Sunday, June 7, 2020

कापडाचोपडाची गोष्ट - ७. थांब सेलिना बिंदी लावते

“आज काय खास? इतकं तयार होऊन आलीयेस!” ठकूच्या कपड्यांकडे बघून सातासमुद्रापारच्या देशात कुणीतरी साडेसहाशेव्यांदा हा प्रश्न ठकूला विचारला. आपल्या मळखाऊ रंगाच्या, पिदडायच्या सलवार कुर्त्याकडे बघून ठकूला प्रश्नकर्त्याबद्दल साडेसहाशेव्यांदा सहानुभूती दाटून आली. सहाशेएकावन्नावी वेळ आलीच नाही. ठकूने रोजच्या वापरातून सलवार कुर्ते काढूनच टाकले. भारतात परत येताना ते सगळे ठकूने यमीपेक्षा पाचशेपट गोरी असलेल्या आपल्या मैत्रिणीला देऊन टाकले. मैत्रिणीने ते कौतुकाने मिरवत वापरले.

जगामध्ये वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रदेशात अश्या मैत्रिणी असतील. आपलं रूप सजवायला वेगळं, नवीन काहीतरी मिळाल्याच्या उत्साहात त्यांनी अश्याच एकमेकींच्या वस्तू वापरल्या असतील आणि कदाचित कपड्यांच्या इतिहासाला नवे वळण लागले असेल. हे आपण पाह्यलं. पण हे तेवढंच आहे का?

जेव्हा एखादी पाश्चिमात्य कन्या टिकल्या लावून एखाद्या वधूसारखे नटते तेव्हा आपल्या मिश्र प्रतिक्रिया असतात. एकतर असा जामानिमा केल्यानंतर त्या आपल्याला माहिती असलेल्या प्रकारे वावरत नाहीत. त्यामुळे ‘कुठून आलं हे येडं!’ असं वाटून आपल्याला हसायला येतं. मग ‘बघा बघा गोऱ्या लोकांनाही आमच्या संस्कृतीचे कौतुक!’ असा प्रखर अभिमान आमच्या हृदयात जागृत होतो. मग हे सगळं करून ती मॅडोना, शकिरा, व्हेनेसा किंवा सेलिना तिच्या नृत्यात मादक हालचाली करते तेव्हा आम्हाला ‘संस्कृतीचा अपमान!’ वगैरे वाटतो. हे अतिशय विनोदी आहे. आणि दांभिकही. जे या तारकांनी केले तेच बॉलिवूडच्या आयटम सॉंगमध्ये एखाद्या नर्तिकेने केले तर मात्र कसलाही अपमान ना होता आम्ही मिटक्या मारता बघू शकतो. तिथे कुंकवाचा अडसर येत नाही.
bindiw.jpg

खरंतर कुंकू हिंदू स्त्रीच्या वैवाहिक स्थिती निदर्शक प्रतीकांपैकी एक असे कैक शतके मानले गेले आहे. मानसिकता बदलत जाते आहे तसे विधवेने कुंकू लावणे निषिद्ध आणि सव्वाष्ण बाईने कुंकू लावलेच पाहिजे वगैरे नियमांचा कट्टरपणा बराचसा कमी झालेला आहे. स्त्रिया समाजामध्ये स्वतः:ची ओळख निर्माण करत आहेत. वैवाहिक स्थिती ही प्रदर्शन करायची गोष्ट नसून अतिशय खाजगी गोष्ट आहे या कारणाने अनेक स्त्रियांनी तथाकथित सौभाग्यचिन्हे नाकारली आहेत. कुठल्याही स्वरूपातले कुंकू हे आता अनेक भारतीय स्त्रिया केवळ चेहरा सजवण्याची वस्तू म्हणूनच वापरायला लागल्या आहेत. आणि या सजावटीसाठी भरपूर प्रकारच्या टिकल्या बाजारात उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मॅडोनापासून सेलिना गोमेझपर्यंत सगळ्यांनी टिकल्या वापरणे यात ‘इतका आरडाओरडा का?’ हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

