Friday, June 12, 2020

प्रमोदबन - २

प्रमोदबनच्या घरात दार उघडल्या उघडल्या समोरच्या खिडकीला लागून कडाप्पा होता. म्हणजे भिंतीत बसवलेला ओटा होता ज्याचा वापर एखाद्या साइड टेबलसारखा होत असे. त्याच्या खाली भिंतीमध्ये चपला ठेवायचे शेल्फ होते. त्याचे नाव कडाप्पा कारण त्या ओट्याला वरती कडाप्पा घातलेला होता. तसा तो स्वैपाकघरातही ओट्याला आणि भांडी ठेवायच्या फडताळसदृश जागेला घातलेला होता. पण स्वैपाकघरात होते ते ओटा आणि शेल्फ. हा बाहेर होता त्याचेच नाव कडाप्पा. त्या कडाप्प्यावर बसून गोष्टीचं पुस्तक वाचणे हा मला अक्षरओळख झाली तेव्हापासूनचा आवडता उद्योग होता. 
पुढे जेव्हा फोन आला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा कडाप्प्यावर झाली. आई जशी मावशीशी भरपूर वेळ फोनवर बोले तसेच आपणही कडाप्प्यावर बसून फोनवर बोलत बसावे असे मला नेहमी वाटायचे. आम्ही पुरेशी वर्षे त्या घरात राह्यलो असतो तर घडलेही असते. फोननंतर टिव्ही आला आणि टिव्ही बघायची माझी जागा मी कडाप्प्यावर नक्की केली. 
आईने घर एक्के घर हा मंत्र टाकून दिला तेव्हापासून मग कडाप्प्याचा वापर निरोपानिरोपीसाठीही होऊ लागला. 'यायला उशीर होईल', 'भात लावायचा आहे', 'मी वरती लीनाकडे खेळायला गेले आहे', 'नीरजाला स्काऊटला सोडून मी शशीकडे जातो.' वगैरे निरोप आई, बाबा, मी, अधूनमधून असणारे आजी आणि बापू एकमेकांना लिहून ठेवत असू. दार उघडल्यावर समोर चपला काढताना समोरच निरोप दिसल्याने, "मी वाचलाच नाही." वगैरे बहाणे करताच येऊ नयेत म्हणून तो बाहेरच्या खोलीत, कडाप्प्यावर लिहिला जाई. ही आयडिया बहुतेकतरी आईची असावी.
बाहेरचे कुणी आले की बारक्या पोरांना घरात पिटाळणे हे जनरितीप्रमाणे आमच्याही घरात होते. मग ते बाहेरचे कितीही इंटरेस्टिंग का असेनात. मला वाटायचे आपण कडाप्प्याखाली लपलो तर आपल्याला पिटाळणार नाहीत आतमधे. पण मी पडले बिचारी एकटीच. माझ्याकडे दुर्लक्षच होत नसे कधी.

पिटाऴल्यानंतर मी जायचे ते कडाप्प्यानंतरच्या महत्वाच्या दुसऱ्या जागेत म्हणजे सर्कशीच्या पडद्यामागे. त्या काळच्या बिल्डींगींमधे भिंतीला काटकोनात दुसरी दोन अडीच फुट खोल भिंत घालून मग त्यावरती माळ्याची स्लॅब घालत असत. खाली जे तयार होई त्याला आजकालच्या भाषेत क्लॉजेट स्पेस म्हणता येईल. अशी एक जागा होती स्वैपाकघरात. तिथे खाली वर्षाचे धान्य भरलेले डबेडुबे ठेवलेले होते. अजूनही इतर अनेक गोष्टी होत्या. माझे शाळेचे दप्तर तिथे असायचे. ती जागा पडदा टाकून झाकलेली होती. माझ्या तेव्हाच्या वयाला अनुसरून विविध कार्टून प्राणी छापलेल्या कापडाचा तो लांबरूंद पडदा होता. तो सर्कशीचा पडदा. पिटाऴल्यानंतर मी त्या पडद्याआड जाऊन बसे कारण बाहेर हॉलमधे काय बोलतायत हे तिथे व्यवस्थित ऐकू यायचे. कधी कधी स्वैपाकघरातून पिटाळली गेल्यावरही मी नजरा चुकवून पडद्यामागे जाऊन बसायचे. मी लहान असल्याने आईवडील आपल्यापेक्षा कावळे असतात हे मला तेव्हा माहित नव्हते. मला कळू नये असे काहीही इंटरेस्टिंग बोलायचे असेल तर आलेल्या लोकांशी अचानक इंग्लिशमधे बोलले जाई. माझ्या कानावर पडण्यासारखे असे ते तद्दन कंटाळवाणेच असे.
या छापलेल्या सर्कशीच्या पडद्याआड मी बरेच उद्योग केलेत. सर्कशीचाच पडदा. असर तो होनेवाला था! लालूकाका - म्हणजे माझा धाकटा काका - त्याने मस्कतहून आणलेले एकदम मस्त खोडरबर आणि टोकयंत्र, त्याने आणलेल्या रंगीत पेन्सिली, कुणीतरी भेट म्हणून दिलेली गोष्टींची पुस्तके आणि असेच बरेच काही जे मला शाळेत नेऊन खराब करायचे नाही असे सांगितले जायचे त्यातल्या दप्तरात मावण्यासारख्या त्या सगळ्या गोष्टी मी दप्तरात भरून शाळेत नेऊन मिरवायचे. हा उद्योग सर्कशीच्या पडद्याआडच केला जायचा. गोष्टीचे पुस्तक कपड्यात लपवून 'ध्यानमंदीरात' जाणे या उद्योगातही हा पडदा महत्वपूर्ण कामगिरी निभावायाचा. अर्थात यातले सगळे पकडले जायचे. मग 'प्रेमळ' भाषेत माझे समुपदेशन व्हायचे. त्या समुपदेशनानंतर, देवापुढे उभे राहून 'मी चुकले' असं म्हणायची खडतर शिक्षा व्हायची. त्यानंतर डोळे गाळायला मग सर्कशीचा पडदाच असायचा. तिथली ऊब आणि अंधुक उजेड मला बरे वाटायला लावायचा.

खिडकीपाशी कडाप्प्यावर बसून पुस्तके वाचणारी मी हे स्वप्न कधीतरी पुरे करायचे आहेच. त्यासाठी आणि एकूणच जगण्याची धडपड करताना मधे मधे हातपाय आत वळवून जगाशी संपर्क बंद करून, स्वत:च्या आत उतरत, स्वत:ला सावरत, स्वत:ला बरे करत थोडे थांबायचे असते तेव्हा मनातल्या मनात तो सर्कशीचा पडदा मी आजही गुंडाळून घेते.
- नी

0 comments:

Search This Blog