“त्या बिचाऱ्या दिपिकेला आपले कपडे कुलुपात ठेवावे लागत असतील नै? कधी रणवीर डल्ला मारेल काय सांगता येतंय काय? ” रणवीर सिंगचे नवीन फोटो आले की व्हॉटसॅपवर किमान पंचवीसवेळातरी हा डबडा विनोद येतो.
आपल्या मनाजोगी धडाडी न दाखवणाऱ्या पुरूषाला "बांगड्या भरा!" असा टोला मारणारे पैशाला पासरीभर असतात आणि त्यात काही चुकीचे आहे हे ही समजत नसते त्यांना. मुलीबायकांनी जीन्स घालणे यावर काही सांस्कृतिक गड्डे "आईचा पदर आणि जीन्स घातलेल्या मम्मीला पदर नसतो म्हणून मातृत्वाचा जिव्हाळा नसतो" वगैरे मंद टिप्पण्या करताना अजूनही दिसतात.
घागर्यामधे रणवीर
एकूणात काय जगात प्रत्येकाने चौकटीत ठरवून दिल्याप्रमाणेच स्त्री वा पुरूष व्हायचे असते आणि त्या कप्प्यातच बसायचे असते असे स्थितीवादी समाजाचे पक्के ठरलेले असते.
कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला मुलगी हे आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे. नीट विचार केला तर लक्षात येईल की हि लिंगनिश्चिती केवळ राहणी, घातलेले कपडे यांच्यावरूनच आहे. मानवजातीच्या प्रवासात खूप पूर्वी कधीतरी लिंगनिश्चिती आणि कपडे यांचा संबंध जोडला गेला आणि मग तो नियमही झाला. त्यामुळे इथे कपडे हे चक्क स्त्री वा पुरुष असण्याचे चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात.
हे कुठून सुरू होतं? जगातल्या बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये मूल चालायला लागेतो, त्याच्या आठवणी सुरू होईतो बाळ मुलगी आहे की मुलगा हे स्पष्ट करणारे कपडे शक्यतो वापरले जात नाहीत. तान्ह्या बाळांना सारखीच झबली टोपडी घातली जातात. मग बाळ मुलगा असो वा मुलगी. तान्हे बाळ हे बाळ असते. स्त्री वा पुरूष असण्याआधी माणसाचे बाळ असते. मानवजन्म आधी मग लिंगभाव हे जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृतींना मान्य होते असे म्हणायला हरकत नाही.
आपल्याकडे झबल्याटोपड्याबरोबरच कुंच्या, वाळे, मनगट्या वगैरे बाळलेणी ही सर्वांना सारखीच घातली जातात. मूल चालूपळू लागले की मग मुलाचे वा मुलीचे कपडे दिले जातात. तिसरे वर्ष लागताना आपल्याकडे आत्याने भाचीला खण, बांगड्या घ्यायची पद्धत आहे. ही पद्धतही कदाचित तान्हेपणा संपला आणि नुसता मानवजन्म असण्याऐवजी त्याचे पुढचे कप्पे पडायला सुरू झाले हे सांगणारीच असावी. मग पुढे मुलीला गाठीची चोळी + बिनपदराची साडी, नंतर ती न्हातीधुती झाली की साडीला पदर हे सगळे टप्पे असत. मुलीला पदर आला हा वाक्प्रचार यातूनच आला.
प्रबोधनकाळादरम्यान युरोपात मुलग्यांना झगा वा झबलेसदृश कपडेच घातले जात. पाचसहा वर्षाच्या आसपास ते कपडे जाऊन ब्रीचेस म्हणजे गुडघ्यापर्यंतच्या पॅन्टस घातल्या जात. अमीरउमरावांच्या घरांमध्ये मुलाला पहिल्या ब्रीचेस देण्याचा सोहळा केला जाई. त्याला ब्रीचिंग असे म्हणतात.
ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे
ही झाली बरीच पुढची गोष्ट. कपड्यांच्या इतिहासाच्या मुळाशी गेले तर जगभरात मानवी संस्कृती सुरवातीची पावले टाकत होत्या तेव्हा वेशभूषेच्या उत्क्रांतीच्या त्या टप्प्यात कपड्यांमधून लिंगनिश्चिती हा उद्देश महत्वाचा नव्हता. प्राचीन ग्रीक काळात याची सुरूवात दिसते परंतू हे समाजाच्या काही घटकांपुरतेच अपेक्षित होते. रोमन कालखंडात कपड्यांचा व लिंगनिश्चितीचा परस्पर संबंध जास्त गडद झालेला दिसतो. रोमन वा ग्रीकांच्या आधी इजिप्त, बॅबिलोनियन, सुमेरियन वगैरे संस्कृती जिथे ग्रॅविटेशनल म्हणजे नेसायच्या कपड्यांवर भर असलेली वेशभूषा आहे तिथे कपड्यांचे लिंगाधारीत ध्रुवीकरण हे केवळ वरवरच्या सजावटीच्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. मात्र मूळ कपडे बरेचसे सारखेच आहेत.
आपल्याकडेही वैदीकपूर्व, वैदीक ते पार मौर्यन कालखंडाच्या सुरूवातीपर्यंत हेच दिसते. मौर्यन काळात स्त्रिया व पुरूष दोघांच्याही कपड्यांमधे अंतरीय, उत्तरीय आणि शिरोभूषण (उष्णीष) आहे. स्त्रियांनी छाती झाकणे हे ही नव्हते. पुढे गुप्त काळात कपड्यांचा हेतू लिंगनिश्चितीकडे जास्त झुकल्याचे लक्षात येते. शिरोभूषणे पुरूषांपुरतीच उरणे, स्त्रियांनी चोळ्या वा कंचुकीने छाती झाकणे, स्त्रियांनी शिरोभूषणांऐवजी विविध केशरचना करून त्या सजवणे असे काही महत्वाचे लिंगाधारित फरक दिसतात.
पुढे मुघलांच्या काळात आणि नंतर ब्रिटिश काळात बघितले तर पुरूषांचे कपडे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन झाले आणि स्त्रियांच्या मूळ असलेल्या कपड्यांमधे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन प्रभाव असलेले बदल झाले. फ्युजन व्हावे तसे. हे ही गमतीशीर आहे. त्यामुळे कपड्यांवरून माणूस वाचायचा तर पहिला मुद्दा लिंगनिश्चिती आणि मग सामाजिक दर्जा आणि इतर हेतू असे आपसूकच झाले.
यालाच समांतर कालखंडात मध्यपूर्व व युरोपियन संस्कृतींमधे मध्ययुगीन काळापासून पुढे कपड्यांमधे लिंगाधारीत फरक असणे आणि असे फरक अनिवार्य होत जाणे हे दिसते. भारतीय उपखंडात आणि पाश्चिमात्य जगातही पितृसत्ताक संस्कृती घट्ट होत जाणे, माणसाचे समाजातले स्थान व भूमिका हे त्याच्या स्त्री वा पुरूष असण्यावरून ठरणे हे ही या काळात पक्के होत गेलेले दिसते.
नागर संस्कृतीमधे स्त्रियांची भूमिका सांपत्तिक आणि सामाजिक स्थानानुसार वेगवेगळी पण घरकाम, मुले, घरगुती गोष्टी, शोभेची बाहुली, संपत्तीचे प्रदर्शन याच वर्तुळात फिरत राह्यली. अमीरउमरावांच्या घरातल्या शोभेच्या बाहुल्यांनी आपापल्या घराण्याच्या संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी ज्या ज्या वस्तू परिधान करणे अनिवार्य होत गेले त्या सगळ्या वस्तू घोळदार, परिधान करण्यात वेळखाऊ होत्या. ठराविक प्रकारे बसणे, उठणे, चालणे सोडल्यास बाकी काही हालचाली करणे त्यात निव्वळ अशक्य होते. प्रबोधनकाळापासून बघितल्यास भरभक्कम गाऊन्स, कॉर्सेटस, आतमधले पेटिकोटसचे थर या गोष्टींचा अधिकाधिक किचकट आणि जडपणाकडे होत गेलेला प्रवास याची साक्ष देईल.