पाश्चिमात्य जगामध्ये विविध संस्कृतींची पार्श्वभूमी असलेले लोक राहतात. तिथे जाऊन मुख्य धारेत समाविष्ट होण्यासाठी त्यांनी आपले म्हणून बरोबर आणलेले जे काही आहे त्यातले बरेच त्यांची इच्छा असो नसो टाकून दिलेले आहे. जिथे आपण राहतो त्या समाजाचा भाग होण्यासाठी त्यांनी ती किंमत मोजली आहे. आपली सांस्कृतिक ओळख पटकन डोळ्यावर येणार नाही याबद्दल प्रयत्न केले आहेत. पण ज्या ठळक गोष्टी त्यांचे बाहेरचे असणे अधोरेखित करत होत्या त्याच गोष्टी मुख्यधारेतल्या तारेतारकांनी उजमेखून वापरल्या आहेत. त्या वस्तूंना अनोखेपणाचे लेबल लावून, त्या वस्तूंचा मुळातला अर्थ, मुळातले कारण या कशाचाही संदर्भ लक्षात न घेता वापरल्या आहेत आणि आजही वापरल्या जात आहेत. अनोखेपणा, गूढ आणि म्हणून मादक अशी एक प्रतिमा या वस्तूंच्या द्वारे उभी केली जाते आणि विकली जाते. त्या त्या संस्कृतीची पार्श्वभूमी असलेल्या बहुतेक सगळ्याच लोकांकडे बघायचा दृष्टिकोन या लेबलांमुळे गढूळ झालेला आहे. उदाहरणार्थ वेगळ्या संस्कृतीतली, रंगाने काळीसावळी असलेली, कुंकू किंवा मांगटिका वापरणारी, नेसायचे वस्त्र वापरणारी स्त्री ही केवळ एक सुखावणारे, छेडणारे लैंगिक आकर्षण यापुरतीच किंवा रोमानियाच्या भटक्या समाजातले लोक हे जगाचे नियम मोडून जगणारे, चोऱ्यामाऱ्या करणारे, शरीरसंबंधाच्या बाबतीत अगदीच धरबंध नसलेले लोक अशी काही समीकरणे बनतात. मिश्र समाजात प्रतीकांच्या अस्मिता या फार कडवट, कर्मठ होतात. आणि त्यामुळे मानापमानही टोकाचेच. आपल्या संस्कृतीच्या वस्तू आपण वापरायला बंधन पण कुणी सेलिना तिच्या गाण्याला ‘आदिम आणि मध्यपूर्वेची डूब’ देण्यासाठी बॉलिवूड आणि टिकल्या वापरते ते स्वीकारले जाते. हा विरोधाभास विविध संस्कृतीतील लोकांना मुख्य धारेपासून वेगळा काढतो. त्यांना असुरक्षित वाटायला लावू शकतो.

या विषयाबद्दल गेल्या काहीच वर्षांमध्ये तपशिलात आणि गांभिर्याने चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या संस्कृतीशी जोडलेली चिन्हे, प्रतीके, वस्तू इत्यादींची देवाणघेवाण होणे हे अपरिहार्य आहेच. काही प्रमाणात स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य वा अयोग्य याबद्दल अजून अनेक पातळ्यांवर संभ्रम आहेत. अयोग्य असण्याची ओरड कधी टोकाला जाऊन दोन समूहांमध्ये पक्क्या भिंती घालण्याचे काम करते आहे तर यात काहीच चूक नाही हे विधान टोकाला जाऊन पूर्णपणे असंवेदनशील व अनिर्बंध व्यवहाराचे समर्थन करण्यासाठी उभे ठाकते आहे.

पाश्चिमात्य विश्व हे काही प्रमाणात संपूर्ण जगाची मुख्याधारा म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थातच त्यांचे अंधानुकरण जगभर केले जाते. भारतही याला अपवाद नाही. आपणही पाश्चिमात्य जगाच्या पावलावर पाऊल ठेवून इतर संस्कृतींमधील रूपचिन्हांचा, प्रतिकांचा यथेच्छ वापर करतो.

हे झालं बाहेरच्या देशांमधल्या संस्कृतींविषयी पण इथल्याइथे आपल्याच देशातल्या गोष्टींचे आपण काय करतो तेही बघण्यासारखे आहे. इथे प्रांतानुसार, भाषेनुसार इतक्या अनेक संस्कृती नांदतात. प्रत्येकाचे पारंपरिक कपडे आणि त्याबरोबरचे रितीरिवाज वेगळे. स्वातंत्र्यानंतर या सर्व संस्कृती एकत्र नांदाव्या यासाठी तयार केलेले ‘विविधतेत एकता’ हे एक ब्रीदवाक्य. शालेय अभ्यासक्रमामध्ये हे कायमच महत्वाचा भाग होते. ती विविधतेतली एकता सिद्ध करण्यासाठी दरवर्षी प्रत्येक शाळेत गॅदरिंगला एक तरी कार्यक्रम असायचाच ज्यात किमान दहापंधरा राज्यांचे कपडे घातलेले विद्यार्थी स्टेजवर येऊन जयहिंद म्हणत असत. आजही हे चालू असतेच शाळांमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी.

