Tuesday, November 11, 2008

स्वच्छतेच्या बैलाला..!!

मायबोलीच्या दिवाळी अंकात माझा 'स्वच्छतेच्या बैलाला..!!' हा लेख प्रसिद्ध झाला.
-------------------------------------------------------------------
"इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?"
प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता. अत्यंत त्रासिक चेहर्‍यापासून सुरू करून मग थोबाडावर एक गलिच्छ हसू घेऊन मुस्कटात मारल्यासारखं उत्तर जयंतने फेकलं.
"मला इतर कामं आधी करू देत."
'तुम्हा पोरींचे नखरेच जास्त, काम कमी..' इत्यादी सगळं तो मनात बडबडला असणारच. नखशिखांत घाण वाटली मला. थोडक्यात लेडीज टॉयलेट ही गरज नसून चैन होती. गरजेला कुठलाही आडोसा जवळ करणे हे अपेक्षित होते. स्टारच्या सगळ्या मागण्या अजिजीने झेलणार्‍या प्रोड्युसरला युनिटमधल्या बायांसाठी फिरते टॉयलेट किंवा जास्तीची व्हॅनिटी मागवणे परवडण्यासारखे नव्हते, असेही नाही. पण प्रॉडक्शन मॅनेजरचा हा घाणेरडा ऍटिट्यूड मला तसाही नवा नाही. कामाच्या निमित्ताने मी बरीच फिरते. शहरात आणि शहराबाहेरही. सगळीकडे हेच.

रेल्वे किंवा विमानाचा प्रवास असेल तर काही प्रश्न नसतो पण बस किंवा कारने जाणार असू तर प्रवासात पाणी पिणं हे संकट होऊन बसतं. पाण्याच्या एकेका घोटाबरोबर एकेक प्रश्न उगवत असतात. वाटेत टॉयलेट मिळेल ना? कमोड असेल की इंडियन? कमोड असेल तर निदान लेडीज वेगळं असेल ना? जे काही मिळेल ते स्वच्छ असेल ना? तिथल्या खिडक्या तुटलेल्या नसतील ना? तिथे हात धुवायला पाणी मिळेल ना? हजार गोष्टी. मग पाणी पिणं टाळायचं. 'खूप वेळ कंट्रोल आहे माझा' असं अभिमानानं म्हणायचं आणि अनेक रोगांना निमंत्रण द्यायचं.

सुरूवात कधी झाली बरं या सगळ्याची?? बरोबर.. शाळेपासून.
"बाई गच्चीला जाऊ?"
असं रूपालीने विचारल्यावर सगळा वर्ग फिसफिसला होता. आपण विचारलं तर आपल्यालाही हसतील त्यापेक्षा नकोच ते. सुट्टीपर्यंत थांबू. असं म्हणत पहिल्यांदा पायावर पाय ठेवून पुढचा तास काढला होता.
'गच्चीपाण्याच्या सुट्टीत खूप मोठी रांग असते.'
'खूप घाण वास येतो.'
'तिथे पाणीच नाहीये.'
'तिथे अंधार आहे. अंधारात काही असलं तर?'
अश्या अनेक कारणातून हळूहळू 'शाळेतून घरी गेल्यावरच काय ते बघू' हे अंगवळणी पडलं.

मग थोडंसं मोठं झाल्यावर शाळेच्या वेळातही पर्याय उरेना, डाग पडण्याची भिती असे. तेव्हा मनात दाटणारी सगळी घाण, सगळी मळमळ घेऊन आत जायचं. तिथला अंधार, तिथली जळमटं, तिथे पाणी नसणं किंवा असलं तरी ते डबडं घाण असणं, नापास होणार्‍या मोठ्ठाड मुलींनी कर्कटकानी कोरून ठेवलेलं विचारवाङ्मय आणि चित्र असं सगळं सगळं सहन करत आपला कार्यभाग उरकायचा. आईकडून तिच्या लहानपणी बाजूला बसण्याबद्दल ऐकलं होतं ते बरं असं वाटायचं. "हे जे काय तुमच्या शरीरात घडतंय ते काही घाण नाहीये. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं शरीर आई होण्यासाठी तयार होऊ लागलंय." असं 'त्या' लेक्चर्समधे सांगितलं होतं खरं पण त्या लेक्चर्सच्या बाईंना कुठे त्या टॉयलेटमधे जावं लागतं बदलायला. असं काय काय डोक्यात येऊन मग ते दिवस नुसतं घाण घाण वाटायचं.

