलेली कथा आणि पटकथेमधे त्याचं झालेलं वांगं एवढंच impression शेवटी डोक्यात उरतं.
हे झालं माझं मत. पहावी की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं.

Saturday, January 26, 2008

'ते पुढे गेले'

तडजोडी, खटपटी करत जगताना, यशस्वी नाहीतरी किमान 'पुढे' जाताना थांबवून कुणी तुम्हाला नागडं करणारा आरसा दाखवला तर काय होईल? त्यातून तुम्ही स्वतःला संवेदनशील वगैरे म्हणवून घेत असाल, चुक बरोबर चा निवाडा आत कुठेतरी जागा असेल अजून तर काय होईल तुमचं?
बास हेच होतं 'ते पुढे गेले' बघताना.
माणसाचा सतत पुढे जाण्याचा हव्यास, obsession च खरंतर आपल्याला सगळा विधिनिषेध विसरायला लावतो. कुठलीही किंमत मोजून पुढे जाताना कुणाचं तरी शोषण, कुणावर तरी अन्याय करावाच लागतो ही अपरीहार्य वस्तुस्थिती आहे असं आपण स्वतःला समजावतो. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचाच दोष आहे यात असं सोयीस्करपणे समजतो आपण. अन्याय करणं जेवढं मुर्दाड आणि निर्ढावलेपणाचं तेवढा पुढे जाण्याचा वेग जास्त.
ही परिस्थिती. नीट, सूक्ष्मात जाऊन आणि प्रामाणिकपणे विचार केला तर कुठेना कुठेतरी आपण या परिस्थितीचा भाग आहोत. याच गोष्टीला हातभार लावतोय हे लख्ख जाणवतं. असह्य त्रास होतो ह्या आरश्यात बघण्याचा.
हा नाटकातला मूळ विचार अधोरेखित करण्यासाठी नाटकात रूपक (metaphor) म्हणून मृत्यूनंतर माणसे पोचतात अशी एक जागा/ एक दालन, तोंड मिटलेल्या बाईवर बलात्कार ह्या गोष्टी येतात. अत्यंत साध्या आणि प्रभावी संवादांच्यातून हे सगळं येतं त्यामुळे जास्त अंगावर येतं.
नाटकाचं सादरीकरण हे अत्यंत साधेपणाचं आणि म्हणूनच परिणामकारक आहे. हा विषय spectacular visuals नी मारला जाऊ शकतो. हे ओळखून नेपथ्य म्हणजे एक void , अंधार असे नेपथ्याचे निर्णयन केल्याने तीव्रता अजून वाढते. नेपथ्यासाठी बजेट नही, करायचा काय सेट नाटकाला अश्या पळवाटांमधून हा void येत नाही. तर नेपथ्याचे design म्हणून येतो. विचारपूर्वक घेतलेला निरणय म्हणून येतो. म्हणून तो महत्वाचा ठरतो. प्रकाशयोजनेतील patterns व लय यांच्यामुळे आपण अजून अजूनच आशयाच्या जवळ पोचतो. आणि कलाकारांच्य वागण्यातील सहजता. 'अ' चं खूप बोलणं आणि 'ब' चं गोंधळलेलं असणं, 'ब' चं 'सोपा उपाय' शोधू पहाणं. हे सगळं सगळं अगदी जिथल्या तिथे. अभिनय केल्याचं जाणवतच नाही.

प्रयोगभर होतं असं की हळू हळू आरसा दिसायला लागतो. मग तो लख्ख दिसतो आणि मग सहन होईनासा होतो. नेपथ्यातल्या void मुळे claustrophobic वाटायला लागतं, अंधार हुडहुडी भरवू लागतो.

पृथ्वी थिएटर मधलं नाटक संपलं सोमवारी २१ जानेवारीच्या रात्री. माझ्या मनात अजून प्रयोग चालूच आहे. आणि भरलेली हुडहुडी अजून तशीच

Monday, January 7, 2008

गंध कुणाचा...

वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.
नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासाMसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर पडत नाही. मग त्यावर उपाय म्हणून किन्नर (आ एड्या!! किन्नर काय बोलतो.. आपन काय टरकवाले हे का? वोल्वो हे वोल्वो.. अशिश्टन म्हनायचं काय...) जो असतो तो एक शस्त्र काढतो आणि त्यातून एक फवारा मारून उंदीर मारण्याचं अति गोडमिट्ट औषश कसं असेल तसा वास गाडीभर पसरवतो. इथे आपल्या पोटातील उंदीर ते औषध पिण्यासाठी आतुर झाल्यासारखे उड्या मारू लागतात आणि पोटात सगळं काही आतल्याआत ढवळायला सुरूवात होते.
तुम्ही कुठल्याही सीटवर असलात तरी या सुगंधी कट्ट्यापासून तुमची सुटका नाही. पुढची सीट मिळाली.. ऐसपैस जागा (ही व्होल्वो च्या बाहेरच असते. आत कोणे एके काळी असायची!!) मिळाली असं समजून तुम्ही सुखावताय तोच तुमच्या पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या जागी चालक(मराठीचा विजय असो!!) स्थानापन्न होतो. आणि त्याच्या डोक्यातल्या चमेलीच्या तेलाबरोबर त्याच्या डोक्यातला घाम मिसळून तयार झालेल्या रसायनाच्या भयाण लहरी तुमच्या नाकात शिरतात आणि नाकालाच काय तुमच्या पोटालाही परत एकदा झिणझिण्या येतात त्या थांबतच नाहीत. पोटातली उलाढाल अजून वाढते.
हे घडलं नाही तर स्वत:ला एवढ्यात भाग्यवान समजू नका. तुमच्या शेजारी कोण येणारे ते अजून तुम्हाला कळलेलं नसतं. कोणीच येऊ नये अशी तुम्ही देवाची करूणा भाकत असता (एकदम आकाशातल्या बापा इश्टायल...) आणि देव म्हणत असतो आत्ता आठवलो काय मी, घे अजून एक सुगंधी ठोकळा.. (मला बुडवताना तुम्ही नाचता ना? अस म्हणणार्‍या बाप्पा श्टायल...). तर एक सर्व बाजूनी सुटलेला बोजा किंवा बोजी तुमच्या शेजारी आदळतो/ते. बोजा असेल तर तो हमखास 'पनवा, पान मसालवा असं काहीतरी खायके' आलेला असतो. त्या जिन्तान किंवा तत्सम सुगंधी मसाल्याचा वासाचं वलय त्या बोजाभोवती असतं. त्यात त्याने हिरा पन्ना मधून घेतलेलं लेटेष्ट सेंट मारलेलं असतं. शेजारी बोजी आली तर तिने अंगावर टाल्कम पावडर ओतलेली असते शक्यतो गोडुस वासाची. आणि अंगावर कुठलं तरी 'गुलाबी' सेंट ही ओतलेलं असतं. ह्या सगळ्या सेंटसमधे एक काहीतरी द्रव्य असतं बहुतेक ज्याची माझ्या नाकाशी आणि मग पोटाशी कुंडली जुळत नाही. मग परत पोटात 'घुसळण प्रेमाची काढली'.
बर सेंटचा प्रादुर्भाव झाला असला तरी त्यातून एक छुपा वास येतच असतो. कसला काय विचारता!! अहो एवढं सेंट/ टाल्कम पावडर कशासाठी असते? सोप्पय, अहो त्या बोज्या/जीचे कपडे धुतलेले नसतात किंवा ८-१० दिवस केस धुतलेले नसतात. वाळलेल्या घामाचा कुसका कडू वास आणि बोजीच्या न धुतलेल्या केसांचा आंबुस वास हे या सगळ्या वरच्या वासांमधून आपलं अस्तित्व दाखवतातच.