विविधतेत एकता, राष्ट्रीय एकात्मता वगैरे साधण्यासाठी जो वेश केलेला आहे तो तपशिलात योग्य आहे का? अर्थाचा अनर्थ होईल अश्या चुका तर नाहीत? वगैरे मुद्दे इथे खिजगणतीतही नसतात. साचे ठरलेले असतात. मराठी स्त्री म्हणल्यावर वाईट रित्या शिवलेली, मोक्याच्या ठिकाणी घट्ट अशी नऊवारी साडी आणि नाकात टीचभर नथ हे यावेच लागते. बंगाली स्त्रीला पांढऱ्या आणि लाल साडीशिवाय पर्याय नसतो. मुस्लिम स्त्रीने सलवार कुर्ता, डोक्यावरून गुंडाळलेली ओढणी हे घालून हाताने ‘आदाब’ करावेच लागते. परत आपले राजकीय नेते ज्या ज्या प्रदेशात जातील तिथले शिरस्त्राण, कपडे घालून लोकांशी समन्वय साधायचा प्रयत्न करत असतात. असा आपल्या संस्कृतीचा नसलेला जामानिमा करून मिरवण्यानेच त्या संस्कृतीचा आदर राखला जातो असे समीकरण आपल्या डोक्यात पक्के आहे.
vividhatame ekata.jpg

हीच मानसिकता मग इतर वस्तूंच्या वापरात पण येते. भारतीय समाजाच्या मुख्य धारेच्या काठावर असलेल्या गटांच्या रोजच्या जगण्यातल्या पारंपरिक वस्तू आपण याच मानसिकतेने वापरतो. विविध कानाकोपऱ्यातल्या आदिवासी जमातींच्या दागिन्यांचा वापर, वारली, मधुबनी सारख्या चित्रशैलींचा कपड्यांमध्ये वापर अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. त्या शैलीचा, वस्तूंचा मूळ उद्देश बाजूला पडून केवळ त्यातल्या निव्वळ सुंदरतेला धरून त्या वापरल्या जातात. याबद्दल त्या त्या कलेचे, वस्तूंचे मूळ ज्या समाजगटाकडे आहे त्यांचे म्हणणे काय असू शकते हा वेगळ्या समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. पण परंपरांचे व्यापारीकरण होते यात वाद नाही.

अश्या पारंपरिक वस्तूंचे, रूपचिन्हांचे व्यापारीकरण टाळण्यासाठी आपण हा वापर थांबवायला हवा असे सांगण्याचा या लेखाचा उद्देश नाही. तसे घडणेही योग्य नाही. या विविध वस्तू, चिन्हे, प्रतिके, शैली आणि त्यांची तंत्रे हा आपला फार महत्वाचा वारसा आहे. या वस्तू पार्ंपरिकरित्या घडवणारे कलाकार लोक जगणे, त्यांची कला जगणे, वाढणे हे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी कलाकारांना, कारागिरांना राजाश्रय असायचा. तसेच वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यामुळे कला जगणे शक्य होते. या दोन्हीही व्यवस्था आजच्या अर्थकारणात उरलेल्या नाहीत. तस्मात कलांचे, कौशल्याचे जतन व्हायचे असेल, कारागीर, कलाकार जगायचे असतील तर व्यापारीकरण नक्कीच आवश्यक आहे. किती, कसे आणि कुठे हा काही प्रमाणात तारतम्याचा भाग आहे. त्याबद्दल आणि पारंपरिक वस्त्रे, दागिने आणि इतर कलांचे पुनरुज्जीवन आणि व्यापारीकरण याबद्दल पुढच्या वेळेस तपशिलात चर्चा करूया.

- नी 
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - जुलै २०१८ मधे प्रकाशित)
थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै

0 comments:

Search This Blog