“ती हिंदी सिनेमातल्या दुखियारी माँ सारखे कपडे घातलेली रोमन बाई कोण गं ठकू? तिने साडीचा शोध लावलाय. हो ना?” गुगल संशोधकांनी ठकूला विचारले. “साडी म्हणजे काय वीज आहे का शोध लावायला?” ठकूने नाक उडवले.
प्राचीन रोमन काळातली दुखियारी माँ अंगावर घातलेल्या झग्यावरून आडवातिडवा लांबरुंद ‘पल्ला’ लपेटून घ्यायची. रोमन लोक इथे आले तेव्हा इथे अंगभर एकच कापड लपेटण्यापेक्षा कमरेशी बांधलेले अंतरीय आणि ओढणीसारखे वरच्या शरीरावर लपेटलेले उत्तरीय ही पद्धत होती. यामुळे काहींचं म्हणणं आहे की एकच कापड कमरेवर आणि मग ते तसेच शरीराच्या वरच्या भागावर घेणे हा प्रकार म्हणजेच साडी आपण रोमनांकडून शिकली असावी असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.
माणसे प्रवास करतात, स्थलांतर करतात, नवीन प्रदेश पादाक्रांत करतात. आपल्या जगण्याच्या पद्धती या नवीन ठिकाणी घेऊन जातात आणि नवीन ठिकाणच्या पद्धती आत्मसात करतात. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो. आणि संस्कृतीची कथा नवे वळण घेते. यामधे अर्थातच कपड्यांची गोष्टही आलीच.
भारतामधे वसण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी, प्रवासासाठी, व्यापारासाठी, लुटण्यासाठी, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या काळात वेगवेगळे लोक आले. त्यातले काही आले आणि परत गेले तर काही आले आणि इथलेच झाले. त्या प्रत्येकाने आपल्याबरोबर आपल्या गोष्टी आणल्या.
चिनमधून रेशीम आले आणि मग इथलेच झाले. आज भारताच्या वेशभूषेची गोष्ट रेशमी वस्त्रांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इसपू ५०० - ३३० दरम्यान आताचा इराण ते पंजाब पसरलेल्या अकिमेनिड साम्राज्याशी झालेल्या देवाणघेवाणीतून इथे शिवणकला येऊन वसली. कुशाण काळात त्याच्या साम्राज्यात दरबारातली, योद्ध्यांची वेशभूषा शिवलेली आणि घरगुती व स्त्रियांचे कपडे गुंडाळलेले अशी विभागणीही झाली.
मुघल साम्राज्याबरोबर सलवार व कुर्ता असे शिवलेले कपडे सर्वसामान्य स्त्रीपुरूषांसाठीही आले. सुरुवातीला केवळ मुस्लिम समाजापुरती असलेली ही वेशभूषा आता सर्व धर्माच्या भारतीय स्त्रियांचा गणवेष होऊन बसली आहे. पडदा, घुंघट, गोषा वगैरे पद्धती मुघलांबरोबर आल्या. ओढणीने किंवा पदराने डोके झाकणे आणि त्याला लागून येणारे सगळे रितीरिवाज मुघलांबरोबर भारतात आले. जिथे मुघलांना अडवले गेले, जिथपर्यंत मुघल साम्राज्य पोचू शकले नाही अश्या दक्षिण भारतात मुस्लिम समाज वगळता डोक्यावरून पदर/ ओढणी घेण्याच्या पद्धती अस्तित्वात नाहीत. डोक्यावरून पदर घेण्याला काही महत्व नाही. जिथे जिथे मुघल साम्राज्य पोचले तिथे तिथे आमिर उमराव घरातल्या स्त्रियांच्या वरच्या कपड्यांमध्ये चोळी आणि कुडता किंवा चोळी आणि अंगरखा असे दोन घटक अस्तित्वात आले. आणि अर्थातच त्यावरून एक मोठा दुपट्टा किंवा पदर.
भारतात सिंधु संस्कृतीपासून मेंढीपासून लोकर मिळवून त्याचे कापड बनवल्याचे पुरावे आहेत. ती पद्धत भारतात हिमालयाच्या कुशीत अस्तित्वात होतीच. पण मुघल काळामधे भारतीय पश्मिना मेंढ्यांपासून मिळवलेल्या लोकरीच्या शालींना एक उद्योग म्हणून मान्यता मिळाली. त्या मेंढ्यांना आणि शालींना पश्मिना हे नावही याच काळात मिळाले. एखाद्याचा सन्मान म्हणून, राजकन्येला लग्नातली भेट म्हणून अस्सल म्हणजे रेशमाचे धागे न मिसळलेली पश्मिना शाल देण्याचा पायंडा या काळात पडला. आज हिच पश्मिना शाल भारतीय वारश्यामधे महत्वाचे स्थान मिळवून आहे.
