Monday, January 28, 2008

वळू

ऑक्टोबर मधे प्रीव्ह्यू पाह्यला होता.चित्रपट मला अजिबात आवडला नाही.
गोष्ट म्हणायची तर गावात देवाला सोडलेला वळू असतो तो हिंसक होतो. त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसरला त्या वळूला पकडायला बोलावतात. त्या ऑफिसरबरोबर त्याचा अतिउत्साही Docu-maker भाऊही असतो.
वळूला पकडायला गावात फारेश्ट चं येणं, सोबत डाक्यूमेंट्रीचं गावात येणं, गावातल्या लोकांनी डुरक्या (वळू) च्या गोष्टी सांगणं यातून गाव आणि व्यक्तिरेखा उलगडत जातात. शेवटी वळू पकडला जातो. फारेश्ट त्याला घेऊन जातो आणि गावात दुसर्‍या एका गायीला गोर्‍हा होतो तो नवीन वळू असं सांगत चित्रपट संपतो.
वळू आणि त्याला पकडणे इत्यादी गोष्टींचा एक metaphor म्हणून वापर करायचा आणि परिस्थितीवर भाष्य करायचे की केवळ एक गावरान विनोदी ढंगातला सिनेमा करायचा यामधे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचा गोंधळ दिसतो. त्यामुळे मधेच परिस्थितीवर भाष्य करायच्या नादाला जाता जाता परत ग्रामीण विनोदाकडे गाडी घसरते. साध्य काहीच नाही.
गावाचं वातावरण तपशीलात दाखवायचं या सोसापोटी सभेला जाताना छोट्या पोराला त्याची आई देवळाच्या बाहेरच शू करायला धरते ह्या दृश्याने चित्रपटात भर काहीच पडत नाही अगदी विनोदनिर्मिती सुद्धा. सतत बिघडलेल्या पोटाने घाण वास सोडणारा किंवा लोटा घेऊन जाणारा देवळाचा पुजारी या व्यक्तिरेखेसाठी दिलीप प्रभावळकर कशासाठी हवेत? कोणीही करेल की ते. सतत संडासला जाणे यापलिकडे ही व्यक्तिरेखा काहीच फारसं करताना दिसत नाही. बर या प्रकारच्या विनोदांना किती वेळा हसायचं?
फारेष्टचा भाऊ डाक्यूमेंट्री ह्याने मराठी किती कृत्रिम बोलावं याला काही अर्थच नाही. वृषसेन दाभोळकर हा नट इतकंही वाईट मराठी बोलत नाही (माझ्या नाटकातला मुलगा आहे, मी याला लहानपणापासून ओळखते. थोडी कृत्रिम झाक आहे मराठीमधे पण एकदा सांगितल्यावर हे बाळ सुतासारखं सरळ मराठी बोलू लागतं हा अनुभव आहे.) आणि ते सुधारून घेणे हे दिग्दर्शकाचे काम नाही का?
अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून खूप ताकदीचा आहे हे आता माहित होऊन जुनं झालं पण इथे त्याचाही गोंधळ उडाल्यासारखा वाटतो. विनोदी अंगाने जाणारे मर्मभेदी भाष्य अश्या काहीश्या presentation format मधे तो जायला बघतो. त्यामुळे अभिनयाची शैलीही थोडी लाउड, caricature सारखी त्याने ठेवली आहे. ते चित्रपटाला कुठेही मदत करत नाही. पण याठिकाणी दोष बिचार्‍या अतुलचा नाही, पटकथेच्या form, lack of focus यांचा व दिग्दर्शकाचाच आहे असं जाणवत रहातं. अतुलला कपड्यात कृपया stir-ups देऊ नयेत. वरचं शरीर कमावलेलं आणि खाली मोराचे काटकुळे पाय हे अतिशय विचित्र दिसतं.
अमृता सुभाष मात्र तिच्या व्यक्तिरेखेमधे चोख बसलीये. तिच्या अभिनय पद्धतीला जाणारी भडक, लाउड व्यक्तिरेखाच तिला मिळाल्यामुळे ते जमून गेलेय.
बाकी सगळं जिथल्या तिथे ठीक. कपडे गावाच्या मानाने फारच स्वच्छ आणि नवेकोरे वाटतात. तसंच सगळं visual ही. नाटकाच्या सेटसारखं बनवलेलं वाटतं.
हे सगळ दिसत रहातं कारण पटकथेतल्या गोंधळामुळे आपण नाट्यापासून तुटत रहतो.
एक उत्तम potential असलेली कथा आणि पटकथेमधे त्याचं झालेलं वांगं एवढंच impression शेवटी डोक्यात उरतं.
हे झालं माझं मत. पहावी की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं.

6 comments:

.. said...

amazing! .. तू पहिली अशी व्यक्ती आहेस की हा चित्रपट आवडला नाहीये म्हणतेयस. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी हा पाहिला त्या सर्वांना तर बेहद्द आवडलांय.
असो .. प्रत्येकाची आवड निराळी!
मला तर ट्रेलर्स आवडले आणि नक्की बघावासा वाटतोय.

एका भटक्याचा ब्लॉग said...
This comment has been removed by the author.
एका भटक्याचा ब्लॉग said...

ओह मॅडम ....
तुम्ही समिक्षण पण करता की .. सगळ्या वेगवेगळ्या कला एकाच व्यक्तित भरल्यायत कि देवाने .. एखाद दोन आमच्यात तरी भरायच्या होत्यान :(

असो.. एकदम प्रोफेशली समिक्षण आलेय .. कुठली गोष्ट का चांगली वाटत नाही डिटेल्स सहित .. एखादी गोष्ट आवडली नाही चांगली नाही हे तर कोणीही सांगते .. पण ते का आवडले नाही याचे येवढे सर्व अंगानी विश्लेषण .. सही आहे .. त्यामुळे उगीचच नावे ठेऊन .. कलाकॄतीकारावर अन्याय वगैरे झाल्या सारखा वाटत नाही..जे चुकलेय .. जे वाटले ते एकदम नेमक्या शब्दात मांडलेय ..

Alhad Mahabal said...

वळू बद्दल वाचलेली पहिलीच निगेटिव्ह कॉमेंट...
अर्थात, वळूकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टीकोन वेगळा आहे हे जाणवतं.

Parag said...

The best character in the film in my opinion is Jivanya (Girish Kulkarni). Mohan Agashe and Nandu Madhav have done a fine job.

The problem I see with the movie is before intermission, after a particular point, the story does not move ahead for a while. Things start again moving after intermission.

I found it strange that you did not find a single good thing worth mentioning about the movie.

निशा............ said...

एकदम परफ़ेक्ट!!!

मला पण लोक कॊतुक करतात तितका काही वळू भारी वाटला नाही!!!

आणि मुख्य म्हणजे पोस्टर पाहून एक माजलेला वळू अपेक्षित होता... पिक्चर भर एक सामान्य शांत बैल दिसतो...

Search This Blog