Friday, September 19, 2008

ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी

"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

14 comments:

Samved said...

by accident, i visited your blog. मजा आली असं म्हणता म्हणता जीभ चावली. खुपच छान आहे लेख

Silence said...

माझ्याही पत्नीचा हाच निर्णय स्विकारणे मला कठीण गेले होते. माझी स्वत:ची काही हरकत नसली तरी विनाकारण समाजाच्या विरुद्ध न जाण्याची माझी (कदाचित चुकीची) प्रवृत्ती आहे.

zelam said...

नी - हे तर पावलोपावली घडतं गं.
पण नवयाला पटलय नं? मग बाकीचे गेले उडत.

--- झेलम

Jaswandi said...

KCBC nantar ata ithe parat ekda tu lihilela vachtana khup chhan vattay!
mazya khup javalchya vishayvar lihilays!

प्रशांत said...

हल्ली लग्नानंतर नाव बदलणं जवळजवळ बंदच झालंय, असं म्हणायला हरकत नाही. आणि आडनावाचं म्हणाल, तर आडनाव बदललं काय, किंवा तेच कायम ठेवलं काय, त्याचा संबंध फक्त लेखी व्यवहारापुरताच मर्यादित असतो. एरव्ही, मित्रमंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये आडनाव अगदी गौण असतं. (अगदी पूर्वी उखाणॆ घ्यायचे, त्यामध्येही आडनावाचा प्रश्न येत नसे.) पण काही घेणं देणं नसताना हे "आप्त, ईष्ट" उगाचच विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीची अपेक्षा करतात. याच बाबतीत नव्हे, तर इतर अनेक बाबतीतही अशा लोकांचं निष्कारण interference खटकतं. असो. प्रत्येक गोष्ट बदलायला वेळ जावा लागतो. कालाय तस्मै नमः.

btw. लेख मस्त झालाय. आज बर्‍याच दिवसांनी या ब्लॉगवर चक्कर टाकली. हे टेम्प्लेटही छान आहे.

Seema Padalkar said...

Majhyaa pahilya nokareet barobarachya sahakarya sobat mee bhaandale hote yababateet te aathavale. :)

Mee kaahisa haa nirnay majhyaa navaryavaar laadala mhanaayalaa harkat naahee. :P Ajunahee tyala chukun kunache Mr Padalkar mhanoon patra aale tar avarjun mala dakhavito. :)

Aso. 12 varshaanpoorvee ghetalela ha nirnay don mule jhalayavarahee badalavasaa vaatala naahee yatach saare aale.

Sunil Kashikar said...

नीरजा मस्त लिहीले आहे. वाचतांना माझ्यातहि ’परंपरावादी’ पुरुषी प्रवृत्ती हे मात्र जाणवल. हि जाणिव अगदिच नव्याने झाली नसली तरी यावेळी जास्त समर्पक पणे झाली. याला कारण कोणतीही विशिष्ट भुमिका न घेता, मनात आकस न बाळगता तुम्ही केलेलं सकस लेखन. अशा प्रकारचे लेखन आपल्या समाजाच्या जाणिवा अधिक प्रगल्भ करुन आपल्याला रुढिवादाच्या बंदिस्त भिंतींमधुन एक मोकळ्या आकाशाकडे घेउन जाईल अशी आशा करतो.

धन्यवाद!

- पांथस्थ

अनामिका!! said...

