Saturday, June 6, 2020

प्रमोदबन - १

काही गोष्टी विनाकारण आठवत राहतात. अगदी लख्खपणे आठवत राहतात. मांजरांसारख्या पायात येत राहतात. मग त्यांना उचलून घ्यावे लागते. लाड करावे लागतात. त्या लिहून मोकळे होण्याशिवाय पर्याय नसतो. तसे कुठलाही ट्रिगर नसताना छळतेय प्रमोदबन सध्या.
नाही प्रमोदबन हे कुठल्याही अभयारण्याचे, जंगलाचे किंवा संस्थेचे नाव नाही. माझ्या बालपणाच्या सगळ्या आठवणी जिथून सुरू होतात ती जागा आहे प्रमोदबन.
शुक्रवारात, बाफना पेट्रोल पंपाकडून अकरा मारुतीकडे जाणाऱ्या गल्लीत झालेली पहिली बिल्डिंग. म्हणजे ओनरशिप अपार्टमेंट वगैरे असलेली पहिली. पुण्याच्या पेठांमध्ये पूर्ण किंवा अर्धे वाडे पाडून तेव्हढ्याश्या जागेत बिल्डिंग्ज बांधायच्या पर्वाची ती सुरुवात होती. आम्ही तिथे राहात होतो तोवर ज्या आगाशे वाड्याचा अर्धा तुकडा पाडून आमची बिल्डिंग झाली होती त्यातला उरलेला वाडा शेजारी मौजूद होता. आणि तो आमच्या कानिटकर वाड्यापेक्षा गूढरम्य वाटायचा.
मी दोन वर्षांची असताना आम्ही तिथे राहायला गेलो. पुढची दहा वर्षे आम्ही तिथे होतो. अडीच वर्षांची असताना मला तिथून जवळच्या शिशुशाळेत घातले. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची ती मॉटेसरी होती. बाफना पेट्रोल पंप, चिंचेची तालीम, अकरा मारूतीची गल्ली हे सगळे लहानपणी आईने पाठ करून घेतले होते. तेव्हा घरी फोनही नव्हता. आणि हरवले तर पत्ता सांगता यायला हवा ना. घरातून टमाकटुमुक करत निघायचे, बाफनाचा चौक क्रॉस करायचा मग दोन चार उड्या उड्या पावलं टाकायची की डावीकडे आमची शिशुविहार यायची. तिची गम्मत नंतर सांगणारे.
आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो. स्वैपाकघराची खिडकी आणि बेडरूमची गॅलरी रस्त्याच्या बाजूला होती. घराचे दार आणि हॉल बिल्डिंगच्या आतल्या बाजूला. बेडरूमच्या खाली बिल्डिंगचे गेट होते तर स्वैपाकघराखाली डॉ. अरविंद लेल्यांचा दवाखाना. माझ्या आठवणीत अगदी सुरूवातीला फारतर ते स्वतः त्या दवाखान्यात असायचे. नंतर ते राजकारणात जास्त सक्रिय झाले आणि मग तो दवाखाना डॉ. रोंघे चालवू लागले. पण नाव डॉ. लेल्यांचेच होते. त्यांचा राहता वाडा मंडईजवळ होता.
बहुतेक ७७ किंवा ७८ सालची गोष्ट असेल. आई घरीच असायची. त्या दिवशी शाळेत गेलेच नव्हते किंवा मला शाळेतून घेऊन आई नुकतीच घरी आली होती. अचानक आरडाओरडा ऐकू आला आणि आमच्या घरावर दगडफेक झाली. किचन आणि बेडरूमची गॅलरी दोन्ही रस्त्याला लागून होते. दोन्हीकडून दगड आले. काचा बिचा फुटल्या. ओट्यावर दगड पडले. गॅलरीत पडले. एक जागा होती जिथे किचन किंवा गॅलरी कुठूनही दगड आला तरी लागणार नाही अशी. तिथे मी आणि आई बसून होतो. मग थोड्या वेळाने दगडफेक करणारी माणसे गेली. नंतर पोलिस आले. कुठे दगड पडले, किती नुकसान झाले वगैरे वगैरे पंचनामा झाला.
आई थोडी घाबरलेली असणार तेव्हा पण मी जाम एक्सायटेड होते त्या दिवशी. काहीतरी सॉलिड घडलंय आपल्या घरात म्हणून. घटनेचं गांभिर्य कळण्याचं वय नव्हतंच ते. नंतर कळलं ते असं की लेल्यांचा दवाखाना खाली होता. डॉ. लेले आणिबाणी नंतर कसबापेठ मतदारसंघातून निवडून आले होते. तर त्या रागावर बहुतेक इंदिरा समर्थकांनी लेल्यांच्या दवाखान्यावर आणि घरावर (नीचे दुकान, उपर मकान असे गृहित धरून) दगडफेक केली. मला आयुष्यात नंतर जेव्हा जेव्हा हे आठवले तेव्हा ‘इतका कसा काय राँग नंबर लागू शकतो?’ याचे प्रत्येक वेळेला आश्चर्य वाटत आलेय. पण तेव्हा बिल्डींगमधे, वाड्यात एखाद्या घरी फोन असायचा असा काळ होता. टिव्ही पण मजल्यावर एखाद्यांकडे असलातर असला वगैरे. त्यामुळे सगळ्यांना सगळं माहिती नसे. तर कदाचित कार्यकर्त्यांना दगड पुरवून छू म्हणेपर्यंत योग्य पत्ता पोचला नसावा त्यांच्याकडे.
त्यानंतर बरेच वर्ष घरी आल्यागेल्या कुणाकुणाला ‘घरावर दगडफेक झाली तर ही जागा एकदम सेफ आहे. अजिबात दगड लागणार नाही.’ असे मी सांगायचे हे आठवतंय. पाऊस पडला की इथे थांबलो तर भिजणार नाही हे जसे सांगावे तसे मी सांगायचे. मग कधीतरी ‘दगडफेक काही पावसासारखी नॉर्मल नसते.’ असा साक्षात्कार झाला आणि ते बंद पडले.

प्रमोदबनमधल्या आठवणींना वाट करून देण्याची ही सुरुवात. बघू तुम्हाला आवडतायत का ते!
- नी

0 comments:

Search This Blog