आधी मुघलांनी आणि मग ब्रिटीशांनी शरीर अति झाकण्याचे स्तोम आयात केले हे आपण गेल्या वेळेला बघितलेच. ब्रिटीशांच्या बरोबरीचे समजले जावे यासाठी अनेक ठिकाणच्या अमिर उमरावांनी आपल्या राहणीमधे घरांमधे बदल केले. काही प्रदेशातील तत्कालिन उच्चवर्गीय विवाहित स्त्रिया चोळीशिवायच साडी नेसत पण ब्रिटिशांच्या सभ्यतेच्या कल्पनांबरोबरच त्यांनी तेव्हाच्या युरोपियन गाऊन्समधले बॉडिसचे डिझाइन आपलेसे केले. बाह्यांना पांढरी लेस लावलेले ब्लाऊज घातलेली बंगाली स्त्री हे याचेच एक उदाहरण. महाराष्ट्रात व दक्षिण भारतात तत्कालिन उच्चवर्गात चोळी वापरली जात असे. या चोळ्यांची शिवण्याची पद्धत मात्र वैशिष्ट्यपूर्ण होती. कापडाला चोळीचा आकार येण्यासाठी ठराविक प्रकारे तुकडे करून ते जोडले जात आणि मग स्तनांखाली गाठ मारून ही चोळी अंगावर घट्ट बसवली जाई. मात्र या चोळीच्या बाह्या दंडाला घट्टे पडतील इतक्या अंगाबरोबर नसत. चोळीच्या गाठीपासून कमरेशी साडी नेसली जाई तिथवरचा भाग उघडाच असे. हे अर्थातच ब्रिटिशांच्या दृष्टीने असभ्य होते. तत्कालिन उच्चवर्गीय तसेच सुधारक लोकांच्या घरातील स्त्रियांनी या चोळ्या टाकून देऊन किंवा चोळ्यांच्या वरून व्हिक्टोरियन काळचे बॉडिस असावे असे वस्त्र घालून त्यावरून् साडी नेसायला सुरूवात केली. पुण्यातल्या हुजूरपागेत शिक्षण घेणाऱ्या सुरुवातीच्या काळातल्या विद्यार्थिनी आणि शिक्षिकाही या प्रकारचे ब्लाऊज घालत असत. कालांतराने बॉडिसचा मुख्य भाग आणि चोळ्यांच्या बाह्या एकत्र होऊन आपल्याला माहिती असलेले साडीवरचे ब्लाऊज जन्माला आले. हे ब्लाऊज पार कमरेपर्यंत लांब नव्हते आणि चोळीच्या इतके आखूड नव्हते. या ब्लाऊजमधे कापडाला आकार देण्यासाठी विशिष्ठ प्रकारे तीन बाजूंनी तीन चुण्या घातल्या जातात. या चुण्यांना डार्टस किंवा टक्स म्हणले जाते. ही डार्टस घालून कापडाला आकार देण्याची शिवणाची पद्धत मूळ युरोपियन आहे. हीच युरोपियन पद्धत कुडत्यांमध्येही आलेली दिसते. कुडते हे प्रकरण मुळात कुशाणांच्या बरोबर भारतात आले. तेंव्हाची कुडते शिवायची पद्धत अशीच विशिष्ट प्रकारे तुकडे कापून कापडाला आकार देण्याची होती. या पद्धतीत कपडे अगदी घट्ट अंगाबरोबर बसत नाहीत. तसेच शिवलेले कपडे असले तरी त्याला बंद असतात. त्यांच्या गाठी मारल्यावर हे कपडे अंगावर बसतात. डार्ट घालून शिवायच्या कुडत्यामध्ये कपडा अंगाबरोबर जास्त बसतो.
