Thursday, April 3, 2008

मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!

"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."
मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन ऐकत होतो.
"असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्‍या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्‍याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका महान वास अजून कशाचा असू शकेल असं वाटत नाही."
आम्ही गाडीत आधीच बसलो होतो.
पहिल्या पावसात, नव्याकोर्‍या लेदर सीटस असलेल्या बीएमडब्ल्यूमधे मोगर्‍याचा गजरा हातात घेऊन बसायचं.. सुखाची परमावधीच की. झालं! ठरलं! हे कधीतरी जमलं पाहिजेच.

पैसा कमवायचाच हे परत एकदा अधोरेखित झालं होतं डोक्यात. बास झालं आता कलेसाठी समर्पण.
इतकं खपलो, आत्ता पैसा नाही कमावला तर कधी?
येणार्‍या कामाचं बजेट विचारल्याशिवाय बाकी काही बोलायचंच नाही असा परत एकदा मी निश्चय केला. आणि मोबाइल वाजला. नोकियाचं ते जुनं पुराणं मॉडेल बघत मी स्वत:लाच वचन दिलं की आता बास ही गरीबी.

नृत्यांगना अमुक तमुक नवीन बॅले करतायत त्यासाठी त्यांनी डिझाइन करायला बोलावलं. शक्यच नव्हतं वेळेचं. घरात एका पाठोपाठ एक ८ दिवसाच्या अंतरानी दोन लग्नं होती. अगदी जवळची. पण घरातली धावपळ बाजूला ठेवून मी गेले धावत. जेवढं शक्य तेवढं करून दिलं. हाती आला एक चेक ज्यावरची रक्कम बघून स्पॉटबॉय पण लाजला असता. वर 'तुला वेळ नव्हताच ना तपशीलात सगळं करायला त्यामुळे या ताइंनीच सगळं निभावून नेलं.' अशी उगाच गिल्टी वाटायला लावायची मखलाशी. निश्चय गेला तेल लावत!

नंतर दिल्लीहून फोन होता. एका बाइंचा. कुठूनकुठून त्यांना माझा संदर्भ मिळाला होता. आणि आता त्यांना त्यांच्या पुस्तकातल्या महाराष्ट्राच्या विभागासाठी माझ्या 'एक्सपर्टीज' ची गरज होती.
दिल्लीवाला फोन, मधाळ हिंदी आणि माझ्या 'एक्सपर्टीज' चा उल्लेख. पैशाचं विचारायचं राहूनच गेलं ना.
बाईंच्या सहायिकेबरोबर इकडे फिर, तिकडचे फोटो काढ असं करत करत ४ - ५ दिवस नुसतेच निघून गेले. यातच मराठी साडी नेसवून दाखवायला त्या मागच्या नृत्यांगनेच्या एका नवख्या शिष्येचे दोन तास मागितले तर नृत्यांगना बाई म्हणतात, "पैशे किती देणार?"
"मी नंतर फोन करते!"
आता आयत्यावेळेला काही प्रात्यक्षिक स्वत:वर काही अश्याच एका दत्तूवर दाखवून. दिल्लीवालीचं काम पूर्ण झालं.
दिल्लीहून एक इमेल आला (यावेळेला फोन नाही!) आभाराचा.
आमचा खिसा रिकामाच राह्यला.

मराठी फिल्म करायचीये म्हणून जुनी ओळख सांगत एक जण आला. ऐतिहासिक चित्रपट. आणि बजेट म्हणाल तर डोकीच्या वस्तूलाही पुरणार नाही. इथे आमचा निश्चय होता मोठा. कपड्यांचे एवढे, माझे एवढे. जमत असेल तर ठिक नाहीतर जाउदेत. "आपली जुनी ओळख म्हणून मी तुझ्याकडे आलो. आणि तू एवढं बजेट सांगतेस?" "अरे पण ऐतिहासिक करायचं तर बजेट लागतं तेवढं. नगाला नग वस्तू वापरायच्यात का? शेवटी माझ्या reputation चा पण प्रश्न आहे." "पण ही काय रक्कम झाली?" "तुला १०० चा मॉब हवा, २५ ब्रिटिश शिपाई आणि २५ ब्रिटिश पोलिस हवेत, महत्वाच्या व्यक्तिरेखा १०, भरपूर ऍक्शन सीक्वेन्स म्हणजे कपडे डबल डबल एवढं सगळं जमवायचं/ बनवायचं तेही इतिहासाप्रमाणे तर किमान दोन लाख तरी नकोत? आणि मी, माझे असिस्टंट राबणार ५० दिवस मग मला काहीतरी पैसे मिळायला नकोत? माझ्या असिस्टंटस ना काहितरी द्यायला नको?" "ते काय मला माहित नाही. तुझ्या पेमेंटसकट कपड्याचं सगळं ८०००० मधे भागव!" "शक्य नाही तू दुसरी व्यक्ती बघ!"
माझ्यावर पैशाची हाव असल्याचा शिक्का बसला.
माझा खिसा रिकामाच होता तेव्हा.