लहानपणी आईबाबांच्या बरोबर प्रवासाला जाताना शक्य असेल तिथे रेल्वे असायची सुदैवाने. कारण मी नी बाबा दोघेही मोठ्ठे 'वकार युनूस!' त्यामुळे एसटीच्या भानगडीत आम्ही पडत नसू. पण आईबरोबर कोकणात जायचं तर एसटीनंच जावं लागायचं. एकदा तिसरी चौथीतली गोष्ट असेल. बरेच नातेवाईक मंडळी एकत्र कोकणात जात होतो. रात्रीचा खूप वेळाचा प्रवास. तोही एसटीने. आपापल्या आयांबरोबर एसटी स्टॅण्डवरच्या टॉयलेटमधे जायला आम्ही दोघी बहिणींनी नकार दिला. तिथली अवस्था काय वर्णावी. तिथे जायच्या रस्त्यावर बरंच आधी पुढे काय असणार आहे हे वासावरनंच कळत होतं. साधारण जिथून आडोसा सुरू होतो तिथे रात्रीचा मिणमिणता दिवा. खाली बघितलं तर जमीन सगळी ओली आणि कुठे कुठे साचलेलं पाणी नि त्यावर टाकलेली माती. पण एकाही नळाला पाणी नाही. आतली टॉयलेट्स फुटलेली नी कोरडी ठाक. आतमधे भरपूर जळमटं नि माती. त्यात एक बाई आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या बाहेरच काम उरकून मोकळी झालेली दिसली. तेव्हा ओली जमीन आणि साचलेल्या पाण्याचं गणित अगदी नीट कळलं. अश्या ठिकाणी जायला नकार दिल्यावर मग साधारण लहानपणी जे शक्य होतं ते म्हणजे पूर्णपणे बाहेर साधारण कडेचा भाग बघून सर्व भावंडांना एका लायनीत बसवलं होतं. एसटीच्या प्रवासातला हा सगळ्यात भीषण प्रकार तेव्हापासून डोक्यात बसला तो बसलाच.

शाळेनंतर कॉलेजमधे गेल्यावरही फार काही फरक नाही पडला. शाळा निदान फक्त मुलींची होती. भल्या मोठ्ठ्या शाळेच्या कुठल्याही दिशेचं टॉयलेट हे आमच्यासाठीच होतं. आता कॉलेजमधे झालं असं की क्षेत्रफळ वाढलं. वर्ग लांब लांब आणि आमच्यासाठी एकुलती एक एलआर(लेडीज रूम) ज्यात आत बरीच टॉयलेटस होती. म्हणजे दोन लेक्चर्सच्या मधे जाउन यायचं तर पुढच्या लेक्चरची पाचदहा मिनिटं गेली. नपेक्षा बंक मारलेला काय वाईट. त्यामुळे कधी टॉयलेटला जाण्यासाठी लेक्चर बंक तर कधी लेक्चरसाठी एलआरला जाणं बंक.

कॉलेजच्या काळातच नाटकासाठी दौरे, एनसीसी चे कॅम्पस इत्यादी सुरू झालं. मग 'हाल कुत्रे खात नाही' या म्हणीचा अर्थ चांगलाच लक्षात आला. दौर्‍यांना श्रीमंती थाट अर्थातच नसायचा. जिथे थांबू तिथे जसं असेल तसं टॉयलेट वापरायचं आणि निमूट पुढे जायचं. हेच अंगवळणी पडायला लागलं. अगदी त्या दिवसात सुद्धा. परत वर माझा आठ आठ तासाचा कंट्रोल आहे हे अभिमानानं मिरवायचं आपापसात. हीच गोष्ट कॅम्पची. १०-१२ दिवस ४००-५०० मुली जिथे रहाणार तिथे निदान बर्‍या टॉयलेट्सची, आंघोळीची सोय असावी असं त्यांना कधी वाटलं नाही. बहुतेक 'सैन्यात का घेत नाही तुम्हाला कळलं?' असं काहीतरी सांगायचं असेल त्यांना. पाणी कमी प्यायची सवय अशीच लागत गेली असावी.

