फेब्रुवारी २०४५
'दर वर्षी थंडीच्या मोसमात मुंबईनगरीमधे फोर्ट परिसरात काळ्या घोड्याचा उरूस भरतो. तर्हेतर्हेचे खाद्यपदार्थ, भिरभिरी, मुखवटे, इतर खेळणी, टिशर्ट, कपडे, दागिने, मातीच्या उपयोगी वस्तू याची भरपूर रेलचेल असते. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. विशेषतः शनिवार रविवारच्या दिवशी तर मुंगीला शिरायला जागा उरत नाही एवढी गर्दी होते.
काळा घोडा ही देवता तांत्रिक प्रकारची आहे. चित्रविचित्र प्रकारची, विविध वस्तूंपासून बनलेली शिल्पे वाह्यल्याने ही देवता प्रसन्न होते. त्यामुळे अनेक चित्र व शिल्पकारांना पाचारण करून विचित्र विचित्र वस्तू बनवून काळा घोड्याभोवती मांडल्या जातात.
याच परिसरात छत्रपति शिवाजी वस्तूसंग्रहालय, जहांगीर कला प्रदर्शनी, नवकलेची राष्ट्रीय प्रदर्शनी आणि अश्याच अनेक वास्तू असल्याने या उरूसाला काळा घोडा कला महोत्सव असे म्हणण्याची काही वर्षांपूर्वी पद्धत पडली होती. पण लोटणार्या गर्दीने काळा घोडा देवतेला न्याय दिला आणि दाखवून दिले की हा कला महोत्सव नसून उरूस आहे.'
वयाच्या सत्तरीला आलेली मी सकाळी सकाळी पेप्रात वाचत होते. वाचून परत एकदा जुनी चिडचिड वर आली. हल्ली सगळ्या जुन्या चिडचिडी बाहेर यायला लागल्यात. आमच्यावेळी असं नव्हतं ची टेप नाही वाजवायची म्हणली तरी वाजवली जातेय... असो हे असं होतं हल्ली चिडचिडल्यावर सुद्धा जास्त वेळ त्याच ट्रॅकवर रहाता येत नाही.
तर काळ्या घोड्याच्या उरूसाची बातमी वाचली पेप्रात आणि संताप संताप झाला. कला महोत्सवाचं जत्रेत झालेलं रूपांतर बघितलं होतं. कुठल्याही महोत्सवाला देव देवता देवस्की याच्याशी नाहीतर बॉलिवूड, टॉलिवूडशी जोडायचं ही पद्धतच पडून गेली होती. त्या अनुषंगाने खादाडीचे स्टॉल्स आणि विकायच्या फुटकळ वस्तू... नुसतं हस्तकौशल्य असलेल्या. कला मिसिंग इन अॅक्शन.
एक काळ असा होता की काला घोडा फेस्टिवलमधे सगळ्या 'आव्हा गार्द (Avent Garde)' म्हणता येईल अश्या कलाप्रकारांचं प्रदर्शन असायचं. चित्रकला, शिल्पकला, इन्स्टॉलेशन्स, संगीत, नृत्य, नाटक सगळं सगळं चाकोरीबाहेरचं. नवीन असं काहीतरी. बघणार्याला टोचून जाईल, विचारात पाडेल, अस्वस्थ करेल, अनुभव देईल, डोक्याला चालना देईल, किक देईल असं काहीतरी... सगळं फ्रेश वातावरण. सिरीयल्समधल्या गोड, गुलगुलीत, कंटाळवाण्या कौटुंबिक बजबजपुरीला हास्यास्पद बनवेल असं 'आजचं', ताजं काहीतरी तिथे मिळायचं. वातावरण कलाप्रकार, कलाप्रवाह यांनी भारीत असायचं.
अश्याच अपेक्षा घेऊन २०१० च्या फेब्रुवारीमधे मी आणि निलिमा गेलो होतो काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला. नेमका होता शनिवार. प्रचंड गर्दी होती. कला महोत्सवाला अशी दाद मिळतेय बघून आधी छानच वाटलं. पण थोडं त्या गर्दीच्या पोटात घुसलो तेव्हा भ्रमनिरास झाला.