तशी तक्रार अशी काहीच नाही. पण चांगलं काम तेच ज्यात पैसे मिळतात मग ते कितीही अ आणि अ का असेना हे आता पटायला लागलंय.
सध्या मला मोगरा परवडतो. पावसाचा वास आपला आपण येत असला तरी तो उपभोगायला सवड होत नाही आणि बीएमडब्ल्यू चं चित्रही मी विकत घेतलेलं नाही.

6 comments:

Raj said...

सुंदर. प्रकटन आवडले. कलेसाठी समर्पण वगैरे लोक बोलतात तेव्हा वास्तव लक्षात येत नाही. कदाचित अशी वाक्ये मुलाखती देण्यासाठी ठीक असतात. इथे जेन ऑस्टीनचे एक वाक्य आठवले. "A large income is the best recipe for happiness I ever heard of."

नीरजा पटवर्धन said...

are thank you thank you.
kala, vikri ani paisa ha sagala itaka gamatishir khel aahe ani pratyekacha aadarsh te vastusthiti pravas hot asato. ichchha aso va naso. aamachyasarakhe kahi lavakar sodat nahit adarshacha padar ani mag basatat radat.. tyatun alela re!

कोहम said...

हं. असेल असं.

असेही दिवस होते जेव्हा अभिनयानं एवढं वेड लावलं होतं की सीए झालो तरी व्यावसायीक नट व्हायचं डोक्यातून जाईना. त्यात काही लोकांनी केलेलं कौतूकही आगीत तेलंच घालणार. तेव्हा कुण्या जाणत्याने असंच काहीसं मला सांगितलं होतं. कला बिला सब झूट है. पैसा फेको तमाशा देखो.

नव्हतं पटलं तेव्हा आणि अजूनही नाही पटत कारण, माझ्या नाटकाचा व्यवसाय कधी झालाच नाही. ती फक्त एक खाजच राहिली. आणि खाज म्हटली की आपण त्यागबीग करतोच की, कलेबिलेसाठी.

असं काही वाचलं की बरं वाटतं, त्या जाणत्याचं मी तेव्हा ऐकलं ह्याचं. आधीच आमच्या अभिनयाचं वारू ग्रूप सोडून बाहेर किती उड्या मारणार होतं हे दैवालाच ठाऊक, त्यात आहे त्या कलेबिलेच्या खाजेतली खाजही जायची आणि उरायचे नुसते पोकळ वासे.

माझं पुराण पुरे. मनोगत आवडलं, पण मनापासून नाही वाटलं. म्हणजे कळतंय लेखिकेला, पण वळतंय असं वाटलं नाही.

Random Thoughts said...

Neeraja,
Vachaun khup maja aali ga. Ttile tar very catchy. BMW ghetlyavar kahi sagla sampnar nahi. There will be more things :-)

saurabh V said...

हं! असं होतं बर्‍याचदा.
आपलेच पैसे मागायला आपल्याला कसेतरी वाटते. बाकि लोकं मात्र पैश्यासाठी बापाला बाप म्हणत नाहित. आपण मात्र ती आपली संस्कृती नाहि असं आपल्यालाच समजावुन आपण गप्प बसतो.

असो, लिखाणातला ’फ्लो’ मला आवडतो नेहमी. पोस्ट छान झालाय.ता.क.- माझे ते अर्धे असलेले ’पत्र’ पण पुर्ण झालयं.

Rahul Ranade said...

me swataha houshi rangabhoomeetoon var alelo aslyamule,tee 'khaaj' kay aste te mala changla mahit ahe.....ani ajunsuddha mala houshi(mhanje paise na gheta)natak karayla awadta(ajuntari koni houshi cinema kelyacha aikeevaat nahi).....pan houshi cha artha 'paise na gheta'....kamaachi quality mhanaal tar ekdam professional....karan tithe khara doka waprayla,experiments karayle miltaat...

me geli 26 varsha ya industry madhe wawartoy....ani neerjachya dance walya bainsaarkhe khoop loak pahilet....aslya lokanbaddal satwik santaap yet asto....tyanna tyanchi jaaga dakhwayla me utaveel zalela asto....ani mazya anek clients barobar me he kelela ahe....mala gruhit dharlela ajibaat awdat nahi...

me hava asen...tar mazi kimmat mojayla lagel...parwadat asel tar ghya,nahitar me bhinteela tumbdya lavoon ghari basen pan phaltu budget madhe tumcha kaam nahi karnaar....karan tumhi sokawal....ani generally tumcha mhanna asta "to amuk tamuk itkya paishaat karto".....o bhau...mag tyachyakadech ja na....maza amoolya vel kashala waya ghalavtay?

kharokhar manaswee cheed yete mala aslya lokanchi....

aso...

Jai Hind,Jai Maharashtra,

Rahul Ranade.

Search This Blog