रोमॅन्टिक कालखंडातील स्त्री वेष
स्त्रियांनी आपल्याला बंधनात टाकणार्या वेशभूषेत बदल करून पुरूषी किंवा सोपी वेशभूषा (जी पुरूषी दिसत असे अशी) करणे हे साधारण रोमॅन्टिक कालखंडात युरोपात घडायला सुरू झाले. १८४० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेतील तेव्हाच्या स्त्रीवादी चळवळीतील एलिझाबेथ स्मिथ मिलर, सुझन बी अँथनी, एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, मिसेस स्टोन आणि अमेलिया ब्लूमर एक वेगळ्या प्रकारचा वेष घालायला सुरूवात केली. हा वेष रोमॅन्टिक कालखंडातल्या स्त्रियांच्या कपड्यांपेक्षा सुटसुटीत होता. पाश्चिमात्य जगामधे अश्या आकृतीचे काही आधी स्त्रियांच्या वेशभूषेत आले नव्हते. ढगळी आणि पायाशी चुण्या असलेली तुम्मान आणि वरती गुडघ्यापर्यंत येणारा घोळदार गाऊन असे साधारण या वेषाचे स्वरूप होते. अमेलिया ब्लूमरने ती संपादन करत असलेल्या ‘द लिली’ या स्त्रियांच्या नियतकालिकामधे या वेषाबद्दल प्रशंसापूर्वक लिहिले. तेव्हापासून या वेषाला ब्लूमर कॉश्च्युम असे नाव मिळाले. चळवळीच्या बाहेर हा वेश फारसा प्रचलित झाला नाही. टिकेची झोडही अर्थातच बरीच उठली. चळवळीचे उद्दीष्ट झाकोळायला नको या कारणाने काही काळाने या सर्वांनीच इतर सर्व स्त्रियांप्रमाणेच वेश पत्करला. परंतू तुम्मानला पाश्चिमात्य वेशभूषेत ब्लूमर्स असे नाव मिळाले. कालांतराने या तुम्मानची उंची कमी होत ती अंतर्वस्त्रात जाऊन बसली. लहान मुलींच्या कापडी, फुग्याच्या चड्ड्यांना आता जगभरात ब्लूमर्स म्हणले जाते.
ब्लूमर कॉश्च्युम
यानंतर पहिल्या महायुद्धाने बरेच काही बदल घडवले. सैन्यात भरती होणे पुरूषांना अनिवार्य ठरल्यामुळे अनेक कार्यालयांमधे स्त्रिया काम करू लागल्या. अर्थातच याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या कपड्यांमधे पडले. स्त्रियांच्या कपड्यांच्या आकृतीमधे जास्त सरळ रेषांचा अंतर्भाव होओ लागला. एस आकारातले एडवर्डियन कपडे कालबाह्य होत गेले. स्त्रियांसाठी कार्यलयीन काम करताना वापरण्यायोग्य कोट बनू लागले. हे अर्थातच पुरूषांच्या कोटापेक्षा वेगळे होते पण पुरूषांच्या कोटांमधले अनेक फिचर्स अस्तित्वात होते.
१९१० मधील स्त्रियांचा ऑफिस लुक
पहिले महायुद्ध संपून सगळे स्थिर होईतो स्त्रियांच्या कपड्यांच्या बाह्याकृतीमधे सरळसोटपणा आला. अगदी लहान कापलेले केस आणि शरीराचे आकार सहजगत्या न दिसू देणारी बाह्याकृती याला बॉयिश लुक असे म्हणले जाई.
बॉयिश लुक
यानंतर दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जेण्डर या गोष्टीचा विचारच वेगळ्या प्रकारे सुरू झाला युरोपात आणि त्यातून १९३० च्या दशकात मार्लिन डिट्रीचने या अभिनेत्रीने ट्राऊझर्स आपल्याश्या केल्या. या गोष्टींना स्टायलिश आणि फॆशनेबल स्थान दिले. याची चर्चा अर्थातच झाली. टिकेची झोड उठलीच. दिपिका रणवीरपासून आपले कपडे लपवून ठेवत असेल अश्या प्रकारचे विनोद तिच्यावरही झाले. फॅशन आणि लिंगभाव या विषयातल्या चर्चा आणि अभ्यासाला तिने जन्म दिला. टिकेची झोड उठल्यामुळे लगेचच संपून गेलेल्या ब्लूमर ड्रेस प्रमाणे हा नवीन प्रवाह मात्र अल्पायुषी ठरला नाही. स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारे पॅण्टस आपल्याश्या केल्या. मग ते लोण हळूहळू जगभर पसरले.