शिक्षण संपलं. परदेशातलं शिक्षणही उरकलं आणि मुंबईत कामाला सुरूवात झाली. लग्नही झालं होतं. तेव्हा व्यवस्थित पाणी पिणे आणि एकुणात या सगळ्याच गोष्टींचा awareness, गांभीर्य इत्यादि कळून चुकलं होतं. पण म्हणून नष्टचर्य संपतं का? तर मुळीच नाही.

हल्ली प्रवास करताना वर म्हणल्याप्रमाणे by road असेल तर चिंताच चिंता असतात. अजूनही छोट्या ठिकाणची एस्ट्यांची टॉयलेट्स त्याच भयाण अवस्थेत असतात. अजूनही गावंढळ बायका आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या आडोश्याच्या भागातच बसतात. छोटेमोठे धाबे भरपूर असतात. पण तिथे टॉयलेट असतंच असं नाही. असलं तर एकच जे अंधारं, इकडनं झाकलं तर तिकडे उघडं पडतंय अश्या स्वरूपाचं आणि अतीव घाण असं असतं. चकचकीत हॉटेल शोधण्याशिवाय आणि तिथल्या माजोरीला तोंड देण्याशिवाय पर्याय नसतो. बर एवढं करूनही तिथे लेडीज टॉयलेट वेगळं असेलच आणि ते स्वच्छ असेलच याची खात्री नाही. पेट्रोल पंपावर लेडीज टॉयलेट वेगळं असतं ते बर्‍याचदा तिथे काम करणारी पोरं स्वत:चं खाजगी टॉयलेट म्हणून वापरतात. आडवळणाच्या प्रवासात असल्या ठिकाणी जाण्यापेक्षा झाडाझाडोर्‍याचा, दगडांचा आडोसा शोधून तिकडे जाणे हे जास्त स्वच्छ वाटतं.

'प्रवासात कुठे थांबायचं?' यावरून आमच्या दोघांच्यात (मी आणि नवरा) एकतरी प्रेमसंवाद ठरलेला असतो. आजवरच्या अनुभवाने मी paranoid असते की हा कुठेतरी भयाण जागी थांबवणार गाडी. किंवा ड्रायव्हरने थांबवली अश्या कुठल्याही जागी तर त्याला काही म्हणणार नाही. मग होतं miniature World War III. नवरा बरोबर नसेल आणि बरोबर केवळ ड्रायव्हर असेल किंवा असे लोक असतील की ज्यांना योग्य टॉयलेट हवं असं मी सांगू शकत नाही किंवा सांगितलं तरी त्यांच्या स्वच्छच्या व्याख्या वेगळ्या असतात तर मग मी केवळ देवाची प्रार्थनाच करू शकते. सगळा प्रवास याच टेन्शनमधे. कधी निर्लज्जपणे याबद्दल बोललेच तर मग वरती शूटवरचा जो अनुभव दिलाय त्याची पुनरावृत्ती. अगदी ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर फिरतानाही यात काही फरक नाही.

हा प्रवासातला अनुभव पण मुंबईतल्या मुंबईत फिरताना होणारी फरपट काही कमी नसते हो. कापडाचं, कपड्याचं मार्केट एका ठिकाणी तर टेलर दुसर्‍या ठिकाणी, डाय करणारा अजून तिसर्‍या ठिकाणी. प्रॉडक्शनचं ऑफिस अजून एका ठिकाणी. अशी त्रि च नाही तर अनेकस्थळी यात्रा मला एका दिवसात पार पाडायची असते. पाण्याची बाटली बरोबर ठेवलेली असते पण पुढच्या दोन तासात टॉयलेट मिळेलच याची खात्री नसतेच. सुलभची अवस्था काही ठिकाणी बरी म्हणावी इतपतच आहे. पण तिथेही माझ्या हातातली खरेदीची (कामाच्या खरेदीची) बोचकी ठेवायची कुठे हा प्रश्न असतोच. लोकलच्या स्टेशन्सवरची टॉयलेटस हा एक मोठ्ठा विषय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने चर्चेला घेतला होता, तेव्हा त्या लेखातून मिळालेलं चित्र भयाण होतं. अर्धवट फुटलेल्या भिंती, पाणी नसणं, लेडीज टॉयलेट हे सगळ्यांच्या नजरेसमोर असणं, खिडकीच्या जागी फक्त रिकामा चौकोन, लेडीज टॉयलेटमधे छक्के, गर्दुले, दलाल, बेघर कुटुंब यातल्या कुणाचं तरी राज्य असणं हे सगळं सगळं त्यात फोटोसहित होतं. कुणीतरी विषयाला तोंड फोडलं यावर बरं वाटलं होतं पण नंतर काहीच नाही. रेल्वे प्रशासन किंवा अजून यासंदर्भातले इतर विभाग यातल्या कोणालाच त्याविषयी काही करावं असं वाटलं नाही. माझ्यासारख्या अनेक जणींच्या रोजच्या hygiene शी संबंधित असलेला हा विषय कुणालाच लक्ष घालावं इतका महत्त्वाचा वाटला नाही.