नीरजा माझा वेगळा अनुभव आहे ...........९३ला लग्न झाले ते देखिल गावात ................लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट बनवुन घ्यायचे राहुन गेले.......हा नवर्‍याचा आणि माझाच निष्काळजीपणा म्हण हव तर्...............अचानक नवर्‍याला परदेशी नोकरी साठी जावे लागले ५ वर्षांनी ................ तो गेल्यावर मुलाला आणि मला देखिल तिथे न्यायच अस ठरवल्यावर मग पासपोर्ट साठी धावाधाव सुरु झाली...............आणि मग अगदी शिधापत्रिका मिळवण्यापासुनची तयारी सुरु झाली....शिधापत्रिकेवर नाव चढवायचे तर लग्नाचे प्रमाणपत्र हवे................आता आली का पंचाईत्?.............. सगळे सोपस्कार करुन घेताना जो काही मानसिक आणि शारीरिक त्रास झाला त्याचे वर्णन शब्दात करणे कठिण..............दरम्यान नवर्‍याचे पुर्वीच्या कंपनीतल्या काही आर्थिक बाबींचा निकाल लागायचा होता ...........जसे प्रोव्हिडंड फंड ,ग्रॅज्युईटि तत्सम येणे बा़की होते आणि लक्षात आले कि गावातल्या कुठल्याही बँकेत आपले स्वतःचे अथवा दोघांचे मिळुन एकही खाते नाही............. घरच्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर माझी नाकेबंदी करायची आयती सबब त्यांना मिळाली ....................सासुबाईंचे आणि माझ्या नवर्‍याचे एक जॉइंट खाते होते त्यातच सगळे चेक टाकावे असा हेका सुरु झाला..........मधल्या काळात नवर्‍याने माझी सगळी जबाबदारी धाकट्या दिरावर टाकली होती ...........पण मोठ्या भावाची पाठ वळताच त्याने हात वर केले...........मी नोकरी वगैरे करत नव्हते..........मला माझे व मुलाचे पोस्टाचे पैसे देखिल तुझे तुच भर असे सांगण्यात आले रक्कम होती २०० रु महिना........................याच काळात नवर्‍याने आपल्या बहिणीशी एक आर्थिक व्यवहार केला होता .............परदेशी जाण्यापुर्वी तिला एक ठरावीक रक्कम तिच्या घराच्या कर्जासाठी इतर ठिकाणाहुन येणार्‍या पैशातुन द्यावी असे नवरा सांगुन गेला होता ..........मी प्रामाणिकपणे तिला आलेल्या पैशातुन रक्कम पोहोचती केली ..................जाताना नवर्‍याने जो चेक तिला पैशाची सोय न झाल्यास खात्यातुन पैसे काढण्यासाठी दिला होता त्याची विचारणा मी केली असता तिने तिच्या स्वतःच्या ऑफिस स्टाफ समोर मला तु कोण त्याची ? तुझा काय संबंध ?तुला का देऊ? असे बोचणारे प्रश्न विचारुन माझा सगळ्यांदेखत पाणउतारा केल्यावर मी मनाशी ठरवल की आता यांना दाखवुन द्यायचेच की आपण कोण आहोत ते .?............"ठकास व्हावे महाठक" या न्यायाने मी माझे लग्नानंतरचे सगळे कायदेशिर् हक्क योग्य मार्गाचा अवलंब करुन मिळवले................एरवी मी माझे लग्नापुर्विचेच नाव वापरत होते पण कायदेशिर बाबी समजुन घेता ,नवर्‍याचे नाव व आडनाव न लावण्याचा इतर माणसे कश्या प्रकारे फायदा करुन घेउ शकतात हे लक्षात आल्यावर सगळीकडेच नाव बदलुन घेतले अगदी गॅझेट वर सुद्धा...............कदाचित माझा हा अनुभव सगळ्यांना थोडा अतर्क्य वाटेल पण .............केवळ लग्न झाले आणि नाव बदलले म्हणुन कुणि माणुस बदलत नाही ...........आपल्या शिक्षणाच्या बळावर आलेल्या शहाणपणातुन आणि आईवडिलांच्या सुसंस्कारांची शिदोरी कायम गाठीला बांधुनच प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात प्रत्येक कठिण प्रसंगाला सामोरी जात असते............ नविन आडनाव लावले म्हणुन आपली माहेरच्या आडनावाशी कायमची जोडली गेलेली नाळ कधि तुटत नाही हेच खरं!!!!!!!!!!!..............सासरचे आडनाव मिरवणे अथवा न मिरवणे हा प्रत्येक विवाहीत स्त्रीचा वैयक्तीक प्रश्न नक्किच आहे पण समाजात अश्या प्रकारची माणसे देखिल वावरत असतात जे अश्या क्षुल्लक गोष्टिंचा बाऊ करुन एखाद्या स्त्रीला कायद्याच्या कचाट्यात अडकवु शकतात तेंव्हा निदान कागदोपत्री नवर्‍याचे नाव लावायला काहीच हरकत नाही................
हे व्यक्तीशः माझे मत आहे..............!

नीरजा पटवर्धन said...

तुमचा अनुभव दुर्दैवी आहे. परंतु तुमच्या उदाहरणामधे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो लग्नाचे सर्टिफिकेट नसण्याचा. ते नसेल तर नाव बदलले काय आणि नाही बदलले काय कोणीही असा गैरफायदा घेऊ शकतो.
असो. तुमच्या अनुभवावरूनही मला अजिबात असं वाटत नाही की लग्नानंतर आडनाव बदलण्याने स्त्रीला कुठली सामाजिक किंवा कायदेशीर सुरक्षितता मिळत असावी.
दुसरं म्हणजे मला माझ्या निर्णयाबद्दल कधीच पश्चाताप नव्हता आणि नाहीये आणि नसेल. आणि या निर्णयाचा फेरविचार करायची मला अजूनतरी गरज पडली नाहीये.

Prashant said...

I agree with Jaimaharashtra in a way. We did not find it necessary to change the family name on my wifes passport and everywhere else till recently. However, in Germany the child gets the name registered at the hospital which in turn is the name registered at medical insurance company. To avoid complications when we go back to India we decided to get it done at the consulate. Now my wife has both the family names and our son has a choice. Sometimes it is a matter of convenience however it is not important if the marriage is registered.

Dk said...

Nee i totally agree with this point of view! hi ek atishy khaasgee bab astana lokaanaa tyaat ludbud karaychee garjch kaay? BTW sadhya tuze june likhaan vachun kaadhtoy :D

D D said...

