Wednesday, February 10, 2010

ब्लॉग आणि संवाद

माझ्यासाठी गेले काही आठवडे कामाचा वेळ सोडून ब्लॉगमय झाले होते. आधी पुण्यात मराठी ब्लॉगर्सचा मेळावा मग स्टार माझाच्या ब्लॉगस्पर्धेचा बक्षिससमारंभ आणि मग त्या समारंभाचे प्रक्षेपण असे तीन सलग रविवार झाले. मी नियमित लिहित नाही, लिहिलं पाहीजे हे तर त्यातून लख्खपणे टोचलं गेलंच पण अजूनही काही शिक्षण केलं माझं या ब्लॉगमय वातावरणाने.


ब्लॉगर्स मेळाव्यात हरेकृष्णजी म्हणाले की तुम्हाला प्रतिक्रिया दिली तरी तुमचं उत्तरच नसतं त्यावर म्हणजे मग वाचलेल्यावर प्रतिक्रिया द्यायची की नाही कळत नाही. गिल्टी अ‍ॅज चार्जड सर! पण काय करू उत्तर द्यायचं असतं पण ते कुठे द्यायचं तेच कळत नाही. दिलेल्या प्रतिक्रियेवरून तुम्हाला परस्पर इमेल करता येण्याचा पर्याय नसतो. मग तिथेच खाली कॉमेंट म्हणून उत्तर दिलं तरी ते तुम्ही वाचालच कशावरून असंही वाटतं. अनेकविध ब्लॉग्ज वाचताना मी पण प्रतिक्रिया देत जाते. कुठे कुठे प्रतिक्रिया दिलीय याची काही जंत्री डोक्यात रहात नाही त्यामुळे त्यावर काही पुढचं उत्तर आलंय का हे बघणं तर अशक्यच असतं. तेव्हा याच न्यायाने तुम्ही (हरेकृष्णजीच नाही तर कोणीही) दिलेलं उत्तर वाचायला आवर्जून यालच याची खात्री वाटत नाही. पण उत्तर तर द्यायचं असतं. प्रतिक्रियेवर व्यक्त तर व्हायचं असतं. ते मनातल्या मनात होऊन जातं आणि तुमच्याशी संवाद राहूनच जातो की.

हे स्टार माझाचं बक्षिस मिळालं आणि फॉलोअर्सची संख्या ७ वरून आधी ३९ मग ४५ आणि आता ५१ ला टेकली. छान तर वाटलंच. स्वत:ची कॉलर ताठ बिठ करून घेणं हे केलंच मी आरश्यासमोर. सगळ्यांचे ब्लॉग्ज आपण बघितले तरी आहेत का अजून ह्या विचाराने मग लाजही वाटलीच की. खरंच या सगळ्यांच्या ब्लॉग्जना अजून भेट द्यायची राह्यलीच आहे तर वेळ काढून एक दिवस सगळे ब्लॉग्ज निदान चाळून तरी घेऊ या म्हणून पहिल्या फॉलोअरच्या नावावर क्लिकलं. त्यांचं नाव, फोटो आला पण त्यांच्या ब्लॉगची लिंक काही दिसेना. असंच अजून दोनचार जणांच्याबाबतीत झालं. मग माझा उत्साह मावळला.
बर आता या सगळ्यांना एकगठ्ठा मेल करून प्रत्येकाची ब्लॉगची लिंक घ्यावी तर त्यांना मेल पाठवायला मेल अ‍ॅड्रेस कुठे ते दिसेना. फॉलो करतायत त्या अर्थी त्यांचा ब्लॉग असलाच पाहीजे ही माझी समजूत खरी की खोटी ते काही अजून कळलं नाहीये.

दिपक कुलकर्णी म्हणाला होता त्याने ब्लॉग फॉलो केलाय पण त्याला नोटिफिकेशन येत नाही नवीन पोस्ट आलं की. असं कसं म्हणून बघायला गेले तर मला फॉलोअर्सच्या लिस्टमधे दिप्या दिसेचना.

मी काही लोकांना फॉलो केलंय पण त्यांच्या नवीन पोस्टस आल्या की कुठे नोटिफिकेशन येतं हे अजून मला कळलेलं नाही म्हणजे मी अजून दिप्यापेक्षाही मागास.

आपण तांत्रिकदृष्ट्या महा ढ आहोत हे परत एकदा लक्षात येऊन मला न्यूनगंड का काय तो पण आला.

सर्व ठिकाणातून संवादाच्या वाटा अश्या बंद झालेल्या दिसल्या. थोडक्यात माझा आतला जो कोण तो आणि त्या आतल्यासहीत मी एवढीच शक्यता लक्षात आली. म्हणजे ब्लॉग खरंतर तुमचं चिंतन वाढवण्यासाठी लिहायचा असतो असा एक जावईशोधही मी लावला.

ही वस्तुस्थिती काही आवडली नाही. ५१ लोक मी नवीन लिहिलं की कळावं यासाठी नोंद करून बसलेत आणि आपण त्यांच्यापर्यंत पोचूही शकत नाही? ह्याला काय अर्थ आहे? 