मॉल्स, मॅक्डोनाल्डस, सिसिडी, बरीस्ता इत्यादी यांचा चंगळवादाशी संबंध जोडा तुम्ही पण त्यांनी आमची किंचित का होईना सोय बघितलीये हे विसरता कामा नये. कारण फिरत असताना अधेमधे कुठे खावं आणि तिथेच टॉयलेट वापरावं तर अनेक छोटी छोटी हॉटेल्स तर बिना टॉयलेटचीच असतात. मॉल्स सोडा पण या बाकीच्या ठिकाणचं टॉयलेट वापरण्यासाठी मला एका वेळेला किमान ५० रूपये त्या त्या ठिकाणी खर्चावे लागतात त्याचं काय! दिवसाला केवळ टॉयलेटला जाता यावे म्हणून दिडशे दोनशे (किंवा गरजेनुसार जास्त) रूपये खर्च करणे हे कुणाला नि कसं परवडावं? गरोदर बाया काय करत असतील अश्या वेळेला? हे सगळे प्रश्न चिवचिवत रहातातच.

बर मॉल्स सोडून या इतर ठिकाणी लेडीज आणि जेन्टस अशी वेगळी टॉयलेटस नसतात. आणि त्यातून तो कमोड असतो. डिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर ही आपल्याकडे अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे. आणि टॉयलेट पेपर बहुधा संपलेलाच असतो. कमोडची सीट वापरताना वर ठेवावी हे बहुतांशी भारतीय पुरुषांना माहीत नसतं किंवा ते तसं करणं हे त्यांच्या इगोला झेपण्यासारखं नसतं. त्यामुळे अश्या ठिकाणी जाणं हे अनेक रोगांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. "शेवटी आपल्याला तिथे बसायचं असतं. कसलंही infection आपल्यालाच आधी होणार ना!" एका मैत्रिणीचं वाक्य सतत पटत रहातं. सीसीडी वा बरिस्ताच नव्हे तर अनेक मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्स मधे नियमानुसार असायला हवे म्हणून एक टॉयलेट असते, जे कुक, साफसफाई करणारी पोरे, इतर स्टाफ आणि ग्राहक असे सगळ्यांसाठीच असते. आता हे असे कमोडवाले टॉयलेट बायकांनी वापरायच्या लायकीचे असेल का याचा तुम्हीच अंदाज घ्या. आणि हे केवळ उडपी टाइप्सच्या हॉटेल्सबद्दल नाही तर दादर, पार्ला, जुहू, लोखंडवाला अश्या ठिकाणची 'अपमार्केट' म्हणता येईल अशी रेस्टॉरंट्स पण आहेत जिथे टॉयलेट मात्र एकच आहे. त्यामुळे चांगल्या कॉफीशॉपमधे बराच वेळ बसायचं असेल तर मग मेरियाट किंवा ऑर्किड किंवा तशी ४-५ तारेवाली हॉटेल्स बरी पडतात. कारण तिथे वेगळी वेगळी टॉयलेटस असतात आणि एकदम स्वच्छही असतात. पण हे ज्याला परवडेल त्याला. सामान्य उत्पन्न असलेल्या बाईने बाहेर 'जाऊच' नये का मग? आणि गेली तरी पाणी पिऊ नये, प्यायलंच तर भरपूर चालावं उन्हातून म्हणजे घाम येउन जाईल आणि जायची गरजच भासणार नाही? आणि पिरीयडच्या दिवसात तर घराच्या बाहेर पडूच नये?