एका संवेदनाशील विषयावर माझेच मत वाचत आहे, असे मला ही पोस्ट वाचतांना वाटत होते. भारतीय स्त्रीने विवाहानंतर कोणते नाव लावावे हे ठरवण्याचा हक्क तिला कायद्याने दिला आहे, हे खरे! पण कायद्यातील इतर तरतुदी मात्र दुर्दैवाने ह्या हक्काला बाधा आणणार्‍या असल्याने, एखाद्या स्त्रीला विवाहानंतरही तिचे मूळ नाव तसेच ठेवावेसे वाटले, तरी समोर येणार्‍या कायदेशीर अडचणींचा डोंगर पाहून ती तो विचार बाजूला सारते. तसेच कोणत्याही परिस्थितीत मॅरेज सर्टिफ़िकेशन केलेले असणे आवश्यक आहे, तोच एक निर्णायक पुरावा ठरतो.
पण स्त्रियांना नाव बदलले नाही, तर ज्या काही कायदेशीर अडचणी येतात, त्या येऊ नये म्हणून सरकारने देखील कायद्यात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. बॅंकेत खाते उघडतांना त्या व्यक्तीचे मॅरिटल स्टेटस नोंदणे अनिवार्य करावे, तसेच खाते उघडल्यानंतर त्या व्यक्तीने लग्न केल्यास दोन महिन्यांच्या आत त्याची माहिती बॅंकेला देण्याचे सक्तीचे करावे. तसेच सर्व प्रकारचे फ़ॉर्म भरतांनाही त्या व्यक्तीचे नाव काहीही असले तरी, ती व्यक्ती विवाहीत असेल, तर त्या व्यक्तीच्या नावासोबत तिच्या जोडीदाराचे नाव सुद्धा त्या फ़ॉर्मवर नोंदणे सक्तीचे करावे.
हे बदल घडून आल्यास स्त्रिया त्यांचे नाव काय असावे हे ठरवण्याचा त्यांचा वैयक्तिक अधिकार पूर्णपणे वापरू शकतील.

नीरजा पटवर्धन said...

DD,
तुमची माहीती चुकीची आहे. जर कोणी नाव आणि आडनाव बदलायचे नाही असे ठरवलेले असेल तर त्यामधे कुठल्याही कायदेशीर तरतुदी अडचणीच्या होत नाहीत. पासपोर्टवरसुद्धा जोडीदाराचे नाव असणे आवश्यक असते आणि आमच्या दोघांच्या पासपोर्टवर एकमेकांची नावे आहेत. वेगवेगळ्या आडनावासकट. ते करून घेताना कधी कुठे प्रॊब्लेम आला नाही. आजवर मलातरी कुठलीही कायदेशीर वा तांत्रिक अडचण आलेली नाही आडनाव न बदलण्याने.
लग्नाच्या रजिस्ट्रेशनचे सर्टीफिकेट हे कुठल्याही लग्नासाठी आवश्यकच असते मग आडनाव बदला वा बदलू नका. आडनावातला बदल हा लग्न वैध ठरवण्यास समर्थ नाही...

D D said...

माझी माहिती चुकीची असल्यास मला आनंदच होईल. नाव न बदलण्याचा निर्णय घेतल्यास त्यावेळी तिथे कोणत्याही कायदेशीर अडचणी येत नाहीत हे मलाही मान्य आहे. पण त्यानंतर पुढे येणार्‍या काही प्रसंगात योग्य कागदपत्रे सादर केली गेली नाहीत, तर नाव न बदललेल्या विवाहीत स्त्रीला त्याचा त्रास होतो, असे मला म्हणयचे होते. त्यावेळी त्या स्त्रीला किंवा तिच्या नातेवाईकांना कायद्यातील इतर काही गोष्टींचा आधार घेऊन त्रास दिला जाऊ शकतो.
माझ्या ओळखीतील एक नाव न बदललेली स्त्री मरण पावली, तेव्हा नुसतेच तिच्या नावाने दिलेल्या डेथ सर्टिफ़िकेटवर "श्री. अमुक तमुक यांची पत्नी" असा बदल करून घ्यावा लागला. नाहीतर वारसा सिद्ध करतांना अडचणी आल्या असत्या. तसेच माझ्या ओळखीतील एका प्रेग्नंट स्त्रीला "लवकर नाव बदलून घे, नाहीतर प्रसूतीची रजा मिळण्यात अडचण येईल, व बिनपगारी रजा घ्यावी लागेल" असे तिच्या कार्यालयातून सांगण्यात आले. अशा काही प्रसंगात नाव न बदललेल्या स्त्रीला तिचे हक्क मिळवतांना भरपूर मानसिक त्रास होतो म्हणून स्त्रिया नाव तसेच ठेवतांना कचरतात, इतकेच मला सांगायचे होते.
दुसरे असे, की अजूनही सरसकट सर्व स्त्रियांकडे पासपोर्ट असतोच असे नाही, म्हणून खबरदारी म्हणून बॅंक अकाऊंटवर जोडीदाराचे नाव लिहिणे सक्तीचे करणे आवश्यक आहे. लवकरच हेही बदल घडून येतील आणि सर्व स्त्रिया कायद्याने त्यांना दिलेल्या नाव न बदलण्याचा हक्क वापरू शकतील अशी आशा करूया!

Search This Blog