मग ट्यूब पेटली. नवीन ब्लॉग यंट्रीच लिहावी हे सांगायला. शेवटी कसं का होईना 'ये हृदयीचे ते हृदयी घातले' गेल्याशी कारण...
कितीही स्वान्त सुखाय म्हणलं तरी आपण लिहिलेलं कुणीतरी वाचतंय आणि त्यावर भल्याबुर्‍या (हो बुर्‍यासुद्धा चालतील. पळतील.) प्रतिक्रिया देण्याएवढा वेळ कुणी खर्च करतंय हे कुणालाही आवडतंच. मलाही आवडतं. लिहीत रहायला ते टॉनिक म्हणून उपयोगी पडतं.

तस्मात हे लिखाण माझं लिखाण वाचणार्‍यांसाठी. असेच वाचत रहा. प्रतिक्रिया देत रहा. कधीनाकधीतरी परस्पर संवादाची योग्य कळ माझ्या हाती लागेल तोवर समजून घ्या.

-नी

11 comments:

अनिकेत वैद्य said...

नीरजा,
मी आपला ब्लॉग नियमीत वाचतो. ह्या पोस्ट वरून मला आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत.
१) जेंव्हा कोणी वाचक आपल्या पोस्ट वर कमेंट टाकतो, तेंव्हा तेथे १ पर्याय असतो की "Email follow-up comments to **@gmail.com" किंवा त्याचा मेल आयडी. हा पर्याय आपण निवडल्यास त्या पोस्ट वर येणार्या सर्व कमेंटच्या मला(वाचकाला) इ-मेल येतात.
आपण एखाद्या कमेंट ला प्रत्युत्तर म्हणून कमेंट टाकल्यास त्या वाचकाला इ-मेल जाईल.

२) गूगल रिडर नावाची १ सेवा आहे, ज्यात आपण RSS Feed देउ शकता. त्या साईट वर होणारे अपडेट्स आपल्याला रिडर मध्ये मिळतात.
उदा. मी तुमचा ब्लॉग गूअग्ल रिडर मधे सबस्क्राईब केला आहे. आपण जेंव्हा एखादी नवीन पोस्ट टाकता तेंव्हा मला तिकडे नोटिफ़िकेशन मिळते.
तसेच जे ब्लॉग्स मी फ़ॉलो करतो तेथे होणारे अपडेट्स मला रिडर वर मिळतात.

३) तुमचा ब्लॉग फोलो करणार्‍या प्रत्येकाचा ब्लॉग असेलच असे नाही. (माझा नाहीये.)

आपला,
अनिकेत वैद्य.

देवदत्त said...

प्रतिक्रिया कुठे द्यावी व वाचल्या जाईलच का असा प्रश्न मलाही पडतो. पण सध्या तरी ज्या त्या लेखा खाली आलेल्या प्रतिक्रियांनंतर लिहितो.

बाकी आपण फॉलो (अनुसरण) करत असलेल्या ब्लॉग ची नोंद Blogger.com मध्ये 'डॅशबोर्ड' पानावर 'मी अनुसरण करीत असलेले ब्लॉग्ज' नावाखाली दिसतात. मी तरी तेथेच पाहतो.

दुसरा प्रकार आहे तो, RSS फीड चे सदस्यत्व घेणे. ह्यात कोणत्याही साईट ज्या RSS फीड देतात त्यात नवीन लिखाण आल्याची नोंद पाहू शकतो.

हेरंब said...

तो न्यूनगंड वगैरे काढून टाका. :-) कारण माझ्या माहिती प्रमाणे तरी (आणि जवळ जवळ नक्कीच) ब्लॉगमध्ये अशी कुठलीही सोय नसते कि तुम्ही नवीन पोस्ट टाकल्यावर फॉलो करणा-याला त्याबद्दल मेल गेलं पाहिजे. अर्थात आपण ते सेटिंग करू शकतो blogger.com मध्ये.

login to blogger.com --> settings --> email and mobile --> email notifications --> BlogSend Address

Add the email ids here.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवदत्त आणि अनिकेतने सांगितल्याप्रमाणे ब्लॉगचे फॉलोअर्स गुगल रीडर किंवा blogger.com ला लॉगिन करून आपण फॉलो करत असलेल्या ब्लॉगमधली नवीन एन्ट्री बघू शकतात.

आणि प्रतिक्रियांविषयी.. मला वाटतं वाचकांच्या कमेंटखालीच आपण आपलं उत्तर टाकावं नवीन कमेंटद्वारे.. जे लोक आवडीने ब्लॉग वाचतात आणि आवर्जून प्रतिक्रिया देतात ते नक्की पुन्हा एकदा येऊन डोकावून जातातच हे बघायला कि आपण लिहिलेल्या प्रतिक्रियेला ब्लॉगरने काय प्रतिक्रिया दिली आहे. मी तरी करतो असं आणि माझ्या (ब्लॉगच्या) बाबतीतही होतं असं. असो. च-हाट खूप लांबलं.. थांबतो आता..