पॅथोलॉजीवाली डॉक्टर मैत्रिण माझ्याशी गप्पा मारत होती.
"मधे एक केस आली होती. २०-२५ वर्षांची मुलगी. युरिन एकदम व्हाईट. पासिंगच्या वेळेला जळजळ प्रचंड. मी तिला विचारलं की पाणी पितेस का भरपूर तर म्हणे कसं पिणार? फिरण्याचा जॉब माझा. जाणार कुठे? ती मुलगी सकाळी घरून निघायच्या आधी जायची ते पार संध्याकाळी घरी येईपर्यंत तशीच. पण एकुणातच अश्या कारणांनी युरिन इन्फेक्शन असण्याचं प्रमाण खूप वाढलंय."
"काय करणार गं. नसतंच शक्य कुठे जाणं. थांबावंच लागतं. कंट्रोल ठेवावाच लागतो."
"पण याचे परिणाम काय होतील कळतंय का? एकतर हे असलं इन्फेक्शन म्हणजे त्रास. बर तेवढ्यावर भागत नाही. उद्या या मुलीचं लग्न होणार. सगळ्या गोष्टी शेवटी एकाच जागी. किती त्रास? आणि pregnant राहिल्यावर हे असं न जाणं म्हणजे तिच्या आणि बाळाच्या आरोग्याशीही खेळच की गं."
"पण मग करायचं काय नि कसं? सगळं सोडून घरी बसणं हा तर उपाय होत नाही ना!"
या वाक्याशी सगळं संभाषण संपलं. अनुत्तरितच.

नाही, हे नखरे नाहीत किंवा अतिस्वच्छता नाही. पंचतारांकित सोयींची अपेक्षाही नाही. किमान सुविधांची गरज आहे.
पूर्वीच्या बायका कसं करायच्या हा युक्तिवादही उपयोगाचा नाहीये. कारण, पूर्वीच्या बायका पण प्रवास करायच्या आणि हे सगळं सहन करायच्या. पण एकतर त्यांनी लाजेकाजेपोटी हे सहन केलं असेल आणि कदाचित आम्ही आज जितक्या फिरतो तितक्या त्या सगळ्या फिरत नसणार त्यामुळे ह्या समस्या तेव्हा काहीजणींच्याच असणार.

एवढा त्रास होतो तर बसा घरातच असं काही मध्ययुगीन मानसिकतेची माणसं म्हणतीलच पण तेही उत्तर नाही, निश्चितच नाही. गरजेच्या वेळेला लेडीज टॉयलेट मिळणं ही एक बेसिक गोष्ट आहे. हा बेसिक हक्क आहे. आणि दुर्दैवानं हे आपल्या विविध व्यवस्थांपैकी कुठल्याच व्यवस्थेत महत्त्वाचं मानलेलं दिसत नाही. कुणालाच त्याचं महत्त्व जाणवत नाही.

मग काय करायचं? आपण आपलं भरपूर पाणी प्यायचं नि आपले आपल्याला परवडतील आणि झेपतील असे उपाय शोधायचे हे नक्की. मग ते मॉल मधे घुसणे, प्रत्येक उपनगरात एक तरी ओळखीचं घर मॅनेज करणे, सगळी किळस बाजूला ठेवून सुलभमधे शिरणे, हॉटेलमधे किंवा ऑफिसेसमधे गेल्यावर निर्लज्जपणे टॉयलेट विचारणे, टॉयलेट विचारल्यानंतर उत्तर देणार्‍याच्या चेहर्‍यावरचे सगळे घाणेरडे भाव दुर्लक्षित करणे, प्रवासात/ बाहेरगावच्या शूटवर योग्य टॉयलेटसाठी भांडण करणे यातले काहीही असो... आणि त्यातूनही चिडचिड उरलीच तर असा लेख लिहायचा...

तेव्हा (हातामधे प्यायच्या पाण्याची मोठ्ठी बाटली घेऊन) स्वच्छता आणि आरोग्याच्या नावाने.... चांगभलं...! चिअर्स...!!