एखाद्या दिवशी देव प्रसन्न झाला तर सुदैवाने तुमची शेजारची सीट रिकामी असते किंवा फार वास न येणारा/री शेजारी येतो/ते. पण तुम्ही देवाचे आभार मानत असताना देव खदाखदा हसत असतोच (मला बुडवताना तुम्ही नाचता ना!!)
गाडी सुरू होते. ४ तासात तुम्ही म्हातारे किंवा शिळे होऊ नये ही जबाबदारी बस कंपनीची असते त्यामुळे ते तुमच्यावर सतत गार हवेचे झोत सोडत असतात. गाडी जशी हलते तसे वासांचे संक्रमण होत असते. गाडीत कुणालातरी काल फक्त रात्री तासभर घातलेला गजरा आजही प्रवासात घालायची बुद्धी झालेली असते. गजरा आता सुकलेला असतो. तेवढ्यात कुणीतरी हात उंचावून आळस देते आणि नेमका त्यांनाच ह्या फ्रिजमधे बसून देखील घाम आलेला असतो.
हे सगळं परवडलं अस म्हणायची वेळ एकदा आली होती. मागच्या सीटवरच्या सदगृहस्थांना बिडी ओढायची सुरसुरी आली होती. "मला विडीच्या वासाने ढवळतंय. उलटी व्हायला लागली तर तुमच्या अंगावर ओकेन" अशी धमकी दिल्यावर तो थांबला.
तेवढ्यात "गाडी टॉयलेटके लिए २० मिनिट रूकेगी!" असं स्पष्ट शब्दात ओरडून सांगितलं जातं. गाडी थांबते. गाडीमधे काही घोळ होऊ नयेत, लोकांना वासांचे त्रास होऊ नयेत म्हणून केवढी काळजी घेतात हे लोक. कश्यासाठी उतरायचं हे नीट सांगतात. पण लोक ऐकतील तर ना. ते आपले मोकळं होतात पण हादडूनही घेतात. परत गाडीत खायलाही घेऊन येतात. शेजारचा वास न येणारा कचकून सिगरेट ओढून आलेला असतो. आणि जळक्या बोळ्यासारखा घमघमत असतो.
२० मिनिटात सगळं उरकायचं म्हणून गपागपा खाल्लेलं असतं. वर ढेकर द्यायची राहून गेलेली असते. गाडी सुटते आणि ज्या बाजूने ढेकर येईल तिकडे वडापाव कि मिसळ कि चाट हे ओळखायचा खेळ खेळता येऊ शकतो. त्यात हातात बांधून आणलेल्या वस्तूंचे वासही गाडीभर भ्रमण करत असतातच. इतकं खाल्यानंतर ढेकर नाही तर अजून कशापद्धतीने तरी पवनमुक्ती होतेच.
सुदैवाने व्होल्वो घाट मात्र अजूनही सुसाट वेगाने पार करते त्यामुळे पोटात प्रेमाची घुसळण चालू असली तरी ती घाटाच्या वळणांमुळे वाढत नाही.
घाट संपल्यावर टोलच्या आसपास पुण्याकडे येताना कंपनीतली चिकन्स आणि मुंबईकडे जाताना कुठल्यातरी कारखान्याची मळी यांचा वास बाहेरूनही वसकन बसमधे घुसतो आणि आधीच गंधलेल्या हवेवर चार चांद चढवतो.
टोल संपला की थोड्या वेळाने गाडीचा वेग अतिच मंदावतो. गार हवेचे झोत सुरूच असतात. आता तुम्हाला फ्रिजमधल्या शिळ्या अन्नाला काय वाटत असेल तसं वाटायला लागतं. आंबल्यासारखं...
तुमच्या सहनशक्तीचा कडेलोट होत असतो तेव्हा गाडी सायनमधून धारावी मधे शिरत असते आणि आत येणारा कॅनॉलचा वास तुम्हाला आता तुम्ही मुंबई नामक उकीरड्यात आलात बरंका असं सांगू लागतो.
ह्या सगळ्यातून न ओकता ( कधी खरंच झालं ओकायला तर काय होईल?) आणि सर्दीने भरलेली (thanks to फ्रिजमधली गार हवा!)मी पार्ल्यात उतरते. घरी पोचल्यावर मात्र मला मी टाकलेल्या खिचडीच्या फोडणीचा वास येणंही शक्य नसतं.

Search This Blog