ब्रिटीशांच्या सभ्यतेच्या कल्पनांचा प्रभाव पुरुषांच्या कपड्यांवरही पडला. हॅट, बूटमोजे, कोट वगैरे गोष्टी घालणारा तो जंटलमन या एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातल्या ब्रिटिश कल्पना भारतीय पुरुषांच्यातही एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाशी येताना स्वीकारल्या गेल्या. मुघल काळातल्या राजेशाही आणि घोळदार शेरवानीचे रूपांतर झाले. रोमँटिक कालखंडातल्या फ्रॉक कोटाची आकृती, गडद रंग हे शेरवानीचे महत्वाचे विशेष बनले. तसेच शेरवानी हे केवळ राजघराण्यातल्या लोकांचे वस्त्र म्हणून राह्यले नाही. ब्रिटीश सरकारच्या नोकरीत वरच्या हुद्द्यावर असलेले किंवा वकिली करणारे किंवा समाजात वरचे स्थान असणारे किंवा श्रीमंत व्यापारी लोक अश्या सर्वांनीच शेरवानीला आपले म्हणले. उत्तर भारतात सुरू झालेले हे प्रकरण जिथे जिथे ब्रिटीश सत्तेची केंद्रे होती तिथे तिथे पसरले आणि स्थिरावले सुद्धा. विसाव्या शतकामध्ये पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नोकऱ्या करणारे मध्यमवर्गीय नोकरदार, शिक्षक धोतर, सदरा आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या पद्धतीचा कोट, खाली बूटमोजे अश्याही वेशात दिसत. हा वेश ब्रिटीश लोक निघून गेल्यावरही ६०-७० च्या दशकापर्यंत टिकून राह्यला. विसाव्या ब्रिटिश सत्तेच्या शेवटच्या काळामध्ये भारतात पुरुषांच्या वेषामध्ये धोतराचा वा सलवारीचा वा मुंडूचा वापर कमी होत गेला. त्या जागी पाश्चात्य पँट आली. घरामध्ये, गोतावळ्यात धोतर किंवा सलवारीसारखे पारंपरिक प्रकरण तर कामाच्या ठिकाणी पॅन्ट अश्या प्रकारे अनेक जण वावरत होते.
भारतात येऊन वसलेले, पण राज्यकर्ते नसलेले आणि संख्येने कमी असलेले असे जे समुदाय होते त्यांनी स्थानिक पद्धती स्वीकारल्या पण आपले स्वत:चे रंग त्यात मिसळले आणि एक नवीन पद्धती निर्माण केली. यात सगळ्यात महत्वाचा समुदाय म्हणता येईल तो म्हणजे पारशी समुदाय. आठव्या दहाव्या शतकात गुजरातच्या किनाऱ्यावर येऊन पोचलेला हा समुदाय त्यांच्या आख्यायिकेप्रमाणेच दुधात साखर मिसळावी तसा इथल्या समाजात मिसळून गेला. त्यांनी त्यांच्या मूळ कपड्यांबरोबर गुजराथी वेशभूषेतले महत्वाचे भाग आपलेसे केले. विशेषत: स्त्रियांच्या वेशभूषेमधे. आज भारतीय साड्यांबद्दल विवेचन केले जाताना पारसी गारा साडीच्या उल्लेखाशिवाय पुढे जाता येणार नाही. कोकणातल्या बेने इस्राएल समाजाने मात्र कपड्यांच्या आणि इतरही अनेक बाबतीत कोकणातल्या इतर समुदायांमध्ये मिसळून जाणे स्वीकारले होते. नऊवार नेसणाऱ्या ज्यू स्त्रिया हे त्यांचे वैशिष्ट्य. कुंकू वगळता सर्व जामानिमा एतद्देशियांप्रमाणेच असे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ख्रिश्चन समाजामध्ये आजही वयस्क स्त्रियांच्यात नऊवारी साडी नेसणाऱ्या स्त्रिया दिसतात. सिंधुदुर्ग ख्रिश्चन स्त्रियांची नऊवारी म्हणून या पद्धतीची वर्गवारी करता येईल इतकी त्यांची नऊवारी नेसायची पद्धत वेगळी आहे. मंगळसूत्र वापरणाऱ्या ख्रिश्चन आणि मुस्लिम विवाहित स्त्रिया आत्ताआत्तापर्यंत मुंबईपुण्यात दिसत असत.
भारतामध्ये कपड्यांच्या गोष्टीत येऊन मिसळलेले आणि आपली कपड्यांची गोष्ट समृद्ध करणारे हे असे अनेक प्रवाह. पण ही मिसळण्याची गोष्ट इथेच संपत नाही. गोष्ट अजून बरीच आहे. ती उरलेली गोष्ट आपण पुढच्या वेळेला बघूया.
- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - मे २०१८ मधे प्रकाशित)
आपलं काय काय म्हणायचं? - २९ मे
0 comments:
Post a Comment