-------------------------------------------------------------------------------


लोकांनी मनापासून प्रतिक्रिया दिल्याच पण या संदर्भात काही करायला हवे ही भावना मूळ धरू लागली. त्यानुसार या विषयावर एक चर्चाही सुरू केलीये मायबोलीवर. लेख आणि चर्चा दोन्हीची माहिती तुम्हाला कळावी म्हणून ब्लॉगवर दुवे टाकतेय. जरूर वाचा. तुमच्या मनात काय येतंय तेही आम्हाला कळूद्या. मायबोलीवर वा इमेलने आम्हाला कळवा. सहभागी व्हा.
-नी

6 comments:

Meghana Bhuskute said...

विचार करायला लावणारा, मोकळा आणि अनावश्यक मोकळेपणा नसलेला लेख आहे. वाचून बरे वाटले, असे तर म्हणू शकत नाही. आपल्यावरच्याच अन्यायाची जाणीव नव्याने झाल्यासारखे वाटले, असे म्हणता येईल फार तर. :)

HAREKRISHNAJI said...

Yesterday while talking to Mr.Subhas Dalvi, who works for BMC and who is also from vile Parle, I mentioned about your post. He is the man who can make a lot of difference. I have requested for his views and suggesstions.

I have created a blog for his work done for our city, Mumabi.

www.maazimumbai.blogspot.com

Unknown said...

Are you from H H C P Highschool Pune?
Mrunalini

हेरंब said...

नीरजाताई, माझ्या आजच्या पोस्ट मध्ये मी आपल्या या लेखाचा संदर्भ दिला आहे. हरकत नसेल अशी आशा आहे. धन्यवाद..
http://harkatnay.blogspot.com/2010/01/blog-post_11.html

Mahendra Kulkarni said...

निरजा
मुलींच्या पाणी न पिण्याच्या सवय़ी मुळे स्टोन चा त्रास झाला होता मोठ्या मुलीला. कॉलेजमधे टॉयलेट्स जरी असले, तरीही तिथे सारखं जावं लागु नये म्हणुन पाणी कमी पिणे - आणि त्यामुळे झालेला ८ एमएम चा स्टोन..!!! बाहेर काढायला खर्च.. १९ हजार रुपये. मुलिला म्हंटलं , पाणी प्यायली असतीस, तर नक्कीच हिरा घेउन दिला असता तुला १९ हजाराचा...
विनोदाचा भाग सोडा, पण अजुनही दादर सारख्या स्टेशनवर फक्त एक नंबर प्लॅटफॉर्म वर टॉयलेट आहे. इतर कुठेही नाही. अशीच परिस्थिती सगळ्याच स्टेशनची आहे. रेल्वे प्रशासन इतकं निर्ढावलेलं आहे की त्यांना अशा मुलभुत गरजांच्या कडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही.
मला वाटतं एक ऑन लाइन पिटीशन करुन ममता ला पाठवावे, आणि मग वाट बघावी काही होतं कां याची!!
मी पण याच विषयावर पोस्ट लिहिली होती, तेंव्हा ह्या पोस्ट ची लिंक प्रकाशजींनी आणि आनंदने पोस्ट केली. छान लिहिलंय, पण पुढे यात जर काही करता आलं तर बरं होईल.. बघु या, मी पण करतो विचार.

Unknown said...

mam kharach khup chhan lihla ahe..
mulina asha gairsoyimule kiti tras hot asel yachi amhi fakt kalpanach karu shakato..
yasathi mala asa vatat ki pratyek vibhaga madhil striyani ekatra yeun sthanik adhikari athava nagarsewakachya nidarshanas hi goshta anhn dyavi..gya nantarhi tyani tyavar kahi kela nahi tar swatach 1toilet bandhayacha ani tyachi niga pan rakhayachi..
pratekane aplya vibhagamadhe ashi soy keli tar konatyach strila ha traas jast janavnar nahi ase mala vatate..
sadhya prblm nidarshanas anun nahi chalnar tar tyasathi apanach suruwat keli pahije..tar kahi tari badlu shaken ani yacha apalyalach fayda hoil..

Search This Blog