मार्लीन डीट्रिच
याला इतका काळ लोटलाय आणि पॅण्ट्स आणि जीन्स वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या इतकी झाली आहे की पूर्वी पुरूषांचे मानले गेलेले कपडे आता स्त्रियांच्या शरीराप्रमाणे वेगळ्या प्रकारे बेतले जातात. विमेन्स ट्राऊझर्स, विमेन्स शर्टस वगैरे. आता स्त्रियांनी पुरूषांचे कपडे घालायचे म्हणले तर एक्स्च्लुझिव असे फारसे उरलेले नाही.
युनिसेक्स म्हणजे कुठलेही जेण्डर न दर्शवणारे कपडेही मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. पण ते बहुतेक सगळे मुळातले पुरूषी या कप्प्यात असलेले कपडे आहेत. मेट्रोसेक्श्युअल पुरूषाने स्त्रियांचे म्हणावे असे कपडे क्वचित स्कार्फ आणि स्टोल वगळता आपलेसे केलेले नाहीत.
याच्यामागे लिंगाधारित प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचा हातभार मोठा आहे. जगभराच्या पितृसत्ताक संस्कृतींमधे पुरूषाला एका उच्चासनावर ठेवून मुळातून खूप कमकुवत आणि अहंकारी बनवून ठेवले आहे. स्त्रियांचे कपडे वापरणे याचा अर्थ आपल्या पुरूषत्वात कमतरता असा घेतला जाईल, स्त्रियांच्यासारखे कमी समजले जाईल की काय ही सुप्त भिती नक्की आहे. त्यामुळे रणवीर सिंग जेव्हा साडी, घागरा वगैरे कपडे घालून मिरवतो तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाला आणि पुरूषी अहंकारावर मात करण्याला आपसूकच दाद दिली जाते.
परंतू स्त्रियांनी जश्या पॅण्ट्स आपल्याश्या केल्या तसे पुरूषांनी साड्या, स्कर्टस आपलेसे करणे घडेल याची शक्यता मात्र कमी दिसते. लिंगाधारित अहंकार वगैरे लोप पावेल असे धरले तरीही ही शक्यता कमी दिसते. हे विसरता येणार नाही की आजघडीला स्त्रियांचे कपडे म्हणून जे कपडे आहेत ते उदयाला आले तेव्हा समाजातले स्त्रियांचे स्थान, करायची कामे हे सगळे पक्के ठरलेले होते. माजघर ते शोभेची बाहुली हा परीघ होता. आणि त्यामुळे कपड्यांमधे वावरायची, बसाउठायची सोय, सुटसुटीतपणा कमी आणि नखरा जास्त हा प्रकार नक्कीच होता. आजच्या स्त्रियांच्या म्हणल्या गेलेल्या कपड्यांमधे या गोष्टी दिसतातच. त्यामुळे सोय, सुटसुटीतपणा या मुद्द्यावर पुरूषांनी हे कपडे आपलेसे करणे फारसे शक्य दिसत नाही.
पण इतका वेळ आपण स्त्री व पुरूष या दोनच जेण्डर्सविषयी बोललो. तृतीयपंथी, शरीर एका जेण्डरचे व मन दुसऱ्या जेण्डरचे, लिंगबदल केलेले, ठराविक जेण्डरच्या कप्प्यात स्वत:ला बसवू न इच्छिणारे वगैरे अनेक लोक जगतात आहेत. ही सगळी वेगवेगळी जेण्डर्स मानली जाईन त्या त्या जेण्डरप्रमाणे कपडे असा बदल पुढच्या काळात दिसेल की सगळेच कप्पे बरखास्त होऊन कपड्यांमधे जेण्डरचा संदर्भच राहणार नाही या दिशेने कपड्यांची कहाणी पुढे जाईल हे सांगणे आत्ता तरी अशक्य आहे. परंतू सगळ्यांना मानवी समानतेवर वागवता येणे हे मात्र महत्वाचे आहे आणि कपडे व त्याला लागून येणारे लिंगाधारित पूर्वग्रह टाकून देणे हे त्यादिशेने पहिले पाऊल ठरेल.
- नी
(पुन्हा स्त्री उवाच या डिजिटल अंकात ८ मार्च २०२० रोजी प्रकाशित)
1 comments:
Superb Article.
https://mazisamruddhi.blogspot.com
Post a Comment