Monday, January 28, 2008

वळू

ऑक्टोबर मधे प्रीव्ह्यू पाह्यला होता.चित्रपट मला अजिबात आवडला नाही.
गोष्ट म्हणायची तर गावात देवाला सोडलेला वळू असतो तो हिंसक होतो. त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसरला त्या वळूला पकडायला बोलावतात. त्या ऑफिसरबरोबर त्याचा अतिउत्साही Docu-maker भाऊही असतो.
वळूला पकडायला गावात फारेश्ट चं येणं, सोबत डाक्यूमेंट्रीचं गावात येणं, गावातल्या लोकांनी डुरक्या (वळू) च्या गोष्टी सांगणं यातून गाव आणि व्यक्तिरेखा उलगडत जातात. शेवटी वळू पकडला जातो. फारेश्ट त्याला घेऊन जातो आणि गावात दुसर्‍या एका गायीला गोर्‍हा होतो तो नवीन वळू असं सांगत चित्रपट संपतो.
वळू आणि त्याला पकडणे इत्यादी गोष्टींचा एक metaphor म्हणून वापर करायचा आणि परिस्थितीवर भाष्य करायचे की केवळ एक गावरान विनोदी ढंगातला सिनेमा करायचा यामधे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचा गोंधळ दिसतो. त्यामुळे मधेच परिस्थितीवर भाष्य करायच्या नादाला जाता जाता परत ग्रामीण विनोदाकडे गाडी घसरते. साध्य काहीच नाही.
गावाचं वातावरण तपशीलात दाखवायचं या सोसापोटी सभेला जाताना छोट्या पोराला त्याची आई देवळाच्या बाहेरच शू करायला धरते ह्या दृश्याने चित्रपटात भर काहीच पडत नाही अगदी विनोदनिर्मिती सुद्धा. सतत बिघडलेल्या पोटाने घाण वास सोडणारा किंवा लोटा घेऊन जाणारा देवळाचा पुजारी या व्यक्तिरेखेसाठी दिलीप प्रभावळकर कशासाठी हवेत? कोणीही करेल की ते. सतत संडासला जाणे यापलिकडे ही व्यक्तिरेखा काहीच फारसं करताना दिसत नाही. बर या प्रकारच्या विनोदांना किती वेळा हसायचं?
फारेष्टचा भाऊ डाक्यूमेंट्री ह्याने मराठी किती कृत्रिम बोलावं याला काही अर्थच नाही. वृषसेन दाभोळकर हा नट इतकंही वाईट मराठी बोलत नाही (माझ्या नाटकातला मुलगा आहे, मी याला लहानपणापासून ओळखते. थोडी कृत्रिम झाक आहे मराठीमधे पण एकदा सांगितल्यावर हे बाळ सुतासारखं सरळ मराठी बोलू लागतं हा अनुभव आहे.) आणि ते सुधारून घेणे हे दिग्दर्शकाचे काम नाही का?
अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून खूप ताकदीचा आहे हे आता माहित होऊन जुनं झालं पण इथे त्याचाही गोंधळ उडाल्यासारखा वाटतो. विनोदी अंगाने जाणारे मर्मभेदी भाष्य अश्या काहीश्या presentation format मधे तो जायला बघतो. त्यामुळे अभिनयाची शैलीही थोडी लाउड, caricature सारखी त्याने ठेवली आहे. ते चित्रपटाला कुठेही मदत करत नाही. पण याठिकाणी दोष बिचार्‍या अतुलचा नाही, पटकथेच्या form, lack of focus यांचा व दिग्दर्शकाचाच आहे असं जाणवत रहातं. अतुलला कपड्यात कृपया stir-ups देऊ नयेत. वरचं शरीर कमावलेलं आणि खाली मोराचे काटकुळे पाय हे अतिशय विचित्र दिसतं.
अमृता सुभाष मात्र तिच्या व्यक्तिरेखेमधे चोख बसलीये. तिच्या अभिनय पद्धतीला जाणारी भडक, लाउड व्यक्तिरेखाच तिला मिळाल्यामुळे ते जमून गेलेय.
बाकी सगळं जिथल्या तिथे ठीक. कपडे गावाच्या मानाने फारच स्वच्छ आणि नवेकोरे वाटतात. तसंच सगळं visual ही. नाटकाच्या सेटसारखं बनवलेलं वाटतं.
हे सगळ दिसत रहातं कारण पटकथेतल्या गोंधळामुळे आपण नाट्यापासून तुटत रहतो.
एक उत्तम potential असलेली कथा आणि पटकथेमधे त्याचं झालेलं वांगं एवढंच impression शेवटी डोक्यात उरतं.
हे झालं माझं मत. पहावी की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं.