(माझ्या या प्रतिक्रियेखालीच "एवढी मोठी प्रतिक्रिया देऊ नये. वाचायला कंटाळा येतो" असं किंवा इतर काहीही उत्तर दिलत तरी चालेल. कारण आधी म्हटल्याप्रमाणे मी १-२ दिवसात पुन्हा नक्की डोकावून जाणार तुमचा कमेंट बघायला :P )

देवदत्त said...

अरे हो, आणखी आठवले, गुगल रीडर मध्येही आपण अनुसरण करत असलेले ब्लॉग आपोआप जोडल्या जातात. त्यामुळे dashboard वर जाण्याचीही गरज नाही. RSS वरून घेतलेले आणि अनुसरण करत असलेले अशा दोन्ही नोंदी मिळतात.

Gouri said...

अनिकेत, देवदत्त, हेरंबने लिहिलंय तेच लिहायला इथे आले होते :)

अपर्णा said...

हो अगदी गौरीसारखंच म्हणायचं होतं...ही ही ही....:) मी हा ब्लॉग वाचते पण तुम्हीच जास्त काही लिहित नाही अशी एक लडिवाळ तक्रार आहे...:)

भानस said...

नीरजा, तुझा ब्लॊग मी नेहमीच वाचते. बाकी वरती सगळ्यांनी लिहिलेच आहे.:)

Anonymous said...

http://tinyurl.com/yfpvu9a
इथे फार पुर्वी एक लेख लिहिला होता ब्लॉगर्स एटीकेट्स म्हणुन. वेळ मिळाला तर अवश्य वाचा.
मला एकच सांगावसं वाट्तं, की जो कोणी कॉमेंट टाकतो, तो नेहेमीच उत्तराची अपेक्षा ठेवतो. कॉमेंटला एखाद्या ब्लॉगरने इग्नोर केलं की त्याला आपल्या कॉमेंटची गरज नाही, किंवा ती व्यक्ती फार आढ्यताखोर आहे, असा अर्थ होतो असे माझे मत आहे.
असो..
मी स्वतः प्रत्येक कॉमेंटला उत्तर देत असतो. मग अगदी एखाद्या लेखावर ४० कॉमेंट्स झाल्या, तरीही शेवटल्या कॉमेंटपर्यंत कमीत कमी धन्यवाद म्हणुन तरी नक्कीच कळवतो.. असो..

नीरजा पटवर्धन said...

RSS feed mhanaje kay ani te kuthun ghyayacha/ dyayacha.
Google reader he prakaran shodhala pahije.

sagalyanche abhaar. agadi tapashilaat pratikriya dilelyanchehi.. :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

जर आपण एखाद्याचा ब्लॉग फॉलो करत असू तर त्याने लिहिलेले नविन लेखन ब्लॉगर डॅशबोर्डवर (जिथे आपण "New Post"साठीए क्लिक करतो) ब्लॉगर अपडेट्स-ब्लॉगर बझ्झ अशा नावाने दिसते. आणि कमेंटसाठी इमेल फॉलोअप आहेच की.

सांगायचे म्हणजे मी तुझा ब्लॉग फॉलो करतो आणि कमेंटसाठी इमेल फॉलोअपपण.

D D said...

ब्लॉगर डॅशबोर्डमध्ये खाली रीडींग लिस्ट असते. त्यात ब्लॉग्ज आय ऍम फ़ॉलोईंग हा ऑप्शन निवडा. त्यात खाली ऍड हा ऑप्शन निवडा. त्यात ऍड फ़्रॉम यू आर एल हा ऑप्शन निवडा व तेथे तुम्हांला जो ब्लॉग फ़ॉलो करायचा आहे त्याचा यू आर एल (http://****.blogspot.com/) टाका. नेक्स्ट वर क्लिक करा. मग Follow publicly as किंवा Follow anonymously हा ऑप्शन निवडा. फ़ॉलो वर क्लिक करा. आता त्या ब्लॉगचे फ़ीड (नवीन पोस्टच्य़ा सुरूवातीच्या चार ओळी) तुम्हांला डॅशबोर्डवर दिसतील. मग मॅनेज हा ऑप्शन निवडा व ते फ़ीड गुगल रीडरमध्ये घ्या.
किंवा
गुगल रीडर उघडून गुगल रीडरखाली असलेला ऍड अ सबस्क्रिप्शन हा ऑप्शन निवडा व तेथे तुम्हांला जो ब्लॉग फ़ॉलो करायचा आहे त्याचा यू आर एल (http://****.blogspot.com/) टाका. ऍड वर क्लिक करा. आता त्या ब्लॉगचे फ़ीड (संपूर्ण नवीन पोस्ट किंवा पोस्टच्य़ा सुरूवातीच्या चार ओळी) तुम्हांला गुगल रीडरमध्ये दिसतील.
गुगल सर्च मध्ये जाऊन साइन इन केले की तिथे सेटींग्ज हा ऑप्शन निवडा व त्यातील गुगल अकाउंट सेटींग्ज हा ऑप्शन निवडा . तिथे तुम्हांला तुम्ही गुगलच्या वापरत असलेल्या व वापरत नसलेल्या सुविधांची नावे दिसतील. त्यात गुगल रीडर निवडा.

Search This Blog