फुटपाथवर 'हॅलो मॅडम, इंडियन इंस्टृमेंट!' म्हणत डमरू-ढोलक्-ढोलकी यांचा संगम असलेलं एक बडववाद्य घेऊन गोर्या चमडीच्या मागे लागणारे विक्रेते होते. भिरभिरं, खेळणी, फुगे, डेव्हिलची लाल शिंगे असलेले हेयरबॅण्ड विकणारे अनेक जण होते. खाद्यपदार्थ, सिरॅमिकच्या वस्तू ज्यात बरेचसे विविध आकाराचे फ्लॉवरपॉटस होते, खोटे दागिने, कापडचोपड, टि शर्टस, उलटी येईल इतपत गोड असलेली लॅण्डस्केपस, व्यवस्थित सबमिसिव्ह दिसणार्या भारतीय नारीचे वेगवेगळ्या रंगात रंगवलेले चेहरे आणि त्याला लावलेल्या महागड्या फ्रेम्स, झाडे-रोपे-पक्ष्यांची पत्र्याची घरटी-प्लास्टिकच्या कुंड्या, हुबेहुब चित्र काढून देणारे असेच बरेचसे स्टॉल्स होते. 'ये देखो ये काला घोडा फेस्टिव्हलसे लिया!' असं सांगून स्वतःचा कलात्मक दृष्टीकोन सिद्ध करता येईल इतपत आर्टसी दिसेल पण एकुणात गुळचट दिसणार्या गृहसजावटीच्या वस्तू चिक्कार होत्या. या सगळ्या स्टॉल्सवर ही झुंबड उडालेली होती. सगळं हस्तकौशल्य उतू चाललं होतं. हुबेहुब आणि आकर्षक ह्याच्यापलिकडे बर्याचश्या वस्तूंची उडी नव्हती.
तिथल्या गर्दीमधे 'लूक लूक हा हॉर्सी कसा छान बनवलाय ना ड्राइड ग्रासमधून!' असं काहीतरी अगम्य बोलत मिरवणारे विकेंड अॅक्टिव्हिटी म्हणून मुलांना घेऊन आलेले आईबाप होते. 'काला घोडा फेस्टिव्हल घुमने जायेंगे, खायेंगे, पियेंगे, ऐश करेंगे' म्हणत आलेले कॉलेजियन्सचे ग्रुप होते. 'देखो हमे क्या मिला' म्हणत आपल्या डोक्यावर लाल शिंगांचा हेयरबॅण्ड वागवत चित्कारत फिरणार्या मुली होत्या. 'काला घोडा देखनेको जायेंगे फीर वहीपे खाना खाके घर जायेंगे' असं ठरवून आलेले लोक होते. थोडक्यात सगळे जत्रेला आल्यासारखे. सगळे हस्तकौशल्यालाच कला समजणारे.
गेलेल्या सिडीज, जुनी सायकल, पाण्याच्या संपलेल्या बाटल्या अश्या सगळ्या कचर्यातून एक इन्स्टॉलेशन केलेलं होतं. पण ते बघायचं तर अगदीच त्याच्या पुढ्यात जावं लागत होतं जिथून त्या इन्स्टॉलेशनचा काही इफेक्ट जाणवत नव्हता. दुरून बघायचं तर पोर्टेबल कमानीचा एक मोठ्ठा पोलादी खांब पुढ्यातच ठेवलेला होता आणि गर्दी तर लोकलच्या तोंडात मारेल अशी होती. दुरून काही दिसण्याचा प्रश्नच नव्हता. आणि बिन्डोक लोक त्या इन्स्टॉलेशनला हात बित लावून बघत होते. लहान पोरं टांगलेल्या बाटल्यांना झोका देऊन बघत होती. हात लावू नये च्या सुचनेवर हात टेकवून त्यावर रेलून कोणी गप्पा मारायचा प्रयत्न करत होता. ते एक इन्स्टॉलेशन आहे.. बघण्याची वस्तू आहे. हात लावण्याची नाही. मी मनातल्या मनात त्या लोकांवर फिसकटले आणि मागे वळले.
एक मोठी घंटा टांगल्याचं पेपरमधे आलं होतं ती लांबवरून दिसत होती. तिथपर्यंत पोचणं आणि नंतर तिथून बाहेर येणं हे मुश्किल वाटत होतं.
काही थोडे लोक गर्दीला वैतागलेले, अरे हा कला महोत्सव आहे ना अश्या प्रश्नात पडलेले, गुळचट चित्रं आणि फ्लॉवरपॉटस बघून कंटाळलेले, आमच्यासारखे तिथून लवकरात लवकर बाहेर पडायच्या बेतात होते. बाहेर पडलेही.
हॅण्डलूम एक्स्पो, सिल्क एक्स्पो, हॅण्डिक्राफ्ट एक्स्पो, भीमथडी जत्रा, पूर्वी सारसबागेच्या ग्राउंडवर भरायचं ते डिस्नेलँड या पेक्षा इथे फार वेगळं काय होतं हा प्रश्न सतत घोळत राह्यला डोक्यात. हस्तकौशल्यालाच कला मानून भागवावं लागणार का आता असे प्रश्नही उमटले. एक महोत्सव केवळ दृश्य आणि प्रयोगकलांचा, कलाकार आणि कलारसिक यांच्यापुरताच किंवा त्यांच्या आवडीनिवडीला, अपेक्षांना प्राधान्य देणारा असा असूच शकत नाही का? खूप चिडचिड होत राह्यली.
त्याला होत आली आता ३०-३५ वर्ष. काळा घोडा देवतेने कलेचा शिरच्छेद करून झाला. महोत्सवाचा उरूस झाला. अंगवळणी पडून घ्यायचा प्रयत्न काही कमी केला नाही पण जमलं नाही. म्हणून मग चिडचिड लिहूनच काढली.
-नी