Saturday, January 26, 2008

'ते पुढे गेले'

तडजोडी, खटपटी करत जगताना, यशस्वी नाहीतरी किमान 'पुढे' जाताना थांबवून कुणी तुम्हाला नागडं करणारा आरसा दाखवला तर काय होईल? त्यातून तुम्ही स्वतःला संवेदनशील वगैरे म्हणवून घेत असाल, चुक बरोबर चा निवाडा आत कुठेतरी जागा असेल अजून तर काय होईल तुमचं?
बास हेच होतं 'ते पुढे गेले' बघताना.
माणसाचा सतत पुढे जाण्याचा हव्यास, obsession च खरंतर आपल्याला सगळा विधिनिषेध विसरायला लावतो. कुठलीही किंमत मोजून पुढे जाताना कुणाचं तरी शोषण, कुणावर तरी अन्याय करावाच लागतो ही अपरीहार्य वस्तुस्थिती आहे असं आपण स्वतःला समजावतो. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचाच दोष आहे यात असं सोयीस्करपणे समजतो आपण. अन्याय करणं जेवढं मुर्दाड आणि निर्ढावलेपणाचं तेवढा पुढे जाण्याचा वेग जास्त.
ही परिस्थिती. नीट, सूक्ष्मात जाऊन आणि प्रामाणिकपणे विचार केला तर कुठेना कुठेतरी आपण या परिस्थितीचा भाग आहोत. याच गोष्टीला हातभार लावतोय हे लख्ख जाणवतं. असह्य त्रास होतो ह्या आरश्यात बघण्याचा.
हा नाटकातला मूळ विचार अधोरेखित करण्यासाठी नाटकात रूपक (metaphor) म्हणून मृत्यूनंतर माणसे पोचतात अशी एक जागा/ एक दालन, तोंड मिटलेल्या बाईवर बलात्कार ह्या गोष्टी येतात. अत्यंत साध्या आणि प्रभावी संवादांच्यातून हे सगळं येतं त्यामुळे जास्त अंगावर येतं.
नाटकाचं सादरीकरण हे अत्यंत साधेपणाचं आणि म्हणूनच परिणामकारक आहे. हा विषय spectacular visuals नी मारला जाऊ शकतो. हे ओळखून नेपथ्य म्हणजे एक void , अंधार असे नेपथ्याचे निर्णयन केल्याने तीव्रता अजून वाढते. नेपथ्यासाठी बजेट नही, करायचा काय सेट नाटकाला अश्या पळवाटांमधून हा void येत नाही. तर नेपथ्याचे design म्हणून येतो. विचारपूर्वक घेतलेला निरणय म्हणून येतो. म्हणून तो महत्वाचा ठरतो. प्रकाशयोजनेतील patterns व लय यांच्यामुळे आपण अजून अजूनच आशयाच्या जवळ पोचतो. आणि कलाकारांच्य वागण्यातील सहजता. 'अ' चं खूप बोलणं आणि 'ब' चं गोंधळलेलं असणं, 'ब' चं 'सोपा उपाय' शोधू पहाणं. हे सगळं सगळं अगदी जिथल्या तिथे. अभिनय केल्याचं जाणवतच नाही.

प्रयोगभर होतं असं की हळू हळू आरसा दिसायला लागतो. मग तो लख्ख दिसतो आणि मग सहन होईनासा होतो. नेपथ्यातल्या void मुळे claustrophobic वाटायला लागतं, अंधार हुडहुडी भरवू लागतो.

पृथ्वी थिएटर मधलं नाटक संपलं सोमवारी २१ जानेवारीच्या रात्री. माझ्या मनात अजून प्रयोग चालूच आहे. आणि भरलेली हुडहुडी अजून तशीच

Monday, January 7, 2008

गंध कुणाचा...

वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.
नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासाMसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर पडत नाही. मग त्यावर उपाय म्हणून किन्नर (आ एड्या!! किन्नर काय बोलतो.. आपन काय टरकवाले हे का? वोल्वो हे वोल्वो.. अशिश्टन म्हनायचं काय...) जो असतो तो एक शस्त्र काढतो आणि त्यातून एक फवारा मारून उंदीर मारण्याचं अति गोडमिट्ट औषश कसं असेल तसा वास गाडीभर पसरवतो. इथे आपल्या पोटातील उंदीर ते औषध पिण्यासाठी आतुर झाल्यासारखे उड्या मारू लागतात आणि पोटात सगळं काही आतल्याआत ढवळायला सुरूवात होते.
तुम्ही कुठल्याही सीटवर असलात तरी या सुगंधी कट्ट्यापासून तुमची सुटका नाही. पुढची सीट मिळाली.. ऐसपैस जागा (ही व्होल्वो च्या बाहेरच असते. आत कोणे एके काळी असायची!!) मिळाली असं समजून तुम्ही सुखावताय तोच तुमच्या पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या जागी चालक(मराठीचा विजय असो!!) स्थानापन्न होतो. आणि त्याच्या डोक्यातल्या चमेलीच्या तेलाबरोबर त्याच्या डोक्यातला घाम मिसळून तयार झालेल्या रसायनाच्या भयाण लहरी तुमच्या नाकात शिरतात आणि नाकालाच काय तुमच्या पोटालाही परत एकदा झिणझिण्या येतात त्या थांबतच नाहीत. पोटातली उलाढाल अजून वाढते.
हे घडलं नाही तर स्वत:ला एवढ्यात भाग्यवान समजू नका. तुमच्या शेजारी कोण येणारे ते अजून तुम्हाला कळलेलं नसतं. कोणीच येऊ नये अशी तुम्ही देवाची करूणा भाकत असता (एकदम आकाशातल्या बापा इश्टायल...) आणि देव म्हणत असतो आत्ता आठवलो काय मी, घे अजून एक सुगंधी ठोकळा.. (मला बुडवताना तुम्ही नाचता ना? अस म्हणणार्‍या बाप्पा श्टायल...). तर एक सर्व बाजूनी सुटलेला बोजा किंवा बोजी तुमच्या शेजारी आदळतो/ते. बोजा असेल तर तो हमखास 'पनवा, पान मसालवा असं काहीतरी खायके' आलेला असतो. त्या जिन्तान किंवा तत्सम सुगंधी मसाल्याचा वासाचं वलय त्या बोजाभोवती असतं. त्यात त्याने हिरा पन्ना मधून घेतलेलं लेटेष्ट सेंट मारलेलं असतं. शेजारी बोजी आली तर तिने अंगावर टाल्कम पावडर ओतलेली असते शक्यतो गोडुस वासाची. आणि अंगावर कुठलं तरी 'गुलाबी' सेंट ही ओतलेलं असतं. ह्या सगळ्या सेंटसमधे एक काहीतरी द्रव्य असतं बहुतेक ज्याची माझ्या नाकाशी आणि मग पोटाशी कुंडली जुळत नाही. मग परत पोटात 'घुसळण प्रेमाची काढली'.
बर सेंटचा प्रादुर्भाव झाला असला तरी त्यातून एक छुपा वास येतच असतो. कसला काय विचारता!! अहो एवढं सेंट/ टाल्कम पावडर कशासाठी असते? सोप्पय, अहो त्या बोज्या/जीचे कपडे धुतलेले नसतात किंवा ८-१० दिवस केस धुतलेले नसतात. वाळलेल्या घामाचा कुसका कडू वास आणि बोजीच्या न धुतलेल्या केसांचा आंबुस वास हे या सगळ्या वरच्या वासांमधून आपलं अस्तित्व दाखवतातच.
एखाद्या दिवशी देव प्रसन्न झाला तर सुदैवाने तुमची शेजारची सीट रिकामी असते किंवा फार वास न येणारा/री शेजारी येतो/ते. पण तुम्ही देवाचे आभार मानत असताना देव खदाखदा हसत असतोच (मला बुडवताना तुम्ही नाचता ना!!)
गाडी सुरू होते. ४ तासात तुम्ही म्हातारे किंवा शिळे होऊ नये ही जबाबदारी बस कंपनीची असते त्यामुळे ते तुमच्यावर सतत गार हवेचे झोत सोडत असतात. गाडी जशी हलते तसे वासांचे संक्रमण होत असते. गाडीत कुणालातरी काल फक्त रात्री तासभर घातलेला गजरा आजही प्रवासात घालायची बुद्धी झालेली असते. गजरा आता सुकलेला असतो. तेवढ्यात कुणीतरी हात उंचावून आळस देते आणि नेमका त्यांनाच ह्या फ्रिजमधे बसून देखील घाम आलेला असतो.
हे सगळं परवडलं अस म्हणायची वेळ एकदा आली होती. मागच्या सीटवरच्या सदगृहस्थांना बिडी ओढायची सुरसुरी आली होती. "मला विडीच्या वासाने ढवळतंय. उलटी व्हायला लागली तर तुमच्या अंगावर ओकेन" अशी धमकी दिल्यावर तो थांबला.
तेवढ्यात "गाडी टॉयलेटके लिए २० मिनिट रूकेगी!" असं स्पष्ट शब्दात ओरडून सांगितलं जातं. गाडी थांबते. गाडीमधे काही घोळ होऊ नयेत, लोकांना वासांचे त्रास होऊ नयेत म्हणून केवढी काळजी घेतात हे लोक. कश्यासाठी उतरायचं हे नीट सांगतात. पण लोक ऐकतील तर ना. ते आपले मोकळं होतात पण हादडूनही घेतात. परत गाडीत खायलाही घेऊन येतात. शेजारचा वास न येणारा कचकून सिगरेट ओढून आलेला असतो. आणि जळक्या बोळ्यासारखा घमघमत असतो.
२० मिनिटात सगळं उरकायचं म्हणून गपागपा खाल्लेलं असतं. वर ढेकर द्यायची राहून गेलेली असते. गाडी सुटते आणि ज्या बाजूने ढेकर येईल तिकडे वडापाव कि मिसळ कि चाट हे ओळखायचा खेळ खेळता येऊ शकतो. त्यात हातात बांधून आणलेल्या वस्तूंचे वासही गाडीभर भ्रमण करत असतातच. इतकं खाल्यानंतर ढेकर नाही तर अजून कशापद्धतीने तरी पवनमुक्ती होतेच.
सुदैवाने व्होल्वो घाट मात्र अजूनही सुसाट वेगाने पार करते त्यामुळे पोटात प्रेमाची घुसळण चालू असली तरी ती घाटाच्या वळणांमुळे वाढत नाही.
घाट संपल्यावर टोलच्या आसपास पुण्याकडे येताना कंपनीतली चिकन्स आणि मुंबईकडे जाताना कुठल्यातरी कारखान्याची मळी यांचा वास बाहेरूनही वसकन बसमधे घुसतो आणि आधीच गंधलेल्या हवेवर चार चांद चढवतो.
टोल संपला की थोड्या वेळाने गाडीचा वेग अतिच मंदावतो. गार हवेचे झोत सुरूच असतात. आता तुम्हाला फ्रिजमधल्या शिळ्या अन्नाला काय वाटत असेल तसं वाटायला लागतं. आंबल्यासारखं...
तुमच्या सहनशक्तीचा कडेलोट होत असतो तेव्हा गाडी सायनमधून धारावी मधे शिरत असते आणि आत येणारा कॅनॉलचा वास तुम्हाला आता तुम्ही मुंबई नामक उकीरड्यात आलात बरंका असं सांगू लागतो.
ह्या सगळ्यातून न ओकता ( कधी खरंच झालं ओकायला तर काय होईल?) आणि सर्दीने भरलेली (thanks to फ्रिजमधली गार हवा!)मी पार्ल्यात उतरते. घरी पोचल्यावर मात्र मला मी टाकलेल्या खिचडीच्या फोडणीचा वास येणंही शक्य नसतं.

Search This Blog